"भारतीय सिनेमातील स्टार सिस्टीम"

Submitted by राहूलराव on 26 September, 2024 - 02:14

"भारतीय सिनेमातील स्टार सिस्टीम"
.
धुंडिराज गोविंद फाळके ऊर्फ दादासाहेब फाळके यांनी (हिंदुस्थान फिल्म कंपनी च्या माध्यमातून) निर्मिलेला हा मराठी व भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील आद्य चित्रपट, पहिला भारतीय मूक चित्रपट , राजा हरिश्र्चंद्र हा ०३ मे १९१३ रोजी मुंबई येथील कॉरोनेशन चित्रपटगृहात प्रदर्शित झाला, आणि भारतीय चित्रपट सृष्टीचा पाया घातला गेला.
भारतीय इतिहासातील ही एक महत्वाची घटना, म्हणावी लागेल.
मुळात चित्रपट कला , तिची विविध अंगे ही भारतीयांना नवीन होती.
सुरुवातीच्या काळात निर्मिती, दिग्दर्शन, छायाचित्रण, संकलन, वितरण, प्रदर्शन या साऱ्या जबाबदाऱ्या दादासाहेब फाळके (प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे) उचलत असत अशी नोंद आहे.
मुळातअगदी सुरुवातीला सिनेमात काम करायला लोकं, कलावंत मिळत नसत , अशी परिस्थिती होती असं वाचायला मिळतं.
विशेषतः स्त्रिया तर नाहीच नाही.
पण नंतर मात्र हळूहळू हे चित्र बदलत गेलं, बरेच कलावंत लोकं या क्षेत्राकडे आकर्षित झाले.
त्याच बरोबर , या व्यवसायात फायदा आहे हे पाहिल्यावर हळू हळू महाराष्ट्रातील आणि भारतातील अन्य प्रांतातील लोकं विशेषतः धनिक मंडळी या व्यवसायात उतरली. पण सिनेमा साठी कराव्या लागणाऱ्या रासायनिक प्रक्रिया या प्रामुख्याने मुंबई येथे होत असल्याने, मुंबई हे चित्रपट व्यवसायाचे स्वाभाविक पणे केंद्र बनले. नंतर चित्रपट व्यवसायाचा विस्तार देशभर (उदा. कलकत्ता , मद्रास इत्यादी) तसेच महाराष्ट्रात पुणे , कोल्हापूर अशा ठिकाणी झाला ही बाब वेगळी.
या काळात चित्रपट हे मूक चित्रपट होते , आणि ते ज्या चित्रपट निर्मात्या संस्थेने बनवले , त्या संस्थेच्या नावावर पाहिले जात असत. त्या चित्रपटात काम करणारे कलावंत लोकप्रिय होते, पण ते त्या चित्रपट संस्थेत पगारदार नोकर म्हणून काम करत असत. आपण जसे नियमितपणे नोकरीच्या ठिकाणी जाऊन काम करतो आणि दरमहा पगार घेतो, तसे हे लोक नियमितपणे ते ज्या चित्रपट निर्मिती संस्थेत नोकरी करत असत तिथे नियमाने रोज जाऊन काम करून महिन्याचा पगार घेत. ही पद्धत भारतीय चित्रपट सृष्टीच्या इतिहासात "स्टुडिओ सिस्टीम" म्हणून ओळखली जाते.
त्या नंतर तांत्रिक दृष्टीने सिनेमा मध्ये अनेक बदल घडले , १४ मार्च १९३१ रोजी प्रदर्शित झालेल्या "आलम आरा" चित्रपटापासून भारतीय चित्रपट जो आजवर मूक होता तो बोलू लागला.
१९३७ साली प्रदर्शित झालेल्या "किसान कन्या" या चित्रपटापासून भारतीय चित्रपटात सर्वप्रथम रंग आले आणि भारतीय चित्रपट जो आत्ता पर्यंत कृष्ण धवल होता तो रंगीत झाला.
अर्थात हे बदल पटकन स्वीकारले गेले असं नाही.
म्हणजे या बदला नंतर सुद्धा काही काळ मूकपट निघत राहिले , चित्रपट हा कृष्ण धवल राहिला, कारण हे नवीन तंत्रज्ञान सर्वांना परवडेल असे न्हवते (किंवा नसावेत).
पण हे सारे होताना , स्टुडिओ सिस्टीम ला मात्र धक्का लागला नाही, ती फारशी बदलली नाही.
कारण त्या काळात चित्रपट मूक होता , त्या मुळे संवाद वाचणे ,बोलणे वगैरे भानगड न्हवती. रूप , सौंदर्य असेल तर काहीसा अनपढ किंवा अशिक्षित माणूस पण चित्रपटात अभिनेता बनू शकत असे.
जेव्हा चित्रपट बोलू लागला आणि बऱ्यापैकी मुकपट संपले आणि बोलपट हे सरसकट निघू लागले तेव्हा मात्र अशा अशिक्षित अभिनेते/अभिनेत्री यांची पंचाईत झाली. कारण आता चित्रपटात संवाद होते, ते बोलावे लागणार होते , त्यासाठी पटकथा वाचावी लागणार होती.
या बदलाने बऱ्याच अशिक्षित अभिनेते मंडळींचा रोजगार हिरावला गेला.
