रॉबर्ट फ्रॉस्ट यांच्या Stopping by woods on a snowy evening या कवितेचा भावानुवाद

Submitted by अस्मिता. on 24 December, 2023 - 18:56

Stopping by woods on a snowy evening

Whose woods these are I think I know.
His house is in the village, though;
He will not see me stopping here
To watch his woods fill up with snow.

My little horse must think it queer
To stop without a farmhouse near
Between the woods and frozen lake
The darkest evening of the year.

He gives his harness bells a shake
To ask if there is some mistake.
The only other sound’s the sweep
Of easy wind and downy flake.

The woods are lovely, dark and deep,
But I have promises to keep,
And miles to go before I sleep,
And miles to go before I sleep.

-----------

रॉबर्ट फ्रॉस्टची ही कविता सर्वांच्या परिचयाची आहे.
त्यांना ही कविता सुचली त्या काळात आर्थिक चणचणीमुळे आपल्या मुलांसाठी नाताळाला काही भेटवस्तू घेता आल्या नाही याचं त्यांना अपार दुःख झालं होतं. एक आपेशी पिता म्हणून टोचणी लागलेली असल्याने त्यांना आत्महत्येचे विचार यायला लागले पण त्यांनी हताश मनाला पुन्हा एकदा समजावून योग्य मार्गावर नेले. 

एक 'पृथ्वी' नावाचं गाव आहे म्हणे आणि तुम्ही तिथे काही काळ जाऊन आलात आणि परत आल्यावर कुणी विचारलं 'कसा वाटला अनुभव' तर तुम्ही जे काही सांगाल, तेच तुमचं जीवन. "नको जाऊस, फार तर एकदा जावू शकतोस , काय भाषा बोलतात काय माहीत मी तर जन्मभर चाचपडतच राहिलो, तिथलं मला काहीच जमलं नाही, यंत्र झाली आहेत सगळी-माणसं शोधूनही सापडत नाहीत, काय करायचेय जाऊन वेडेयत सगळे, मला माझ्यासारखं कुणीच सापडलं नाही म्हणून मी कायम एकटाच राहिलो....." . unrecommend करायला अनंत कारणं सापडतील, जगायला मात्र एकही कारण पुरेल... 'क्षण एक पुरे प्रेमाचा वर्षाव पडो मरणाचा' !

प्रत्येक माणूस मृत्यूचा विचार कधीनकधी करतच असतो. अनिश्चिततेचे सावट आलेल्या मनाला प्रचंड भीती किंवा एकदा कधीतरी हे सगळंच संपणार आहे याचा दिलासा ह्यापैकी काहीही वाटू शकतं. मृत्यूमुळे जीवन अर्थहीन आणि अर्थपूर्ण दोन्ही होतं. मरणाची भीती नसती तर कदाचित आईलाही अपत्याची काळजी वाटली नसती. अर्थहीनतेत आपण समर्पित राहू शकत नाही म्हणून त्याला अर्थपूर्ण समजून पूर्ण झोकून देऊन कर्म करत रहाणं हेच उचित आहे. आता आलोच आहोत तर देऊ शंभर टक्के, वाघ म्हटलं तरी खाणार आणि वाघोबा.....

 निराशेच्या गर्तेत पुन्हापुन्हा जाणाऱ्या मनाला अवखळ घोड्यासारखी तीच-ती झापडं वारंवार लावून कर्माकडे वळवायचं हाच कवितेचा आशय आहे. अतिशय साधे शब्द आणि जीवघेणा गहन अर्थ. अन्वयार्थ किंवा भावानुवाद हा आपण किती वेदना आणि सुख बघितलं आहे, त्या परवशतेच्या दऱ्या-गर्ता, त्या आनंदाच्या- यशाच्या टेकड्या- ती उन्मादाची शिखरं या दोन्ही मधलं बेफाम अंतर, तोच आपला एखाद्या कलाकृतीकडे बघायचा दृष्टिकोन..! 

सरळ रेषेतलं जीवन हवंय कुणाला, अर्थ समजून घेण्यासाठी कड्यावरून उडी मारायची तयारी ठेवायची पण मरायचं नाही. अश्वत्थाम्यासारख्या चिरंतन काळापासून भळभळणाऱ्या अमर्त्य वेदनेचे दोन क्षण अनुभवायला झोकून द्यावंचं लागतं. असाही काय अर्थ आहे नाही तर.... कशालाच. 

