तरी मला घरी पोहोचायला जिथे दहा मिनिटे लागत तिथे वीस मिनिटे लागली. मनाला एक प्रकारचं रिकामपण आलं होतं. एरव्ही जोरजोरात होणारे मनातले संवाद आता पूर्णपणे थांबले होते. पावणे आठच्या सुमारास मी घरात पोहोचलो.लिफ्टने जाण्यापेक्षा मला उडत जावं असं वाटतं होतं. दिशा आणि मुलांची काय अवस्था असेल याची काळजी मला वाटू लागली. आता संवाद परत आले. फ्लॅटचा दरवाजा सताड उघडा असून सगळे लाईट लावलेले होते. आत मधे आमचे सेक्रेटरी विधाते , शेजारचे शिंदे आणि पो.इन्स्पेक्टर वाघ आणि त्यांचे सहकारी यांचं निरीक्षण चालू होतं. मी आल्याबरोबर विधातेंनी माझी इन्स्पेक्टरना ओळख करून दिली. त्यांचे मोठाले डोळे माझ्याकडे संशयी नजरेने पाहत होते.मी त्यांना हॅलो म्हंटलं. पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही. उलट तिरसटपणे विचारलं, " होतात कुठे दोन दिवस ? " त्यावर मी थोडक्यात सांगितलं आणि गुरुजीच्या मृतदेहाजवळ गेलो. ते निपचित पडले होते. त्यांचे डोळे आणि जीभ अर्धवट बाहेर आली होती.तेवढ्यात दिशा आत आली आणि रडत रडतच म्हणाली,"अहो, पांच वाजता चहा घेऊन आले.तर गुरुजी बेडवर दिसले नाहीत.....ते पंख्याला लटकत असलेले दिसले. मला चक्कर आल्यासारखं झालं. मग मी (विधात्यांकडे बोट दाखवून म्हणाली) यांच्या घरी गेले. मुलांना तिकडेच ठेवलंय....ते आले. त्यांनीच पोलिसाना बोलावलं. मग इतरही लोक आले. " ती माझ्या जवळ थरथरत उभी होती.पोलिसांचं काम संपत आलं होतं की नाही माहित नाही. मग मला विधाते बाजूला घेऊन जाऊन म्हणाले," मी ऐकदोघांना विचारलं आणि पोलिसांना मुद्दामच बोलावलं. आत्महत्येची केस आहे, कोणताही डॉक्टर सर्टिफिकेट देणार नाही आणि त्याशिवाय स्मशानाचा पासही मिळणार नाही. मला वाटतं मी हे ठीक केलं असावं. तुम्हाला काय वाटतं ? ....." ते माझ्या उत्तराची वाट न पाहता पुढे म्हणाले," प्रदीप एवढी नाजूक अवस्था होती तरीही तुम्ही गुरुजींना घरी का आणलंत कळत नाही.त्यांना मुलगा आहे आणि तो अमेरिकेत असतो,असं वहिनी म्हणत होत्या. त्याचा फोन नंबर आहे का ? " मला काय बोलावं कळेना. मला एकदम गुरुजींच्या डायरीची आठवण झाली. मी ती कपाटातून आणायला आत गेलो. इन्स्पेक्टर वाघ मला अडवीत म्हणाले," तुम्हाला पो. स्टेशनला यावं लागेल. गुरुजींचा मृत्यू संशयास्पद वाटतोय. " मला होकार देण्याशिवाय पर्याय नव्हता. मी पुन्हा आतल्या खोलीत जायचा प्रयत्न केला. मला परत अडवीत इन्स्पेक्टर म्हणाले," सध्या घरातल्या कोणत्याही गोष्टीला हात लावता येणार नाही.. आत आमचा सर्च चालू आहे. लवकरच स्ट्रेचर घेऊन दोघे आले. गरुजींना घेऊन ॲम्ब्युलन्स मधे ठेवण्यासाठी निघून गेले. मी दिशाला समजावून बाहेर आणली. " हे बघ, घाबरु नकोस. मी आलोय ना आता.मी बघेन सगळं. तू कीर्ती आणि रचना बरोबर राहा " असं म्हणून मी तिला विधात्यांच्या घरी पाठवली. तिने जाताजाता काळजीने विचारलं," तुम्हाला पोलीस काही करणार नाहीत ना ? मी पण येते तुमच्या बरोबर. " त्यावर मी तिला समजावून म्हंटलं," अगं हा खून नाही. मला काहीही होणार नाही. मी लवकरच परत येईन. " पण मला किती वेळ होणार याची कल्पना नव्हती.
