अजब तत्त्वज्ञान

Submitted by शब्दब्रम्ह on 26 June, 2024 - 10:35

"मंदिराला कळस होता सोन्याचा, गाभाऱ्याला घमघमाट होता चंदनाचा, समईच्या वातीला तुप त्यात केशराची धुप, चोहीकडे पुण्य पुण्याचाच उत, कुणी सांगावे या सोगांड्यांना?

गर्भगृहाचा तो दगड सुखला होता दुधाशी, अन पायरीवर मात्र देव निजला होता उपाशी."

वाचायला किती भारी वाटतं ना?

सदरची चारोळी एका समाज माध्यमावर वाचनात आली.

ही चारोळी रसात्मक रूपाने उत्तम आहे. मात्रांचा मेळ ही जमला आहे, जो संदेश द्यायचा आहे तो देखील अत्यंत कल्पकतेने दिला आहे ,पण देण्यात आलेला संदेश मात्र चुकीचा आहे.

यातून एका विशिष्ट धर्मातील लोकांवर च टीका केल्यासारखी वाटते आणि हा मुद्दा वादग्रस्त देखील आहे. (मी सर्वधर्मसमभाववादी आस्तिक आहे.)

मूळात जर देवाला काही अर्पण केल्याने लोकांना आनंद मिळत असेल तर त्यात चुकीचं काय आहे?

'नेटफ्लिक्स, अमेझॉन, डिस्ने हॉटस्टार चे सबस्क्रिप्शन्स घेऊन ओटीटी चा आनंद घेण्यापेक्षा ते पैसे वाचवून भुकेल्यांच्या अन्नाची व्यवस्था करा.' अशी जनजागृती मी कधी ऐकली नाही, किंवा
'वेगवेगळ्या टुरिस्ट कंपन्यांना पैसे देऊन निरनिराळ्या ठिकाणी भ्रमंती करून आनंद घेण्यापेक्षा ते पैसे समाजसेवी संस्थांना दान करा!.' असे ज्ञान पाजळणारा अवलियाही मला अद्याप भेटला नाही. मग मंदिरात श्रद्धेने भगवंता चरणी काही अर्पण करणाऱ्या श्रद्धावंतांबद्दलच हा पोटशूळ का? प्रत्येकालाच जर त्याच्या आनंदासाठी आपला पैसा खर्च करण्याचा अधिकार असेल, तर श्रद्धावंतांनी देखील आपल्या आनंदासाठी तो का खर्च करू नये?

भलेही तुमचा देवावर विश्वास नसेल पण समाज माध्यमांवर पोस्टस् टाकताना, आपली मतं मांडताना देवतांच्या मूर्तींना दगड म्हणणे, किंवा श्रद्धावंतांच्या विश्वासाला अंधश्रद्धा म्हणणे कितपत योग्य आहे? समाजहित करण्याच्या भ्रमात आपण त्याच समाजातील काही घटकांसाठी त्रासदायक असं काहीतरी करत आहोत, समाजाच्याच एका घटकाच्या भावना दुखावत आहोत, हा विचार हे तथाकथित पुरोगामी का करत नाहीत?

आणि मुळात अशा प्रकारे ' मंदिरात पैसा घालण्यापेक्षा तो गरिबांना दान करा , गरजूंसाठी दान करा.' असा प्रचार करणाऱ्यांनी आयुष्यात आपल्या संपत्ती पैकी किती संपत्ती गरिबांसाठी, गरजूंच्या हितासाठी, समाज कल्याणासाठी खर्च केली असेल हाही एक प्रश्नच आहे.

