५०-६०-७० चे दशक हिन्दी चित्रपटसन्गिताचा सुवर्णकाळ होता. प्रतिभावान सन्गितकार, गायक, कवी या सर्वांनी मिळुन प्रेम, विरह, भक्ती, समर्पण अशा विवीध प्रकारच्या गाण्यांचा नजराणा आपल्याला पेश केला. पण सर्वात प्रसिद्ध होती ती एकमेकांचे चारचौघात वाभाडे काढणारी गाणी.
विश्वास नाही ना बसत? बघा तर मग...
एखादे राजेशाही घर असते, ऐपतीप्रमाणे ते सजवलेले असते, चिरुट किंवा सिगार ओढणारे [हिं.चि. नियम क्र.१ श्रीमंत माणसे सिगारेट ओढत नाहीत, फक्त चिरुट/सिगार.] पिताजी/डॅडी/चाचाजी असतात, प्रसंगानुरुप सजलेली नायिका असते, तिच्या मैत्रिणी असतात, एक रुबाबदार (विलायतसे लौटा हुआ डॉक्टर/इंजिनीअर/कारखानदार/गेला बाजार पिताजी/डॅडी/चाचाजी के बचपनके दोस्त का बेटा) तरुण असतो, आणि पुढे घडणार्या प्रसंगांना साक्षीदार व्हावेत म्हणुन की काय ५-५० पाहुणे आलेले असतात. अशावेळी उंची पोशाख केलेला एक आगंतुक येतो, नायिकेची आता चुळबुळ सुरु होते. तिची एखादी जिवश्चकंठश्च मैत्रिण तिचा अलगद येउन खांदा दाबते. चाणाक्ष वाचकांनी आतापर्यंत ओळखले असेलच की हा नायक आहे. [हिं. चि. नियम २ तुम्ही नायक असाल तर तुम्ही डॉक्टर/कारकुन/ड्रायव्हर/बेरोजगार काहीही असा, तुम्ही मैफिलीत येताना सुटबुटातच येता.] त्याची जणु वाट बघत असल्याप्रमाणे पिताजी/डॅडी/चाचाजी त्याची आधीच्या तरुणाशी ओळख करुन देतात आणि बॉम्ब टाकतात की मैने अपनी प्यारी बेटी/भांजी की शादी/ सगाई इसके साथ तय की है. आलेला नायक जर दिलीपकुमार कॅटेगरीमधला असेल तर तो डोळ्यावर अचानक प्रकाशझोत पडलेल्या हरणासारखा जागच्याजागी स्तब्ध होतो. आणि तो जर प्रदीपकुमार, मनोजकुमार कॅटेगरीतील असेल तर आपण सुटकेचा निश्वास टाकतो की बरं झालं बाई, नायिकेने अशोक कुमार, प्राण किंवा किंवा असाच कुणीतरी सेन्सिबल माणुस गाठला.
इथपर्यंत सगळं सुरळीत चाललेलं असतं. तेवढ्यात जमलेल्या ५-५० जणांपैकी कुणालातरी आत्तापर्यंत आपल्याला स्क्रीनटाइम आणि डॉयलॉग न मिळाल्याचे वैषम्य येते. तो डिक्लेअर करतो की इस खुशीके मौकेपर गाना हो जाना चाहिये. [हिं. चि. नियम ३ तुम्ही स्त्री/पुरुष/इतर काहीही असा, तुमचा पोटापाण्याचा उद्योगधंदा काहीही असो, तुम्ही शीघ्रकवी+गायक असणे गरजेचे आहे.]
ऑन दॅट क्यु, नायक स्टॅच्यु पोझिशनमधुन बाहेर येतो अन काय आश्चर्य, गायला सुरुवात करतो. (नायिकेचे लग्न ठरत असण्याच्या/त्याच्या बेकारीच्या काळात त्याने घरी बहुधा सराव केला असावा. या काळात नायिकेच्या पि/डॅ/चा ना पटवण्याचा प्रयत्न केला असता तर ये नौबत न आती. असो.)