हे कुणाचं 'अरण्य' आहे कोण जाणे, घटकाभर बसायला गेलं तर मेलं ओढ लावतंय. मी गुपचूप आलो तर कळेल का कुणाला, देव करो आणि कुणाच्या लक्षातही येऊ नये. सगळीकडे हिमवर्षाव झाला आहे, दूरदूरपर्यंत कुणी नाही. मी असं तडक कुठल्याही बाजारी न थांबता- न भुलता इथं येणं आणि या तरुंकडे हरवल्यासारखं एकटक बघणं ह्या माझ्या घोड्याला विचित्र वाटतंय बहुदा. गोठलेलं तळंही जवळंच.

त्याला काय कळणार या अरण्याची ओढ, ती निष्पर्ण तरुंची राई, आयुष्यातील सगळ्यात काळीकुट्ट संध्याकाळ वाटावी अशा या त्यांच्या दूरपर्यंत पसरलेल्या भयभीत करणाऱ्या संध्याछाया. आजची रात्र इतकी गर्द-गर्द की वाटावे या रात्रीची सकाळ कधी होणारच नाही. जिथून आलो तिथं जायचा मोह अधूनमधून होतोच. 'झाडांशी निजलो आपण झाडांत पुन्हा उगवाया....'

किती गूढ-गहिरं अरण्य आहे हे, का खुणावतंय मला. कुठं संपतं का असंच क्षितिजापर्यंत जातं कळत नाही, अंतच नाही की काय याचा. आत पाऊल ठेवलेला माणूस परत आलेला बघितलंय का कुणी. थांबवा रे कुणीतरी या संमोहनाला..!

माझ्याच शंकाकुशंका, अपयश, अपेक्षाभंग, निराशा, टोचणी यांची पेरलेली बीजं आकाशाला भिडणारी वृक्षं कधी झाली कळलंच नाही. असंख्य बीजांची दाट झाडी. इतकी उंच की प्रकाशाचा मागमूस नाही. फक्त काळोख... ओळखीचा. हे घोडं आणि त्याच्या घंटीची किणकिण. थंड वाऱ्याची कुजबूज , भुरभुरणारं बर्फ ... निःशब्द शांतता पसरली आहे. ह्या विश्वात फक्त मीच आहे जणू. गूढगर्भातून चिरनिद्रेच्या अनाहूत हाका. जन्मोजन्मी ज्याची प्रतिक्षा केली तीच व्याकुळता घेऊन पुन्हापुन्हा काळजात खंजीर खुपसायला तयार.

हे घोडंही जणू मोठी चूक झाल्यागत बघायला लागलंय. आपण ही अंधाराची लक्तरं घेऊन परतच जावं हेच खरं. अरण्य कुठं जाणार... ते असंच उभं... नित्य... शाश्वत. तीच निष्पर्ण तरुंची राई. तूच वाट बघ बाबा. अरण्या, तू विलक्षण मोहक आहेस खरा, पण दिल्याघेतल्या अपूर्ण वचनांची काळजातली खिंडारं घेऊन मी काही येत नाही आता... अजून पुष्कळ काही करायचं आहे. सहस्र स्वप्नांची आणि समर्पणाची पूर्तता होईपर्यंत तू वाट बघ 'चिरनिद्रेच्या अरण्या'... तू वाट बघ... पुष्कळ मोठा पल्ला गाठायचाय... आता तूच वाट बघ माझी. 

©अस्मिता

-----
*संदर्भ- मूळ कविता-
Stopping by Woods on a Snowy Evening
https://www.poetryfoundation.org/poems/42891/stopping-by-woods-on-a-snow...

