लष्कराच्या भाकऱ्या(२) : जागरूक वाचक मंच

Submitted by कुमार१ on 1 January, 2023 - 20:22

भाग १: https://www.maayboli.com/node/75324
..................................................................................................
नववर्षानिमित्त सर्व मायबोलीकरांचे स्वागत आणि सर्वांना शुभेच्छा !
भाग १ मधील पृष्ठसंख्या बरीच फुगल्यामुळे हा भाग काढतो आहे.

नव्या वाचकांसाठी थोडी पार्श्वभूमी :
वृत्तमाध्यमांमधून असंख्य बातम्या आणि विविध प्रकारची माहिती प्रसारित होत असते. अलीकडे माध्यमांमध्ये घाईघाईत अर्धवट बातम्या देणे, मूळ इंग्लिशमधील बातमीचे ढिसाळ व हास्यास्पद भाषांतर आणि एकंदरीतच लेखनाबद्दलची बेफिकिरी या गोष्टी मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. अपवाद म्हणून काही माध्यमांमधून इतरांपेक्षा काहीतरी वेगळे किंवा चांगले सुद्धा सादर केले जाते. अशा वृत्तापैकी तुम्हाला आवडलेले/ नावडलेले/ खटकलेले असे काहीही तुम्ही इथे संबंधित दुव्यासकट लिहू शकता.

शीर्षकाच्या नामविस्तारासह सादर आहे हा “लष्कराच्या भाकऱ्याचा” दुसरा भाग..

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरंय !
शुद्धलेखन हा धाब्यावर बसवलेला विषय झाला आहे.

अनुकरणिय व समृद्ध ही 'अंतरदृष्टी' या सामान्यनामाची विशेषणे आहेत. मला चूक कळली नाही Sad

मूळ ट्वीटमध्ये insights हा शब्द आहे. त्याचा शब्दशः अनुवाद अंतर्दृष्टी असा केला झाला आहे. His Parliamentary interventions have always been exemplary, full of rich insights.

Interventions = सहभाग.
Full off = भरलेले
Ground level चा अनुवाद नाही केला?

लोकसत्ताच्या आजच्या संपादकीयाच्या शीर्षकातून

चंडीगढ, येथील महापौरपदाची निवडणूक असो,.....

राजा भोज एकदा नगरात फिरत असताना त्याला एक सामान्य माणूस डोक्यावर मोळी घेऊन जाताना दिसला. साहजिकच त्याने विचारले. ‘बाधति’ भारम्? (वजनाचा काही त्रास?) त्यावर त्याने सांगितले की, "भारन्न बाधते राजन्, यथा बाधति बाधते।" तुमच्या चुकीच्या "बाधति" शब्दाचा त्रास या वजनाच्या त्रासापेक्षा जास्त आहे! तो शब्द बाधते असा हवा होता.

सामान्य माणूस भाषेच्या बाबतीत सजग असलेला तो काळ होता. आताचा काळ वेगळा आहे. आता आपल्या "प्रायोरिटीज्" बदललेल्या आहेत. त्याचे हे एक उदाहरण पहा...

"आपणास अनंत शुभेच्छा" ह्यात चुकण्यासारखं काय आहे? दुसर्‍या एका बॅनरवाल्याने तर चक्क "शुभेच्क्षा" असे लिहिलेले आठवते. "तोंडवाळकर" हे आडनाव माझ्या माहितीप्रमाणे "तोंडवळकर" असे आहे. अनधिकृत बॅनरच्या त्रासापेक्षा भाषेची ऐसीतैसी करण्याचा हा प्रकार जास्त त्रासदायक आहे!

सहमत.
कुणालचे कुणाला केले नाही हेच नशीब समजायचे.

शुभेच्क्षा
>>>> बापरे !
काय तो भाषेचा खून...

सुभेच्छुक
आनंत
सुभेच्छा
आपनास
.
.
अवघड आहे सगळ
ते सिदेश आहे का सिद्धेश?

भूरिभारभराक्रान्तस्तत्र स्कन्धो न बाधति?
न तथा बाधते राजन् यथा बाधति बाधते |

आता आजकाल सगळंच बाधते अशी परिस्थिती आहे. जिथे लिखाणकामासाठी वेतन घेणारी वृत्तपत्रमंडळीच माती खातात तिथे सामान्यांची काय कथा!