बरं गाणे वगैरे एक वेळ ठीक आहे, पण तुझे नायिकेवर प्रेम आहे ना, मग तिला सर्वांसमोर शालजोडीतले कशाला? कोपर्यात घेउन विचार ना की अचानक का बुवा बेत बदलला? हवे तर पुढे काय करायचे याची हींट दे. पण छे! अर्जुनाला जसा पक्ष्याचा डोळा दिसत असतो, तसा त्याला आता नायिकेचा पाणउतारा दिसत असतो.
वानगीदाखल ही गाणी पहा....
भिगी रात मधे मीनाकुमारी आणि उमद्या अशोक कुमारच्या भावी लग्नाची पार्टी आहे. तिथे येउन टपकलाय प्रदीप कुमार आणि म्हणतोय काय तर, "दिल जो न कह सका वही राज-ए-दिल कहने की रात आयी"
का? ज्योतिष्याने मुहुर्त काढुन दिला होता का आजचा? बरं, एखादं कडवं म्हणुन झाल्यावर थांबावं, जरा आजुबाजुच्या परीस्थितीचा अंदाज घ्यावा, कुठलं? इकडे अशोक कुमारची भुवई चढलेय, मीनाकुमारीला रडु कोसळतयं आणि हा आपला गातोय "मुबारक तुम्हे किसी की लरजती सी बाहों में रहने की रात आयी". अरे असं नसतं, छान रांगा-बिंगा लावुन, स्टेजवर जाउन, फोटो-बिटो काढुन मुबारकबात दयायची असते.
नाहीतर हा मनोजकुमार आदमीमध्ये. दिलीपकुमार सुटाबुटात पियानो आळवत वहिदा रेहमानला सांगतोय
"कैसी हसीं आज बहारों की रात है, एक चांद आसमा पे है, एक मेरे साथ है"
तिला जरा अटेन्शन एन्जॉय करु दे ना. तु कशाला मध्ये तोंड घालतोयस? तुझा मित्र किती आनंदी आहे, बघवत नाहीये का? त्यालाच सांगतोय "मेरी खुशी भी आप के दामन मे आ गयी". तरी बरं दिलीप कुमार आपल्याच धुंदीत आहे आणि त्याचं मनोजकुमारकडे लक्ष नाहीये.
आणि आदमीमध्ये वहिदाला पुरेसा त्रास नाही दिला वाटतं, पत्थर के सनम मध्ये परत तेच?
"तुझे हमने मोहोब्बत का खुदा जाना, बडी भूल हुई" झाली ना चुक, मग सुधार आता. एवढी छान मुमताज घुटमळतेय आजुबाजुला. मैफिलीत छद्मी हसणारा प्राण आणि ललिता पवार आहेत. जीव नकोसा करतील ना ते वहिदाचा. वरतुन मानभावीपणा आहेच. "शीशा नही सागर नही, मंदीर सा एक दिल ढाया है"
गेल्यावेळी दिलीपकुमारच्या मैफिलीत रंगाचा बेरंग झाला होता, त्यावरुन तो काही शिकेल? नाव नका काढु. राम और श्याम मधे तोही तेच करतोय. "कल तेरी बज्म से दीवाना चला जायेगा". अरे मग वाट कशाची बघतोयस? काय तर म्हणे "तुने लेकिन ना मेरा राज-ए-मोहोब्बत समझा, तेरी आंखोने मेरे प्यार को नफरत समझा" अरे बाबा नक्की ठरव काय ते तिने तुला सोडलय का तिला काही समजत नाही म्हणुन तु जातोयस.
