रोजच्या जीवनात येणारे थरारक प्रसंग

Submitted by पशुपत on 9 March, 2020 - 06:20

एक प्रसंग मनावर कोरला गेलेला आहे. १९८९ मधे दिल्लीला मुलाखतीसाठी गेलो होतो. डिसेंबरचे दिवस , मरणाची थंडी !.
मी झेलम एक्स्प्रेसने रात्री ९ ला स्टेशनला उतरून धौला कुवाला रिक्षाने गेलो. मित्राच्या भावाकडे ( नेव्ही क्वार्टर्स ) जायचे होते. फोन नव्हते. चुकीच्या गेटला उतरलो. आत सिक्युरिटीला विचारल्यावर हे कळले. मग त्याने सांगितले चालत कसे जायचे. कुडकुडत , न झेपणारे सामान घेऊन चालता झालो. १० मिनिटाचे अंतर . पाच मिनिटाने , आलो तिथले दिवे आणि पोहोचायचे होते तिथले दिवे क्षीण दिसू लागलेले. किर्र अंधार , रातकिड्यांची किरकिर. आकाशात छोटी चंद्रकोर... इतक्यात बाजूने दोन कुत्रे हुश हुश करत आले .. पायातले उरले सुरले त्राणही गेले. मनात भीमरूपी म्हणायला लागलो. मग मेंदू चालू लागला. कुत्रे माझ्यावर भुंकत नव्हते.. याचा अर्थ ते पाळीव आणी ट्रेंड आहेत ! इतक्यात त्यांचा मालक माझ्ह्या बाजूने येऊन माझ्याशी बोलू लागला ! जीव भांड्यात पडणे म्हणजे काय त्याचा खरा खरा खरा अनुभव आला.
तो ऑफिसरच होता . मित्राच्या भावाला ओळखणारा !. त्याने मला सोबत केली आणि योग्य इमारतीत आणून सोडले . त्याचे आभार मानायचे भानही त्यावेळी मला उरले नव्हते.
त्याच ट्रिप मधला शेवटच्या दिवशीचा रात्रीचा प्रसंग असाच थरार अनुभवाचा.
पुण्यातल्या आमच्या कट्टा गँगमधला एक मित्रही त्या काळात दिल्लीत नोकरी करायचा. त्याला भेटायला संद्याकाळी (ज्या मित्रा च्या भावाकडे राहिलो होतो त्याची) जुनी बजाज १५० स्कूटर चालवीत गेलो. रात्री हॉटेलात जेऊन, गप्पा मारून निघालो. मला दिल्लीची काडीमात्र माहिती नाही. कडक अंधार , निर्मनुष्य रस्ते , थंदीचा कडाका ! त्या मित्राने मला ज्या एरियात जायचे होते तिथे जाणार्या चौकात आणून सोडले. आणि गप्पा मारून तो परत निघाला . तो कुठलीशी बस पकडून जाणार होता, त्याने मला माझ्या वाटेतल्या खाणाखुणा सांगून ठेवल्या. मी स्कूटर चालू केली आणि निघालो तर काय, स्कूटरचे टायर फ्लॅट. ओरडून आधी त्याला हाक मारली. तो भारी धीराचा. त्याने पहाणी केली आणि शोध लावला कि व्हाल्व्ह मधली पिन अडकली आहे. नशीबाने ज्या कॉर्नरवर आम्ही उभे होतो , तो पेट्रोल पंपच होता. आता तिथल्या मिणमिणत्या दिव्याच्या प्रकाषात आम्ही तार शोधू लागलो . २ - ४ मिनिटानी ती मात्र सापडली. व्हाल्व्हची पिन सरळ करण्यात यशही मिळाले. आता प्रष्ण होता हवा कशी भरायची ! तिथल्याच हवेच्या नळीचा अंदाज घेतला. माझ्या नशीबाने काँप्रेसरमधे हवेचे पुरेसे प्रेशर होते. हवा भरली. संकटात मेंदू तीक्ष्णपणे काम करतो . त्याला म्हंटले ५ मिनिटे हवा टिकते आहे याची खात्री करू. ती टिकली. मग तो म्हणाला इथून माझे घर ५ मिनिटाच्या (स्कूटरवरून) अंतरावर होते. (३-५ कोलोमीटर असावे) . तू माझ्यासाठी त्या कॉर्नरवर १५ मिनिटे थांबणार आणि तोपर्यंत मी परत आलो नाही तर मी सुखरूप घरी पोहोचलो असे समजून निघून जाणार असे ठरले.
मग मी निघालो . तो ५ मिनिटाचा प्रवास अजून लक्षात आहे. लांबून आमची बिल्डिंग दिसू लागल्यावर परत खूप खूप खूप आनंद झाला.

