विकास , विध्वंस आणि विवेक : प्राथमिकतेवर बोलू काही

Submitted by रघू आचार्य on 18 May, 2024 - 10:05

The cost of our success is the exhaustion of natural resources, leading to energy crises, climate change, pollution, and the destruction of our habitat. If you exhaust natural resources, there will be nothing left for your children. If we continue in the same direction, humankind is headed for some frightful ordeals, if not extinction.

- Christian de Duve

दोस्तहो,

रूदरफर्डला अणूचं मॉडेल समजलं त्यातून आधुनिक विज्ञानाची घोडदौड सुरू झाली. त्याला अणूचं मॉडेल सापडलं ते ही जुगाड टेक्नॉलॉजीने. थिअरी विदाऊट प्रॅक्टीकल इज ब्लाईंड यावर त्याचा विश्वास होता. प्रॅक्टीकल शिवाय थिअरी मांडणार्‍यांबद्दल त्याचं मत फारसं चांगलं नव्हतं. मात्र पुढे पुढे थिअरी विदाऊट प्रॅक्टीकल हे जिनीअस असण्याचं लक्षण झालं. आईनस्टाईन तर त्याची लॅब म्हणजे त्याचे पेन किंवा ब्रेन आहे असे म्हणायचा. इथे आपल्याला या वादात पडायचं नाही. याचा संदर्भ पुढे येईल.

या वैज्ञानिक क्रांतीला विज्ञान म्हणायचे कि अप्लाईड सायन्स म्हणायचे हे ठामपणे सांगता येणार नाही.
विज्ञानाचे नियम माणसाला माहिती असावेत. पण त्याच्या किती आहारी जायचे, त्याचे दुष्परिणाम काय होणार हे सुद्धा त्याच वेळी त्याला शिकता यायला हवे होते. तसे ते झालेले नाही. प्रॅक्टीकल मुळे त्याचे दुष्परिणाम समजले असते. आईनस्टाईनच्या डोळ्यादेखतच अणूचा वापर विध्वंसक कामासाठी होताना त्याने पाहिला आणि तो ही त्याला थांबवू शकला नाही.

एखादी लस किंवा औषध बाजारात आणायचे असेल तर त्यासाठी केव्हढी मोठी प्रक्रिया आहे. ती लस माणसाला टोचायच्या आधी तिचे दुष्परिणाम काय आहेत हे पहावे लागते. ते तपसणारी एक स्वायत्त संस्था आहे. त्यावर जागतिक संस्था आहे. याशिवाय या किचकट चाळणीतून गेल्यावरही पुढे काही संकट आलेच तर ते औषध मागे घ्यायला लागू शकते अशी व्यवस्था निश्चितच अस्तित्वात आहे ( असे होते कि नाही हा मुद्दा बाजूला ठेवू). औषधाचा शोध लावण्यापूर्वी माणसावर दुष्परिणाम होणार नाही ही जबाबदारी आपण घेतो. ती हमी आपण देतो. पण इतर शोधांचे काय ? त्याचा मानवी जीवनावर किंवा पृथ्वीवर, अंतरिक्षावर काय परिणाम होईल हे तपासण्याची व्यवस्था आहे का ?

आणखी एक उदाहरण पाहूयात.
American Society of Heating, Refrigerating, and Air Conditioning Engineers या संस्थेच्या हँडबुक मधे कंफर्टची व्याख्या केलेली आहे. २००१ च्या आवृत्तीनुसार कंफर्ट म्हणजे वाहेरच्या तापमानापेक्षा पाच ते दहा अंशाने कमी तापमान ठेवणे. (आतले तापमान आणि बाहेरचे तापमान यात यापेक्षा फरक असल्यास थर्मल शॉक बसून उपभोक्ता मृत्यूमुखी देखील पडू शकतो) . वास्तविक एसीच्या संदर्भात कंफर्ट म्हणजे बाहेरच्या तापमानापासून सुसह्य वाटेल इतका तापमान बदल. त्यापेक्षा थंड करणे या मानवी स्वभावामागे सुखासीनता, हव्यास कारणीभूत आहेत. गरज आणि आरामाचा हव्यास यातली निवड करता यायला हवी.
अ‍ॅश्रेच्या हॅण्डबुकवरून माणूस जेव्हां स्वतःसाठी शोध लावतो तेव्हां इशारेही देतो हे दिसते. . माणूस हा असा स्वार्थी प्राणी आहे.

पण त्याच रेफ्रिजरेशन मुळे तापमान बदलाला सुरूवात झाली. पर्यावरण, प्राणीजीवन यावर काय परिणाम होतील यावर मनुष्य उदासीन असतो. इतकेच काय स्वतःच्या स्वार्थासाठी प्राण्यांना लस टोचली जाते. रेडीएशनच्या प्रयोगांसाठी मुक्या जिवांचा वापर होतो.
माणूस असा बेदरकार आहे.
अर्थात अ‍ॅश्रे ने सुधारणा करत पर्यावरण स्नेही वायूंचा वापर अनिवार्य केला आहे त्याचे स्वागत. त्यामध्ये विवेकवाद्यांचे योगदान आहे.

औद्योगिक क्रांतीनंतर जे जे शोध लागत गेले त्यांना अशा चाळण्या / चाचण्या अस्तित्वातच नव्हत्या. कारण एका बाजूला ध्येयाने झपाटलेली वैज्ञानिक कम्युनिटी, त्यांना प्रोत्साहन देणारी उत्पादक मंडळी आणि दुसर्‍या बाजूला या पासून अनभिज्ञ जनता. या असमतोलामुळे वैज्ञानिक शोध लागले त्यापेक्षा ते झपाट्याने वापरात आले. तंत्रज्ञान विकसित होते गेले आणि मग काही काळाने या विज्ञानाशी जुळवून घेतलेल्या सामान्य जनतेला त्याचे भान आले. त्यातूनच मग दुष्परिणामाची तपासणी कराविशी वाटू लागली.

