काय आहे ना, उगाच नमनाला घडाभर तेल नको म्हणून मी थेट विषयाला हात घालणार आहे. तसंही, नंतर अधूनमधून विषयांतर होईलच. मग जरा अजून पुढे गेलं की विषयांतरातून 'मूळ विषय शोधा' हेही होणारच आहे. मग आतापासून कशाला वेळ असा वाया घालवू?
तर, मुद्दा असा, की माझा हा डूआयडी आहे असं तुम्हाला वाटलं तर वाटू द्या. पण मला खरी ओळख इथे देऊ नका ही विनंती. माझ्या कामाच्या ठिकाणी अडचणी येऊ नयेत यासाठी.
पुढे, थेट गोष्ट अशी, की मी एका चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजला शिकवते. इथे मला रोज भारीपैकी अनुभव येतात. जगावेगळे नाहीतच, पण मांडावेसे वाटतात. आणि ते एक शिक्षक म्हणून, एक हितचिंतक म्हणून आणि कधीकाळची आणि काही कारणाने आताही स्वतःला विद्यार्थिनीच मानते (अप्रेझलसाठी दर सेमिस्टरला एनपीटेलचे कोर्सेस आणि अभ्यास-परीक्षा असतात म्हणून) त्याही दृष्टीकोनातून इथे सांगणार आहे.
तर, मोरया!!
**********
स्थळः प्रॅक्टिकल लॅब. संगणक विभाग.
पात्रयोजना : मी, संगणक विभागाचे तिसर्या वर्षाचे विद्यार्थी.
वेळ : परीक्षा जवळ आल्यामुळे/ प्रत्यक्ष चालू असल्यामुळे आणीबाणीचीच
अबकड : मॅडम, फोल्डर सेव्ह कसं करू? उबंटूवर कधी काम नाही केलंय.
मी: (आश्चर्याचा धक्का कमी झाल्यावर) तू थर्ड इअरचा ना? मग मागच्या वर्षी कशी केलीस लॅब ? आपण सगळीच प्रॅक्टिकल्स उबंटूवर घेतली आहेत. नियम आहे विद्यापिठाचा तसा.
भयाण शांतता.
मी प्रोसिजर सांगते. मुलं करतात. वेळ निभली म्हणून उभयपक्षी निश्वास! परीक्षेच्या वेळी फोल्डर करेपर्यंत प्रगती झालेली असते. कसंबसं प्रॉब्लेम स्टेटमेंट सोडवता येतं. मग परीक्षेचा म्हणून बॅक अप घेताना ते फोल्डर कुठे शोधायचं असा पुढचा प्रश्न मी सोडवते. कारण तेव्हा वातावरण तापलेलं असतं. आरडाओरडा करणं योग्य नसतं. मुलं कायमच हरवलेली, हुकलेली असतात! १०% मुलं लक्ष देऊन प्रॅक्टिकल करतात. बाकीची नुसती येऊन बसतात. आजकाल गिटहबवरून कुठलाही कोड मिळतो या भरवशावर स्वतः निष्क्रिय झालेली तरुणाई बघितली की पोटात तुटतं...
मग सुरू होते तोंडी परीक्षा. हिंदी, मराठी, इंग्लिश अशी ज्या जमेल त्या भाषेत!
परीक्षकः कुठला आहे प्रोग्राम?
अबकडः ...... (हे तरी सांगता येतं!)
पः काय करतात यात?
अबकडः .... (हेपण जमतंय की!)
पः ... (अजून काही सोपे प्रश्न)
अबकडः ... (जमेल तशी खिंड लढवतोय/ लढवतेय).