मी सोसायटीच्या आवारात उभ्या असलेल्या पोलीस गाडीत जाऊन बसलो. दहा पंधरा मिनिटांत आम्ही नायगाव पो. स्टेशनला पोहोचलो. पोलिस स्टेशनमध्ये जाण्याचा माझा पहिलाच अनुभव होता. एकदा मात्र पासपोर्ट व्हेरिफिकेशन साठी गेलो होतो. पण आत्ताचं कारण वेगळं होतं. सगळीकडेच पिवळे लाईट पसरविणारे बल्ब होते. ते उजेडापेक्षा अंधार जास्त जाणवून देत होते. इतर कोणतेही वर्णन देणं मनावर असलेल्या ताणामुळे मला शक्य नाही. परंतू शिरल्या शिरल्या एकच भावना बळावली, इथून मी कधी बाहेर पडणार आणि पुन्हा इथे कधी न यावं लागलं तर बरं होईल. वाघ साहेबांच्या सहकाऱ्यांनी त्यांना कडक सलाम ठोकले. केबिनमध्ये ते स्थानापन्न झाल्यावर मीही खुर्ची ओढली त्या बरोबर ते ओरडले, "मी तुम्हाला सांगितलं बसा म्हणून . सांगितल्याशिवाय बसता कसे हो तुम्ही ? " मी उभा राहिलो. मला अर्थातच ही वागणूक आवडली नाही. आता मात्र मी ठरवलं, यांना जास्त माहिती द्यायची नाही. ते पाणी पिऊन म्हणाले," गुरुजींना असं काय टेन्शन दिलंत की त्यांनी आत्महत्येचा निर्णय घेतला. पोस्टमॉर्टेम रिपोर्ट आला की कळेलच नक्की काय झालंय ते. बोला. लवकर लवकर बोलायचं. गुरुजी तुमचे कोण ,कुठे भेटले. बोला बोला पटापट. मला एकट्याला बोलायला आवडत नाही. "..... मी गुरुजींची मला फारशी माहिती नाही,असं सांगायला सुरुवात केल्यावर ते म्हणाले," पाहा परब, गुरुजींची यांना काहीच माहिती नाही. " परब की कोणी होते त्यांनी मला जरब दाखवणारा ' लुक 'दिला आणि म्हणाले, " घेऊ का याला आत ? ". परबांना दम देत ते म्हणाले," मी तुम्हाला बोलायला सांगितलं ? सरळ उभे राहा. " मला तरी हा त्यांचा नेहमीचा ड्रामा असावा असं वाटलं. मग ते आवाज मऊ करीत म्हणाले, " बसा मि. प्रदीप राजे. आणि खरं काय ते बोला.चहा पाणी काही पाहिजे?" मी पटकन बसायला तयार नाही असं पाहून म्हणाले," आता तुम्हाला गोंजारचं काय ? आमचं गोंजारणं परवडणार नाही. " असं म्हंटल्यावर मी बसलो. त्यांनी पाणी मागवलं. ते प्यायल्यावर मी जेवढं आवश्यक तेवढंच बोलत होतो. जसं जमलं तसं सांगितलं. पण मी गावी का गेलो होतो ते सांगितलं नाही. सगळं ऐकल्यावर ते म्हणाले," तुम्हाला काय वाटतं ? तुमच्या या कथेवर लहान पोर तरी विश्वास ठेवील का ? मि. राजे मला खरं खरं सांगा. गुरुजींसारख्या, गरीब, रिटायर्ड माणसाचे पैसे मिळावेत म्हणून त्यांना फूस लावून सांभाळण्याची वचनं देऊन घरी आणलंत ,ते सुद्धा त्यांचा मुलगा इथे नाही आणि तो बिचारा पटकन येऊही शकत नसताना , गुरुजींना टेन्शन दिलंत आणि आत्महत्या करायला भाग पाडलंत ? कुठे आहेत ते गुरुजींचे सह्या घेतलेले