अदमुरं प्रेम (कथा)

Submitted by अनघा देशपांडे on 31 August, 2024 - 23:48

अदमुरं प्रेम(कथा)

चार दिवसाच्या पावसानं नदीकडं जाणारी पायवाट चिखलानं माखली होती. चिखलातच पाय रुतवुन रुतवून चालत चालत तिची गुरं आणि ती नदीकडं पोहोचली होती. गुरांना पाणी पिण्यासाठी हाकून ती नदीच्या एका काठच्या दगडावर बसून हातातल्या वाळल्या निंबाच्या काटकीनं पाण्यावर रेघोट्या मारत बसली होती. बाप चार रोज गावाला गेल्यामुळे लागलेलं काम निगुतीनं ती करत होती.
नदीच्या लगतचच रान गावच्या सरपंचाच होतं. तिथून येणारा घुंगुराचा आवाज गायीच्या गळ्यात बांधलेला घुंगरांचाच आवाज आहे हे तिने ओळखलं होत. पाठमोरी असूनही केवळ त्यांचा नाद ऐकून ओळख धरली होती. गायी आलेत म्हणजे गायी हाकायला हैब्या पण आला असणारं तिने ताडलं होतं. तिची आणि हैब्याची एकदम बालपणीची दोस्ती होती. अगदी सोनी बाळ असल्यापासूनची पण आताशा त्याच्या नजरेला नजर देणं तिच्यासाठी जिकरीचं झाल़ं होतं. कारण तिने त्याच्याकडे नजर फिरवली की त्याचे डोळे तिच्याकडच भिडलेले तिला जाणवायचे. ते तिला आवडायचं की नाही हे तिच तिलाच कळायचं नाही. पण अंगावरच्या कपड्याच एक टोक पाण्यात बुडून निथळून बाहेर आल्यावर अंगचटीला करुन बाकीच अंग कस ओलं ओलं कराव तस वाटत होतं. हैब्यानं पलीकडच्या रानातनं तिला हळी दिली.
"ए सोने अग तुझी गुर इकड पंचाच्या रानात घुसायलेत आवर त्यासनी"
"आलो आलो " म्हणत सोनी तिच्या गुरांना माघारी बोलावण्यासाठी तिथनं ताडदिशी उठली. उठून पळता पळता तिच्या पायातलं पैंजण निसटून जमीनीवर पडलं. पंचाच्या रानात गेलेली म्हसर तिनं त्यांच्या दावणीला धरुन ओढून आणली. तिची म्हसरं घेऊन ती घराच्या वाटेला लागली. तेवढ्यात पुन्यांदा हैब्याची हाक तिला ऐकू आली.
"अग ए म्हशे "
त्यो म्हशे म्हसराला म्हणणार नाही हे तिला ठाऊकच होतं. ती हाक सोनीसाठीच होती हे समजून ती थांबली.माग वळून बघितलं तसा हैब्या लांबचा तिच्या एकदम जवळ आला होता. त्याच्या जवळ येण्याने तिच्या काळजातली धडधड एकदम वाढली होती.
"तुझी एक वस्तु हाय माज्यापाशी"
"कसली? कोणची वस्तू? "
काल टीव्हीवर बघितलेल्या सिनेमातला हिरो पण असच काय तोंडातल्या तोंडात पुटपुटत होता. हिरॉईनला असच म्हणाला की तुझी कोणतीतरी गोष्ट हाय माझ्याजवळ मंग एक गुडघा टेकून म्हणाला तुझं दिल हाय माझ्यापास. ते बघितलेलं चित्रच तिच्या टकुऱ्यात सारख माग पुढं माग पुढं हिंदोळ्यागत झुलतं होतं. त्यामुळे हैब्याच्या तोंडून पण असच कायतर शब्द बाहेर पडणार म्हणून स्वप्नात हरवून बसली होती. तोच तिच्या पावलावर चढलेल्या मुंगीनं तिचा चावा घेताच तिचा तिलाच हिसका बसला. तशी एकदम भानावर येऊन म्हणाली?
"कोणची गोष्ट? "
"देतो पर मला कायतरी बक्षीसी पायजे? "
"बक्षीसी? ती अन काय? "
"तुमच्या घराच्या मागच्या बाजूला एकदम लै कंच अळंबी उगवलीय मला दे आणून मामीला सांगतो त्याची भाजी करायला"
बैलासारखी बुगी बुगी मुंडी आन तिच्या दोन वेण्या हलवत सोनी म्हणाली
"देतो की आणून पर कोणची गोष्ट हाय तुझ्याकडं"
हैब्यानं त्याच्या सदऱ्याच्या खिशातून तिच पैंजण हळूच बाहेर काढल.
तसे तिच्या चेहऱ्यावर भय आणि आश्चर्य एकदम दाटून आले. तिच्या डोळ्याच्या भोवती जमा झालेला भीतीचा पहारा एकदम हैब्याच्या आनंदाने जोरात किंचाळण्यामुळं पांगला. त्याच्या हातातनं तिच्या हातात पैंजण जाताना एक सुखावणारा स्पर्श तिला जाणवला. परंतु लगेचच तो नकोसाही वाटला. तिने ते पैंजण पायात चढवलं. ती तिची वाट तुडवत चालू लागली. तिच्या मागून लांबलेली हैब्याची सावलीही अंधाराच्या दिशेन जाऊन गुडूप झाली.

