आरोग्यदायी पेय - मेक्सिकन तेपाचे - अमितव

Submitted by अमितव on 17 September, 2024 - 13:57
तेपाचे

प्रत्यक्षात लागणारा वेळ * : ३ दिवस

लागणारे जिन्नस *:
Tapache-02.jpg
छान पिकलेला न सोललेला अननस.
Tapache-03.jpg
चार लवंगा
एक दालचिनीची लहान काडी
एक कप ब्राऊन साखर/ गूळ/ साधी साखर
पाणी
एक मोठी घट्ट झाकणाची बरणी

क्रमवार पाककृती *

ही मूळ मेक्सिकन रेसिपी आहे. अननसाची सालं काढण्यापूवी तो हलकासा धुवुन घ्या. फक्त पाण्याखाली धरा फार चोळू वगैरे नका.

सुरीने अननसाची सालं काढा. आपल्याला या कृतीत अननस नाही तर फक्त त्याची सालंच वापरायची आहे. साल काढताना थोडा सालीसरशी गर राहू दिलात तरी चालेल. मधला दांडा (कोर) ही वेगळा काढा. उरलेल्या अननसाचा शिरा करा, मोरांबा करा किंवा येता जाता खाऊन टाका.
एका मोठ्या बरणीत ही ओबड धोबड कापलेली सालं आणि मधला दांडा टाका.

त्यात एक कप ब्राऊन साखर टाका. मूळ कृतीत पिलांसिओ वापरतात. म्हणजे आपला गूळ सदृष. पिलांसिओचे कोनिकल तुकडे दुकानातून आणलेत तर ते वापरा. मी ब्राऊन शुगर वापरली. ती नसेल तर साधी साखर वापरलीत तरी चालेल. ब्राऊन शुगर फक्त रंगाला आहे. साखर आणि मोलॅसिस (काकवी?) वापरलीत तरी चालेल. साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता.

त्यात चार लवंगा आणि एक दालचिनीची काडी टाका.

आता यात अंदाजे पाणी घाला. मी साधारण दोन -अडीच लिटर घातलं. क्लोरीन नसलेलं पाणी घ्या म्हणतात, जेणे करुन पाण्यातला क्लोरीन हे बॅक्टेरिया मारणार नाही. आपल्या नळाचं पाणी थोडावेळ उघडं ठेवलं की सुद्धा म्हणे क्लोरीन उडून जातो. मी तसं टीव्हीवर एक एपिसोड संपेपर्यंत उघडं ठेवलं पाणी. फार विचार करू नका, आणि तेवढ्यासाठी क्लोरीन विरहित पाणी शोधत बसू नका. आहे ते पाणी वापरा. तेपाचे होतं. Happy

बरणी बंद करा, आणि उबदार जागी ठेवून द्या.
अननसाच्या सालीत जे सूक्ष्मजीव असतात त्यांचाच फक्त वापर आपण किन्वनासाठी करणार आहोत. २४ तास झाले की एकदा लाकडी चमच्याने मिश्रण हलवा आणि परत झाकण बंद करुन ठेवून द्या.
२ दिवसांनी फरमेंटेशन चालू झाल्याची चाहूल पृष्ठभागावरचे बुडबुडे आणि बरणी मोठी असेल तर वरच्या भागावर जमा झालेली पाण्याची वाफ करुन देतील.
Tapache-04.jpg
अजुन एक दिवस थांबा.
Tapache-05.jpg

तिसर्‍या दिवशी चव घेतलीत तर किंचित आंबट, गोड आणि थोडी मिरमिरणारी असेल.
आता ते मिश्रण गाळून शीतपेयांच्या रिकाम्या झालेल्या बाटल्यात भरुन फ्रीज मध्ये ठेवा. इथे इतर काचेच्या बाटल्या वापरू नका. फ्रीज मध्ये ठेवल्यावरही बुडबडे तयार व्हायची प्रक्रिया चालूच रहाणार आहे. त्यातून जे वायू तयार होतील त्याने प्रेशर तयार होऊन बाटली फुटायची शक्यता आहे. त्यामुळे असा दाब सहन करू शकेल अशीच बाटली घ्या.

तेपाचे गार करुन किंचित मिरमिरणारे, थोडं आंबट, गोड असंच छान लागतं. त्यामुळे दोन - तीन दिवसांपेक्षा जास्त बरणीत मिश्रण ठेवू नका. कार्बन डायऑक्साईड नंतर बाटलीत काढल्यावरही तयार होईलच पण तपाचेची चव फार बदलणार नाही.

