रॉबर्ट फ्रॉस्ट यांच्या Stopping by woods on a snowy evening या कवितेचा भावानुवाद

Submitted by अस्मिता. on 24 December, 2023 - 18:56

Stopping by woods on a snowy evening

Whose woods these are I think I know.
His house is in the village, though;
He will not see me stopping here
To watch his woods fill up with snow.

My little horse must think it queer
To stop without a farmhouse near
Between the woods and frozen lake
The darkest evening of the year.

He gives his harness bells a shake
To ask if there is some mistake.
The only other sound’s the sweep
Of easy wind and downy flake.

The woods are lovely, dark and deep,
But I have promises to keep,
And miles to go before I sleep,
And miles to go before I sleep.

-----------

रॉबर्ट फ्रॉस्टची ही कविता सर्वांच्या परिचयाची आहे.
त्यांना ही कविता सुचली त्या काळात आर्थिक चणचणीमुळे आपल्या मुलांसाठी नाताळाला काही भेटवस्तू घेता आल्या नाही याचं त्यांना अपार दुःख झालं होतं. एक आपेशी पिता म्हणून टोचणी लागलेली असल्याने त्यांना आत्महत्येचे विचार यायला लागले पण त्यांनी हताश मनाला पुन्हा एकदा समजावून योग्य मार्गावर नेले. 

एक 'पृथ्वी' नावाचं गाव आहे म्हणे आणि तुम्ही तिथे काही काळ जाऊन आलात आणि परत आल्यावर कुणी विचारलं 'कसा वाटला अनुभव' तर तुम्ही जे काही सांगाल, तेच तुमचं जीवन. "नको जाऊस, फार तर एकदा जावू शकतोस , काय भाषा बोलतात काय माहीत मी तर जन्मभर चाचपडतच राहिलो, तिथलं मला काहीच जमलं नाही, यंत्र झाली आहेत सगळी-माणसं शोधूनही सापडत नाहीत, काय करायचेय जाऊन वेडेयत सगळे, मला माझ्यासारखं कुणीच सापडलं नाही म्हणून मी कायम एकटाच राहिलो....." . unrecommend करायला अनंत कारणं सापडतील, जगायला मात्र एकही कारण पुरेल... 'क्षण एक पुरे प्रेमाचा वर्षाव पडो मरणाचा' !

प्रत्येक माणूस मृत्यूचा विचार कधीनकधी करतच असतो. अनिश्चिततेचे सावट आलेल्या मनाला प्रचंड भीती किंवा एकदा कधीतरी हे सगळंच संपणार आहे याचा दिलासा ह्यापैकी काहीही वाटू शकतं. मृत्यूमुळे जीवन अर्थहीन आणि अर्थपूर्ण दोन्ही होतं. मरणाची भीती नसती तर कदाचित आईलाही अपत्याची काळजी वाटली नसती. अर्थहीनतेत आपण समर्पित राहू शकत नाही म्हणून त्याला अर्थपूर्ण समजून पूर्ण झोकून देऊन कर्म करत रहाणं हेच उचित आहे. आता आलोच आहोत तर देऊ शंभर टक्के, वाघ म्हटलं तरी खाणार आणि वाघोबा.....

 निराशेच्या गर्तेत पुन्हापुन्हा जाणाऱ्या मनाला अवखळ घोड्यासारखी तीच-ती झापडं वारंवार लावून कर्माकडे वळवायचं हाच कवितेचा आशय आहे. अतिशय साधे शब्द आणि जीवघेणा गहन अर्थ. अन्वयार्थ किंवा भावानुवाद हा आपण किती वेदना आणि सुख बघितलं आहे, त्या परवशतेच्या दऱ्या-गर्ता, त्या आनंदाच्या- यशाच्या टेकड्या- ती उन्मादाची शिखरं या दोन्ही मधलं बेफाम अंतर, तोच आपला एखाद्या कलाकृतीकडे बघायचा दृष्टिकोन..! 

सरळ रेषेतलं जीवन हवंय कुणाला, अर्थ समजून घेण्यासाठी कड्यावरून उडी मारायची तयारी ठेवायची पण मरायचं नाही. अश्वत्थाम्यासारख्या चिरंतन काळापासून भळभळणाऱ्या अमर्त्य वेदनेचे दोन क्षण अनुभवायला झोकून द्यावंचं लागतं. असाही काय अर्थ आहे नाही तर.... कशालाच. 