माणसाच्या कंफर्ट साठी वातानुकूल यंत्रणे आणि शीतकपाटं विकसित झाली. त्यासाठी पूर्वी फ्रिऑन गॅसेस वापरले गेले. ते पर्यावरणस्नेही नाहीत हे समजायला पाच दशकं जावी लागली. या काळात पर्यावरणाचे व्हायचे ते नुकसान झाले. त्यानंतर आर सिरीज गॅसेसचा वापर सुरू झाला. मग तिसर्‍या जगातून ओरड सुरू झाली कि आता तिसर्‍या जगाने उत्पादन सुरू केल्याबरोबर मुद्दामून हे निर्बंध आणले गेले आहेत, जेणे करून पाश्चात्य देशांचीच उत्पादने सक्तीची व्हावीत. यात तथ्य असेलही. पण पर्यावरणाच्या लढाईला असा आर्थिक असमतोलाचाही कोन प्राप्त झाला.

जगातला अणूकचरा तिसर्‍या देशात आणून टाकून द्यायला सुरूवात झाली. आफ्रिकन देशातल्या त्या त्या भागात माणूसच नाही तर प्राण्यांवर आणि वनस्पती, झाडांवरही विकृत परिणाम दिसू लागल्यावर ते बंद झाले.

सगळी यादी देणे हा इथे उद्देश नाही. विज्ञानाला विरोध हा सूर इथे नाही.

तर कोणतेही शोध लागले तर त्याच्या वापराआधी जो विरोध होतो त्याचे समाधान झाले पाहीजे. त्या उलट काही हुषार वादविवादपटूंची नेमणूक केली जाते. ते अशा आक्षेपांची नोंद घेतात. मग या आक्षेपांना गप्प करणारी उत्तरे तयार केली जातात. हे टूलकीट त्या त्या वापरकर्त्याच्या एजन्सीला दिले जाते. त्यांना प्रशिक्षण दिले जाते. अशा सेवा घेणार्‍या कंपन्या एकत्रित रित्याही नरेटिव्ह सेट करायच्या मागे लागतात. आता तर व्यापारी संघटना आहेत, उत्पादक संघटना आहेत. नव्या उत्पादनाच्या भावी आक्षेपांना मोडीत काढणार्‍या पीआर एजन्सीजचे हे सुगीचे दिवस असतात.
घरात मोबाईल आला कि जुन्या जमान्याच्या वैभवाच्या खुणा मिरवणारं ओसरीत बाजेवर पडीक असणारं एखादं म्हातारं ओरडतं " आरं, कशाला ते डबडं आणलंय ? त्याच्या वाचून अडलं व्हतं का काय ?"
त्याला पोरं उत्तर देतात " ओ आबा, गप बसा, आताच्या जमान्यात हे लै गरजेचं हाय"
" आरं पर त्यानं नुस्कान काय व्हणार ते कोन बगनार ?
" आबा, तुमीच सांगा कि काय नुक्सान हाय ते "
" आता मला समजलं असतं तर बसतं व्हय सांगितलं ?"
" मंग नाय माहीत तर कशाला नुस्तंच आडवं लावता ?"
"बरं बाबा राह्यलं "
प्रॉब्लेम हा इथे आहे.
म्हातार्‍याला जे म्हणायचं असतं त्याचा आत्मा पोरांना समजूनच घ्यायचा नसतो. आपल्याकडे मोबाईल नसणे हे आपण आउट ऑफ डेट झाल्याच्या पीअर प्रेशरखाली मोबाईल घेतला जातो. त्यात फोन सोबतच इंटरनेट, टिव्ही, ओटीटी या सर्व सुविधा मिळू लागतात. हे सर्व आपल्याला परवडतं का ? याचा उपयोग आहे का याचा विचार मागे पडतो.

सिंहगड रस्त्याच्या दुतर्फी असलेली हिरवीगार झाडे तोडण्यासाठी मनपाने हुकूम काढला कि त्याला विरोध सुरू होतो. मग या विरोधकांना जनतेचा सपोर्ट मिळू नये यासाठी त्यांचे खलनायकीकरण, गुन्हेगारीकरण, दानवीकरण केले जाते. या मंडळींना विकृत, लहरी ठरवले जाते. त्यांना विकास विरोधी ठरवले जाते. "मग काय धोतर नेसून फिरायचे का ? " "तुम्ही वल्कले नेसून फिरता का ?" किंवा झाडांना इजा पोहोचवायची नसेल तर मग "तुम्हाला बर्थडे सूटमधेच फिरावे लागत असेल ना ? कारण पानांची वस्त्रे हा सुद्धा गुन्हाच आहे" अशी तयार वाक्ये फेकली जातात.

सामान्य माणसे मुद्दे मांडत असतात. ते वादविवादपटू नसतात. व्यावसायिक ट्रोल्सना ते उत्तरं देऊ शकत नाहीत हे या एजन्सीजने हेरलेले असते. याचा परिणाम म्हणून विरोधाच्या बाजू लंगड्या, दुबळ्या आणि क्षीण पडतात. शिवाय विध्वंसाच्या बाजूने भांडवल असते. भांडवल प्रसार माध्यमांनाही नियंत्रित करते. हा एक सुसंघटीत माफिया आहे. हा विकास खरोखर माणसाच्या भल्यासाठी आहे का ?

माणसाला जगण्यासाठी काय लागते ?
उपग्रहांचे शोध लागले तर हवेच आहेत. अंतरीक्षाचा शोध अनादि काळापासून माणूस घेत आला आहे. त्याबद्दल ना नाही. इथे विवेकाची नितांत आवश्यकता आहे. पण अवकाशात होणारा कचरा पुढे विश्वाच्या नाशाला कारणीभूत होईल का याची उत्तरे कधी शोधणार ? दुष्परिणामांचा शोध लावणे हे जिनीअस असणे नाही का ? त्यासाठी बुद्धी लागत नाही का ? माणसाला फॅन्सी वाटतील, लक्झरी वाटतील अशा शोधांचे जनकत्व आपल्याकडे असावे हा इगो आहे का ? या शोधांचे दुष्परिणाम समोर आणणे हे दळभद्रीपणाचे लक्षण आहे का ?

