जिम कॉर्बेट - एक दर्शन

Submitted by वावे on 1 November, 2024 - 17:58

जिम कॉर्बेट या व्यक्तीविषयी माझ्या मनात आत्यंतिक आदर आहे. काही वर्षांपूर्वी त्याचं मॅन-ईटर्स ऑफ कुमाऊं हे पुस्तक पहिल्यांदा वाचलं आणि कॉर्बेटचं अफाट धैर्य, जंगल ’वाचण्याची’ त्याची असामान्य क्षमता, सर्वसामान्य माणसाबद्दल त्याला वाटणारी मनापासूनची कणव, लिखाणात मधूनच डोकावणारा खास ब्रिटिश मिश्किलपणा आणि या सगळ्याबरोबरच, आतून येणारा खराखुरा विनम्रपणा असे त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू मला खूप प्रभावित करून गेले. मग त्याची ’माय इंडिया’, ’ट्री टॉप्स’ अशी अजूनही काही पुस्तकं वाचली आणि त्याच्याबद्दलचा आदर वृद्धिंगत होत गेला. सध्या डफ हार्ट-डेव्हिस या लेखकाने लिहिलेलं ’हीरो ऑफ कुमाऊं’ हे त्याचं चरित्र वाचायला घेतलं आहे. तेही आवडतंय.

या पार्श्वभूमीवर जिम कॉर्बेट नॅशनल पार्कला जायचं ठरलं, तेव्हा नकाशात बघताना कालाढुंगी, हलद्वानी वगैरे नावं वाचून आपण आता ’कॉर्बेटच्या’ परिसरात जाणार, यामुळे छान वाटत होतं. कालाढुंगीला जिम कॉर्बेटचं, आता संग्रहालयात रूपांतरित केलेलं घर आहे. हे त्या कुटुंबाचं हिवाळ्यातलं निवासस्थान होतं. काही वर्षांपूर्वी नाशिकला कुसुमाग्रजांचं निवासस्थान बघताना मला जसा भारावून गेल्याचा अनुभव आला होता, तसाच मला आत्ता जिम कॉर्बेटचं घर बघताना आला.

corbett_house.jpg

या घरात जिम कॉर्बेटने वापरलेल्या काही वस्तू आहेत, त्याची काही पत्रं आहेत, काही फोटो आहेत आणि मुख्य म्हणजे लोकांच्या कॉर्बेटबद्दलच्या प्रेमाचं आणि आदराचं भरून राहिलेलं अस्तित्व आहे.

IMG-20241102-WA0000.jpg
.
house_interior.jpg
.
gun.jpg
.
intro_corbett.jpg

मॅगी, म्हणजे मार्गारेट ही जिम कॉर्बेटची बहीण. हे दोघेही आयुष्यभर अविवाहित राहिले. या बहीण-भावाचं एकमेकांवर खूप प्रेम होतं आणि मरेपर्यंत त्यांनी एकमेकांना साथ दिली. ज्यांनी जिम कॉर्बेटची पुस्तकं वाचली आहेत, त्यांनी जरूर जावं, असं हे संग्रहालय आहे. जिम कॉर्बेटवरची अजून दोन वेगवेगळी संग्रहालयंही याच परिसरात इतरत्र, थोडी लांब आहेत. मला तिथे यावेळेस जायला जमलं नाही. परत कधीतरी.

जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानात आम्ही एकूण दोन सफारी केल्या. एक सकाळी आणि दुसरी दुपारी-संध्याकाळी. दोन्ही वेळचे गाईड्स एकदम चांगले होते. ’वाघ बघणं’ हे आपल्यासाठी मुळात जरी तितकं महत्त्वाचं नसलं तरी तिथला एकूण माहौल असा असतो की आपल्यालाही ती सफारीतली सर्वात महत्त्वाची गोष्ट वाटायला लागते. सुदैवाने आम्हाला वाघ दिसला! (फोटो मात्र मिळाला नाही!)

jungle_path.JPG

सकाळी उजाडता उजाडताच पहिल्या सफारीला सुरुवात झाली. वातावरण सुंदर होतं. या सफारीत आम्हाला कोल्हे, हरणं, मोर, रानडुकरं असे काही प्राणी-पक्षी दिसले. संध्याकाळच्या सफारीत बरेच वेगवेगळे पक्षी दिसले आणि वाघ दिसला.