मला विचारायचं आहे की उपरोक्त तत्त्वज्ञान सांगणाऱ्यांपैकी किती जणांनी आपल्या लग्नाचा आवाजवी खर्च टाळून ते पैसे गरजूंच्या हितासाठी दान केले आहेत? वरील प्रमाणे महान उपदेश करणाऱ्या आणि सामान्य जनतेचा इतका कळवळा असणाऱ्या किती जणांनी कधीतरी आपल्या हातात झाडू घेऊन निदान आपल्या घराच्या आसपासचा परिसर तरी कोणतीही लाज न बाळगता साफ केला आहे? किती जणांनी मृत्यूपश्चात अवयवदानाचा संकल्प केला आहे? किती जण नियमित रक्तदान करतात? किती जण वर्षाअखेरीस काही ठराविक रक्कम वृद्धाश्रम अथवा समाजसेवी संस्थांना नियमाने दान करतात? किती जण पर्यावरणाची काळजी म्हणून पावसाळ्यात एक तरी झाड लावतात? कुणीही नाही. म्हणजे सदरचे तत्वज्ञ सामान्यतः ' शिवाजी जन्मावा पण शेजारच्या घरात. ' या मानसिकतेचे असतात.

(हे विद्वान देवाच्या आणि श्रद्धावंतांच्या नावाने समाज माध्यमांवर पुरोगामीपणाचा आव आणून खडे फोडतात पण त्याच देवाच्या नावाने श्रद्धावंतांनी घातलेल्या भंडाऱ्यात आपले पुरोगामी विचार आणि चपला मंडपाच्या बाहेर काढून पहिल्या पंक्तीला बसून ताव मारतात. आणि त्यावेळी मात्र त्यांच्या सारख्या किती गरिबांचे आणि गरजूंचे पोटे श्रद्धावंतांकडून भरली जातात याचा हिशोब ते करत नाहीत. असो.)

गरजूंना गरिबांना दान करणे त्यांना मदत करणे चुकीचे मुळीच नाही पण मंदिरात श्रद्धेने काही पैसा खर्च करण्यापेक्षा तो पैसा गरजूंना गरजूंसाठी खर्च करा हा सिद्धांत चुकीचा आहे. त्यापेक्षा फक्त 'गरजूंना मदत करा ' हा इतकाच संदेश उत्तम आहे. कारण 'एक तर पैसा आपल्या श्रद्धेसाठी खर्च करा किंवा गरिबांना द्या!' असा काही नियम थोडीच आहे? जो मनुष्य मंदिरात श्रद्धेपोटी काही रक्कम खर्च करू शकतो तो मनुष्य गरिबांना गरजूंना दान करण्यासाठी सुद्धा आपल्या संपत्तीतील काही भाग खर्च करूच शकतो ना? त्यासाठी श्रद्धेसाठी खर्च केली जाणारी रक्कमच गरिबांना द्यावी असा अट्टाहास का? जर एखादा मनुष्य आपल्या संपत्तीतील दोन रुपये आपल्या श्रद्धेसाठी खर्च करत असेल तर तोच मनुष्य आपल्या संपत्तीतील आणखी दोन रुपये सामाजिक बांधिलकीसाठी का खर्च करू शकत नाही?

Group content visibility: 
Use group defaults

मस्त विषय आहे.
इथे खुर्ची आणि पोपकॉर्न ची सोय करा कुणीतऱी

रघू जी असं नका म्हणू.
.
ब्रह्म जी इथे ह्या विषयावर चर्चा झालीये.
(आणि त्यायोगे वादविवाद सुद्धा!)
तुमचा लेख आणि तळमळ पोचली.

तुमचे निरिक्षण योग्य आहे.

माझ्या मते देवाला दान करण्याविषयी जे टीका करतात त्यांचा उद्देश्य काहीही असो, मुद्दा योग्य आहे.

लग्न, हॉटेलिंग, पर्यटन, चैन इत्यादी पुण्य मिळवण्यासाठी केले जात नाहीत. देवळात दान मात्र पुण्य मिळवण्यासाठी केले जाते. पुण्यच कमवायचे आहे तर देवाला हिर्‍यांचा मुकुट अर्पुन ते मिळणार नाही कारण देवाला मुकुटाची असोशी नाही, नसावी, असली तर तो देव नाही. त्या ऐवजी एखादे सत्कृत्य केले तर मात्र पुण्यप्राप्ती नक्कीच होईल असे हिंदु धर्म व इतर धर्मही सांगतात.