प्रेमीजनांमधे थोडेफार गैरसमज असंतील तर एक वेळ क्षम्य. पण जब जब फुल खिले मधल्या या शशी कपुरचं काय करावं? स्वतःच्या घरातल्या पार्टीत हा गातोय की
"तेरी बाहों में देखु सनम गैरो की बाहें, मै लाउंगा कहा से भला ऐसी निगाहे"
अरे बायको ना ती तुझी. थोडातरी विश्वास ठेव. निदान घरातले पाहुणे-बिहुणे गेल्यावर तरी बोल काय बोलायचे ते.
आणि ५० वर्षांनंतर याच सिच्युएशनवर राजा हिंदुस्तानीमधे आमिर खान पण तेच करतोय? अरे निदान आधीचा पिक्चर तरी बघायचा रे.
शशी कपुरला बहुतेक नायिकेला टोमणे मारण्यात मजा येत असावी कारण आ गले लग जा मधेही तेच. म्हणे
"अपना है क्या, चाहे जिए मरे कुछ हो, तुझ को तो जिना रास आ गया"
शर्मिला कावरीबावरी होउन फिरतेय आणि शत्रुघ्न सिगरेटीवर सिगरेटी फुंकतोय, नशिब ओरडला नाही 'खामोश' म्हणुन.
त्याचाच भाउ शम्मि. तो ही काही मागे नाही या बाबतीत. 'ब्रह्मचारी'मधे नायिका खुश आहे, त्याला गाणे ऐकवायला सांगतेय तर म्हणे "मत हो मेरी जां उदास"
उरला ज्येष्ठ बंधु राज, त्याने तरी कशाला आवर घालावा आपल्या भावनांना? 'अनाडी'मधे नुसतीच आपली पार्टी आहे, कुठली सगाई नाही, कुणी प्रतिस्पर्धी नाही, नुतनने त्याला सोडलेही नाही. तरी पण हा म्हणतो की "मेरे दुखते दिल से पुछो, क्या क्या ख्वाब सुनहरें देखे" आनुवांशिक रोग आहे का या कपुर घराण्याला?
एखादीला चारचौघात शालजोडीतले मारण्याचा मोह तरी किती असावा? देव आनंद ज्याने मधुबाला, वहिदा, नुतन यासारख्या सुंदर नायिकांशी प्रणयाराधन केलेय, त्याने गॅम्बलरमधे "दिल आज शायर है" गाउन जाहिदाला जाहिर त्रास द्यावा?
या रोगाची पुढची अवस्था आहे, स्टेजवरुन प्रेयसीचा (बचपनच्या हं) जीव नकोसा करणे जसे की
"क्या हुआ तेरा वादा" अरे लहानपणी तू जे तुणतुणे वाजवत होतास, त्यावरुन तिने तुला आत्ता ओळखावे का? ते सुद्धा ऋषी कपुरसारखा प्रॉस्पेक्ट समोर असताना?
नायिकाही मागे नाहीत बरं का!
वहिदाला इतक्या जणांनी सुनवलेय की तिने बहुतेक सुड म्हणुन 'रंगिला रे' केले असावे. देव आनंदवर काही परीणाम आहे का त्याचा? त्याच्या चेहर्यावर तर आश्चर्याचे भाव आहेत. जाहिदा वैतागलीय पण तिला विचारतो कोण?
तेच बहुतेक मीनाकुमारीचे झालेय. तिने तरी किती ऐकुन घ्यावे "रंग और नुर की बारात" वगैरे. मग तिही राजकुमारच्या लग्नाच्या पार्टीत म्हणणारच ना "किसी के इतने पास हो के सब से दुर हो गये"
राजकुमार मात्र खजिल झालाय. साहजिकच आहे, मीनाकुमारीला सोडुन नादिराशी लग्न केल्यावर दुसरे काय होणार?