बॅनर लावायला खर्च करायची तयारी असते. फोटो काढण्यात/निवडण्यात बराच वेळ घालवतील. एखाद्याकडून शुद्धलेखन तपासून घ्यायला पाच मिनिटंपण लागणार नाहीत. पण इच्छाशक्तीच नाही!

>>> पण इच्छाशक्तीच नाही!
‘आम्ही बामणी भाषा बोलत-लिहीत नाही’ याचा काहीतरी misplaced reactionary अभिमानही असण्याची शक्याता नाकारता येत नाही.

वर्तमानपत्रांना ते excuse नाही.

अयमान्दोलिकादण्डः स्कन्धे किं तव बाधति |
न तथा बाधति दण्डो यथा बाधति बाधते II

हे वरचे version माहित आहे. पण हे फ्लेक्स निखळ करमणूक करतात आणि ते वाचावेत ते फक्त त्यातल्या अशुद्धलेखनासाठीच Happy

ज्या व्यक्तीने बॅनर बनवले तिला माहीत नसणे, कुठे (तिच्या दृष्टीकोनातुन) जराशी चूक झाली असे कळले तरी त्यात काय एवढे वाटणे, बॅनर आणायला पाठवलेली व्यक्ती या बाबतीत अनभिज्ञ असणे, बॅनर बनवून घेणाऱ्याने चित्र आणि एकंदरीत बॅनर कसे छान दिसते आहे एवढेच पहाणे, एखाद्याने चूक दाखवून दिली तरी 'आता कोण परत जाऊन एवढीशी चूक दुरुस्त करणार'/ बाकी एवढं छान बॅनर बनवलंय ते बघ की, तुला नेमक्या चूकाच दिसतात का, आपण थोडीच मराठीचा पेपर देतोय इथं' असे ऐकवणे.
असला प्रकार असावा.

हा माझा चार वर्षांपूर्वीचा प्रतिसाद :

दुकानांच्या पाट्यांवरील लेखनात बऱ्यापैकी चुका आढळतात. त्या सुधारण्यासाठी बऱ्याच वर्षांपूर्वी पुणे विद्यापीठाच्या वृत्तविद्या विभागाने एक सुरेख उपक्रम राबवला होता. तो म्हणजे रंगाऱ्यांसाठी कार्यशाळा.

बहुतेक दुकानदार हे त्यांच्या दुकानाच्या पाटीवरील लेखन शुद्धतेबाबत जागरूक नसतात. एका गावातील पाट्या रंगवण्याची कामे करणारे रंगारी साधारण ठरलेले असतात. हा मुद्दा ध्यानात घेऊन सदर कार्यशाळा आयोजली होती.

अशा प्रकारे रंगारी प्रशिक्षित झाले, तर पाट्यांवर लेखनही निर्दोष होईल अशी यामागे धारणा होती.
Submitted by कुमार१ on 12 July, 2020 - 16:06
......
असे उपक्रम वारंवार व्हावेत.

माझ्या पाहण्यात काही रंगारी (सुमारे २० वर्षांपूर्वी) परप्रांतीय होते. शिवाय काहे अशिक्षितही होते. त्यांनी फक्त देवनागरीच नाही, तर कन्नड पाट्याही रंगवलेल्या आहेत. त्यांना लिहून दिलेल्या अक्षराबरहुकूम ते रंगकाम करीत. अक्षर मुळात जसं आहे तसं असावं म्हणून त्यांच्याकडे लहान मुलांकडे असतो त्या वर्णमालेच्या तक्त्याची गुंडाळी असे. क्वचित जोडाक्षरे लिहिताना ते चुकत, कारण तक्त्यात ती जोडाक्षरं नव्हती. तरी देवनागरी आणि कन्नड दोन्ही अक्षरं ते छान वळणदार काढत असत व रंगकाम झाल्यावर मुकादमाला दाखवायच्या आधी कुणा स्थानिकाला पकडून 'हे ठीक दिसतं आहे ना' असं विचारून घेत (पंचायत नावाच्या वेबसिरीजमध्ये त्या 'बवासीर'च्या भागात असाच एक प्रसंग दाखवला आहे). बर्‍याचदा स्थानिक माणसाच्या सल्ल्याने त्यांना खाडाखोड आणि पुनर्रंगकाम करावं लागे आणि मुकादमाच्या ओरड्यापासून ते वाचत. काही वेळा मुकादमही नीट तपासून न घेता चुकीचा मजकूर त्यांना देत असे आणि अश्या वेळी स्थानिक लोक त्यातल्या चुका दाखवून देत. हे मला माहीत असण्याचं कारण माझ्याच नातेवाईकांपैकी एक साईनबोर्ड पेंटींग, जाहिरातीचे फलक इत्यादी व्यवसाय करत होते आणि त्यांच्याकडे असे हे लोक कामाला असत.