* मला कवी ग्रेस यांची 'भय इथले संपत नाही' ही कविता अन्वयाने या कवितेच्या जवळ जाणारी वाटते. योगायोगाने 'चंद्रमाधवीचे प्रदेश' या काव्यसंग्रहातील या कवितेचे मूळ शीर्षकही 'निष्पर्ण तरुंची राई' आहे. हे मला लेख लिहून झाल्यावर संदर्भासाठी शोधाशोध करताना सापडले आणि अवचित काही तरी गवसल्याचा आनंद झाला.
https://marathikavitaa.wordpress.com/2007/12/01/%E0%A4%AD%E0%A4%AF-%E0%A...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान रसग्रहण !
हेवा वाटला. इथे मराठी कविता लवकर समजत नाहीत. पहिल्याच वाक्यात क्नो ला अडखळलो. "फिदी:

रच्याकने, कवीला ओळखत नसू तर कवितेत तो प्रतिमा कशा वापरतो हे कळत नाही. त्याने एक शब्दचित्र रेखाटलेय कि त्यात गर्भित अर्थ आहेत हे कळत नाही. त्यामुळे स्वतः या कवितेचा अर्थ लावण्याला पास. सध्या हेच रसग्रहण या कवितेकडे पाहण्यासाठी दुर्बिणीसारखं वापरता येईल. रसग्रहण करताना देखील प्रतिभा आवश्यक असते, ती गूढार्थ शोधताना दिसतेच आहे. अभिनंदन !

छान!
र आ ह्यांचा प्रतिसाद ही मस्त आहे

सुंदर रसग्रहण केले आहे.
मोजक्याच वाचलेल्या इंग्रजी कवितांपैकी भावलेली कविता.

मनाच्या वारुला, लगाम घालून कर्मपथावरती नेण्याचा आशय असेल तर फार गहन कविता आहे. आणि सुंदरही.
छान अर्थ लावलेला आहेस.

शेवटचं कडवं ट्रिकी आहे. समजा ही कविता लिहीतानाची मानसिक अवस्था दु:खी आहे.
निराशा आहे. या नैराश्यातून कवितेत निष्पर्ण, बर्फाळ,गोठलेल्या प्रतिमा उभ्या केलेल्या आहेत.
हे सर्व मृत्यूचं वर्णन आहे. मृत्यूच्या ठिकाणी सगळे गोठलेले असते.
पाश्चात्य तत्त्वज्ञानाप्रमाणे किंवा त्यांच्या गूढ तत्त्वज्ञानाप्रमाणे या प्रतिमा मृत्यूच सांगत असाव्यात.
हा मनावरचा संस्कार आहे. तर्क सुद्धा आहे.
त्यामुळे कवितेची शेवटची जी ओळ रिपीट होते त्यामुळे हे मृत्यूगीत आहे असा समज होऊ शकतो.

मात्र शेवटून तिसरी ओळ कलाटणी देणारी आहे. ती जीवनाकडे, मोह, माया, आसक्तीकडे बोट दाखवतेय.
डोळे मिटण्यापूर्वी ऐहिक आयुष्यात केलेले वादे, दिलेली वचने हे त्या मृत्यूच्या ओढीवर मात करतेय.
ही कविता नैराश्यावर मात करणारी आहे.

जर कवितेच्या वेळची परिस्थिती, मुलाला गिफ्ट घेऊन न देता येण्याची खंत ही असेल तर मुत्यू येण्याच्या आधी ही कर्तव्ये पूर्ण करण्याची जिद्द दिसते.
( इंग्रजीचं ज्ञान नसल्याने हास्यास्पद अर्थ निघाले तर कामणूक करून घ्यावी Happy )

छान भावानुवाद व परीक्षण. यु शुड रिअली कन्सिडर डुइन्ग सिरीअस रायटिंग. जी एंच्या रुपक कथा असतात त्याचे फील आहे. त्या कथा वाचल्यावर अनेक वेळाने अर्थ समोर येतो. दिवाळी अंका साठी लिहा, कथा संग्रह पुस्तके लिहा. इथे तर लिहितच राहा.

माझा संसार हैद्राबादेत नवीन होता तेव्हा मित्रमैत्रीणींना मदत करुन आमच्या खात्यात एकदा फक्त १२५ रु. होते दिवा ळीच्या आधी ते आठवले.
नवर्‍याचा स्वभाव दिलदार. म्हणून आम्ही कोणाला पैसे परत मागायचोच नाही. पुढे परिस्थिती सुधारल्यावर मग कायते पाड्व्याला साडी ड्रेस, मुलीला तर ती म्हणेल ते घेउन दिले. ते तिचे नशीब. पण जुने दिवस लक्षात आहेत.