spotted_deer.JPG
चितळ
sambar.JPG
सांबर
jackal.JPG
कोल्हे
pied_bushchat_female.JPG
.Pied bushchat
flameback.JPG
सुतारपक्षी

DSCN5975 - frame at 0m0s.jpg
कापशी घार. ( हा फोटो नाही. व्हिडिओमधली फ्रेम आहे. ती हॉवरिंग करत होती, म्हणजे एका जागी उडत होती. स्पष्ट फोटो मिळाला नाही.)

common_stonechat.JPG
common stonechat
changeable_hawk_eagle.JPG
changeable hawk eagle
brown_shrike.JPG
गांधारी
barn_swallows.jpg

गंमत म्हणजे जीप ड्रायव्हर आणि गाईडनी आम्हाला सूचना दिलेल्या होत्या की कुठलाही प्राणी दिसला तरी उत्तेजित होऊन ओरडू नका, कायम हळू बोला वगैरे. पण झालं असं की हा वरचा तारेवर बसलेल्या भिंगर्‍यांचा फोटो काढायला आम्ही थांबलो होतो. कुठेही हरणं किंवा माकडांचे ’वॉर्निंग कॉल्स’ वगैरे नव्हते. फोटो काढून झाला आणि आता निघणार तितक्यात समोर साठ-सत्तर मीटर्सवर दस्तुरखुद्द वाघ रस्ता ओलांडताना दिसला. त्याबरोब्बर गाईड आणि ड्रायव्हर ’टायगर निकला है, टायगर निकला है’ म्हणून चक्क मोठ्याने ओरडले आणि ड्रायव्हरने जी जोरात गाडी पुढे नेली, त्यामुळे आम्ही, असा अचानक वाघ दिसला या घटनेपेक्षाही जास्त आश्चर्यचकित झालो असं म्हणायला हरकत नाही. आता तो वाघ कशाला तिथे थांबला असेल, असंही आम्हाला वाटलं. पण आमची जीप आणि आमच्या मागचीही जीप जिथून वाघाने रस्ता ओलांडला होता तिथे जरा वेळ थांबून राहिली. वाघ परत काही दिसला नाही. एकंदरीत त्या दिवशी फक्त आम्हालाच वाघ दिसला म्हणे! वाघानेही आम्हाला बघितलं असणारच. आम्ही तिथे थांबलेलो असताना तो कदाचित तिथेच गवतात बसलेलाही असेल, कुणी सांगावं.

आमच्या दहावीच्या मराठीच्या पुस्तकात सुनीता देशपांड्यांचा ’दर्शनमात्रे’ नावाचा धडा होता. आता त्यातलं खूपसं विस्मरणात गेलं असलं, तरी अशाच, जंगलात वाघ दिसण्याच्या अनुभवाचं सुंदर वर्णन होतं, हे आठवतंय. आम्हाला वाघाचं दर्शन अगदी काही क्षणच घडलं, पण त्यातला थरार जाणवायला ते काही क्षण पुरेसे होते.
सकाळच्या सफारीत वाघाच्या पावलाचे ठसे दिसले होते.
pugmark.JPG

कॉर्बेटने स्वतः वाघ या प्राण्याचं वर्णन ’ a large-hearted gentleman with boundless courage' असं केलंय! जिम कॉर्बेट या व्यक्तीचं वर्णन एका वाक्यात करायचं झालं, तरी याहून योग्य शब्द सापडणार नाहीत!

IMG-20241102-WA0001.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर चित्रदर्शी लेख आणि वर्णन.
Happy .
रच्याकने,
नकाशात बघताना कालाढुंगी >> हे गावाचं नाव एवढं comedy का आहे Proud

छान लेख
फोटो इतके कमी का? असे वाटते तुझे लेख वाचताना.
गावाचं नाव कॉमेडी आहे खरंच Lol
दर्शनमात्रे धड्याचं नाव आहे का?
ताडोबा जंगल, त्यांना बाबा आमटे घेउन गेलेले असतात, आणि वाघ दिसत नाही म्हणून बाबा ची देखील झालेली तगमग वै वर्णन आहे.
हा धडा वाचलेला / शिकवलेला तेव्हा आम्हाला सुनीताबाई / पुलं ह्यांच्या विषयी फारसे माहीत नव्हते.
बाबा आमटे विषयी थोडेफार माहीत होते.
दहावीत नसेल हा धडा बहुतेक. नक्की आठवत नाही.
पु लं चा उपास होता असे आठवतेय.