पण तरी सुद्धा स्टुडिओ सिस्टीम , न बदलता सुरूच राहिली, फक्त आता कलाकार शिकलेला हवा आणि त्याला गाणे यायला हवे (कारण चित्रपटात गाणे असे आणि ते स्वतः गावे लागे), असा एक बदल झाला.
पण या दरम्यान युरोपातील एका घटनेने जागतिक पातळीवर सर्वंकश आणि अनेक परिणाम केले, ती घटना म्हणजे दुसरे महायुद्ध. मुळात युरोप खंडातील हे युद्ध तिथेच मर्यादित न राहता त्याच्या ज्वाळा या आशिया खंडा पर्यंत पोहोचल्या. असं म्हणतात की "युद्धात पहिली मरते ती माणुसकी आणि नंतर मरतात ती माणसे".
अगदी तसं काहीसं घडलं , आणि या युद्धाच्या धगीत भारतीय चित्रपट सृष्टी (अन्य देशातील चित्रपट व्यवसाया प्रमाणेच) सुद्धा होरपळून निघाली. त्याची अनेक कारणे होती.
एक म्हणजे चित्रपट व्यवसायाला लागणारा महत्वाचा कच्चा माल, पक्का माल (उदाहरणार्थ यंत्र सामग्री , रॉ फिल्म , ध्वनीमुद्रण सामग्री , कॅमेरे , फिल्म प्रोसेसिंग साठीची रसायने , फिल्म जोडण्यात वापरली जाणारी रसायने ) हे सारं युरोप मधून येत असे विशेषतः भारतीय चित्रपट सृष्टी या बाबतीत विशेष करून जर्मनी वर अवलंबून होती. त्याच्या पुरवठ्यात खंड पडला.
दुसरं म्हणजे या युद्धा मुळे जीवनावश्यक गोष्टींचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला , आणि या गोष्टींचा काळा बाजार करून धनिक झालेला नवश्रीमंत वर्ग चित्रपट सृष्टीत घुसला.
तिसरं म्हणजे आपण त्या वेळी पारतंत्र्यात होतो , ब्रिटिश आपल्या वर राज्य करत होते , त्या ब्रिटिश शासना तर्फे सुद्धा चित्रपट निर्मिती वर अनेक निर्बंध लादले गेले आणि विशिष्ठ प्रकारची परमिट (परवाना पत्र) असल्याशिवाय चित्रपट निर्मिती करता येणार नाही असे ब्रिटिश सरकार तर्फे सांगितले गेले.
जर मी चुकत नसेन तर एका चित्रपट निर्मिती संस्थेला एका वर्षात फक्त तीन चित्रपट निर्मिती ची परवानगी , या परमिट नुसार होती.
यात बऱ्याच चित्रपट निर्मिती संस्था डबघाईला आल्या , काही बुडाल्या.
आता हा जो नवश्रीमंत वर्ग चित्रपट सृष्टीत आला , त्याला फक्त धंद्याशी मतलब होता. त्यांनी अशी प्रथा सुरू केली की स्टुडिओ सांभाळणे , लोकांना पगार देत रहाणे असं करण्यापेक्षा चित्रपट बनवण्या पुरता एखादा स्टुडिओ भाड्याने घ्यायचा , लोकप्रिय कलाकार हे करार तत्वाने बांधून घ्यायचे , म्हणजे तो एक चित्रपट बने पर्यंत तो कलाकार आणि निर्माता एकमेकांशी कराराने बांधलेले असणार , एकदा चित्रपट बनला की तो निर्माता आणि तो कलावंत यांच्यात बांधिलकी नाही.
म्हणजे स्टुडिओ सांभाळा , त्याचा मेंटेनन्स पहा , लोकं सांभाळा , त्यांना पगार द्या ही कटकट उरली नाही.
ही नवी सिस्टीम फ्री लान्स पद्धत म्हणून चित्रपट सृष्टीत आली आणि हळूहळू भारतीय चित्रपट सृष्टीतील जुनी स्टुडिओ सिस्टीम मोडीत निघाली आणि फ्री लान्स सिस्टीम रुजली.
या फ्री लान्स सिस्टीम चं गोंडस अपत्य म्हणजे "स्टार सिस्टीम".
म्हणजे झालं असं की या फ्री लान्स सिस्टीम मध्ये सिनेमा कुणी बनवला याला (फारसं) महत्व न राहता, त्या सिनेमात काम करणारे कलाकार कोण आहेत? या बाबी वर सिनेमाचं यश/अपयश ठरू लागलं.
थोडक्यात सिनेमाची "फेस व्हॅल्यू" ही त्या सिनेमात काम करणाऱ्या कलावंत मंडळींवर , त्यांच्या लोकप्रियते वर ठरू लागली. हे सारे कलाकार स्टार म्हणून ओळखले जाऊ लागले. आणि स्टार सिस्टीम चा उदय झाला. थोडक्यात आता चित्रपटात काम करणारे कलाकार , त्यांची लोकप्रियता ही चित्रपट निर्माण करणाऱ्या संस्थेपेक्षा , निर्मात्या पेक्षा वरचढ ठरू लागली.