हे कुणाचं 'अरण्य' आहे कोण जाणे, घटकाभर बसायला गेलं तर मेलं ओढ लावतंय. मी गुपचूप आलो तर कळेल का कुणाला, देव करो आणि कुणाच्या लक्षातही येऊ नये. सगळीकडे हिमवर्षाव झाला आहे, दूरदूरपर्यंत कुणी नाही. मी असं तडक कुठल्याही बाजारी न थांबता- न भुलता इथं येणं आणि या तरुंकडे हरवल्यासारखं एकटक बघणं ह्या माझ्या घोड्याला विचित्र वाटतंय बहुदा. गोठलेलं तळंही जवळंच.

त्याला काय कळणार या अरण्याची ओढ, ती निष्पर्ण तरुंची राई, आयुष्यातील सगळ्यात काळीकुट्ट संध्याकाळ वाटावी अशा या त्यांच्या दूरपर्यंत पसरलेल्या भयभीत करणाऱ्या संध्याछाया. आजची रात्र इतकी गर्द-गर्द की वाटावे या रात्रीची सकाळ कधी होणारच नाही. जिथून आलो तिथं जायचा मोह अधूनमधून होतोच. 'झाडांशी निजलो आपण झाडांत पुन्हा उगवाया....'

किती गूढ-गहिरं अरण्य आहे हे, का खुणावतंय मला. कुठं संपतं का असंच क्षितिजापर्यंत जातं कळत नाही, अंतच नाही की काय याचा. आत पाऊल ठेवलेला माणूस परत आलेला बघितलंय का कुणी. थांबवा रे कुणीतरी या संमोहनाला..!

माझ्याच शंकाकुशंका, अपयश, अपेक्षाभंग, निराशा, टोचणी यांची पेरलेली बीजं आकाशाला भिडणारी वृक्षं कधी झाली कळलंच नाही. असंख्य बीजांची दाट झाडी. इतकी उंच की प्रकाशाचा मागमूस नाही. फक्त काळोख... ओळखीचा. हे घोडं आणि त्याच्या घंटीची किणकिण. थंड वाऱ्याची कुजबूज , भुरभुरणारं बर्फ ... निःशब्द शांतता पसरली आहे. ह्या विश्वात फक्त मीच आहे जणू. गूढगर्भातून चिरनिद्रेच्या अनाहूत हाका. जन्मोजन्मी ज्याची प्रतिक्षा केली तीच व्याकुळता घेऊन पुन्हापुन्हा काळजात खंजीर खुपसायला तयार.

हे घोडंही जणू मोठी चूक झाल्यागत बघायला लागलंय. आपण ही अंधाराची लक्तरं घेऊन परतच जावं हेच खरं. अरण्य कुठं जाणार... ते असंच उभं... नित्य... शाश्वत. तीच निष्पर्ण तरुंची राई. तूच वाट बघ बाबा. अरण्या, तू विलक्षण मोहक आहेस खरा, पण दिल्याघेतल्या अपूर्ण वचनांची काळजातली खिंडारं घेऊन मी काही येत नाही आता... अजून पुष्कळ काही करायचं आहे. सहस्र स्वप्नांची आणि समर्पणाची पूर्तता होईपर्यंत तू वाट बघ 'चिरनिद्रेच्या अरण्या'... तू वाट बघ... पुष्कळ मोठा पल्ला गाठायचाय... आता तूच वाट बघ माझी. 

©अस्मिता

-----
*संदर्भ- मूळ कविता-
Stopping by Woods on a Snowy Evening
https://www.poetryfoundation.org/poems/42891/stopping-by-woods-on-a-snow...

* मला कवी ग्रेस यांची 'भय इथले संपत नाही' ही कविता अन्वयाने या कवितेच्या जवळ जाणारी वाटते. योगायोगाने 'चंद्रमाधवीचे प्रदेश' या काव्यसंग्रहातील या कवितेचे मूळ शीर्षकही 'निष्पर्ण तरुंची राई' आहे. हे मला लेख लिहून झाल्यावर संदर्भासाठी शोधाशोध करताना सापडले आणि अवचित काही तरी गवसल्याचा आनंद झाला.
https://marathikavitaa.wordpress.com/2007/12/01/%E0%A4%AD%E0%A4%AF-%E0%A...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख रसग्रहण.
इथे रसग्रहण फार गहन केलेले असले तरी.>>>>>> अगदी पहिल्यांदा हे पटलंच.कविता वाचताना सोपी वाटली. मात्र पहिल्या ओळींतून खिन्नता जाणवत होती.शेवटच्या तीन ओळी तर ठोसा मारल्याचे काम करतात.

र आंचे प्रतिसादही मस्त.