मी: (मनात- हे मी क्लास आणि लॅबमधे शिकवताना घसा बसेपर्यंत घोटून घेतल होतं... काय उपयोग! का लक्ष देत नाहीत पोरं!! मी हताश. मीच कशाला, ज्यांनी ज्यांनी म्हणून मनापासून शिकवलेलं असतं ते सगळेच हताश, हतबल. काहीच झेपत नाहे म्हणून मुलं निर्विकार. "हे असंच असतं. अगदी चांगल्यातल्या चांगल्या कॉलेजात गेलात तरी हेच! असा विचार मनात करून परीक्षकसुद्धा निर्विकार. )
२-३ दिवसांनी -
अ : मॅडम, माझं बॅक राहील का? (म्हणजे बॅकलॉग लागेल का.)
मी: ते कसं सांगणार? रिझल्ट आला की कळेल ना.
अ : नाही ते काये ना, जरा प्रॉब्लेम झाल्ता. घरी थोडे इशूज आहेत...
मी: बाकी सब्जेक्ट्स ना पण प्रॉब्लेम आला का?
अ: (गप)
मी. मग याच सब्जेक्टला का? (ही सबजेक्ट खरंच अवघड अस्तो हेच एकमेव कारण मला माहितेय. बाकी सब मोहमाया)
रिझल्ट लागतो. बाळ्या काठावर पास असतो.
******************
स्थळः लॅब मधे, अशीच एक ओरल परीक्षा.
वेळ : आणीबाणीची
पात्र : तशीच.
पः हं, सांग असेम्बलर डायरेक्टिव म्हणजे काय?
अ: (आं? हे काय असतं? क्लीन बोल्ड!) सर असेम्बलर डायरेक्टिव्ह म्हणजे..(आणि थापा सुरू)
हे असेम्ब्लर डायरेक्टिव्ह पहिल्या युनिटच्या १-२र्या प्रॅक्टिकलमधेच सांगितलेलं असतं, कारण त्याशिवाय कमांड्स सुरूच होत नसतात. त्यामुळे कोड समजायला हवा तर हे बेसिक ज्ञान हवंच. मग तेव्हा काय झोपला होतास का रे बाळ्या???
अशी २०० मुलं त्या २ दिवसांत सहन करायची असतात! (मॅडम, उडवा लवकर घेऊन.. कुठे खेळत बसताय अवघड कायकाय विचारून! - शिपाई. हे परमज्ञानी असतात.) आम्ही विद्यापिठाला "नातिचरामि|" चं वचन देऊन बसलेलो असतो. शिवाय विद्यापिठात रिपोर्ट द्यावाच लागतो. २ दिवस सकाळी ९ ते संध्याकाळी ५ यात सगळा कार्यक्रम संपला की आमचेच मेंदू बधीर होतात. का? कारण "आम्ही परीक्षा देतो!"
*******************
स्थळ : लेखी परीक्षेचा हॉल.
वेळः सकाळी किंवा दुपारी, जेव्हा पेपर असेल तेव्हाची.
पात्र: तीच सगळी.
मी : "आन्सरशीटवर "इन्फर्मेशन" कॉलममध्ये काय काय लिहायचंय सांगते, नीट ऐका.
तारीखः आजची. विषयः तुमचा जो पेपर आहे तो. मिडिअम ऑफ आन्सरः इंग्लिश" (हे लिहायला निम्मी मुलं विसरतात. मग सुपरवायझर म्हणून मी सही करताना प्रत्येक पोरापाशी माझा खोळंबा) पण आता खरा गेम. "पेपर कोडः क्वेश्चन पेपर वर इथे जो कोड लिहिलाय (मी पेपर उंच करून तो कोड नीट दाखवते) तो लिहा. संपूर्ण लिहा, ब्रॅकेटसकट." मुलं अर्धी हरवतात. लिहित नाहीत. सहीच्या वेळी पुन्हा खोळंबा. "कॉलेज कोडः**** "
मी नीट सांगते. मुलं नीट दुर्लक्ष करतात. पुन्हा खोळंबा.
"सीट नंबर स्वतःचा, याच वर्षीचा नीट लिहा. फिगर्स आणि वर्ड्स, दोन्ही नीट लिहा."
हे जमतं कारण शेवटी मार्क्स याच नंबरने मिळतात ना! बाकी सब मोहमाया.
