डॉ. ब्रायन वाईस ह्यांचं पुस्तक!

Submitted by मार्गी on 23 April, 2024 - 11:55

कोलंबिया युनिव्हर्सिटी आणि येल मेडिकल स्कूलचे पदवीधर आणि मियामीतील मानसशास्त्राच्या संस्थेचे अध्यक्ष असलेले डॉ. ब्रायन वाईस अतिशय तणावात असलेल्या व अस्थिर अशा कॅथरीन ह्या तरुणीवर मानसोपचार करतात. तिला होणार्‍या त्रासाचं मूळ तिच्या जीवनातल्याच काही अनुभवांमध्ये असावं असं मानून ते तिला बोलतं करतात. तिने अधिक बोलतं व्हावं आणि हलकं व्हावं म्हणून ते तिला ट्रान्समध्ये नेतात आणि तिच्या आठवणी सांगायला सांगतात. कॅथरीन तिचे अनुभव- आठवणी सांगत जाते. थेरपीचे काही सेशन्स होऊनही तिची अस्थिरता थांबत नाही. म्हणून डॉ. वाईस तिला आणखी लहानपणीचे अनुभव विचारतात. एका वेळी ती सांगते की, मी तीन वर्षाचे होते तेव्हा माझ्या वडिलांनी माझ्यावर अत्याचार केला. त्यामुळे मी अजूनही त्यांना घाबरते. त्यावेळी तिच्या निरागस मनामध्ये भावना असते की, बाबा माझ्याशी असं वागले म्हणजे मीच काही तरी चुकले असणार! आणि हळु हळु हे पुस्तक वाचताना आपल्याला एकामागोमाग एक धक्के बसण्याची फक्त सुरूवात होते.

डॉ. वाईसचा अनुभव असतो की, आपल्या आयुष्यातल्या अशा असंख्य भल्या- बुर्‍या अनुभवांचं इंप्रिंट आपल्या मनावर असतं आणि केवळ ते अवचेतन (अनकॉन्शस) मनामध्ये असल्यामुळे आपल्याला जाणवत नाही. अनेक गंभीर तक्रारी असलेल्या मनोरुग्णांवर उपचार करणारे डॉ. वाईस कॅथरीनच्या बाबतीत काही करू शकत नाहीत. तिच्या सगळ्या आठवणी समोर येऊन आणि अनेक आठवडे थेरपी होऊनही तिची अस्थिरता काही संपत नाही. तिच्या वागण्यामध्ये अनियमित ताण असतो. अनेक गोष्टींची भिती तिला वाटत असते. तर कधी विमानाला प्रचंड घाबरणारी असूनही ती इजिप्तला जाते. आणि विलक्षण बाब म्हणजे पहिल्यांदाच इजिप्तला जात असूनही तिथे फिरताना तिथल्या गाईडच्या सांगण्यातल्या चुका ती दाखवून देते! कॅथरीन डॉ. वाईससाठी एक प्रश्नचिन्ह बनते. अखेर ते तिच्यावर हिप्नोसिस थेरपी वापरायचा निर्णय घेतात.

(असे इतर लेख माझ्या ब्लॉगवर उपलब्ध- http://niranjan-vichar.blogspot.com/2024/04/blog-post.html )

१९७९ मध्ये ह्या घडलेली ही सत्य घटना आहे! हिप्नोसिस थेरपीमध्ये ट्रान्समध्ये गेल्यावर ते तिला नेहमीप्रमाणे प्रश्न विचारतात. एका वेळी ती अचानक वर्णन सुरू करते की, ती शेतावरच्या तिच्या घरी आहे. तिथे अनेक जनावरं आहेत. तो अगदी डोंगराळ भाग आहे. तिच्या कुटुंबियांनी असे असे कपडे घातलेले आहेत. डॉक्टरांना प्रश्न पडतो की, ती तर अमेरिकेत शहरात वाढलेली मुलगी. हे वर्णन कसं काय सांगेल? मग ते तिला प्रश्न विचारून बोलतं करतात. तेव्हा ती सविस्तर वर्णन करते. तो काळही अगदी वेगळा असतो. तेव्हाची वेशभुषा- राहणीमान सगळं वेगळं असतं. मग ते तिला वर्ष कोणतं आहे हे विचारतात. तेव्हा ती सांगते साधारण १६४६! आणि गावाचं नाव व कुटुंबियांची नावं युरोपियन असतात. प्रस्थापित मानसशास्त्र आणि विज्ञानामध्ये शिकलेले डॉक्टर अवाक् होतात. पण मग त्यांना मानसशास्त्रातली पास्ट लाईफ रिग्रेशन ही संकल्पना आठवते ज्यावर त्यांचा काडीमात्र विश्वास नसतो. पण पुढच्या अनेक सत्रांमध्ये त्यांना कळत जातं की, कॅथरीन जे अनुभव सांगतेय ते तिचे वेगवेगळ्या जन्मातले अनुभवच आहेत! तीन वर्षाची असतानाच्या आठवणी जशा मनामध्ये खोलवर जतन केल्या गेल्या आहेत, तशाच पूर्वजन्मातल्या स्मृतीही आहेत. कारण हे वर्णन व आठवणी सांगताना तिचा सूर स्वाभाविक असतो. शिवाय इतक्या खोलवर ट्रान्समध्ये नेल्यावर कोणी खोटं कसं बोलेल आणि बोललं तरी ते कळेल ना.

