भाग २
घरी नकार कळवून एक आठवडा झाला आज. आईने पहिल्या दिवशी नकाराबद्दल ऐकलं तेव्हा एकच प्रश्न विचारला, “नकारच देणार होतास तर एव्हढा वेळ तरी का वाया घालवलास?”
“अरेच्या! मी माझी मतं सांगितली होती ना आधी तुला? तूच म्हणालीस एकदा भेटून तर ये.”
“मला वाटलं होतं कदाचित भेटल्यावर मतं बदलावी वाटू शकेल तुला. आणि गेल्यावेळी तू अर्ध्या तासात काही तरी कारण काढून आलायस ना घरी.”
“तू काय घड्याळ लावून वॉच ठेवतेस काय माझ्यावर?”
“तसं नाही रे बाबा! चिडू नकोस. मला वाटलं यावेळी घड्याळाच भान नाही राहिलं म्हणजे आवडलेय मुलगी. बरं नाही तर नाही.”
उशीरा आली हा एक मायनस पॉईंट आणि वकील नाही हा माझ्या क्रायटेरिया बाहेरचा पॉईंट सोडला तर छान गप्पा झाल्या आमच्या. त्याही सहज म्हणजे आता अजून काय विषय काढायचे याचा सेकंदभरही विचार न करता.
पण ठिक आहे, सगळ्या छान गप्पा मारु शकणाऱ्या सुंदर मुलींशी आपण लग्न थोडीच करतो.
तीन तास घालवले कसे म्हणजे?, नुसतं गप्पा मारण्यात तर नसेलच गेला वेळ. अशा ठिकाणी ऑर्डर येण्यात मग खाण्यात जातोच वेळ. जाऊदे म्हणा मी कशाला इतका विचार करतोय. आईपण काहीतरी पुडी सोडते आणि स्वतः मस्त झोपते जाऊन. ती तर विचारही नसेल करत. एक मेसेज नाहीये तिचा काही काल घरी पोहोचल्यापासून. तिला नवीन क्लाएंट मिळवून दिला एक. चिन्याचा नंबर शेअर केला, तिचा नंबर चिन्याला दिला. तो डॉग ट्रेनिंगसाठी कॉल करेल लिहीलं पण एक साधा थम्ब्स अप नाही. मित्राला मदत म्हणून रेफरन्स दिला. आता तो जाणे आणि ती जाणे. आपला संबंध संपला. कर्टसी म्हणून एक धन्यवाद चालला असता पण ठिक आहे. ती मस्त डाराडूर झोपली असेल मी आपलं उगा कुणाचं काय म्हणत इतका विचार करत माझी झोप खराब करतोय.
रात्री उशीरा झोप लागली म्हणून सकाळी उशीरा जाग आली. ब्रेकफास्टही स्किप करुन निघाव लागलं. मिटिंग सुरु व्हायला पाच मिनिटं असताना पोहोचलो. एक कडक चहा मारुन फाईल जरा नजरेखालून घातली. नवीन काही नव्हतं निघालेलं, तसंही फॉर्मॅलिटी म्हणूनच होती मिटिंग. पण पुढल्या आठवड्यात रजेवर असताना काही अडचण नको यायला म्हणून सगळ्यांना लूप मधे ठेवणं गरजेचं होतं.
११ वाजता मिटिंग संपली तेव्हा कामत मधून इडली वडा सांबार मागवलं वरती आणि मग फोन हातात घेतला.
आयच्यान! इतके मेसेजेस. चिन्याचे चार आईचा एक आणि सिद्धीचे १०. काल एका शब्दाचा रिप्लाय नाही आणि आज दहा? पहिले तिचेच वाचायला घेतले.
“सॉरी फोन डेड होता”
“घरी गेले तर झुबीला उलट्या झाल्या कळलं मग तडक वेट गाठला.”
“तिथून आल्यावर मध्यरात्री पर्यंत झुबीवरच लक्ष ठेवून बसलेले पण फोन हातात घ्यायचाही मूड नव्हता.”
“झुबी मांडीवरच झोपून होती.”
“आज मेसेजेस बघितले”
“थॅंक्स.”
“मित्राचा मेसेज आणि फोन दोन्ही येऊन गेलं.”
