हवामान बदलाचे दुष्परिणाम हे आता दूर कुठे तरी हिमालयात हिमनद्या वितळाताहेत, उत्तर / दक्षिण ध्रूवावरचे हिमनग सुटून निघत आहेत असं काहीतरी केवळ वाचायची गोष्ट राहिली नाही. लेहला झालेली ढगफुटी, केदारनाथ प्रलय, अशा केवळ फिरायला जायच्या ठिकाणांच्या ठिकाणी घडणार्या गोष्टींसोबतच, मोठ्या भूस्खलनामुळे सह्याद्रीच्या कुशीतील माळीण सारखे आख्खेच्या आख्खे गाव नाहीसे होणे, पुण्यासारख्या उत्तम हवामानाकरता प्रसिद्ध असलेल्या शहराचे ४५ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचलेले तपमान असे आपल्या उंबरठ्यापर्यंत येऊन ठेपले आहेत. मागे एकदा, भविष्यात पिण्याच्या पाण्यावरनं युद्धं होतील असे मी जेव्हा वाचले तेव्हा माझ्या हयातीत काही असे होत नाही म्हणून मी माझी समजूत काढलेली जी खोटी ठरण्याची वेळ आलेली आहे.
ह्या सगळ्या मानव निर्मित / मानवी हस्तक्षेपामुळे होणार्या नैसर्गिक घडामोडी चालू असताना आपल्या देशातली स्थिती माध्यमांवर नजर टाकता तरी अशी भासते की जगात जास्त महत्वाचे काही असेल तर ते म्हणजे नटनट्यांचा एअरपोर्ट लूक, कोणत्या क्रिकेटवीराला किती जाहिराती मिळतात आणि त्यामुळे त्याची ब्रँड व्हॅल्यु कशी वधारते आहे आणि राजकीय घडामोडी. राजकीय घडामोडी तर 'अराजकी'य होत चालल्या आहेत. एखाद्या सरकारने केलेले काम चांगले आहे की नाही हे ते सरकार कोणत्या पक्षाचे आहे ह्यावर ठरते. सर्वसाधारणतः आपल्याकडच्या बहुतेक शहरी माणसांचा समज असा असतो की कर भरला म्हणजे आपले काम / कर्तव्य संपले बाकी जे काही करायचे आहे ते त्या भरलेल्या करांच्या बदल्यात सरकारने करावे. सरकारला (स्थिर असेल तर / तरीही) लोकांना चटकन दाखवायला सोपी पडतील अशी कामे करण्यात रुची असते. शाश्वत विकास वगैरे गोष्टी बोलाची कढी म्हणून च राहतात. ह्या सगळ्यात पर्यावरणाबाबत आपण काहीतरी करायची वेळ आलेली आहे असे वाटत असतानाच माझ्या वाचनात आले मियावाकी पद्धतीने बनवता येणार्या जंगलाबाबत.
मियावाकी प्रकारच्या जंगलाचे कमीत कमी शब्दात वर्णन करायचे झाले तर ते असे असेल.
जैवविविधता राखून स्थानिक झाडे जवळजवळ लावणे. ह्याने होणारे फायदे असे मातीतून घेत असलेल्या पोषणाबाबत परस्परपुरक वातावरण आणि झाडे जवळजवळ लावल्याने वाढीच्या बाबतीत (जमीनीवर फांद्यांची आणि खाली मुळांची वाढ) स्पर्धा केल्याने होणारी जलद वाढ. दावा असा आहे की हे जंगल, आपण लावलेल्या सहा इंच ते दोन फूटी रोपांना वणवा, चराई पासून जपले आणि पाणी घालत राहिले तर केवळ तीन वर्षात १०-१२ फुटांहून जास्त उंच वाढते आणि पाण्याच्या बाबतीत स्वयंपुर्ण होते.
मला मिळालेली बहुतांश सर्व माहीती https://www.afforestt.com/ ह्या वेब साईटवरून मिळवलेली आहे. भारतात सर्व प्रथम शुभेंदू शर्मा नावाच्या एका इंजीनियर ने तो त्यावेळी काम करत असलेल्या एका जपानी ऑटो उत्पादक कंपनी करता त्यांच्या आवारात अशा प्रकारचे जंगल तयार केले; त्यानंतर ह्या पद्धतीमुळे तो इतका प्रभावित झाला की त्याने ती नोकरी सोडून स्वतःच एक कंपनी स्थापन केली ज्यायोगे तो आज अनेक ठिकाणी अशा प्रकारचे जंगले तयार करण्याचे काम पैसे घेऊन करतो अर्थात तरीही ज्याला कोणाला स्वतः चे स्वतः हे काम करण्याची ईच्छा आहे अशा लोकांकरता अत्यंत सुलभ प्रकारे वर्णन केलेली माहीती ह्याच वेबसाईटवर दिलेली आहे. https://www.dropbox.com/sh/4l3sqwd3b9j3pmq/AAAa6kbi3r7yY9QnDgrnj5BMa?dl=0 इथुन ती डाऊनलोड देखिल करता येऊ शकते.
