अश्वत्थामा

Submitted by प्रणव साकुळकर on 15 January, 2024 - 14:36

रोज रात्री झोपताना गोष्टी ऐकायची सुश्रुतला सवय झालीय. किंबहुना आम्हीच ती लावलीय. रोज रोज नवनवीन गोष्टी कुठून आणायच्या हाही एक प्रश्नच असतो. यातून आमच्या कल्पनाशक्तीचा कसच लागतो. वर त्या बोधप्रद असाव्यात, त्यांचं काही तात्पर्य असावं असा आमचाच आग्रह. असंच एकदा कुठली गोष्ट सांगता येईल याचा विचार करीत असताना अश्वत्थामा आठवला.

अश्वत्थामा लहान असताना एकदा त्याला भूक लागली होती आणि त्यानं दूध प्यायचा हट्ट धरला होता. घरी दूध नव्हतं. “बाबा, ते वॉलमार्टला जाऊन का आणत नाही?”, सुश्रुतचा निरागस प्रश्न. काहीही हवं असल्यास वॉलमार्ट मधून ते आणता येतं हा त्याचा आजवरचा समज; पण वॉलमार्ट मधून वस्तू विकत घ्याव्या लागतात, त्यासाठी पैसे मोजावे लागतात आणि तेच बऱ्याच लोकांकडे नसतात, हाच खरं तर ही गोष्ट सांगण्यामागचा उद्देश. गोष्टीत अश्वत्थाम्याची आई दूध म्हणून कणिक पाण्यात मिसळून त्याला पाजते. दूध पिल्याचं समाधान होऊन शेवटी अश्वत्थामा शांत झोपी जातो. गोष्ट संपली. सुश्रुत रडायला लागला. अगदी हमसून हमसून. मी सुश्रुतला घट्ट मिठी मारली, पाठीवरून हात फिरवला. पण सुश्रुतच्या रडण्याचं नेमकं कारण काय बरं असावं? ते रडणं अश्वत्थाम्याला खरं दूध मिळालं नाही याबद्दल तर नव्हतं ना? अश्वत्थाम्याच्या आईची अगतिकता त्याला कळली असेल? गरिबांना स्वतःच्या अगदी लहानसहान इच्छा मारून कसं जगावं लागतं हे त्याला समजलं असेल? सुश्रुतला त्याचं रडण्याचं कारण विचारलं. “कारण ते गरीब होते”, सुश्रुत हुंदके देत म्हणाला. मी मिठी आणखी घट्ट केली, त्याचे भरपूर पापे घेतले. आपल्याला जे समजावून सांगायचं होतं, ते सुश्रुतला समजलं याच्या समाधानाचं स्मित माझ्या चेहऱ्यावर आलं.

कसलीही दैन्यावस्था आपल्या मुलांच्या वाट्याला येऊ नये अशी सर्व आई-वडिलांची इच्छा असते, अपेक्षा असते. पण गरिबी प्रत्यक्ष अनुभवली नसली तरी मुलांना गरिबांप्रती करुणा असावी, त्यांच्या संघर्षांची जाण असावी, पैशांचं मूल्य कळावं अशी सुजाण पालकांची आशा असते. आई-बाबांनी माझ्या बाबतीत असे भरपूर प्रयत्न केलेत. बाजारातून मुद्दाम समोर गर्दी नसणाऱ्या गरीब शेतकऱ्याकडून भाजी घ्यायची, भाव करायचा काही, हे लहानपणापासून बघितलं होतं. बाबा तर हमखास लहान दुकानातून कुठलीही खरेदी करायचे. कपडे लहान-मोठे करायला, गुंड्या लावायला बाबांचा एक ठरलेला शिंपी होता. एका बोळात अतिशय लहान असं त्याचं दुकान होतं. तिकडे जाताना तो शिंपी किती गरीब आहे हे वारंवार सांगायचे. प्रत्यक्षपणे आणि स्वतःच्या वागण्यातून अप्रत्यक्षपणे त्यांनी हे माझ्या मनावर बिंबवण्याचा सतत प्रयत्न केला.