माला सिन्हाचे मात्र नशिबच फुटके. तिने एखादा अशोक कुमार किंवा रहेमान बघुन लग्न करावं, तर सभ्य म्हणुन ओळखले जाणारे सुनिल दत्त किंवा गुरु दत्त तिच्या सासरी जाउन गाणी म्हणणार "चलो एक बार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो" आणि "जाने वो कैसे लोग थे जिनके प्यार को प्यार मिला"
अजनबी बनायचे आहेच तर मग मुळात ओळख का दाखवायची? आणि गुरु दत्त म्हणणार की "उफ्फ न करेंगे लब सी लेंगे आसु पी लेंगे". बोले तैसा चाले वगैरे माहीत नाही का रे तुला?
मग तिने बिचारीने अशाच एखाद्या वेळी धर्मेन्द्रला सुनावले
"गैरो पे करम अपनो पे सितम, ऐ जान-ए-वफा ये जुल्म ना कर" तर काय चुकले?
आता नायक-नायिकेचं दोषारोप प्रकरण सुरु असताना, इतर लोक ठोंब्यासारखे उभे असतात आणि गाणं संपल्यावर टाळ्या वाजवतात. मान्य आहे की रफी/लताच्या मखमली आवाजाने एक वेगळीच गुंगी येते. किंवा त्या काळी भारतातली असहिष्णुता वाढली नसावी कदाचित. नाहीतर अशा प्रसंगात जनरली आप्त(मित्र)गण हिंसक प्रव्रुत्तीचे दर्शन घडवायला उत्सुक असतात.
अलिकडे मात्र अशी गाणी कमी झाली आहेत हे खरं. नायिकाही खमक्या झाल्या आहेत. केलाच कुणी लग्नसमारंभात "अच्छा चलता हुं, दुआओं में याद रखना" म्हणण्याचा प्रयत्न तर सरळ हात धरुन बाहेर काढतात.
"कालाय तस्मै नमः", दुसरे काय?
वि. सु. : हा लेख माझ्या पर्सनल ब्लॉगवर पूर्वी प्रकाशित झालेला आहे.
काय 'चाबुक' लिहीलय. खूप खूप
काय 'चाबुक' लिहीलय. खूप खूप आवडलं. निवडक १० त.
ते एक आहे ना अर्जुन रामपाल चं
ते एक आहे ना अर्जुन रामपाल चं
त्यात जय तूने तोडा मेरा दिल, तेरा दिल टुटेगा
आणि मेरे बाद अब किसको बरबाद करेगी असे शब्द आहेत.जनरली कोणा मुलीच्या लग्नात(का एंगेजमेंट मध्ये) असं गाणं गायलं तर दात पडतील.
मस्त धागा. वाचता वाचताच"तू
मस्त धागा. वाचता वाचताच"तू औरों कि क्यूंहो गई " कानात वाजायला लागलं होतं.
पण ते नेमकं अशा धाग्यांव र सहसा न फिरकणार्या आणि अ आणि त ची मारामारी असलेल्या आयडीने दिलं इथं.
“आजच्या काळात असे चित्रपट
“आजच्या काळात असे चित्रपट चालतील तरी का.” - ओम शांती ओम चा प्लॉट हाच आहे.
>>>मेरे बाद अब किसको बरबाद
>>>मेरे बाद अब किसको बरबाद करेगी असे शब्द आहेत.जनरली कोणा मुलीच्या लग्नात(का एंगेजमेंट मध्ये) असं गाणं गायलं तर दात पडतील.>>>
दादा कोंडके बॅन्ड पथकात असताना एका लग्नात वरात निघाल्यावर चांगली गाणी वाजवा असे सांगितले. एरवी ते लग्नकार्यात सुसंगत गाणी वाजवत ( जा मुली जा सारखी ) पण त्यांनी मुद्दाम हे वाजवलं...
दिल में छुपाके प्यार का तुफान ले चले
हम आज अपनी मौत का सामान ले चले
आणि मार खाल्ला...
