परीक्षण ए जवान - फक्त आणि फक्त शाहरूख खान !

Submitted by ऋन्मेऽऽष on 11 September, 2023 - 18:06

हिरोगिरीचा पिक्चर म्हणजे ज्यात एक हिरो असतो. तो स्टार किंवा सुपरस्टार असतो. तो पिक्चरच्या सुरुवातीला जेव्हा फटा पोस्टर निकला हिरो स्टाईल एक फाडू एन्ट्री घेतो. तेव्हा पब्लिक शिट्टी आणि टाळ्यांनी थेटर डोक्यावर घेते.

जवानमध्ये पिता आणि पुत्र असे दोन हिरो आहेत. दोन्ही शाहरुख आहेत. दोघे मिळून पिक्चर मध्ये जवळपास दहा-बारा एन्ट्री घेतात. आणि प्रत्येक एन्ट्री वेळी.. आय रिपीट.. प्रत्येक आणि एकूण एक एन्ट्रीवेळी पब्लिकच्या शिट्ट्या आणि टाळ्यानी थेटर दणाणून उठते.

माझी नऊ वर्षाची मुलगी जिने जेमतेम पंधरा-वीस चित्रपट थिएटरला पाहिले असतील. ती म्हणाली, पप्पा मी पहिल्यांदाच असा पिक्चर बघतेय जिथे पब्लिक एवढा आरडाओरडा करतेय..
आता तिला काय सांगू, मी सुद्धा माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच हिरोच्या दर नव्या एंट्रीला इतका जल्लोष अनुभवत होतो.

काय ती स्टाईल, काय ती ॲक्शन, काय तो स्वॅग.. येस स्वॅग इज द परफेक्ट वर्ड..
आजवर ही दक्षिण भारतीय हिरोंची मक्तेदारी होती. जी आज शाहरुख ने अक्षरशः मोडून काढली. नक्कीच दिग्दर्शक तिकडचा होता आणि त्याची कमाल यात होतीच. पण तिथली पब्लिक सुद्धा तशीच असते जे हिरोला तसेच डोक्यावर घेते. आपल्याकडे तशी काही पद्धत नसूनही आज मी एका हिंदी पिक्चरला असा माहौल अनुभवत होतो. शाहरूखचे स्टारडम म्हणजे नक्की काय चीज आहे हे मी त्याचा एक कट्टर चाहता असूनही मला नव्याने समजतेय असे होत होते..

पिक्चरमध्ये नयनतारा आहे, विजय सेतुपती आहे, दीपिका आहे, झाल्यास सरप्राईज पेकेज संजूबाबा आहे, शाहरुखच्या टोळीतील मुलींनी देखील मस्त काम केले आहे, दिग्दर्शक नावाजलेला आहे, का ते पिक्चर बघून समजते, बॅकग्राऊंड म्युझिक नुसता राडा घालते, गाणी फार श्रवणीय नसली तरी कोरिओग्राफी प्रेक्षणीय आहे. बोलायला बरेच काही आहे. पण आज शाहरूख पलीकडे काही सुचणे अवघड आहे.

जर पठाणने खरेच हजार कोटी कमावले असतील तर हा दहा हजार कोटी डिझर्व्ह करतो.
पण....
या पिक्चरची पठाणशी तुलना देखील करू नका. म्हणजे हा वेगळ्या धाटणीचा पिक्चर आहे ते सोडा. म्हणजे पठाण हॉलीवुड स्टाईल ऍक्शनपट बनवण्याचा प्रयत्न होता. तर हा दक्षिण भारतीय मसालापट आहे त्यामुळे शैली भिन्न आहेच. पण दोन्हीतील शाहरूखची तुलनाच नाही. पठाणचा शाहरूख यापुढे फार सामान्य भासला. आजवर कधी असा शाहरूख पाहिला नव्हता. कोणी कल्पनाही करू शकत नाही अश्या शाहरूखची..

त्यामुळे जा, उठा, तिकीट बुक करा आणि थिएटरमध्ये जाऊनच बघा. नुसते मोठ्या पडद्यावर बघायला म्हणून नाही तर तो माहौल तुम्ही तिथेच अनुभवू शकता. माझ्या मुलीने देखील टाळ्या वाजवून एन्जॉय केला. घरी आल्यावर आईला तो अनुभव सांगून थकत नव्हती. पिक्चर संपल्यावर म्हणाली की हा पहिला चित्रपट जो मी एकही डुलकी न काढता बघितला कारण दंगाच एवढा चालू होता, झोप यायचा प्रश्नच नव्हता..