देवळांवर टीका करणारे ह्या विचारांचे पाईक असतील असे मानन्यास काय हरकत आहे,? पुण्यप्राप्ती हाच हेतु धरुन देवळात दान करत असाल तर पुण्यप्राप्तीचे इतर जास्त चांगले व लगेच परिणाम दिसतील असे मार्ग आहेत असेच हे लोक म्हणताहेत.

देवळात आपण दक्षिणेची पावती फाडतो तेव्हा ही दक्षिणा कुठल्यातरी पुजाअर्चेसाठी किंवा अन्नदानासाठी घेतलेली आहे असे त्यावर नमुद केलेले असते. त्यात सामाजिक बांधिलकीचे रकानेही असावेत असा आग्रह धरुन आपण जर त्या समोर देणगी दिली तर आपल्याला वेगळे गरजु शोधायला नकोत. त्या भागातील रोज वापरात असलेल्या ग्रंथालयांना पुस्तकदान, गरजु विद्यार्थ्यांना पुस्तके, फी, अभ्यासिका इत्यादीत मदत वगैरे वाढिव रकाने देवळांनी पावतीवर घालावेत व देणार्‍यांनी त्यासमोर देणगी द्यावी.

अयोध्येतील रामाच्या मंदीर ऊभारणीसाठी जगभरातल्या लोकांनी जी देणगी दिली ती केवळ पुण्यप्राप्तीसाठी नव्हती तर हिंदु धर्माच्या मुद्दाम पाडलेल्या एका श्रद्धास्थानाची पुनर्निमिती करण्यासाठी देणगी दिलेली होती. आपल्या परिसरातील देवळाच्या कामासाठी जर देणगी द्यावीशी वाटली तर जरुर द्यावी. कोणाला हॉटेलात जाऊन हजारो रु खर्च केल्यावर बरे वाटते, कोणाला देवळात हजारची देणगी दिल्यावर बरे वाटते.
ज्यांना हॉटेलचे काही वाटत नाही पण देवळात दिलेले पैसे पाहुन पोटशुळ उठतो ते बोलणार, बोलायचे माध्यम आता प्रत्येकाच्या हातात आहे त्यामुळे काय व केव्हा बोलायचे याचा विवेक लयाला गेलाय. अशा बोलण्याकडे दुर्लक्ष करणे हाच एक उपाय आहे.

खूप मोठा विषय आहे.हल्ली मी ज्याशांत देवळात जाते तिथे 21 किंवा 51 रूपये दानपेटीत टाकते. अगदी पुण्य यापेक्षा या देवळाने मला टेकायला 5 मिनिटं, बघायला सुंदर मूर्ती, पवित्र सुगंधी वातावरण हा युजर एक्सपिरियन्स दिला.मीही या वास्तूला इन्फ्रास्ट्रक्चर मेंटेनन्स दयावा.या भावनेने.प्रसिद्ध मोठी देवळं जिथे मूर्ती डोळ्यांना दिसेपर्यंत मागून पोलीस दरडावून खांद्याला हात लावून हाकलतात त्या देवळांना काहीही देत नाही.त्यांना देणारे भरपूर आहेत.
बाकी हिऱ्याचे मुकुट देणाऱ्यांबद्दल आपण काय बोलावे?त्यांचा पैसा.जोवर समाजाला नुकसान पोहोचवत नाहीत(ड्रग, दारू, दारू पिऊन वाहन चालवून लोकांचा खून,गुन्हेगारी धंदे किंवा चाईल्ड ट्रॅफिकिंग करून) तोवर त्यांनी पाहिजे तसा तो वापरावा, पाहिजे तिथे खर्च करावा.
'या गोष्टी पेक्षा त्या गोष्टी वर पैसा खर्च करा' हा प्रश्न तेव्हाच येतो जेव्हा त्या व्यक्तीवर, व्यक्तीच्या पैश्यांवर आपला प्रेमाने अधिकार असतो.जे आपले नाहीतच त्यांनी काहीही करावे, मला इजा न पोहचवता.