मग यथावकाश एखादी चिठी सापडणे, हाता-पायावर लिवलेलं काहीबाही, खाणाखुणा वगैरे... मग पेपर काढून घेऊन एक्झाम सेक्शनला मुलांना पाठवून देणे वगैरे कार्यक्रम एखाद्या तरी वर्गात घडतोच.
पुरवण्यांचे दोरे नीट टो़क जुळवून साधी पण पक्की गाठ मारणे हे बेसिक स्किल आहे याचा विसर पडतो मुलांना. दोन टोकं जुळवायची आणि एक गोलाकार करून त्यातून ती टोकं एकसारखेपणाने ओढून पक्की गाठ मारायची यात न समजण्यासारखं किंवा कथीण काय आहे हे मला अजूनही समजलेलं नाही. हे मी शाळेत इfunction at() { [native code] }ता ५वीत शिकले होते.
एकूणच, परीक्षा ही साधी सरळ परीक्षा न रहाता आमचीही सत्त्वपरीक्षाच ठरते. इतकं करून, ६०% च्या वर मारकं मिळालेली पोरंही कॅम्पस ड्राईव्ह ला डिसक्वालिफाय होतात आणि मग निराश होऊन शून्यात बघत असतात. जेव्हा आम्ही "टेक्निकल सेमिनार द्या.... कामापुरतं तरी बिनचूक इंग्रजीतून सेमिनार द्या.... नीट स्वतः वेळ देऊन स्लाईड्स तयार करा... प्रत्येक मुद्द्यासाठी 'असं का?' याचं नीट उत्तर तुमच्याकडे तयार ठेवा. नुसतं गुगलत बसू नका... स्वतः कष्ट करा, उत्तरं मिळवा.." असं कानीकपाळी ओरडलो तरी "चलता है यार...चिल मार!! ती बाई/ तो सर फक्त ओरडायचाच पैसा घेते/ घेतो" असं आपसांत बोलतात (दुर्दैवाने ते आम्हाला ऐकू येतं आणि सुदैवाने आम्ही दुर्लक्ष करतो!!) आणि तशाच अॅटिट्यूडने वागतात तेव्हा संताप होतो.
असो. इतकं असूनही आम्ही पुन्हा नव्याने, दरवर्षी आवडीचे विषय घेऊन क्लासवर जायला तयार होतो. लेक्चरच्या मधल्या रिकाम्या वेळात मनापासून अभ्यास करतो. नोट्स काढतो. स्लाईड्स तयार करतो. गूगल, चॅटजिपीटी वगैरे आम्हीपण वापरतो. पण शेवटी आपलं नॉलेज महत्त्वाचं हे अंतिम सत्य आम्हाला माहितेय. बाकीचे सगळे सपोर्ट्स आहेत, मुख्य सिस्टिम नाही. मुख्य सिस्टिम आपण माणसं आहोत हे खरं.
स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावयः | असं म्हटलं गेलंय. कितीही त्रास वाटला तरी याच कामात आनंद मिळतो. तो जो त्रास असतो तोही याच कामात होतो तेव्हा सहन होतो, इतर कामातला होईल असं वाटत नाही. जे काय असेल ते इथे असो असं वाटतं म्हणून मी काम करते. परीक्षेचा मस्त रिझल्ट घेऊन, प्लेसमेंटचे पेढे घेऊन वगैरे मुलं येतात तेव्हा जे वाटतं ते फार मस्त असतं.
"मॅडम तुम्ही तेव्हा रागावलात म्हणून मी रडले होते, पण तुमचं पटलं. मी तसाच अभ्यास केला आणि बघा ना मस्त ग्रेड्स आल्या" असं एखादी बाळी म्हणाली की सार्थक झालंय असं वाटतं.
याचिसाठी केला होता अट्टाहास...
मग मी सज्ज होते पुन्हा नवीन पान लिहिण्यासाठी!!
हं. अवघड आहे खरं.
हं. अवघड आहे खरं.