या ठिकाणी भारतीय चित्रपट सृष्टीत आणि एक बदल घडला त्याची नोंद घेणे आवश्यक आहे. १९३४ सालच्या चंडीदास या बंगाली चित्रपटात पार्श्वसंगीताचा यशस्वी वापर झाला आणि १९३५ साली प्रदर्शित झालेला "धूप छाव" या चित्रपटात उसना आवाज वापरणे (प्ले बॅक तंत्राचा) हा यशस्वी प्रयोग केला गेला. म्हणजे पडद्यावर गाणे साकारताना कलाकाराला स्वतः गाण्याची गरज उरली नाही. म्हणजे पार्श्वगायन करणारा गायक आणि त्याच्या आवाजावर पडद्यावर फक्त ओठ हलवणारा चित्रपट अभिनेता असं कॉम्बिनेशन तयार झालं. यातून पार्श्वगायक , गीतकार , संगीतकार , वादक यांची एक स्वतंत्र आणि समांतर संस्था चित्रपट सृष्टीत तयार झाली.
या पुढे रुपेरी पडद्यावर येणाऱ्या अभिनेत्याला स्वतः गाणे गाण्याची गरज राहिली नाही. त्याने त्या गाण्यावर ओठ हलवत फक्त अभिनय करायचा होता. या गोष्टीमुळे स्टार सिस्टीम ला आणखी थोडं खतपाणी मिळालं.
या काळातील काही गाजलेले स्टार्स म्हटलं तर वानगीदाखल आणि माझ्या माहिती नुसार मास्टर विठ्ठल , पृथ्वीराज कपूर , मास्टर निस्सार , झुबेदा , रुबी मायर्स उर्फ सुलोचना , दुर्गा खोटे यांची नावे घेता येतील.
पण खऱ्या अर्थाने साऱ्या देशभर गाजलेला आणि त्या काळच्या तरुण पिढीच्या गळ्यातील ताईत बनलेला स्टार म्हणून नाव घायचं झालं तर ते एकमेवाद्वितीय कुंदनलाल सैगल याचं घेता येईल. अर्थात सुरुवातीला तो कलकत्ता येथील न्यू थिएटर चा करारबद्ध कलावंत होता.
पण जशी त्याची लोकप्रियता शिगेला भिडली तसा त्याने कलकत्ता आणि न्यू थिएटर सोडून मुंबईच्या चित्रपट सृष्टीत फ्री लान्स कलाकार म्हणून आगमन केलं आणि बरेचसे हिंदी चित्रपट आपल्या स्टारडम वर यशस्वी केले. भारतीय चित्रपट सृष्टीतील अनेक यशस्वी स्टार्स मध्ये सैगल चा उल्लेख सर्वप्रथम आणि सन्मानाने होतो.
त्याचा पडद्यावरचा वावर , त्याचा तत्कालीन अभिनय , त्याचं गाणं हे तत्कालीन तरुण पिढीला भुरळ पाडून गेलं. तलत , मुकेश , किशोर कुमार , लता मंगेशकर हे सारे चित्रपट सृष्टीत करिअर घडवण्यासाठी आले तेव्हा त्यांचा आदर्श सैगल होता हे त्यांच्या अनेक मुलखातीत ऐकायला मिळत. मुकेशवर तर सैगल चा प्रभाव बऱ्यापैकी राहिला.
या नंतर नाव येतं ते अशोक कुमार यांचं. अशोक कुमार ची सुरुवात सुद्धा "बॉम्बे टॉकीज" या चित्रपट निर्मिती संस्थेचा एक भाग (संस्था चालक हिमांशू राय हे त्याचे नातेवाईक होते) म्हणून सुरू झाली.लोकप्रिय झाल्यावर त्याने सुदधा फ्री लान्स पद्धतीने चित्रपट स्वीकारायला सुरुवात करून स्टार सिस्टीम मजबूत केली. बरेच व्यावसायिक दृष्टया अत्यंत यशस्वी चित्रपट अशोक कुमारच्या नांवावर आहेत.
पैकी किस्मत हा त्याचा चित्रपट जवळ जवळ साडे तीन वर्षे तोबा गर्दीत चालला अशी नोंद आहे. हा विक्रम आजवर अबाधित आहे.
१९५० साल येता राज कपूर , दिलीप कुमार , देव आनंद या त्रयीचा उदय झाला आणि अशोक कुमार काळाची पावले ओळखून हळू हळू चरित्र भूमिकांकडे वळला आणि चरित्र अभिनेता म्हणून शेवट पर्यंत यशस्वी पणे कार्यरत राहिला.
इथं पर्यंत स्टार सिस्टीम चांगलीच रुजली होती .
पुढे राज , दिलीप , देव यांच्या काळात ती आणखी बहरली.
त्यांच्या यशाला पूरक ठरणारे रफी , मुकेश , किशोर हे पार्श्वगायक आणि नौशाद , शंकर जयकिशन , एस डी बर्मन यांच्या सारखे संगीतकार त्यांना मिळाले , आणि त्यांच्या लौकिकात आणखी भर पडली.
या तिघांचे स्वतंत्र प्रेक्षक होते. त्यांनी या तिकडी वर अपरंपार प्रेम केलं
दरम्यानच्या काळात १९६० च्या आसपास राजेंद्र कुमार चा उदय झाला , तो १९६७ पर्यंत यशस्वी पणे कार्यरत राहिला.
त्याने बरेच चित्रपट हे सिल्व्हर ज्युबिली करणारे दिले आणि तो ज्युबिलीकुमार या नावानेच ओळखला गेला.
त्याच्या ही यशात रफी चा आवाज आणि शंकर जयकिशन यांचं संगीत यांचा वाटा मोलाचा राहिला.
