सुवासाच्या देशात

Submitted by अनघा देशपांडे on 13 August, 2024 - 15:13
तिच्या माहेरची आठवण व त्याच्या बालपणीचे ठेव म्हणजेच हा सहवासाचा देश

नव्या रचलेल्या घड्यांच्या उतरंडीत कोणत्या चीजवस्तू ठेवल्या आहेत हे काही दिवसांनी विस्मृतीत जाते तसेच त्याचे झाले होते. काहीच महिन्यांपूर्वी यंत्रवत झालेले जगणे तो पुर्णपणे विसरुन गेला होता. जणू त्याच्या प्रखर बुध्दीला मृदुल व रेशमी अश्या रसिकतेचा स्पर्श झाला होता. त्याच्यातील हे स्थित्यंतर अगदी नकळत्या क्षणाला झाले होते. ज्यापासून तो स्वतःही अनभिज्ञ होता. मनगटावर पुसल्या गेलेल्या सुवासाचा स्पर्श जसा अत्तराला कळत नाही तितकेच हे सहज त्याच्या जगण्यात घडून गेले होते. त्याच्या आयुष्याच्या चौकटीच्या उंबरयावरचे माप तिने ओलांडल्यापासून त्याच्या मनात तिचे प्रेम घर करुन बसले होते.

ज्याप्रमाणे सर्वसाधारणपणे प्रेमिक आपल्या प्रेयसीपुढे शब्दाविना प्रेम व्यक्त करण्याकरिता फुलांमार्फत संदेश पाठवतात त्यानेही तेच निवडले होते. त्याकरिता त्याच्या रोजच्या वहिवाटीवरचा एक गजरेवाला त्याची वाट पहात थांबलेला असे. पानात गुंडाळलेला गजरा खिशात ठेवताना तो पैश्याचे पाकीट काढायचे विसरणे सहज घडे. व गजरेवाल्याचा चेष्टेस उगाचच बळी पडे. जणू त्या नाजूक सुवासाच्या दोरयात फुलाऐवजी तोच स्थित होई.

आज रोजच्या वेळेपेक्षाही अधिक लवकर कामकाजातून त्याची सुटका झाली. कुंद हवेच्या व ढगाच्या मंडपातून जाताना ओढीने त्याची पावले झपझप पडत होती. गजरेवाल्याने अगदी नेहमीच्या जागेवर त्याचा ठेला मांडला होता. पण तो वेळेआधी पोहोचल्यामुळे की फुलांचा कुठेतरी दूर दुर सडा सांडल्यामुळे गजरेवाल्याकडे गजरा नसल्याचे त्याला कळाले. चालता चालता एखादं पाऊल चुकाव तस त्याच मन अडखळल होतं.

त्याने वाटेवर भेटणारया सजलेल्या नटलेल्या, कुस्करलेल्या, चुरगळलेल्या प्रत्येक फुलापाशी त्याची तक्रार सांगितली. कुणी म्हणणे ऐकून घेतले. कुणी उपदेश केले. कुणी समजूत काढली. कुणी नुसतेच गंध पांघरून निजून गेले. पण त्याच्या हृदयीचा निरोप तिला सांगणारे कुणी भेटले नाही. शेवटी त्याने पापणीजवळ त्याचा रुमाल धरला अन पाणी टिपले. त्याच्या अश्रुचे गंधित पाणी कधी झाले? त्यालाही हा उगम कळला नाही.

गजऱ्यामार्फत पत्रव्यवहार करता येणार नाही हे सलत नव्हतच.
तिला कुठलाही अनुवाद भाषांतर करणे लकबीने जमत होतेच. त्याचे बोलघेवडे बोल तिने मौनातूनही वेचले असते. त्याला डाचत होता तो केवळ रोजच्या घडीत पडलेला 'खंड'. याने तो भलताच निरस झाला होता. त्याच्या मुलायम प्रेमाच्या रेशीम वेदना त्यालाच ठाऊक.

त्याची चुकलेली पावले कधी आजोळघरी वळली हे त्याला न उमगण साहजिकच होतं. आज्जीच्या सुरकुतलेल्या हाताच्या स्पर्शाने त्याला दाराबाहेरचा बालपणीचा चाफा आठवला. त्याने आज्जीपाशी त्याची आठवण काढली तसा आज्जीचाही गळा भरुन आला. भरलेल्या गळ्याने तिने भावपुर्वक जपलेले तिचे हक्काचे गाणे गायली. तिच्या कापरया आवाजाला आलेला अलवारपणा तिने पांघरलेल्या गोधडीइतकाच मऊसूत होता. त्याने परसुत जाऊन चाफ्याची रुजवात केली. का बरे आज्जीच्या ओटीत फुले सांडत नाहीस म्हणून हळवे भांडण काढले. तसे पानाआड लपलेला चाफा त्याच्या खांद्यावर येऊन ओघळला. झाडाने त्याला दिलेला त्याने आज्जीला देवू केला. तशी आज्जीने फुलानेच दृष्ट काढून 'लब्बाड' म्हणत त्याच्या गालावर चापट मारुन चाफा त्याच्या कानात गुंफला.