पण पिक्चर नुसते शाहरूखचे स्टारडमच नाही दाखवत, तर तो हसवतो, रडवतो, इमोशनल करतो, पुन्हा खुश करतो, एक सामान्य माणूस म्हणून आपला जीव सुखावतो. कारण त्यातला हिरो आणि त्याची हिरोगिरी जरी लार्जर than लाईफ दाखवली असली तरी त्यातील समस्या खऱ्याखुऱ्या आहेत.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या, ऑक्सिजन अभावी सरकारी हॉस्पिटलमध्ये मुलांचा मृत्यू, भ्रष्टाचाराने पोखरलेली सिस्टीम ज्यातून सुरक्षायंत्रणा सुद्धा वाचली नाही. या सर्वात कुठलीही आतिशयोक्ती नाहीये. त्यामुळे ते प्रसंग भिडतात आणि आपल्याला चित्रपटाशी जोडतात.

दुर्दैव असे आहे की या सिस्टीम विरुद्ध लढून कोणी जिंकताना दाखवायचे असेल तर लॉजिक गहाण ठेऊन लार्जर than लाईफ दाखवण्याला पर्याय नाही. पण हा चार घटकांचा खोटा अनुभव देखील आपल्याला आनंद देतो हे तितकेच खरे आहे.

शाहरूखचे महिलांच्या जेलमध्ये जेलर असणे, सिस्टम विरुद्ध लढायला तेथील महिलांची टोळी बनवणे, त्याचे तिथल्या महिलांशी असलेले बॉण्डिंग आणि इमोशनल लव्हेबल प्रसंग जे शाहरूखलाच शोभावेत याचीही रेलचेल आहेच. त्यामुळे शाहरूखचे चाहते यातून सर्व प्रकारचा आनंद घेऊन बाहेर पडणार हे नक्की. एंटरटेनमेंटचा निकष लावता पिक्चरला नाव कुठे ठेवावे हा प्रश्न पडतो.

तरी हा कौतुक सोहळा आवरते घेत जाता जाता एवढेच सांगेन,
यू कॅन लव्ह शाहरूख
यू कॅन हेट शाहरूख
बट यू कॅन नॉट इग्नोर शाहरूख...
त्यामुळे त्याच्या चित्रपटाची नेहमी उलट सुलट चर्चा होतेच.
यात कोण त्याच्या बंडल चित्रपटाचे मुद्दाम कौतुक करते किंवा कोण त्याच्या चांगल्या चित्रपटावर मुद्दाम टिका करते हे समजेनासे होते.
तरी अशा गैरसमजातून कोणी चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट बघायचे टाळले तर त्यांच्याबद्दल वाईट वाटेल..
आणि म्हणूनच रात्रीचे तीन साडेतीन वाजता पोटतिडकीने हे लिहून काढले. कारण आपल्याला आलेला चांगला अनुभव लोकांशी शेअर करावा हाच नेहमी माझा परीक्षण लिहायचा हेतू असतो. धन्यवाद Happy

ता.क. - My First Movie date with daughter... या अनुभवामुळे कायम लक्षात राहील.. लव्ह यू शाहरूख .. बदाम बदाम बदाम !

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जवान पाहिला आज. सौदी इंडियन स्टाईल मसालापट आहे.
म्हाताऱ्या शारुकचा स्वॅग भारी आहे. सोबतीला डॅशिंग बीजीएम.

जवान म्हातारा दोघे शाहरूख भारी आहेत..
तरी बापाने जे रजनी बेअरिंग पकडले आहे त्याची हवा होते नंतर..

Happy birthday SRK
जवान नेट फलिक्स वर आला आहे....
चेक करा...

नसल्यास मला कळवा...

काय विनोदी आहे सिनेमाची सुरुवात. तो मिनिस्टर सी लिंक वरुन टाउन मध्ये पाच मिनिट ४२ सेकंदाच्या आत पोहो चतो!!! जम्मतच आहे बाई.
हिरवीन हिरॉइन गिरी जास्त करत आहे. निगोशिएशन कमी. फार्मर सुइसाइड चा मुद्दा मान्यच. पण मांडणी एकदम दाक्षिणात्य सिनेमाची.

मेट्रो म्हणून वडाळ्याची मोनो रेल दाखिवली आहे. सो स्टुपिड. बाकी परीक्षण जसे बघू तसे लिहू.

Totally.