या सर्व काळात एक नोंद घ्यावी लागते , ती म्हणजे जरी स्टार सिस्टीम असली तरी दिग्दर्शक ही संस्था चित्रपट सृष्टीत आपला आब राखून होती. आणि दिग्दर्शक सुदधा त्या वकुबाचे होते. उदा.सोहराब मोदी, मेहबूब खान , व्ही शांताराम , बिमल रॉय , हृषीकेश मुखर्जी , गुरू दत्त , राज कपूर , विजय आनंद आणि अन्य. १९५० ते १९७० या दशकात हे स्टार्स जरी मोठे असले तरी ते दिग्दर्शका समोर दबून असत , त्यांचा मान ठेवत.
१९६९ साल चित्रपट सृष्टीत मोठं मन्वंतर घेऊन आलं. राजेश खन्ना या काहीशा नवोदित अभिनेत्याचा आराधना प्रदर्शित झाला , तो कमालीचा यशस्वी ठरला, आणि त्या नंतर त्याने सलग १८ सिनेमे ओळीने सुपर डुपर हिट दिले. असं म्हणतात की असं यश आजवरच्या चित्रपट सृष्टीच्या इतिहासात कुणालाही मिळालं नाही.
"सुपरस्टार" ही नवी संज्ञा त्याच्या काळात तयार झाली आणि त्यालाच मिळाली. याच्या अगोदर नुसते स्टार्स होते. आता सुपरस्टार आला.
स्टार सिस्टीम चं हे वैभवाचं शिखर असावं. तरुण पिढीनं विशेषतः तरुण मुलींनी केवळ , केवळ आणि केवळ राजेश खन्ना साठी गर्दी करून त्याचे चित्रपट वारंवार पाहिले. त्या वेळच्या तरुण मुली त्याच्या वर करत असलेल्या प्रेमाचे किस्से आजही सांगितले जातात. अगोदरच्या पूर्वसूरीं प्रमाणेच राजेश खन्नाच्या कारकिर्दीला सुद्धा किशोर कुमार चा आवाज आणि एस डी , आर डी यांचं संगीत यांचा प्रचंड फायदा झाला.
पण राजेश खन्नाची ही वावटळ काहीशी चार वर्षात थंडावली आणि १९७३ साली अमिताभ बच्चन या नवीन ताऱ्याचं आगमन झालं.
सुरुवातीला साधारण ११ चित्रपट अपयशी देऊन आता चित्रपट सृष्टीला रामराम ठोकावा का? अशा परिस्थितीत असताना त्याला सलीम-जावेद लिखित , प्रकाश मेहरा निर्मित, दिग्दर्शित "जंजीर" हा चित्रपट मिळाला. तो तिकीटबारी वर धो धो चालला आणि एका नव्या स्टार चा जन्म झाला.
जंजीर चं यश आणि अमिताभ चं सुपरस्टार होणं हे चित्रपट सृष्टीत मोठा बदल घेऊन आलं.
जंजिर, दिवार , त्रिशूल , शोले या अमिताभ अभिनित चित्रपटांच्या यशा नंतर भारतीय चित्रपट सृष्टीत संगीताचा प्रभाव कमी झाला.
या अगोदर प्रत्येक स्टार च्या यशात संगीतकार आणि पार्श्वगायकाचा मोलाचा वाटा होता.
उदा. राज कपूर-शंकर जयकिशन-मुकेश , दिलीप कुमार-नौशाद-तलत/ रफी , देव आनंद-एस डी बर्मन-किशोर/रफी, राजेश खन्ना-आर डी बर्मन-किशोर कुमार.
पण अमिताभच्या आगमनानंतर चित्रपट सृष्टीत संगीताचं महत्व काहीसं कमी झालं. दुसरा बदल झाला तो असा की १९५० ते १९७० च्या दरम्यान जसे प्रभावी दिग्दर्शक होते तसे या काळात उरले नाहीत , आणि दिग्दर्शक या संस्थेचा प्रभाव पूर्णपणे नाही पण काहीसा घटला.
पण तरी सुदधा दर्जेदार अभिनय , व्यावसायिक शिस्त , नशिबाची योग्य साथ आणि काळा बरोबर जुळवून घेणे या गुणांमुळे अमिताभ दीर्घकाळ यशस्वी राहिला . १९८० च्या आसपास कुमार गौरव, संजय दत्त , सनी देओल असे नवे तारे उदयाला आले , काही अंशी लोकप्रिय सुद्धा झाले. त्याच दशकात नंतर अनिल कपूर , जॅकी श्रॉफ यांचं पण पदार्पण झालं.
पण या साऱ्यांचा अमिताभला काही फरक पडला नाही. त्याचं स्थान अबाधित राहिलं आणि आजही तो चित्रपट सृष्टीत कार्यरत आहे. भले आज तो सुपरस्टार नसेल पण त्याचा दबदबा आजही आहे.
असो
१९८९ साल येता येता व्यावसायिक दृष्ट्या अमिताभ अपयशी होत गेला आणि परत अमीर खान , शाहरुख खान , सलमान खान हे तीन नव्या दमाचे स्टार्स उदयाला आले.
पण सुपरस्टार म्हणून जे काही असतं ते मात्र राजेश खन्ना आणि अमिताभ नंतर कुणालाही मिळालं नाही असं दिसतं.
हे तीन खान पण दीर्घकाळ टिकले , चालले , पण काळा समोर मात्र ते ही थकले आणि हृतिक रोशन हा नवा तारा उदयाला आला.
