जंगल तयार करायची मियावाकी पद्धत

Submitted by हर्पेन on 10 June, 2019 - 02:34

हवामान बदलाचे दुष्परिणाम हे आता दूर कुठे तरी हिमालयात हिमनद्या वितळाताहेत, उत्तर / दक्षिण ध्रूवावरचे हिमनग सुटून निघत आहेत असं काहीतरी केवळ वाचायची गोष्ट राहिली नाही. लेहला झालेली ढगफुटी, केदारनाथ प्रलय, अशा केवळ फिरायला जायच्या ठिकाणांच्या ठिकाणी घडणार्‍या गोष्टींसोबतच, मोठ्या भूस्खलनामुळे सह्याद्रीच्या कुशीतील माळीण सारखे आख्खेच्या आख्खे गाव नाहीसे होणे, पुण्यासारख्या उत्तम हवामानाकरता प्रसिद्ध असलेल्या शहराचे ४५ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचलेले तपमान असे आपल्या उंबरठ्यापर्यंत येऊन ठेपले आहेत. मागे एकदा, भविष्यात पिण्याच्या पाण्यावरनं युद्धं होतील असे मी जेव्हा वाचले तेव्हा माझ्या हयातीत काही असे होत नाही म्हणून मी माझी समजूत काढलेली जी खोटी ठरण्याची वेळ आलेली आहे.

ह्या सगळ्या मानव निर्मित / मानवी हस्तक्षेपामुळे होणार्‍या नैसर्गिक घडामोडी चालू असताना आपल्या देशातली स्थिती माध्यमांवर नजर टाकता तरी अशी भासते की जगात जास्त महत्वाचे काही असेल तर ते म्हणजे नटनट्यांचा एअरपोर्ट लूक, कोणत्या क्रिकेटवीराला किती जाहिराती मिळतात आणि त्यामुळे त्याची ब्रँड व्हॅल्यु कशी वधारते आहे आणि राजकीय घडामोडी. राजकीय घडामोडी तर 'अराजकी'य होत चालल्या आहेत. एखाद्या सरकारने केलेले काम चांगले आहे की नाही हे ते सरकार कोणत्या पक्षाचे आहे ह्यावर ठरते. सर्वसाधारणतः आपल्याकडच्या बहुतेक शहरी माणसांचा समज असा असतो की कर भरला म्हणजे आपले काम / कर्तव्य संपले बाकी जे काही करायचे आहे ते त्या भरलेल्या करांच्या बदल्यात सरकारने करावे. सरकारला (स्थिर असेल तर / तरीही) लोकांना चटकन दाखवायला सोपी पडतील अशी कामे करण्यात रुची असते. शाश्वत विकास वगैरे गोष्टी बोलाची कढी म्हणून च राहतात. ह्या सगळ्यात पर्यावरणाबाबत आपण काहीतरी करायची वेळ आलेली आहे असे वाटत असतानाच माझ्या वाचनात आले मियावाकी पद्धतीने बनवता येणार्‍या जंगलाबाबत.

मियावाकी प्रकारच्या जंगलाचे कमीत कमी शब्दात वर्णन करायचे झाले तर ते असे असेल.
जैवविविधता राखून स्थानिक झाडे जवळजवळ लावणे. ह्याने होणारे फायदे असे मातीतून घेत असलेल्या पोषणाबाबत परस्परपुरक वातावरण आणि झाडे जवळजवळ लावल्याने वाढीच्या बाबतीत (जमीनीवर फांद्यांची आणि खाली मुळांची वाढ) स्पर्धा केल्याने होणारी जलद वाढ. दावा असा आहे की हे जंगल, आपण लावलेल्या सहा इंच ते दोन फूटी रोपांना वणवा, चराई पासून जपले आणि पाणी घालत राहिले तर केवळ तीन वर्षात १०-१२ फुटांहून जास्त उंच वाढते आणि पाण्याच्या बाबतीत स्वयंपुर्ण होते.