थिएटरला बघायचा पिक्चर आहे..
>>
म्हणजे अजून बारकाईने चुका काढता आल्या असत्या

पण एकूणच लोकं कुठूनही कुठेही निमिषार्धात पोचतात, ट्रॅफिक जॅम वगैरे नसतं बहुतेक यांच्या जगात.
आणि यांना दारूगोळा कोण पुरवतं? का हे पण सेतुपती चे कस्टमर?

आणि मेट्रो पासून स्कॅनर पर्यंत इतकं सीमलेस टेक हॅकिंग, ते ही जेल मधून access होऊ शकणारे लिमिटेड रिसोर्सेस वापरून???
कै पण....

म्हणजे अजून बारकाईने चुका काढता आल्या असत्या
>>>

चुका काढत बघायचा पिक्चर नाही
थिएटर मध्ये एन्जॉय करायचा आणि घरी खुशी खुशी परत यायचे Happy

आणि मेट्रो पासून स्कॅनर पर्यंत इतकं सीमलेस टेक हॅकिंग, ते ही जेल मधून access होऊ शकणारे लिमिटेड रिसोर्सेस वापरून???
>>>

हेच हॉलीवूड ने दाखवले की आपण कौतुक करतो Happy

हेच हॉलीवूड ने दाखवले की आपण कौतुक करतो
>>
नाही रे... लॉजिक नसेल तर तिथेही नाही
बाँड पटांमध्ये भलती भलती गॅजेट्स बनवायला क्यू ब्रांच असल्याचं दाखवतात.
इथे बाप शाहरुख च्या (आणि त्याच्या टीम च्या) मोटारसायकल मधल्या तांत्रिक करामती कुणी केल्या??

अरे 'अभि तो मैं जवान हुं' आला का. मी 'बाळा गाऊ कशी अंगाई'ची वाट बघत होते. आईपेक्षा थोडेच लहान असलेल्या हिरोंचा कंटाळा आला आहे. समाधान एवढंच की नयनतारा 38 वर्षांची आहे व दोन मुलांची आई आहे. हिरविनीचे स्टिरिओटाईप मोडल्याचा आनंद झाला आहे. अभिनेत्रींचं करिअरच शेल्फ लाईफ वाढत जाओ. एकेदिवशी त्यांना कामाचा समान मोबदला मिळो.

समाधान एवढंच की नयनतारा 38 वर्षांची आहे
>>>
आणि दीपिका सुद्धा ३७ वर्षांची आहे Happy

मागेही मला माझा एक मित्र या नयनतारा बद्दल सांगताना म्हणालेला की ही नयनतारा तिथली लेडी सुपरस्टार आहे. ३८ वर्षांची आहे. वाटत नाही ना वगिरे...
तेव्हाही माझ्या हे लक्षात आले नव्हते पण आता वाचून सहज क्लिक झाले की दीपिका सुद्धा वयाने तेवढीच जास्त असावी. कारण तिचा पाहिला पिक्चर ओम शांती ओम शाहरूख सोबतच होता आणि तो मी बरेपैकी लहानपणी पाहिला होता.. म्हणून गूगल करून चेक केले तर ३७ वर्षांची निघाली.. पण आहे अशी की अजूनही बघताक्षणी प्रेमात पडावे Happy आता विषय निघाला म्हणून नाही हे लिहीत आहे तर माझा धागा सुद्धा होता तिच्यावर..

बाई दवे नुकताच जवान संपवला... घराचे होम थिएटर करून, लाईट वगैरे लाऊन माहोल करून.. सोफ्यावरच्या उश्या जमिनीवर टाकून आणि त्यावर चादर टाकून त्याची गादी करून त्यावर लोळत, जेवण झालेले असूनही मस्त ऑर्डर करून खात पित पाहिला..
अर्थात मी आणि लेकीनेच पाहिला.. कारण बायकोला तो बोर वाटलेला Proud असतात अशीही लोकं जगात.. पण माझ्याच घरात असावी Proud तरी समाधानाची बाब ही की लेकीने थिएटरला दोनदा पाहिला असूनही आज पिक्चर बघायला माझ्यापेक्षा कितीतरी जास्त एक्साईटेड तीच होती Happy