एका व्हायरल क्लिप मधल्या दाव्यांनुसार पृथ्वीवरचे ६५% जीवन गेल्या दोनशे वर्षात नष्ट झालेले आहे. अर्थात या क्लिपचा उद्देश चांगला असला तरी काही तथ्या़ंकडे दुर्लक्ष झाले आहे. जसे कि अरल समुद्र हा तापमान बदलामुळे आटला. खरे तर तत्कालीन सोव्हिएत युनियनच्या १९६७ सालच्या अजस्त्र आणि महत्वाकांक्षी जलसंधारण योजनांमुळे जी महाकाय धरणांची मालिका या अरल समुद्राच्या फीडर नद्यांवर उभारली गेली त्यामुळे पाण्याचा पुरवठा बंद झाल्याने अरल समुद्र नाहीसा झाला. तपशीलात चूक असली तरी या टीमने गेल्या काही वर्षात पृथ्वीची जी असंख्य छायाचित्रे घेतली आहेत त्यामुळे विकासाचा विध्वंस समोर आलेला आहे. अर्थात त्या वेळी या शंका उपस्थित झाल्याने नवा व्हिडीओ प्राप्त झाला.
https://www.youtube.com/watch?v=UHkEbemburs

हे थांबवणे आपल्या हातात आहे का असा विचार येतो.
असा विचार मांडणारे सगळे मूर्ख, अर्धवट, विकृत म्हणून हल्ला करायला येताना थोडे थांबले पाहीजे. माणूस बुद्धीजीवी आहे हे कबूल. पण त्याचा अरोगन्स नियंत्रित असायला हवा. त्याला विवेकाची जोड हवी. जाणून घेणे, शोध लावणे इथपर्यत आम्ही इतर प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ आहोत हा अरोगन्स कुरवाळायला ना नाही.

पण विद्वत्तेला विवेकाची जोड असावी हे सुद्धा माणसाच्या बुद्धीवंत असण्याचेच लक्षण आहे. विद्वत्ता आणि शहाणपणा १८० अंशाच्या कोनातून एकमेकांच्या विरोधात जाऊ शकत नाही. तसे ते गेले कि हिरोशिमा, नागासाकी घडते. अर्थात कोणतेही युद्धखोर शस्त्रे हे विवेक नसल्याचेच लक्षण आहे.

म्हणूनच जीवन जगण्याची कला सांगणारे तत्त्वज्ञान (ज्याला जे झेपेल ते) ते सुद्धा शिकायला हवे. समाजाला मिळून मिसळून रहायला लावणारे तत्त्वज्ञान, तंत्रज्ञान, विज्ञान आत्मसात केले पाहीजे. ते ही शिकवायला हवे. शाळेपासून त्याची सुरूवात हवी. दहावीच्या विद्यार्थ्याचा निकाल लागला कि विज्ञान आणि गणितात किती गुण पाहिले जाते. जणू काही इतर ज्ञानशाखा आता रद्द झालेल्या आहेत असा समज झालेला आहे. वैज्ञानिक दृष्टी आणि विज्ञानाचा अहंकार यातला फरक समजेनासा झालेला आहे.

पृथ्वी वाचवण्यासाठी शौचाला फ्लश ऐवजी बादली वापरा, स्नानाला शॉवर ऐवजी मगाचा वापर करा अशा फुटकळ मललमपट्टीपेक्षा आणि बाह्य इलाजापेक्षा आतला इलाज महत्वाचा आहे. आपल्या वैज्ञानिक युगात विज्ञानासोबत जगताना आपल्या चुकीच्या धारणांचा सामना करायला हवा. त्या धारणा चुकीच्या आहेत याची कबुली आधी स्वतःला दिली पाहीजे. मग निसर्गाची क्षमा मागायला हवी.

चंगळवाद, हव्यास, लालसा या गोष्टींवर मात करता येण्यासाठी किमान गरजा ठाऊक असायला हव्यात. एक अपारंपारिक उर्जास्त्रोतांना वाहून घेतलेले जर्मन शास्त्रज्ञ शेफलर होते. त्यांनी सूर्यापासून, पवन उर्जेपासून आणि अन्य आपारंपारिक स्त्रोतांवर चालणारी अनेक संयंत्रे विकसित केली आहेत. पण हे शोध हस्तांतरित करताना ते त्यांच्या विद्यार्थ्यांना विवेकाची कास धरायचा आग्रह धरतात.

त्यांचे संशोधक विद्यार्थी घरात फ्रीज वापरत नाहीत, एसी वापरत नाहीत. या गोष्टींच्या आहारी जात नाहीत. त्यांचे एक विद्यार्थी वलसाडला आहेत. त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांच्या घरात तर वीजही नाही. रात्री सोलर कंदीलाचा वापर होतो. टिव्ही नाही. टिव्हीवरच्या डिबेटस हे वैचारीक प्रदूषण आहे असे ते म्हणतात. त्यांच्या सहवासात येताना हेच विचार विस्कळीत स्वरूपात होते. गेल्या वीस वर्षांपासून मी ही टिव्ही कमी म्हणजे जवळपास बंद केला आहे. काहीही नुकसान होत नाही.