सुंदर रसग्रहण!
प्रतिसाद सुद्धा छान आहेत.
मूळ कविता एखाद्या चित्रासारखी आहे. एका जुन्या रशियन मूवीत सायबेरिया मधलं शुटिंग होतं. तसं चित्र डोळ्यासमोर आलं.
अशा चित्रावर कविता लिहाविशी वाटतेय. Happy

अस्मिता, लेख आवडला . ही कविता मनात घर करुन राहिलेली आहे. त्यामुळे की काय जास्त आवडला.

स्वाती आंबोळे यांचा प्रतिसादही मार्मिक आहे

अस्मिता, सुंदर लेख!
र आ आणि स्वाती आंबोळे यांचे प्रतिसादही आवडले.

आज निवांत वाचला हा धागा. अस्मिता, छान रसग्रहण केले आहेस. ही कविता आवडती आहेच. अजून जास्त आवडली. नवीन वर्षाच्या उंबरठयाशी नव्या उमेदीचं गाठोडं हातात दिलंस बघ!

धन्यवाद देवकी तै, रानभुली, जाई आणि रमड. Happy

अशा चित्रावर कविता लिहाविशी वाटतेय. >>> लिही नक्की. कल्पना आवडली आहे. मलाही शब्द भावनांसारखे आणि भावना चित्रांसारख्या स्पष्ट जाणवतात, त्यामुळे खरंच आवडली. Happy

नवीन वर्षाच्या उंबरठयाशी नव्या उमेदीचं गाठोडं हातात दिलंस बघ!>>> हे वाचून भरूनच आलं. /\

इतके दिवस खूप गहन , उलथापलथ करणारं काही वाचायचं टाळत होतो. मूळ लेखाव रून नजर फिरवली होती. प्रतिसाद वाचत होतो. आता कवितेचा भावानुवाद , किंवा जे काही आहे ते संपूर्ण वाचलं. मग कविता पुन्हा वाचली. मला हा लेख ती कविता वाचल्यानंतर मनात उभ्या राहिलेल्या नाट्याचं शब्दांकन वाटलं. लेखिकेला जशी ही कविता दिसली, तशी मला दिसत नाही. अर्थात ते इंटरप्रिटेशनही फार सुंदर, गहन झालं आहे. मला या कवितेत जीवन मृत्यूचं नाट्य न दिसता आयुष्यातला एक आव्हानात्मक कालखंड दिसतो. याचं उत्तर/कारण स्वातींच्या प्रतिसादात आलंच आहे. मला woods म्हणजे अरण्य वाटलं नाही, बन वाटलं. स्वातींनी या कवितेवर जे लिहिलं ते अधिक जवळचं वाटलं.

शेवटच्या कडव्यात ते बन lovely, dark and deep असल्याचं म्हटलंय. त्यावरून ना घ. देशपांडेंची कविता आठवली.
मन पिसाट माझे अडले रे
थांब जरासा
वनगान रान गुणगुणले रे
दूरात दिवे मिणमिणले रे
मधुजाल तमाने विणले रे
थांब जरासा

ही खाली हिरवळ ओली
कुजबुजून बोलू बोली
तिमिराची मोजू खोली रे
थांब जरासा

नुसतेच असे हे फिरणे रे
नुसतेच दिवस हे भरणे रे
नुसतेच नको हुरहुरणे रे
थांब जरासा.

याही कवितेत वन आहे, जरासं थांबणं आहे, तिमिर आहे, पण तो भयाण नाही. ही प्रेमकविता वाटते आणि अंधार हा प्रेमिकांचा पाठीराखा.

या कवितेच्या शेवटच्या चार पंक्ती नेहरूंनी आपल्या शेवटच्या दिवसांत स्वहस्ते लिहून काढून आपल्या मेजावर तो कागद ठेवला होता. या माहितीची खातरजमा करताना हरिवंशराय बच्चन यांनी या कवितेचा अनुवाद केल्याचं कळलं.

स्वाती आणि भरत यांनी मूळच्या सुंदर लेखाला चार चांद लावलेले आहेत. दोघांनीही व्हॅल्यु अ‍ॅड प्रतिसाद दिलेत. नुसतच छान छान नाही. अर्थात फक्त छान छान सुद्धा हवेतच. पण मला हे विस्तृत प्रतिसाद आवडतात.

हरिवंशराय बच्चन यांनी या कवितेचा अनुवाद केल्याचं कळलं.
>>>>>>>

गहन सघन मनमोहन वन तक मुझको आज बुलाते हैं
किन्तु किये जो वादे मैंने याद मुझे आ जाते हैं
अभी कहाँ आराम बदा, यह नेह-निमंत्रण छलना है
अरे अभी सोने से पहले मुझको मीलों चलना है
अरे अभी सोने से पहले मुझको मीलों चलना है

–हरिवंश राय बच्चन
https://avinashkishoreshahi.wordpress.com/2012/02/01/the-woods-are-lovel...