तो सुपरस्टार होईल अशी आशा होती आणि त्याच्या कडे तो वकुब पण होता. पण दीर्घकाळ तो ही वाटचाल करू शकला नाही आणि त्याच्या नंतर मोठा असा स्टार कुणी उदयाला आला नाही.
वर उल्लेख केलेल्या लोकप्रिय स्टार्स सोबत १९५०-६० च्या आसपास भारत भूषण , प्रदीप कुमार , १९६०-७० च्या आसपास शम्मी कपूर जॉय मुखर्जी, विश्वजीत , धर्मेंद्र , जितेंद्र , मनोज कुमार, शशी कपूर असे स्टार्स होते. १९७०-१९८० च्या आसपास धर्मेंद्र , जितेंद्र, शशी कपूर , शत्रुघ्न सिन्हा वगैरे टिकून राहिले .
नंतर च्या काळात अलीकडे अजय देवगण , अक्षय कुमार , सैफ अली खान हे पण स्टार्स होते.
पण हे सारे ऑल्सो रँन या कम्युनिटीत राहिले. त्यांना पाहणारा एक प्रेक्षक वर्ग होता पण ते सर्व स्तरावर लोकप्रिय न्हवते.
इथं पर्यंत येता येता (साधारण पणे २०१० च्या आसपास) स्टार सिस्टीम ला हळूहळू तडे जाऊ लागले.
आता असा एकही अभिनेता उरला नाही की ज्याच्या नावावर आसेतू हिमाचल सारे भारतीय थिएटरमध्ये गर्दी करतील. या काळात चित्रपट निर्मात्यांनी शक्कल लढवली. एका सिनेमात वेगवेगळे स्टार्स घ्यायचे आणि त्यांच्या फेस व्हॅल्यू चा फायदा घेण्याचा प्रयत्न करायचा.
(१९८० च्या दशकात असेच मल्टीस्टार कास्ट असलेले चित्रपट येत असतं त्याचीच ही पुढची आवृत्ती)
पण या साऱ्या दरम्यान सोशल मीडिया चं वादळ बऱ्यापैकी माणसाच्या आयुष्याच्या सर्व बाजूला उलटापालट करून गेलं. या सोशल मीडियाने चित्रपट सृष्टी सुद्धा प्रभावीत केली. यु ट्यूब , नेट फ्लिक्स , ऍमेझॉन प्राईम असे बरेच ओ.टी. टी. प्लॅटफॉर्म्स वेगवेगळे मनोरंजन घेऊन आले. थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहणे हा प्रकार काही अंशी कमी झाला. परदेशी चित्रपट सहज पाहता येऊ लागले. तरुण पिढी शैक्षणिक दृष्ट्या पुढारलेली होतीच , या सोशल मीडियामुळे ती अधिक चौकस झाली.
त्या मुळे एखाद्या अभिनेत्यावर प्रेम करणे , त्याचा चाहता असणे ही गोष्ट कमी कमी होत गेली
दरम्यान आणि एक संकट साऱ्या जगाने पाहिले त्याचा फटका भारतीय चित्रपट सृष्टीला ही बसला.
ते होते कोव्हिडं १९ चे संकट.
सारे जग या काळात जणू ठप्प झाले. एकत्र येण्यास , गर्दी करण्यास मनाई होती. थिएटरमध्ये जाणार कोण आणि ? चित्रपट पाहणार कोण?
या काळात वेब सिरीज नावाचे माध्यम इंटरनेटवर फोफावले. त्या माध्यमातून तरुण पिढीला घर बसल्या हवी तशी हवी तेव्हा करमणूक मिळू लागली.
आणि इथे मात्र मोडकळीस आलेली स्टार सिस्टीम पूर्णपणे कोसळून पडली.
कोव्हिड नंतर चित्रपट सृष्टी परत उभी राहिली पण स्टार सिस्टीम हळू हळू करत पूर्ण लयाला गेली असं आजचं तरी चित्र आहे.
आज लोकप्रिय झालेल्या चित्रपटात लोकप्रिय अभिनेते नाहीत , आणि ज्याच्या एकट्याच्या बळावर एक चित्रपट संपूर्ण भारतभर यशस्वी होईल असा स्टार नाही.
बधाई हो, ड्रीम गर्ल , लुकाछिपी , लापता लेडीज , ट्वेल्थ फेल, मुंज्या, असे काही चित्रपट वानगीदाखल घेतले तर हे सारे चित्रपट माऊथ पब्लिसिटी आणि कथानक यावर चालले आहेत.
थोडक्यात १९४०-४५ पासून दीर्घकाळ चाललेली आणि वेगवेगळ्या पिढयांनी वेगवेगळ्या स्वरूपात पाहिलेली "स्टार सिस्टीम" आता संपली असं आज म्हणता येऊ शकतं.
आता पुन्हा स्टुडिओ सिस्टीम चा उदय होणं अवघड आहे, पण भविष्यात (किंवा आताच) स्टुडिओ सिस्टीम सारखीच किंवा स्टुडिओ सिस्टीम आणि फ्री लान्स सिस्टीम यांचा संकर असलेली सिस्टीम पहायला मिळेल असं वाटतं.
बाकी सारं येणारा काळ सांगेल.
.
राहुल साखवळकर
सातारा.
२५ सप्टेंबर २०२४
(०३ अश्विन १९४६)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