हे चित्र आता कसं आहे ते माहीत नाही. आता साक्षरता वाढली असल्याने रंगारी स्वतः निदान स्वतःच्या लिपीतलं तरी वाचू शकत असतील. पण एकंदरीत व्याकरणाची सर्वंकश दुर्दशा झाल्याने मुळात मजकूर योग्य लिहिलेला असणे, त्यात स्थानिक लोकांनी तपासून योग्य तो अभिप्राय देणे - ही शक्यता मला कमीच वाटते. त्यातही आता रंगकाम फारसं राहिलं नाही, सगळीकडे फ्लेक्स मुद्रणालाच प्राधान्य दिलं जातं. त्यामुळे एकेक अक्षर रंगवून तपासून घ्यायची सोय त्यात नाही. आख्खा फ्लेक्सच मुद्रित होऊन बाहेर येतो आणि फलकावर लागल्यावरच त्यातल्या चुका बाकीचे वाचू शकतात. त्यामुळे फ्लेक्स-मुद्रकांना प्रशिक्षण द्यायची गरज आहे. निदान मुद्रितशोधन करण्याचं महत्त्व ते फ्लेक्स ऑर्डर करणार्‍यांना पटलं पाहिजे, तर ते शक्य आहे.

>>>>>‘आम्ही बामणी भाषा बोलत-लिहीत नाही’ याचा काहीतरी misplaced reactionary अभिमानही असण्याची शक्याता नाकारता येत नाही.
परखड आणि सत्य!! असू शकते असे.
सरस्वती आम्ही मानत नाय टाइप्स. असो.

१) डि. टी. पी. चे काम कॉम्प्युटरवर पूर्ण झाले की गूगल लेन्स मधून स्क्रीनचाच फोटो काढायचा. "होमवर्क" या टॅबमध्ये "कॉपी टेक्स्ट" असा पहिलाच पर्याय आहे खालील चित्रात दाखविल्याप्रमाणे. (अपेक्षित वेळः ३० सेकंद)

२) मराठी स्पेल चेक या अ‍ॅपमध्ये तो मजकूर पेस्ट करायचा या चित्रात दाखविल्याप्रमाणे. मग "चेक स्पेलिंग" या बटनावर क्लिक करायची. (अपेक्षित वेळ : १५ सेकंद)

३) आधीच खूप अ‍ॅप आहेत त्यात आणखी एका अ‍ॅपची गर्दी नको असे वाटत असेल किंवा सिक्युरिटीची भीती असेल तर टेलिग्राम अ‍ॅपमध्ये "marathispellbot" या बॉटला फ्रेंड लिस्टमध्ये अ‍ॅड करा. आणि मग तो मजकूर पेस्ट करा, खाली दाखविल्याप्रमाणे. (अपेक्षित वेळ: १५ सेकंद)

फ्लेक्स-मुद्रकांचे प्रशिक्षण पूर्ण झाले.

तॉडवाळकर : वाळक्या >> Lol Lol Lol

रच्याकने, वरील प्रक्रिया उपयुक्त आहे, परंतु अजून त्यातली अक्षरे नीट वाचली गेलेली नाहीत. त्यामुळे फ्लेक्समजकूरलेखकांना सोयीचे नाही. गूगल लेन्सच्या पिक्चर टू टेक्स्ट कन्वर्जनमध्ये आणखीन सुधारणा झाल्यास हे काम खूप छान उपयोगी पडेल. मराठी स्पेलबॉट चांगले काम करते आहे.

Pages