मास उत्पादन जिथे अनिवार्य आहे तिथे ते घ्यावे. पण त्याचा अ‍ॅण्टीडोटही शोधून काढावा असे ते म्हणतात. ते जन्माने हिंदू, कर्माने वैज्ञानिक , तत्वाने जैन, बौद्ध आणि ओशो यांचे मिश्रण आहे. ते झेन सुद्धा आहेत. जे चांगले वाटते ते आत्मसात करावे. स्वतःवर नियंत्रण मिळवले कि गरजा कमी होतात. उपभोक्त्याच्या गरजा कमी झाल्या कि उत्पादन कमी होते. उत्पादन कमी झाले कि पृथ्वीचा नाश थोडा मंदगतीने होतो हे त्यांचे तत्त्वज्ञान आहे. त्यासाठी धर्माचे बंधन नाही. हा मूलतत्ववाद आहे असे वाटत नाही. ते ही त्यांच्या विद्यार्थ्यांना हा विचार देतातच.
विज्ञान या पद्धतीने जबाबदारीसहीत आणखी पुढे गेले तर काय हरकत आहे ?

आपणासी जे जे ठावे ते ते दुसऱ्यासी सांगावे
शहाणे करून सोडावे सकळ जन...

अशा पद्धतीने ही लोकहितवादी चळवळ पुढे गेली पाहीजे. जितकी जास्त वर्षे लागतील तितका झालेला विध्वंस पुन्हा भरून काढता येणार नाही. पण अशी चळवळ न चालवता नुसतेच उसासे सोडून हा विध्वसं थांबणार नाही.

Saving our planet, lifting people out of poverty, advancing economic growth… these are one and the same fight. We must connect the dots between climate change, water scarcity, energy shortages, global health, food security and women’s empowerment. Solutions to one problem must be solutions for all. – Ban Ki-moon

******************************************

लेख त्रोटक शब्दात असल्याने अधिकचे संदर्भ. प्रतिसादात देखील दिलेले आहेत. देत राहणार आहे.

भारतात येत असलेले विध्वंसाचे संकट आणि उपाय
https://www.youtube.com/watch?v=5At6eVbXNck

व्यक्ती म्हणून काय करता येऊ शकते ?
https://www.youtube.com/watch?v=CeWkPMqupDI

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगला लेख आहे. वरती शरदजी यांनी लिहील्याप्रमाणे विचारांना चालना देणारा.

तर कोणतेही शोध लागले तर त्याच्या वापराआधी जो विरोध होतो त्याचे समाधान झाले पाहीजे. त्या उलट काही हुषार वादविवादपटूंची नेमणूक केली जाते. ते अशा आक्षेपांची नोंद घेतात. मग या आक्षेपांना गप्प करणारी उत्तरे तयार केली जातात. हे टूलकीट त्या त्या वापरकर्त्याच्या एजन्सीला दिले जाते. >>> हा भाग सर्वात आवडला. थँक यू फॉर स्मोकिंग सारख्या चित्रपटांत असे पीआर वाले/लॉबीइंग करणारे कसे काम करतात याचे चित्रण आहे.

अशा शोधांच्या कमर्शियल वापरांच्या बाजूने जसे हितसंबंध असतात तसेच विरोधातही असतात. कधी ते पोटापाण्याचा प्रश्न निर्माण होण्यामुळे असतात (रिक्षा वि टांगे, ओला वि रिक्षा ई), तर कधी आपली गुंतवणूक किंवा धार्मिक, राजकीय किंवा आर्थिक सत्ता धोक्यात येऊ शकत असल्यानेही असतात. विशेषतः या दुसर्‍या केस मधे दोन्ही बाजूंकडून वातावरण इतके गढूळ केले जाते की सामान्य लोकांना नक्की सत्य काय आहे सहज समजत नाही. दोन्ही बाजूंची माहिती काढून स्वतंत्रपणे मत बनवणे सर्वांना जमत नाही, तितका वेळ्/इंटरेस्ट नसतो, किंवा तितकी झेपही नसते.

त्यामुळे सहसा लोक एक खुंटी पकडून तसेच राहतात. त्यापेक्षा वेगळे मत कोणी सांगितले तर त्यांच्या हेतूवरच शंका घेणे ते पार वरती लिहीले आहे तसे दानवीकरण करणे इथपर्यंत जातात. याला सोशल मीडिया खूप कारणीभूत आहे, हा ही एक भाग आहे.

एक उदाहरण म्हणजे भारतीय रेल्वेचा "विकास". यात झपाट्याने झालेले विद्युतीकरण बहुधा सर्वांच्याच फायद्याचे आहे. पण ते मॅक्रो लेव्हलला. मिरज-पंढरपूर लाइन ही बहुधा पूर्वीची नॅरो गेज डिझेल लाइन. ती आता इलेक्ट्रिफाइड आहे. जास्त वेगवानही आहे. पूर्वी डेक्कन क्वीन ई गाड्यांना वापरली जाणारी इंजिने आता तेथे दिसतात. याचा स्थानिकांना नक्की फायदा काय हे सहज सांगता येणार नाही. पण देशाच्या एकूण इंधनाच्या गरजेच्या दृष्टीने, परराष्ट्र संबंध ई च्या दृष्टीने ते प्रचंड आहे.

दुसरा "विकास" - रेल्वेने सगळीकडे जास्त वंदे भारत आणाव्यात आणि काही लोकांना वेगाने व आरामात फिरायची सोय करावी, का प्रत्येक एक्स्प्रेस गाडीत अगदी "जनरल डिब्बा" मधे काही किमान सोय होईल याला प्राधान्य द्यावे? विकासाच्या चर्चेत हा सामाजिक भागही आहे.

लेखाचा हेतू उत्तम आहे. पण लेख काहीसा विस्कळीत वाटतो. कदाचित खूप सारी उदाहरणं एकत्र मांडण्याचा परीणाम आहे का?

क्या बात है! बऱ्याच कालावधीनंतर असे काहीतरी वाचायला मिळाले जे विचारप्रवर्तक आहे, विचारपूर्वक शब्दरचना करून लिहिलेले आहे, लेखाची दिशा विवेकवादी आहे आणि सातत्याने तेच तेच लिहिणाऱ्यांना ज्यावर गोंधळ घालता येणार नाही असे आहे.