पण सुपरस्टार म्हणून जे काही असतं ते मात्र राजेश खन्ना आणि अमिताभ नंतर कुणालाही मिळालं नाही असं दिसतं.>>>असहमत!
Chaos at Mumbai airport early today because...
https://m.rediff.com/news/commentary/2024/sep/26/chaos-at-mumbai-airport...
ह्या बातमीच्या सुरवातीलाच शाहरुख खानला Superstar म्हणून संबोधले आहे.

राजेश खन्ना याने सुपरस्टारपदाची जी जादू अनुभवली ती अख्ख्या हयातीत अमिताभच्याही वाट्याला आली नाही. खान्स, कुमार्स, कपूर्स हे तर त्या खिजगणतीतही नाहीत.

मात्र, अमिताभ खऱ्या अर्थाने शहनशाह ठरला यात शंकाच नाही. अभिनय, आवाज, उंची, डोळे, नृत्य, विनोद या सर्वच आघाड्यांवर सर्वांपेक्षा सरळ सरळ सरस!

ऋत्विक रोशन हा शेवटचा सुपरस्टार आहे असं काही वर्षांपूर्वी कुणी तरी बोललं होतं. मायबोलीवर पण नामोल्लेख न करता तो उल्लेख आलेला आहे. पण खरंच असं होईल असं वाटत नाही. मोठ्या पडद्यावर सिनेमा पाहणे बंद होईल कि नाही हे सांगणे अवघड आहे.

लहान मुलांना मोठ्या पडद्यावर सिनेमा पाहणे आवडतेच. त्याच्या साठी संपूर्ण कुटुंब सिनेमाला जाते. त्या मुलाला खेचून आणेल असा सिनेमा शक्यतो यशस्वी ठरतो. पाश्चात्य देशात त्यामुळे सुपरहिरोजचे सिनेमे निघत राहतात आणि आता त्यात त्या मुलासोबत येणार्‍या मोठ्यांनाही गुंगवण्यासाठी त्याला वैचारीक / मानसिक किंवा कसलीतरी अन्य बैठक देतात.

जगात जपान मधे सर्वात जास्त होम प्रोजेक्टर्स वापरले जातात. टिव्ही पेक्षा घरातच पडदा लावून पाहण्याचे प्रमाण त्या देशात जास्त आहे. तरीही तिथे हॉल मधे जाऊन सिनेमे पाहणे बंद होत नाही.

भारतात जोपर्यंत सिनेमा आणि क्रिकेट यांचे उत्सवी स्वरूप कायम टिकून आहे तोपर्यंत तरी सामूहिक रित्या सेलिब्रेशन साठी लोक जातच राहणार. दिवाळीच्या दरम्यान आलेले सिनेमे शक्यतो तसेच असतात. मिठाईचं ताट किंवा फराळ असावं अशा प्रकारचे.

तुम्ही हा लेख लिहीण्यासाठी घेतलेली मेहनत नक्कीच कौतुकास्पद आहे. वय साधारण पस्तिशीच्या आतच असावे असा अंदाज आहे. त्यामुळे जुन्या सिनेमांबाबत मागच्या पिढीकडून आलेला वारसा मिळालेला असण्याची शक्यता थोडी कमी आहे. भारतीय संस्कृती, परंपरा यात आता सिनेमाची सुद्धा भर पडली आहे.