अरे कसलं भारी लिहिलय सगळी
अरे कसलं भारी लिहिलय सगळी गाणी अगदी नीटच आठवली. ही गाणी सगळ्या तपशीलांसह गुजत रहातात मनात. मजा म्हणून ठिक पण खोल आतवर दुखावत रहातात. जखम नाही का जरा कुरवाळली की हुळहुळते, दुखते पण तरी बरं वाटतं, तसं काहीसं फिलिंग.
माझेमन, तुम्हाला ही गाणी इतकी आवडतात की तपशीलांसह लक्षात आहेत न, अगदी माझ्यासारखी
@अतूल हे "तू औरोंकी क्यो हो
@अतूल हे "तू औरोंकी क्यो हो गयी" हे गाणे मला एकेकाळी आवडायचे. एकाने कॉलेजमध्ये दिव्य आवाजात ऐकवल्यानंतर मला आवडेनासे झाले. अवांतर : त्या गाण्यातील हिरो म्हणजे देब मुखर्जी हा जॉय मुखर्जीचा भाऊ. ह्या देब मुखर्जीला "जो जिता वही सिकंदर" मध्ये राजपुत कॉलेजच्या कोचच्या रोलमध्ये शेवटचे पाहिले होते. (सध्याच्या काळातील दिग्दर्शक अयान मुखर्जी हा ह्याच देब मुखर्जीचा मुलगा).
Submitted by योगी९०० on 20 May, 2020 - 13:20 >>>>> देवेन मूर्खजी असेल. देव मूर्खजी हा त्यांचा मोठा भाऊ. नमकहलाल मधला मिस्टर तीन छक्के. मूर्ख राणीशी काहीतरी कनेक्शन आहे यांचे.
देवेन मूर्खजी असेल. देव
देवेन मूर्खजी असेल. देव मूर्खजी हा त्यांचा मोठा भाऊ. नमकहलाल मधला मिस्टर तीन छक्के. मूर्ख राणीशी काहीतरी कनेक्शन आहे यांचे.
Submitted by रघू आचार्य on 18 September, 2023 - 07:22
नमक हलाल चा तीन छक्के हा "देव कुमार", देव मुखर्जी नाही.
जॉय मुखर्जी आणि देब मुखर्जी (कितने अटल थे वाला )भाऊच दोघे,
ओम शांती ओम चा प्लॉट हाच आहे.
ओम शांती ओम चा प्लॉट हाच आहे.--ओम शांती ओमही बंडलच होता शाहरुख ,दीपिका ,बरे डायलॉग बर्यापैकी गाणी नसती तर कुणी डुंकूणही पाहिलं नसतं हिमेश च्या कर्ज (नवीन) सारखं.
पुनर्जन्मावरचे पिक्चर आता चालत असते तर सुशांत सिंग राजपूत चा "राबता" साफ पडला नसता.
नवीन (म्हणजे तशी जुनीच) काही
काही नवीन (म्हणजे तशी जुनीच) पार्टी पूपर गाणी सापडली.
'सच मेरे यार है' हे माझ्या आठवणीतले आद्य पार्टी पूपर. कमल हसनचा अभिनय, बालसुब्रमण्यमचा आवाज अगदी परफेक्ट. फरक एवढाच की इथे ऋषी कपूर आहे आणि तो हुशार असल्याने त्याला शेवटच्या ओळीत का होईना काहीतरी गडबड आहे हे समजते.
वो ख़ुशी मिली है मुझको - जितेंद्रच्या पार्टीत राजकुमार रफीच्या आवाजात गातोच आहे. तलवार कट मिशी लावल्याने आधीच बावळट दिसणारा जितू ह्या गाण्यावर आनंदी असण्याचा अभिनय करून बावळटपणा सिद्ध करतो. फक्त हिरॉईन माला सिन्हा समस्त स्त्रीवर्गासमवेत परदे के पीछे असल्याने गाणे कुठल्याही बाईला अप्लाय करता येईल अशी तरतूद डायरेक्टरने करून ठेवलीय. राजकुमाराने केस नीट विंचरले असते तर आऊटकम वेगळे असते का असा विचार सध्या मनात येतोय.
