५०-६०-७० चे दशक हिन्दी चित्रपटसन्गिताचा सुवर्णकाळ होता. प्रतिभावान सन्गितकार, गायक, कवी या सर्वांनी मिळुन प्रेम, विरह, भक्ती, समर्पण अशा विवीध प्रकारच्या गाण्यांचा नजराणा आपल्याला पेश केला. पण सर्वात प्रसिद्ध होती ती एकमेकांचे चारचौघात वाभाडे काढणारी गाणी.
विश्वास नाही ना बसत? बघा तर मग...
एखादे राजेशाही घर असते, ऐपतीप्रमाणे ते सजवलेले असते, चिरुट किंवा सिगार ओढणारे [हिं.चि. नियम क्र.१ श्रीमंत माणसे सिगारेट ओढत नाहीत, फक्त चिरुट/सिगार.] पिताजी/डॅडी/चाचाजी असतात, प्रसंगानुरुप सजलेली नायिका असते, तिच्या मैत्रिणी असतात, एक रुबाबदार (विलायतसे लौटा हुआ डॉक्टर/इंजिनीअर/कारखानदार/गेला बाजार पिताजी/डॅडी/चाचाजी के बचपनके दोस्त का बेटा) तरुण असतो, आणि पुढे घडणार्या प्रसंगांना साक्षीदार व्हावेत म्हणुन की काय ५-५० पाहुणे आलेले असतात. अशावेळी उंची पोशाख केलेला एक आगंतुक येतो, नायिकेची आता चुळबुळ सुरु होते. तिची एखादी जिवश्चकंठश्च मैत्रिण तिचा अलगद येउन खांदा दाबते. चाणाक्ष वाचकांनी आतापर्यंत ओळखले असेलच की हा नायक आहे. [हिं. चि. नियम २ तुम्ही नायक असाल तर तुम्ही डॉक्टर/कारकुन/ड्रायव्हर/बेरोजगार काहीही असा, तुम्ही मैफिलीत येताना सुटबुटातच येता.] त्याची जणु वाट बघत असल्याप्रमाणे पिताजी/डॅडी/चाचाजी त्याची आधीच्या तरुणाशी ओळख करुन देतात आणि बॉम्ब टाकतात की मैने अपनी प्यारी बेटी/भांजी की शादी/ सगाई इसके साथ तय की है. आलेला नायक जर दिलीपकुमार कॅटेगरीमधला असेल तर तो डोळ्यावर अचानक प्रकाशझोत पडलेल्या हरणासारखा जागच्याजागी स्तब्ध होतो. आणि तो जर प्रदीपकुमार, मनोजकुमार कॅटेगरीतील असेल तर आपण सुटकेचा निश्वास टाकतो की बरं झालं बाई, नायिकेने अशोक कुमार, प्राण किंवा किंवा असाच कुणीतरी सेन्सिबल माणुस गाठला.
इथपर्यंत सगळं सुरळीत चाललेलं असतं. तेवढ्यात जमलेल्या ५-५० जणांपैकी कुणालातरी आत्तापर्यंत आपल्याला स्क्रीनटाइम आणि डॉयलॉग न मिळाल्याचे वैषम्य येते. तो डिक्लेअर करतो की इस खुशीके मौकेपर गाना हो जाना चाहिये. [हिं. चि. नियम ३ तुम्ही स्त्री/पुरुष/इतर काहीही असा, तुमचा पोटापाण्याचा उद्योगधंदा काहीही असो, तुम्ही शीघ्रकवी+गायक असणे गरजेचे आहे.]
ऑन दॅट क्यु, नायक स्टॅच्यु पोझिशनमधुन बाहेर येतो अन काय आश्चर्य, गायला सुरुवात करतो. (नायिकेचे लग्न ठरत असण्याच्या/त्याच्या बेकारीच्या काळात त्याने घरी बहुधा सराव केला असावा. या काळात नायिकेच्या पि/डॅ/चा ना पटवण्याचा प्रयत्न केला असता तर ये नौबत न आती. असो.)