@आचार्य, आय क्नो दॅट यू क्नो...यू जस्ट डोन्ट वॉन्ट टू शो. Happy

मात्र शेवटून तिसरी ओळ कलाटणी देणारी आहे. ती जीवनाकडे, मोह, माया, आसक्तीकडे बोट दाखवतेय.
डोळे मिटण्यापूर्वी ऐहिक आयुष्यात केलेले वादे, दिलेली वचने हे त्या मृत्यूच्या ओढीवर मात करतेय.

ही कविता नैराश्यावर मात करणारी आहे.>>>+1

बऱ्याच जणांनी याला गडद तरीही प्रेरणादायी कविता म्हटले आहे. चिरनिद्रेच्या हाका अनाहूत आहेत. मी 'अनाहूत' हा शब्द जाणूनबुजून वापरला आहे.
https://anothernightofreading.wordpress.com/2020/01/17/robert-frost-stop...

>>> आसक्तीपेक्षा कर्तव्यनिष्ठता आणि समर्पण म्हणेन. ऐहिक जरी असले तरी, anything that makes you come back to life is worth it. त्या काळ्याकुट्ट क्षणी तत्त्वज्ञान नको वाटतं. ते सुदृढ मनोवस्था असताना झेपत असेल. तत्त्वज्ञान कधीकधी डार्क होतं, तो निर्भयाचा प्रांत आहे. त्याला तितकीच पूर्वतयारी लागत असावी. तुमचं आकलनही सहज आहे, हास्यास्पद नाही. मी फक्त तेव्हा मला काय योग्य वाटलं असतं ते लिहीलं आहे. Happy

पहिली प्रतिक्रिया नेहमी तुमची असते , आता तुम्ही बोहणी नाही केली तर मीच रूमाल टाकीन बहुतेक. Proud

Happy धन्यवाद आचार्य, कुमार सर, सामो , किल्ली, माझेमन, अमा आणि मानवदादा.

अमा, भापो. तुमच्यासारखे समजून घेतात म्हणून मी स्वतःला ट्रिम करणं सोडून दिलं. मला आवडलं असतं पण मी या क्षेत्रात कुणालाच ओळखत नाही, रिसोर्सेस नाहीत माझ्याकडे. फक्त हौसेखातर आणि इंट्यूटिव्ह आहे. तुमची आठवण हृद्य आहे. मनापासून आभार तुमचे. Happy

आज नाताळ आहे आणि काल ही कविता फेसबुक पेजवर उडतउडत आली. माझी एक जीवलग मैत्रीण मला एकदा म्हणाली होती 'असे विशेष दिवस- सणवार-सोहळे नकोच वाटतात. साध्या दिवशीच कमी एकटं वाटतं'. ते मला फारच 'पोचलं' होतं.

पृथ्वी नावाचं गाव आणि तिथले अनुभव खरच एवढे विचित्र आहेत ?
पाडगावकर आठवले ...
या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे...
दुसरी बाजू...उध्दवा अजब तुझे सरकार...
तिसरी बाजू... दोन ओंडक्यांची होते सागरांत भेट।
एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गांठ।
क्षणिक तेवी आहे बाळा, मेळ माणसांचा ।
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा ।।

आपण फक्त साक्षीभावाने आयुष्य जगायचं.

तुमचे मत वाचायला आवडेल...

विचार प्रवर्तक भावानुवाद...

https://theimaginativeconservative.org/2023/01/beyond-lines-robert-frost...

---हे मी आता शोधलं. मला ही कविता मी फारच इन्टेन्स केली की काय असं वाटत‌ होतं.‌ पण आता जाऊ देतेय.‌

The philosophy of a composition -
By Edger Ellen Poe

When, indeed, men speak of Beauty, they mean, precisely, not a quality, as is supposed, but an effect—they refer, in short, just to that intense and pure elevation of soul—not of intellect, or of heart—upon which I have commented, and which is experienced in consequence of contemplating the “beautiful.”