=====

माझेमन,

अनेक उदाहरणे किंवा विषय एका लेखात येणे यामुळे लेख विस्कळीत होईल / वाटू शकेल असे मला तरी वाटत नाही. या लेखाला निश्चित व चांगली दिशा आहे, निश्चित व चांगले उद्दिष्ट आहे, असे वाटले. तरीही, प्रत्येकाचे मत वेगळे असू शकते हे अगदी मान्य!

लेख अतिशय विस्कळीत आणि त्यामुळे गोंधळात टाकणारा झाला आहे. नक्की काय म्हणायचे आहे तो मुद्दाच कळत नाहीये, इतकी भेसळ झाली आहे. लेख काहीसा विज्ञानाच्या विरोधात वाटला, कदाचित तसा हेतू नसेलही, पण तरीही. विज्ञानामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे, असा अजेंडा असावा असेही वाटले, पण नक्की खात्री नाही.

खंडन करण्यासाठी काही मुद्दे मांडतो.
१.
<< The cost of our success is the exhaustion of natural resources, leading to energy crises..... there will be nothing left for your children. >>
जगात ऊर्जेचा तुटवडा कधीच पडणार नाही. अणुऊर्जेचा शोध मानव जातीस लागला आहे. खुद्द सूर्याची ऊर्जापण आण्विक प्रक्रियेतून बनते.

२. रूदरफर्ड आणि आईन्स्टाईन, थियरी आणि प्रॅक्टिकल याची माहिती लेखात का घुसवली आहे, ते कळले नाही. वैज्ञानिक पद्धत (Scientific method) म्हणजे काय ते या व्हिडिओत छान समजावले आहे. थियरी आणि प्रॅक्टिकल या दोन्हीची गरज असते, एक दुसऱ्यापेक्षा जास्त महत्त्वाचे असे काही नसते.
<< प्रॅक्टीकल मुळे त्याचे दुष्परिणाम समजले असते. >> हा मुद्दा असेल तर तो योग्य नाही, याची अनेक उदाहरणे मिळू शकतील.

३. HVAC मध्ये फक्त तापमान नियंत्रित केले जात नाही तर आर्द्रता (humidity) पण. HVAC च्या वापरामुळे कुणाचा thermal shock मुळे मृत्यू झाला आहे, हे कधीच वाचले नाही. उपयुक्त माहिती दिल्यास तुमच्या विधानास पुष्टी मिळेल. HVAC मुळे माणसाची कार्य क्षमता मात्र नक्कीच वाढते, याची लिंक मी शोधून देऊ शकेन. उदा, टेक्सासमध्ये वातानुकुलनाचा शोध लागल्यामुळे खूप लोक स्थलांतरित झाले आणि त्यामुळे तिथे उद्योगधंद्याची भरभराट झाली, असे वाचल्याचे आठवते.

तूर्तास इतकेच. तुमचा मूळ मुद्दा काय आहे, ते कळले तर पुढे काही लिहिता येईल.

माझे मन, विस्कळीत झाला असेल तर बहुधा लेखनदोष असेल. विस्तारभयास्तव काही मुद्दे आटोपते घेतलेले आहेत.

उबो - अ‍ॅश्रे हॅण्डबुकचा वापर एअर कंडीशनिंग डिझाईन करताना केला जातो. त्यातले स्टँडर्ड्स दरवर्षी अपडेट होत असतात. १० डिग्रीचा तापमान बदल मानवी शरीरास अपायकारक नाही हे त्यांचे मत आहे. हे स्टँडर्ड्स जगभरात वापरले जातात. सध्याचे २०२२ चे हँडबुक तुम्हाला नेटवर मिळू शकेल.

राजस्थानात गंगानगरला बाहेर ५५ डिग्री तापमान असताना २४ डिग्रीच्या कंटेनरमधे असताना एका व्यक्तीचा बाहेर जाऊन मृत्यू झाल्याची गोष्ट माहिती आहे. सकाळ मधे अनेक वर्षांपूर्वी जळगाव स्थानकावर झेलम एक्सप्रेस मधून उतरलेली व्यक्ती थर्मल शॉकने मेल्याची बातमी होती.

थर्मल शॉक वर तुम्हाला असंख्य माहिती जालावर मिळू शकेल. इथे एक उदाहरण आहे.
https://cleanairforall.org/ACTShock.asp

थर्मल शॉकचा उल्लेख यासाठी केला आहे कि माणसाची गरज काय हे जाणून न घेता कंफर्ट साठी माणूस अशा उपकरणांच्या आहारी जातो. ही गरज नक्कीच नाही. हे एकच उदाहरण आहे. माणूस स्वतःवर नियंत्रण ठेवत नाही. गरजेपेक्षा जास्त उपभोग आणि त्यातून मग पर्यावरणाचे प्रश्न उग्र रूप धारण करतात. एसी नसावा असे काही म्हटलेले नाही. पण बाहेरच्या तापमानापेक्षा क्षमता वाढीसाठी कंफर्ट लेव्हल किती असावी याचे स्टँडर्ड अभ्यासा अंती अस्तित्वात आलेले आहेत. तितकाच वापर करायला शिकले पाहीजे. ते हॅण्डबुक भलेमोठे आहे. त्यात अनेक गोष्टी आहेत. पण कंफर्टची व्याख्या आणि स्टँडर्डस हा मुद्दा लगेच वाचून होईल. एकदा वाचून पहा.

थर्मल शॉक मुळे मृत्यू ही एक्स्ट्रीम केस जरी असली तरी आजारपण येते. हा धोका माणसाला असल्याने त्याची दखल घेतली पण अशा अनिर्बंध कंफर्टच्या हव्यासापायी पर्यावरणाचा विचार होत नाही हा सूर आहे. हा मुद्दा आहे. तो वर स्पष्ट केलेला आहे.