बरं किल्ली.
अनेकदा आपण अशा चर्चेत भाग का घेतो ? आपले आपल्याला मुद्दे स्पष्ट होत असतात म्हणून. तो काळ हिरीरीने वादविवाद करण्याचा असतो. जेव्हां आपण त्या वादविवादातून तावूनसुलाखून निघतो, आणि आपल्यापुरते आपले प्रामाणिक मत बनते, तेव्हां लोकांना ते पटवण्याचा आग्रह राहत नाही. कुणी एखादे मत मांडले कि मग त्याबद्दल का नाही असा दुराग्रह अशा वादविवादात येत नाही. काही ठिकाणी तो दुराग्रह असत नाही हे पण महत्वाचे आहे. थोडक्यात वादविवादाचे नियम नसतात. नीरक्षीरविवेक लावून पाहिले पाहिजे.

धाग्याबद्दल..
लेखाच्या सुरूवातीला चारोळी दिली आहे. ही त्या कवीची भावना आहे. त्याने काय भाव ठेवावा हा त्याचा प्रश्न आहे. जो कुणी आस्तिक आहे त्याने असा भाव कवीच्या ठायी उत्पन्न व्हावा ही "त्याचीच" इच्छा आहे असे का मानू नये ? जर "त्यानेच" हा विचार कवीला दिला असेल तर अन्य कुणी त्याबद्दल विपर्यास करून चुकीचे का ठरवावे ? हे आस्तिकाच्या मताचा आदर करून म्हटले आहे.

पण त्याच वेळी कवीचा विचार चुकीचा आहे असे क्षणभर मान्य केले तरी कवी ज्या धर्माचा आहे त्या धर्माबद्दल त्याने का बोलू नये ? हा मुद्दा लाख वेळा इंटरनेटवर अनेक भाषेत चर्चेला आलेला असेल. इथे धागालेखकाने जे प्रमेय मांडले आहे ते असे आहे कि आपल्या धर्मावर टीका करायची तर इतर धर्मावर सुद्धा टीका करायला हवी. (तरच त्याला सर्वधर्मसमभाव म्हणता येईल). पण जो ज्या धर्माचा आहे त्याने त्या धर्मावर टीका करण्यासाठी सर्वधर्मभाव का जोपासला पाहिजे ? हेच प्रमेय आणि हाच न्याय जर खालच्या उदाहरणाला लावला तर काय दिसते ?

खिर्स्ती धर्मीय त्यांच्या धर्माची टर उडवतात, टिंगल करतात मग त्यांनी कवीच्या धर्मावर किंवा धागालेखकाच्या धर्मावर टीका केली तर या प्रमेयाद्वारे धागालेखकाला काहीही अडचण नसायला पाहीजे. पण तसे होते का ? ते चालणार आहे का ? नसेल तर इथे मांडलेले प्रमेय तकलादू सिद्ध होते.

टूर कंपनी आणि ओटीटी प्लॅटफॉर्म यांच्या सेवा या व्यावसायिक सेवा आहेत. या सेवांचे चार्जेस पडतात. त्या घराला रंग मारणे, घर बांधणे, साफ करणे , गाडी दुरूस्त करणे याप्रमाणेच आहेत. तुमची प्रवासाला जाण्याची किंवा विकतचे मनोरंजन घेण्याची गरज या सेवाकंपन्या पूर्ण करतात त्याचे चार्जेस तुम्ही देता.

देवाशी तुमचे नाते व्यावसायिक आहे का ?
तुम्ही जी देणगी देता ती त्या देवाचा व्यवसाय आहे कि ऐच्छिक आहे ? देणगी देताना या पैशांच्या बदल्यात मला अमूक तमूक सेवा मिळणार आहे असा भाव तुमच्या ठायी असतो का ? तुम्हाला देवदर्शनातून मिळणारा आनंद हा देणगी न देता मिळणार नाही का ? आणखीही बरेच बारकावे आहेत यात.

यावर असे युक्तीवाद येतात कि आनंदाची फीस हा दोन्हीकडे समान धागा आहे. तोच मुळात चुकीचा आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म वर तुम्ही काय विकत घेता हे निश्चित असते. ते मनोरंजन कुणीतरी बनवलेले असते त्याचा निर्मितीखर्च असतो आणि तो जाऊन नफा मिळावा म्हणून त्याने ते बनवलेले असते. या धंद्यात नुकसान सुद्धा असते. नफाही असतो. इथे आपण सुख विकत घेतो.