“बोलणं झालं”
“आज नाही पण उद्या एक फेस टु फेस मिटिंग करु त्यानंतर पुढचे सेशन ठरवू”
“Thanks again and sorry for late reply.”
तिचे मेसेज वाचून झाल्यावर वरती बघितलं तर ऑफीस कलीग माझ्याकडेच निरखून बघताना दिसला.
"काय रे एकटाच हसतोयस? आणि ती इडली झाली की रे गार" पाठीवर थाप मारत त्याने म्हंटलं.
"मीच भेटलो काय रे सकाळपासून" म्हणत त्याला उडवून लावत मी इडली वडा संपवला.
चिन्याला आणि आईला रिप्लाय केला आणि सिद्धीला एक कर्टसी कॉल लावला. झुबी आता ठिक आहे हे सांगताना तिचा आवाज मात्र थकलेला होता. टेक रेस्ट म्हणत मी फोन कट केला आणि परत एका मिटिंगला जायला जागेवरुन उठलो.
आठवडाभर आईने दम धरला आणि मग एक कुठल्यातरी पोर्टलवर नाव नोंदवलं होतं तिथून ३-४ वकील मुलींचे बायोडेटा माझ्या हातात आणून ठेवत म्हणाली,"या सगळ्या तुझ्या क्रायटेरियात बसणाऱ्या मुली आहेत. मुलींच्या अपेक्षे प्रमाणे त्यांच्याही क्रायटेरियात तू बसतोयस तेव्हा आता काय ते आपापसात भेटीगाठी ठरवा"
तिला म्हंटलं, “आत्ता काही सांगू नकोस. हा आठवडा बराच पॅक आहे. बरीच कामं आटपायची आहेत. पुढल्या आठवड्यात किर्तीचं लग्नं आहे आणि त्यासाठी रजा सॅंक्शन करुन घेतलेय चार दिवसांची. आम्ही सगळे इंदोरला जातोय लग्नाला. तुला बोललोय ना हे. तर हे फोटो आणि बायोडेटा सध्या ठेव इथेच. इंदोरहून आल्यानंतर करतो कॉल यातल्या एकीला."
माझ्या उत्तराने तिचं समाधान झालं पण किर्ती नावाची वेगळी कळ दाबली गेली त्या नादात.
“मला वाटायचं किर्ती आणि तुझ्यात नक्की काहीतरी आहे स्पेशल”
"खास मैत्री आहेच आमची आई" मी मुद्दाम तिला चिडवायला म्हंटलं
"मैत्रीहून जास्त काही रे" तिने टपली मारत मला ऐकवलं.
“अगं खरच फक्त मैत्री आहे. नाहीतर आत्तापर्यंत लग्न करुन मोकळे नसतो का झालो आम्ही?”
"तसं नाही रे तुम्ही एकत्र असायचात ना कायम. BFF काय ते"
"चिन्यापण तर असायचा की त्या BFF Gang मधे. तो ही जवळचा अती अती जवळचा मित्र आहे"
“बरं”
"हे बघ जसा चिन्या तशीच किर्ती, ना कम ना जादा. पण दोघे निव्वळ मित्रच. तू म्हणत्येस तसा अरेंजसाठीही विचार केला नसता कारण तिने तिचं लग्न ठरवलं होतं ऑफीस कलीगच्या प्रेमात पडून आणि मला वकिलीण बाईशीच लग्न करायचं आहे कांदेपोहे लग्नच करायचे आहे तर. प्रेमात पडलो असतो तर गोष्टच वेगळी असती."
"बरं बाबा पण इंदोरहून आलास की न विसरता कॉल कर यातल्या एकीला." तिने परत एकदा आठवण करुन दिली आणि ती झोपायला तिच्या खोलीत गेली.
इथे पूर्ण आठवडा मी कामात बुडून गेलो होतो आणि तिथे चिन्याने पहिले सेशन देखील करुन घेतले. त्याचे अपडेटही मला पाठवले आणि उत्तम ट्रेनर दिल्याबद्दल दहावेळा आभार मानले अगदी इंदोरलाही किर्तीच्या समोर इतक्यावेळा ट्रेनिंग सेशनच कौतुक केलं की किर्तीने शेवटी विचारलं त्याला की ट्रेनिंग मधे इंटरेस्ट आहे की ट्रेनरमधे?