कॅथरीनच्या बोलण्यातून डॉक्टरांना कळत‌ं की, अनेक जन्मांमध्ये तिला भेटलेले काही जण ह्या जन्मातही तिच्यासोबत आहेत. अगदी ते स्वत:ही एका जन्मात तिचे शिक्षक होते व त्यांच्याबद्दल तिला खूप आदर होता. आणि त्याबरोबर काही खूप नकारात्मक अनुभवही तिला आलेले आहेत ज्याचे खूप गहिरे इंप्रिंट्स तिच्या मनावर आहेत. एका जन्मात ती बुडाल्यामुळे तिला पाण्याची फार भिती वाटते. काही लोकांचे खूप नकारात्मक अनुभव आल्यामुळे ती लोकांसोबत वावरताना भिते. आणि एका जन्मात ती इजिप्तमध्येही राहिलेली असल्यामुळे तिच्या मनात त्याही स्मृती आहेत. अशी सगळी संगती त्यांना लागत जाते. आणि इतक्या वेगवेगळ्या जन्मातल्या आठवणी जशा ती व्यक्त करत जाते, तसे तिचे लक्षणं कमी होत जातात. तिची अस्थिरता कमी होत जाते.

हे सर्व सांगताना ती डॉक्टरांना इतरही काही माहिती सांगते. एका जन्मात तिचा मृत्यु झाल्यावर तिला उन्नत चेतना- मास्टर्स मार्गदर्शन करतात असं ती सांगते. किंबहुना अनेक जन्म- मृत्युच्या चक्रामध्ये असे अनेक मास्टर्स तिला मार्गदर्शन करतात, ह्या जन्मात तू काय शिकलीस व तुला पुढे काय शिकायचं आहे हे सांगतात. इतकंच नाही तर खोलवर ट्रान्समध्ये ती बोलत असताना तिच्या माध्यमातून काही मास्टर्स म्हणजे उच्च चेतना डॉ. वाईसशी बोलतात. त्यांचा बोलण्याचा सूर, अधिकारवाणी, हळुवारपणा ह्यांचं वर्णन त्या पुस्तकातच वाचायला पाहिजे. ह्या मास्टर्सचं सांगणं असतं की, ज्याप्रमाणे एका जन्मात माणूस शिकत पुढे जातो, त्याचे साथीदार मिळतात, त्याच प्रमाणे अनेक जन्मांमध्येही माणूस पुढे शिकत जातो व त्याला अनेक जन्मांमध्ये सोबत असलेले सोबतीही मिळतात- Groups of souls travel together! आणि मग ते मास्टर्स डॉक्टरांना त्यांच्या जीवनातल्याही काही प्रसंगांबद्दल सांगतात. जसं डॉक्टरांचा पहिला मुलगा जन्मानंतर अगदी लगेचच दुर्मिळ आजाराने गेला. त्यांच्या नंतरच्या अपत्याचं नाव त्यांनी त्यांच्या वडिलांच्या नावावरून ठेवलं होतं.

आधी अशा संकल्पनांबद्दल पूर्ण अविश्वास असलेले डॉक्टर आता मात्र हे सत्य नाकारू शकत नाहीत. त्यांना प्रत्यक्ष प्रमाण- स्वत:चं उदाहरण मिळालेलं असतं. त्यांचं वैद्यकीय व मानसशास्त्राचं ज्ञान आणि वैज्ञानिक पद्धतीने ते ह्याचा छडा घेतात. आणि मग ह्या दिशेने इतर काही मानसशास्त्रज्ञांनी केलेलं कामही अर्थपूर्ण वाटतं. असं हे अतिशय थरारक अनुभव देणारं पुस्तक. वयाच्या चौथ्या वर्षी स्टेफी ग्राफ रॅकेट हातात कशी घेते, बीथोव्हेन अगदी कमी वयात कसे जादुई सूर निर्माण करतो किंवा अनेक वैज्ञानिक शोध हे स्वप्नावस्थेमध्ये किंवा खोलवरच्या तल्लीन ट्रान्समध्ये कसे लागले आहेत, अशा गोष्टींमधला अर्थही हे वाचताना कळतो! त्याबरोबर जीवन हे एक विद्यापीठ आहे आणि जीवन हे प्रचंड अर्थपूर्ण आणि सखोल आहे ही जाणीव आपल्याला होते. पुस्तकाचं नाव- Many lives, many masters. लेखक- Dr. Brian Weiss. त्यांचे अनेक पोडकास्टस आणि मुलाखतीही युट्युबवर उपलब्ध आहेत.