असे इंजिनिअर्स (आणि इंजिनिअरिंग व्यतिरिक्त इतर कॉलेजेस मध्ये असे होत असेल ते) बनवून मग नक्की कुठे आणि काय काम करतात असा प्रश्न पडतो.
<<माझ्या कामाच्या ठिकाणी
<<माझ्या कामाच्या ठिकाणी अडचणी येऊ नयेत यासाठी>>
धागा ग्रुपपरता मर्यादित ठेवल्यास माबो सदस्यांशिवाय कुणी वाचू शकणार नाही. हे ड्युआयडीला पर्याय म्हणुन नव्हे तर त्यात अजून एक खबरदारी म्हणुन सुचवले.
हताश करणारी वस्तुस्थिती
हताश करणारी वस्तुस्थिती
विषय काळजीचा असला तरी लिहिलय
विषय काळजीचा असला तरी लिहिलय एकदम खुसखुशीत...
पंचेस तर एकदम भारी..
हीच उज्ज्वल उद्याची युवाशक्ती पुढे आमच्यासारख्यांकडे जाॅब मुलाखतीसाठी येते तेव्हा "आजकाल (गिटहबवरून ) गूगलवर कुठलाही (कोड ) input deck मिळतो या भरवशावर स्वतः निष्क्रिय झालेली तरुणाई बघितली की पोटात तुटतं..." हीच अवस्था होते..
चांगलं लिहिलंय.
चांगलं लिहिलंय.
अलीकडे ऐकलेला इंटरव्ह्यूचा एक अनुभव.
उमेदवार मुलगा इंजिनिअर, चांगले मार्क्स, लेखी परीक्षाही पार करून आलेला.
या प्रश्नापर्यंत गाडी का गेली हे इंटरव्ह्यू घेणाऱ्यालाही आठवत नाही पण असा प्रश्न विचारला गेला की ते भिंतीवर सॉकेट दिसतंय तिथे जर मल्टीमीटर जोडला तर काय रीडिंग येईल?
उमेदवार- २२०.
प्रश्नकर्ता - २२० काय?
उ. अँपियर्स
प्र. अँपियर्स? म्हणजे २२० अँपियर्स करंट?
उ. हो.
प्र. २२० अँपियर्स करंट इथे वाहत असला तर चालेल?
उ. हो.
एकंदरीत कठीण आहे!
(आम्हीही इंजिनिअरिंगच्या ओरल्समधे काही झगझगीत उजेड पाडलाय असा भाग नाही, पण इतकीही वाईट परिस्थिती नव्हती.)
हे किंवा असेच विद्यार्थी मग
हे किंवा असेच विद्यार्थी मग ओ सी आय कार्डाची वेबसाइट किंवा भारतीय रेलवेची रीझर्व्हेशन करायची वेब साइट, ट्रेन चे स्टॅटस दाखवणारी वेबसाइट बनवतात . आणि या सगळ्या साइट्स आणि अॅप्स तमाम पब्लिकला वापराव्या लागतात : कपाळबडवती:
How wealth accumulates and
How wealth accumulates and men decay सारखं आहे हे.
शिक्षण संस्था फोफावल्या, कमाई वाढली आणि शिक्षणाचा दर्जा खालावला.
शिक्षण संस्था फोफावल्या, कमाई
शिक्षण संस्था फोफावल्या, कमाई वाढली आणि शिक्षणाचा दर्जा खालावला. >> दुर्दैवाने अगदीच खरे आहे. सखोल अभ्यास करण्यापेक्षा मार्क मिळविण्यासाठीच फक्त अभ्यास केला जातोय हल्ली. आयते किती मिळेल हेच बघितले जाते. कष्ट करायची तयारीच नसते.
वाचले. इंटरेस्टिंग धागा आहे.
वाचले. इंटरेस्टिंग धागा आहे.
नशीब ! तुमच्या इंजिनीअरिंग कॉलेजात अजूनही लेक्चर्स प्रॅक्टीकल्स होतात आणि कोरम भरण्यापुरती तरी मुलं मुली येऊन बसतात. मी असं समजून चाललेलो की वर्गात जाऊन बसायची पद्धत आमच्यावेळीच बंद पडली ती नंतर पुन्हा चालूच नाही झाली की काय.?