लेखिकेला जशी ही कविता दिसली, तशी मला दिसत नाही. अर्थात ते इंटरप्रिटेशनही फार सुंदर, गहन झालं आहे
>>> धन्यवाद भरत. Happy
वेगवेगळी आकलनं वाचणं हा सुद्धा एक सुरेख अनुभव आहे. प्रत्येक मन म्हणजे एक आरसाच. घटकाभर पडलेली वेगवेगळी प्रतिबिंब बघणं सुद्धा आनंददायी आहे. तुमची पोस्ट अतिशय आवडली.

मला woods म्हणजे अरण्य वाटलं नाही, बन वाटलं. >>> Happy हे (आणि वरचंही सगळं) सहज लिहीलं आहे, स्पष्टिकरण म्हणून नाही.

मला बन निबिड वाटत नाहीत. छोटी झुडपे आणि पायवाटा आणि मध्येच झाडी असं काही तरी डोळ्यासमोर येते. जसं वृंदावन. त्यामुळे ते 'डार्क आणि डीप' शब्दांशी जुळणारं असं नाही वाटलं. Woods म्हटलं की निष्पर्ण, उंच व जवळजवळ असणारी झाडी जी परदेशात जास्त आढळते, तेच डोळ्यासमोर येते. डिसेंबरमधली सगळ्यात दीर्घ रात्र आहे, त्यावेळी पानगळ होऊन झाडं निष्पर्ण होऊन गेलेली असतात. तुमची कविताही आवडली, तीन वेळा वाचली. 'तिमिराची मोजू खोली रे' ओळी फारच उत्कट. मनापासून आभार. माझ्या 'तिमिराची खोली' फारच खोल आहे बहुतेक. Happy

अस्मिता, प्रतिसाद आवडला. मी तिथले वुड्स प्रत्यक्ष पाहिलेले नाहीत. तुम्ही पाहिलेत. त्यामुळे फरक पडणार. हे लिहिताना असंही वाटलं, की तुम्ही अन्य देशातून तिथल्या निसर्गाची रूपं पाहत तयार झालेल्या नजरेने ती वुड्स पाहिली. रॉबर्ट फ्रॉस्ट बहुधा तिथेच जन्मलेला , वाढलेला. त्याची त्या वुड्स कडे पाहणारी नजर आणखी वेगळी असेल.

ना घ देशपांड्यांच्या त्या कवितेचं गीत झालं आहे. गायिका कृष्णा कल्ले. संगीत यशवंत देव.

पंडित नेहरूंच्या संदर्भातच या कवितेची पहिली ओळख झाली होती. मला वाटते शालेय पाठ्यपुस्तकात नेहरूंचा (कि नेहरूंवर) एक धडा होता त्यात या कवितेच्या ओळी पहिल्यांदा वाचनात आल्या होत्या. भरत यांच्या प्रतिसादात त्याचा उल्लेख आला आहे त्याबाबत सहमत. पण नेहरूंना ती कविता इतकी का भावली होती हे तितकेसे कळले नव्हते. हे रसग्रहण वाचल्यानंतर Woods चा अभिप्रेत अर्थ कळला आणि वाचताना आपसूकच 'ओह्ह्ह!' असे उद्गार निघाले. प्रतिसाद सुद्धा एक एक खूप छान व अर्थगर्भ आहेत. त्या कवितेचा इतका सुंदर आणि गहन अर्थ असेल असे कधीच वाटले नव्हते.

>> शंकाकुशंका, अपयश, अपेक्षाभंग, निराशा, टोचणी यांची पेरलेली बीजं आकाशाला भिडणारी वृक्षं कधी झाली कळलंच नाही. असंख्य बीजांची दाट झाडी. इतकी उंच की प्रकाशाचा मागमूस नाही. फक्त काळोख...