बाप गावाला गेल्यामुळे तिला घरात जायला नकोसेच झाले होते. पण आता रात्रीचा वेळ कुठ काढणार? तस तिच्या मैतरणीच शेजारीच घर होत पण आय बापाला चुगली केल्याखेरीज राहणार नाही .तेव्हा तिच्या पडतील त्या शिव्या पाठीवर गोंदवून घेऊन रात्र घरातच काढायची सोनीनं ठरवलं. सोनीला उशीर झालेला पाहून आईनं रागारागानंच चुलीची फुकणी फुकली.
"एवढा येळ कुठ व्हती? "
"कुठ म्हणजे म्हसरांना पाणी पाजलो नव्ह का? "
"व्हय पर तिन्हीसांज उलटून गेली. जास्त अंधारुन आलं की धारा देत नाय ठाव नाय का तुला? "
"ठाव हाय पर चूकी झाली. परत नाय व्हणार"
"परत म्या तुला तशी चूकी करून बी देणार नाय. मुकाट्याने तेवढी भाकर कर. मला जरा जाडच धर. लगोलग भांडी घासाया घे. मंगच गिळायचं"
"व्हय पर जरा भूक लागली व्हती. जरा खातो मंग करतो की भाकर"
"काय नगं. एकदा गड्यावानी मांड्या ठोकून बसली की उठायची नाय. काय कसलं कामाच वळण नाय काय नाय. खाण तशी माती. आडातच नाय तर पोहऱ्यात कुठनं येणार?"
"उगा माझ्या आईला काय नाव ठेवते. मला बोल काय बोलायच ते."
"आवाज खाली. नीट वागायचं. आता काय बापू नाय तुझी बाजू घ्यायला"
"मी नाही घाबरत कुणाला. तू माझी सगी आई नाहीस तरीपण तुला आई म्हणतो ध्यानात ठीव"
सोनीवर फणकारा काढतं तिची परकी आई म्हशीच्या धारा काढायला बाहेर गेली. दुसऱ्या आईचा राग भाकरीवर काढत सोनीनं दणादणा भाकरी बडवल्या. भाकरीला तोंडीला लावायला झुणका केला. झुणका करताना तिला हैब्याला दिलेला शब्द ध्यानी आला. त्याला अळंबी गोळा करुन द्यायचे तिनं पक्क केलं. त्याचबरोबर हैब्याचा नकळत झालेला त्याचा स्पर्श तिला आठवला. त्यामुळे तिच्या एकदम घशाला कोरड पडली. अंग सगळे फुलारुन गेले तसेच शहारुनही गेले. तव्याचा चटका बसताच स्वर्गातून पुन्हा धरणीवर आलेल्या सोनीनं आईच व तिच ताट केलं.
सोनीला जन्मल्यापासूनच सख्खा आईचं प्रेम ठाऊक नव्हतं. सोनीला जन्म देताच तिला तिच्या बापाकडं सोपवून ती देवाघरी गेली होती. बापानं तिच्यावर अगदी आईएवढाच जीव लावला होता. पण ती उणीव तो भरुन काढू शकत नव्हता. तेव्हा त्यानं पाव्हणापई लोकांनी दिलेला सल्ला मनावर घेतला अन दुसर लगीन करुन नवी आई सोनीच्या वाटणीला आणली. सोनीच्या दुसऱ्या आईला कधी मुल होणार नव्हतं. ही बात तशी सोनीच्या बापाच्या म्हणजे महाद्याच्या पथ्थावरच पडली. सोनीच्या सावत्र आईनं तिच्यावर सख्खा आईवानीच माया केली होती. सोनीला तर ठाऊकही नव्हतं तिची आई सौतेली आहे म्हणून.

पण एक दिवस-
शाळेचा दिवस संपवून सोनी घराकडं चालली होती. रोजची वहिवाटीची वाट न धरता दुसऱ्या वाटेनं निघाली. सोबतीला मैत्रिण चंपा होतीच. गावाला वळसा घालून येऊन गावाबाहेरच्या कल्लेश्वराच्या मंदिराजवळ येऊन दोघी पोहचल्या. तिथं जाऊन देवाला पाया पडून मंदिराच्या पटांगणात जरावेळ विसावल्या. विसावताच त्या दोघींच्या गप्पाला म्हंजे अगदी उत आला होता. अगदी शाळेतल्या मीनीच्या केसापासून शेजारच्या गावात चाललेल्या चोऱ्यामाऱ्यापर्यंत पुष्कळ गप्पांचा फड दोघींनी रंगवला होता. एरवी जरा कुठ म्हणून बोलायला संधी मिळाली की घरची सोबत येत नाहीतर "किती वटावटा करता ग. थोबाड मातीच असत तर फुटलं असतं" म्हणत दटावून सोडत. आज अडवणार कुणी नाही. कल्लेश्वराच्या मंदिरावरचा झेंडापण त्यांच्या गप्पा ऐकुन हवा तसा डोलत होता.

एवढ्यात-
सोनीला शेजारच्या वाड्यातली सुंद्रा काकी आणि शांता काकी येताना दिसल्या. एवढ्या लांब चंपा सोनी घरच्यांना न सांगताच आल्या होत्या. सांगून गेल्या असत्या तर घरच्यांनी सोडलंच नसत. नाहीतर कुठलं तर सोंगट सोबतीला धाडून दिलं असतं. एवढी मोकळीक मग दोघींना कुठ मिळाली असती. तेव्हा सोनीनं एक युक्ती लढवली. वडाच्या पाराच्या माग जाऊन दडायचं. या म्हाताऱ्या आज्ज्या बाहेर पडल्या की पुन्हा जाऊन पटांगणात बसायचं. तस चंपीला तंबी दिली आणि दोघीपण पाराच्या मागं दडून बसल्या. सोनीला तेव्हा दडून बसल्यामुळे तिच्या आयुष्यात सापासारखे दडून बसलेलं एक रहस्य समजलं.

गावच्या सगळ्या उकाळ्यापाकाळ्या काढत काढत सुंद्रा काकी नि शांता काकीचा विषय सोनीच्या घरापाशी आला तेव्हा सोनीनं अगदी मोरावानी कान टवकारले.
"काय एकेकीच नशीब असत बघ. एवढी गुणासारखी पोर हाय पर तिची आई देवानं हेरुन नेली."
"व्हय की पर दैवाचा डाव कसा असत्योय बघ, छायाला काय पोर हुणार नाही. पर तिची कुस काय वांझोटी ठेवली नाय देवानं, तिला सोनीसारखी पोर दिली. शिवाय तरणाबांड नवरा दिला"
"व्हय खर पर सुशीची सर नाही बघ छायाला. आता सुशी असती म्हणजे बापूचा संसार कसा रेघोट्यावानी छान ओढला असता. अक्षी लक्ष्मीवानी व्हती बग. ती असती तर बापूला पगाराची बढती मिळाली असती. कुणाला सांगू नगं त्याचा निम्मा पगार छायेच्या आजारपणातच जातो. दोन महिने गेल नै गेलं की तिला चार सलाईनच्या बाटल्या चढवायला लागत्यात."
"खर का खोट कुणास ठाऊक पर मला एकदा छाया म्हणत व्हती तिच्या माहेराची लै बिकट अवस्था व्हती म्हण. तिच्या पायात अवदसा म्हणून आईनं भावाकडं घाडली. तर तिथं बी तिच गत झाली. मामा जरा पडला शाहणा त्यानं हिच लगीन करुन दिलं. पण पोर होत नाही म्हणून नवऱ्यानं पण टाकून दिली. कुणाच्या तर मयताला बापू गेला व्हता तेव्हा हिच गाऱ्हाणं कुणीतरं गायलं त्याच्याम्होरं. तवा बापूलाच कुठनं पाझर फुटला आन हिथ तिला आसरा दिला. त्यांच लगीन बिगीन काय नाही. नुसता आसरा दिलाय बापूनं. पण आता ती हातपाय पसरायली बग. परवा बापूचा पगार झाल्या झाल्या निम्म्या पगाराचं नवकोर पातळं घेऊन आली. त्या पोरीच काय होतय आता कोण जाणे?"