आता या प्रसंगांचे इतके काही वाटत नाही पण त्या वेळी मात्र खूप थरारक वाटले होते.

तुमच्या जीवनात असे काही प्रसंग घडले असतीलच. इथे सांगण्या साठी स्वागत आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाप रे एकेक अनुभव थरारक आहेत.
सिंहगडाचा किस्सा, गारांचा पाऊस, विजा कोसळल्या तो किस्सा सगळे एक से एक आहेत.

सिंहगड भितीदायक वाटतो मला तरी त्या टॉवरच्या अजूबाजूला. अंगावर येतो.
मी आणि माझ्या मैत्रिणीने सुद्धा दोघींनीच सिंहगड चढून वगैरे जायचं धाडस केलेलं आहे बॉटनीचे स्पेसिमेन गोळा करायला पण नशीबाने दिवसाउजेडी जाऊन सुखरूप परतलो. चपला वगैरे घालून गेलो होतो उतरताना वाट लागत होती. असल्या मांड्या दुखत होत्या दुसर्‍या दिवशी पाय रोवून रोवून उतरल्यामुळे. एकेक आठवणी.

एक खतरनाक प्रसंग आमच्याबरोबर चांदणी चौकात घडलाय. शब्द न शब्द खरा आहे आज इतक्या वर्षांनी लिहायची हिम्मत करतेय.
आमचं लग्न ठरलं होतं त्यानंतर चांदणी चैक एनडीए रोडला फिरायला जायचा शिरस्ता होता. तेव्हाची पुण्यातली युगुलं तिकडेच जायची बहुतेक करून. २० वर्षांपूर्वी खूप सुनसान जागा होती ती अप अँड अबाव्ह हॉटेल होतं त्यापुढची. तिथे आम्हाला लुटलं गेलंय Sad त्या दिवशी आम्ही फारच उशीर केला निघायला. जाऊ निघू म्हणत बाईकवर बसतोय तोवरच २-३ जण आले अंधारात आणि एकाने माझ्या गळ्यावर चाकू लावला, दुसरा नवर्‍याशी झटापट कराय्ला लागला..... आहे नाही ते द्या नाहीतर आता हिला कापतो असं माझ्याजवळच्याचे शब्द मी ऐकले... माझे हातपाय लटपटत तोंडातून काय काय आवाज निघत होते बापरे बहुतेक वाचव मला असं काहीतरी... नवर्‍याने सोन्याची चेन दिली पैसे दिले होते नव्हते सगळे आणि आमची सुटका झाली. केवळ नशीब चांगलं म्हणूनच आम्ही वाचलोय. देव किंवा जे कोण आहे शक्ती त्याला शतशः प्रणाम केले. का ही ही घडू शकलं असतं दोघांसोबत तो विचारच करवत नाही. अजूनही त्या प्रसंगाची आठवण नको वाटते.

हॉरिबल अंजली…..
थोडक्यात वाचलात तुम्ही. पैसे गेलेले चालतील. शारिरीक इजा नको व्हायला.

कुठल्याश्या दिवाळी अंकात गदिमांच्या सुनेने एका टेकडीवरचा असाच प्रसंग लिहिला आहे. तिथे मात्र त्या गुंडांनी होणाऱ्यी नवऱ्याला नाव विचारलं व माडगुळकर नाव ऐकून ते गाणं लिहीणाऱ्या माडगुळकरांचे तुम्ही कोण म्हणून विचारलं. त्यांचा मुलगा असं समजल्यावर सोडलंही. नंतर सुनेला कळलं की अजून १-२ जोडप्यांना तिथे लुटलं गेलं होतं आणि फक्त पैशांवर निभवले नाही, मुलींवर वाईट प्रसंग ओढवले.