बरं गाणे वगैरे एक वेळ ठीक आहे, पण तुझे नायिकेवर प्रेम आहे ना, मग तिला सर्वांसमोर शालजोडीतले कशाला? कोपर्यात घेउन विचार ना की अचानक का बुवा बेत बदलला? हवे तर पुढे काय करायचे याची हींट दे. पण छे! अर्जुनाला जसा पक्ष्याचा डोळा दिसत असतो, तसा त्याला आता नायिकेचा पाणउतारा दिसत असतो.
वानगीदाखल ही गाणी पहा....
भिगी रात मधे मीनाकुमारी आणि उमद्या अशोक कुमारच्या भावी लग्नाची पार्टी आहे. तिथे येउन टपकलाय प्रदीप कुमार आणि म्हणतोय काय तर, "दिल जो न कह सका वही राज-ए-दिल कहने की रात आयी"
का? ज्योतिष्याने मुहुर्त काढुन दिला होता का आजचा? बरं, एखादं कडवं म्हणुन झाल्यावर थांबावं, जरा आजुबाजुच्या परीस्थितीचा अंदाज घ्यावा, कुठलं? इकडे अशोक कुमारची भुवई चढलेय, मीनाकुमारीला रडु कोसळतयं आणि हा आपला गातोय "मुबारक तुम्हे किसी की लरजती सी बाहों में रहने की रात आयी". अरे असं नसतं, छान रांगा-बिंगा लावुन, स्टेजवर जाउन, फोटो-बिटो काढुन मुबारकबात दयायची असते.
नाहीतर हा मनोजकुमार आदमीमध्ये. दिलीपकुमार सुटाबुटात पियानो आळवत वहिदा रेहमानला सांगतोय
"कैसी हसीं आज बहारों की रात है, एक चांद आसमा पे है, एक मेरे साथ है"
तिला जरा अटेन्शन एन्जॉय करु दे ना. तु कशाला मध्ये तोंड घालतोयस? तुझा मित्र किती आनंदी आहे, बघवत नाहीये का? त्यालाच सांगतोय "मेरी खुशी भी आप के दामन मे आ गयी". तरी बरं दिलीप कुमार आपल्याच धुंदीत आहे आणि त्याचं मनोजकुमारकडे लक्ष नाहीये.
आणि आदमीमध्ये वहिदाला पुरेसा त्रास नाही दिला वाटतं, पत्थर के सनम मध्ये परत तेच?
"तुझे हमने मोहोब्बत का खुदा जाना, बडी भूल हुई" झाली ना चुक, मग सुधार आता. एवढी छान मुमताज घुटमळतेय आजुबाजुला. मैफिलीत छद्मी हसणारा प्राण आणि ललिता पवार आहेत. जीव नकोसा करतील ना ते वहिदाचा. वरतुन मानभावीपणा आहेच. "शीशा नही सागर नही, मंदीर सा एक दिल ढाया है"
गेल्यावेळी दिलीपकुमारच्या मैफिलीत रंगाचा बेरंग झाला होता, त्यावरुन तो काही शिकेल? नाव नका काढु. राम और श्याम मधे तोही तेच करतोय. "कल तेरी बज्म से दीवाना चला जायेगा". अरे मग वाट कशाची बघतोयस? काय तर म्हणे "तुने लेकिन ना मेरा राज-ए-मोहोब्बत समझा, तेरी आंखोने मेरे प्यार को नफरत समझा" अरे बाबा नक्की ठरव काय ते तिने तुला सोडलय का तिला काही समजत नाही म्हणुन तु जातोयस.
प्रेमीजनांमधे थोडेफार गैरसमज असंतील तर एक वेळ क्षम्य. पण जब जब फुल खिले मधल्या या शशी कपुरचं काय करावं? स्वतःच्या घरातल्या पार्टीत हा गातोय की
"तेरी बाहों में देखु सनम गैरो की बाहें, मै लाउंगा कहा से भला ऐसी निगाहे"
अरे बायको ना ती तुझी. थोडातरी विश्वास ठेव. निदान घरातले पाहुणे-बिहुणे गेल्यावर तरी बोल काय बोलायचे ते.
