"मराठी भाषा दिवस : सरस्वतीची चिरंजीव मुले - वसंत बापट - भरत.

Submitted by भरत. on 2 March, 2022 - 02:49

मी कॉलेजात होतो , तेव्हा पॉकेट मनीची पद्धत फार नव्हती. अडल्यानडल्याला म्हणून थोडे पैसे दिलेले असत. पार्ल्यात जानेवारी महिन्यात मॅजेस्टिक गप्पा असत आणि त्याला जोडून त्यांचं पुस्तकप्रदर्शनही असे. जवाहर बुक डेपोवालेही त्याच्या मागे पुढेच पुस्तकप्रदर्शन लावीत. अशाच एका पुस्तकप्रदर्शनात दुपारी मंडपात कोणीही चिटपाखरू नसताना भरपूर वेळ पुस्तकं चाळत , त्यातल्या त्यात कमी किंमतीची आवडलेली पुस्तकं विकत घेतली. त्यात वसंत बापटांची मानसी (किंमत पाच रुपये) प्रवासाच्या कविता ( किंमत सोळा रुपये) सकीना (किंमत बारा रुपये) ही पुस्तके घेतली. इंदिरा - मृगजळ आणि कुसुमाग्रज - वादळवेल हीदेखील. दुकानातल्या न खपलेल्या पुस्तकांना हवा दाखवायला ही पुस्तक प्रदर्शने भरवीत असावेत. कारण बहुतेक पुस्तके छापून आठदहा वर्षे तरी झालीच होती.

शान्ताबाईंवरच्या लेखात म्हटलं तसं 'केवळ माझा सह्यकडा' ही कविता वसंत बापटांच्या नाव-चेहरा- कविता यांची एकत्र ओळख करून द्यायला कारण ठरली. अकरावी की बारावीला त्यांची `फुंकर' ही कविता होती. पुढे मी शिकवण्या घेतल्या, त्यात एके वर्षी नववीचं हिंदी शिकवलं त्यात देह मंदिर चित्त मंदिर या प्रार्थनेचा अनुवाद होता.

केवळ माझा सह्यकडा ही कविता पाच कडव्यांची. प्रत्येक कडवं दहा- दहा ओळींचं. महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल, वारकरी पंथ, लोकसंगीत यांचा धांडोळा घेतल्यावर विश्वाला कवेत घेत असतानाही अस्मितेची ज्योत जपणारा संदेश कवितेत आहे. कवितेला संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची पार्श्वभूमी असावी असं शेवटचं कडवं वाचताना आता जाणवलं. पुस्तकात हा संदर्भ होता किंवा शिक्षकांनी तसं सांगितल्याचे आठवत नाही.
फुंकर या कवितेत . बेवफा झालेल्या प्रेयसीच्या घरी गेलेल्या प्रियकराचं मनोगत. एकेक विशेषण म्हणजे फूत्कारच जणू. पण मनातच ठेवलेले. ही कविता म्हणजे नाटकातला एक प्रवेश होऊ शकेल.
vasant bapat_0001.jpg

'मानसी' मधल्या कविता तेव्हापासून आतापर्यंत कितीदातरी वाचल्या असतील. बापटांच्या एकेका शब्दात पानपान भर आशय भरलेला आहे.

हा मृगजळात समाधी घेईल.

खरेच मी आता सिद्ध आहे
स्वत्वाच्या खडावा काठावर ठेवून.
--------------
स्वागत करण्यापुरते जवळ हासू नव्हते
आसू तरी हुकमासरशी येतात कुठे!
मधली स्थिती म्हणजे एक थबकलेली प्रलयलाट
-----------
सत्य आपले आणि दुबळे असते
न्याय त्यांचा आणि समर्थ असतो

हा संग्रह चाळताना आता लक्षात आलं यातली एक कविता माझ्या नकळत माझे शब्द होऊन कागदावर उतरवली गेली होती.

बापट आणि कुसुमाग्रज , दोघांच्या कवितांत स्वातंत्र्यलढ्याचा जोष , आवेग दिसतो आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या स्वप्नभंगाची एक विदारक जाणीवही. `सावंत' ही कविता तर प्रसिद्धच आहे.