त्या दोघींचे शब्द म्हणजे तापलेला शिलारस कानात पडावा तस वाटतं होतं. सकाळपर्यंत तिच्या आवडीचा डबा शाळेला करून देणारी तिची आई नसून कोणतरं उपरी बाई आहे हे समजल्यावर सोनीला तिच्या खऱ्या आईची उराउरी आठवण आली. पण तिचा चेहरा कसा होता कशी दिसायची हे ठाऊक नसल्यानं तिनं आभाळाकड केविलवाण्या नजरनं बघितलं. "ती आता हातपाय पसरायली बघ त्या पोरीच काय खरं नाही" हे शब्द पुन्हा पुन्हा माघारी येऊन तिच्या कानावर आदळत होते. तिच्या अश्रुंचा बांध फुटला होता. मातीनं मळलेला शाळेचा गणवेश आता तिच्या आसवांनी धूत चाललां होता. चंपा पाराच्या दुसऱ्या टोकाला असल्यानं सोनीच काय चालल आहे याची तिला खबरबातच नव्हती. त्या म्हाताऱ्या बायकांची मन मोकळी झाल्यावर त्या सुर्य पश्चिमेला चालला म्हणतं तिथन उठल्या. सोनीनं रडून रडून चेहरा लाल करुन घेतला होता. चंपीनं तिची बक्कळ समजूत घातली पण ती रडायची थांबेनाच. तिला आईची शपथ घालताच .ती शपथ तिनं मानली अन डोळ्यानं पाणी गिळून टाकलं. चंपी कितीवेळ रडायच कारण पुसत राहिली पण सोनीनं एकही शब्द काढला नाही. जिभेवर आलेला शब्द परतून लावला आणि घुम्यासारखी न बोलता घराच्या वाटेला लागली.

बापूचा जीव कुणावर जास्त आहे? तिच्यावर का माझ्यावर? ती आपल्या बापूला फसवित आहे. माझ्यापास्न दुर करतीये. एक दिवस बापू अन ती दोघ मिळून मला कुटून खाणार अशी संशयाची सुई ती जवळ सतत बाळगत राहिली. ती सुई तिला वारंवार बोचत राहिली. तिच्या शंंकेनुसारच तिला प्रत्यंतर येत राहिलं. तिच तिच्या परक्या वाटणाऱ्या आईसोबतचं वागण पार भाकरी परतून ती करपावी तसं बदलून गेलं होतं. तशातच जर बापू तिच्याशी आपुलकीनं बोललेले दोन शब्द बोलला तरी तिच्या अंगाची लाहीलाही होई. तिची परकी आई तर तिची नव्हतीच .अशा घडीला बापू सुध्दा तिला परका वाटे. अशाच एका रात्री स्वप्नातनं तिला जाग आली तेव्हा घराच्या बाहेर अंधारात बापू छायेला बिलगून मिठी मारुन बसलेला बघून तिच्या अंगाच तिळपापड झाला होता. तेव्हापासून तिची छायासोबतची तेढ वाढतच चालली होती. कुठल पाणी मुरलयं? काय होतयं?सोनीच्या मनात विषाचा वृक्ष झालाय याची बापूला दूरदूर कल्पना नव्हती. त्यान सोनीपासून खर दडवून ठेवून चूकच केली होती. ते सत्य खोदुन काढायकरता तिने उचलेली पहार धोक्याचीच होती, याची बापूला छायाला आणि स्वतः सोनीलाही कल्पना नव्हती.

सोनीची अशी चाललेली ससेहोलपट बहुधा कल्लेश्वराला सहन झाली नसावी म्हणूनच हैब्या नावाच साजिरवाणं प्रेम तिच्या आयुष्यात आलं होतं. आता तिच्या कळत नकळत तिच्या जिण्याचा आधार फक्त हैब्या होता. त्यात हैब्यानं पेन्सिलीनं तिच हुबेहूब चित्र रेखाटल होतं, तेव्हापास्न तर ती पार वेडीपिशी झाली होती. यात दोष तिचा नव्हता. तिच अडनिड वय तिच तिलाच आडव येत होतं. आरश्यात न्हाळताना शरीराचा बदलत चाललेला पिंड तिला सुखावतही होता आणि जाचतही होता. चालता चालता उफाळी बसली की अंगाला बसलेल्या हादऱ्यांनी पोरीचा जन्म तिला नकोसा वाटायचा. तोच पाठीवर रुळलेल्या कमरेपर्यंतच्या वेणीच्या केसाचा गोंडा हातात आला की तिच जगणं पुन्हा तिला मुलायम वाटायचं. अशातच निर्सग त्याची किमया दाखवतो तशी ती मोठी झाली. तिला न्हाण आल तेव्हापासून तीच जगाकड बघायची दृष्टीच पालटून गेली.

हैब्या तिचा एकदम जिगरी बालपणीचा दोस्त होता. तिच्यापेक्षा दोन चार वर्षे वयान थोरला होता एवढच. पण त्याच्यासंग भातुकली खेळता खेळता त्याच्याशी संसार करायच्या अदमुऱ्या स्वप्नात सोनी रमलेली असायची. लपंडाव खेळता खेळता त्याच्यासोबत संसाराचा डाव मांडावा असली वेडी कल्पना तिच्या मानगुटीवर भुतासारखी बसून राहिली होती. तशातच हैब्यान काढलेलं ते तिच मोहक चित्र. शिवाय वयाला शोभणारी हैब्यालाही त्याच्या पुरुषपणाची झालेली जाणीव. सगळ्याचा मिळून ताळा एकच लागतं होता. सोनीला हैब्या आवडत होता अन कदाचित हैब्यालाही सोनी आवडत होती. तस हैब्याच हे मुळ गाव नव्हे. त्याच्या मामाच्या गावी त्यो रहात होता. नावेनं नदी ओलांडली की येणार टेकावरच गाव त्याचं मुळच गाव. शाळा शिकायकरता मामाच्या गावात आलेला हैब्या इथच लहानाचा मोठा झाला. शाळा संपून नुकताच इंटर कॉलेजात गेला तरी त्याच इथल बस्तान त्यान हलविलं नव्हतं.