पृथ्वी नावाचं गाव आणि तिथले अनुभव खरच एवढे विचित्र आहेत ?
>>>>>
Happy प्रत्येकाचं आयुष्य वेगवेगळं आहे- असू शकतं, त्यामुळे सगळ्या शक्यतांचा अंतर्भाव करून लिहिले आहे. आयुष्य नेहमीच आनंदी- प्रेमळ नसतं आणि दुःख आणि संघर्षही तितकाच खरा असतो.‌ काही जणांच्या वाटेत जास्त काटे असू शकतात. शिवाय ह्या कवितेची नशा चढविण्यासाठी त्या भावनेशी समांतर रहावे लागले.‌ हेही सत्यच आहे, त्या क्षणातील पूर्ण सत्य, काळकुट्टं पण सत्यच..! सत्य स्विकारलेलं बरं असतं, त्याने मार्ग शोधता येतो. कठीण परिस्थितीतही स्वतःचं 'बेस्ट व्हर्जन' टिकवता येतं. प्रत्येकवेळी साक्षीभाव ठेवून बघता येत नाही. पण ज्या अर्थी कवी परतून आला, त्याला विचारांती काहीतरी गवसलेच असावे.

धन्यवाद द सा. Happy

अस्मिता खूप धन्यवाद....तुमचं उत्तर छान आहे...
>>>प्रत्येकवेळी साक्षीभाव ठेवून बघता येत नाही.>>>
सहमत निदान संसारी माणसाला ते शक्य नाही....जे तपस्वी आहेत , बुध्द आहेत , ज्यांची साधना निरंतर आहे त्यांना शक्य असावं.

असे विशेष दिवस- सणवार-सोहळे नकोच वाटतात. साध्या दिवशीच कमी एकटं वाटतं'. ते मला फारच 'पोचलं' होतं.
+११११११११११
अगदी खरंय.. अशा दिवशी जी पोकळी जाणवते ना ती शब्दात मांडता येणार नाही

बोहणी नाही केली तर मीच रूमाल टाकीन बहुतेक >>> एकदम एसटी स्टॅण्ड आठवला. खिडकीतून रूमाल,पिशवी टाकून निवांत चढलेले लोक खिडकीतून घुसून त्या सीटवर बसलेल्यांशी भांडण करायचे . Lol

घोडा म्हटलं कि मनाचे वारू या अर्थाने आपण बघतो. पण हा टिपीकल मराठीपणा झाला. इंग्रजी कवितेत पण मन वढाय वढाय म्हणून अश्वाची उपमा असेल का ? अन्य काही कवितांमधे घोडा हे सौंदर्याचे, कणखरपणाचे, शक्तीचे, स्वातंत्र्याचे प्रतिक म्हणून येते. तर निसर्गाचा बेफामपणा, उधळण, (मानवी) हस्तक्षेपापासून अस्पर्शित अशा अर्थाने कवीने घोड्याची प्रतिमा वापरली आहे.

गोठणे, सर्वत्र बर्फ, निष्पर्ण वृक्ष या प्रतिमा नैराश्य सुद्धा उभ्या करतात. पण त्या ग्रेसच्या कवितांवर पोसलेल्या रसिकाला. ग्रेसच्या काही कवितांमधे पाश्चात्य प्रतिमा या त्याच अर्थाने आहेत. त्यामुळे तसेच असावे. अशा अर्थाने पाहिली तर कविता वेगळी भासेल. शोभायंत्राप्रमाणे असतात या कविता.

पण काहीही असो अंधारात प्रकाश, नैराश्यात उमेद , मृत्यूच्या सावटाखाली जगण्याची इच्छा असेच दिसतेय.

असे विशेष दिवस- सणवार-सोहळे नकोच वाटतात. साध्या दिवशीच कमी एकटं वाटतं'. ते मला फारच 'पोचलं' होतं.
+११११११११११
अगदी खरंय.. अशा दिवशी जी पोकळी जाणवते ना ती शब्दात मांडता येणार नाही>>>> +१

प्रत्यक्षात ती कविता अजिबात गहन नाही, इथे रसग्रहण फार गहन केलेले असले तरी.
माझ्या मते, इंग्लिश मिडियमला ६ वी किंवा ७ वी आणि मराठी माध्यमासाठी ९ वी - १० वी ला जास्त योग्य आहे. रॉबर्ट फ्रॉस्टची The Road Not Taken मला ११ वी का १२ ला होती.