बाकी, प्राध्यापकांनी सुपरव्हिजनचं आणि एकूणच परीक्षांचं काम एवढं मनावर घेऊ नये, आणि ते तसं का घेऊ नये, याबद्दलचं बहारदार विवेचन नेमाडे आडनावाच्या एका वस्ताद मास्तराने १९७० च्या दशकात करून ठेवलं होतं, त्याच्या आठवणी ह्यानिमित्तानं जाग्या झाल्या. (काय काय करणार एक सुपरव्हायजर अडीच तीन तासांत! आणि त्याचा आऊटपुट काय! मुळात त्याला आणि समोर पेपर लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांना तरी ह्या सगळ्या अर्थ हरवून गेलेल्या प्रक्रियेत डांबून कशाला ठेवायचं?)
इथे मला आणखी काही गोष्टींबद्दल पूर्वीपासूनच कुतुहल आहे. (मी उगाच उडाणटप्पू विद्यार्थ्यासारखा सगळा क्लास डिस्टर्ब करतोय, असे कृपया समजू नये. माझा बिलकुल तसा हेतू नाहीये. )
१. ती पुरवणी दोऱ्यानेच का बांधायची असते? विद्यापीठाला स्टॅपलर का बरे चालत नाही ? कुठल्याशा अगम्य परंपरेचा भंग होतो काय?
२. एनपीटीईल कोर्सेसचा दर्जा नेमका काय असतो?
म्हणजे कोर्सेरा, युडेमी, किंवा मार्केटमधले तत्सम इतर जे ट्रेनिंग कोर्सेस जे सहा महिन्यांत विद्यार्थ्याला इंडस्ट्री रेडी होण्याइतपत तरी रेटत आणतात, त्यांच्या तुलनेत?
३. जे एक्सटर्नल परीक्षक येतात, त्यांना स्वतःच्या कॉलेजमध्ये काय परिस्थिती असते, याचंही भान ठेवावं लागत असेल ना ? मुळात दिवसभर ओरल घेण्यात इंटरेस्ट/सवड उरलेले प्राध्यापक शिल्लक आहेत, हे ही जरासं आश्चर्याचं आहे.
मी तर असे ऐकलेय की टीचिंग लर्निंग फक्त वीस टक्के वेळ आणि उर्वरित ऐंशी टक्के नॅक/एनबीएचे डॉक्युमेंटेशन, संस्थाचालकाच्या-प्राचार्यांच्या भंपक निवडणूकांचा प्रचार/ ॲडमिशन्स गोळा करणे/फायली सजवणे/ डिपार्टमेंटल राजकारणांमधून स्वतःला वाचवणे/रिसर्चच्या नावाखाली अहम् अहम् (जाऊ द्या )वगैरे वगैरे गोष्टींमध्येच वेळ व्यतीत होतो.
४. बाकी, भगवान भरोसे चाललेल्या बाबा आदमच्या जमान्यातल्या विद्यापीठांचा/अभ्यासमंडळांचा/ सिनेटचा/ अभ्यासक्रम व पेपर सेट करण्याच्या सिस्टीमचा/ धंदा म्हणून इंजिनिअरींग कॉलेज चालवणाऱ्या संस्थाचालकांचा/ धोरणं ठरवणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या व शिक्षणतज्ञांच्या कुवतीचा /भाषणं ठोकून, अपेक्षा व्यक्त करून लंपास होणाऱ्या राज्यकर्त्यांचा रोल जर नीट बघितला तर एका मर्यादेपलीकडे विद्यार्थ्यांना त्यांच्या निष्क्रियतेबद्दल दोष देता येत नाही.