हे खूप भिडले. अंतर्मुख करणारे तितकेच प्रेरणादायीसुद्धा आहे. जंगल भयाण आहे. गोठलेल्या डिसेंबर मधली रस्त्यावरची भीषण एकाकी रात्र. अशा कविता स्फुरण्याच्या अथवा त्या भिडण्याच्या अवस्थेस पोहोचलेल्या मनाने, आयुष्याच्या प्रवासात असताना सुद्धा अशा 'रात्री' कधी ना कधी अनुभवलेल्या असतात. विशेष हे कि जंगल इतके भीषण असूनही तिथे थांबायला त्यास हवेसे वाटते Happy समज गैरसमज, त्यातून दुरावलेली नाती, अनेक आघाड्यांवर आलेली निराशा, सारे सोबती असून नसल्यासारखे झाल्यावर आलेले टोकाचे एकाकीपण इत्यादी एक ना अनेक टक्केटोणपे खाल्ल्यावर गोठलेले भयाण जंगल सुद्धा आकर्षक वाटते. या सगळ्याकडे स्थितप्रज्ञतेने पहायला शिकवते. दूर दूर दूर घेऊन जाते.

नकोच आता नवीन नाती,
नकोच स्वप्ने हवी कोणा ती?

पण होय! कर्तव्ये तर करायलाच हवीत. पार पाडायलाच हवीत. "But I have promises to keep" Happy इतके कटू अनुभव आल्यावर हे तसे अवघडच! पण तिथेच खूप सारी तत्वज्ञाने कामी येतात. मनाची परिपक्वता कामी येते. श्वासांवर लक्ष केंद्रित करून जाणायेणाऱ्या विचारांकडे त्रयस्थपणे पहायला हेच जंगल तर शिकवते. मग उर्जा येते. मरणाच्या थंडीत काकडलेला निसर्ग जगण्याची उर्जा देऊन जातो.

And miles to go before I sleep,
And miles to go before I sleep.

इतकी गहन कविता शाळेच्या पुस्तकात असण्यावरुन मला एक दुसरे उदाहरण आठवले. "दुधावरची साय" नावाचा एक धडा इयत्ता चौथीच्या मराठी पाठ्यपुस्तकात होता. आणि तोच धडा तेंव्हा मराठी बी.ए. च्या पुस्तकात सुद्धा होता. प्रश्न मात्र वेगळे असायचे. चौथीच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्न असायचा,
"आजी आपल्या नातीला जवळ घेऊन कोणते उद्गार काढते?" मग मुले उत्तर लिहित "दुधापेक्षा दुधावरच्या सायीला जपावे लागते"
तेच बीए च्या प्रश्नपत्रिकेत मध्ये मात्र प्रश्न असे "आजी आपल्या नातीला जवळ घेऊन 'दुधापेक्षा दुधावरच्या सायीला जपावे लागते' असे उद्गार का काढते ते स्पष्ट करा" Lol

तुमचे म्हणणे बरोबर आहे. कविता, चित्रकला वगैरे (Artform in general) हे व्यक्तीसापेक्ष वाटते मला. पण माझे स्वत:चे आकलन चौथीच्या विद्यार्थ्यांप्रमाणे असते. Occam's razor प्रमाणे मी सुटसुटीत स्पष्टीकरण शोधतो. त्यामुळे मला अध्यात्म दिसत नाही. ही माझ्या समजूतीची मर्यादा.

माझ्या आकलनानुसार
Stopping by Woods on snowy evening
Whose woods these are I think I know.
His house is in the village though;
He will not see me stopping here
To watch his woods fill up with snow.

कवी जंगलातून चालता चालता थांबलाय. विचार करतोय की हे जंगल कुणाचे आहे? मला कदाचित माहीत आहे. पण तो मालक तर दूर कुठेतरी रहातो. मी इथे थांबलोय ते तर त्याला कळणार नाही. (मला इथे कवी हा अतिशय एकाकी आहे, असे वाटते. धार्मिक वृत्तीच्या लोकांना कदाचित असे वाटेल की त्याला देवाची आठवण येत आहे, हे जंगल देवाच्या मालकीचे आहे वगैरे वगैरे.)

My little horse must think it queer
To stop without a farmhouse near
Between the woods and frozen lake
The darkest evening of the year.

माझा घोडा पण माझ्या इथे थांबण्याने अचंबित झाला आहे की मी इथे अचानक का थांबलो, आजूबाजूला एकही घर नसताना, सोबतीला फक्त गोठलेला तलाव आहे, अतिशय थंडीची भयाण रात्र आहे, तरीही कवी का थांबला आहे इथे? (पण मला हे निसर्गाचे शांत, एकाकी रूप आवडते, निसर्गाच्या सान्निध्यात, मला इथे एक प्रकारची शांतता मिळते)

He gives his harness bells a shake
To ask if there is some mistake.
The only other sound’s the sweep
Of easy wind and downy flake.