गंमतीची/ शिकण्यासारखी गोष्ट म्हणजे वरील कवितेत यमक (Rhyme) चा प्रकार आहे AABA BBCB CCDC DDDD
know (A)
though (A)
here (B)
snow (A)

queer (B)
near (B)
lake (C)
year (B)

shake (C)
mistake (C)
sweep (D)
flake (C)

deep (D)
keep (D)
sleep (D)
sleep (D)

म्हणून मला परदेशी जमिनींबद्दल प्रेम आतून वाटत नाही. गार बर्फाळ जागा त्या. आय अ‍ॅम अ चाइल्ड ऑफ द ट्रॉपिक्स. भरपूर बायो डायवर्सिटी असलेली सदा हरित जंगले. पाण्याने भरलेल्या नद्या. मजबूत उन्हे. इथे माणूस डिप्रेस होत नसावा. किंवा कमी. आश्रम असला तर साधे पणी राहावे. आजू बाजुस माजलेले जंगल व हिरवाई कायम. खूप गर्मी झाली की नदीत डुंबायचे. वॉट लाइफ. आम्ही ह्याच चिकण मातीत जाणार.

उपाशि बोका, हा यमक प्रकार आहे हा कोनतातरि अलन्कार आहे इन्ग्रजी मध्ये ....त्यासाठी हि कविता त्यान्ना आहे .... म्हनजे अलन्कार समजण्या साठी.
मी विचारले त्याला की अभ्यास घेतला होता तेव्हामुलाने शाळेत काय शिकवले किंवा याला जे कळले ते थोडक्यात सांगते ---- एक माणुस घोड्यावरुन जात असतो तर त्याला वाटेत एक जन्गल लागते. तिथे त्याला थांबायचे असते आणि निसर्गशोभा पहायची असते पण त्यला खुप काम असते त्यामुळे थांबायला वेळ नसतो. म्हणुन तो dilemma मध्ये अडकला आहे.

प्रत्यक्षात ती कविता अजिबात गहन नाही, इथे रसग्रहण फार गहन केलेले असले तरी.
>>>> मी इतकी हसतेय.... Lol
कविता गहन नाही पण आंतरजालावरील सोर्सेसने आशय गहन असल्याचे सांगितले होते. हा यमक प्रकार वाचला होता. माझ्याही मुलाला ही कविता होती आणि त्यानीही suicidal thoughts असंच सांगितलं होतं. इथं सातवीआठवीला Honours English ला भयंकर डार्क इंग्रजी पुस्तकं आहेत.

अमा, अगदी. हाडं गोठवणारी थंडी, संधिप्रकाश आणि गोठलेलं mystic वातावरण. कॅनडात राहताना मानसिक आणि शारीरिक कस लागला अगदी. परकं वाटत रहातं. त्यामुळे कवितेतल्या New Hampshire च्या वर्णनाची कल्पना होतीच.

किल्ली आणि मंजूताई, पोचलं.

आचार्य, 'कल्पनेचे वारू' ही घोड्याला दिलेली उपमा व मराठीकरण खूपच आवडले आहे. पोस्टीशी सहमत. पोस्ट आवडली आहे. Happy

अमि, शक्य आहे ते. Happy त्या वयात तेच आकलन योग्य वाटतेय. पण ही किंकर्तव्यमूढता (dillema) 'Miles to go before I sleep' आहे, 'Miles to go before I enjoy the view' नाहीये. वरील लिंक्स मधेही अधिक माहिती आहे.

ह्या ओळी( last ४)शाळेत असतानापासून माहिती आहेत. पण त्याचा एवढा deep अर्थ असेल हे लेख वाचून कळलं.
त्या निमित्ताने बऱ्याचदा माझ्याकडून वरवर चा विचार केला जातो हे लक्षात आलं.
धन्यवाद अस्मिता

छान लिहिलंयस. कविता सुंदर आहेच.
आर्थिक चणचण वगैरे संदर्भ मला माहीत नव्हता, पण सृजनाच्या बाबतीत 'हा अनुभव आणि ही त्यावरची कविता' असं काही त्रैराशिक नसतं.