मला मिळालेली बहुतांश सर्व माहीती https://www.afforestt.com/ ह्या वेब साईटवरून मिळवलेली आहे. भारतात सर्व प्रथम शुभेंदू शर्मा नावाच्या एका इंजीनियर ने तो त्यावेळी काम करत असलेल्या एका जपानी ऑटो उत्पादक कंपनी करता त्यांच्या आवारात अशा प्रकारचे जंगल तयार केले; त्यानंतर ह्या पद्धतीमुळे तो इतका प्रभावित झाला की त्याने ती नोकरी सोडून स्वतःच एक कंपनी स्थापन केली ज्यायोगे तो आज अनेक ठिकाणी अशा प्रकारचे जंगले तयार करण्याचे काम पैसे घेऊन करतो अर्थात तरीही ज्याला कोणाला स्वतः चे स्वतः हे काम करण्याची ईच्छा आहे अशा लोकांकरता अत्यंत सुलभ प्रकारे वर्णन केलेली माहीती ह्याच वेबसाईटवर दिलेली आहे. https://www.dropbox.com/sh/4l3sqwd3b9j3pmq/AAAa6kbi3r7yY9QnDgrnj5BMa?dl=0 इथुन ती डाऊनलोड देखिल करता येऊ शकते.

माझ्या पाहण्यात आलेला मियावाकी बाबतचा पहिला व्हिडिओ
https://youtu.be/jf3YXoMZ76o

आणि अलीकडेच पाहण्यात आलेला हा एक व्हिडिओ
https://youtu.be/j7PbJYJXRuI

हे पाहून काय करायचे असते ते अधिक चांगल्या प्रकारे कळू शकेल.

मियावाकी पद्धती ने तयार केलेले आणि पारंपारिक पद्धती ने तयार केलेले जंगल यामधला फरक उलगडून दाखवणारा हा अजून एक व्हिडियो

https://youtu.be/BXsBfo3GVG4

मी ही ठरवले आहे की आपणही हे करून बघायला हवे. माझ्याकडे ज्यावर असे जंगल तयार करता येईल अशी जमीन आहे फक्त २ गुंठे त्यामुळे आणि त्याव्यतिरिक्तही, 'पण' ने सुरु होणारे अनेक प्रश्न उपस्थित झाले आणि नेहेमी प्रमाणे बापूंना आठवले. गांधीजी, त्यांच्याकडे एखाद्या उपक्रमाबाबत 'हे कसं होईल' वगैरे शंका घेऊन कोणी माणूस आला की म्हणायचे 'करके देखो'

मी माझ्याकडे असलेल्या (फक्त २ गुंठे) जागेत असे जंगल तयार करू शकलो तरी त्याचा वातावरणावर खूप मोठा प्रभाव पडणार आहे असे काही नाही पण आपल्याकडे रामाच्या सेतूला मदत करणार्‍या खारीची गोष्ट, खुलभर दुधाची कहाणी अशा अनेक गोष्टींनी प्रेरित होऊन ही हिंमत एकवटत आहे. नेहेमी प्रमाणेच माझ्या अनेक वैयक्तिक उपक्रमांना देता तशा शुभेच्छा द्याल अशी आशा आहे.

लावू पहात आहे अशी झाडे निवडण्याकरता माझ्या एका मैत्रीणीची व्यावसायिक मदत मिळाली आहे. सर्व झाडे अर्थात च देशी असणार आहेतच पण त्यातही अशी काही निवडली आहेत ज्यामुळे पक्षी , कीटक, फुलपाखरे अशा निसर्ग साखळी तील सर्व घटकांना पोषक असे पर्यावरण तयार होईल.

झाडांबाबत अधिक माहिती खालील वेब साईटस् वरून मिळवता येईल. (विशेषकरून भारतीय झाडांकरता पहिल्या दोन वेब्साईट अधिक उपयुकरता)

https://indiabiodiversity.org/
http://www.flowersofindia.net/
http://tropical.theferns.info/

आपल्या मायबोलीवर अनेक निसर्गप्रेमी, पर्यावरण प्रेमी मंडळी आहेत; असेही अनेक जण आहेत ज्यांच्याकडे भरपूर जमीन आहे; काहीजण शहरातील थोडीफार मोकळी जागा असलेल्या सोसायटीत रहात असतील त्यासर्वांपर्यंत ही माहिती पोहोचवावी म्हणून हा खटाटोप.