आता ही दोन गाणी ऐकल्यामुळे युट्यूबने माझ्या न झालेल्या प्रेमभंगासाठी उपयुक्त असे इतरही नमुने (गाण्यांचे हो) दाखवायला सुरुवात केली आहे.
भरी दुनिया में आखिर - रफीच्या आवाजात मनोज कुमार, पार्टी, पियानो, सजलेली आशा पारेख आणि प्राण. बाकी काय सांगायची गरज आहे का? धुतले कसे नाही मनोज कुमारला लोकांनी एवढाच प्रश्न आहे.
आणि एक गाणे पुरेसे नाही म्हणून तोच चित्रपट, तीच लोकं, घराऐवजी रेस्तरॉं, पियानोऐवजी माईक, विथ मंगळसूत्र आशा पारेख आणि विना मंगळसूत्र सिम्मी गरेवाल आहे.
या दिग्दर्शकासाठी इंडियन पीनल कोड पुरेसा नाही..गरुडपुराण आणा रे कोणीतरी...
तसलेच आया है मुझे फिर याद आणि कोणीतरी लिहिलंय
मागे या टाईप चे एक धर्मेंद्र चे होते आता आठवत नाहीये. बहुतेक त्यात नवरा म्हणून देवेन वर्मा बसलेला असतो आणि हा हीरो त्याला एवढा डेंजर लुक देत असतो संपूर्ण गाणंभर की तो शेवटी उठून निघून जातो >>>
ते बहारों ने मेरा चमन लूटकर
कधी कॉमिक रिलीफ हवा असेल तर क्या मिलिए ऐसे लोगों से पहा. काय डान्स आहे...
फॅमिली गॅदरिंग्स पण सोडत नाहीत असली चिवट लोकं - गीत गाता हूं मैं
फॅमिली गॅदरिंग्स पण सोडत
फॅमिली गॅदरिंग्स पण सोडत नाहीत असली चिवट लोकं >>>
तलवार कट मिशी लावल्याने आधीच
तलवार कट मिशी लावल्याने आधीच बावळट दिसणारा जितू ह्या गाण्यावर आनंदी असण्याचा अभिनय करून बावळटपणा सिद्ध करतो. >>>> लॉल हे गाणं पाहावं लागेल
तू औरों कि क्यू हो गई
तू औरों कि क्यू हो गई
आलंय का हे चेक करत होतो.
असे गाणे कोट्यवधी वर्षातून एकदाच होते. संगीताच्या इतिहासात असे गाणे ना झालेय, ना होईल.
ज्यांना असे अनुभव नाहीत त्यांना ते आक्रंदन समजणार नाही. ज्यांच्या वर ही वेळ आली त्यांच्या या भावना हे गाणे चीख चीख के बयॉं करते.
ज्यांच्या वर अशी वेळ सरासरी दिवसाआड आली आहे ते हे गाणं कसं विसरू शकतात?
एखाद्या भूताला घाबरण्याऱ्या इसमासाठी हनुमान स्त्रोताचे जे महत्व तेच महत्व, अव्यक्त राहिलेली प्रेमं नियमितपणे इतरांची होताना पाहिलेल्यांना या गाण्याचे आहे.
'तू औरों कि' वाल्या
'तू औरों कि' वाल्या चित्रपटातले 'रूप तेरा ऐसा' हे तर भर मंडपात लाऊड स्पीकरवर ऐकवलेय.
आणि संजीव कुमारसारखा सभ्य माणूसही भर पार्टीत 'मेरी भीगी भीगी सी' म्हणतो. कलियुग आलेय हेच खरे.
कधी कॉमिक रिलीफ हवा असेल तर
कधी कॉमिक रिलीफ हवा असेल तर क्या मिलिए ऐसे लोगों से पहा. काय डान्स आहे...>>>> बापरे काय आहे हे रत्न!