HVAC चा उल्लेख अ‍ॅश्रेच्या कंफर्टच्या स्टॅण्डर्डला विरोध म्हणून करण्याचे कारण समजलेले नाही. माणसाची क्षमता आणि होम स्टॅण्डर्ड हे निराळे घटक आहेत. हवा प्रदूषित असताना फिल्टर्ड व्हेंटिलेशन सिस्टीम वापरणे, हवा खेळती ठेवणे आणि थर्मल शॉक या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. इतक्या तांत्रिक विश्लेषणात जायची गरज नाही खरे तर. या गोष्टी तपशीलवार लिहील्या तर लेख कंटाळवाणे होतात हा अनुभव आहे. त्रोटक उल्लेख केले तर काही संदर्भ हाताशी असावे लागतात. किंवा गुगळून घ्यावे लागतात. तसे न केल्यास गोंधळ उडतो.

रूदरफर्डचा उल्लेख वैज्ञानिक क्रांतीची सुरूवात ढोबळमानाने जिथून सुरू झाली त्यासाठी केला आहे. बाराला दहा कमी वाचले असेल तर लक्षात येईल. हा संपूर्ण काळ शोध लागणे, ते वापरात येणे आणि जगाने ते मूकपणे स्विकारणे असा होता. कारण सामान्य जनता भांबावलेली होती. ज्याला विरोध करायचा त्याकडे ते ज्ञान नव्हते. कोणताही नवीन शोध लागताना जबाबदारीने तो लागला पाहीजे यावर तत्त्वज्ञानात अनेक दाखले आहेत.

पंचतंत्रात मेलेला सिंह आणि चार विद्यार्थ्यांची गोष्ट प्रसिद्ध आहे. इथे थांबतो. लेख टाकाऊ झाला असेल तर क्षमा मागतो. कदाचित तुमचे म्हणणे तुमच्या दृष्टीकोणातून योग्य असेल. पण सुरूवातीलाच प्रॅक्टीकल कि थिअरी हा विषय नाही हे स्पष्ट केलेले आहे. याचा उल्लेख करण्याचे कारण सुद्धा दिलेले आहे. इगो.

लेख एकदा वाचून चांगला वाटला, हो थोडा विस्कळीत वाटला खरा सुरवातीला पण पूर्ण वाचत गेल्यावर रोख आणि मुद्दा उघड होत गेला. शाश्वत विकासाकडे कल असल्याने मूळ मुद्दा पटला.
पण लेख स्नॉर्केल करत वाचला असल्याने सध्या इतकेच. परत सावकाश चिंतन करत वाचेन.
फारएण्ड यांनी मांडलेला सामाजिक प्राधान्यक्रमाचा मुद्दाही योग्य आहे, यात असे इतर कंगोरेही असतील.

विषय चांगला आहे आणि मांडणी वर इतर लोक म्हटलेत तशी थोडी विस्कळीत वाटली, पण कदाचित तसाच तो लिहायचा होता असंही असेल. विवेक या विषयावरचे मुद्दे जास्त पटले.

२००१ च्या आवृत्तीनुसार कंफर्ट म्हणजे वाहेरच्या तापमानापेक्षा पाच ते दहा अंशाने कमी तापमान ठेवणे >> या व्याखेला विवेकवाद्यांनी बदलायची गरज आहे. इथे मी कमी किंवा जास्त असा जरी अर्थ घेतला, (म्हणजे थंडीत जिथे ३-४ डिग्री तापमान असतं तिथे १३-१४ पर्यंत ठेवणे) तरी बाहेर ४५ असताना घरात ३५ ते ४० ठेवणे किंवा बाहेर -२० असताना घरात -१० ते -१५ ठेवणे हे दोन्ही अत्याचार आहेत. ट्रॉपिकल देश सोडता इतर जगात ही व्याख्या लागू होणार नाही . थर्मल शॉक न येण्यासाठी इतर गोष्टी करता येतील - उदा. घराबाहेर पडण्यापूर्वी ac बंद करून खिडकी उघडणे किंवा हळू हळू करून बाहेर पडणे इत्यादी.

हपा
तुम्ही सकाळी एसीत शिरून जर सायंकाळी बाहेरचे तापमान कमी झाल्यावरच बाहेर पडणार असाल तर थर्मल शॉकचा सामना तुम्हाला करावा लागणार नाही. थर्मल शॉक हा बाहेर गेल्यावरच बसतो. सर्वांना एक विनंती राहील कि थर्मल शॉकची व्याख्या सर्वांनी एकदा गुगळून पहावी. एसी किंवा रेफ्रिजरेशन मधे हिटिंग येत नाही. एसीमधे दहा डिग्री ही कंफर्टची व्याख्या करताना नॉर्मल कंडीशन्सचा उहापोह सुद्धा केलेला आहे. हे सायन्स उलगडून सांगणे हा हेतू इथे नाही.ते उपलब्ध असल्याने माणूस कसा गरजेची स्केल विसरून अधिकच्या पाठीमागे लागतो एव्हढेच स्पष्ट करायचे होते.

मी उणे तीस तापमानात राहिलो आहे. अशा वेळी रूम मधे २७ डिग्री (रूम टेंपरेचर मेन्टेन केले तर बाहेर जाताना काय काळजी घ्यावी हा प्रोटोकॉल पाळला जातो. रोजच्या जीवनात एसीच्या वापरासाठी असा प्रोटोकॉल अस्तित्वात नाही. अ‍ॅश्रेच्या उल्लेखाबाबत हे स्पष्टीकरण समाधानकारक असेल ही आशा आहे.

बरं. लक्षात आलं.

लेख टाकाऊ झाला असेल>>>> अज्जिबात टाकाऊ नाही. तुम्ही मांडणीबद्दलही अपेक्षा वाढवून ठेवल्या आहेत एवढंच…

'निसर्गाची क्षमा मागायला हवी.'
यावरून एक वारली आदिवासी प्रथा आठवली.(आजही चालू आहे.) ज्यात खळ्याचा देव असतो, जी अशीच निसर्गाची क्षमा मागायला लावणारी प्रथा आहे.

लेखाबद्दल - बरोब्बर समतोल! मी व माझी सहचर नेहमीच यावर मनसोक्त, सर्व बाजूंनी चर्चा करत असतो, त्याची आठवण झाली.