आणि हा निर्लज्ज दोन्ही इंटरेस्टींग आहेत म्हणून मोकळा झाला.
"साहेबा! तिला तिच्या प्रोफेशनच्या जवळपास प्रोफेशन असेल असा नवरा हवाय. तेव्हा तुम्ही विसरा" मी शेवटी जमिनीवर आणत ऐकवलं. त्यावर पण त्याचं म्हणणं पडलं की, “डॉगी प्रेम तर कॉमन आहे आमच्यात. बाकी बघून घेईन मी वेळ आली की. तुला काय प्रॉब्लेम आहे?”
“मला काय प्रॉब्लेम असणार आहे? मी जस्ट सांगितलं मला जे माहिती आहे ते.”
"मला दाखव तरी तुझी ट्रेनर" म्हणत किर्तीने लकडा लावला तेव्हा चिन्याने तिचा व्हॉट्स अॅप वरचा डिपी दाखवला.
डिपी बदलेला वाटला मला. आधी तिचा एकटीचाच फोटो होता आता झुबी बरोबरचा फोटो लावला होता. घरच्या अवतारातला असला तरी छान आला होता फोटो तिचा.
"भारी आहे रे तुझी ट्रेनर. डॉगी पण मस्तय. डोळे बघ ना डॉगीचे, कसले बोलके आहेत." किर्ती म्हणाली.
मी फोटो परत बघितला. खरच झुबीच्या डोळ्यातून, आनंद, विश्वास ओसंडून वहात होता.
"तू तिला पटवणार आणि वकीलसाहेब वकिलीण बाईना डेट करणार. वॉव! यार मला तर दिसतय माझ्या नंतर तुम्ही दोघेही नंबर लावणार. चट मंगनी पट ब्याह करु नका, मी हनीमूनहून येई पर्यंत धीर धरा. नंतरची तारीख काढा. एकाच जरी लग्न मीस झालं ना माझं तर बघा" किर्तीने तिचा वेगळाच अजेंडा पुढे केला.
"तू काय आमच्या लग्नाची स्वप्न बघत्येस! परवा लग्न तुझं आहे. तुझ्या हिरोची स्वप्न बघ ना" यावेळी माझ्या ऐवजी चिन्यानेच ऐकवलं तिला आणि मग दोघांची तू तू मै मै सुरु झाली नेहमी प्रमाणे.
विषय तिथे संपला त्यावेळी तरी.
तिथून आल्यावर आईने परत आठवण करुन दिली आणि मग मी ही त्यातून अल्पनाचं प्रोफाईल शॉर्टलिस्ट करुन तिला फोन करुन भेटीची जागा आणि वेळ निश्चित केली. यावेळी प्रभादेवीच्या CCD मधे भेटायचं ठरवलं. अल्पनाचं ऑफीस ‘प्रभादेवी म्युनिसिपल शाळेजवळ’ आहे म्हणाली ती आणि तिथून ‘CCD‘ ५ मिनिटावर म्हणून ते सुचवलं तिने. मला प्रॉब्लेम नव्हता काही. मी तसही बाईक घेऊन जायच्या विचारात होतो. मला कोणतंही ठिकाण चालणार होतं जिथे जवळपास पर्किंग मिळेल असं.
इथल्या भेटीची हुरहूर जरा जास्त होती. पहिल्या ठिकाणी नकार द्यायचे ठरवून फक्तं मन राखायला भेटायचं ठरवलं होतं पण यावेळी होकार नकार अशा दोन्ही शक्यता दोन्ही बाजूंनी होत्या.
सिद्धीच्या त्यादिवशीच्या बोलण्याप्रमाणे तिच्या घरीही काहीसे असेच घडत असणार कारण तिचे आईबाबा यंदा सासुसासरे होऊनच दम घेणार होते. हे तिचेच शब्द अर्थात.
त्या दिवसा नंतर आमचे काही बोलणे किंवा मेसेज झाला नाही खरंतर पण माझ्या मित्राकडून तिचं कौतुक ऐकायला मिळतय भरपूर. त्याला लकीसाठी नंबर दिला होता मी. त्यांचे एक सेशन पारही पडले आणि दुसरे या आठवड्यात होणार होते.