फ्रीजमधे दोन आठवडे रहातं म्हणतात. पण चव आवडली तर तितकं टिकत नाही.
Tapache-06.jpg
प्रादेशिक : मेक्सिकन

तेपाचे प्रो-बायोटिक, पोटातील बॅक्टेरियासाठी चांगले, फरमेंटेशन झाल्याने जीवनसत्त्वे युक्त पचनास चांगले असते असं गूगल म्हणतो. थोडे बर्फाचे खडे घालून चवीला चांगले असते असं मी म्हणतो.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त. मला केंव्हाचा करायचाय हा प्रयोग. यावेळी गणेशोत्सवात करूया ठरवलेल्या प्रयोगापैकी एक हा प्रयोग होता. आळशीपणा नडला.
फक्त कंबुचा तयार आहे. पण त्यासाठी वेगळं विरजण लागते म्हणून इथे लिहू कि नको हे अजून ठरवलं नाहीये.
अननस हे माझ्या आवडत्या फळांपैकी असल्याने तपाचे आवडेल याची खात्री आहे. तपाचे केल्यावर इथे नक्की लिहिन मी.

मी असं ऐकलं/ वाचलं आहे कि किमान तिन दिवस तरी किण्वन प्रक्रिया होवू द्यावी. आतड्यांसाठी चांगले असणारे जिवाणू बनायला सुरवात तिसर्‍या दिवशी पासून होते. शिवाय बाहेरच्या तापमानाचा पण फरक पडेल ना? आयडियल बहूतेक २५ ते ३० सेल्सिअस असतं तापमान. यापेक्षा जास्त असेल तर किण्वन लवकर होते आणि हवे तितके चांगले जिवाणू मिळत नाहीत.

ठेवल्यावरही बुडबडे तयार व्हायची प्रक्रिया चालूच रहाणार आहे. त्यातून जे वायू तयार होतील त्याने प्रेशर तयार होऊन बाटली फुटायची शक्यता आहे. त्यामुळे असा दाब सहन करू शकेल अशीच बाटली घ्या.>> रोज झाकण हलके उघडून गॅस रिलीज केला तर असे प्रेशर येणार नाही ना?

(बायो एंझाईम प्रयोग करते तेव्हा असे करते मी. विसरल्यावर दोन वेळा रॉकेट उडलेय Lol )

अमित च्या वतीने मीच देते उत्तर -
रोज झाकण हलके उघडून गॅस रिलीज केला तर असे प्रेशर येणार नाही ना?>> हो. असं केलं तर चालेल. पण तरी जाड काचेची बाटली घेतलेली बरी. आणि बाटलीत वर जागा असू द्यावी. त्या गॅसमूळेच तर विकतच्या कार्बोनेटेड पेयांसारखा अनुभव येतो. त्यामूळे थोडा गॅस तर हवाच.

अल्पना +१.
पहिली बाटली जाड काचेची, मोठ्या झाकणाची घ्यावी. ती सुद्धा रोज उघडून मिश्रण ढवळायचं आहेच.
नंतर लहान बाटल्यात भरल्यावर रोज उघडून प्रेशर रिलीज केलं तर चालेल. पण लक्षात रहाणार आहे का? फ्रीज मध्ये राडा झाला तर? Proud प्लास्टिक नको असेल तर वरुन खटक्यांचं बूच लावता येणार्‍या काचेच्या/ सोडा/ बीअर अशा बाटल्यांत ठेवू शकता.

धन्यवाद कविन, अल्पना, कॉमी.
कॉमी, अगदी सोपी आहे. आणि काही प्रमाण असं नाही, चवी प्रमाणे. त्यामुळे चुकण्याची शक्यता ही नाही.
परत 'नो वेस्ट'!
अल्पना, ओके. तीन दिवसांनंतर चांगले बॅक्टेरिआ तयार होतात माहित न्हवतं. मी तीन दिवसांनंतर कमी तापमानाला फ्रीज मध्ये काढून ठेवतो. तसंही बाहेर ठेवलेलं पेय इथे दिलं तर संयोजक रागावतील. Wink
सगळी साखर बॅक्टेरियांनी खाण्यापूर्वीचं थोडं गोड, आंबट मिरमिरणारं असं आवडतं मला.

सालासकट फळं खावीत जसं की नारळ फणस अननस Happy ..कारण जीवनसत्व सालातच असतात. हा विनोद प्रसिद्ध आहे . पण इथे तर खरचं अननसाची साल वापरायची आहे. असो.
दिसतय मात्र भारी हो... गुळी साखरेमुळे रंग मस्तच आलाय.