कुठल्या झोनमध्ये फिरलात? आणि राहिलात कुठे? कुठल्या तरी एका झोनच्या आत पण रहायला मिळते ना?

कान्हा, ताडोबासारखी व्यवस्थीत माहिती / ऑनलाइन बुकींग यांची नीट सोय नाही सापडली मला तरी.

घारीचा फोटो मस्त आलाय.

कुणी काही म्हणोत पण वाघ नाही दिसला तर मनातून खट्टू व्हायला होतेच थोडे तरी. कान्हाला मला वाघ निसटता दिसला होता. पण ताडोबाला मात्र अती दूरवर बसलेला वाघ (जो फक्त ४०० झूमनेच दिसू शकत होता), थोडा दूरवर पाण्याच्या काठावर बसलेला वाघ, अगदी जवळच्या गवतातून हरणांचा पाठलाग करणारी वाघीण, वाघांचे मेटींग असे मनमुराद व्याघ्रदर्शन झाले. त्यामुळे ताडोबा जरा जास्तच लाडके आहे माझे.

प्रत्येक जंगल हे वेगळे असते आणि तो वेगळेपणा अगदी आपल्यासारख्या नवागताला पण सहज जाणवतो. कान्हाचे जंगल खूप सुंदर आहे ताडोबापेक्षा.

लेख आवडला.उशीरा प्रतिक्रिया देतेय.
जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानाची सफर खूप छान वाटली होती.गाईडने हत्तीचा पाऊलठसा दाखवला होता.ओझरता हत्ती दिसला.धनेश आणि मोर पाहिले होते.

धन्यवाद सर्वांना Happy
किल्ली Lol आहे खरं असं नाव.
झकासराव, करेक्ट. हाच तो धडा. माझ्या मते दहावीलाच होता. 'उपास'पण त्याच वर्षी होता.
माधव, आम्ही सकाळी झिरना आणि संध्याकाळी ढेला झोनमध्ये फिरलो. दोन्ही वेळी ढेला गेटनेच आत गेलो. 'ढिकाला' झोनमध्ये आत जंगलात राहता येतं. पण ते नोव्हेंबरमध्ये सुरू होतं. आत्ता नसतं. आम्ही बिजरानी जंगल कँपमधे राहिलो होतो.
मनमुराद व्याघ्रदर्शन झाले >> भाग्यवान आहात.
माझा हा जंगल सफारीचा पहिलाच अनुभव होता. किरण पुरंदऱ्यांकडून खूप वेळा ऐकलंय की लोक वाघ बघण्यासाठी क्रेझी होतात, त्या नादात बाकीचं जंगल, बाकीचे प्राणी-पक्षी बघतच नाहीत. त्यामुळे आम्ही 'वाघ बघणं' असं उद्दिष्ट ठेवलंच नव्हतं. पण गाईड्स वाघाचा कानोसा घेतच होते. त्यामुळे आपोआपच आम्हालाही उत्सुकता लागून राहिली.
एक ग्रुप होता, तो म्हणे पाच दिवस रोज प्रयत्न करत होता, तरी त्यांना वाघ दिसला नाही. एवढी क्रेझ मला तरी नाही.

छान! अनुभव, लेख, फोटो..
मुंबईचे राणीबाग किंवा इथल्या कुठल्या प्राणी संग्रहालयात सुद्धा वाघाचीच क्रेझ असते. तिथेही त्याचा रुबाब वेगळाच भासतो. तर मग जंगलात मोकळा वाघ बघणे तर आणखी भारी अनुभव. लोकांना क्रेझ असणे स्वाभाविकच आहे. फोटो नसला तरी तो दिसला हाच अनुभव पुरेसा आहे ट्रिप लक्षात राहायला.
बाकी वाघाच्या नादात इतर मजा लुटायची राहिली असे होऊ नये हे बरोबर आहे.