असो. प्रतिसाद टोकाचा/एककल्ली/हेकेखोर/सिनिकल/ पूर्वग्रहदूषित/ असंबद्ध इत्यादी वाटल्यास, दुर्लक्ष करून तुम्ही तुमच्या तुमच्या हिशेबाने डायरीचे पुढचे भाग मोकळेपणाने लिहावेत. कुतूहल आहेच, शुभेच्छाही आहेत.
अगदी अगदी relate झाले सगळे.
अगदी अगदी relate झाले सगळे. आमच्या pharmacy मध्येही असेच सुरू आहे.
ह्यात अजून एक भर. एकदा ppt presentation झाले की २ दिवसांत त्याचा निदान १० पानी रिपोर्ट द्यावा लागतो with proper cross referencing. आमच्या कडे सरळ ppt च छापून देतात सर्रास. आणि क्रॉस reference नाहीच.
आता परवा एका मास्टर्स student ने ppt handout स्टाईल ने प्रिंट मारून रिपोर्ट म्हणून सबमिट केल्या.
दर वर्षी सगळ्याच परीक्षांचा दर्जा अजूनच खालावत जातो आहे ही चर्चा करायची आणि मग naac, NBA, AICTE, PCI झालेच तर विद्यापीठ ह्यांना डाटा देत बसायचं.
एकदम बरोबर आहे मेधा.
एकदम बरोबर आहे मेधा.
ह्य अश्याच साईटवर आम्ही काल पर्यंत डाटा भरत होता. सॉफ्टवेअर निट चालत नाही म्हणून date ३ वेळा extend झालीय.
एंजिनीयरिंग कॉलेजात संगणक
एंजिनीयरिंग कॉलेजात संगणक विभागात सुद्धा हेच चित्र आहे, हे पाहून मला का कोण जाणे बरं वाटलं. नुकताच नवा एसर प्रकाशित झाला आहे. बारावीतल्या अमुक टक्के विद्यार्थ्यांना भागाकार येत नाही, दुसरीच्या पुस्तकातला उतारा वाचता येत नाही हे वाचल्यावर फार धक्का बसला नव्हता. आताचे बारावीतले म्हणजे लॉकडाउनच्या काळात नववी दहावी शिकलेले. कोणी परीक्षा न देताच पुढे गेलेले.
आधीही परिस्थिती चांगली होती असं नाही. पण लॉकडाउन, ऑनलाइन शिक्षण, परीक्षा नाही किंवा बहुपर्यायी यांचे परिणाम दिसणारच होते.
वर वेबसाइट्सचा उल्लेख आला आहे. इन्फोसिसने बनवलेल्या आयकर खात्याच्या वेबसाइटबद्दल खूप ओरड झाली होती.
संप्रति१, तुमचंही बरोबर आहे.
संप्रति१, तुमचंही बरोबर आहे. फक्त विद्यार्थ्यांनाच दोष देऊन चालणार नाही.
बायको कॉलेजमध्ये आयटी शिकवते,
बायको कॉलेजमध्ये आयटी शिकवते, त्यामुळे अशा गमती जमती कानावर पडतच असतात
मी नोकरी करत असताना इंटरव्ह्यू घेताना एका इंजिनियरला रेसिस्टर देऊन त्याचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एन्ड कुठले विचारायचो आणि बरेच जण दाखवत असतही. काय कॉन्फिडन्स असायचा त्यांच्या चेहऱ्यावर!
मी जेव्हा नोकरीसाठी
मी जेव्हा नोकरीसाठी इंटरव्ह्यू देऊ लागलो तेव्हा इंटरव्ह्युत कुणाला ओहम्स लॉ सांग, घरात एसी सप्लाय असतो की डीसी, रेक्टिफायर म्हणजे काय, काढून दाखव असे प्रश्न विचारले असते तर अपमान समजला गेला असता.
मी इंटरव्ह्यू घेऊ लागलो तेव्हा सुद्धा यात फार फरक पडला नव्हता. पण २००५ आसपास आधी थोड्या गप्पा मारून अंदाज घेऊन (योग्य कँडीडेटला अपमानास्पद वाटु नये म्हणुन) मग काही कँडीडेट्स मीच असे प्रश्न विचारु लागलो किमान एवढे येत असेल तर पुढे जावे यासाठी. त्यातच बरेच नापास होत.