(वाचल्याबद्दल धन्यवाद! निरंजन वेलणकर 09422108376 फिटनेस, ध्यान, आकाश दर्शन, ट्रेकिंग, मुलांचे ज्ञान- रंजन सेशन्स आयोजन)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिले आहे. पुस्तक बऱ्यापैकी प्रसिद्ध आहे आणि
तुमच्या मताचाही आदर आहे.

पण---
हे पुस्तक मी वाचलेलं आहे. मला अतिशय पाल्हाळ लावलेलं व पुनर्जन्मातून पूर्वजन्मात त्याहून मागे-मागे करत स्वतःचा मुद्दा हरवून बसलेलं , भ्रामक समजुतींचा भरणा असलेलं, आशयच नसलेलं, pseudosciencey, शब्दबंबाळ करून पोकळ - एकुण हाताशी काहीच न लागणारं असं वाटलं होतं. अजिबात आवडलं नव्हतं. छद्मविज्ञानाकडे ठरवून दुर्लक्ष केलं तरी हे पुस्तक एक काल्पनिक कादंबरी म्हणून सुद्धा नीट 'बांधलेलं' नाही. त्यामुळे जास्त रटाळ वाटले होते.

तसेही पुस्तकाचे वर्णन वाचून, हे भंपक वाटेल असे पुस्तक वाचण्याची शक्यता कमीच होती. पण तरीही वरील प्रतिसाद अतिशय उपयुक्त वाटला. म्हणून मुद्दाम धन्यवाद. _/\_

@ अस्मिता जी, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद! तुमच्या मताचा आदर आहे.

@ उपाशी बोका जी, कोणत्याही गोष्टीबद्दल इतरांच्या मताऐवजी स्वत: स्वाद घेऊन बघणं जास्त योग्य असं मला वाटतं. धन्यवाद.

कॅथेराईन हिप्नॉसिस मध्ये सर्वात पहिल्या जन्मात जाते तेव्हा वर्ष 1863 BC आहे असे सांगते.

ती स्वतः मागच्या जन्मात पोचली असेल तर तिला सध्या कुठले वर्ष चालू आहे हे कळणेही शक्य आहे. पण 1863 BC? तेव्हा कालगणना सुरू झाली असेल तरी BC कसे काय? अजून Christ जन्मलाही नव्हता.

मग हिप्नोसिस मध्ये ती कॉन्शस माईंड मधून आपल्या पूर्वीच्या जन्मातील स्वतःला पहाते म्हणुन तिच्या कॉन्शस माईंडला BC/AD माहीत आहे असे जरी मानले तरी 1863 BC हे स्पेसिफिक वर्ष कळणार कसे? केवळ ऍरोंडाच्या नजरेतून आजूबाजूचा परिसर पाहून अरे हा तर 1863 BC चा काळ असे ओळखते? की एरोंडाला कुठली तरी कालगणना माहीत होती, त्यानुसार ती ते वर्ष सांगते, पण ते सायकियाट्रिस्टला कळणार नाही म्हणुन ती पटकन मनात हिशेब करते आणि मी 1863 BC मध्ये आहे असे सांगते?

आणि या पुस्तकावरून काही लोक लहानपणीच खेळ, वाद्ये कसे शिकतात, काही शास्त्रज्ञांना स्वप्नात कसा उलगडा होतो हे समजते?

Screenshot_2024-04-27-13-07-46-37_e4424258c8b8649f6e67d283a50a2cbc.jpg

<< इतरांच्या मताऐवजी स्वत: स्वाद घेऊन बघणं जास्त योग्य असं मला वाटतं. >>

तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. पण जगातल्या सर्व चुका स्वतः करून बघाव्यात इतका वेळ दुर्दैवाने माझ्या आयुष्यात नाही.

वाचलेले आहे. कंटाळा आलेला होता. अर्ध्यातच सोडले.
आपला कर्मविपाकाचा सिद्धांत मला पटतो - एक थिअरी म्हणुन. पण हे पुस्तक फार कंटाळवाणे झालेले होते.

चांगला परिचय, मार्गी!
माझे अतिशय जिव्हाळ्याचे पुस्तक! (भले कितीही त्रुटी असूदेत )

Back to top