प्युअर सिक्वेन्स - भाग ३

Submitted by कविन on 22 October, 2023 - 00:59

भाग २

भाग 3

"अव्या आज तुझी वकिलीण बाई बरोबर डेट नाही ना?" किर्तीच्या प्रश्नावर मी, ‘नाहीये’ म्हणून उत्तर देऊन पुढे काही मेसेज करणार इतक्यात तिचाच मेसेज आला.

"कूल. मग आज काही इतर प्लॅन करुही नको. उद्या पहाटेच्या फ्लाईटने मी परत जातेय. मी आजचा दिवस तुम्हाला भेटायला फ्री ठेवलाय. तू आणि चिन्या मला साडेसहा वाजता भेटताय मॉकिंगबर्ड कॅफेत." तिने ऑर्डरच सोडली.

"बरं चिन्याला कळवलयस ना? साहेब हल्ली व्यग्र असतात वेगवेगळ्या कामात" मी ऐकवलं.

"हो रे तो शहाणा अतीच व्यग्र असल्याचं दाखवतो हल्ली. काल दोनवेळा फोनच कट केला माझा त्याने. नंतर कॉलबॅक केला त्याने. तुला माहिती आहे का? साहेब आज डेटवर आहेत डॉग ट्रेनर बरोबर."

"क्काय?" मी जवळ जवळ उडालोच हे ऐकून.

"हो ना रे. तरी आपलं नशीब थोर म्हणून येतायत आपल्याला भेटायला चिन्याजी महाराज. तू डिच करु नकोस पण" तिने नकाराला जागाही न ठेवता डायरेक्ट ऑर्डरच दिली.

"ओके बॉस" मी तिला म्हंटलं.

चिन्या आणि सिद्धी डेट? चिन्या म्हणजे तुफान मेलच निघाला च्यायला. आणि सिद्धीला काय झाले? वेटर्नरी हवा किंवा डॉग ट्रेनर तरी हवा, क्रायटेरिया बाद केला? की लकी कृपा? पेट्स असण्याचा हा फायदा लक्षातच नव्हता आला आधी.
मला बोलला असता पण. कधीकधी ही किर्ती उगाच राईचा पर्वत करते पण तिला खोदून विचारलं असतं तर आग नसतानाही धूर दिसला असता तिला आणि मग मलाच गिऱ्हाईक केले असते कारण नसताना. त्यापेक्षा चिन्याला पिकअप करायला येतो म्हणून सांगणं जास्त उत्तम. त्यावर त्याचा रिप्लाय काय येतो त्यावरून कळेलच खरी माहिती. मी यासाठी स्वतःचीच पाठ थोपटून त्याला कॉल लावला.
आधी तो, "परस्परच येतो टॅक्सीने" म्हणाला. आज लकी आणि त्याचं ट्रेनिंग सेशन होतं. त्यांचं सेशन आज त्याच्या घरीच होणार होतं.

ओके! कूल. म्हणजे ही अशी डेट होती तर. किर्ती ने ॲटॅकच दिला होता मला.

“मी येतो तुला पिक अप करायला. आपण सेशन संपल्यानंतर निघू” असं म्हणून मी फोन ठेवला.

मी घरातून लवकर निघालो. पेट्रोल भरायचं होतं वाटेत, जमलं तर टायरमधली हवाही चेक करुन घ्यायची होती. तिथे वेळ मोडला असता म्हणून लवकर निघालो पण सगळी कामं लवकर झाली आणि मी त्याच्याकडे सव्वापाचलाच पोहोचलो.

लिव्हिंग रुम मधे ट्रेनिंग सेशन सुरु होतं. चिन्याबरोबर काकाही होते सेशनमधे.

“बस, बस. अजून एक पंधरा वीस मिनिटात ब्रेकच होईल. मग माझ्या हातचा फक्कड चहा ठेवतो सगळ्यांसाठी” असं म्हणत काकांनी मला त्यांच्या बाजूच्या खुर्चीत बसवलं.

लकी येऊन हुंगून गेला पण एकदम चेकाळत उड्या मारत अंगावर यायचा तसं नाही झालं यावेळी.

“चालूदे तुमचं सेशन” मी त्यांच्याकडे बघत म्हणालो.

सिद्धी हातात ट्रिट घेऊन त्याला खाली बसायला शिकवत होती. हातातल्या ट्रिटकडे बघत तो खाली बसला पण तिने ट्रिट दिले नाही.

"अरे ये तो चिटिंग है" माझ्या मनात येऊन गेले.

ती, चिन्मय आणि काकांना सांगत होती, “जोपर्यंत लकीचा फोकस आपल्याकडे नसेल, तो डोळ्यात बघत नसेल तोपर्यंत ट्रीट द्यायची नाही. त्याचा फोकस ट्रिट वर नाही तुमच्यावर असायला हवा आणि तो शांतपणे खाली बसायला हवा. हे झाले की मगच त्याचे कौतुक करुन ट्रीट द्यायची. खाणं देतानाही अशीच सवय डेव्हलप करायची हळूहळू. Nurture calm behaviour instead of anxiety.”

