* दुभंग *

Submitted by पॅडी on 30 July, 2024 - 02:34

* दुभंग *

किलकिले करोनी I जरा बंद दार
प्रवेशलो पार I मुळापाशी II

तिथे उजवेना I आसक्तीची कूस
माती भुसभुस I लाख होती II

कोमेजून कोंभ I पहुडला संथ
वाटेनाच खंत I त्याची त्याला II

ओलाव्याचा सोस I मनाला उभारी
गोठलेली सारी I इच्छाकांक्षा II

घेववेना तिन्ही I ऋतुशी धडका
जन्माचा भडका I थंडावला II

पाने फुले फळे I कुठले बहर
स्वप्नात प्रहर I टक्क जागे II

तळे शेवाळले I साकळे अंधार
वेदना गर्भार I मुळापाशी II

***

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

आवडली. Happy
ही ज्या वृत्तात लिहिली आहे त्याला काय म्हणायचे?

>>> ही ज्या वृत्तात लिहिली आहे त्याला काय म्हणायचे?

ओवी / अभंग छंद!

६--६--६--४

किंवा

८--८--८--६

(या कवितेत ६--६--६--४ योजले आहे पण पहिल्याच शब्दात ते भंगले आहे, किलकिले या शब्दात! इतरत्र पाळले गेले आहे)

कविता आशयघन असावी पण (मला) थोडी गूढ वाटल्याने नक्की काही म्हणता येत नाही.

आभार बेफिकीर.
मी कविता विषयात टोटली अनभिज्ञ असल्याने विचारले.

कुमार१ , केशवकूल - प्रतिसादासाठी मन:पूर्वक आभार आपले...!

बेफ़िकीर - अभंग ह्याच प्रकारात ही रचना मोडते.. ६--६--६--४ पदबंध कायम ठेवण्यासाठी " किल्किले " शब्दप्रयोग करायचा विचार आलेला...परंतु मला रुचला नाही. असो.
प्रतिसादासाठी आणि विवेचनासाठी खूप खूप आभार...!

>>> अभंग ह्याच प्रकारात ही रचना मोडते.

तेच लिहिले आहे मी! ( ओवी / अभंग असे लिहिण्याचे कारण अभंग हा बहुतांशी काव्यप्रकार व ओवी हा छंदप्रकार म्हणून गणला जातो, पण अभंग हा छंदप्रकार म्हणूनही गणला जाण्याची परंपरा आहे)

>>> पदबंध कायम ठेवण्यासाठी " किल्किले " शब्दप्रयोग करायचा विचार आलेला...परंतु मला रुचला नाही.

ही तुमची निवड व स्वातंत्र्य आहे. त्यामुळे छंद भंगत आहे इतकेच नोंदवले.