कागद ? लवकर खरं काय ते सांगा,नाहीतर परबना तुम्हाला चार्जरुममधे घ्यायला सांगतो. नक्की काय प्लानिंग होतं तुमचं आणि यात कोण कोण सामील आहे ? ....... रमणिकलाल तर नाही? खरा सूत्रधार ?". आता मात्र मला प्रचंड संताप आला त्या भरात मी ओरडलो, "साफ खोटं आहे हे. कुभांड रचता काय माझ्या विरोधात ? माणसाने चांगल्या भावनेने काही करायलाच नको. तुम्हाला काय वाटतं? मी त्यांच्या मुलाचा फोन नंबरही शोधायचा प्रयत्न केला . पण तो अर्धवट मिळाला. ". असं म्हंटल्यावर ते भडकून म्हणाले," माझ्यावर ओरडता ? ओरडायचंय तुम्हाला ? परब उचला याला आणि घ्या आत. तिथे कितीही ओरडलास ना तरी एक शब्दही बाहेर जाणार नाही." माझ्या मानेपासून कमरे पर्यंत घामाचे थंड थेंब ओघळत गेले. परब लगेचंच पुढे आला आणि माझी कॉलर धरुन उठवीत म्हणाला," चल रे एक भाड्या. आत चल गोंधळ घालू. " मग वाघ साहेब हलक्या आवाजात म्हणाले, " हीच ती डायरी आणि हाच ना तो नंबर. डायरी सापडल्याचे काही बोलला नाहीस ? खूप प्रयत्न केले असशील ना नंबर शोधायचे ? नंबर मिळाला असता तर त्यांच्या मुलाला ब्लॅकमेल करणार होतास नाही का ? हे बघ अजूनही खरं बोल. ". त्यांनी परबला बाजूला व्हायला सांगितलं. परब नी कॉलर सोडली. माझं सगळं अंग घामाने भिजलेलं होतं. तेवढ्यात माझ्या खिशातला मोबाईल वाजला. तो दिशाचा फोन होता. मधेच वाघसाहेब दबक्या आवाजात म्हणाले," फोन घे. स्पीकर वर ठेव. " मी स्पीकर वर ठेवला. शांत वातावरणात दिशाचा आवाज फार मोठा वाटला. " अहो कधी घरी येताय ? मुलं खूप घाबरल्येत हो. मी काही बोलणार एवढ्यात वाघ मोठ्याने पण शक्य तेवढं मार्दव आणीत म्हणाले," अहो, वहिनी सोडतोय हो त्यांना. अगदी गाडीनी सोडतोय. ,ठेवा फोन आता "
तिने फोन ठेवला. इन्स्पेक्टर म्हणाले," तुमचा बहुतेक आज इथेच राहायचा दिसतोय. लवकर काही क्लू दिलात तर घरी जाता येईल. मि. राजे साडेअकरा होतायत. नाही म्हंटलं तरी दोन तास झाले. ठीक आहे. चहा घेणार? " मी काहीच बोलत नाही असं पाहून म्हणाले," घ्या हो थोडा चहा. आम्हाला पण कंपनी लागते. मला एक गोष्ट तुम्ही अजून सांगितली नाहीत. गावी का गेला होतात ? तपास करायला? " त्यांनी दरवाज्याजवळ उभ्या असलेल्या हवालदाराला दोन स्पेशल चहा आणायला सांगितले. समजावणीच्या सुरात म्हणाले," काय आहे ना राजे साहेब, आत्महत्या आहे नक्की,पण का केली आणि कोण कोण त्याला जबाबदार आहे,हे शोधायलाच हवं.