रघु आचार्य, लेख हा अगदी बरोबर जुळला आहे. मला एका वाचनात त्याचा रोख समजला. कदाचित हेच विचारचक्र असल्याने लगेच समजला.

शरदजी,आभार
फारएण्ड, या विषयाशी संबंधित चित्रपट सुचवल्याबद्दल धन्यवाद. इथे दिसत असेल तर नक्कीच बघेन.

त्यामुळे सहसा लोक एक खुंटी पकडून तसेच राहतात. त्यापेक्षा वेगळे मत कोणी सांगितले तर त्यांच्या हेतूवरच शंका घेणे >> अगदी.
विकासाच्या चर्चेत हा सामाजिक भागही आहे. >> होय. ते सुद्धा महत्वाचे आहे. या सर्वांचा मसावि काढला तर सर्वांना विकासाची फळे मिळताना किमान गरजेच्या विकासाकडेच फोकस असला तर हा ग्रह आपण जास्त काळ तगवून धरू शकवू.

बेफिकीर, लेख आवडला हे कळवल्याबद्दल आभार. अन्यथा खूप विस्कळीत आहे का ही शंका होती.
ब्ल्यू कोलंबसे, तुमचेही मनापासून आभार. वेवलेंग्थ सारखीच आहे बहुधा आपली.

मानव आभार Happy
उबो,हपा, माझे मन मनमोकळ्या प्रतिसादांबद्दल आभार.

आचार्य, लेख चांगला जमलाय. सगळ्या गोष्टी पटल्या/आचरण्यात आणण्यासारख्या वाटल्या असं नसलं तरी तुमचे विचार, त्यातली क्लॅरिटी आणि त्यामागची जेन्युइनिटी पोहोचली.

उर्जेच्या आणि कंफर्टच्या बाबतीत उबोंशी माझी मतं जास्त जुळतात. पुढची पिढी, आव्हानात्मक परिस्थितीत त्या परिस्थितीतून मार्ग काढण्यात अधिक सक्षम आहे/असते असा आजवरचा मानवी इतिहास आहे.

फेफ ,धन्यवाद.
पण उबोंना माझा मुद्दा समजलेला नाही असे ते म्हणत आहेत. त्यामुळे तूर्तास इतकेच. Happy

छोटी छोटी उदाहरण देता येतील, जसे की टीशु पेपर , वेट वाइप्स, एकदा वापरायचे मास्क .. ह्या सर्वाना पुर्वीपासुन पर्याय उपलब्ध आहेत पण आपण ते सर्व सोडुन दिले वापरायचे

झाडे लावा याच्याशी १००% सहमत आहे, इतर लेखाशी सहमत नसलो तरीही.

<< माणसाच्या कंफर्ट साठी वातानुकूल यंत्रणे आणि शीतकपाटं विकसित झाली. >> चूक. पेशंटच्या सोईसाठी एका डॉक्टरच्या प्रयत्नातून वातानुकूल यंत्रणा विकसित झाली आणि सुरुवातीला ती आकाराने खूप मोठी आणि महाग होती. एके काळी ते लक्झरी प्रॉडक्ट होते, त्यामुळे फक्त बिझनेसना परवडत असे. (History of air conditioning)

<< आपल्याकडे मोबाईल नसणे हे आपण आउट ऑफ डेट झाल्याच्या पीअर प्रेशरखाली मोबाईल घेतला जातो. >> पुन्हा चूक. स्मार्ट फोन हे अतिशय उपयुक्त टूल आहे. त्याचा वापर कसा करता, याच्यावर त्याची उपयुक्तता अवलंबून असली तरीपण ते वापरायची सक्ती कुणीही केलेली नाही. माणसाचा स्वतःवर ताबा नाही हा विज्ञानाचा/तंत्रज्ञानाचा दोष नाही.

<< त्यांचे संशोधक विद्यार्थी घरात फ्रीज वापरत नाहीत, एसी वापरत नाहीत. या गोष्टींच्या आहारी जात नाहीत. >> Good for them. याचा अर्थ इतरांनी तसेच जगावे हा होत नाही.

भारतात भरपूर प्रमाणात झाडे लावली जात आहेत. चीन आणि भारत या देशांचा भूभाग जगाच्या ९% आहे, पण जगातील एक तृतीयांश वाढ या दोन देशांमध्ये होत आहे. हा बघा नासा चा संदर्भ.

Vertical garden concept जेव्हा सोसायटी लेव्हल वरती सुरळीत सुरू होईल तेव्हा बरेचसे हे प्रॉब्लेम कमी करणे शक्य होऊ शकते

बोका धन्यवाद. अचूक तपशीलात जाऊन चूक दर्शविली यासाठी.
पण हा लेख ललित लेखन मधे आहे. हे काही टेक्निकल आर्टिकल नाही. प्रत्येकाने सहमत असावे असे वाटत नाही. ललित लेखाच्या सुरुवातीला उपोद्घात म्हणून रूदरफर्डचा उल्लेख केला आहे. माझ्या दृष्टीने हा वैज्ञानिक क्रांतीचा मैलाचा दगड आहे. इतरांसाठी वेगळा असेल.

पण पहिला एसी / पहिला संगणक का बनवला याला आता फक्त इतिहास म्हणून स्थान आहे. एसी कंफर्टसाठी वापरला जातो ही फॅक्ट आहे. तसेच तुमचे इतर मुद्दे आहेत.

लेखाचा रोख गरज आणि लालसेपोटी होणारा विध्वंस यातली पातळ रेषा समजून घेणे याबाबत आहे. या नजरेतून एकदा वाचून पहा. अर्थात तुमची मतं कायम असतील तर त्याबद्दल अर्थातच आदर आहे.