तर मंडळी चला जंगल तयार करू या.

तळटीप - मियावाकी जंगलासंदर्भात वेळोवेळी वाचनात आलेल्या बातम्या देखिल ह्याधाग्याखाली संकलित करुया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गोरेगावत आरे कॉलनीत अस एक नक्षत्रवन उभारलं होत आठल्ये नावाच्या गृहस्थांनी . सध्या त्याची काय स्थिती आहे याची कल्पना नाही .

नक्षत्रवने अनेक ठिकाणी बनवली गेली आहेत / जात आहेत.
२७ इतकी जैवविविधताही नसते आजकाल एका ठिकाणी 'लावलेल्या' झाडांमधे त्यामुळे आणि नक्षत्रानुसार आराध्य असलेली सगळी स्थानिक झाडेच आहेत त्यामुळे मला तरी हरकत नाही असेच वाटते.

हर्पेन, स्वाती, धन्यवाद. माझा असा समज होता की जैविक विविधतेच्या दृष्टीने अध्येमध्ये नव्या जातीची झाडे लावणे हिताचे असेल.

मस्त आहे चर्चा. शेवग्याच्या शेंगाचे झाड जोरदार वाढते व भरघोस शेंगा देते म्हणे. त्याचा काही उपयोग होऊ शकेल का या पद्धतीत? (हे वर आधीच यादीत आले असेल तर सॉरी, नजरेतुन सुटले). नानबाने लिहिलेला उपक्रम फार छान आहे. तिथे असते तर पळतपळत नाव नोंदवले असते.

वा वा!!! हार्दिक अभिनंदन!!! आपल्या कर्तृत्व पर्वतातील आणखी एक शिखर! ह्या वेळच्या राज्य अर्थसंकल्पात होतं की, सरकारही ह्या पद्धतीने वन बनवणार आहे.

छान विचार आहेत, आणि उपक्रमास शुभेच्छा. आपल्याकडे झाडे, जंगल कमी होते आहे हे दुखणे आहे. आता जनमत तयार होत आहे. छान गोष्ट आहे...

दुसरी टोकाची पण विरुद्ध बाजू निव्वळ माहिती म्हणुन देतो आहे. आमच्याकडे नॉर्थ सस्कात्चेवान मधे घनदाट झाडे शेकडो - चौ कि मी मधे पसरलेले आहेत. या झाडांची वाढ पटकन होते, काही वर्षातच जमिनीवर झाडांचा पालापाचोळा / फांद्या पडतात... वर्षानुवर्षे असे होत रहाते. खुप कोरडे आणि ज्वलनशील पदार्थ शेकडो चौ मैल पसरलेला आहे.
तापमान वाढल्यावर... वीज- वादळांच्या जांच कटकडाटात... एक वीज पडली की आग लागते, मग अनेक आठवडे/ कधी महिनों महिने आग सुरु रहाते. आगी आटोक्यात आणायचे प्रयत्न होतात, पण बरेच वेळा निष्फळ ठरतात. मग हिवाळ्याची वाट पहायची. किती ठिकाणी आग (स्कोअर काय आहे... २५... ३७... ५०) लागली आहे हा फक्त आकडा बघायचा. आग ५०० -७०० कि मी दूर जंगलात असली तरी आम्हाला तिचे परिणाम दिसतात. हवेची दिशा/ तापमान/ आद्रता खुप महत्वाचे घटक आहेत. कधी आग ब्रिटिश कोलंबियात आहे आणि आमच्याकडे (१५०० + कि. मी) धुळीचे ढग आहेत असे प्रकार पण होतात.
जंगल तयार होणे, अमाप वाढणे... आणि नैसर्गिक आगीमधे (येथे वीज) भस्मसात होणे... आणि पुन्हा नव्याने जंगल तयार होणे हे चक्र अत्यंत नैसर्गिक आहे... अनैसर्गिक (जळती सिगरेट फेकणे, कॅम्पफायर) पण आगी लागतात/ लावल्या जातात.

<< जैवविविधता राखून स्थानिक झाडे जवळजवळ लावणे. >>
------ जैवविविधता म्हणजे नक्की काय?

