अजब तत्त्वज्ञान

Submitted by शब्दब्रम्ह on 26 June, 2024 - 10:35

"मंदिराला कळस होता सोन्याचा, गाभाऱ्याला घमघमाट होता चंदनाचा, समईच्या वातीला तुप त्यात केशराची धुप, चोहीकडे पुण्य पुण्याचाच उत, कुणी सांगावे या सोगांड्यांना?

गर्भगृहाचा तो दगड सुखला होता दुधाशी, अन पायरीवर मात्र देव निजला होता उपाशी."

वाचायला किती भारी वाटतं ना?

सदरची चारोळी एका समाज माध्यमावर वाचनात आली.

ही चारोळी रसात्मक रूपाने उत्तम आहे. मात्रांचा मेळ ही जमला आहे, जो संदेश द्यायचा आहे तो देखील अत्यंत कल्पकतेने दिला आहे ,पण देण्यात आलेला संदेश मात्र चुकीचा आहे.

यातून एका विशिष्ट धर्मातील लोकांवर च टीका केल्यासारखी वाटते आणि हा मुद्दा वादग्रस्त देखील आहे. (मी सर्वधर्मसमभाववादी आस्तिक आहे.)

मूळात जर देवाला काही अर्पण केल्याने लोकांना आनंद मिळत असेल तर त्यात चुकीचं काय आहे?

'नेटफ्लिक्स, अमेझॉन, डिस्ने हॉटस्टार चे सबस्क्रिप्शन्स घेऊन ओटीटी चा आनंद घेण्यापेक्षा ते पैसे वाचवून भुकेल्यांच्या अन्नाची व्यवस्था करा.' अशी जनजागृती मी कधी ऐकली नाही, किंवा
'वेगवेगळ्या टुरिस्ट कंपन्यांना पैसे देऊन निरनिराळ्या ठिकाणी भ्रमंती करून आनंद घेण्यापेक्षा ते पैसे समाजसेवी संस्थांना दान करा!.' असे ज्ञान पाजळणारा अवलियाही मला अद्याप भेटला नाही. मग मंदिरात श्रद्धेने भगवंता चरणी काही अर्पण करणाऱ्या श्रद्धावंतांबद्दलच हा पोटशूळ का? प्रत्येकालाच जर त्याच्या आनंदासाठी आपला पैसा खर्च करण्याचा अधिकार असेल, तर श्रद्धावंतांनी देखील आपल्या आनंदासाठी तो का खर्च करू नये?

भलेही तुमचा देवावर विश्वास नसेल पण समाज माध्यमांवर पोस्टस् टाकताना, आपली मतं मांडताना देवतांच्या मूर्तींना दगड म्हणणे, किंवा श्रद्धावंतांच्या विश्वासाला अंधश्रद्धा म्हणणे कितपत योग्य आहे? समाजहित करण्याच्या भ्रमात आपण त्याच समाजातील काही घटकांसाठी त्रासदायक असं काहीतरी करत आहोत, समाजाच्याच एका घटकाच्या भावना दुखावत आहोत, हा विचार हे तथाकथित पुरोगामी का करत नाहीत?

आणि मुळात अशा प्रकारे ' मंदिरात पैसा घालण्यापेक्षा तो गरिबांना दान करा , गरजूंसाठी दान करा.' असा प्रचार करणाऱ्यांनी आयुष्यात आपल्या संपत्ती पैकी किती संपत्ती गरिबांसाठी, गरजूंच्या हितासाठी, समाज कल्याणासाठी खर्च केली असेल हाही एक प्रश्नच आहे.

मला विचारायचं आहे की उपरोक्त तत्त्वज्ञान सांगणाऱ्यांपैकी किती जणांनी आपल्या लग्नाचा आवाजवी खर्च टाळून ते पैसे गरजूंच्या हितासाठी दान केले आहेत? वरील प्रमाणे महान उपदेश करणाऱ्या आणि सामान्य जनतेचा इतका कळवळा असणाऱ्या किती जणांनी कधीतरी आपल्या हातात झाडू घेऊन निदान आपल्या घराच्या आसपासचा परिसर तरी कोणतीही लाज न बाळगता साफ केला आहे? किती जणांनी मृत्यूपश्चात अवयवदानाचा संकल्प केला आहे? किती जण नियमित रक्तदान करतात? किती जण वर्षाअखेरीस काही ठराविक रक्कम वृद्धाश्रम अथवा समाजसेवी संस्थांना नियमाने दान करतात? किती जण पर्यावरणाची काळजी म्हणून पावसाळ्यात एक तरी झाड लावतात? कुणीही नाही. म्हणजे सदरचे तत्वज्ञ सामान्यतः ' शिवाजी जन्मावा पण शेजारच्या घरात. ' या मानसिकतेचे असतात.

(हे विद्वान देवाच्या आणि श्रद्धावंतांच्या नावाने समाज माध्यमांवर पुरोगामीपणाचा आव आणून खडे फोडतात पण त्याच देवाच्या नावाने श्रद्धावंतांनी घातलेल्या भंडाऱ्यात आपले पुरोगामी विचार आणि चपला मंडपाच्या बाहेर काढून पहिल्या पंक्तीला बसून ताव मारतात. आणि त्यावेळी मात्र त्यांच्या सारख्या किती गरिबांचे आणि गरजूंचे पोटे श्रद्धावंतांकडून भरली जातात याचा हिशोब ते करत नाहीत. असो.)

गरजूंना गरिबांना दान करणे त्यांना मदत करणे चुकीचे मुळीच नाही पण मंदिरात श्रद्धेने काही पैसा खर्च करण्यापेक्षा तो पैसा गरजूंना गरजूंसाठी खर्च करा हा सिद्धांत चुकीचा आहे. त्यापेक्षा फक्त 'गरजूंना मदत करा ' हा इतकाच संदेश उत्तम आहे. कारण 'एक तर पैसा आपल्या श्रद्धेसाठी खर्च करा किंवा गरिबांना द्या!' असा काही नियम थोडीच आहे? जो मनुष्य मंदिरात श्रद्धेपोटी काही रक्कम खर्च करू शकतो तो मनुष्य गरिबांना गरजूंना दान करण्यासाठी सुद्धा आपल्या संपत्तीतील काही भाग खर्च करूच शकतो ना? त्यासाठी श्रद्धेसाठी खर्च केली जाणारी रक्कमच गरिबांना द्यावी असा अट्टाहास का? जर एखादा मनुष्य आपल्या संपत्तीतील दोन रुपये आपल्या श्रद्धेसाठी खर्च करत असेल तर तोच मनुष्य आपल्या संपत्तीतील आणखी दोन रुपये सामाजिक बांधिलकीसाठी का खर्च करू शकत नाही?

Group content visibility: 
Use group defaults

..

Pages