“ पु लं चा उपास होता असे आठवतेय.” - ‘उपास’ अवतरणचिन्हात नसल्यामुळे वाचताना उगाचच गोंधळ झाला. Happy

त्या नादात बाकीचं जंगल, बाकीचे प्राणी-पक्षी बघतच नाहीत. त्यामुळे आम्ही 'वाघ बघणं' असं उद्दिष्ट ठेवलंच नव्हतं. >>> हो हो जंगल एंजॉय तर केलंच पाहिजे. एकही प्राणी नाही दिसला तरी जंगल मस्त एंजॉय करता येतं. पण त्या जंगलात वाघ आहे, तो एक दुर्मिळ प्रजाती आहे, भारताव्यतीरिक्त फक्त सैबेरीयात आढळतो, जंगलचा राजा ही बिरुदावली सार्थ करण्याइतकं देखणं, रुबाबदार जनावर आहे - हे सगळं अ‍ॅडअप होऊन 'एक वार तरी वाघ दिसावा' अशी सूप्त इच्छा असतेच. आणि ती पूर्ण नाही झाली तर मन थोडं निराश होतंच. म्हणजे ९९% आनंद जंगल देते पण उरलेला १% वाघच देउ शकतो. ९९% आनंद ही अवस्था खूपच छान आहे पण त्याहून १००% जास्त चांगले ना?

व्यक्तीशः मला वाघ जबरदस्त आवडतो आणि थंडीच्या दिवसात वाघ आणखीनच राजबिंडा दिसतो - फर कोट पूर्ण असल्यामुळे. उन्हाळ्यात गवत आणि झुडपे कमी झाल्यामुळे वाघ दिसण्याची शक्यता वाढते पण तेंव्हा त्यांची फर झडून गेलेली असते. मग ते रंग कमी होतात.

ही ताडोबातली वाघीण (बिजली)

धन्यवाद अनिंद्य, फेरफटका, ऋन्मेष. Happy
माधव, मस्त, दिमाखदार आलाय फोटो.
एकदा, म्हैसूरच्या प्राणिसंग्रहालयात गेलो होतो. तिथे सिंहही आहेत. पिंजऱ्यात असलेल्या सिंहाची भीती अशी वाटत नव्हती. पण त्याने काही कारणाने अचानक गर्जना केली. सर्रकन काटा आला अंगावर भीतीने Lol

छान लिहिलंय पण अजून हवं होतं असं वाटलं.
अरण्यं/अभयारण्य हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय.
गेल्याच मार्चमधे मी काॅर्बेटला जाऊन आलो. तीन रात्री मुक्काम होता, (दोन ढिकाला आणि एक गैराल) म्हणजे एकंदर सात सफरी झाल्या. एक भाग कधीचा लिहून झालाय पण फोटोज चिकार आहेत आणि ते अपलोड करायच्या विचाराने लेख मागे सारला जातोय. आता तुमच्या ह्या लेखामुळे पूर्ण करु शकलो तर ते श्रेय तुमचंच..

लेख सुंदर!

(उपास नववीत आणि दर्शनमात्रे दहावीत)

जिम कॉर्बेट अभयारण्य खूपच मोठं आहे, कितीही फिरलं तरी समाधान होत नाही
जिम कॉर्बेट चे घर आणि त्याकाळी वापरत असलेली प्राथमिक दर्जाची साधने बघून अचंबीत व्हायला होतं की कसा काय हा बेधडकपणे फिरला असेल जंगलात

त्यांची लायब्ररी पण खूप सही आहे, अनेक दुर्मिळ पुस्तके जपून ठेवली आहेत

खुप छान लिहिलं आहेस वावे.
गिर ला गेलो होतो आमच्या जीपच्या बाजूने किती तरी वेळ सिंह चालत होता अगदी शांत होता आणि अजिबात भीती वाटत नव्हती. पण थोडया वेळाने पुढे गेला, झाडाच्या बेचक्यातून मान बाहेर काढली आणि खुप मोठी गर्जना केली. काय भीती वाटली होती तेंव्हा.
एक सिंहीण आणि तिच्या अंगावर खेळणारी, उड्या मारणारी तीन गोजिरवाणी पिल्लं ही बघायला मिळाली होती. जंगलात कॅमेरा allowed नव्हता त्यामुळे फोटो मात्र नाही काढता आले.

अनिरुद्ध, प्रज्ञा, आशुचँप, मनीमोहोर, थँक यू!
मनीमोहोर, बापरे.. चांगलीच भीती वाटली असणार!
आशुचँप, लायब्ररी या घरात तरी नव्हती. दुसऱ्या संग्रहालयात असेल.