धन्यवाद उदय, जैव विविधता म्हणजे इंग्रजीत Bio diversity, वेगवेगळ्या प्रकारची प्रजातींची सजीव सृष्टी

माझा खूप काही अभ्यास नाही पण एकसुरीपणा असलेल्या ठिकाणी आगी जास्त लवकर फोफावतात, वेगवेगळ्या प्रकारची झाडे असतील तर त्यांची आगीला अवरोध करायची क्षमता वेगवेगळी असते, त्यामुळे देखील काही प्रमाणात फरक पडत असावा.

नैसर्गिक चक्राबाबत एकदम सहमत पण भारतातील दरडोई वृक्षांची संख्या अनैसर्गिक कारणांनी घटत चालल्याने मानवी प्रयत्न करायला हवे.

धन्यवाद मार्गी, सुनिधी, मानव.

<< माझा खूप काही अभ्यास नाही पण एकसुरीपणा असलेल्या ठिकाणी आगी जास्त लवकर फोफावतात, वेगवेगळ्या प्रकारची झाडे असतील तर त्यांची आगीला अवरोध करायची क्षमता वेगवेगळी असते, त्यामुळे देखील काही प्रमाणात फरक पडत असावा. >>

------- आपण "प्रश्नच्या " दोन विरुद्ध टोकाला आहोत आणि तुमच्या लेखामुळे या विषयावर माहिती गोळा करायला मला प्रेरणा मिळाली. काही झाडे खुप अ‍ॅग्रेसिव्ह असतात. आज विविध झाडे लावली तरी पुढच्या काही दशकांत ते इतरांवर मात करुन टिकतील.

प्रत्येक विद्द्यार्थ्याने किमान १० झाडे लावावीत असा निर्णय फिलीपिन्स देशाने घेतला आहे.
https://www.independent.co.uk/news/world/asia/philippines-tree-planting-...

काही झाडे खुप अ‍ॅग्रेसिव्ह असतात. आज विविध झाडे लावली तरी पुढच्या काही दशकांत ते इतरांवर मात करुन टिकतील.< >>>>>
हे रोचक आहे आणि थोडं भिववणारे पण, ह्याबाबत अधिक वाचायला आवडेल, कुठे वाचलं हे

whatsapp वर आलेला एक लेख खूप पटला म्हणून नावासकट देतोय

देशी परदेशी झाडांविषयीची अशास्त्रीय वक्तव्ये

(अनेक निसर्गप्रेमी कळत नकळत देशी तसेच परदेशी झाडांविषयी गैरसमज पसरवत त्यांचा प्रचार करत आहेत. यातल्या शास्त्राची उकल व्हावी याकरता हा लेखनप्रपंच. स्थानिक झाडांना प्राधान्य द्यायला हवेच पण ते डोळसपणे आणि शास्त्राच्या आधाराने. झाडांबद्दल अशास्त्रीय विधाने करून नव्हे ! या लेखाचा उद्देश परदेशी झाडांचे समर्थन करणे असा निश्चित नाही. वाचकांनी संपूर्ण लेख काळजीपूर्वक वाचावा, ही विनंती.)

सध्या लागवडीच्या धामधुमीत देशी आणि परदेशी वृक्षांवरून चर्चा वाढलेली दिसते. एका दृष्टीने जागरूकता वाढली आहे ही बरी गोष्ट असली तरी या देशी परदेशी वर्गीकरणाला टोकाचे आणि अत्यंत अशास्त्रीय रूप प्राप्त झालेले दिसते. लक्षात घ्यायचा शास्त्रीय मुद्दा असा की झाडे केवळ परदेशी असल्याने वाईट होत नाहीत. ते झाड कुठे ना कुठे देशी असतेच. ते कुठे लावायचे हा विवेक मात्र माणसाने शिकावा. "झाडे त्यांच्या त्यांच्या भौगोलिक क्षेत्रातच लावावीत." यात कुठेही देशी परदेशी हा देशभक्तीचा मुद्दा आणू नये. शास्त्र समजून घ्यावे.

