आरोग्यवर्धक पेय- अमृतदूध - SharmilaR

Submitted by SharmilaR on 7 September, 2024 - 01:08

आरोग्यवर्धक पेय- अमृतदूध


खरंतर अमृतदूध ही द्विरुक्ती होतेय, कारण पुरेसं पोषणमूल्य असणारं दूध हेच मुळात अमृत आहे. पण ह्या अमृतासमान असलेल्या दुधाची चव आणखीन वाढवणं, हा अमृतदुध पेयाचा उद्देश!

मला स्वत:ला तर हे पेय एवढं.. एवढं.. आवडतं, की निव्वळ ‘आता ते प्यायला मिळणार’ हेच माझं पहाटे लवकर उठण्याचं motivation असायचं (नोकरीत असतांना सकाळी सातच्या आत घराबाहेर पडायला लागायचं).

कृती अतिशय सोपी आहे. (म्हणजे इतकी सोपी की, कुकर पण नं लावता येणारा नवरा.., बाहेरगावी एकटी राहणारी मुलं.. कुणीही ते करू शकतं.) करायला सोपं.., आरोग्यवर्धक.., चव अफलातून.., शिवाय पोटभरीचं! एक मोठा कप/पेला अमृतदूध घेतलं, की नंतर जेवणाच्या वेळेपर्यंत खायला प्यायला इतर काही नसलं तरीही चालेल.

तर करूया सुरवात-
रात्री झोपण्याच्या आधी आठवणीने चार-पाच मनुका, एक सुका अंजीर, चार बदाम पाण्यात भिजत घालायचे.

सकाळी (ब्रश करून झाला की, चहा करता करता) एका मोठ्या कपात/पेल्यात हा अंजीर, मनुके, आणि बदाम (हे सोलून, त्यामुळे पोषणमूल्य वाढतं) घ्यायचे. ज्या पाण्यात हे सगळं भिजत घातलं होतं ते पाणी (सटकन किंवा वेळ असल्यास चवी चवीने) पिऊन टाकायचं. (म्हणून ब्रश करून झाला की.. असं सांगितलं. बाकी उपाशी पोटी अंजिराचं पाणी पिण्याचे अनेक फायदे अधिक जाणकार लोकं सांगू शकतील.) हे अंजिराचं पाणी अतिशय चवदार असतं. (पण हे बायप्रॉडक्ट आहे. एक पेय करता करता दुसरं आपोआपच मिळतं!)

आता त्यातच (म्हणजे त्या मोठ्या कपात/पेल्यात! पाण्यात नाही. ते झालय पिऊन!) चार-पाच खजूर (धुवून, बिया काढून) टाकायचे. हे खजूर उत्तम प्रतीचे.. काळे.. लुसलुशीत.. असल्यास दुधाची चव अधिक बहारदार येते. आता त्यावर कपभर गरम दूध टाकायचं (आठवतंय.., तुम्ही चहा करत आहात!). आवडत असतील तर थोडे काजूही घालू शकता वर.

आता तुमचा चहा पिऊन आंघोळ वगैरे होईपर्यंत दुधात खजूर आणी अंजीर वगैरे मस्त मुरले असतात. दूधही पिण्याइतपत कोमट झालेलं असतं. तर आता मस्त मोठया चमच्याने त्याचा आस्वाद घ्यायचा. अ.. हा.. हा..हा.. हा..!!!!

हे खजुराच्या चवीचं दूध म्हणजे निव्वळ अप्रतिम!!!! (शिवाय अधून मधून चमच्यात येणाऱ्या मनुका.. बदाम.. तळाचा अंजीर आणि मस्त मुरलेले खजूर आहेतच गट्टम करायला!!!)

वरचे साहित्य फक्त एका कपासाठी (एका व्यक्तीसाठी) आहे. दुधासकट सगळं मीक्सर मधून भुर्र.. केलं तर स्मुदी होईल. पण तसं नं करता असं चमच्या चमच्या ने प्यायला आणि खायला जास्त छान तर लागतंच शिवाय फार पसारा नं करता एकट्या दुकट्या राहणाऱ्या मुला-मुलीला करता येतं.

करायला लागणारा वेळ:- चार बदाम सोलायला अन् चार पाच खजुराच्या बिया काढायला असा कितीसा वेळ लागणार?

एकदा तरी करून आणि पिऊन बघाच. (म्हणजे रोजच करावसं/प्यावसं वाटेल!)
*****

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभिनंदन
हे बरेच जणांनी करून बघितले असणार किंवा करतील नक्कीच Happy

अभिनंदन!

बाय द वे, बदाम सोलून का टाकायचे? उलट सालं चांगली असतात ना?

पाकृ आणि लेखन - दोन्ही मस्त Happy हे नक्कीच ट्राय करणार. हे दूध फ्रीज मधे ठेवून थंडही चांगले लागेल असे दिसते. खजुरांऐवजी खारकेची पावडर मिळते त्यानेसुद्धा एक वेगळी चव व टेक्स्चर येईल. खारकेची खीर जशी लागते तसे.

बाय द वे, बदाम सोलून का टाकायचे? उलट सालं चांगली असतात ना?>> बदामा च्या सालीबद्दल असे नसावे. त्यामुळे एरवीही खायला ते भिजवून आणि सोलून खातात.

इतके दिवस मी या धाग्यावर कुणाचेच आभार मानले नाहीत. ह्याचे कारण म्हणजे मी स्वतः पुरती स्वतः वर आचारसंहिता लावून घेतली होती. (धागा वर नं काढण्याची ).
आता मात्र मनापासून सर्वांचे खूप खूप आभार.
माझ्या आयुष्यात मी कधी कुठली रेसिपी टाकीन असे वाटले नव्हते. पण मायबोली मुळे तेही शक्य झाले.

अभिनंदन Happy

सोपी चविष्ट आणि पौष्टीक आहे ही रेसिपी

कसली गोड आहेस तू शर्मिला! धागा वर न काढण्याची आचार संहिता.हे बऱ्याच जणांच्या पटकन लक्षात येत नसेल, की स्वतःच्या धाग्यावर फ्रिक्वेन्ट आभार मानणे म्हणजे तो वर काढणे

अभिनंदन.

<< धागा वर न काढण्याची आचार संहिता.हे बऱ्याच जणांच्या पटकन लक्षात येत नसेल, की स्वतःच्या धाग्यावर फ्रिक्वेन्ट आभार मानणे म्हणजे तो वर काढणे >> +१

धागा वर यावा म्हणून काही जण मुद्दाम एडिट करत बसतात, ते दुसरे टोक.

Pages