धर्मेंद्र पुर्ण वेळ त्या माईकशी फारकत घेऊन उभा आहे. डान्स तर धन्यवाद... तो धोतरवाला किती सेन्शुअस हालचाली करतोय
ते कपल्स नाचताना बायका खाली का लोळतायत... धमाल आहे.
क्या मिलिए ऐसे लोगों से पहा
क्या मिलिए ऐसे लोगों से पहा
भयानक ! कपडे बंडी /धोतर्/नऊवारी/लेहेंगा आणे स्टेप्स मात्र बॉल डान्स च्या. क्रीम रोल आंबाडीची चटनी सोबत खाणे.
अरेच्चा ! याच पानावर सप्टेंबर
अरेच्चा ! याच पानावर सप्टेंबर पासून तिसरा प्रतिसाद एकाच गाण्यावर दिलाय मी.
लक्षात राहत नाही आताशा !!
तो धोतरवाला किती सेन्शुअस
तो धोतरवाला किती सेन्शुअस हालचाली करतोय>>> पाहिलच शेवटी क्या मिलिये गाणं खरंच त्या धोतर वाल्याचं काय वेगळंच गणित गाणं काय आणि ह्याचं काय! मुळात सगळ्यांचा ड्रेस, डान्स काही म्हणता काही त्या इल्जाम टाईप गाण्याच्या म्युजिक ला शोभत नाहिये.
कोणी पार्टी ला अश्या थीम वर गाणं का ठेवेल? की बायका खूप लबाड असतात, असली चेहरा लपऊन नकली चेहरा घेऊन २-२ जणांना फिरवतात
डांसर्सः १ सेट ऑफ बायका & २ सेटस ओफ जोडिदार्स
मी पण पाहिलं मुद्दाम गाणं!
मी पण पाहिलं मुद्दाम गाणं!
माईक पासून पूर्णच फारकत घेऊन ....!
ते नाचणारे लोक फारच धमाल आहेत..
एकतर साधू टाइप भगवा ड्रेस घालून तशाच भगवी वस्त्र ल्यायलेल्या तरुणी सोबत नाचतोय!!!
15 august chi party asel .
15 august chi party asel .
मी पण आत्ता पाहिले ते क्या
मी पण आत्ता पाहिले ते क्या मिलिए ... गाणे. अक्षरशः डोळ्यातून घळा घळा पाणी यायला लागलं हसून !
एक जण सूट घालून आणि त्यावर पार्टी हॅट घालून नुसताच गोंधळुन उभा आहे. धोतरवाल्याच्या सेन्शुअस स्टेप्स.. लोळणार्या बायका,
रफीने असली सूरत गाताना वेगवेगळ्या शेड्स वगैरे आणल्यात आवाजात पण धरम पाजी ते गाताना चुकूनही काही भाव दाखवत नाहीये. माइक ला असा हँडपम्प सारखा तिरका का केलाय तेही कळत नाही
>>> क्या मिलिए ऐसे लोगों से
>>> क्या मिलिए ऐसे लोगों से
या गाण्याची सिच्युएशन काय असू शकेल हे मला प्रयत्न करकरूनही इम्याजिन करता येत नाहीये!
एक पुतळा महात्मा फुल्यांचा वाटला, एक माइकसमोर धर्मेंद्रचा, तिसरा कोणाचा ते कळलं नाही.
माइक ला असा हँडपम्प सारखा
माइक ला असा हँडपम्प सारखा तिरका का केलाय तेही कळत नाही Happy>>> काय बिशाद धरमपाजी त्याला तोंडाजवळ धरतील
हिमेशच्या माईक धरण्याचे उगमस्थान .. लोल
माइक ला असा हँडपम्प सारखा
माइक ला असा हँडपम्प सारखा तिरका का केलाय तेही कळत नाही >> भविष्याची नांदी सूचित केली आहे तिथे. मी जसा गाण्याच्या मूडशी नि गायकच्या हरकतींशी फारकत घेऊन गाण्याचा मूड उखडला आहे आहे तसाच माझा मुलगा मोठा झाल्यावर हँडपम्प उखडेल ह्याची नांदी केली आहे.