परदेशी झाडे विषारी असतात, घातक वायू बाहेर सोडतात, त्यावर पक्षी घरटी करत नाहीत, त्यामुळे प्राणी अपंग होतात, ही झाडे पानांद्वारे अतिरिक्त पाणी शोषतात, अशी अत्यंत अशास्त्रीय माहिती लोक पसरवत आहेत. या माहितीला देशी झाडांचं प्रेम आणि परदेशी झाडांचा द्वेष एवढाच काय तो आधार दिसतो. परंतु ही अशी माहिती पसरुन अंधश्रद्धा वाढत आहे. अशी अनेक परदेशी झाडे आहेत ज्यावर पक्षी घरटी करतात, फळे अथवा मकरंद खायला येतात. उदा. बॉटल ब्रश, काशीद. आणि विषारी म्हणावी अशी देशी झाडेदेखील आहेत. उदा. काजरा, हुरा. त्यामुळे उपरोक्त माहिती चक्क खोटी ठरते. “अर्थात यावरून परदेशी झाडे सर्रास सर्वत्र लावावीत असा निष्कर्ष कुणीही काढू नये.”

विषारीपणाविषयी एक जरा वेगळा मुद्दा इथे सांगावासा वाटतो तो असा की कुठलेही झाड, मग ते देशी असो किंवा परदेशी, विषारी असते म्हणजे केवळ ते असण्याने काहीच धोका नसतो! त्याचे फळ खाल्ले अथवा चीक डोळ्यात गेला अथवा मुळांचा रस काढून प्यायला तर ते विषारी असते. यातही प्रमाण महत्वाचे आहे. विषारी झाडांपैकी बहुतांश झाडे केवळ अपायकारक आहेत. एक फळ खाऊन माणूस थेट मेलाच असे सहसा ऐकीवात नाही. काजरा या देशी झाडाच्या बिया विषारी असतात परंतु त्याच बियांची अत्यल्प मात्रा औषध म्हणून दिली जाते. त्यामुळे विषारीपणाविषयी टोकाची भीती बाळगण्याची गरज नाही. मात्र काळजी घ्यायला हवीच याबाबत दुमत नाही. "माहीत नसलेल्या झाडांची फळे किंवा इतर भाग खाणे योग्य नव्हेच."

आता परत मूळ मुद्द्याकडे येऊयात. देशी 'स्थानिक' झाडांचा प्रचार प्रसार व्हायला हवा यात शंकाच नाही परंतु परदेशी / अस्थानिक झाडांना नावे ठेऊन, हिणवून असा प्रचार करू नये. किंवा देशी झाडांचे चुकीच्या पद्धतीने समर्थन करू नये. कुणीतरी लिहिलंय की देशी झाडे मोठ्या प्रमाणावर प्राणवायू बाहेर सोडतात. तुळस चोवीस तास प्राणवायू बाहेर टाकते. हा तपशील शुद्ध अशास्त्रीय. झाडांच्या पानांद्वारे प्रकाश संश्लेषण (Photosynthesis) या एकमेव क्रियेद्वारे ऑक्सिजन बाहेर पडतो, मग ते देशी असो की परदेशी! परदेशी झाड आहे म्हणून ते प्रकाश संश्लेषण करणे थांबवणार नाही. हिरवे पान असले की त्यात क्लोरोफिल (एक pigment / रंगद्रव्य जो निळा आणि लाल रंग शोषून हिरवा रंग परावर्तीत करते) असणारच आणि ते प्रकाश संश्लेषण करणारच. ऑक्सिजन बाहेर पडण्यासाठी सर्वप्रथम पाण्याच्या रेणूचे विभाजन (H व O) व्हावे लागते जे केवळ प्रकाशामुळेच होते. स्वाभाविकपणे ही क्रिया रात्री थांबते आणि ऑक्सिजन बाहेर पडणेदेखील थांबते. केवळ ध्रुवीय प्रदेशात जिथे चोवीस तास सूर्यप्रकाश असतो तिथल्या झाडांमध्ये ही क्रिया रात्री कमकुवतपणे सुरू राहते. झाडांच्या जातींप्रमाणे पानांवरील पर्णरंध्रांची संख्या (stomata, ज्यांद्वारे वायू विनिमय चालतो) बदलते. आणि त्यांच्यातील क्लोरोफिलचे प्रमाणदेखील बदलते. परंतु ढोबळ मानाने पानाचे क्षेत्रफळ जितके जास्त तितका ऑक्सिजन जास्त असे यातील साधे गणित आहे असे म्हणता येईल. त्यामुळे खरोखर ऑक्सिजन मोठ्या प्रमाणावर हवा असेल आणि मोठी जागा असेल तर तुळशीसारखी छोटी झाडे लावण्यापेक्षा मोठे वृक्ष लावावेत.