मला या कवितेतला 'आकस्मिक'पणा फार भावतो. वृक्षराजी माझी नाही, कोणाची आहे ते बहुधा मला ठाऊक आहे. त्याचं घर गावात आहे, आणि त्याच्या मालकीच्या या घनगर्द राईचं हे गूढरम्य आमंत्रण स्वीकारायला आत्ता या क्षणी तो इथे नाही. ही राई आता नीरवपणे पडणार्‍या हिमाने भरून जाईल, आणि त्याचा साक्षी मी असेन - या अनुभवाची मालकी मात्र फक्त माझी!
आयुष्यातली कितीतरी सुखदु:खं अशीच यदृच्छेने (तू 'अनाहूत' हा नेमका शब्द वापरला आहेस!) आपल्या पदरात पडतात. कित्येकदा तर आपण ती भोगली हे फक्त आपलं आपल्याला जाणवतं.
ती राई हे चिरनिद्रेचं प्रतीक आहे की सर्वसंगपरित्यागाचं की अन्य कशाचं हे वाचकाच्या दृष्टीकोनावर अवलंबून. पण ते जे काही आहे त्यापेक्षा श्रेयस असं काहीतरी जीवितकार्य अजून अपूर्ण आहे, अजून या राईत हरवून जायची मुभा मला नाही. मला परतणं भाग आहे, पण परतणारा मी मात्र आता काही क्षणांपूर्वीचा तो राहिलो नाही हेही तितकंच खरं.

थोडंसं अवांतर:
कवितेचा 'एकच' (गहन किंवा उथळ) अर्थ नसतो. ती एखाद्या आरशासारखी असते. वाचणार्‍याला एखाद्या क्षणी आपल्या त्या वेळच्या मनःस्थितीचं प्रतिबिंब त्यात दिसतं आणि ती भिडते. नाही भिडली तर त्यावरून ना कवितेला 'जज' करता येतं, ना कवीला, ना वाचकाला. तिच्या आणि आपल्या भेटीची वेळ अजून आलेली नसते इतकंच. शिवाय आज एका कोनातून ती जशी दिसली, हुबेहूब तशीच उद्या निराळ्या कोनातून निराळ्या उजेडात दिसेल असंही नाही.

इ. इ. कमिंग्ज म्हणाला होता : लोलक हे सगळ्या कलांचं प्रतीक आहे असं म्हणता येईल. वरकरणी साध्या दिसणार्‍या पांढर्‍या प्रकाशकिरणांत लपलेल्या विलक्षण रंगच्छटा त्यांतून दृग्गोचर होतात. 'हेच' आणि 'असंच'च्या सगळ्या चौकटी मोडूनच ते साध्य होतं.

किती सुंदर लिहिलंय!!
ह्या ओळी( last ४)शाळेत असतानापासून माहिती आहेत. पण त्याचा एवढा deep अर्थ असेल हे लेख वाचून कळलं.
त्या निमित्ताने बऱ्याचदा माझ्याकडून वरवर चा विचार केला जातो हे लक्षात आलं. >>> +100

सुंदर प्रतिसाद स्वाती. तुझ्या लेखनातलं भाषासौंदर्य नेहमी आल्हाददायक असतं. Happy

पण सृजनाच्या बाबतीत 'हा अनुभव आणि ही त्यावरची कविता' असं काही त्रैराशिक नसतं. >>>>
होय. पण मला लिहावी वाटली पूर्वपीठिका. कदाचित रसग्रहण जास्त पोचेल असं वाटलं. हे मी लिहिलेलं कवितेवरच पहिलं रसग्रहण आहे.

सर्वसंगपरित्यागाचं की अन्य कशाचं हे वाचकाच्या दृष्टीकोनावर अवलंबून. >>> लेखनात अध्यात्म अजिबात येऊ द्यायचं नव्हतं म्हणून ही शक्यता लक्षात आली नाही. कारण हल्लीच त्या विषयावर लिहिल्याने तोचतोचपणा आला असता. पण हा दृष्टिकोन आवडला आहे.

मला परतणं भाग आहे, पण परतणारा मी मात्र आता काही क्षणांपूर्वीचा तो राहिलो नाही हेही तितकंच खरं.>>>अलवार लिहिले आहे.

लोलकाची लिंक वाचली, आवडली. पटलंच.
मला मध्यवर्ती कल्पना थोर कवीची असल्याने अजिबात कमी पडू द्यायचं नव्हतं, जास्त झालं तर चालणार होतं. कवी त्या क्षणी जी भावना जगतो ती तर आपल्याला कधीही कळत नाही, पण तो क्षण जगायचा प्रयत्न करणं किंवा त्या क्षणी त्यातल्या भावना आपल्यातलं जे काही बाहेर काढतं ते येऊ देणं म्हणजे 'काव्याची अनुभूती' वगैरे असावी. त्यामुळे गहन-उथळ बद्द्ल सहमत.

धन्यवाद. Happy

Pages