CCD मधे पोहोचल्याचा अल्पनाचा मेसेज आला तेव्हा मी इतर पार्क केलेल्या गाड्यांच्या मधे जागा शोधून माझी बाईक पार्क करतच होतो. तिला एंट्रन्स पाशीच येतो दोन मिनिटात सांगून मी हेल्मेट डिकीत ठेवलं. वेळेच्या बाबतीत पहिला टिकमार्क पॉझिटिव्ह झाला असं मनात म्हणत मी एंट्रन्स जवळ पोहोचलो.
ती इथे यायचं म्हणून ऑफीसमधे आवरुन निघाली असावी. छान दिसतेय. थोडं अजून हसू असतं तर जास्त खुलून दिसला असता चेहरा. मी पण आज मुद्दाम दाढी करुन माझा बेस्ट शर्ट घालून आलो होतो.
औपचारीक हाय हॅलो करुन आम्ही आत एक टेबल पकडून बसलो. सॅण्डविच आणि कॅपिचिनोची ऑर्डर दिली. पुढच्या दहा मिनिटात एकमेकांच्या घरची आणि ऑफीसची माहिती दिली आणि घेतली. दोघांचे प्रोफेशनल इंटरेस्ट एकसमान होते. तिलाही स्वतंत्र प्रॅक्टीस करण्यात रस होता. दुसरा पॉईंट टिकमार्क झाला. अजूनपर्यंत तरी सगळे क्रायटेरिया परफेक्टली जुळत होते आमचे एक थोडा ऑकवर्डनेस वगळता. पण ते जशी ओळख होत जाते तसे कमी होतेच.
पहिल्या दहा मिनिटांनंतर मात्र सॅण्डविच आणि कॉफीने ताबा घेतला जिभेचा. ऑफीस मधून परस्पर आल्यामुळे असणार पण पुढची दहा मिनिटे काही न बोलता उदरभरण करण्यात गेली दोघांची. अजून एकदा भेटूया असे तिने सुचवले, मलाही पटले. बील चुकते केले आणि आम्ही निघालो.
तिला स्टेशनला सोडून माझ्या वाटेला लागलो तेव्हा बरोब्बर ३५ मिनिटे संपली होती. बघू आता पुढची भेट होईल तेव्हा गाडी पुढे किती सरकते ते.
पुढची २०-२५ मिनिटं मला घरी पोहोचायला लागली.
"लवकर आलास" आईने मी आत आल्या आल्या म्हंटलं.
"हो ट्रॅफिक आणि सिग्नल काहीच नाही लागले आज. आंघोळ करुन येतो काही खायला केलयस का?" मी बाईकची किल्ली कि-होल्डरला लटकवत विचारलं
"भेटलात तिथे काही खाल्लंच नाहीत पोटभरीचं? मला वाटलं त्यादिवशी सारखं आजपण जेवणार नाहीस घरी म्हणून मी अजून काही केलच नाहीये. सकाळच्यात माझं भागलय. तुला दही पोहे देऊ का पटकन करुन की उपमा देऊ?" तिने विचारलं
"खाल्लं ग सॅंडवीच तिथे, पण पोट नाही भरलं. दही पोहे चालतील. खाराची मिरची घाल कुस्करून त्यात"
"बरं तू ये आंघोळ करुन मी करते" ती किचनमधे जात म्हणाली.
माझं खाऊन होई पर्यंत तिने संयम ठेवला आणि नंतर मात्र विचारलं,"कशी वाटली मुलगी?"
"ठिक आहे. फार काही बोलणं नाही झालं आज. पहिल्यांदा भेटलो म्हणून काही सुचलं नाही फारसं. परत भेटू कदाचित" मी जे आहे ते सांगून टाकलं
"बरं" ती इतकंच म्हणून तिची सिरियल लावायला उठली आणि मी माझ्या खोलीत येऊन टेकलो.
अल्पनाचा काही मेसेज आहे का बघायला व्हॉट्स ॲप उघडलं. reached home इतकाच मेसेज होता तिचा. मी त्यावर थम्ब्स अपची स्मायली टेकवली मी पण पोहोचलो घरी लिहिले आणि इतर मेसेज बघायला सुरुवात केली.