इकड सोनी घरातल्या पिटक्या आरश्यात तासनतास बघत राहयची. तिचे माश्यावानी असलेले नाजूक डोळे. गुलाबाच्या पाकळीसारखं असलेले ओठ, तलवारीसारख धारदार नाक, तलम कापडासारखे केस,मऊ सायीसारखी बाळस असलेल्या बाळासारखी गुबगुबीत त्वचा, तशात तिन्हीसांजेला घरभर उजळून निघावा असा तिचा सावळा रंग, तश्यात हैब्यानं तिच रेखाटलेले चित्र. तिची आरश्यावरन नजरच हटायची नाही. तरी हैब्यान ते चित्र रंगात डुबवल नव्हत ही कमालच म्हणायची. नायतर सोनी अगदी रंगाच्या पाण्यातच विरघळून गेली असती. स्वतःच्याच डोळ्यात डोळे घालून बघताना आरश्यातलीला पुसायची
"हैब्याचा पण माझ्यावर जीव असल का? त्यान चित्र काढलं म्हंजी असल सुध्दा, पर माझ्या एकटीच कुठ काढल? त्या बारक्या सुम्याच पण काढलयं. तरी बी माझ्याशी बोलताना त्यो येगळाच असतो. किती थट्टा करतो. शब्दात लै पकडतो. अन गप गुमान मला वळकटीवानी गुंडाळून टाकतो. पर चंपीशी बी असाच बोलतो. पर तिच कुठ चित्र काढलय? एक काम करतो दहा वीस करतो जर शंभर आल तर त्याच प्रेम हाय जर नाय आल तर नाय. असल सगळ करण्यापरीस त्यालाच विचाराव का? नाय बा एवढी हिंमतवान कुठ मी? आन बापूला समजलं तर झोडपून काढलं मला बी अन हैब्याला बी. मांग नाय काय कृष्णा मावशीची लेक गावातल्या कुठल्या पोरासंग जत्रेला गेलती. तवा घरच्यांनी तिच नाव टाकून दिलंत. मंग ती त्या पोरासंग पळूनच गेली. माझी त्याहून वाईट हालत करेल बापू. तसं आय काय बरी वागत नाही माझ्याशी पर बापूसाठी जीव जळतो. बापू शिवाय या जगात मला मायेच कुणी माणूस नाही. अगदी हैब्यालाही त्याची सर नाही यायची"
स्वतःच स्वतःत रमलेल्या त्या दिव्य पोरीला कितीवेळ झालं तिची परकी आई काहीतरी शिव्या देतीय याची खबरच नव्हती. आईनं कानाला चिमटा काढला तशी ती स्वप्नाच्या धुक्यातनं बाहेर आली. सभोवती जळलेल्या लाकडाचा धूर आणि करपलेला वास भरुन राहिला होता. गावातन माळव आणते म्हणून सांगून आई घराबाहेर पडली होती. जाताना चुलीवर तांदूळ चढवला होता. त्याला कड येईल म्हणून सोनीला ताकीद सुध्दा दिली होती. पण तांदूळ शिजून त्याचा पार कोळसा झाला होता. आईच्या रागाचा पारा पार गगनालाच भिडला होता
"कुठ लक्षय? कुठ? तरी सांगून गेलते. सगळा तांदूळ वाया घालविलास. "
"अग अये चूकून चुकी झाली. मी ते अभ्यासाच बघत होतो"
"व्हय ठाव आहे मला. पुस्तक मिटवून कुठला अभ्यास करती ते"
"खरच चूकी झाली. पुन्हा नाय अशी होणार"
"तर तर पुन्हा नाय होणार म्हणे. आता एवढ्यात बापू येईल जेवायला उपाशी रहायचीच पाळी आहे त्याच्यावर"
"शेजारच्या चंपीच्यातन आणू काय थोडा भात"
"काय नको. असले भिकेचे डोहाळे नकोत. तसही तुझ काय जातय. मरमर मी मरते राबते. तरी सगळं गाव सौतेलीच म्हणत. मला कुठ माया आहे तुझ्याबद्दल? तुला तरी हाय का माझ्याबद्दल माया?"

आयेच्या प्रश्नावर उत्तर देण सोनीन टाळलं. पायाच्या अंगठ्यानं आधीच भसका पडलेल्या जमीनीचा कोपरा उकरत राहिली. तेवढ्यात बापूचा दारातून घरात प्रवेश झाल्याने तापलेलं वातावरण निवळलं

तिन्हीसांज मालवली होती. रात्र हळूहळू पसरायला लागली होती. रानातनं दमून भागून आलेली लोकं पाट पाण्यासंग गप्पा करत गरम गरम जेवण हाणत होती. तर कुठ हापीसातन कंटाळून आलेली लोक दारातल्या वाऱ्यासंग अजून एवढी सुस्तावून गेली होती. तर इकड बापूच्या घरी वेगळेच चित्र होतं बापूच्या बिड्या संपल्या म्हणून त्याने कोपऱ्यावरच्या गुरुजीच्या दुकानातन विडी आणायला सोनीला धाडल होत. गुरुजीच्या दुकानापलीकडलं हैब्याच्या मामाच घर होतं. तेव्हा अगदी फुलावानी हरखून फुलपाखराच्या पाठीवर बसून सोनी दुकानाकडं आली होती. रात्रीची वेळ असूनसुध्दा दुकानाबाहेर अगदी देवाच्या दर्शनाला असावी एवढी तुडुंब गर्दी होती. गर्दीतच एका कोपऱ्यात सोनी घुसली तेव्हा पलीकडच्या कट्ट्यावर हैब्या त्याच्या दोस्तासंग टवाळक्या करत बसला आहे हे तिनं कान्या नजरेनं हेरलं होतं. दोघांमध्ये तस चिक्कार अंतर होतं. पण सोनीचे कान हैब्याच्या भाषेकडं होते. हैब्या काय बोलतो? काय सांगतो दोस्तांना.? यावर बारीक घारीसारखी ती नजर ठेवून होती. त्यांच्या टाळ्या पिटून चाललेल्या खिदळण्यावरन एवढच तिला कळालं की हैब्या त्याच्या दोस्तासंग चोरी छुप्पे रात्रीच्या तमाशाला जाणार होता. तिला त्याच हे वागणं अजिबात आवडलं नाही. जाता जाता त्याच्याशी दोन शब्द अदबीन बोलाव अस घरातन ठरवुन बाहेर पडली होती. परंतु त्याचे इरादे ऐकून तिनं बोलायचा बेत रद्द केला. त्याच्या अंगावरनच अगदी ओळख नसल्यागत निघून गेली. हैब्याला ती आलेलीच ठाऊक नव्हती त्यामुळे गेलेल्याचा मागमूस काढायचा काय संबंधच नव्हता.