बहुतेक सातच्या आत घरात पिक्चर तेव्हाच आला होता.सुखरूप सुटलात हे खरंच नशीब.
आमचं लग्न ठरलं तेव्हा लोकांनी बजावून सांगितलं होतं की सुनसान जागी जाऊन गप्पा मारण्याचा कितीही मोह झाला तरी जाऊ नका.शक्यतो घरी गप्पा मारा किंवा ccd मध्ये बसा.(आमचे त्या वेळचे पगार पाहता रोहित वडेवाले वॉज मोअर इन बजेट Happy )

आमचे त्या वेळचे पगार पाहता रोहित वडेवाले वॉज मोअर इन बजेट >> Happy आम्ही उडूपीत जायचो. गप्पा जोरजोरात ओरडून माराव्या लागायच्या Lol

अंजली_१२, खरंच हॉरीबल Sad केवळ नशीब बलवत्तर म्हणायचे. होय, वीस वर्षांपूर्वी काही भाग अतिशय सुनसान व कुप्रसिद्धही होते. तळजाई रस्ता, चांदणी चौक ते एनडीए रस्ता, चतुश्रृंगी टेकडी, वेताळ टेकडी ही नावे बातम्यांत असायची.

>> ccd मध्ये बसा.(आमचे त्या वेळचे पगार पाहता रोहित वडेवाले वॉज मोअर इन बजेट )

खरं आहे अगदी! "कॅफे कॉफी डे" ऐवजी "रोहित वडा दे" Happy तसेही गरम चहा आणि भजी ची मजा कॉफी मध्ये नाही. थँक्स टू मिस्टर बच्चन आणि मिस मौशुमी चटर्जी Biggrin

एक एक खतरनाक किस्से आहेत

अंजली 12 सातच्या आत घरात चित्रपट आठवला.
तेव्हा तशा काही वाईट घटना घडल्या होत्या तिथे.

सिंहगडावर पावसाळ्यात गेलो होतो. मित्र मित्र. सगळे 22 ते 24 वयोगट.
उतरताना मस्ती सुरू होती.
शॉर्टकट ने उतरू म्हणून निसरड्या भागातून उतरत होतो.
एका ठिकाणी जरा शंका वाटली म्हणून थांबलो आणि अशा वयोगटात जशा गप्पा होतील तशाच सुरू होत्या.
बास का, घाबरला का, त्येला काय हुतय kind of.
तिथे एक जरा सिनियर 40 तला माणूस आला आणि हिंदीत डायलॉग मारून गेला.
पहाड, पानी और आग से मस्ती मत करो.
मग आम्हीही जरा भानावर आलो.
मग नीट रस्त्याने उतरलो.

<< गुंडांनी होणाऱ्यी नवऱ्याला नाव विचारलं व माडगुळकर नाव ऐकून ते गाणं लिहीणाऱ्या माडगुळकरांचे तुम्ही कोण म्हणून विचारलं. त्यांचा मुलगा असं समजल्यावर सोडलंही. >>

म्हणजे चोर एकंदरीत रसिक आणि सुसंस्कृत होते तर. Happy

रोहित वडेवाले वॉज मोअर इन बजेट >> Rofl

अंजली, खरंच खूप भीतीदायक प्रसंग! नशीब फक्त चेनवर निभावलं. मलाही सातच्या आत घरात आठवला. त्या भागात लग्नाच्या आधी आम्हीही एकदा गेलो होतो. पण एकंदरीत वातावरण न आवडल्याने लगेच निघालो. तो परिसर भीतीदायकच वाटला.
रोहित वडेवाले Proud

अन्जली! नशिब बलवत्तर आणी देवाची क्रुपा म्हणून थोडक्यात निभावल...त्या परिसराचे खुप किस्से एकले होते तेव्हा.

चोर एकंदरीत रसिक आणि सुसंस्कृत होते तर. >> परवा नारायण सुर्वे यांच्या घरी चोरी झाली आणि ते घर त्यांचं आहे हे कळल्यावर चोराने टिव्ही वगैरे गोष्टी परत केल्या. अजूनही असे चोर शिल्लक आहेत हे पाहून मला भडभडून आलं.

मुलींवर वाईट प्रसंग ओढवले.<<<< +++१११ फिल फॉर देम खरंच काय होत असेल. याचीच भिती सगळ्यात जास्त वाटली होती.
सातच्या आत घरात सिनेमा त्याच वर्षी आला होता बरोबर. तो पाहून आपण कशातून वाचलो याचं भान आलं होतं.

खूप छान वाटलं आज या धाग्यावर येऊन !खरं तर मी स्वतःच विसरून गेलो होतो हा धागा.
खूप खूप छान आणि मनोरंजन करणारे किस्से आहेत .. पण त्या वेळेला मात्र पायाखालची जमीन सरकवणारे !

गेल्या वर्षी मी, नणंद व तिच्या तिन मैत्रिणी अशा आम्ही पाच जणी व्हॅली ओफ फ्लॉवरला गेलो होतो. माझी दुसर्‍यांदा ट्रिप.