चिन्याने फोटो आणि व्हिडीओ पाठवले होते लकी आणि सिद्धीचे. आज लिश कम्युनिकेशन सेशन झालं म्हणे त्यांचं. वर्कआऊट केल्या नंतरच्या अवतारात फोटो घेतल्यासारखा वाटत होता पण तरी छान होता तो फोटो. लकी तिचा हात चाटत होता. एरव्ही आम्हाला उग्र वाटणारा त्याचा चेहरा यात मृदू वाटत होता. घामेजलेल्या तिच्या चेहऱ्यावरही एक कमावलेलं हसू दिसत होतं आणि डोळ्यातला आनंद लपत नव्हता.
मी फोटोच अॅनॅलिसीस करण्यात गुंतलो होतो तोपर्यंत चिन्याने अजून एक सेल्फी पाठवला तिघांचा त्या खाली मेसेज होता
"Thanks bro बेस्ट ट्रेनर मिळाला तुझ्यामुळे"
मी त्यालाही एक थम्ब्स अप देत - ग्रेट अचिव्हमेन्ट. हॅपी फॉर यु!”, असे लिहून टाकले आणि पुढचं काही यायच्या आधीच व्हॉट्स अॅप बंद केले.
सहज चाळा म्हणून इंस्टा ओपन केले आणि तिच्या पेजवर जाऊन पोहोचलो.
ऱिव्ह्य्यु सेक्शन ओपन केला. कोणी अॅग्रेशन कमी झाल्याचं लिहिले होते कोणी लिश ट्रेनिंगचा अनुभव शेअर केला होता. एका ठिकाणी तिचा त्यावर रिप्लायही होता डॉग पॅरेंटसाठी - 'Your dog change when you change'
Dogs are family. To train them first understand them, understand their needs.
एका पोस्टमधे लिहिले हो ते, ”आधी रिलेशनशिप बिल्ड करा डॉग बरोबर मग त्याला ट्रेनिंग द्यायला वेगळे एफर्ट्स घ्यावे लागणार नाहीत. ते होऊन जाईल as a by product”.
बाब्बो! जवळपास पन्नास एक रिव्ह्यू होते. आणि तितकेच रिल्स आणि पोस्ट्स जवळपास.
काही रिल्स इतर डॉग ट्रेनर्स बरोबर कोलॅबोरेशनमधे केलेले होते. एक रील वेट बरोबरचाही होता.
How to handle seperation anxiety, make car ride happy experience, barking issue, stray dogs and their behaviour वगैर वगैरे. एकेक व्हिडिओ जेमतेम १० मिनिटाचा पण माझे निम्मेही बघून नाही झाले इतकं मटेरिअल होतं वाचायला. काही इंटरेस्टींग होतं काही गोष्टी वाचताना मात्र असं वाटलं हे पेट्स पॅरेंटिंग दुरुनच ठीक.
नवीन पोस्टमधे वेबसाईट लॉंच करण्याच काम सुरु आहे असं लिहीलं होतं.
सिद्धी विनायक बरीच फेमस असावी तिच्या फिल्डमधे असं दिसत होतं एकंदरीतच. तिचं जग पेट्स शिवाय नाही आणि माझ्या जगात पेट्स असणं मला झेपेलसं वाटत नाही.
पेट्सचे क्युट व्हिडीओ बघणं वेगळं आणि प्रत्यक्ष पेट घरात आणून वाढवणं वेगळं.
मी इंस्टावर अल्पनाला शोधलं पण तिचं प्रोफाईल प्रायव्हेट होतं. तिला फॉलो रिक्वेस्ट पाठवावी का विचार करुन शेवटी ठरवलं की दुसऱ्या भेटीनंतर बघू. शैक्षणिक पदवी आणि व्यावसायिक उद्दिष्ट समान असली तरी रमीचा प्युअर सिक्वेन्स लागायला पुरेशी नाहीत. शैक्षणिक आणि करिअर अॅचिव्हमेन्ट्स वगळता आज काही देवाणघेवाणच नाही झाली आमची. वीस पंचवीस मिनिटाच्या भेटीतला अर्धावेळ गप्प बसून खाण्यातच संपवला आम्ही. पुढल्यावेळी बोलण्यासाठीच्या विषयांचा विचार करुन जायला हवे. त्या भेटीत एखादा पत्ता मिळून प्युअर सिक्वेन्स लागूनही जाईल कदाचित, असे मनाशीच म्हणत मी फोन चार्जिंगला लावायला उठलो.