माझ्या पाहण्यात आलेला मियावाकी बाबतचा पहिला व्हिडिओ
https://youtu.be/jf3YXoMZ76o
आणि अलीकडेच पाहण्यात आलेला हा एक व्हिडिओ
https://youtu.be/j7PbJYJXRuI
हे पाहून काय करायचे असते ते अधिक चांगल्या प्रकारे कळू शकेल.
मियावाकी पद्धती ने तयार केलेले आणि पारंपारिक पद्धती ने तयार केलेले जंगल यामधला फरक उलगडून दाखवणारा हा अजून एक व्हिडियो
मी ही ठरवले आहे की आपणही हे करून बघायला हवे. माझ्याकडे ज्यावर असे जंगल तयार करता येईल अशी जमीन आहे फक्त २ गुंठे त्यामुळे आणि त्याव्यतिरिक्तही, 'पण' ने सुरु होणारे अनेक प्रश्न उपस्थित झाले आणि नेहेमी प्रमाणे बापूंना आठवले. गांधीजी, त्यांच्याकडे एखाद्या उपक्रमाबाबत 'हे कसं होईल' वगैरे शंका घेऊन कोणी माणूस आला की म्हणायचे 'करके देखो'
मी माझ्याकडे असलेल्या (फक्त २ गुंठे) जागेत असे जंगल तयार करू शकलो तरी त्याचा वातावरणावर खूप मोठा प्रभाव पडणार आहे असे काही नाही पण आपल्याकडे रामाच्या सेतूला मदत करणार्या खारीची गोष्ट, खुलभर दुधाची कहाणी अशा अनेक गोष्टींनी प्रेरित होऊन ही हिंमत एकवटत आहे. नेहेमी प्रमाणेच माझ्या अनेक वैयक्तिक उपक्रमांना देता तशा शुभेच्छा द्याल अशी आशा आहे.
लावू पहात आहे अशी झाडे निवडण्याकरता माझ्या एका मैत्रीणीची व्यावसायिक मदत मिळाली आहे. सर्व झाडे अर्थात च देशी असणार आहेतच पण त्यातही अशी काही निवडली आहेत ज्यामुळे पक्षी , कीटक, फुलपाखरे अशा निसर्ग साखळी तील सर्व घटकांना पोषक असे पर्यावरण तयार होईल.
झाडांबाबत अधिक माहिती खालील वेब साईटस् वरून मिळवता येईल. (विशेषकरून भारतीय झाडांकरता पहिल्या दोन वेब्साईट अधिक उपयुकरता)
https://indiabiodiversity.org/
http://www.flowersofindia.net/
http://tropical.theferns.info/
आपल्या मायबोलीवर अनेक निसर्गप्रेमी, पर्यावरण प्रेमी मंडळी आहेत; असेही अनेक जण आहेत ज्यांच्याकडे भरपूर जमीन आहे; काहीजण शहरातील थोडीफार मोकळी जागा असलेल्या सोसायटीत रहात असतील त्यासर्वांपर्यंत ही माहिती पोहोचवावी म्हणून हा खटाटोप.
तर मंडळी चला जंगल तयार करू या.
तळटीप - मियावाकी जंगलासंदर्भात वेळोवेळी वाचनात आलेल्या बातम्या देखिल ह्याधाग्याखाली संकलित करुया.
ऑरगॅनिक मॅटर ब्रेकडाऊन होताना
ऑरगॅनिक मॅटर ब्रेकडाऊन होताना उष्णता होतेच शिवाय ओक्सिजन खाऊन टाकते. खड्ड्यात गाडले गेल्याने प्रोसेस स्लो होतेच .
>> मला काही फळझाडे लावायची होती>>>
(नारळ आणि सुपारी सोडून इतर) फळझाडांना मुख्य सोटमूळ असते ते खोल जाते आणि ते जळत कामा नये. नर्सरीतले दोन वर्षांच्या रोपांचे सोटमूळ त्या प्लास्टिक पिशवीतच तळाला गुंडाळून बसलेले असते ते सरळ करून लावावे लागते. ते सरळ खाली वाढले की पुढे झाडांची वाढ चांगली जोरदार होते. म्हणून फार जुने रोपही आणू नये.
Pages