बाप रे! महा भयाण !! बकवास !! बघणे अशक्य झाले १५ -२० मिनिटापेक्षा. मला पठाण आवडला होता. करमणूक असेल तर थोडा फार देमारपणा चालतो मला. एक था टायगर पण करमणुकीचा होता.
पण हा?? हा टिपिकल म्हणजे अगदी टिपिकल साउथी स्टाइल चा पकाऊ भडक मूव्ही आहे. इतका पकाऊ + टाकाऊ की बोलण्याची सोय नाही.
मला वाटते आहे हा सिनेमा हिट झाला वगैरे पीआर चा प्रोपोगंडा असावा. किंवा साउथ मधे झाला असेल हिट. अ‍ॅवरेज बॉलिवुड पब्लिकने हिट केला वगैरे शक्य वाटत नाही.
अस्मिता, बघ बाई आणि येऊन दे एक रीव्ह्यू. Happy

मी काल वीस मिनटं पाहिला.. काय मस्त इन्ट्रो आहे शारूकचा..
वीस मिनटं खिळवून ठेवलेलं..आज बघेन पूर्ण.. मला बिन्डोक मसालापट हिरोगिरीवाले साऊथ सिनेमे पण आवडतात.

मला वाटते आहे हा सिनेमा हिट झाला वगैरे पीआर चा प्रोपोगंडा असावा. किंवा साउथ मधे झाला असेल हिट. अ‍ॅवरेज बॉलिवुड पब्लिकने हिट केला वगैरे शक्य वाटत नाही.
,>>>>>>>

इथे मुबई मध्ये तरी पब्लिक थिएटर मध्ये नुसते चेकाळलेले होते. फुलं शिट्ट्या टाळ्या असा माहौला होता. हा माझाच नाही तर बरेच जणांचा अनुभव आहे. आणि हे खरेच असे घडत होते. कारण पिक्चर साऊथ स्टाईल असला तरी हिरो आपला शाहरूख होता Happy

दोन तास पन्नास मिनिटे लांबीचा एकतर अतिशय मोठा आहे. त्यात कथानक वीस मिनिटात संपेल इतकं आहे , बाकीचे वीस तास मारामारी आहे. एकदा मधेच मी पॉज केलं तर टिव्हीवरच्या कोपऱ्यात 'एक्स्टेंडेड कट' दिसलं, प्राण कंठाशी आले होते, त्यात 'अब क्या बच्चे की जान लोगे क्या' झालं. दोन शाहरुख खान आहेत. एक मोठा आहे आणि एक छोटा आहे. हो, विक्रम आणि आझादमधे तेवढाच फरक आहे.

मोठ्या शाखा-विक्रमचा ट्रॅक सुरू झाला की माझं लक्ष उडालं. सेथुपतीनी हाणहाणहाणल्याने मोठ्या शाखाला 'याददाश्त खो गयी' झाले व एक्सप्रेशन नदीत वाहून गेले. डोळे फिरवून काहीतरी मिनिमम दाखवतो. मोठा शाखा जेव्हा तरूण होता, तेव्हा तो जितेंद्रचे कपडे घालून फिरत होता. पण तेव्हा तो स्वतंत्र पात्र- विक्रम वाटलाच नाही. देहबोलीत कसलाही फरक नाही, फक्त कपडे-केस बदलले. बाबा व मुलगा शाखा म्हणजे जस्टिस चौधरीच जणू. Proud तरूण शाखा -आझादलाच फॅन्सी ड्रेसमध्ये पाठवलंय असं वाटलं. दिपीका तर साडी नेहमीपेक्षा खाली नेसणारी निरूपा रॉयच. इतकं रडली आहे की ज्याचं नाव ते.

नयनतारा काहीही प्रभावी नाही. बांधा व उंची चांगली आहे. तिची तिच्यामुलीसोबत किंवा आझादसोबत कसलीही केमिस्ट्री दिसत नाही, फारच सुपरफिशियल वावरते. आपल्या मुलीला बाबा म्हणून आवडलेल्या माणसाशी लग्न करते, हे काय कारण आहे? उगाच बंदूक घेऊन इकडंतिकडं हिंडते. 'एक था टायगर'ची कट्रीना यापेक्षा कितीतरी सरस, चपळ आणि तडफदार वाटली होती. तिला आझाद तोच गुंड आहे, हे लक्षात कसं येत नाही. आपल्याला स्पष्ट ओळखू येत असतं. जुन्या काळी मस लावून आलं की ओळखू यायचं नाही, तसं हा तुटका मास्क लावून वेषांतर करत होता. वेषांतरही बेमालूमपणे न करता भाविकांना श्री श्री श्री शाखांचे थोडे दर्शन झालेच पाहिजे ह्या बेताने केले आहे. स्त्रियांचा तुरुंग हा एक लेडिज हॉस्टेलचा भाग वाटतो. अधुनमधून 'ऑरेंज ईज द न्यू ब्लॅक -इन निरूपा रॉय व्हर्जन' बघायला मिळते.