काही वर्षे शिकवण्याचा अनुभव
काही वर्षे शिकवण्याचा अनुभव असल्यामुळे अगदीच रिलेट (! मराठी प्रतिशब्द?) झाला.
फक्त भारतातच इतकी वाईट परिस्थिती आहे असं नाही, सगळीकडे असे नमुने आढळतात असा माझा वैयक्तिक अनुभव आहे, प्रमाण फक्त कमीजास्त असेल. मला पास करा असं फक्त आपल्याच बोर्डाच्या परीक्षेच्या पेपर्स मध्ये असतं असं नाही, हाही अनुभव युनिव्हर्सलच आहे!
असा एखादा तरी कपाळबडवंती योग प्रत्येक परीक्षेच्या वेळी येतोच. एक दोन उदाहरणादाखल फोटो जोडते आहे. मी नंतर नंतर मजा घेऊन सोडून द्यायला शिकले.
(खालचा फोटो सरळ का होत नाही कळत नाही.)
(हे फोटो काही वर्षांपूर्वीचे आहेत, त्यामुळे इथे चालून जायला हरकत नसावी.)
छान. रिलेटेबल.
छान. रिलेटेबल.
मेघना
मेघना
धमाल लिहिलं आहे.
धमाल लिहिलं आहे.
एक किस्सा ऐकला होता. इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगची व्हायवा -
परीक्षक - कॅपॅसिटर काय असतो ठाऊक आहे का?
विद्यार्थी - हो सर
प - मग सांग बरं, कॅपॅसिटर मधून एसी करंट का फ्लो होतो आणि डीसी का नाही?
वि - सर, कॅपॅसिटरचं चिन्ह --||-- असं असतं ना? डीसी (डायरेक्ट करंट) हा थेट येतो आणि पहिल्या दांडीपाशी अडतो. एसी (अल्टर्नेटिंग करंट) हा खालीवर खालीवर होत येतो आणि दोन्ही दांड्यांवरून उडी मारून पुढे जातो.
माझ्या अभियांत्रिकीमधील
माझ्या अभियांत्रिकीमधील कॉम्पुटर च्या प्रॅक्टिकल ची आठवण झाली. त्यात चिट्ठ्या टाकून जी चिट्ठी येईल तो प्रोग्रॅम लिहायचा होता. माझ्या पार्टनर ने ती चिट्ठी न उघडताच प्रोग्रॅम लिहायला सुरवात केली. मी आश्चर्याने विचारताच म्हणाला - मी एकच प्रोग्रॅम पाठ करून आलोय. तोच लिहिणार.
अर्थात या सर्व प्रकाराला दुसरीही काही बाजू असावी. सर्वच दोष विद्यार्थ्यांचा नसावा.
मस्त!
मस्त!
सगळेच रिलेट होणारे किस्से.. शिक्षकांच्या नजरेतून वाचायला मजा आली...
येऊ द्या अजून किस्से.. वाचायला आवडतील
पुरवण्यांचे दोरे नीट टो़क
पुरवण्यांचे दोरे नीट टो़क जुळवून साधी पण पक्की गाठ मारणे हे बेसिक स्किल आहे याचा विसर पडतो मुलांना.>> मागे एकदा मी ऑफिस मध्ये एकीला मी पेपर्स पंच करायला सांगितले, फाइल मध्ये लावण्यासाठी. तर “मॅडम.. कसं पंच करायचं.. मी नवीन आहे म्हणून..” असं उत्तर आलं .
सर्व प्रतिसादकांचे आभार.
सर्व प्रतिसादकांचे आभार.
सगळा दोष विद्यार्थ्यांचा नाही ही मीही मान्य करते. पण या पानात, मुलं कशी सरसकट दुर्लक्ष करताना दिसतात हे मला सांगायचं होतं. म्हणजे वर्गात एकदा-दोनदा नाही, अनेको वेळा शिकवलेलं निदान ओळखीचं तरी वाटावं अशी किमान माफक अपेक्षा चुकीची आहे का? धडाधड उत्तर द्या असं नाहीच म्हणत!