सोनीला हैब्याचा वाईट्ट म्हणजे वाईट्ट राग आला होता. हैब्याला शहाणा समंजस समजत होती. बाकीच्या वाह्यात पोरात अन हैब्यात जमीन अस्मानाच अंतर आहे अस सोनी मानत होती. पण हैब्या सुध्दा बाकीच्या पोरांसारखाच वंगाळ आहे अस मनातल्या मनात तिन किती वेळा घोकलं होतं. आता काय झालं तरी हैब्याशी बोलायच नाही. हसायच तर बिलकुल नाही अशी स्वतःचीच स्वतःला ताकीद दिली होती. पण ती अमलात आणायला हैब्या तिला भेटलाच कुठ होता.?
त्या दिवशी-
छायाची बहीण चार दिवस पाव्हणी म्हणून सोनीकडं रहायला आली होती. तिला घालवायला म्हणून एस टी स्टँडवर सोनी आली होती. फलाटावर गाड्या येत होत्या जात होत्या. पण पाव्हणीची गाडी कुठं घुटमळली होती त्याच्या ड्रायव्हरलाच ठाऊक होतं. पाव्हणीच्या सांगण्यावरन चार वेळा सोनी ऑफिसाच्या खिडकीत बसलेल्या मास्तरकडं चौकशी करुन आली होती. त्या मास्तरन आता येईल एवढ्यात अस म्हणून तिची दरवेळी परतवणी केली होती. शेवटी कंटाळून पाव्हणी रस्त्यावरच उकीडवं बसून मिसरी चोळत बसली होती. पाव्हणीनं आणलेला नवा कोरा ड्रेस लगेच मिरवायकरता सोनी घालून आली होती.आता त्यो लगेच मळायला नको म्हणून तिच्याच पिशवीच्या बोचक्यावर बुड टेकवून सोनी बसली होती. आता याच्यापेक्षा उशीर झाला तर पोचायला उशीर होणार म्हणून पाव्हणीचा जायचा बेत जवळ जवळ रद्द होत आला होता. शेवटी कुठलासा मुहुर्त साधून पाव्हणीची एसटी वेळेत आली. तिच्या पिशव्या एसटीत चढवून तिला जागा करून देऊन सोनी एसटीतन खाली उतरली. खिडकीतन हात हलवत पाव्हणीन पण निरोप घेतला. गाडी स्टँडबाहेर पडायकरता पाठमोरी झाली.
एवढ्यात पलीकडच्या फलाटावर थांबलेल्या एसटीतनं सामानाच बोचक घेऊन उतरलेला हैब्या तिला दिसला. पाचोळ्यात विस्तवाची ठिणगी वाऱ्यानं विझून गेल्यावर पुन्हा वाऱ्यानच ती चेतवावी तसं सोनीच्या रागाच झालं होतं. तिन हैब्यावर अबोला धरला होता. पण तिचा अबोला पकडायला हैब्या थाऱ्यावरच कुठं होता? पण आता आलेली संधी दवडायची नाही अस तिन ठरवलं. त्याच्याकड अगदी काचेसारखं आरपार बघायचं पण त्याची ओळख धरायची नाही. अस मनात योजून तिन त्याच्याकड पाठ फिरवली. तिच्या पाठमोऱ्या सावलीला त्याच्या हाका ऐकू आल्या पण तिनं बहिऱ्याच उसन सोंग घेतल होतं. अखेर हैब्याच्या धावत्या पावलांनी सोनीला गाठलं. त्यान तिची वाट अडवली. त्याच तोंडभरून असलेलं हसू अन धापलेल्या आवाजात असलेलं तिच नाव ऐकून तिचे सगळे मनसूबे कोसळले. त्याला धडा शिकवायचा त्याला अद्दल घडवायची हे सगळे पत्याचे बंगले धाडकन कोसळले.
"अग किती हाका मारत्योय मगाधरन काय चंपीवानी तू पण किंवडीं बिंबडी झाली काय? "
चंपीला किंवडी म्हटलेलं ऐकून सोनीला हसु फुटलं त्यात तिचा रागाचा एवढा मोठा हत्ती पोहून गेला तस लगेच साधारण आवाजात म्हणाली
"नाय मला तर नाय ऐकू आला तुझा आवाज"
"असलं असलं. अग ह्या एसटी धुर फुकत जातात त्या फुकणीच्या आवाजान ऐकू आल नसलं. "
"ते समदं ठीक हाय. तू कोणच्या गावाला गेलता?का तमाशा बघाया गेलता? "
"ए तुला कस कळलं? चंपी बोलली काय? तर तिच्या भावाला मी दरडावलत त्या पोरीस्नी काय कळता कामा नये"
"चंपी नाय बोलली मला. मीच ऐकल होत स्वतःच्या कानानं. तु माझा बालपणीचा दोस्त हाय म्हणून सांगते. असल तमाशाला जाण मला आवडतं नाय. आणि जायच असल तर माझ्याशी लगट करु नको"
सोनीच्या रुसव्यात काठोकाठ भरुन आलेल हैब्याबद्दलच प्रेम हैब्याला पहिल्यांदाच जाणवलं होतं. पण या प्रेमाच काय करायच होतं? तो काय करणार होता? त्याचं त्यालाच ठाऊक नव्हतं. पण तिच्या रागापेक्षा त्या माग उभ राहिलेल तिचं निचळ प्रेम पाहून त्याची त्यालाच भूल पडली होती. तो एक क्षणभरात सगळया विश्वाला पालथ घालून तिच्यापुढ्यात मौनाचे खडे मोजत थांबला होता. प्रेमात पडलेली माणस कितीही काळापल्याड जायचा प्रयत्न करू लागली तरी व्यावहारिक जगत त्यांना पुन्हा त्रिमितीय जगण्यात खेचून आणतं. तस शेजारच्या टॅम्पोच्या हॉर्नच्या भोंग्यान तो भानावर आला.
"अग नाही चुकल माझ. पुन्हा नाही अस होणार. तुला तक्रार करायची संधी पण देणार नाही"
"ठीक हाय. पण तू कोणच्या गावाला गेलता? "
"अग कोणचं गाव काय? आमच्या घरीच गेलतो. आईन बोलावण धाडल होत. जरा काम होती दोन तीन. "
"आर मग एसटीन? "
"अग व्हय नावेनच जाणार होतो पण संपत मामा चार रोज कुठ गावाला गेलेत. तुला तर ठाव हाय गावात तर एकच नाव हाय. आणि बोलावणं तातडीच होतं"
"का र तातडीच? समद बर हाय ना घरी तिकडं"
"अग व्हय व्हय समदी बरी हाईत बा जरा फणफणला होता तापानं. रानात लावण करायची होती म्हणून बोलावल होतं. बर मी म्होर जाऊ काय? ह्यो त्यात्या टेलर डोळे वटारुन तुझ्या माझ्याकडं बघायलाय. त्याला गावाला सांगायला चर्चेचा विषय नको. आपण बोलायचो चांगल्या हेतून त्यासनी ते भलत वाटत"
"खरय तुझ. जा तू तुझ्या वाटेनं मी मागन येते"
हैब्याच्या खांद्यावर असलेल्या सामानासोबतच त्याच्यावर पडलेल्या जबाबदारीच्या ओझ्याखाली तो नेहमीपेक्षाही अधिक सुंदर असा सोनीला वाटला.

सुट्टीचा दिवस असून पण सोनी तिच्या शाळेचा अभ्यास करायच नाटकचं करत होती. बापू घरात असल्यामुळं दुसर काही करायला तिला वाव पण नव्हता. ऐतवारचा दिस असल्यामुळं चंपीच्या घरी माश्याचं कालवण केलं होतं. ती मेजवानी वरपायकरता चंपी सोनीला बोलावयला आली होती. अभ्यासाच पात्र वठवून सोनी पण कंटाळली होती. बापूची परवानगी मिळताच. अभ्यासाला घेतललं पुस्तक वही दप्तरात न कोंबताच दप्तराखालीच आदळून सोनी चंपीसोबत पसार झाली. चंपीच्या घरी चंपीचं कुठले तर लांबचे पाव्हणे आले होते. नवीन लगीन झालेल जोडप आल्यानं घरातली मंडळी पण उत्साहान कामाला लागली होती. त्यातली नवरी सारखी लाजत होती तर नवरा हसत होता. त्यांच्यात चाललेल्या चेष्टा मस्करीत सोनीला तिची अन हैब्याचीच जोडी दिसू लागली होती. घरातल्या पुरुष माणसाच्या दोन पंगती उठल्यावर चंपी व सोनीची जेवायची बारी आली. त्यांना वाढायला नवी नवरी आली होती तर तिच्या मागनं नवरा पाण्याचा जार घेऊन पंगतीत हिंडत होता. माश्याच झक्कास झालेले कालवण सोनीनं अगदी चाटून पुसून खाल्लं. चंपीचा आन नव्या जोडप्याचा निरोप घेऊन सोनी घराकडं जायला माघारी फिरली. सोनीन घराच्या अंगणात पाऊल टाकताच दारातल्या म्हशीन जोरात हंबरडा फोडला. तिच्या शिंगावरन डोक्यावरन प्रेमान हात फिरवून घरात आत गेली. उंबऱ्यातन पाऊल आत टाकताच बापू वेगानं येरझाऱ्या घालत असलेला दिसला. त्याचे डोळे सुर्यावानी लालबुंद झाले होते तर तोंड आगीनं नुसत पेटल होतं. त्याच्याकड नुसत बघूनच तिला धडकी भरली होती. तरीपण धीर एकवटून तिन जोरात हळी दिली.
"बापू"