आणि ५० वर्षांनंतर याच सिच्युएशनवर राजा हिंदुस्तानीमधे आमिर खान पण तेच करतोय? अरे निदान आधीचा पिक्चर तरी बघायचा रे.
शशी कपुरला बहुतेक नायिकेला टोमणे मारण्यात मजा येत असावी कारण आ गले लग जा मधेही तेच. म्हणे
"अपना है क्या, चाहे जिए मरे कुछ हो, तुझ को तो जिना रास आ गया"
शर्मिला कावरीबावरी होउन फिरतेय आणि शत्रुघ्न सिगरेटीवर सिगरेटी फुंकतोय, नशिब ओरडला नाही 'खामोश' म्हणुन.
त्याचाच भाउ शम्मि. तो ही काही मागे नाही या बाबतीत. 'ब्रह्मचारी'मधे नायिका खुश आहे, त्याला गाणे ऐकवायला सांगतेय तर म्हणे "मत हो मेरी जां उदास"
उरला ज्येष्ठ बंधु राज, त्याने तरी कशाला आवर घालावा आपल्या भावनांना? 'अनाडी'मधे नुसतीच आपली पार्टी आहे, कुठली सगाई नाही, कुणी प्रतिस्पर्धी नाही, नुतनने त्याला सोडलेही नाही. तरी पण हा म्हणतो की "मेरे दुखते दिल से पुछो, क्या क्या ख्वाब सुनहरें देखे" आनुवांशिक रोग आहे का या कपुर घराण्याला?
एखादीला चारचौघात शालजोडीतले मारण्याचा मोह तरी किती असावा? देव आनंद ज्याने मधुबाला, वहिदा, नुतन यासारख्या सुंदर नायिकांशी प्रणयाराधन केलेय, त्याने गॅम्बलरमधे "दिल आज शायर है" गाउन जाहिदाला जाहिर त्रास द्यावा?
या रोगाची पुढची अवस्था आहे, स्टेजवरुन प्रेयसीचा (बचपनच्या हं) जीव नकोसा करणे जसे की
"क्या हुआ तेरा वादा" अरे लहानपणी तू जे तुणतुणे वाजवत होतास, त्यावरुन तिने तुला आत्ता ओळखावे का? ते सुद्धा ऋषी कपुरसारखा प्रॉस्पेक्ट समोर असताना?
नायिकाही मागे नाहीत बरं का!
वहिदाला इतक्या जणांनी सुनवलेय की तिने बहुतेक सुड म्हणुन 'रंगिला रे' केले असावे. देव आनंदवर काही परीणाम आहे का त्याचा? त्याच्या चेहर्यावर तर आश्चर्याचे भाव आहेत. जाहिदा वैतागलीय पण तिला विचारतो कोण?
तेच बहुतेक मीनाकुमारीचे झालेय. तिने तरी किती ऐकुन घ्यावे "रंग और नुर की बारात" वगैरे. मग तिही राजकुमारच्या लग्नाच्या पार्टीत म्हणणारच ना "किसी के इतने पास हो के सब से दुर हो गये"
राजकुमार मात्र खजिल झालाय. साहजिकच आहे, मीनाकुमारीला सोडुन नादिराशी लग्न केल्यावर दुसरे काय होणार?
माला सिन्हाचे मात्र नशिबच फुटके. तिने एखादा अशोक कुमार किंवा रहेमान बघुन लग्न करावं, तर सभ्य म्हणुन ओळखले जाणारे सुनिल दत्त किंवा गुरु दत्त तिच्या सासरी जाउन गाणी म्हणणार "चलो एक बार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो" आणि "जाने वो कैसे लोग थे जिनके प्यार को प्यार मिला"
अजनबी बनायचे आहेच तर मग मुळात ओळख का दाखवायची? आणि गुरु दत्त म्हणणार की "उफ्फ न करेंगे लब सी लेंगे आसु पी लेंगे". बोले तैसा चाले वगैरे माहीत नाही का रे तुला?
मग तिने बिचारीने अशाच एखाद्या वेळी धर्मेन्द्रला सुनावले
"गैरो पे करम अपनो पे सितम, ऐ जान-ए-वफा ये जुल्म ना कर" तर काय चुकले?