वसंत बापट सावंत
पंधरा ऑगस्ट

गर्दन छाटली होती तरी झेंडा उंच गेलाच
छाती फाटली होती तरी आम्ही घोष केलाच
----------
दुष्काळ
चीफ एक्झिक्युटिव्ह करतो स्वखुशीने पगार कपात
भागवतो फक्त साडेपाच हजारात सहाऐवजी
मलबारहिलवर आठवड्यातून एकदा चुलीला रजा
(मजा त्यादिवशी आलिशान हॉटेलात )
--------
ही चीन आक्रमणावेळची असावी.

सह्याद्रीच्या वादळवार्‍या! पैल जाऊन सांग खबर
थंडगार बर्फामध्ये ज्यांना हवी असेल कबर
तेवढी भुते पुढे या, बाकी सारे चले जाव
कोपर ढोपर सं गिन इथे, बाळमूठ वज्रघाव

वीर साचा उग्र आविष्कार करणारी लेखणी
अजून त्या झुडुपांच्या मागे सदाफुली दोघांना हसते

अशी हळुवार प्रेम कविता लिहिते तर कधी

कॉफी निम्मी निम्मी बरी
कप मला बशी तुला
अर्धा घोट झाल्यावर
देई बशी घेई प्याला

असा खट्याळपणाही करते.

कवी आपल्या कवितेबद्दल - कलेबद्दल कवितेतून बोलला नाही, असे सहसा होत नाही.

संगमरवरातून संगमरवर वजा केल्यावर
संगमरवर उरला पाहिजे
जो संगमरवरातून हस्तिदंत ठेवीन म्हणेल
तो अपकीर्ती नामक नरकात जाईल
(कलेचा व्यापार करणार्‍यांबद्दल?)

थोडंसं अवांतर - वसंत बापट USIS मध्ये होते आणि त्यांनी इंग्रजी पुस्तकांचे मराठी अनुवाद जी ए, शान्ताबाई अशा लेखकांकडून करून घेतले,
अशी नोंद शान्ताबाईनी चौघीजणी संदर्भात केली आहे.
vasant bapat_0002.jpg

बापट-करंदीकर-पाडगावकर कवितावाचनाचे कार्यक्रम करीत. इतर दोघांचे कवितावाचन ऐकले की त्यांच्या कोणत्याही कविता त्यांच्या आवाजात आणि ते वाचतील तशा आपण मनातल्या मनात ऐकू शकतो. पण बापटांच्या कविता तशा नाहीत. त्यांचं सादरीकरण प्रत्येक कवितेगणिक वेगळंच रूप घेतं. अनेक कविता तर ते गाऊन दाखवत. `लावणी अखेरच्या विनवणीची' दोनतीनदा तरी ऐकली- पाहिली असेल. पण तशी आठवतही नाही.

मैतर हो! खातरजमा करू मी कशी
अम्हि जाणारच की कधी तरी पटदिशी
हे एकच आता अखेरचे मागणे
ही मैफल अपुली अखंड चालो अशी
अम्हि जाणारच की कधी तरी पटदिशी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हाही लेख सुंदर झालाय भरत. वसंत बापटांची 'सह्यकडा' आणि काही गद्य लिखाण (प्रवासवर्णन) सोडता मी फारसं वाचलेलं नव्हतं. 'साधना' ने वसंत बापट विशेषांक काढला होता तेव्हा त्यांच्याबद्दल बरंच वाचायला मिळालं होतं! चतुरस्र व्यक्तिमत्त्व होतं त्यांचं!

डोंबिवलीतील आमची शाळा आणि बर्‍याच शाळा मिळून गीतमंच असा काही कार्यक्रम करत. म्हणजे मोठ्या मैदानात जमुन विद्यार्थ्यांनी अशी काही क्रांतीकारी गाणी म्हणायची. हेतू काय कोण जाणे, पण तेव्हा 'उत्तुंग आमुची उत्तर सीमा, इंच इंच लढवू ' हे पहिलं बापटांचं गाणं माहित झालं.
नंतर शब्दांबद्दल प्रेम निर्माण झाल्यावर 'गगन सदन तेजोमय', 'अजुन त्या झुडुपांच्या मागे'.. हे तर मला वाटतं दशरथ पुजारींकडून प्रत्यक्ष ऐकलेलं आहे. मग यशवंत देवांचं अरुण दात्यांनी गायलेलं 'येशील येशील येशील राणी, पहाटे पहाटे येशील' इ. गाणी माहित होती. बापटांच्या कविता फार वाचल्या नाहीत. ते कार्यक्रम करीत त्या बद्द्ल ऐकिव माहितीच आहे.
आत्ता तुम्ही लिहिलेलं 'संगमरवरातून' वाचल्यावर क्षणात अंगावर काटा आला. पुढच्या भेटीत नक्की कविता संग्रह घेईन.
छान ओळख करुन दिलीत. धन्यवाद.