पुरवणीला स्टेपल न करता गाठी मारावी लागते हा नियम नाईलाजाने का होईना पण मान्य असेल तर मग ती गाठी नीट मारता यायला नको का?
तुम्ही घरी अभ्यास करा किंवा नामांकित कॉलेज-ते-function at() { [native code] }अतिसामान्य कॉलेज या रेंजमधे कुठेही असा पण कॉम्प्यूटर इंजिनिअरिंग करताय आणि तिसर्या वर्षापर्यंत आलायत (आणि पुढे यातच नोकरी-करिअर असेल असा एक साधारणपणे करिअरग्राफ असेल असं गृहीत धरू - तर) उबंटूवर बेसिक गोष्टी करता याव्यात ही अपेक्षा जास्त वाटते का?
अजूनतरी माझ्या कामाच्या ठिकाणी पटसंख्या समजा ७० असेल तर वर्गात ४० तरी पोरं असतात. न आलेल्या आणि हजेरी खूप कमी असणार्या मुलांच्या पालकांना फोन जातो. (त्यावरून कधी कधी पालकच आम्हाला विचारतात, तुम्ही सारखे काय फोन करता.. आम्हाला माहितेय आमचं पोर घरी आहे ते! धन्य!!)
रोज म्हणजे रोज, एका कागदावर (ठरलेल्या फॉर्मॅटमधे) प्रत्येक वर्गातली/ लॅबमधली रोजची पटसंख्या लिहून घेतली जाऊन ती प्रिन्सिपलऑफिसला गेलेली असते. तसं नीट चाललंय काम.
मग मुलं अगदीच दुर्लक्ष करतात तेव्हा जो हताशपणा येतो तोच मी इथे मांडलाय. समर्थन नाही करत माझंच बरोबर असं, कारण प्रतिक्रियांमधेही खूप योग्य मुद्दे समोर आले आहे. पण त्याबद्दल पुन्हा पुढच्या पानावर (पांढर्यावर) काळं करेन, सध्या इतकंच पुरे.
पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार.
हे किंवा असेच विद्यार्थी मग ओ
हे किंवा असेच विद्यार्थी मग ओ सी आय कार्डाची वेबसाइट किंवा भारतीय रेलवेची रीझर्व्हेशन करायची वेब साइट, ट्रेन चे स्टॅटस दाखवणारी वेबसाइट बनवतात . आणि या सगळ्या साइट्स आणि अॅप्स तमाम पब्लिकला वापराव्या लागतात >> क्या बात है मेधा !! खरच कपाळ बडवती योग आहे.
अवघड आहे एकूण. किस्से अफाट
अवघड आहे एकूण. किस्से अफाट आहेत.
ते प्रतिसादातले फोटो पाहून हसू आवरता आवरत नाहीये
धमाल लेखमाला आहे ही
धमाल लेखमाला आहे ही
मुलं खूप गोंधळलेली असतात हे खरं.म्हणजे इंटरव्ह्यू घेताना एकदम भारी स्ट्रीटस्मार्ट उत्तरं देतात.मग प्रत्यक्ष कामात 'हे बघ इथे हा असा असा 2 ओळींचा बदल करून दे' असं काम, व्यवस्थित सविस्तर सांगितलं तरी येत नसतं.थिअरी सगळी जवळ आहे.गुगल चॅट जीपीटी वर सर्व एक्झाम्पल पण आहेत.पण या सगळ्याला समजून घेऊन आपल्या कामासाठी अगदी 1% करावे लागणारे बदल करता येत नाहीत.
इंजिनिअरिंग चे शिक्षक होणं हे कोणत्याही काळात एक सत्वपरीक्षाच आहे.
मेघना, ते फोटो फारच धमाल आहेत अजून काही असतील तर शेअर करा.