“ओके आता ब्रेक घेऊ. त्याआधी परत रिपीट करते आजचं सेशन.” असं सांगत तिने हाताची बोटे काऊंट करत थोडक्यात उजळणी घेतली
१) फटाक्यांच्या आवाजाने घाबरून पळत असेल इथे तिथे तर लीश लावून कंट्रोल करायचे. त्याला आंजारुन गोंजारुन बेबी टॉक्स करणे टाळायचे
२) तुम्ही स्वतः शांत राहून सेम एनर्जी बॉडी लॅग्वेज मधून रिफ्लेक्ट करायची
३) तो जरा शांत झाला की मगच बेबी टॉक्स करा, कडल करा किंवा ट्रीट द्या. ट्रिट, कडलिंग आणि त्याचे शांत बिहेवियर याचे पेअरिंग व्हायला हवे त्याच्या डोक्यात. भिती आणि कडलिंगचे पेअरिंग नको. Nurture calmness
४) त्यांचा फोकस तुमच्या नजरेवर असायला हवा ट्रिटवर नाही.
५) आणि खाणं देताना, कार मधून नेताना तो एक्साईट ऐवजी शांत असेल असे बघायचे.

“थोडा पेशन्स हवा सुरवातीला पण एकदा तुमच्यात रिलेशनशिप बिल्ड झाली की मग तुमचे जग त्याच्या जगापेक्षा वेगळे असले तरी फरक पडत नाही. तुम्ही बरोब्बर समजून घेता एकमेकांच्या गरजा आणि एक हॅपीनेस रिंग तुमच्या भोवती तयार करता.”

“पुढच्या सेशन पर्यंत हाच तुमचा होमवर्कही आहे, आज इथेच थांबूया मग.” तिने सोफ्यावर बसत म्हंटलं.

चिन्या त्याचं आवरायला त्याच्या खोलीत गेला. काकाही चहा करायला स्वयंपाक घरात गेले. उरलो आम्ही दोघे आणि लकी.

"सिद्धी विनायक, I am impressed. How to nurure calmness हे नाही समजलं मला पण ओव्हरऑल जेव्हढं ऐकलं तेव्हढं भारी वाटलं" मी म्हणालो.

"Thank you. तुझ्याकडे पेट आला की शिकवेन तुलाही" तिने हसत म्हंटलं.

"नको रे बाबा, मला झेपणारी गोष्ट नाही ती." माझं वाक्य संपता संपता काका चहा घेऊन आले आणि चिन्याही तयार होऊन आला.

काकांच्या हातचा चहा घेऊन आम्ही निघालो. तिलाही फॉर्मॅलिटी म्हणून येतेस का विचारलं चिन्याने पण तिला झुबीला घेऊन पार्कमधे जायचं होतं म्हणून ती निघाली.

बाईकवरुन आम्ही कॅफेत चर्चगेटला पोहोचलो. किर्तीने चिन्याला बरच ग्रील केलं सिद्धीवरुन.

तो म्हणे, "ब्रो चील! हम लोग फ्रेंड झोन मे है"

यावरही किर्तीकडे उत्तर तयार होतं. प्रोफेशनल झोन मधून फ्रेंड झोनमधे आलायत तर पुढची प्रगती होईलच या रेटने.

"शांती रख लेडी डॉन. ऐसा कुछ नही होनेवाला इन दोनो मे" मी ऐकवलं.

यावर मग त्या दोघांनी मलाच ग्रील करायला सुरुवात केली.

आम्ही एकमेकांना नकार दिलाय याची त्यांना आठवण करुन दिली मी, तेव्हा मग गाडी का नकार दिला यावर घसरली.

"आमच्या अपेक्षा मॅच नाही झाल्या", मी म्हंटलं

"म्हणजे सगळ्या अपेक्षां पैकी एक अपेक्षा मॅच नाही झाली. बरोबर असंच म्हणायचं आहे ना?” किर्तीने टोकत विचारलं

"महत्वाची एक", मी करेक्षन करत म्हंटलं.

"इतर महत्वाच्या नाहीत?" आता चिन्याने संधी उचलली

"बरं मग अल्पनाबद्दल काय वाटलं? तिथे झाल्या अपेक्षा पूर्ण?" किर्तीने विषय अल्पनावर नेत विचारलं

"एकदाच भेटलोय. ऑकवर्डनेस जास्त होता." मी उत्तर दिलं.

"सिद्धीलाही एकदाच भेटलास पण तिथून आल्यावर त्याबद्दल माझ्याशीच तासभर बोललास तू नंबर शेअर करायच्या निमित्ताने. तिच्याशी तर ३ तास बोलून आला होतास असं कळलं" चिन्याने हे ऐकवून क्रिम बृले संपवत वेटरला बील आणायला सांगितलं.

बील चुकतं करुन बाहेर पडत असताना मी त्यांना म्हंटलं, "I need second date to decide"

"Second date with whom?" टॅक्सीत बसता बसता मला असा प्रतीप्रश्न करत किर्ती बाय करुन गेली खरी पण मला मात्र तिने चांगलच विचारात पाडलं.