हृषिकेश ते जोशीमठ पुर्ण दिवसाचा प्रवास आहे. आम्ही इनोवा
गाडी केली होती. ड्रायव्हर शिख होता. वाटेत एका ठिकाणी नेहमीसारझी दरड कोसळली होती, एका वेळेस एक गाडी जेमतेम जाईल इतकी जागा होती. आमची गाडी तिथुन निघत असताना मागुन एक स्कोर्पिओसारखी मोठी गाडी पॅ पॅ करायला लागली. आम्ही निघाल्यावर आमच्या मागुन ती गाडी आली आणि गाडी समोर घालुन आमची गाडी थांबवली. आत २५-२६ चा तरुण एकटाच होता, त्याने गाडीचा मागचा दरबाजा उघडुन सोटा काढला आणि धावत आमच्या गाडीवर आला. खिडकीतुन हात घालुन आमच्या गाडीच्या ड्रायवरचा शर्ट धरुन त्याने त्याच्या थोबाडीत दोन चार मारल्या आणि गाडीतुन उतर म्हणुन ओरडायला लागला. आम्ही आमच्या ड्रायवरला उतरु नको म्हणुन सांगितले आणि त्या माणसाला ‘भाई जाने दो छोड दो हम माफी मांगते है ‘ म्हणत शांत करायचा प्रयत्न करायला लागलो. तो पाच दहा मिनिटे गुरगुरत शिव्या देत राहिला आणि ‘आगे चल तुझे दिखाता हु‘ बोलत परत गाडीत गेला. बराच वेळ तो आम्हाला पुढेच जाऊ देईना. अर्ध्या तासाने पुढे जायला दिले पण पाठलाग सुरु ठेवला. तो आमच्या मागे गेला तेव्हा त्याच्या हातात बाटली दिसली. काहितरी पित होता. नंतर परत आमच्या पुढे आला आणि गाडीथांब्बवा म्हणुन इशारे करत गाडी बाजुला घेतली. आम्ही गाडी थांबवली नसती तर तो परत आला असताच म्हणुन गाडी थांबवली. तो परत उतरुन आला आणि चक्क माफी मागायला लागला. आधी ड्रायवरला बोलला तु बाहेर ये मला तुझ्या पाया पडायचे आहे. आम्ही म्हटले अजिबात उतरायचे नाही. तर त्याने ड्रायवरच्या खिडकीतुन स्वताला अर्धे आत ढकलत त्याच्या पाया पडला. मला मरायचे आहे, मी गाडी खाईत फेकणार, माझे कोणी नाही वगैरे भरपुर बडबड केली. आम्ही म्हटले आम्हाला पण माफ कर, आम्ही देवदर्शनालाच जातोय, तुझ्यासाठी प्रार्थना करु. मग तो परत जाऊन त्याच्या गाडीत बसला. आम्हीही निघालो. बराच वेळ तो आमच्या मागे येत होता. पुढे श्रीनगर लागले तिथे त्याने आमचा पाठलाग सोडला. तिथे रस्त्यावर पोलिस बंदोबस्त होता. तो तिथेही मागे आला असता तर पोलिस मदत घ्यावी लागली असती.

दोन शहरांमधल्या रस्त्यावर तुरळक वाहतुक आणि त्यात असले सोंग.. खुप घाबरले होते मी. श्रीनगर शहर लागले तेव्हा जीवात जीव आला Happy Happy

ऋषिकेश ते जोशीमठ हा प्रवास थरारक आहे. एका बाजूला खूप खोल असे गंगेचे वेगवान पात्र, वर अरूंद रस्ता, त्यात धोकादायक वळणे. अक्षरश: बसचे पुढचे किंवा मागचे चाक हवेत असते. इथे वाहन चालवण्यासाठी वेगळा परवाना लागतो. अशा ठिकाणी असा प्रसंग घडणे हे आपल्या कडच्या घाटातल्या पेक्षा चिंता वाढवणारे आहे.

नशीब जोशीमठ ते बद्रीनाथ या टप्प्यात असे झाले नाही.