हो, हाही लेख आवडला.
प्रवासाच्या कविता कधीतरी पूर्वी वाचल्याचं आठवतं. बाकी फारसं वाचलेलं नाही काही त्यांचं.

सामाजिक कविता कळण्याचे इंद्रिय नसल्यामुळे, या कविता कधी वाचल्या नाहीत किंवा वाचल्यानंतर लक्षात राहील्या नाहीत. लेख आवडला.

हा लेखही छान. ह्यातल्या बर्‍याच कविता माहित नव्हत्या.

डोंबिवलीतील आमची शाळा आणि बर्‍याच शाळा मिळून गीतमंच असा काही कार्यक्रम करत. म्हणजे मोठ्या मैदानात जमुन विद्यार्थ्यांनी अशी काही क्रांतीकारी गाणी म्हणायची. >>>>> गीतमंचाची खूप दिवसांनी आठवण निघाली. Happy

रच्याकने, कवितांच्या ओळी इथे लिहिलेल्या चालतात का ? कॉपीराईटची भानगड नाही ?

हा लेखही सुंदर...

या लेखाच्या ओघाने वसंत बापटां विषयी अतिरिक्त वाचन, श्रवण झाले. ते सुंदर दुवे वसंत बापट किती मोठे होते याची साक्ष देतात. यापैकी एक दूरदर्शन सह्याद्रीने केलेला आवर्जून पहावा असा लघुपट त्याची लिंक
https://youtu.be/XjnVNMegewo
आणि दुसरी साप्ताहिक साधनाची
https://kartavyasadhana.in/view-article/editorial-on-vasant-bapat

लेख आवडला. फक्त फुंकर तेवढी वाचलेली. अनेकदा. चांद मातला आणि येशिल राणी पहाटे या दोन ऐकलेल्या.
मृगजळात समाधी, चीन आक्रमणावेळची कविता जबरदस्त, इतरही छान आहेत.

सगळ्यांचे आभार. Happy

वसंत बापटांच्या आवाजात नेटवर काही आहे का हे शोधत होतो. स्पॉटिफायवर सावंत , मायकेलँजेलोपनिषद् , समाधी या तीन कविता मिळाल्या. लॉगिन करावं लागतं.

दुसर्‍या कवितेच्या नावातच उपनिषद असूनही ती अशी वाचायची सुचले नव्हते.

अमितव , संगमरवर - हीच कविता.

दत्तात्रय साळुंकेंनी दिलेली लिंक पाहिली. लीलाधर हेगडे, इ. मंडळी पाहून त्यांच्या कलापथकाबद्दल वाचल्याचं आठवलं.

हा लेखही छान. ह्यातल्या बर्‍याच कविता माहित नव्हत्या. >>> अगदी अगदी.

गीतमंचाची खूप दिवसांनी आठवण निघाली. >>> हो ना, मी कधीच नव्हते त्यात पण आमच्या धाकट्या बहिणाबाई असायच्या आमच्या शाळेतर्फे.

शालेय जीवनांत बापटांची ओळख पुस्तकांच्या आधी सेवा दलाच्या शाखेतुन झाली. सेवा दलाच्या माध्यमातुन मराठी सांस्कृतिक कलेचा वारसा पुढे नेण्यात लिलाधर डाके, शा. साबळे यांच्या सोबत बापटांचाहि सिंहाचा वाटा आहे...

दख्खन राणी ही कविता तिच्या नादमयतेमुळे शाळेच्या दिवसांपासून आवडते. खरे तर वसंत बापट माहीत झाले ते याच कवितेमुळे.

वसंत बापट USIS मध्ये होते आणि त्यांनीही शांता शेळके, जी एक अशा लेखकांकडून इंग्रजी साहित्याचा अनुवाद करून घेतला असं मी लेखात म्हटलं आहे.
USIS मध्ये जयवंत दळवी होते आणि त्यांनी हे अनुवाद करून घेतले.
आज लोकसत्तेत जयवंत दळवींवर लेख आला आहे, त्यात ही माहितच आहे.
मी आधीही हे वाचलं होतं.
पण आठवणीचा गोंधळ झाला.

Back to top