चांगली वाटतेय रेसिपी. एक शंका: अननस सालावर बरेच पेस्टीसाईड असेल का?
(टिपिकल मायबोलीकर स्टाईल ने शंका: घरात बाप्पा पुढे ठेवलेली सफरचंद जास्त आहेत सध्या, हाच प्रयोग नीट धुवून सफरचंद सालावर करता येईल का?अननस घरी खात नाही कोणी.)

चांगली वाटतेय रेसिपी. एक शंका: अननस सालावर बरेच पेस्टीसाईड असेल का?>>> बहूतेक वेळा तेपाचे करणारे ऑर्गॅनिक अननस वापरतात. आपल्याकडे तसा अननस शोधणं पण एक मोठ्ठं काम होईल. पण बाजारातून अर्धवट कच्चा अननस आणून थोडे घासून धूवून , पूसून त्याला पिकू द्यावे. नैसर्गिक रित्या फळं पिकताना त्यांच्या सालींवर जिवाणू तयार होतात. फळं पिकणं ही सुद्धा जिवाणूंनी केलेली एक प्रक्रिया आहे. हेच सालींवरचे जिवाणू तेपाचे मध्ये किण्वन प्रक्रिया करतात.

सफरचंदाच्या सालींचे तर करता येणार नाही. पण सफरचंदाचे एक प्रोबायोटिक फिझ्झी पेय करता येतं. सफरचंद धूवून सालीसकट त्यांचा ज्युस करायचा. त्यात थोडं मीठ (शक्यतो आयोडिन नसलेलं समुद्री मीठ / खडे मीठ) घालून त्यात अर्धा चमचा दह्याच्या वरचे पाणी/ व्हे (साधारण २५० मिलि ज्युस असेल असं गृहित धरलं आहे) घालून काचेच्या बरणीत ३-४ दिवस झाकण बंद करून ठेवावं. तिसर्‍या दिवशीच त्यावर फेस दिसायला लागेल. चव घेवून बघ. अजून आंबटपणा चालत असेल तर अजून एखादा दिवस ठेवू शकतेस. नाहीतर तिसर्‍या दिवशीनंतर ज्युसच्या बाटलीत घालून फ्रीजमध्ये ठेव (७०-८०% बाटली भरून). मी मिल्कशेकच्या बाटल्या वापरते असे फरमंटेड पेय ठेवायला.
मला हा प्रयोग करायचा होता गणेशोत्सवासाठी. पण घरचे दही खूप आंबट वाटलं म्हणून केला नाही. दुसरं कारण सफरचंदाचा ज्युस करायचा कंटाळा आला होता. Proud

सॉरी अमित, तुझा धागा मी हायजॅक केला.

हायजॅक कसला! तुझ्या माहितीपूर्ण पोस्ट्स साठी धन्यवाद अल्पना.

ॲपल सायडर (फिल्टर न केलेलं, लोकल फार्म मधलं, मे बी फार प्रिझरवेटिव्ह नसलेलं) आणलं आणि लगेच संपलं नाही की ते टर्न व्हायला लागतं आणि त्याचं फसफसणारं पेय आपोआप बनतं. फक्त एकदा हवेच्या संपर्कात आलेलं पुरतं टर्निंग चालू व्हायला.

नक्की करून बघणार. हा प्रकार करून बघायचं खूप दिवस मनात होतं, पण रील बघून रेसिपीची फार खात्री वाटत नाही. मायबोलीवरची रेसिपी खात्रीची वाटते.

ह्याचे रिल पाहिले होते, घरचे अननसही होते पण करेन करेन म्हणत राहुन गेले. आता अननस लागले की नक्की करुन पाहिन.

रेसिपीसाठी मनपुर्वक आभार.

अमितव थॅन्क्स
ही रेसिपी नीट वाचून प्रतिक्रिया द्यायची होती
आता वाचली पूर्ण. मागे कधीतरी हे नाव ऐकले होते पण हा असा अननसाचा प्रकार असेल असे माहीत न्हवते.
बाकी हे नक्की करून पाहीन. आधी बरणी शोधावी लागेल.
एक संत्र्याच्या बायो एनझाईम साठी वापरली (शशक साठी सोललेली संत्रे Wink )
एक शंका, यासाठी साहित्यात लिहिलं आहे तसा गूळ वापरला तर चालेल ना?
तू आणि अल्पना यांनी आणखी मिरमिरणारी पेये शोधा आणि लिहा

आता पिलांसिओ शोधणे हे नवीन काम अंगावर कोसळले.