माझा घोडा माझ्या या अवचित वागण्याने गोंधळून गेला आहे. तो मान हलवून, त्याच्या गळ्यातल्या घंटा वाजवून मला विचारतोय की माझी काही चूक झाली आहे का? तू अचानक इथे का थांबलास? ( पण त्याला कसे कळणार की मला इथे निसर्गाच्या सान्निध्यात आवडते जिथे शांतता आहे, फक्त मंद असा वारा वहात आहे)

The woods are lovely, dark and deep,
But I have promises to keep,
And miles to go before I sleep,
And miles to go before I sleep.

कुणाला कसे कळणार की हा निसर्ग इतका सुंदर आहे कारण तो इतका शांत, एकाकी आणि धीरगंभीर आहे. मला या निसर्गासोबत अजून थोडा वेळ घालवायला आवडेल. पण काय करणार, माझ्यावर जबाबदाऱ्या आहेत त्यामुळे इच्छा असूनही मला इथे थांबता येणार नाही. मला आयुष्यात पुढे जावेच लागेल, माझी इच्छा असो वा नसो तरीही. पण माझी खात्री आहे की मला एकदा (कायमची) झोप लागली की या निसर्गाशी एकरूप होता येईल.

तळटीप:
Sometimes, last paragraph is written as:
The woods are lovely, dark, and deep. (With Oxford comma)

Robert Frost meant to write:
The woods are lovely, dark and deep. (Without Oxford comma) He meant that the woods are lovely because they are dark and deep. When Oxford comma is used, the comma changes the meaning, to convey a meaning that the woods are lovely and dark and deep.
That's not what Robert Frost intended.

https://crisiscribnotes.substack.com/p/the-oxford-comma-is-provocative-r...

Occam's razor प्रमाणे मी सुटसुटीत स्पष्टीकरण शोधतो. त्यामुळे मला अध्यात्म दिसत नाही. हा माझा दोष. >> दोष कसला त्यात ? पहिली दुसरीला रामायणातल्या गोष्टी असायच्या. त्या काही पहिलीच्या मुलांना एकपत्नीव्रताचे महत्व सांगण्यासाठी नसणार. उद्देश वेगळा.

इथेच अ तुलजींचा प्रतिसाद एखाद्याला प्रगल्भ वाटेल. तर दुसर्‍या कुणाला त्यातून भलताच आनंद होईल.
"चला नेहरू तर आले, आता सावरकर, गांधी, गोडसे यायला कितीसा वेळ ? मग यांनी मोदी, शहा काढले कि आम्ही राहुल गांधी, शरद पवार आणतोच" मग या धाग्यावर रणांगण पेटून वुड्सचे कुरूक्षेत्र व्हायला जराही वेळ लागणार नाही. आणि अजून एक धागा या कुरूक्षेत्रावरच्या यज्ञात आहुती म्हणून बळी पडल्याचे अध्यात्मिक समाधान काहींना लाभू शकते.

थोडक्यात दृष्टी वेगवेगळी असते. हेतू वेगवेगळे असतात. अनुभूती वेगवेगळी असते. कवितेचं असंच असतं.
तरूण आहे रात्र अजुनी हे एखाद्याला शृंगारिक गीत वाटू शकते, एखाद्याला विरहगीत, एखाद्याला आणखी काही तर संन्यास घेतलेल्या एखाद्या स्वामीला त्यात अध्यात्म/ मृत्यूगीत / शोकगीत दिसू शकेल.

>>> तरूण आहे रात्र अजुनी हे एखाद्याला शृंगारिक गीत वाटू शकते…
यांना सांगा Lol

मस्त प्रतिसाद आहेत सगळेच, वाचते आहे. Happy

स्वातीजी Lol

कुणाला कसे कळणार की हा निसर्ग इतका सुंदर आहे कारण तो इतका शांत, एकाकी आणि धीरगंभीर आहे. मला या निसर्गासोबत अजून थोडा वेळ घालवायला आवडेल. >>> कविताच नाही तर अ‍ॅब्स्ट्रॅक्ट आर्ट कडे बघताना सुद्धा तुम्ही मनाच्या कोणत्या स्थितीत आहात यावर बरेच काही ठरते. माझ्या मित्राने मानसशास्त्राच्या अनेक टेस्ट्स बनवलेल्या आहेत. त्यात ठराविक प्रतिमा येतात. समुद्राचे कोणते रूप आवडते यावरून सुद्धा तुमच्या मानसिक स्थितीचा पॅटर्न ठरत असतो.

अस्मिता,माफ करा, खूपच विषयांतर होतेय, तुम्ही तुमचा धागा काढा वेगळा असे फर्मान सुटणार नाही या विश्वासावर लिहीतोय.