देवाशी तुमचे नाते आनंदाचे आहे. सुखाचे नाही. सुख विकत घेता येते. आनंद नाही.
हे मत तुम्ही पटवून घ्यावे हा आग्रह नाही. इतरांचे मत चुकीचे आहे असे एकदा म्हटले कि आपल्याही मताची चिकित्सा होऊ शकते ही तयारी असावी एव्हढीच अपेक्षा. बाकी, तुम्ही कुठले मत बाळगावे हा तुमचा अधिकार आहे.

https://www.maayboli.com/node/84227?page=1

या धाग्यात तुम्हीच विचार मांडलेत ना कि मी हिंदू आहे पण हिंदू धर्मात राहून पण बुद्ध विचार अंगी बाणवता येतात.
इथे तुम्ही नास्तिक विचार मांडू नयेत (मूर्तीला दगड म्हणणे) असे म्हणत आहात. बुद्ध आणि चार्वाक हा नास्तिक विचार आहे. तुम्ही एकदा नक्की करा कि तुम्हाला नेमके काय म्हणायचे आहे. तुम्ही कुठलेही विचार बाळगू शकता. त्याचे पूर्ण स्वातंत्र्य असायला हवे आणि त्या विचारांचा आदर व्हायला हवा.

पण त्यात विरोधाभास नको. एक पे कायम रहो.
( तुम्हाला आयडी मधले स्पेलिंग दुरूस्त करून घेण्याबाबत सूचना आलेली नाही याबद्दल अभिनंदन. माबो बदलतेय.)

तुम्हाला आयडी मधले स्पेलिंग दुरूस्त करून घेण्याबाबत सूचना आलेली नाही याबद्दल अभिनंदन. माबो बदलतेय.) Lol

मागे एकदा एका जोशींनी कै.जामोप्याना ब्राम्हण नव्हे ब्राह्मण लिहा असे सुनवले होते, त्यावर म्हैस हा शब्द ह्म वापरून लिहिला होता त्याची आठवण झाली

भ्रमर Happy

मूळ मुद्दा राहिलाच कि..
मुद्दामून उकसवणारी मतं टाळावीत असे आता वाटते. तुम्हाला अजून त्या प्रोसेस मधून जायचेय असे वाटते.
पण चारोळीकाराने त्याचे मत कुणाला उकसवण्यासाठी दिलेय असे अजिबात वाटत नाही. अ त्यंत कलात्मक पद्धतीने त्याने आपले मत मांडलेले आहे. संतांनी पण दर्शने, दाखले देत आपली काही मतं मांडली आहेत जी त्या काळच्या सनातन्यांना मान्य नव्हती.
योग्य पद्धतीने (आक्रस्ताळे न होता) मत मांडावे, त्यावर निकोप चर्चा देखील व्हावी.