चिन्याला ड्रॉप करुन मी घरी परत आलो तरी विचार संपला नव्हता. पण रात्री मोबाईल चार्जींगला लावून झोपताना कल्पनाही नव्हती मला, उद्याची सकाळ काय वादळ घेऊन येणार आहे.

क्रमशः

भाग ४

Group content visibility: 
Use group defaults

थोडे मोठे भाग टाक की! Happy
मस्त चाललीये कथा. आता काय वादळ ते वाचल्याशिवाय जीवाला शांतता नाही Proud

धन्यवाद गिरीकंद आणि रमड

थोडे मोठे भाग टाक की! Happy>> छोटी आहे कथा तशी म्हणून भागही जरा छोटे झालेत. सहा भागात संपतेय कथा.

आता काय वादळ ते वाचल्याशिवाय जीवाला शांतता नाही Proud>> Proud

बरेचदा आपण आरश्यासमोर - डायरी मध्ये एकांतात व्यक्त होतो तसे आपण आपल्या ख़ास पेटसोबत सुद्धा मनातले गुपित शेयर करत असतो. झुबी बोलत असता तर त्याने तिच्या मनातले ह्याला बरोबर सांगितले असते Wink आणि ट्रीट पण मिळवली असती.

धन्यवाद अज्ञानी आणि अनिरुद्ध Happy

झुबी बोलत असता तर त्याने तिच्या मनातले ह्याला बरोबर सांगितले असते Wink आणि ट्रीट पण मिळवली असती.>> Lol खरय. झुबीशी बोलला पाहिजे ना तो आधी. तो तर लकी पासूनही तसा दोन हात लांब आहे Wink

अरे वा.. माॅकिंगबर्ड..>> Happy कथा भलेही काल्पनिक असो, कॅफे आणि पदार्थ खरेच असतात Lol

भारी !!!

आता काय वादळ ते वाचल्याशिवाय जीवाला
शांतता नाही Proud >>>> खरय Lol

मस्त लिहितेयस Happy
नवीन प्रोफेशनचा परफेक्ट उपयोग करतेयस अन प्रेमकथेचा गोडवाही सांभाळते आहेस. मजा येतेय वाचताना.
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत!

मस्त चाललीय कथा तुला यातलं बरंच माहीत आहे.माझ्याकडे(कधी काही 5-6 वर्षांत) माऊ आली तर पहिली डेट तुझ्यबरोबरच!!!

आबा, धनवंती, अवल, धनश्री, मामी, अनु आभारी आहे.

मस्त चाललीय कथा तुला यातलं बरंच माहीत आहे.माझ्याकडे(कधी काही 5-6 वर्षांत) माऊ आली तर पहिली डेट तुझ्यबरोबरच!!!>> चालेल. मला माहिती असलेले नक्कीच सांगेन. पॅरेंटिंग टीप्स पण देईन Wink
पण मी काही ट्रेनर नाहीये Lol कथेच्या निमित्ताने काही ट्रेनर्सना फॉलो केलेय आणि मटेरिअल गोळा केलेय.

हायला!
क्या वादळ आनेवाला! मस्त लिहिते आहेस. आणि फार न टांगवता रेग्युलरली भाग पण येताहेत. आणखी काय पाहिजे!

हायला!
क्या वादळ आनेवाला! मस्त लिहिते आहेस. आणि फार न टांगवता रेग्युलरली भाग पण येताहेत. आणखी काय पाहिजे! >>>+++++11111
आणि मी एरवी क्रमशः कथा वाचतच नाही. पूर्ण झाली की मग वाचते कारण ती पूर्ण होईल का हेच माहित नसतं. पण कविन लिहीतेय म्हंटल्यावर वाचायला घेतलीच, ती पूर्ण करणारच

धन्यवाद अश्विनी, धनुडी, धनि Happy

आणि मी एरवी क्रमशः कथा वाचतच नाही. पूर्ण झाली की मग वाचते कारण ती पूर्ण होईल का हेच माहित नसतं. पण कविन लिहीतेय म्हंटल्यावर वाचायला घेतलीच, ती पूर्ण करणारच>>> हो हो अगदी निश्चिंत रहा. कथा पूर्ण होणारच (कारण ढाचा पूर्ण झाल्यावरच मी भाग पोस्ट करायला सुरवात करते. जुजबी बदल, शुले वगैर तेव्हढे बाकी असते)

मस्त आहे हाही भाग. बाकी पेट्रोल भरणं, हवा चेक करणं वगैरे बारीक तपशील वाचून मस्त वाटलं. स्वतःला आरशात बघितल्यासारखं. Lol

ते मॉकिंगबर्ड कुठेशी आहे? Proud

मी पाळीव प्राण्यांपासून चार का चाळीस हात लांब असते कायम... पण चिन्याच्या घरचा सीन लक्षपूर्वक वाचला यावेळी Proud
काहीतरी एलिमेन्ट बिल्ड होत चाललं आहे नक्की, यासाठी तुला थम्ब्स-अप.