एक चित्र आहे जे पूर्णपणे कृष्णधवल आहे. त्यात एक महिला डोक्यावर सरपण घेऊन चाललेली आहे. खिडकीतून एक वृद्ध तिच्याकडे बघतोय , ज्याच्या नजरेत नैराश्य आहे. खिडकीच्या छज्जात एक कावळा अहे. हा कावळा एकच ऑब्जेक्ट आहे जो निळ्या रंगात आहे. या चित्राचे जितके अर्थ लावले गेले ते सगळे बरोबर आहे असे त्याने जाहीर केले. प्रत्येक जणाला ते चित्र पाहून जी अनुभूती येते ती त्याच्यापुरती सत्य असते. त्यातून मानसिक स्थिती समजते.

अ‍ॅब्स्ट्रॅक्ट आर्ट कडे बघताना सुद्धा तुम्ही मनाच्या कोणत्या स्थितीत आहात यावर बरेच काही ठरते. >> थोडासा, काहीसा, बराचसा असहमत. चित्र बघितले की १०-१५ सेकंदात मी सांगू शकतो की चित्र आवडले की नाही. आता का आवडले किंवा नाही आवडले ते सांगू शकणार नाही कदाचित. Art आणि त्याचे विश्लेषण हा कदाचित वेगळ्या धाग्याचा विषय आहे, वेगळा धागा काढतो.

एखादी कविता, चित्र याचा अर्थ मूळ कवी, चित्रकार जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत प्रत्येक रसिकाचा अर्थ हा त्या त्या कलाकृतीपुरता खरा असतो. - ना घ देशपांडे.
कविता समजून घ्यायला सुद्धा प्रतिभा लागते- सुरेशचंद्र पाध्ये.

प्रत्येक रसिकाचा अर्थ हा त्या त्या कलाकृतीपुरता खरा असतो. >> सहमत

कविता समजून घ्यायला सुद्धा प्रतिभा लागते- सुरेशचंद्र पाध्ये.
>>
Lol Holier than thou ही वृत्ती बऱ्याच कलाकारांमध्ये दिसते बऱ्याचदा.

आचार्य, प्लीज माफी मागू नका. तुम्हाला जे योग्य वाटलं ते लिहा. मी कधीही पॅसिव्ह अग्रेसिव्ह लिहीत नाही, नेहमी सरळ, थेट आणि सुस्पष्ट लिहायचा प्रयत्न असतो. बिनधास्त लिहा. आवडेलच मला. Happy

वाचतेय अजून, तुम्हाला मोकळं करायला गडबडीने प्रतिसाद दिला, कारण क्षण निसटून जायचा Happy

>> अर्थ मूळ कवी, चित्रकार जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत प्रत्येक रसिकाचा अर्थ हा त्या त्या कलाकृतीपुरता खरा असतो

ह्याप्रमाणे जायचे तर मग "तरुण आहे रात्र" बाबत आता रसिकांना मुभा नाही. कारण ह्रदयनाथ मंगेशकरांनी इतर दरवाजे बंद करून टाकलेत.

कविता विश्लेषण हा माझा प्रांत नाही. मलाही सरळसोट अर्थच आवडतात. 'शी वॉक्स इन ब्युटी' चा तीन प्रतलांवरती, चतुर्थ मिती वगैरेचा धागा मी काढलेला तेही त्या कवितेचे एक इंग्रजी विश्लेषण वाचून. नंतर पश्चत्ताप झालेला बिकॉज आय वीझ्न्ट ट्रु टु मायसेल्फ. आय वॉज प्लेयिंग टु द ऑडियन्स. जे की अनेक पातळ्यांवरती चूकीचे आहे. तेव्हा नंतर मी या सखोल विश्लेषणाच्या वाटेला गेले नाही. जे आहे ते सरळ सरळ आवडले तरच कविता आवडते Sad मर्यादा म्हणा.

पण ज्यांना विश्लेषण आणि विविध अर्थ एकाच कलाकृतीत दिसतात त्यांच्याबद्दल आदर आहेच. 'घन तमी शुक्र बघ' ही मृत्युशी संबंधित कविता आहे हे मला विशाल कुलकर्णी यांचा हा धागा वाचुन कळलेले.

मना, वृथा का भिशी मरणा ?
दार सुखाचे हे हरीकरुणा
आई पाहे वाट रे मना
पसरुनी बाहू, कवळण्या उरी

--------------------
अता तुच भय-लाज हरी रे !
धीर देउनी ने नवरी रे :
भरोत भरतिल नेत्र जरी रे !
कळे पळभर मात्र ! खरे घर ते !
तेव्हाही अचंबित झालेले व ते विश्लेषण फारच आवडलेले स्मरते. तसेच काहीसे 'वुडस आर लव्हली, डार्क अँड डीप' बद्दल झालेले आहे. तेव्हा विश्लेषणाची गोडी लागली नाही तरी आनंद जरुर घेता येतो.