आता नायक-नायिकेचं दोषारोप प्रकरण सुरु असताना, इतर लोक ठोंब्यासारखे उभे असतात आणि गाणं संपल्यावर टाळ्या वाजवतात. मान्य आहे की रफी/लताच्या मखमली आवाजाने एक वेगळीच गुंगी येते. किंवा त्या काळी भारतातली असहिष्णुता वाढली नसावी कदाचित. नाहीतर अशा प्रसंगात जनरली आप्त(मित्र)गण हिंसक प्रव्रुत्तीचे दर्शन घडवायला उत्सुक असतात.
अलिकडे मात्र अशी गाणी कमी झाली आहेत हे खरं. नायिकाही खमक्या झाल्या आहेत. केलाच कुणी लग्नसमारंभात "अच्छा चलता हुं, दुआओं में याद रखना" म्हणण्याचा प्रयत्न तर सरळ हात धरुन बाहेर काढतात.
"कालाय तस्मै नमः", दुसरे काय?
वि. सु. : हा लेख माझ्या पर्सनल ब्लॉगवर पूर्वी प्रकाशित झालेला आहे.
मस्तच..
मस्तच..
'तेरी गलियों में ना रखेंगे
'तेरी गलियों में ना रखेंगे कदम . आज के बाद .
हेदेखील याच प्रकारात येईल का ?
अच्छा चलता हुं, दुआओं में याद
अच्छा चलता हुं, दुआओं में याद रखना" म्हणण्याचा प्रयत्न तर सरळ हात धरुन बाहेर काढतात.
तरी शेवटी पुन्हा लग जा गले के फिर ये हसी रात हो ना हो करतातच
मस्त लेख...
मस्त लेख...
आठवतील तशी भर घालण्यात येईल...
डोळ्यावर अचानक प्रकाशझोत
डोळ्यावर अचानक प्रकाशझोत पडलेल्या हरणासारखा जागच्याजागी स्तब्ध होतो. >>>> हे बेक्कार होतं!!!:D
मस्तच
मस्तच
काही वेळा वाटते की बरे झाले तो "अदा" जास्त अभिनय कमी असलेला हिंदी सिनेमा आता मुक्त होत आहे.
धन्यवाद
छान!
छान!
यात दिल है के मानता नहीं मधलं 'तू प्यार है किसी और का तुझे चाहता कोई और है' हेपण येईल.
छुपाना भी नही आता
छुपाना भी नही आता
बताना भी नही आता
तो मत बता ना...... दुसरयांच्या आनंदाच्या पार्टीत आपली प्रेमभंगाची रडगाणी गायची
नाही तर काय वावे . सरळसरळ
नाही तर काय वावे .
बहुतांश गाण्यात सरळसरळ कळते प्रेक्षकांना पण रसनाचा ग्लास घेऊन उभे असलेले शुन्य काम असलेले लोक व विल्लन पार्टी random song समजून मख्ख पहात आहेत.
जैसे तुने तोडा मेरा दिल..तेरा
जैसे तुने तोडा मेरा दिल..तेरा दिल टुटेगा असं भर पार्टीत नायिकेच्या आजूबाजूला गोल गोल रिंगण घालत नाचून म्हणायचं.
शिवाय काळा शर्ट घालून रडक्या चेहऱ्याने नायिकेवर आरोप करत 'दिल चीरके देख तेराही नाम होगा, आज भरी महाफिल मे कोई बदनाम होगा' म्हणायचं.
लेख आवडला... एक वेगळाच
लेख आवडला... एक वेगळाच द्रुष्टीकोन मांडलात...
मोहरा मधले "ए काश कभी ऐसा होता, जो दो दिल होते सिने में" पण याच कॅटेगिरीतले गाणे. ह्या गाण्याच्या आधीची पार्श्वभुमी म्हणजे, अक्षयकुमार आधी रवीनावर संशय घेतो की तिचे सुनिल शेट्टी बरोबर प्रकरण असावे म्हणून... मग ती रागावली तर पार्टीत येऊन हे गाणे म्हणतो...