देशी झाडे प्रदूषण शोषून घेतात हे असेच एक सपाटीकरण. एकतर अजूनही झाडे पानांद्वारे प्रदूषण शोषतात की नाही यावर शास्त्रज्ञांमध्ये एकमत नाही आणि ते म्हणावे तसे शास्त्राने मान्य केलेले नाही. काही जणांचे म्हणणे प्रदूषित घटक पानांवर केवळ जोडले जातात, adsorb होतात. सध्या मान्य करण्यासारखी गोष्ट एवढीच की काही झाडे निश्चितच प्रदूषित हवेत अथवा पाण्यात टिकून राहू शकतात. त्यामुळे जिथे अमुक एक प्रकारचे प्रदूषण आहे तिथे तग धरू शकतील तशी झाडे निवडून लावण्यात काही गैर नाही.

परदेशी झाडे का लावू नये याची शास्त्रीय कारणे वेगळी आहेत ती नीट समजावून घ्यायला हवीत. ही झाडे निसर्गात स्वतःहून अति पसरण्याची, invasive होण्याची शक्यता असते. त्यामुळे देशी वनस्पती मागे हटतात आणि या परदेशी वनस्पतींचे एकसुरी पट्टे दिसू लागतात. उदा. सुबाभूळ, कॉसमॉस. त्यामुळे आपली मूळची विविधता आणि त्यांच्याशी नातं असणारी प्राणी सृष्टी या सगळ्यालाच धक्का पोहोचतो. बहुतांश भारताचा विचार करता विविधता ही आपली ताकद आहे. ती गमावून चालणार नाही. बहुतांश ठिकाणी स्थानिक लोक ही विविधता वापरत रोजचं आयुष्य जगत असतात. त्यावरही परिणाम होतो. उदा. कॉसमॉसमुळे स्थानिक गवते मागे हटली आणि चाऱ्याची कमतरता निर्माण झाली.

झाडे आपणहून नैसर्गिक मार्गाने प्रसारीत होत असतातच परंतु माणसाने ती प्रसारीत करण्याचा वेग अनेक पटीने वाढवला आहे. त्यामुळे ती परिसंस्थांच्या दृष्टीने घातक ठरतात. कारण थोड्या काळात त्यांच्याभोवती सक्षम अन्न जाल विकसित होऊ शकत नाही. त्यांना मित्र शत्रू दोन्हीची कमतरता राहते. विशेषतः शत्रू नसल्याने ती फोफावत जातात. उदा. जलपर्णी. नैसर्गिक परिसंस्थेत स्पर्धा असते त्यामुळे एक जात दुसऱ्या जातीला मर्यादित संख्येत ठेवते. हे परदेशी झाडांबाबतीत घडत नाही. अर्थात सर्वच परदेशी झाडे एवढी आक्रमक असतात असे नाहीच. काही झाडे अजिबात पसरत नाहीत. “पण म्हणून ती जंगलात नैसर्गिक प्रदेशात हरितीकरणासाठी निश्चित लावू नये!!”