बाकी आईने पूर्वी कानावरती घातलेले - 'लागा चुनरीमे दाग, छुपऊं कैसे ....' हे अध्यात्मिक गाणे आहे म्हणुन. ती अशा कवितांची पहीली ओळख होती. ज्यांचा अर्थ जास्त खोल असतो, मनस्वी आणि गूढ असा असतो.

Holier than thou ही वृत्ती बऱ्याच कलाकारांमध्ये दिसते बऱ्याचदा.
>>> पण एखाद्याला Holier than thou वाटेल म्हणून दुसऱ्याने आपल्या अभिव्यक्तीला दामटून कशाला बसवायचं. Writing should be liberating not limiting your self expression. Happy कलाकृतीबाबत दृष्टिकोनातला हा टोकाचा वास्तववाद मला Holier than thou वाटतो. 'Let's make everything REAL and suck the fun out of it' type... Lol

'लागा चुनरीमे दाग, छुपऊं कैसे ....' हे अध्यात्मिक गाणे आहे >> वकिली खोडा ऐकलाय का ? तसा हा मायबोलीव खोडा आहे. Lol
या गाण्याचा अर्थ अध्यात्मिक असू शकतो हे मान्य. लहान असताना ते शास्त्रीय आणि पवित्र गाणं वाटायचं.

सामोजी, थांबणार होतो, पण आता करण्यासारखं पण काही नाही. दुसरा धागाही दिसत नाही झपाटायला Lol
सरळसोट अर्थ आवडणे मस्तच आहे. तुम्ही रसग्रहण करता. कविता वाचल्यावर शब्द सुंदर आहेत, गेयता आहे, यमक आहे,अनुप्रास आहे हे सरळसोट विश्लेषण सुद्धा सुंदरच. पण गहन अर्थ लागणे हा खेळ आहे. त्या खेळाची पण मजा लुटता यायला पाहिजे. चित्राचं पण असंच आहे.

कविता ही मुळातच संतांच्या, अध्यात्मिक लोकांच्या ताब्यात होती. कवितेचा इतिहास पाहिला तर पद्यात लिहीलेले महाकाव्य हे सरळसोट कथाकथन एकीकडे. दुसरीकडे वेद आणि अन्य संस्कृत श्लोकातले पद्यात्मक प्रतिमा वापरलेले साहित्य. प्रतिमांचा वापर करून लिहीण्याची पद्धत एव्हढी प्राचीन आहे. त्यामुळेच अर्थ लावताना फसगत पण होते. पुढे अध्यात्मात प्रतिमांचे अर्थ ठरत गेले. निळा रंग मृत्यूचा, ज्ञानाचा , काही तत्त्वज्ञानात अजून वेगळा.

या गूढार्थाचा वापर करून चित्रं, कविता समोर येतात, तेव्हां त्याची जाण असलेल्याला ते उलगडते. इतरांना त्या प्रतिमा पाहताना त्यांच्या आयुष्यात त्या प्रतिमेचा झालेला इंपॅक्ट जास्त महत्वाचा असतो. ज्याची त्याची जडणघडण जशी असेल तसे तो बघेल. म्हणून त्या मानसशास्त्रज्ञाने चित्राचे सर्वांचे अर्थ मान्य केले. त्यातून अर्थ लावणारा अध्यात्मिक ओढा असणारा आहे का, रसिक आहे का ही ओळख त्याला समजली.

एखाद्याला आवडलेलं पुस्तक, सिनेमा, नाटक दुसर्‍याला अजिबात आवडू शकत नाही. दोघांच्या आवडीचा रिस्पेक्ट झालाच पाहिजे. पार्श्वभूमी, अनुभव, अनुभूती, जडणघडण याचा प्रभाव पडत असतो. आणि काही कलाकृती सर्वांना अपील होऊ शकतात , काही कुणालाच अपील होत नाही.

आचार्य, फार इंट्रेस्टींग प्रतिसाद दिला आहे.
अतुल, छान पोस्ट. नेहमीप्रमाणे सार लिहीलं आहे लेखाचं. Happy
दुसरी पोस्ट Lol
स्वाती Lol
आचार्य, धमाल आणि नेमकं.
दुसरा धागाही दिसत नाही झपाटायला >>> Lol
Mi casa es tu casa...! Happy

Pages