छान लेख आणि फोटो.

टायगर निकला है >> गाईड लोक ओरडण्याचा अनुभव फार विचित्र आहे

धन्यवाद शर्मिला आणि ह.पा.
गाईड ओरडले म्हणजे खूप मोठ्या आवाजात नव्हे, पण ओरडले खरे. त्यांनी किती तरी वेळा वाघ बघितला असेल पण तरी वाघ दिसण्यातलं थ्रिल, विशेषतः असा अचानक दिसल्यामुळे किती असतं, ते लक्षात आलं. किरण पुरंदऱ्यांनी चक्राताला एक सुतारपक्षी (जो तिथे अजिबात दुर्मिळ वगैरे नाही ) स्पॉटिंग स्कोपमधून बघितल्यावर जागच्या जागी अक्षरशः आनंदाने उड्या मारल्या होत्या आणि मला टाळी दिली होती. त्यातलाच प्रकार.

वावे,
निवांत वाचवण्यासाठी हा लेख राखून ठेवला होता.
फारच सुंदर आणि चित्रदर्शी लेख. अजून जास्त लिहिलं असत तरी आवडल असत. व्याघ्रदर्शन आणि त्यांचे फोटो यासाठी लोक फार आटापिटा करतात.
मला स्वतःला त्यापेक्षा इतर प्राणी, पक्षी, झाडे, जंगल, ते वातावरण पाहायला, अनुभवायला जास्त आवडत.
तो जंगलातील वळणाचा रस्त्याचा फोटो फारच सुंदर आहे.
दर्शनमात्रे फारच सुदंर धडा. त्यात सुरुवातीला बरच वेळ वाघ दिसत नाही म्हणून "ती वाघोबाच्या पंचांगातली निर्जळी एकादशी असणार" असे वाक्य होते बहुधा. जिम कॉर्बेट चा उल्लेख पण आहे बहुतेक.

ऋतुराज यांना मम. सुंदर फोटो, सुरेख वर्णन. दर्शनमात्रे धडा किंचित आठवला. कॉर्बेट यांचे 'a large-hearted gentleman with boundless courage' खरोखरच चपखल वर्णन आहे. वाघ हे एक अत्यंत देखणे जनावर आहे, मला सिंहापेक्षाही आकर्षक वाटतो. अशाच सहली करत रहा व छान छान लिहीत रहा. Happy

>>>> नकाशात बघताना कालाढुंगी >> हे गावाचं नाव एवढं comedy का आहे ?>>>>
वेगवे गळ्या भाषांत एकाच शब्दाचे अनेक अर्थ असतात.
उत्तरांचल मध्ये डुंगी म्हणजे दगड व तो दगड काळा असल्यास काला
इथे काळे दगड आहेत म्हणून काला डुंगी
The name of the town Kaladhungi orginates from a place where black dunga (stone) is found. Black refers to the iron content in the stone found in Kaladhungi. The town was a centre of a thriving iron foundry industry based on local ore and forest charcoal. The foundry can still be seen here.
मी त्या भागात ७ वर्षे राहिलो आहे!!

>>>> नकाशात बघताना कालाढुंगी >> हे गावाचं नाव एवढं comedy का आहे ?>>>>
वेगवे गळ्या भाषांत एकाच शब्दाचे अनेक अर्थ असतात.
उत्तरांचल मध्ये डुंगी म्हणजे दगड व तो दगड काळा असल्यास काला
इथे काळे दगड आहेत म्हणून काला डुंगी
The name of the town Kaladhungi orginates from a place where black dunga (stone) is found. Black refers to the iron content in the stone found in Kaladhungi. The town was a centre of a thriving iron foundry industry based on local ore and forest charcoal. The foundry can still be seen here.
मी त्या भागात ७ वर्षे राहिलो आहे!!

ऋतुराज, अस्मिता, धन्यवाद! रेव्यु, अर्थ सांगितल्याबद्दल स्पेशल आभार! Happy
ऋतुराज, तुम्ही लिहिल्यावर मलापण ते निर्जळी एकादशीचं वाक्य आठवलं. जिम कॉर्बेटचाही उल्लेख असेलच, कारण कॉर्बेट हा सुनीताबाईंच्या आवडत्या लेखकांपैकी एक होता.