तस हातात इतकावेळ नुसत्या गोल काडीसारखं फिरत असलेल्या वेताच्या काठीनं वेग पकडला. उभी आडवी कशी सापडल तशी धरुन सोनीला त्यान झोडपायला चालू केलं. जणू काही त्याच्या अंगात कुठला सैतान घुसला होता. कायम प्रेमानं वागणारा बापू असा का वागतोय याचा काय ताळा सोनीला लागतच नव्हता. तर अश्यावेळेला सुध्दा तिच्यातला छायाबद्दलचा द्वेष मनात शिलगावित होता. तिनंच बापूचे कान भरले असणार. असच तिनं गृहीत धरलं. शिवाय तिला मारताना ती बापूच्या मध्ये सुध्दा आली नाही. म्हणून तिचा संशय अधिकच दाट झाला. पण बापू काही पितळेच्या कानाचा नव्हता. छायानं त्याला सोनीबद्दल काही सांगितलं आन त्यानं ऐकून घेऊन तिच्यावर हात उगारला तस काही नव्हतच. स्वतः बापूनंच काहीतरी बघितलं आन त्याच डोक सटकलं होतं.
दप्तर बिप्तर न आवरताच सोनी चंपीकडं गेली अन उगाचच नसतं संकट तिन ओढवून घेतलं. तशातच सोसाट्याच्या सुटलेल्या वाऱ्याने सोनीवरची ब्याद एकदम ढिली केली. त्या बारक्या वावटळीने सोनीचं वहीची पान चाळायला सुरवात केली. तेव्हा लाईट गेली म्हणून आधीच वैतागलेल्या बापूचं लक्ष तिच्या पानान फडफडणाऱ्या वहीकडं गेलं. तो जसा वहीच्या जवळ आला तस वाऱ्यानं त्याच वहायचं काम हातातलं टाकून दाराच्या आडोशाला उभा राहिला. वहीच्या मधल्या कितीतर पानांवर लाल रंगाचा बदाम काढून त्याच्यात सोनी आणि जोडीला हैब्याचं नाव कोरुन कोरुन लिहलेलं दिसलं. ते बघताच त्याच्या डोक्यात मघाशी दरवाज्या कोपऱ्यात थांबलेलं वारं घुसलं होतं. तिला मनसोक्त मारुन झाल्यावर त्याची शहानिशा करण्यासाठी बापूनं सोनीपुढं ती रंगीत वही धरली. तेव्हा सगळाच उलगडा सोनीला झाला. पण आता काय ती स्वतःला वाचवणार होती. त्याच्याआधीच तिची शिक्षा भोगून झाली होती. तक्रार तरी कुणापुढ करणार होती. तिची बाजू समजून घेणारा बापूच वैऱ्यासारखा तिला वाटत होता. इतका वेताचा मार बसल्यावर तिच अंग सुजलं होत. हुंदक्यांशिवाय कोणता शब्द तिच्या वाणीत येत नव्हता. तरी धीर एकवटून ती बापूला म्हणाली
"तू समजितो तस काय नाही बापू"
"म्या बराबर काय समजायचय ते समजलोय . तरी छाया सांगत व्हती पोरगी वयात आलीयं हाताबाहेर चालल्लीयं. पर तिच्या शब्दापेक्षा तुझ्यावर कड माझा. चांगल पांग फेडलंस.गुणाची पोर गुणाची पोर म्हणून नावाजल तर आता डोक्यावर हागून ठेवलंस. त्याच्यासंग काय काय धंदे केलंत ते बी आता बघतो. जाऊन त्याच्या मामालाच जाब विचारतो. हेच शिकवल काय पोराला? "
"बापू ऐक की अस काय नाय हाय. हैब्याच आन माझ तस काय... "
"नाव काढू नको तोंडातन त्याचं. मुस्काटच फोडीन. मला वाटलं शिकशील तुझ्या आईच सपान पूर्ण करशील. जरा घराला चांगले दिस दाखवशील. पण असली थेरं करायला शिकली. भटकभवानी कुठलं. चल मुकाट्याने तेवढ वैरण टाक जा म्हशीपुढं"

सोनीचं हैब्यावर प्रेम होत खरं पण तशी कोणतीच कबूली तिने त्याच्याजवळ अगदी खाजगीतल्या चंपीजवळ पण दिली नव्हती. वहीसोबत मात्र गुलगुलू करुन मनातलं गुपित उघड करुन बसली होती. अगदी बोडकं झाल्यासारखं तिला वाटत होतं. स्वतःसोबत स्वतः बोलायची हिंमत तिच्या नजरेला होत नव्हती. म्हशीला वैरण टाकून घरातल्याच एका कोपऱ्यात मान गुडघ्यात रुतवून बसली होती. चेहऱ्यावर तर इतकी सुतकी कळा आली होती की जणू तिच जीवाभावाच माणूस तिच्यापासून कायमचं दुरावलं आहे. तिला तिच्या जन्मदात्या आईची खूप आठवण येत होती. पण तिचे मुर्त स्वरूप तिला ठाऊक तरी कुठे होते? बापूच्या ट्रंकेत तिचा फोटो होता. तो सुध्दा पाण्यानं भिजल्यामुळं रंग उडालेला. त्यामुळे आईची माया नुसतीच सावलीसारखी गडद झाली होती.