तुम्हा सर्वांच्या प्रतिक्रिया वाचून आनंद झाला, पण या लेखाचा नेमका मुद्दा अनेकांच्या ध्यानात आलेला दिसत नाही. असो.
मला या लेखातून इतकंच सांगायचं आहे की, अनेकांकडून आपण अनेकदा सल्ले ऐकत असतो जसे की 'लोक दगडावर दूध ओतत असतात, तेच दूध त्यांनी मंदिराबाहेरच्या एका भूकेल्याला दिलं पाहिजे.'
का? तेच दूध का? जर एक दुधाची पिशवी मी अभिषेकासाठी विकत घेत असेन तर त्या भुकेल्याला देण्यासाठी मी आणखी एक पिशवी का विकत घेऊ नये? इथे मी अभिषेकाचेच दूध त्याला द्यावे हा आग्रह का? मला जर माझी श्रद्धा असलेल्या देवतेच्या मूर्तीवर दुधाचा अभिषेक घालून आनंद मिळत असेल तर मी तो का घालू नये? जर मी कृतज्ञता म्हणून दानपेटीत दहा रुपये टाकत असेन तर आणखी दहा रुपये मी मंदिराबाहेरच्या एखाद्या गरजूला देऊच शकतो ना? इथे दानपेटीतलेच पैसे त्याला द्यायला हवे होते हा आग्रह का? म्हणूनच मी लेखात म्हटले की मंदिरात श्रद्धेने काही पैसा खर्च करण्यापेक्षा तो पैसा गरजूंसाठी खर्च करा हा सिद्धांत चुकीचा आहे. त्यापेक्षा फक्त 'गरजूंना मदत करा ' हा इतकाच संदेश उत्तम आहे.
आणि देवतेच्या मूर्तीला 'दगड', अभिषेकाला 'ओतणे', श्रद्धेला 'अंधश्रद्धा' म्हणून श्रध्दावांताना खुळ्यात काढणे योग्य आहे का? इथे त्यांच्या भवनाचा आदर नको का करायला? दरवेळी त्यांची टर उडवून समाजजागृती करण्यापेक्षा सौम्य शब्दात समजावता नाही का येणार?
बस. मला इतकंच म्हणायचं आहे. यामध्ये सगळ्याच धर्मांना अनुसरून मी सदरचा लेख लिहिला आहे. गैरसमज नसावा.

@साधना, अभ्यासपूर्ण आणि नेमकी प्रतिक्रिया दिलीत. पण तुमच्या काही मुद्द्यांना माझा विरोध आहे कोणताही द्वेष नाही. देवाला दान काही फक्त पुण्यासाठीच नाही केलं जात, आनंदासाठी, समाधानासाठीसुद्धा केलं जातं. एखादं मूल वडीलांनीच दिलेल्या पॉकेट मनीतून त्यांच्यासाठी चॉकलेट आणत असेल, तर ते त्यांच्यावरील प्रेमासाठीच आणतं, दरवेळी त्याची 'वडीलांनी आपल्याला काहीतरी बदल्यात द्यावं'. ही अपेक्षा मुळीच नसते, आणि वडील सुद्धा त्या चॉकलेटने इतके खुश होतात, ते काही आपल्या मुलाने आपल्याला काही तरी दिलं आता आपल्याला ते उपभोगता येईल म्हणून नव्हे, तर त्याचं त्यामागचं प्रेम बघून. नाहीतर काय वडीलांजवळ चॉकलेट साठी पैसे नाहीत की काय? आईने बाजारातून तीन जिलेब्या आणून तिघा मुलांना दिल्यानंतर एकाने आईजवळ येऊन जिलेबीचा तुकडा तिला भरवला तर आई प्रेमाने त्याला जवळ घेते, ते काही त्याने तिला जिलेबिचा तुकडा दिला म्हणून नव्हे, त्याचं प्रेम बघून. आता आईने बाकी दोघा मुलांना तिसऱ्याप्रमाणे जवळ घेतलं नाही याचा अर्थ तिचे त्यांचावर प्रेम नाही असा अर्थ आपण काढणार का? की 'आईला काहीतरी दिलं तरच ती प्रेम करते त्यामुळे तिला आई म्हणू नये.' असं म्हणणार?

तेच दूध का? जर एक दुधाची पिशवी मी अभिषेकासाठी विकत घेत असेन तर त्या भुकेल्याला देण्यासाठी मी आणखी एक पिशवी का विकत घेऊ नये?>> जर फक्त एका दुध पिशवीचे पैसे असतील तर काय करावे?

प्रश्नासाठी धन्यवाद @वीरू. अशावेळी आपली दूधाची पिशवीच काय, आपल्या धोतरातील अर्ध धोतर ही गरजूला द्यावे ही संतांची शिकवण आहे. ज्यावेळी एखाद्याला गरज असेल त्यावेळी आपण भलेही उपाशी राहावे पण समोरच्याची भूक शमवावी. येथे आपल्या आनंदापेक्षा एखाद्याची गरज भागवणे अधिक श्रेयस्कर असते. पण मंदिरात भक्तीने काही तरी अर्पण करणाऱ्याने कायमच कुठलातरी गरजू शोधून तेच दान त्याला द्यावे ही अपेक्षा चुकीची आहे. ज्याच्याकडे एकाच दुधाच्या पिशवी चे पैसे आहेत त्याच्याकडे चैनीसाठी, मनोरंजनासाठी पैसे नसतीलच या अपेक्षेने हे उत्तर लिहिले आहे.