काही काही तुमची निरीक्षणं छान आहेत. म्हणजे स्टुडीओ संस्कृती कशी गेली याबद्दलची माहिती नवीन आहे. दुसर्‍या महायुद्धाचा कसा परिणाम झाला हे सुद्धा तुम्ही दिले आहे. त्यामुळे लेख दखलपात्र नक्कीच आहे. शेवटी माहिती गोळा करताना जे संदर्भ दिले आहेत त्याची जंत्री दिली तर लेखाची खुमारी अजून वाढते.

मुळात, थोडक्यात या शब्दांचा अनावश्यक वापर कमी असता तर बरे झाले असते असे वाटून गेले.

"सिंगिंग इन द रेन" ह्या जीन केलीच्या चित्रपटात मूकपटातून बोलपटात झालेले स्थित्यंतर छान दाखवले आहे.

अरे खूप मस्त लेख आहे. स्टुडिओ सिस्टम ते स्टार सिस्टीम, मूक चित्रपट ते बोलपट, कृष्णधवल ते रंगीत, स्वतःच गाणी गाणे ते प्लेबॅक आणि सरतेशेवटी स्टार ते सुपरस्टार.. सगळेच मस्त मुद्देसूद आणि लेखाचा फ्लो कायम ठेवून आले आहे.

सुपरस्टारबाबत मतभेद होऊ शकतो असे वरचे काही प्रतिसाद बघून वाटत आहे. पण मला वाटते दिलीप देवानंद, ते राजेश खन्ना, अमिताभ ते आजचा सुपरस्टार शाहरूख यांच्या क्रेझची तुलना करताना स्थळ काळ सुद्धा लक्षात घ्यायला हवे. लोकांची आवड, कल, जमाना, बरेच फॅक्टर यात येतात. राजेश खन्ना आजच्या काळात असता किंवा त्याहून जुन्या काळात असता तर त्याची अशीच क्रेझ असती का याचे उत्तर शोधायला गेले तर ठामपणे हो किंवा नाही बोलता येणार नाही. मी तो काळ पाहिला नाही. तोच काय अमिताभचा काळ सुद्धा पाहिला नाही. आमच्या पिढीचा सुपरस्टार शाहरूख आहे त्यामुळे त्याला झुकते माप जाणे स्वाभाविक आहे. येत्या काळात मात्र इतर कोणी सुपरस्टार होणे अवघड वाटत आहे. म्हणजे राजेश खन्नाचा जमाना संपवायला अमिताभ आला. अमिताभ सुद्धा एका वयानंतर संपला आणि चरित्र अभिनेता झाला. त्यानंतर सुपरस्टारपदाची जागा घ्यायला शाहरूख आला. पण त्यानंतर मात्र त्याची जागा अजूनही घेतली जात नाहीये. या वयातही तो एका वर्षात पठाण जवान डंकी असे तीन चित्रपट देतो जे टोटल अडीच हजार कमावतात. जर कुठला नवीन स्टार या वयातील शाहरुखला सुध्दा रिप्लेस करू शकत नसेल तर शाहरूख जे म्हणतो ते बरोबरच आहे,
"I am the last of the stars" is a statement made by Shah Rukh Khan !

आणि हो, ऋतिक रोशन काही सुपरस्टार नव्हता. कहो ना प्यार है आला आणि पुढचा चित्रपट येईपर्यंत चार सहा महिन्यांसाठी त्याची तशी क्रेझ तयार झाली होती. त्यांनतर जसे रणबीर कपूर, रणवीर सिंग, शाहीद कपूर हे मोठे स्टार आहेत तसाच तो ही एक मोठा स्टार आहे असे म्हणू शकतो.

भारतीय सिनेमातील स्टार सिस्टीम>>> असे शीर्षक न देता "हिंदी सिनेमातील स्टार सिस्टीम" असे द्यायला पाहिजे. कारण साउथ मध्ये "सुपर स्टार्स"ची आपण कल्पनाही करू शकत नाही. तिकडे देवळे बांधतात लोक. सर म्हणताहेत तसे हे स्थळ काल सापेक्ष आहे.

बरोबर केशवकूल स्थळ सापेक्ष मध्ये साउथचा उल्लेख करणार होतो. पण लिहिताना एक काम आल्याने पोस्ट अर्धवट सोडली होती. नंतर पूर्ण करताना विसरलो.

जवान चित्रपटात शाहरुख खानने वडील झालेल्या विक्रम राठोड यांचा रोल जो काही रजनीकांत स्टाईल फुल्ल ऑन swag मध्ये केला ते पाहता तो तिकडे जन्माला आला असता तर एव्हाना त्याचे कित्येक मंदीर किंवा मस्जिद बांधली गेली असती असे वाटते Happy

लेख आवडला. निश्चितच चांगला प्रयत्न आहे आढावा घेण्याचा.