देशी झाडे लावा हे सांगतांना स्थानिकतेचा आणि विविधतेचा मुद्दा सर्वाधिक महत्वाचा! तो स्थानिक हवामान आणि पाऊसमानाप्रमाणे बदलणार. महाराष्ट्रात जरी बहुतांश झाडे सर्वत्र आढळत असली तरी काही त्या त्या भागातील वैशिष्ट्यपूर्णदेखील आहेत. ती दुसरीकडे परदेशीच ठरतात. त्यामुळेच कोकणातील काही झाडे मराठवाड्यात लावण्याचा आग्रह या चर्चेच्या पार्श्वभूमीवर चुकीचा ठरतो. व्हॉटसअपवर सहज फिरणाऱ्या याद्यांमध्ये बहुतांशवेळा हा मुद्दा लक्षात घेतलेला नसतो. बऱ्याचदा अनेक पर्याय उपलब्ध असूनही काही थोड्याच झाडांची नावे पुनःपुन्हा येत राहतात. महाराष्ट्राचा विचार करता आम्ही कोकण, सह्याद्री, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ या प्रदेशांचा आणि तिथल्या जंगलांचा अभ्यास करून वेगवेगळ्या याद्या बनविल्या आहेत. त्यांचा वापर करून लागवड केल्यास निश्चित ती पर्यावरणपूरक ठरू शकेल. अर्थात केवळ लागवड करण्यापेक्षा त्याबरोबरीने पर्यवरण पुनरुज्जीवन महत्वाचे आहे. ते कसे करायचे याकरता तज्ञांची मदत घ्यावी. तसेच पुढील लिंकवरील विविध मार्गदर्शिका तसेच याद्या जरूर वापराव्यात.
http://www.oikos.in/html/publications.html

स्थानिक झाडांच्या लागवडीविषयी अधिक माहितीसाठी हा लेख वाचावा :
http://www.oikos.in/html/articles.html

शेवटी सर्व निसर्गप्रेमींनी सजगतेने लक्षात घ्यायचा मुद्दा असा की देशी (स्थानिक) झाडांना प्राधान्य द्यायला हवेच पण ते डोळसपणे आणि शास्त्राच्या आधाराने. परदेशी (अस्थानिक) झाडांबद्दल चुकीची विधाने करून त्यांना डावलण्याचा प्रचार करण्यापेक्षा, देशी झाडांच्या अनंत उपयोगांविषयी चर्चा करत राहून त्यांचे समर्थन करणे अधिक सकारात्मक ठरेल !

केतकी घाटे - मानसी करंदीकर

जलसंधारण, वृक्ष संवर्धन विषयावर सचित्र वैज्ञानिक सोप्या भाषेत माहिती दिली आहे.

@हर्पेन
जंगल लावून किती महीने झाले ?? स्टेप बाय स्टेप डेवलपमेंट कशी झालीय ते पहायाला उत्सुक आहे. २ गुंठे जागेवरील फोटोंच्या प्रतीक्षेत !

माझ्याकडे असलेल्या जागेला कुंपण घालायचे काम न होऊ शकल्याने तिथे मियावाकी पद्धतीचा प्रयोग सुरुच करता आला नाही. Sad

पण 'ईच्छा तेथे मार्ग' ह्या उक्तीनुसार मला लवकरच दुसर्‍या ठिकाणी एक संधी प्राप्त झाली. एका टाऊनशिप प्रकारच्या बांधकाम प्रकल्पामधली एसटीपीच्या जवळची जवळपास तितकीच जागा (दोन गुंठे) 'मियावाकी'चा प्रयोग करायसाठी म्हणून मिळाली.

अपुर्णावस्थेत असला तरी हा प्रयोग अत्यंत समाधानकारकपणे आकारास येण्यात यशस्वी होत आहे असे म्हणता येऊ शकते.

त्या प्रयोगात माझा आर्थिक सहभाग अजीबात नव्हता त्यामुळे त्याबद्दल इथे मांडलेले कितपत योग्य राहील असे वाटून काही लिहिले नव्हते. सोशल मिडीयावर ह्याबद्दल लिहिलेले चालेल का हे कंपनीला विचारून मग इथे टाकावे म्हणतो.

या आधीच उत्तर न दिल्याबद्दल क्षमस्व सेन्साय आणि सस्मित.

What is the value of a tree?
https://finshots.in/archive/an-explainer-on-tree-valuation/

एका झाडाची किंमत

कोर्टाने नेमलेल्या समितीच्या म्हणण्यानुसार एका झाडाची किंमत, झाडाचे वय गुणीले ७४५००/- इतकी असते.