@रघू आचारी
तुमचे विचार अनमोल आहेत, ते असे कुठेही ओकणे बरे नव्हे. त्यांना तुमच्या पोटातच ठेवा.

लेखाच्या सुरवातीला मांडलेल्या चारोळीतले विचार आवडले.

माझ्या सर्व देवांचे वास्तव्य माणसांत आहे त्यामुळे बहुतेक सर्व मंदिरे कायम फिरत ( म्हणजे मोबाईल ) असतात, काहींना फिरण्यावर मर्यादा आहेत . कुठल्याही दगड विटांनी बांधलेल्या पक्क्या मंदिरांत जायची अवशक्ता मला भासत नाही. तिथल्या दानपेटीत टाकण्यासाठी माझ्याकडे जास्तीचा एक पैसाही नाही आहे कारण बाहेरच्या जगाला त्याची अवशक्ता सर्वाधिक आहे. दोन पिशव्या दूध असेल तर दोन्हींची सर्वात जास्त अवशक्ता बाहेर उपाशी असणार्‍याला आहे.

इस्पितळे, धर्मशाळा, संकट काळांत मुख्यमंत्री निधी किंवा "Prime ministers relief fund " आणि आजकाल पर्यावरणाची काळजी घेणार्‍या अनेक संस्था आहेत त्यांच्याबाबत डोनेशन साठी जरुर माझ्या मर्यादेत विचार करतो. नुसतेच पैसे दिले आणि जबाबदारी संपली असे होत नाही. त्या पैशांचा उपयोग अपेक्षित समाज कार्यासाठी होत आहे का? local food bank ( अन्न कोष) चे व्यावहार पारदर्शक असतात आणि audited financial report सर्वांसाठी उपलब्द असतो.

पद्मनाभ मंदिरांत डोळे विस्फारुन जातील एव्हढे मोठे सोने मिळाले होते ( आकडे काही लाख कोटी रुपये असे काही तरी होते०. अनेक चॉ व्हॉल्ट ( A, B, C,D,E,F,G,H ) मधे हे ठेवले होते.

लाखो कोटीचे सोने नुसते पडून रहाणे याला काहीच अर्थ नाही. देणार्‍यांनी श्रद्धेने दिले.... पण त्याचा उपयोग काय जर ते शेकडो वर्षे नुसते व्हॉल्ट मधेच कुजणार असेल तर? नंतर तिथेही गैरप्रकार झालेत.

देवाधर्मासाठी जास्त खर्च करण्यापेक्षा तो थोडा कमी करुन तो समाजसेवेसाठी वर्ग करणारे लोक आहेत. जनसेवा हीच खरी ईश्वरसेवा असे मानून आपल्या श्रद्धेची पुनर्तपासणी करणारे लोक आहेत. त्यांना अशा आवाहनामुळे पुनर्विचार करावासा वाटतो व समाजात काही सकारात्मक बदल होतो. अन्यथा पैशाचा माज म्हणुन नोटेत तंबाखू घालून चिलिम ओढणारे आपल्या पैशाने ओढतात तुमचे काय जाते? असेही म्हणता येते