गजरा नाही पण चाफा मिळाला या सुखद स्पर्शाने त्याच्या स्नेहाचा थबकलेला हिंदोळा पुन्हा आंदोळू लागला. प्रेमाची भेट नाही पण बालपणीची ठेव तिच्याकडे सुपुर्द करु. या निश्चयाने त्याच्या काळजातली चोरवाट घराकडे पोहोचली.

तिने नेहमीप्रमाणे हसून स्वागत केले. तिच्या हसरया चेहरयाला तिने केसात माळलेल्या मोगऱ्याची कळी खुलवित असल्याचे त्याला लक्षात आले. त्याने डोळ्यांच्या खुणेने त्याच्याबद्दल तिला विचारले. माध्यम कोणतेही असले तरी त्याची भाषा ओळखण्याचे कसब तिला सहवासातून साध्य झाले होते. तिने तिची हकीकत सांगितली.

त्याचे असे झाले. तिच्या माहेरच्या घराच्या पाठी देवीचे मंदिर होते. मंदिरात जाण्याचा तिचा रोजचा नेमच झाला होता. देवीची भेट झाल्याशिवाय तिला दिवसाचा स्पर्श झाल्यासारखे वाटत नसे. तिने वाहिलेल्या हळदी कुंकवाने देवीचा गाभारा भरुन गेल्यासारखे तिला वाटे. देवीदेखील तिने दिलेला घंटेचा नाद कधी ऐकू येतो याची वाट पाहत राही.

आज तिला राहून राहून माहेरची खूप आठवण आली होती. याच आठवणीच्या पानांवर बसून ती अलगदपणे इथल्या देवीच्या मंदिरात पोहोचली होती. तेव्हा देवीने तिला आशीर्वाद म्हणून गजरा दिला होता. तोच गजरा तिने मायेने माळला होता. आजच्या गजरयातही प्रीत होती पण ती माहेरच्या काठोकाठ भरुन आलेल्या उमाळ्याची. तिच्या माहेरच्या आठवणीत रमलेल्या गजरयात त्याने त्याच्या बालपणीची ठेव असलेला चाफा हलकेच माळला होता. आरश्यात आता फक्त हसू होते ते फुलांचे. कारण प्रेमपाखर तर कधीचीच दूर उडाली होती सुवासाच्या देशात.

-----अनघा देशपांडे

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

साधं सोपं आणि म्हणुनच छान वाटलं वाचुन. शेवट ही आवडला.
मी सगळा लेख मात्र शेवटी काही तरी कलाटणी येणार या विचारात तो प्रेमी भुंगा असेल का, का मधमाशी असेल का आणखी काही यात मेंदूचा अर्ध्याहुन अधिक वेळ दवडला. Happy

सुरूवातीला दिलेलं चित्र हे शैलीवरनं ९९.९% शशिकांत धोत्रे याचं आहे. बरोबर? आतिशय सुरेख चित्रं असतात त्याची. काहीही श्रेय / नामोल्लेख न करता ते वापरलंय हे फार खटकलं.

मनापासून धन्यवाद
इतके सुंदर आणि जाणते अभिप्राय मिळाले की लेखन उर्जा मिळते.
धन्यवाद मायबोली.

>>>आतिशय सुरेख चित्रं असतात त्याची. काहीही श्रेय / नामोल्लेख न ते वापरलंय हे फार खटकलं.<<

क्षमा असावी नजरचुकीने राहिले माझ्याकडून.
शशिकांत धोत्रे यांचेच हे चित्र आहे. गुगलवर सहज सापडले होते.
चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. पुढील वेळी नक्कीच ध्यानात ठेवीन

सुंदर..
माझ्यासारख्या वाचकांना ज्याना पद्य आवडत नाही, झेपत नाही, त्यांना कोणीतरी ते गद्यात रुपांतरीत करून दिले असे वाचताना वाटले Happy

मला राजा रवीवर्मा यांचे चित्र वाटले.

छान. इतका अलंकारिक लेख वाचल्यावर, झाडावरच्या चाफ्याऐवजी अत्तराच्या कुपीतला सुगंध आठवला. मनमोहक पण कृत्रिम. Light 1