आमचे धोत्रे गुरुजी (भाग ५)
Submitted by मिरिंडा on 23 November, 2023 - 10:10
तरी मला घरी पोहोचायला जिथे दहा मिनिटे लागत तिथे वीस मिनिटे लागली. मनाला एक प्रकारचं रिकामपण आलं होतं. एरव्ही जोरजोरात होणारे मनातले संवाद आता पूर्णपणे थांबले होते. पावणे आठच्या सुमारास मी घरात पोहोचलो.लिफ्टने जाण्यापेक्षा मला उडत जावं असं वाटतं होतं. दिशा आणि मुलांची काय अवस्था असेल याची काळजी मला वाटू लागली. आता संवाद परत आले. फ्लॅटचा दरवाजा सताड उघडा असून सगळे लाईट लावलेले होते. आत मधे आमचे सेक्रेटरी विधाते , शेजारचे शिंदे आणि पो.इन्स्पेक्टर वाघ आणि त्यांचे सहकारी यांचं निरीक्षण चालू होतं. मी आल्याबरोबर विधातेंनी माझी इन्स्पेक्टरना ओळख करून दिली.