आझादची गर्ल गॅन्ग लेम आहे. ब्रह्मास्त्र मधली हिरोची गॅन्ग जितकी लेम होती तितकीच, फक्त यांना स्वतःची कथा आहे. त्यांची कथा मूळ कथानकात जोडून मरणांत पिळलं आहे. महाराष्ट्रीयन शेतकरी दाक्षिणात्य वाटत होता, त्याला विवस्त्र करून त्याचा अपमान केल्याने त्याने आत्महत्या केली असं दाखवलं आहे. पण स्वतः आझाद नंतर एका पोलिस ऑफिसरला विवस्त्र करून तुरुंगाबाहेर संजय दत्तकडे पाठवतो, ती मात्र गंमत आहे बरंका..! पुष्पा जसं गुंडाला स्त्रियांच्या रिस्पेक्टचं प्रवचन देऊन नंतर एका स्त्रीला हसण्याचे पाच हजार देतो. ह्या विरोधाभासाच्या शैलीत दाक्षिणात्य सिनेमांची हातोटी आहे. पण मग दांभिक प्रवचन तरी देऊ नका, उघडउघड उथळपणा करा.

संजय दत्त सिनेमात का आहे हे मला काही कळलं नाही. मधेच गर्ल गॅन्ग राजस्थानी मेकप करून ट्रक पळवते तेही कळलं नाही. फक्त डोळे बघत होते, मेंदू बंद पडला होता. सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे सिनेमात सुसूत्रता व सलगपणा नाही. रजनीकांतच्या सिनेमात (जेलर) मसाला असूनही सुसूत्रीकरण असल्याने तो सिनेमा म्हणून चांगला-एन्गेजिंग वाटला होता. त्यातला विनोदही बरा होता. इथं टायमिंग जाम गंडलं आहे. सेथुपतीला विक्रम सॅन्टा क्लॉज म्हणतो तो पंच बघा. भट्टी जमली नाही . कुठल्याही पात्राला कसलीही रेंज/हाय-लो नाही. एकसारखे वागतात. सेथुपतीला राग आला की तो चंची काढून मॅट्रिक्स सिनेमातल्या लाल-निळ्या गोळ्या खातो-खाऊ घालतो. ओठांची माफक हालचाल करून संवाद व गाणी म्हटल्यासारखी वाटली -रामसेंच्या भुतांची आठवण झाली. मूळ कथानकाला इतके पाय फुटले आहेत की ते अळीसारखं वळवळत रहातं. मी असह्य झाल्याने शेवटापर्यंत बघू शकले नाही. क्रिं-जवान..!

फक्त यांना स्वतःची कथा आहे
>>
सगळ्यांना नाहीच, फक्त फेमस पोरींना
गिरिजा ओक फेमस नसल्याने तिला नाही

संजय दत्त सिनेमात का आहे
>>
माधवन नामक (तमिळ / मल्लू नाव) इसम म्हणतो की माझी बायको केरळ ची आहे, अन् मला ओणम साद्या खायला घरी जायचं आहे... कै पण

सौदिंडियन डायरेक्टर चा रिजनल अँगल पण कुचकामी च आहे...

हो, तिघींना आहे व बाकी तिघींना असल्याची गृहित धरायचं आहे, असं एकुण 'मां-बहन' प्रवचनावरुन लक्षात आलं. ऑरन्ज इज द न्यू ब्लॅक इन निरूपा रॉय व्हर्जन. Happy

शेतकर्‍याच्या आत्महत्येनंतर त्याच्या बायकोचे मंगळसूत्र बँकेचा अधिकारी हिसकावून नेतो ?? का ही ही. नाही, म्हणजे दाखवा निर्दयी सिस्टीम पण बँक अधिकार्‍याला असं फिजिकल कशाला व्हायला लावता Lol
जेलमधल्या मुली अशा नाजूक सुंदर वेल ग्रूम्ड का? त्यांचे कपडे असे स्वच्छ स्टायलिश का? हे फार लांबचे प्रश्न आहेत. गाणी पण किती बेक्कार.
यापेक्षा पुष्पा नक्कीच बरा होता मग Happy निदान नाच गाणी मस्त होती.

जुन्या काळचा लालाच आहे ऑफिसर. आता मंगळसूत्र 'छिनून' घेतलेलं बघितल्यावर डोळ्यात पाणी येणारी पिढी राहिली नाही. 'बेनटेक्सच असेल दुसरं येईल त्यात काय' वाटतं.

Pages