लेख आणि प्रतिसाद
लेख आणि प्रतिसाद
लेखात अनेक आवडत्या गाण्यांची हटाई केल्या बद्दल तिव्र णिशेध
मस्स्त.
मस्स्त.
मला क्रिशनकुमारचं ' अच्छा सिला दिया' आठवलेलं पण ते नाही बसत या कॅटगरीत.
बरं दुसर्याच्या ह्या असल्या
बरं दुसर्याच्या ह्या असल्या जुळवाजुळवीच्या पार्टीत असले रडकुंडे, माझं लफड हिच्याच बरोबर होत/आहे अस ओरडुन ओरडुन (गाण्यात) सांगणारे नी समस्त रंगीत पाण्याचे ग्लास घेवुन फिरणार्या लोकांना दु:खाच्या खाईत फेकण्याची कपॅसिटी असणारे गाणे गाणार्याला तात्काळ टिंब टिंबवर लात मारुन हाकलुन का देत नसावेत.
बर ज्याच्या सोबत लग्नवगैरे ठरलय तो एकदम बुळबुळीत बुळा किंवा वसवशीत व्हिलन तरी असावा असा कायतरी क्रायटेरिया असावा.
"शालजोडितले मारणारी गाणी"
"शालजोडितले मारणारी गाणी" वाचुन वाटलेलं कव्वाली, जुगलबंदि वगैरे (ना तो कारवां कि तलाश... तत्सम) असेल, पण ठिक आहे. तुम्ही डिस्क्रायब केलेला जॉनरं हि लोकप्रिय आहे. लगेच आठवलं ते म्हणजे काकाचं दो रास्स्ते मधलं हे गाणं. काय अॅटिट्युड आहे? गाण्याचे बोल "मेरे नसीब मे..." असले तरी खरा (छुपा) मेसेज "तेरे नसीब मे ऐ दोस्त, मेरा प्यार नहि..." हाच आहे...
छान लेख,खुसखुशीत
छान लेख,खुसखुशीत
"ये आख्खा इंडिया जानता है हम
"ये आख्खा इंडिया जानता है हम तुम पे मरता है"
हे गाणे....
सिनेमा नाव,कलाकार लक्षात नाही. प्रसंग हिरॉईन चे लग्न. हिरो बॅडवाल्याच्या पोशाखात. एवढेच लक्षात आहे. एलिजीबल असेल तर ॲड करा, आणी प्रकाश टाकावा.
जान तेरे नाम
जान तेरे नाम
रोनीत रॉय आणि फरहीन(ही माधुरी सारखी दिसते अशी काहीतरी अफवा वाचली होती)
रेडिओ वर याची जाहिरात यायची तेव्हा अमीन सयानी ह्यात होते.
दिल अपना और प्रीत पराई (१९६०)
दिल अपना और प्रीत पराई (१९६०) मधील राजकुमार आणि मीनाकुमारी यांच्यावर चित्रित झालेले गाणे
अजीब दास्तां है ये
कहाँ शुरू कहाँ खतम
ये मंज़िलें है कौन सी
न वो समझ सके न हम
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/65144
फारएन्ड यांच्या या लेखातही अशी काही उदाहरणं आहेत.
"ये आख्खा इंडिया जानता है हम
"ये आख्खा इंडिया जानता है हम तुम पे मरता है" >>>>> हा हा कमाल गाणं आहे ते. काय ते लिरिक्स काय तो युनिफॉर्म अन् तो डान्स .
'तेरे दर्द से दिल आबाद रहा' पण असेल काय यात. अजून एक ते इरिटेटींग , " मुबारक हो तुमको ये शादी तुम्हारी .
मागे या टाईप चे एक धर्मेंद्र चे होते आता आठवत नाहीये. बहुतेक त्यात नवरा म्हणून देवेन वर्मा बसलेला असतो आणि हा हीरो त्याला एवढा डेंजर लुक देत असतो संपूर्ण गाणंभर की तो शेवटी उठून निघून जातो . खूप हसलेले तेव्हा. कुणाला आठवलं तर सांगा प्लिज.