माफ करा लहान तोंडी मोठा घास घेत आहे, पण आपण येथे लेखकाची बाजू ही थोडी समजून घेतली पाहिजे असं मला वाटतं. लेखकाचं म्हणणं इतकंच आहे की, देवळात श्रद्धेने देवाला काहीतरी अर्पण करणे मग ते रकमेच्या रूपात असो किंवा वस्तुरूपात, हे श्रद्धावंत आपल्या समाधानासाठी किंवा आनंदासाठी करत असतो त्यात गैर असं काहीच नाही. त्याच्या या कृतीने ना त्याला काही हानी पोहोचते ना समाजातील अन्य कोणाला, झाला तर फायदाच होतो. कृपा, दैवी सामर्थ्य या गोष्टी बाजूला ठेवल्या तरी सकारात्मकता, समाधान हे नक्कीच प्राप्त होतं. म्हणजे त्याच्या या कृतीने झाला तर फायदाच होतो नुकसान नाही होत. ज्याप्रमाणे @ प्रकाश घाटपांडे म्हणतात की ' पैशाचा माज म्हणुन नोटेत तंबाखू घालून चिलिम ओढणारे आपल्या पैशाने ओढतात तुमचे काय जाते? असेही म्हणता येते.' ही तुलना चुकीची आहे कोणीतरी नोटेत तंबाखू घालून चिलीम ओढत असेल तर ते कृत्य त्या व्यक्तीच्या व आजूबाजूच्या लोकांसाठी घातक असते. त्यामुळे त्याच्या या कृत्याची तुलना एखाद्या श्रद्धावंताच्या मंदिरात दान अथवा काही अर्पण करण्याशी नाही करता येऊ शकत. आणि लेखकाने लेखांमध्ये ज्याप्रमाणे मंदिरात काहीतरी अर्पण करून आनंद मिळवण्याच्या कृत्याची तुलना ओ.टी.टी प्लॅटफॉर्म वरती पैसे भरून आनंद मिळवण्याशी केली आहे, ती सुद्धा थोडी असहज वाटते पण थोडा विचार केल्यास ती पटते. आज हजारो, लाखो लोक आनंद मिळवण्यासाठी ओटीटीवर पैसे भरतात. मग ते पैसे समाज कल्याणासाठी वापरावे असा अट्टाहास कोणी का करत नाही हा खर्च टाळता येऊ शकतोच ना? आणि ही तर चैनच आहे नाही का? ज्याप्रमाणे @उदय म्हणतात की 'दोन पिशव्या दूध असेल तर दोन्हींची सर्वात जास्त अवशक्ता बाहेर उपाशी असणार्‍याला आहे.' दोन पिशव्यांची किंमत 50 रुपये असते पण ओटीटी सबस्क्रीप्शन ची किंमत 200 ते 300 रुपये असते तर हा पैसा गरजवंताला दिला तर जास्त फायदा नाही का होणार? तुमचा डोळा त्या दुधाच्या पिशव्यांवरच का ओटीटी सबस्क्रिप्शन वरती का नाही? ओटीटी सबस्क्रिप्शन हे निव्वळ आपल्या इतर आनंदाच्या साधनांचे प्रातिनिधिक उदाहरण म्हणून विचारात घेतले आहे. जर आपण गरजूंना मदत करण्यासाठी आपल्या इतर आनंदाच्या साधनांवर गदा आणू इच्छित नाही तर मग श्रद्धावंतांच्या दान देऊन मिळवण्याच्या आनंदावरच का गदा आणू इच्छितो? जो न्याय तुम्ही श्रद्धावंतांच्या मंदिरात दान देऊन मिळवण्याच्या आनंदासाठी वापरता तोच न्याय तुम्ही इतर लोकांच्या वेगवेगळ्या ठिकाणी पैसा खर्च करून आनंद मिळवण्याच्या साधनांसाठी का बरं वापरत नाही? कदाचित हे स्पष्टीकरण वेगळं वाटेल प्रॅक्टिकली विचार केल्यास नक्की पटेल. लेखकालाही लेखामध्ये उल्लेखित तथाककथित तत्वज्ञांवर ताशेरे ओढण्यापेक्षा सौम्य शब्दात आपली मते मांडता आली असती.

काही लोकं मंदिरात दारू पित नाहीत. पण दारू अपवित्र आहे हे मान्य सुद्धा करत नाहीत. इथेही दिवसा अखेरीस तेच होणार आहे Happy

धागा वरवर वाचला. प्रतिसाद काय असतील हे गेस केले. सध्या माबॉ वावर मर्यादित आहे... रोहीत शर्मासाठी म्हणून येतो...

Pages