घड्याळ रात्रीचा १ वाजून गेल्याचे दाखवत होतं, उद्यापासून सलग तीन दिवस सुट्टी आल्यामुळे आजचं जागरण चालण्यासारखं होतं पण मोबाईल बॅटरी तीन टक्क्यावर आल्यामुळे फोन बंद करुन चार्जिंगला लावलाय लागणारच होता. गुड नाईट मी कुणालाच उद्देशून नाही पण उगाचच म्हंटलं आणि लाईट बंद केला.
क्रमशः
खूप छान ग कविन...
खूप छान ग कविन...
मस्तच लिहीते आहेस
कित्येक दिवसानंतर मायबोलीवर
कित्येक दिवसानंतर मायबोलीवर काहीतरी छान वाचायला मिळत आहे.
कित्येक दिवसानंतर मायबोलीवर
कित्येक दिवसानंतर मायबोलीवर काहीतरी छान वाचायला मिळत आहे. >>> +१
मस्त आणि हॅपनिंग चालू आहे..
मस्त आणि हॅपनिंग चालू आहे..
मस्त !! भाग २ दिसला आणि
मस्त !! भाग २ दिसला आणि अधाशासारखा वाचून काढला. तुमच्याकडे पेट आहे का ? Detaling मस्त !!
धन्यवाद धनवन्ती, राहुल,
धन्यवाद धनवन्ती, राहुल, गिरीकंद, प्रज्ञा आणि अश्विनी
तुमच्याकडे पेट आहे का ? >> मांजर आहे. दोन वर्षांची होईल पुढल्या महिन्यात.
कित्येक दिवसानंतर मायबोलीवर
कित्येक दिवसानंतर मायबोलीवर काहीतरी छान वाचायला मिळत आहे. >>> +१
गुड नाईट मी कुणालाच उद्देशून
गुड नाईट मी कुणालाच उद्देशून नाही पण उगाचच म्हंटलं >> पोरगं प्रेमात पडलंय पण एडमिट करत नाहीये स्वतः
मस्त सुरु आहे कथा. लवकर पुढील भाग येईल अशी अपेक्षा
फार रिफ्रेशिंग कथा आहे. मस्त
फार रिफ्रेशिंग कथा आहे. मस्त वाटतंय वाचायला.
कित्येक दिवसानंतर मायबोलीवर
कित्येक दिवसानंतर मायबोलीवर काहीतरी छान वाचायला मिळत आहे. >>> +१
>>कित्येक दिवसानंतर मायबोलीवर
>>कित्येक दिवसानंतर मायबोलीवर काहीतरी छान वाचायला मिळत आहे. >>> +१
कित्येक दिवसानंतर मायबोलीवर
कित्येक दिवसानंतर मायबोलीवर काहीतरी छान वाचायला मिळत आहे>> या प्रतिसादासाठी सगळ्यांचे आभार*१०० (पुढचे भागही या भावनेला तडा जातील असे होणार नाहीत असे प्रयत्न असतील)
धन्यवाद रमड, अज्ञानी, मामी, अर्चना आणि स्वाती
मस्त!
मस्त!
अज्ञानी +१. हो ना. त्या चिन्याला सांभाळ रे बाबा!
हा भाग पण मस्त!! प्राणी
हा भाग पण मस्त!! प्राणी मलाही आवडतात त्यामुळे सिद्धी आवडली जास्त.
त्या चिन्याला सांभाळ रे बाबा!
त्या चिन्याला सांभाळ रे बाबा!>>.
हा भाग पण मस्त!! प्राणी मलाही आवडतात त्यामुळे सिद्धी आवडली जास्त.>>
धन्यवाद अमित, प्रीतमोहर
छान सुरुय
छान सुरुय
छान सुरु आहे.... शेवट
छान सुरु आहे.... शेवट प्रेडिक्टेबल वाटतोय पण शेवटाकडे जाणारी वाट वळण्दार असणार नक्कीच.
