उत्खनन

Submitted by पॅडी on 15 May, 2024 - 23:49

* उत्खनन *

थांग मनाचा लागेना
लाख ढवळला तळ
आटलेल्या असोशीला
ऐसे विश्वव्यापी बळ

वठलेल्या वासनांना
पुन्हा नव्याने धुमारे
पुन्हा पान्हावले शब्द
पुन्हा नवेच शहारे..!

मन पाखरू बेफाम
उडे आपुल्या तालात
द्वाड वारा शीळ घाली
ऋतु हासती गालात

संथ वाहत्या धारेला
यावे उगमाचे भान
तशी जागवली कुणी
युगायुगाची तहान ?

पाळामुळाशी भिडता
गेलो चिणून-शिणून
मिळे अक्षरांचे धन
देहा-मनाला खोदून...
***

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

सुंदर उत्खनन...
करत रहा...
आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने... तुकोबा

वाह वाह!!! कवितेमुळे प्राप्त झालेले चिरंजीवन. क्या बात है.
अगदी थोडा वेळ मिळतो आजकाल पण तुमच्या कविता आवर्जुन वाचते. कारण त्या सुंदर असतात.

सहज- प्रतिसादासाठी आभार!

सामो - जशा तुम्ही माझ्या कविता आवर्जून वाचता, तसा तुमचा प्रत्येक अभिप्राय मला लाख मोलाचा वाटतो.. !! स्नेह असाच रहावा... कोटी कोटी आभार...!!

>>>> अगदी थोडा वेळ मिळतो आजकाल पण तुमच्या कविता आवर्जुन वाचते. कारण त्या सुंदर असतात
नतमस्तक आहे मी..!

सुंदर कविता. मनाचा थांग लागत नसताना त्यातल्या भावनांना व्यक्त करायला अक्षरधन सापडणे ही तुम्हाला मिळालेली खूप मोठी देणगी आहे.

कमन- खूप आभार प्रतिसादासाठी

हरचंद पालव - मन:पूर्वक आभार आपले..!

रूपाली विशे - पाटील , कुमार१ , केशवकूल - सर्व रसिक वाचकांचे खूप खूप आभार...! नमन...