आमच्या कंपनीकडुन सध्या हा प्रोजेक्ट बोईसरला (तारापुर MIDC) राबवला जातोय ८२५० इतकी झाडे दीड — दोन एकरमधे लावली गेली आहेत. त्यासाठी डाॅ आर के नायर हे तज्ञ काम करत आहेत. त्यांनी जगातील पहीले केमिकल डंपिंग ग्राउंड हे मियावाकी जंगलात रुपांतरीत केले. त्यांना ग्रीन हिरो आॅफ ईंडीया हे नाव दिले गेले आहे, त्यांना जवळपास प्रत्येक राज्यातुन अवाॅर्डस् मिळाले आहेत आणि यावर्षी लंडन आणि जर्मनी येथे ते नाॅमिनेटेड आहेत.

मला या धाग्यावर वाचल्यापासून मियावाकी पद्धती बद्दल फारच कुतुहल होते. नेटवर याबद्दल बरेच वाचन केले, हर्पेनदा सोबत पण याविषयी बोलणे झाले.

मला माझ्या छोट्याश्या जागेत हा प्रयोग करायचा होता. कमीत कमी एक ते दोन गुंठे जागेत हा प्रयोग करायचा होता. या उन्हाळ्यात या प्रकारे झाडे लावायची होती. पण ते जमले नाही.

पण तरी यामधली एक गोष्ट फॉलो करुन एक प्रयोग केला आहे. त्याबद्दल आधी कुठे वाचले नाही. कोणी असे करत असल्यास कल्पना नाही.

मला काही फळझाडे लावायची होती. त्यात अंतर १५ फुटांचे असल्याने एक सलग खड्डा करुन त्यात खत वगैरे टाकणे शक्य नव्हते.

मी १ *१*१ मीटर चे खड्डे केले. त्यात खाली भुसभुशीत माती भरली. वर दोन पाट्या तुकडे केलेले जनावरांचे खाद्य/ सुकलेले गवत, दोन पाट्या माती, दोन पाट्या भाताचे तुस, एक ते दोन पाट्या शेणखत यांचे मिश्रण केले. ते त्या खड्ड्यात टाकून त्यावर झाडे लावली मातीने तो खड्डा भरुन टाकला. वरुन गवताने तेवढा खड्डा झाकून टाकला.

काही रोपे या प्रकारे व काही फक्त शेण खत व मातीचे मिश्रण करुन लावली आहेत.

सगळ्या झाडांना दर १५ दिवसांनी जिवामृत देणार आहे.

लावताना तिथे जेवढे लेबर, घरातले, शेजारी पाजारी येऊन गेले त्या सर्वांनी, ज्याच्याकडून जिवामृत घेतले त्याने तुझी झाडे जगणार नाहीत असे सांगितले आहे.

का जगणार नाहीत?
म्हणजे जमिनीत मुळं जोर धरणार नाहीत? झाडं पडतील? त्यांच्या मते काय चुकलं आहे? का जवळ लावली आहेत म्हणून?

ओके!
शक्य असेल तर त्याच ठिकाणी यातला तुम्हाला जमेल तो एखादा व्हेरिअबल बदलून आणखी एक, आणि सगळेच व्हेरिएबल बदलून त्या लोकल लोकांच्या पद्धतीने असं आणखी एक झाड लावून त्या सगळ्ञांना सारखंच पाणी, प्रकाश, खत देऊन तुलना करू शकता.

या प्रोसेसने फार हिट तयार होईल

बरोबर.

परदेशात जे ग्यारंटेड कॉम्पोस्ट ( शेणखत नव्हे)मिळते ते तसे इथे कुणी देत असेल तर गोष्ट वेगळी आहे.
किंवा येथे खड्डे करून त्यात शेणखत तूस वगैरे जे घालायचे ते घालून खड्डे भरून सहा महिने जाऊ द्या. मग त्यावरच उंचवटे करून रोपे लावा.

ओके. ऑरगॅनिक मॅटर ब्रेकडाऊन होताना उष्णता/ गॅसेस निर्माण होतील. ही डिकम्पोस्ट प्रोसेस स्लो डाऊन करता यायला पीएच/ सी-एन रेशो इ, बदलून काही होईल का?
खड्डे करुन कम्पोस्ट करणे, आणि पुढच्यावर्षी झाडे लावणे +१

Pages