मला पण डॉग पेरेन्ट असल्यामुळे
मला पण डॉग पेरेन्ट असल्यामुळे मजा वाटते आहे वाचायला! भारतात माझ्या आठवणीप्रमाणे डॉग ट्रेनर हे प्रोफेशन आणि तसं वकिलीचे प्रोफेशनही कॉमन नाही आणि सहसा "सक्सेस्फुल" चे जे क्रायटेरिया धरतात त्यात दोन्ही बसत नाहीत त्यामुळे एकूणच गोष्टिचा कॅनव्हास वेगळाच (चांगल्या अर्थाने) वाटतेय.
चिन्याला सांभाळ रे बाबा!>>
मस्त जमलाय हा भागही.
मस्त जमलाय हा भागही.
कित्येक दिवसानंतर मायबोलीवर
कित्येक दिवसानंतर मायबोलीवर काहीतरी छान वाचायला मिळत आहे. >>> +१
दोन्ही भाग वाचले ग , खूप गोड
दोन्ही भाग वाचले ग , खूप गोड
सगळी पात्र relatable आणि आस्पासची वाटणारी आहेत
खूप नको टांगणीला लावु ग , पुढचे भाग पट्पट टाक
छान लिहिते आहेस कवीन , गोड
छान लिहिते आहेस कवीन , गोड शेवट असणार असे वाटतंय पण तरीही मजा येतेय वाचायला
कित्येक दिवसानंतर मायबोलीवर
कित्येक दिवसानंतर मायबोलीवर काहीतरी छान वाचायला मिळत आहे. >>> +१
दोन्ही भाग वाचले.
दोन्ही भाग वाचले.
कित्येक दिवसानंतर मायबोलीवर काहीतरी छान वाचायला मिळत आहे. >>> +१
पुभाप्र
धाग्याचा परिणाम:
धाग्याचा परिणाम:
आत्ता मुलीला घ्यायला क्लासजवळ येताना दोघं बाबा वयाचे लोक दुचाकीवरून जाताना दिसले. मागच्या बाबाने अलगद बास्केट धरली होती आणि कपडे ओसंडून बाहेर दिसत होते. बायकोने कामाला लावलं वाटतं दिवाळीच्या.. पण असे इस्त्रीचे कपडे बास्केटमध्ये कोंबून कोण भरतं... आणि इतकं अलगद जपून नेतं...असा विचार करेपर्यंत बास्केटच्या जाळीतून गुबगुबीत शेपटी हललेली दिसली!!
म्हणजे हे अलगद वगैरे माऊसाठी होतं!! चटकन ही गोष्ट आठवली
खूप मस्त रंगलीये गोष्ट. एकदम
खूप मस्त रंगलीये गोष्ट. एकदम मख्खन जैसा फ्लो.
मला सारखं पेट पुराण आठवतंय. आणि श्री तशी सौ मधली ती.
पुलेशु.
चवीने वाचली. मस्त एकदम
चवीने वाचली. मस्त एकदम
धन्यवाद झकासराव, अमी,
धन्यवाद झकासराव, अमी, मैत्रेयी, सायो, मृणाल, प्राची, सामी, हर्पेन, मंजुताई, प्रज्ञा, चिन्मयी, धनश्री
प्रज्ञा सगळा प्रसंग एकदम उभा राहिला डोळ्यापुढे. दुचाकीवरुन अगदी सुरवातीला बास्केटमधे घालून वेटर्नरीकडे न्यायची कसरत केलेय म्हणून रिलेट झाले. नंतर कॅट सॅक मधून न्यायला लागलो. आता सॅक छोटी पडायला लागलेय जरा. आता कॅट क्रेट मागवायचाय.
मस्त!! रिफ्रेशिंग लेखन आहे.
मस्त!! रिफ्रेशिंग लेखन आहे. कशाला तिला स्वत:च्या मित्रांना रेफर करतोय??
धन्यवाद रायगड
धन्यवाद रायगड
कशाला तिला स्वत:च्या मित्रांना रेफर करतोय?? Proud>> नाही तर काय. वय २७ झाल्यावर तरी इतकं कळावं की नाही
Pages