स्पष्ट सांगायचे तर बहुतेक मते वैयक्तिक आहेत, तुमचा लेख अचूक नाही, आणि केवळ एकांगी विचारातून स्वतः:चा अजेंडा पुढे दामटण्यासाठी लिहिला आहे. आता तुम्हीच म्हणताय की हे ललित लेखन आहे त्यामुळे अधिक कीस काढणे थांबवतो. माझे कष्ट वाचवल्याबद्दल धन्यवाद.

उबो, तुमच्या मार्गदर्शनपर प्रतिसादाबद्दल आभार.
असाच लोभ असू द्या.

Good for them. याचा अर्थ इतरांनी तसेच जगावे हा होत नाही. >> अशा अर्थाने मी लिहिले असेल तर बिनशर्त माफी.

आपण आउट ऑफ डेट झाल्याच्या पीअर प्रेशरखाली मोबाईल घेतला जातो. >> पुन्हा चूक. >>>त्यामागचा हेतू बाजूला ठेवून पुन्हा माफी.
तुम्हाला झालेला त्रास आणि मनःस्ताप याबद्दल खेद व्यक्त करतो.
लोभ असावा.
संपूर्ण लेख आणि एकूण एक शब्द चुकीचा आहे या तुमच्या मताचा आदर.

एकांगी विचारातून स्वतः:चा अजेंडा पुढे दामटण्यासाठी लिहिला आहे. >> या प्रमादासाठी त्रिवार माफी.

स्पष्ट सांगायचे तर बहुतेक मते वैयक्तिक आहेत >>माझ्या लेखात इतरांची मते मांडण्याची सिद्धी प्राप्त झालेली नाही याबद्दल आणखी एक माफी.

वैयक्तिक मते = individual opinion, not facts
माफीची आवश्यकता नाही. इतरांना दुसरी बाजू कळावी म्हणून प्रतिसाद लिहीत होतो.

या फॅक्टस नाहीत हा तुमचा निष्कर्ष अंतिम आहे. धन्यवाद.

माफीची आवश्यकता नाही >> हा तुमचा मनाचा मोठेपणा आहे.

मित्र हो
लेखात एक लिंक दिली आहे. ती टेक्स्ट मधे असल्याने मिस होण्याची शक्यता आहे. लेखाचा रोख अधिक स्पष्ट होईल असे वाटते.

विचार करायला लावणारा लेख आहे. दोन भागांत प्रतिसांद आटपेल Happy

माहितीचा, ज्ञानाचा ( किंवा अवजाराचा) वापर कसा करायचा हे सर्वस्वी मानवाच्या नितीमत्तेवर, ethics values वर अवलंबून आहे , गैरवापर होत असेल तर विज्ञानाला / तंत्रज्ञानाला दोष देता येणार नाही. अणूचा वापर अणुऊर्जा निर्मीतीसाठी करता येतो ( आज जगांत ४५० प्रकल्प काम करत आहेत, एकूण निर्माण होणार्‍या ऊर्जेच्या १० % भाग आहे) तसाच त्याचा वापर विद्वंसासाठी पण झालेला आहे. भविष्यात होणारच नाही हे सांगता येत नाही.

थोडे मागे, काही शतकांपूर्वी दगडापासून विस्तव किंवा धारदार शस्त्र तयार करण्याच्या ज्ञानाचा पण फायदा तसेच तोटा झालेला आहे. सुरीचा वापर वैद्यकीय शस्त्रक्रियेत किंवा भाजी कापायला करणे हा सदुपयोग असेल तर त्याच शस्त्रांनी हत्या करणे हा दुरुपयोग आहे. हिरोशिमा/ नागासाकी विध्वंसा मधे चार दिवसांत जेव्हढी मनुष्यहानी झाली त्याच्या शंभर/ हजार / ? पटीने लोक धारदार शस्त्राने ( भाले, तलवार ) आजपर्यंत मारल्या गेले आहेत आणि अजून प्रक्रिया सुरुच आहे Sad .

असाच न्याय विज्ञानामुळे समोर दिसत असलेल्या इतर तंत्रज्ञानाला लावता येतो... चॅट GPT, मोबाईल तंत्रज्ञान, WA /फेसबुक/मायबोली. तुम्ही हा धागा सुरु करणे, किंवा एखादा मदत हवी आहे, पर्यावरण / आरोग्या बद्दलचा धागा हा या माध्यमाचा सदुपयोग आहे तर सर्वत्र द्वेषयुक्त/ विखारयुक्त प्रचार करत रहाणे आणि टोकाच्या प्रसंगी वैयक्तिक टिका हा दुरुपयोग आहे. कुणी खातरजमा करायला हवी होती? Happy

विज्ञान तुमच्या समोर निसर्गा बद्द्लचे ज्ञान उलगडून सांगेल.... त्या ज्ञानाचा/ माहितीचा ( त्यामुळे मिळालेल्या तंत्रज्ञानाचा) वापर कसा करायचा हे मानवाने ठरवायचे आहे, सर्वस्वी मानवाच्या हातात आहे.

मुळात ऊर्जेचा तुटवडा कधीच पडणार नाही, हा कन्सेप्ट मला अजून नीटसा कळला नाहीय. कुणीतरी उलगडून सांगितलं तर बरं होईल. एखादी गोष्ट उपलब्ध आहे म्हणजे तुटवडा पडणार नाही असं आहे काय? तिची किंमत किंवा त्याचे साईडइफेक्ट्स महत्वाचे नाहीत काय?

स्वच्छ आणि मुबलक ऊर्जा , परवडणाऱ्या ( हि रिलेटिव्ह टर्म आहे ) दरात उपलब्ध झाली तर जगातील बरेच प्रश्न चुटकी सरशी सुटतील. पुढची जी काही युद्धे होणार आहेत ती या उर्जेपायी होणार आहेत असे मला वाटते. बऱ्याच लोकांना युद्ध पाण्यासाठी होईल असे वाटते, पण मुबलक ऊर्जा उपलब्ध झाली तर पाण्याची सोय करणे अवघड नाहीय. तूर्तास इतकेच.

Pages