नाही का ? "माझ्या चेहऱ्याचे सूक्ष्म निरीक्षण करीत ते म्हणाले . तेवढ्यात चहा आला. मग चहापान झालं. मग मीच म्हणालो," गावी मी रमणिकलालला कर्ज वळता करून आमचं राहतं घर विकायचं होतं त्या कागदपत्रांवर सह्या करायला गेलो होतो. " ....." असं ? " असा प्रश्न करून पुन्हा अविश्वासाचे भाव तोंडावर आणीत ते म्हणाले. काही वेळ ते इतर फायली बघत राहिले. मला वाटतं अर्धा तास असाच घालवला. कदाचित समोरचा कंटाळून काहीतरी सांगेल,किंवा काही तरी खास प्रश्न तोंडावर फेकायची त्यांचा विचार असावा. मग माझी जाण्यासाठी चुळबूळ चालू झालेली पाहून ते म्हणाले" ठीक आहे, वहिनी वाट पाहात असतील,निघा तुम्ही. ....हुं ऽऽ.. निघा. बारा वाजल्येत. मी उठलो. दरवाज्याकडे मी वळलो.मी घाम पुसण्यासाठी खिशातून रुमाल काढला आणि दरवाज्या ढकलण्यासाठी हात उचलला ,तशी ते म्हणाले " गावी जाण्याचं खरं कारण अजून तुम्ही सांगितलं नाहीत. चक्क खोटं बोललात. पण एक लक्षात ठेवा यापेक्षा वेगळी माहिती दिलीत ना तर मात्र तुमची खैर नाही. सांगितलंत त्याला चिकटून राहा. आणि हो शहराबाहेर जाण्याचा प्रयत्नही करु नका. पुन्हा बोलवून तुम्हाला. आणि तुमच्या मते या आत्महत्येला जबाबदार कोण,याचा विचार करून ठेवा. You may go now." मी त्या घाबरवणाऱ्या वातावरणातून एकदाचा बाहेर पडलो......
मला जेमतेमच टॅक्सी मिळाली. घरी गेलो. दिशा आणि मुलांना जवळ घेतलं. मग रडत रडतच दिशा म्हणाली," तुम्हाला खूप त्रास दिला का पोलिसांनी ? दोन तास झाले हो. " मग मी तिला घट्ट धरून ठेवली आणि समजावलं. कसेतरी दोन घास पोटात ढकलले. काल संध्याकाळ पासून पोटात काहीच नव्हतं. बिछान्यावर पडल्यावर दिशा जवळ आली, तिला कुरवाळत मी म्हंटलं," हे सगळं लवकर थांबलं पाहिजे." त्यावर ती म्हणाली," मला वाटतं गुरुजींना आणण्याची घाई तर नाही ना झाली ?" मला तसं वाटत नसल्याचं मी म्हणालो. शेवटी तणावावरचा रामबाण उपाय म्हणजे एकमेकांना मिठीत घेणं हाच होता. कितीतरी वेळ ती माझ्या डोक्यावरून हात फिरवीत राहिली....................................................उद्या उठून ऑफिसला जायचं होतं. ऑफिसमधे ही यांत्रिकपणे सगळी कामं उरकीत होतो. अचानक मला आठवण झाली. बस स्टॅण्डवर भेटायला आलेल्या शिपाई बाईने एक चिठ्ठी दिली होती. ते मी कुठे ठेवलं हेच लक्षात येईना. त्या विचाराने मी इतका हैराण झालो, की कधी एकदा घरी जातोय आणि ती चिठ्ठी शोधतोय. कारण जो जो मी विचार करु लागलो तो तो ,तो माझ्या निरपराधीपणाचा मला पुरावा वाटू लागला.काहीतरी कारण काढून मी घरी जाण्याचं निमित्त शोधलं. एकदाचा निघालो. लिफ्ट न पकडता मी धावतच घरी गेलो. मी जोरजोरात बेल वाजवली. दिशाने दार उघडताच मी तिला बाजूला सारून आत शिरली.