मस्त लेख. आधी मलाही वाटले की
मस्त लेख. आधी मलाही वाटले की कव्वाल्यांमधे एकमेकांना उद्देशून शेरे, टोमणे मारतात तशा गाण्यांबद्दल आहे. पण हे ही मस्त आहे.
वावे - धन्यवाद लिन्कबद्दल तेच आठवले हे वाचून.
कोणाच्या मंगनीमधे जाउन त्यांना "आँसू" चे विविध प्रकार सांगणे, मी कसा येडचाप आहे याचे वर्णन करणे असला आचरटपणा तेव्हाची हिंदी गाणीच करू शकत
वावे : फारएन्ड च्या लेखाची
वावे : फारएन्ड च्या लेखाची लिंक दिल्याबद्दल धन्यवाद. तो लेख आधीच वाचला असता तर हम ये जुर्रत ना करते.
फारएन्ड यांना साष्टांग नमस्कार.
सच्चा : दिलंय की हो ते गाणं. मुखडा लिहीला नाही म्हणून कळलं नसेल कदाचित.
कटप्पा : तेरी गलियों में ना सिच्युएशन परफेक्ट. जेम्स बाॅंड म्हणतात तसं “बर ज्याच्या सोबत लग्नवगैरे ठरलय तो एकदम बुळबुळीत बुळा” प्रतिस्पर्धी.
बाकी ये आख्खा इंडिया जानता है, तेरे दर्द से दिल, दिल चीरके देख तेराही, छुपाना भी नही, तू प्यार है किसी और का वगैरे महान गाण्यांची आठवणही खासच.
आने दो.
हम ये जुर्रत ना करते. >>>
हम ये जुर्रत ना करते. >>> जॉइन द पार्टी! वरची उदाहरणे आणि वर्णनही धमाल आहे
गॅम्बलरमधे "दिल आज शायर है" गाउन जाहिदाला जाहिर त्रास द्यावा? >>> जाहिदाला आणि पब्लिकलाही. पहिल्यांदा हे गाणे पाहताना आम्ही मित्र लोक पूर्ण गाणे ही मिशी खरी आहे का खोटी यावर वाद घालत होतो. नुकतीच मिसरूडे फुटण्याच्या वयात हे पाहिले, त्यामुळे आमच्या सर्वांच्या कौलारू घरांसारख्या मिश्या येउ घातल्या असताना याची पहिल्या मजल्यावर स्लॅब घालावी अशी का दिसते असेही वाटे. तिकडे जाहिदाशेजारी सुधीर बसला आहे. तो तर नेहमी मिशीसकट असतो पण इथे देव आनंदची पाहून त्याने स्वतःची उतरून ठेवली असावी. किंवा पाचव्या जॉर्जला भेटायला जाताना गांधीजी जसे म्हंटले होते की आमच्या दोघांना पुरतील इतके कपडे त्याने घातले आहेत, तसे सुधीरला ही वाटले असेल की ती एक मिशी दोघांनाही पुरेल इतकी आहे
फा
फा
(No subject)
त्या धाग्याची आठवण होणं
त्या धाग्याची आठवण होणं अपरिहार्यच आहे. सजदेंं हा शब्दही मी आता कधीही कुठल्याही गाण्यात ऐकला तरी तोच धागा आठवतो
मस्त लेख.
मस्त लेख.
यात संजीव कुमार आणि जया भादुरीचं गाणं येईल का.. अनामिका तू भी तरसे..
नवीन नाही चालत का? "दिल दे
<<
"मेरे नसीब मे..." असले तरी खरा (छुपा) मेसेज "तेरे नसीब मे ऐ दोस्त, मेरा प्यार नहि..." हाच आहे... >> खरंय खरंय
नवीन नाही चालत का? "दिल दे हैं.. जान तुम्हे देंगे, दगा नहीं करेंगे सनम"
दगा दिल्यावर... गात आहेत.. 'मस्ती' मधला
https://youtu.be/zdu1PaqsPT4
अजून एक, "शीशे के घरो में देखो तो, पत्थर दिलवाले रेहते है", पण गाणं खरंच सुंदर आहे.
https://youtu.be/zdu1PaqsPT4
Pages