आता मोठं झाल्यावर मी स्वतः देखील अशीच दुकानं निवडतो हे नुकतंच मला जाणवलंय. बाबांना अपेक्षित असणारी जाणीव माझ्यात निर्माण झाली असावी. हीच जाणीव आता पुढे सुश्रुतमध्ये निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्याची पहिली पायरी यशस्वी झाली या आनंदात सुश्रुतला कुशीत घेऊन, बिलगून झोपी गेलो.

Group content visibility: 
Use group defaults

छान लेख!
लेखातला विचार योग्यच आहे.

आमच्या घरातील काही जण पोरांचे अतीलाड किंवा फाजील लाड आणि त्यांच्यावर उधळपट्टी करणारे आहेत. त्यामुळे मला हे नेहमी टेन्शन राहते की मुलांना गरीबीची जाण, वस्तूंची किंमत राहणार नाही जी मला माझ्या लहानपणी होती. त्यामुळे माझ्यापरीने मी सुद्धा त्यांना अशी आजूबाजूची गरीब मुले दाखवत असतो ज्यांना हे परवडत नाही. दुर्दैवाने ते प्रयत्न कमी पडतात असे वाटते..

मागे मला या विषयावर बालसंगोपन विभागात चर्चेचा धागा सुद्धा काढायचा होता.. पण काही कारणाने राहीला.. असो.

ही अश्वत्थामा कथा सुद्धा सांगून बघतो.. अश्या आणखी शोधतो.

खूप आवडली. उत्तम!
इथे तीन फुले विकणारे आहेत. दोघांकडे बर्‍यापैकी राबता असतो. त्यांची उंची दुकाने आहेत. एक आहे तो जरा गरीब असावा असे वाटते. तो आपल पेट्रोल पंपवरती फुले घेउन बसलेला असतो. मी वीकेन्डला वगैरे बसने, देवळात जाते. तेव्हा, ३ स्टॉप मुद्दाम चालत जाउन त्या गरीब विक्रेत्याकडुन फुले घेते व मगच बस पकडते.

>>>मागे मला या विषयावर बालसंगोपन विभागात चर्चेचा धागा सुद्धा काढायचा होता.
जरुर काढा.

तुमच्या वडिलांनी गरिबी समजून घेण्याची, पैसा किती कष्टाने येतो हे कळावे ही संस्कार परंपरा तुम्हाला दिली ती तुम्ही निभावली आणि अगदी अलगद तुमच्या मुलाला दिली...किती छान पालकत्व...

छान लिहिलयं! तुमची कळकळ पोहोचली. पण लेकराला रात्री गोष्ट सांगताना ती बोधप्रद असावी, तात्पर्य असावे असा आग्रह नका ठेवू. त्यातून लहान मुलाला रडू येइल असे काही तर टाळाच. त्यांना नीट सांगता येत नाही, आपण समजूत घालतो पण कुठेतरी हेल्पलेस, असुरक्षित वाटत रहाते. रात्री झोपण्यापूर्वीचा वेळ थोडा मजेचा पण शांतवणारा असु द्या.
मुलं आपल्या वागण्यातून शिकतात. आपण समाजासाठी जो वेळ किंवा पैसे दान करतो त्यात त्यांना सहभागी करुन घेतले तर गरीबीची जाणही येते आणि जोडीला आपण खारीचा वाटा उचल्याचे समाधानही. साध्या नेहमीच्या वापरातल्या नव्या वस्तू जसे की शैक्षणिक साहित्य, क्रेयॉन्स, गोष्टीचे पुस्तक, रोजच्या वापरातले मुलांना योग्य कपडे, अंग पुसायला पंचा/टॉवेल, अंतरवस्त्रे, पादत्राणे, साधी ग्रोसरी वगैरे गरजूंना देताना मुलांचा सहभाग असेल तर आपण जे गृहित धरतो त्याचाही किती अभाव आहे हे सहज पोहोचते.

धन्यवाद, कुमार१, धनवन्ती, दत्तात्रय साळुंके, स्वाती२, समाधानी!

@स्वाती२, झोपायच्या आधी हलक्या-फुलक्या गोष्टी सांगण्याबद्दलचा तुमचा मुद्दा विचार करण्यासारखा आहे.

@ स्वाती,
छान पोस्ट, योग्य मुद्दा. Noted.