बाकी १:५० ते २:०५ ह्या वेळातल्या डान्स स्टेप्स नि बाकांचे एका पार्ट्नर कडून दुसर्या कडे ट्रांझीशन झाल्यावर सुटे पार्टनर जे काही करतात ते बघाच.
तू औरों कि क्यू हो गई
तू औरों कि क्यू हो गई
आलंय का हे चेक करत होतो.
असे गाणे कोट्यवधी वर्षातून एकदाच होते. संगीताच्या इतिहासात असे गाणे ना झालेय, ना होईल. >> एकदम आचार्य ! आठवड्याला एक प्रेमभंग होणार्या बिल्डींगमधल्या एकाचे हे आवडते गाणे होते. दर संध्याकाळी सुट्टा घेऊन भकास चेहरा ठेवत टेरेसवर आमचा गल्ली देवदास हे लावून असायचा. त्याचा एकंदर टेरेसवर घालवला जाणारा वेळ बघता हे प्रेम नि प्रेमभंग एकतर्फी असणार असे नेहमी वाटत असे. (आम्ही वयाने लहान असल्यामूळे आमच्याशी हे डिस्कशन होत नसे) त्याच्या लग्नात हेच गाणे मुद्दामहून दहा वेळा लावलेले तरी आठवते.
असामी,
असामी,
त्याच्या लग्नात हेच गाणे
त्याच्या लग्नात हेच गाणे मुद्दामहून दहा वेळा लावलेले तरी आठवते. >>>> असामी, लग्नात हे गाणं
पायसने सांगितल्याप्रमाणे
पायसने सांगितल्याप्रमाणे नर्गिसला बहुतेक दिलीप कुमारला फ्रेंडझोन करायची आणि दिलीपला भर पार्टीत आपले दुःख गाऊन दाखवायची सवय झाली आहे. बरं दिलीपला माहितेय कि आपण पार्टीत आलोय पण काही विचार? छे. परिणामी आपल्याला 'देख लिया मैने' झेलावे लागते आणि अशोक कुमारला सिगारेटी फुकाव्या लागतात.
लहानपणी आमच्या कडे मोहम्मद
लहानपणी आमच्या कडे मोहम्मद रफिची एक कॅसेट होती त्यात एक गाणे होते 'मेरे दुश्मन तू मेरी दोस्ती को तरसे' : ( बाप रे ते गाणं म्हणजे टोटल रेड फ्लॅग जिल्टेड लव्हर गाणं होत. अक्खा गाणं भर हिरो हिरोईन ला हिंदी, उर्दू, साध्या,अवघड अशा हर प्रकारच्या भाषेत फक्त शापत आणि शापत राहतो. तेव्हा रामायण, महाभारत मध्ये ऋषीं कसे ॐ फट करत शाप द्यायचे पण एकदाच. या गाण्यात अख्खा अंतरा मुखडा शापवाणीने भारलेला आहे.
पक्षासाठी राबून पण ऐनवेळी
पक्षासाठी राबून पण ऐनवेळी दुसर्याला तिकीट मिळालेला इच्छुक आणि आपलं पाखरू कमावत्या इच्छुकाने उडवल्याने दु:खी असलेला नायक यांची अवथा वेगळी नसते. ( हे लिहीताना राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आलेल्या आणि आता भाजपवासी झालेल्या नवनीत राणा यांच्या बद्दल त्या पक्षाच्या भावना सुद्धा "तू औरों कि क्यू हो गयी" अशाच असतील हे मनात आलं).
Pages