ज्याच्या एकट्याच्या बळावर एक चित्रपट संपूर्ण भारतभर यशस्वी होईल असा स्टार नाही >>> +१ . निदान आत्ताच्या फळीत हिंदी चित्रसृष्टीत तरी नाही.

https://www.youtube.com/watch?v=4sJY7BTIuPY Wink

लेख चांगला आहे. दुसर्‍या महायुद्धाचा परिणाम, जर्मनीशी संबंध वगैरे माहीत नव्हते. सुभाष घईच्या अनेक चित्रपटांची मी खिल्ली उडवली असली तरी ८० च्या दशकात एक दिग्दर्शक म्हणून त्याच्या नावाला वजन होते. त्याच्या पिक्चरमधे कोणीही असले तरी पिक्चर चालत असे आणि त्याची एक खास स्टाइल होती. आधी मनमोहन देसाई, प्रकाश मेहरा, सिपी, यश चोप्रा ई अमिताभ शिवाय काढत नसत (अपवाद सोडून), नंतर चोप्रा/जोहर सुद्धा काही ठराविक कास्ट मधेच खेळत. पण घई तसा अवलंबून नव्हता कोणावरच. इव्हन राम गोपाल वर्मा सुद्धा.

छान आढावा घेतला आहे.

राजेश खन्नाचा काळ मी पाहिलेला आहे, त्यावरुन सांगू शकते की अमिताभ सोडला तर त्यानंतरचा एकही स्टार ती उंची गाठू शकला नाही. प्रत्येकाचे करोडो फॅन्स आहेत पण राजेश खन्नाचा अख्खा देश एकत्रीत फॅन होता. मी तेव्हा लहान होते पण सावंतवाडीसारख्या छोट्याश्या शहरात त्याचे मेरे जीवनसाथी, हाथी मेरे साथी, कटी पतंग वगैरे चित्रपट रिलिज व्हायची लोक आतुरतेने वाट पाहात. रिलिज झाले की परत परत पाहात. मी त्याचे काही चित्रपट तेव्हा थेटरात पाहिले आहेत. गंमत म्हणजे राजेश खन्नाची अभिनयाच्या नावाने बोंब होती. पण त्याच्या डोळ्यात एक जादु होती, प्रत्येक मुलीला तो तिच्या प्रेमात आहे असे वाटे, प्रेमाचे संवाद तिच्यासाठी बोलतोय असे वाटे.

तो खुप लवकर बोजड दिसायला लागला. त्याने स्वतःकडे नीट लक्ष दिले असते तर कदाचित अजुन काही वर्षे त्याच्या त्या तीन फेमस स्टेप्स करत सुपरस्टार म्हणुन आयुष्य काढले असते. नेमके तेव्हाच जंजीरच्या रुपाने एक वादळ आले आणि रोमँटिक चित्रपट थोडे मागे पडले. ते स्वतःला सावरुन परत उभे राहतात तोवर राजेश दुर फेकला गेला.

जुना काळ तेव्हाच्या लिखाणातुन दिसतो. भालबा पेंढारकरांच्या आत्मचरित्रात तेव्हाची पगारदार नोकरीची पद्धत दिसते. मराठी चित्रपटातील अभिनेते त्यांच्याकडे पगारावर होते. सुलोचना, लता मण्गेशकर वगैरे उल्लेख वाचलेत.

जंजीर दीवार आठवले तेव्हा आठवले की किस्मत मधला अशोककुमारने रंगवलेला नायक हा पहिला अँटीहिरो.. डरने शाहरुखला जे स्टारडम दिले ते किस्मतने अशोककुमारला दिले.

राजेश खन्नाचं स्टारडम जंजीरच्या आधी धर्मेंद्रच्या एका वर्षी (१९७३) आलेल्या नऊ सिनेमांमुळे डामाडौल झालेलं होतं.

लोफर हा चित्रपट त्या वर्षीचा सर्वात जास्त कमाई केलेला सातवा क्रमांकाचा सिनेमा होता. यादों कि बारात आणि कीमत हे ब्लॉकबस्टर ठरले होते. जुगनू, , कहानी किस्मत कि हे सुपरहिट ठरले होते. फागुन मधे त्याचा स्पेशल अ‍ॅपिअरन्स होता. ज्वार भाटा, ब्लॅक मेल हिट ठरले होते. झील के उस पार सेमी हिट होता . यातल्या चार सिनेमात तो चोर होता. त्या आधीच्या वर्षी राजा जानी मधेही चोरच होता.

धर्मेंद्रच्याच लोफरमधल्या "आज मौसम " गाण्यामुळे रफीने कमबॅक केलं होतं.

धर्मेंद्र स्टार होता, सुपरस्टार नव्हता. अगदी कंसिस्टंट माणुस. अभिनयाच्या प्रांतात फारसा उजेड पाडु शकला नाही तरी उत्तम कथा लाभल्या, ऊत्तम गाणी लाभली. खुप देखणा होता, उत्तम शरीर संपदा होती जी त्याने टिकवुन ठेवली. १९६६ साली जितका देखणा दिसत होता तितकाच १९७६ सालीही दिसला. आल्सो रॅनच्या कॅटेगरीत सगळ्यात पुढे होता म्हटले तरी चालेल असा.
आधीच बिवाहीत आणि हेमासोबत स्टेडी यामुळे तरुणी बहुतेक त्याला स्वप्नात आणायचे टाळत असाव्यात, त्यामुळे त्याचा राजेश खन्ना होऊ शकला नसावा Happy Happy