एकदा लडाख वरून चंदीगढला हवाई दलाच्या विमानाने येत असताना हवाई दलाच्या स्टाफशी चांगलीच गट्टी जमली. चंदीगढला विमान सकाळी साडेसात ते नऊ पर्यंत पोहोचतात. त्यानंतर साडेसातचे विमान वेळेत आल्याने एकतर बस अड्डा किंवा रेल्वे स्टेशनला जायची घाई होती. इथून अंबाला जवळ पडतं. पण त्या वैमानिकाने गळच घातली. "पार्टी करते है" म्हणाला. त्या दिवशी तिथून जोधपूरला एक फ्लाईट जायची होती. आता खरं म्हणजे जोधपूर आडंनिडं गाव आहे. इथून कुठेही जायला तारांबळच उडते. पण याने आग्रहच धरला. मोडवत नव्हता.

दुपारी बाराची फ्लाईट होती. तिथे गेल्यावर ती अडीच वाजता निघणार आहे असे समजले. अडीच वाजता आत जाऊन बसल्यावर पुन्हा उतरावे लागले. काही तरी सामान घ्यायचे राहिले होते. मग सहा वाजता निघणार, आठ वाजता निघणार असं करत करत ती फ्लाईट रात्री साडेबारा निघाली. काही तरी दीडच्या सुमारास जोधपूरला उतरलो.

जोधपूरचा विमानतळ एका बाजूला असलेल्या जंगलात आहे. जंगल कम वाळवंट. शेजारी रातनाडा पॅलेस आहे. त्याच्या काही भागात संरक्षण दलाचे साम्राज्य असल्याने शुकशुकाट आहे.

रात्री अचानक आलो असल्याने रिक्षा, टॅक्सी, टमटम अजिबात नव्हते. पायी पायी बाहेर आलो.
तो रातनाडा पॅलेस वरून जाणारा सुनसान रस्ता होता. आतून मोराचे भयप्रद ओरडणे ऐकू येत होते ( रात्री मोराए ओरडणे ऐकले असेल तर समजेल). पुढे वाळवंटातल्या खुरट्या जंगलातून तीन किमी जायचे होते. ट्रेन सोडून चूक केली होती. पायी निघालो तसा कुणाच्या तरी चालण्याचा अस्पष्ट असा आवाज आला. मागे वळून पाहिलं तर कुणीच नाही. हा आवाज दबक्या पावलांचा असल्या सारखा यायचा. ते ही वाळूत पाय पडल्यावर येतो तसा.

आता त्या आवाजाकडेच लक्ष जाऊ लागले. रातकिड्यांचा आवाज सुद्धा ऐकू येईनासा झाला.
थोड्या वेळाने एकाच पावलाचा आवाज नसावा असे वाटले. तीन, चार, पाच..
पण कुणीच दिसत नव्हते. जरा अंतरावर एक खांब होता आणि त्यावरची लोंबकळत असलेली ट्यूब उघडझाप करत होती. त्या ट्यूबखाली थांबून मागे पाहिले. आता आवाज थांबला.

रात्री एका जागी उभे राहण्यातही अर्थ नव्हता. पुन्हा पायी निघालो. वीस ते पंचवीस मिनिटे लागायला हवी होती. पण जणू काही रात्रभर हा पाठलाग चालू आहे असे वाटले. थोडं पुढे गेल्यावर एक राजेशाही हॉटेल दिसलं. दरवान झोपलेला होता. पण त्याची सोबत बरी वाटली. तिथेच दगडावर फतकल मारली. पाचच्या सुमाराला दरवान उठला. त्याला मी घडलेला प्रसंग सांगितला.

तर तो म्हणाला कि "वाचलास बाबा तू... इथे बिबट्याचा वावर आहे. तो नक्कीच बिबट्या असणार"
माझी अवस्था काय झाली असेल कल्पना करू शकता.

बाप रे… नशिब जोरावर होतं तुमचं >> खरं तर मला दिसलाच नाही जो कुणी पाठलाग करत होता तो. त्यात दरबान राजस्थानी भाषेत बगेरा कि काय बोलत होता ते समजायला खूप वेळ लागला. तिथून पुढे गेल्यावर मग विचार केला कि बिबट्याच्या पायाचा आवाज कसा येईल ?
कदाचित डांबरी रस्त्यावरच्या वाळूवर चालल्याने असेल. काही का असेना, त्या दरबानाने मात्र घाम फोडला होता.

बघेरा हे त्यांच्या भाषेत बिबळ्याचे नाव आहे. बघीरा हे गोष्टीतल्या चित्त्याचे नाव आहे.
इथे काही गावात बिबटे लोकांसोबत राहतात हे मागाहून समजले.

नेहमीचा बिबट्या सुद्धा सहजा सहजी नजरेला पडत नाही. त्याच्या हालचाली सावध असतात.

Pages