अरे साधा गूळ वापर. साखर/ गूळ हे बॅक्टेरियाचे खाद्य आहे. पांढर्‍या साखरेऐवजी ब्राउन शुगर/ काकवी/ गूळ वापरला की त्याला छान रंगही येतो हा एक आणखी फायदा. चवीत काही फरक पडू नये.
ताक : गुळात केमिकल्स काय असतात आणि त्यांचा काय फरक पडेल कल्पना नाही. तू कर आणि सांग.

ऋतुराज तू ऑर्गॅनिक गूळ घालून करुन बघ हायकाय नायकाय Proud

बायो एंझाईम मधे घातलाच असशील ना गूळ? त्यात ते जे काम करते तेच काम ते इथे करणार आहे म्हणून घाल तू गूळ Lol

पेय इंटरेस्टींग आहे. चव छान लागत असेल.

फक्त १ शंका. दिलेल्या प्रमाणात किती पेयं होतं ? कारण ह्यात तब्बल १ कप साखर आहे.

यावेळी साधारण तीन लिटर झालं आहे. एक कप साखर सुरुवातीला असली तरी सुक्ष्मजीव ती ब्रेकडाऊन करतात आणि आपण पितो त्या पेयात तितकी साखर नसते. शिवाय पिताना बर्फ घालून प्यायला छान लागतं.
काल गाळून बाटलीत भरताना चव घेतली तर थोडी कमी साखर चालली असती वाटलं. अर्थात तेपाचे काही एका वेळेला संपत नाही रोज थोडं थोडं पिताना गोडवा थोडा थोडा कमी होत जातो. पुढच्यावेळी ३/४ कप घालून बघेन.
सगळी साखर ब्रेक डाऊन झाली तर जास्त अ‍ॅसिडिक/ आंबट लागतं.

साखर, पाणी, अननस याचं प्रमाण, अननसाचा गोडवा, तापमान आणि फरमेंटेशनला लागणारा वेळ आणि आपल्याला कुठली चव आवडते आहे याप्रमाणे प्रयोग करुन थोडेफार फेरफार करतो. पण यात फेरफार करणं फार सोपं आहे. गोड वाटलं तर थोडं पाणी घालून अजुन एखाद दिवस बाहेर ठेवणे आणि रोज रात्री चव बघुन झोपणे असं करतो.

Happy पेय फारच इंट्रेस्टींग वाटले. आवडली कृती. उष्णता आणि आर्द्रता जास्त असणाऱ्या ठिकाणी किन्वण लवकर होत असेल ना? तरीही तीन दिवस मुरवत ठेवायचे आहे? पिलांसियो हा प्रकार माहीत नव्हता.

तरीही तीन दिवस मुरवत ठेवायचे आहे? >> हो. यात बाहेरचं विरजण ( कल्चर) टाकत नाही आणि सालीवरचे जीवाणू वापरतो म्हणून वेळ लागत असेल. वर अल्पना म्हणतेय तसे गट मायक्रोब कदाचित तीन दिवसांनी तयार होतात म्हणून ही असेल.
पहिले दोन दिवस साखर पाणी पितोय असं वाटतं, तिसऱ्या दिवशी चव बदलते.

फारच वेगळा प्रकार आहे. कधी ऐकलं नव्हतं. रंग छान दिसतोय. वर्णनावरून चवही छान असेल असं वाटतं.

या पाककृतीत जीवाणू वापरलेत, मग ही शाकाहारी मानावी का? (हे आपलं उगाच.)

सर्वांना धन्यवाद.
हे अल्कोहोलिक आहे का प्रश्न येईल म्हणून त्याची तयारी केली होती. जिवाणू - शाकाहारी अँगल डोक्यात नाही आला. Lol
इडली, डोसा, दही, ताक, तूप जितकं शाकाहारी तितकंच हे! Wink Proud जिवाणूंमुळे फळं ही पिकतात त्यामुळे फळं ही त्यात धरावी का काय विचारात होतो.

छान आहे. मी आपली रेस्टारंटमधेच मागवुन पिणार कारण घरी बाटल्यांवर बाटल्या फुटायची शक्यता.

नाव ऐकलं होतं पण इतका सोपा प्रकार असेल असे नव्हते वाटले. नक्की करून बघेन.

इथले फळवाले खूष होतील - त्यांचे अननस सोलण्याचे कष्ट वाचल्यामुळे. अननस सोलून मिळणे हे भारतातले (निदान मुंबईतले तरी) सुख आहे. इन फॅक्ट त्या अननसवाल्यांकडे अननसाच्या सालींचा ढीग पडलेला असतो. एका अननसाबरोबर बचकाभर साली फ्री - असे डील मिळू शकते. Wink