बापूचं दाराबाहेर वाजत असलेल पायताण ऐकून ती जागची हललीच. मघाशी बापू म्हणाला होता हैब्याच्या मामाला फैलावर घेतो तेच बोलणं पुन्हा कानात घुमटात घुमल्यावानी घुमत होतं. तिच्या अदमुऱ्या वयाला ते खरं वाटलं. बापू कोणते तर खडे बोल हैब्याला ऐकवणार. त्याची कुठलीच चूकी नसताना नाही ती सजा त्याचा मामा त्याला करणार अशी सगळी भविष्याची चिंधी हाताला गुंडाळून बापू मागोमागं सोनीदेखील घराबाहेर पडली. हैब्याला वाचवण्यामाग असलेल्या तिच्या भाबड्या प्रेमानं ती वाटेतच ठेचकाळली. दगडाच टोक घुसून रक्त आलं होतं. एवढ्यात बापू तिच्या नजरेआड झाला. आलेल रक्त अंगावरच्या कपड्यानं पुसलं नि हैब्याच्या आजोळघराकड तिची पावलं वळली. बापू तर इथ आलेला नाही याची दुरूनच तिने खात्री करून घेतली. पण हैब्याच्या दारासमोर टांगा उभा होता. त्यात कसलं कसलं सामान भरलेलं होतं. ते सामान उतरत होत की चढत होतं याचा तिला अंदाज यायचा होता. एवढ्यात टांग्याच्या मागून पुढं आलेला हैब्या तिला दिसला. त्याला सुखरूप बघून तिचा जीव थंडावला होता. टांग्यात उडी मारुन हैब्या बसताच टांगेवाल्यानं घोड्यावर चाबूक हाणलं . तस घोड जोरात खिंकाळलं. सोनीच्या मनात नको नको त्या शंकेच्या पाली चुकचुकल्या. बहुशा बापूनं हैब्याची कागाळी केली आहे.आन मामान त्याला घरातन हाकलून दिलयं याच खुबीनं सोनी लगबगीने पुढे आली.
"काय र हैब्या? बापू दिसला का कुठ? इकडं तुमच्या घरी आलता काय"
"नाय बा. नाय दिसला. काय काम होत काय त्याच? "
"नाही काम नाही. मला वाटलं तसं. हे सामान कसलं? "
"अग मी माघारी निघालो कायमचाच तिकडं माझ्या माझ्या गावाला"
"अन तू हे आत्ता सांगतो हाईस. जा मी कधीच बोलणार नाय तुझ्याशी"
"अग माझ्याशी बोलायला मी गावायला तर पाहिजे. "
"ते काय बी असलं. तू सांगितलं का नाईस? लै वाईट्ट हाईस"
"अग तातडीनं बोलावलयं त्याकरता निघालोय. पुन्हा चार दिवसानं येणार आहे तेव्हा सगळ्या दोस्तांना तुला आणि चंपीला सांगायच ठरवल होतं"
"व्हय पर तातडी कसली?"
"अग बापूस दवाखान्यात अडमिट आहे. आईच्या सोबतीला भावकी हाय पण मला बी गेलच पाहिजे त्याच औषध पाणी करायला. तस पन परवाच म्हणत होती आई की आता हिथ आमच्यासंगच रहा म्हणून तवा गेल पाहिजे. बराय राम राम"
"कसा जाणार? एसटी का? "
"नावेनच की"

सोनीच्या पायांनी हरणांची गती पकडली होती. मघाशी पायाला झालेली जखम विसरली होती. धापत धापत दुसऱ्या वाटेन ती नदीजवळ येऊन थांबली. टांगा अजून यायचा होता. तिला जरास हायसं वाटलं. पण संपत मामा नाव घेऊन हाजिर झाले होते. नदीवर दुपार आता कलंडली होती.त्यामुळं आजूबाजूला सगळ सुनसान झालं होतं. कुठतर सोनीसारखाच एखादा पक्षी पाण्यावर घिरटी घालत फिरत होता. टांग्याच्या घुंगराचा आवाज दुरुन जवळ जवळ येत गेला. तसा एकदम थांबलाही. टांग्यातून हैब्या उतरुन खाली आला. तस त्याच्याकड पाहून सोनीला वाटलं कुठून तर निरोप यावा हैब्याच्या बा ला बर हाय म्हणून अन त्याच जाणं रहित व्हाव. पण तस काही घडणारं नव्हतं. एकेक सामान नावेत हैब्यानं पोचत केलं. अखेरीस तो ही नावेत बसला. नावेनं सुकाणू धरला. संपत मामानं वल्ह वल्हवायला चालू केली. हैब्याला नावेतून दूरवर उभी रडत असलेली सोनी दिसली. तस त्याच्या डोळ्यातनं पण पाणी घळाघळा वाहायला लागलं होतं. वल्ह नदीचं पाणी मागे सारत पुढे चाललं होतं. संपत मामा म्हणत होता "मामाचा गाव सोडून जाऊ नये अस कायमचं पोरास्नी वाटत. तरी तू लई नशीबवान लेका" हैब्याच्या सगळ्या बालपणीच्या आठवणी संपत मामाच्या एका वाक्यात गोळा होऊन आल्या होत्या. कल्लेश्वराच्या मंदिरावर फडकलेला झेंडा अजूनही हैब्याला दिसत होता. दिसता दिसता त्याचा ठिपका झाला.

कितीतरी वेळ नाव अगदी शुन्य होईपर्यंत सोनी हात हलवत राहिली. पुन्हा हैब्या कधीच भेटणार नाही म्हणून उफाळून आलेली तिची अबोल माया पुन्हा कधीच बोलकी होणार नव्हती. सुर्यास्त झाल्यामुळे पाखरे किलकिलाट करत घरट्याकडं परतली होती. सोनी देखील घराची वाट तुडवू लागली.

बापू अजूनपर्यंत घरी आलेला नव्हता. त्याची उपरी बायको छाया शेजारच्या साळकाया माळकाया जमवून हसत खिदळत बसली होती. तिचं खिदळण बघून सोनीच्या डोक्यात संताप गेला होता. हिनंच बापूला आपल्यापासून हिरावून घेतलं म्हणून तिच्यावर तिने दात ओठ खाल्ले. बापूचं सकाळच वागण आठवून सोनीच्या मनात अढी निर्माण झाली. काही झालं तरी बापूसंग अन आईसंग बोलायच नाही हा हेका तिनं घेतला. घर म्हणजे तिच्यासाठी तुरुंगासारखा झाला. घरात आली तरी कोर्टात जाब जबाबाला उत्तर देतात तशी द्यायची. कोणता प्रतिप्रश्न करायची नाही.नेमलेली काम यंत्रासारखी उकरून काढून बुजवून टाकायची. कुणाच्या नजरेला नजर मिळवायची नाही. तिच्यात झालेली सुधारणा समजून बापू देखील गप्प रहायला शिकला होता. छायाला मात्र तिच वागणं अवचित वाटत होतं. तरुण वयात आलेल्या पोरीच्या अंगावर असा बापून हात उचलायला नको होता. अस तिच तिलाच चिक्कार वेळा वाटून गेलं. तस तिनं बापूला सुचवलं पण. परंतु बापू काही आगळच समजतं सुखानं दिवस ढकलत चालला होता. घरातल्या म्हसरांशिवाय आपलं कुणी मायेचं आहे यावरचा विश्वास सोनीन जणू टाकूनच दिला होता.