माझी कालची पॅन्ट मी शोधू लागलो. दिशाला समजेना मला एवढी कसली निकड निर्माण झाली. तिने न राहवून विचारलं," अहो, काय हवंय तरी काय ? " मी कपाटात शोधता शोधता तिला विचारलं," माझी कालची पॅन्ट कुठे आहे ? " त्यावर ती म्हणाली," ती काय दोरीवर वाळत्ये. " मी ती खसकन् खाली ओढून तिचे खिसे तपासू लागलो. अर्थातच चिठ्ठी मला मिळाली नाही. दिशा पुढे ती पॅन्ट नाचवत रागाने ओरडलो, तुम्हा बायकांना नवऱ्याचे कपडे इतके सिन्सियर्ली धुण्याची गरज काय असते गं ? " ती मला शांत करीत म्हणाली," काय झालंय तरी काय ? " मग मी तिला गावाला घडलेलं सगळं सांगितलं. तेव्हा ती म्हणाली," मला वाटतं ती तुमच्या खिशातून बसमधे किंवा इतर कुठेतरी पडली असणार.". मी तीच पॅन्ट घालून पो.स्टेशनला गेलो होतो. आता मला हळू हळू आठवू लागलं आपण इन्स्पेक्टरच्या केबिनमधून बाहेर पडताना खिशात हात घालून रुमाल काढला होता. ती चिठ्ठी त्यांना मिळाली की नाहीशी झाली ?दोन्ही शक्यता मला त्रासदायक ठरणाऱ्या होत्या. त्यांना मिळाली असली तर मी चिठ्ठी बद्दल त्यांना काहीच सांगितलं नव्हतं आणि दुसरीकडे पडली असेल तर माझ्या निरपराधीपणाचा पुरावा नष्ट झाला होता. आता शोधणं ही कठीण होतं. इतकी अस्वस्थता मला कधीच आली नव्हती. कशी तरी रात्र जात होती. झोप सारखी चाळवली जात होती. दिशा गाढ झोपली होती. मी मात्र टक्क जागा होतो. घड्याळ पाहिलं , रात्रीचे तीन वाजत होते. रात्रीच्या शांततेत दूर कुठेतरी तीनाचे अंधुक टोले ऐकू येत होते. की मला भास होत होता. काय माहीत?..........मी तसाच पडून राहिलो. कशीतरी पहाटे झोप लागली आणि एकदम आठ वाजता जाग आली. मला आज दांडी मारावीशी वाटतं होती. हातातला चहाचा कप तोंडाला लावणार, तेवढ्यात मोबाईल वाजला......
आत्ता कोण असणार ? बॉस ? की रॉंग नंबर ? फोन घेतला. ..... पलीकडून इन्स्पेक्टर वाघांचा आवाज आला. " ताबडतोब पोलिस स्टेशनला या. आरोपी सापडलाय." मी कसा तयार झालो. दांडी मारण्याचं नक्की ठरवून टॅक्सीला हात केला. आत बसलो. ड्रायव्हरला गाडी नायगाव पोलिस स्टेशनला घ्यायला सांगितली.
(क्रमशः)
©®
छान!!
छान!!
इंटरेस्टिंग
इंटरेस्टिंग
इंटरेस्टिंग
इंटरेस्टिंग
बापरे! अचानक किती व्याप!
बापरे! अचानक किती व्याप!
छान चाललीय. पण पोलिसांची अशी
छान चाललीय. पण पोलिसांची अशी भुमिका पटली नाही, थोडी विचित्र वाटली.
चांगली चालू आहे गोष्ट.
चांगली चालू आहे गोष्ट. पुभाप्र.
पु भा प्र
पु भा प्र
साधनाजी यांस,
साधनाजी यांस,
पोलीस कधीच सरळ विचार करीत नाहीत, त्यात त्यांची चूक आहे असं म्हणता येत नाही . म्हणून तर सामान्य माणसं पोलिसांकडे जायला घाबरतात व पोलिसाची मदत घेत नाहीत.
कधी ये़नार पुढचा भाग
कधी ये़नार पुढचा भाग