इकडं सोनी रोज नदीकाठी येऊन बसायची. कधीतर चुकून हैब्या येईल अस तिला वाटायचं. नदी वहात रहायची भरुन यायची. त्यावर एखाद झाडाच पान गळून पडायचं. शेजारच्या स्मशानात प्रेत जळत राहायची. पण हैब्या काही यायचा नाही. सुर्यास्ताला उद्याचा वायदा करायची अन निघून जायची.
एक दिवस रात्री
बापूला अन आईला गाढ झोप लागलीय बघून सोनी झोपलेली उठली. चार कपड्याच बोचकं काखोटीला मारुन घराला बाहेरन कडी घालून सोनी घराबाहेर पडली. तिची पावलं नदीकडं वळली. दुरुन येत असलेली संपत मामाची नाव तिन पाहिली नाही.पोहण्यासाठी तिने बोचकं पाठीला बांधून पाण्यात उडी टाकली. संपत मामानं देखील नाव सोडून पाण्यात उडी मारली. त्याला वाटलं कुठल्यातर जीवानं त्याची जगण्याची आशा सोडली आहे. त्या केविलवाण्या जीवाला वाचवण्यासाठी संपत मामानं त्याचा जीवही धोक्यात टाकला. कुणा सासुरवाशीणीनी जीव दिला असच समजून त्या पोरीला घेऊन तो काठाजवळ आला. नदीच्या जवळच्या डांबावरच्या वीजेमुळे त्याला तिचा चेहरा दिसला. ती दुसरी तिसरी कोण नसून सोनी असलेलं पाहून तो चपापला. बापासारखं आपुलकीने त्याला विचारलं
"पोरी काय म्हणून जीव द्यायला निघाली होतीस? "
"मी जीव नव्हते देतं मामा. मी घर सोडून चाल्ले हुते."
"कुठशी निघाली होतीस? "
"मी पलीकडल्या गावात निघाले होते. मला घरात राहून नये वाटतं. कुणी माझ्यावर माया करत नाही. "
"पलीकडं जाऊन काय करणार? कुठल्या शाळेत जाणार. "
"मला नकोच काय. कुठल्यातरी घरची धुणी भांडी करनं देवळ लोटीनं पर मी काय माघारी घरी जाणार नाही"
"काय झालं? बापू काय बोलला काय तुला? "
"त्यो कुठ बोलतो. अयेपुढं नुसती मान हलवतो. ती पण आधी बर वागायची पर आता नाय वागत"
"अग बापाला अस का बोलती? आणि छायाक्का तर किती काळजी वाहती तुझी. रोज इथ देवाला पाणी घालायकरता येती तेव्हा रोज तोंडाने तुझं आन बापूच शुभ चिंतत देवाला गाऱ्हाणं घालून जाती. म्या स्वतः ऐकलय तवा. तुझ कायतर चुकतय पोरी"
"मला काय ठाऊक नाही चूक बराबर. मला हिथ नाही रहायचं. माझी आपली वाटणारी दोनच माणस हाईत या जगात एक हैब्या अन दुसरी चंपी. माझ दुःख वाटायला हैब्या पण सोबत नाही. चंपीशी काय बोलायला सांगायला जाव तर तिची आई लै कावती."
"बर बर अस कर मी तुला हैब्याला भेटवतो. ही जरा पुनव होऊ दे . त्याच घर पण ठाऊक हाय मला. "
"नको नको मला त्याला नाही भेटायचं. बा पुन्हा मारुन झोडपून काढील. यावेळी तर तो मला जिताच सोडणार नाही."
"बर बर डोळ पुस आन घरी जा. शाहण्यासारखी रहा. तुझ्या शाळेला सुट्टी असलं तेव्हा सांग. म्या तुला पलीकडं नेऊन आणतो"
संपत मामाच्या समजूतीनं सोनी घरी गेली. तोवर झुंजूमुंजू झाल होतं. निपचिप पावलांनी बाहेरची कडी काढून घरात घुसली. घरात अजून गुडूप अंधार होता. दोघांना लागलेल्या झोपेची घडी विस्कटली नव्हती. सोनी तिच्या अंथरुणावर जाऊन पडली. अंथरुणावर पडताच तिला कधी नीज आली तिचं तिला उमगलं नाही.

दुसरे दिवशी-
सोनी झोपेतच कण्हत होती. तिला कसल्या वेदनांचा दंश जाणवत होता. तिने डोळे उघडझाक करायचा प्रयत्न केला पण तिच्या पापण्या उलगडत नव्हत्या. तिने अर्धवट पापणीतनं तिच्या उश्या शेजारी बसलेल्या आई नि बापूला बघितलं. ते चित्र ती जागेपणी पाहतीय का स्वप्नात याचीही तिला शुध्द नव्हती. सोनीचा ताप वाढत चालला होता. छायाक्का डोक्यावर मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या एकसारखी ठेवत होती. सोनीच्या अंगाअंगावर पाण्याचे फोड येऊ लागले होते. सोनीला वारयाफोड्याची लागण झाली होती. सोनीचा वाढत चाललेला ताप बघून बापूचं धाब दणाणलं होतं. सोनीची आई अशाच एका साथीच्या तापात डोक्याला ताप जाऊन दगावली होती. भितीनं बापूच हातपाय गारठले होते. गावातल्या डॉक्टरला बोलवून तिचे उपचार पाणी बापूने सुरु केले. औषधानं असर दाखवायला सुरवात केली. चोवीस तासानं सोनीचे डोळे उघडले. तिच्या पायाशी बापू बसून होता तर तिच्या गालावरुन हात फिरवित आई बसली होती. डॉक्टरनं चार दिवस ताप पाळायला सांगितला होता. तशातच महिन्याच्या शिवलेल्या कावळ्यांनही घात केला होता. पण छायानं आजाराची पर्वा न करता तिला कुशीत घेतलं होतं. सोनीला जाग आलेली पाहून बापू जागेवरुन उठला. तशी सोनी बापूला म्हणाली
"बापू तू समजतो तस काही नाही आहे. हैब्याला यातलं काहीच ठाऊक नव्हतं. त्यो नुसता माझ्या मनाचा खेळ होता. मी तो खेळायला पण नको होता. चूकी झाली माझी"
"गप पोरी गप. कळलंय मला सगळं. माझी पण चूकीच होती ती. तुझ काय न ऐकता तुला शिक्षा दिली"
"आई मी तुला चुकीचं समजलो होतो. माझी आई तूच आहेस"
"शांत हो पोरी शांत हो. माझा काल बी तुझ्यावर जीव होता आज बी आहे"

बापूच्या डोळ्यातलं टपटप पाणी सोनीच्या गालावर खळत होतं. छायाचे भरुन आलेले डोळे सोनी तिच्या थरथरत्या हातानी पुसत होती

------ अनघा देशपांडे

सदरचे चित्र चित्रकार एस इलायराजा यांचे आहे
चित्र सौजन्य: गुगल
धन्यवाद

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

पूर्ण वाचून काढली
खूप छान रंगवली आहे कथा
शेवट तर विशेष आवडला

छान कथा!

शेवट तर विशेष आवडला >>> +१

मनापासून धन्यवाद
आपल्या अमुल्य प्रतिक्रियांबद्दल आभारी आहे सर्वांची