सोन्याचा महाल ते भुकेकंगाल: मुघलांच्या पतनपर्वातील रोचक कहाण्या

Submitted by अतुल. on 10 September, 2023 - 01:14

बाबर पासून बहादुरशाह जफर पर्यंत विविध मुघल सम्राटानी या देशावर सत्ता गाजवली. विशेषतः बाबर (इ.स. १५२६) ते औरंगजेब (इ.स. १७०७) पर्यंत मुघलांची निरंकुश सत्ता होती म्हटल्यास वावगे ठरू नये. जे प्रादेशिक राजे वा प्रांतिक शासक शरण येत नाहीत त्यांच्यावर आक्रमण करून त्यांच्या नृशंस हत्या करायच्या, त्यांच्या जमिनी बळकवायच्या, त्यांच्या स्त्रिया पळवून आणायच्या आणि त्यांची राज्ये आपल्या अधिपत्याखाली आणून तेथील कर आपल्या तिजोरीत भरायचा, अशी सर्वसाधारणपणे मुघलांची राज्य करण्याची पद्धती होती. शेकडो ते हजारो स्त्रिया मुघल बादशाहांच्या जनानखान्यात असल्याचे सांगितले जाते. अकबर बादशहाच्या जनानखान्यात तब्बल पाच हजार स्त्रिया होत्या असे उल्लेख आहेत. या काळात मुघलांकडे प्रचंड संपत्ती आणि मालमत्ता होत्या.

Aurangzeb green vault 2.jpg(सोन्याने मढवलेला महाल: औरंगजेबाच्या वाढदिवसाच्या प्रसंगाचे युरोपियन कलाकाराने बनवलेले शिल्प)

छ. शिवरायांनी मुघलांच्या निरंकुश सत्तेस प्रथमच अतिशय कडवे असे आव्हान उभे करून त्यांच्या साम्राज्याला सुरुंग लावला. मग मात्र मुघलांच्या साम्राज्याची घरघर सुरु झाली. असे सांगितले जाते कि मृत्युसमयी औरंगजेबास आपल्यानंतर मुघल साम्राज्याचे पुढे काय होणार याची चिंता लागून राहिली होती. आणि ती चिंता अगदीच अनाठायी नव्हती. कारण औरंगजेबानंतर बहादुरशाह जफर पर्यंत या साम्राज्याने पतनकाळच पाहिला. अखेरचा मुघल बादशाह बहादुरशाह जफर याच्या दोन मुलांना त्याच्याच डोळ्यादेखत गोळ्या घालून इंग्रजांनी बहादुरशाहास कैदेत टाकले. आणि तिथेच मुघल साम्राज्याचा अंत झाला.

औरंगजेब(1658-1707)नंतरच्या मुघलांच्या पतनकाळातल्या या काही रोचक कहाण्या...

औरंगजेबच्या मृत्युनंतर सय्यद बंधू यांचे मुघल सत्तेवर अप्रत्यक्ष नियंत्रण होते. हे बंधू मुघल सैन्यात अधिकारी होते व त्यांचे राजकीय वजनही खूप होते. जहांदार शाह पासून ते मुहम्मद शाह पर्यंतच्या मुघल वंशजाना बादशहा करण्यात सय्यद बंधूची महत्वाची भूमिका होती.

१. जहांदार शाह(1712-1713): रखेल स्त्रीच्या आहारी जाऊन तिच्याकडे राज्यसूत्रे सोपवणारा "लंपट मुर्ख" बादशहा
जहांदार शाह हा इतका स्त्री लंपट होता कि एकदा तर कपडे न घालताच दरबारात आला होता असेही उल्लेख आढळतात. लाल कुंवर नावाच्या रखेल स्त्री च्या तो पूर्णपणे आहारी गेला होता. इतका कि तिच्या सांगण्यावरून त्याने तिच्या नातेवाईकांना पदे आणि जहागिरी दिल्या होत्या. म्हणूनच याला इतिहासकारांनी "लंपट मुर्ख" अशी उपाधी दिली आहे. अतिशय क्रूर आणि विकृत कृत्ये सुद्धा ती त्याच्याकडून करवून घेत असे. एकदा यमुनेच्या पात्रात लोकांनी खचाखच भरलेली नाव बादशाहने आणि लाल कुंवरने केवळ मौजेखातर पाण्यात बुडवायचे आदेश दिले होते. वीस पंचवीस लोक जीवाच्या आकांताने धडपडत प्राणांतिक किंकाळ्या फोडत पाण्यात बुडत होते. आणि हे दोघे त्यांना बुडताना मजेत पाहत होते. हा बादशहा नऊ महिने गादीवर होता.

जहांदर आपल्याच भावाची हत्या करून गादीवर आला. यात त्याला सय्यद बंधूनी मदत केली. असे उल्लेख आहेत कि सत्तेत आल्यानंतर सुद्धा याने अनेक विरोधकांची (दरबारी आणि नातेवाईक) क्रूरपणे हत्या केली. इतकेच नव्हे तर सर्वांचे मृतदेह आठ दिवस सडत ठेवले. यापूर्वी कोणत्याही बादशाहने असे घृणास्पद कृत्य केले नव्हते. त्यामुळे जहांदर विषयी अनेकांच्या मनात प्रचंड रोष होता. अखेर त्याच्याच पुतण्या असलेल्या फर्रूखसियर याने त्याच्या विरोधात मोहीम उघडून त्यास कैद केले. आणि अखेर बेदम मारहाण करून व शिरच्छेद करून जहांदरची हत्या केली.

२. फर्रूखसियर (1713-1719): शिखांविरुद्ध क्रौर्याची परिसीमा
जहांदार शाहच्या काळात बंदासिंग बहादूर या शीख योद्ध्याने साठ हजार शिखांच्या फौजेसहित मुघलांच्या विरोधात आक्रमण करून दिल्ली आणि लाहोर यांच्यामधला पंजाब प्रांत काबीज केला होता. शिखांच्या वाढत्या प्रभावामुळे मुघल अस्वस्थ झाले होते. फर्रूखसियरने वीस हजार मुघल सैन्य पाठवून बंदासिंग बहादूर आणि त्याचे साथीदार असलेल्या एका किल्ल्यास वेढा घातला. तब्बल आठ महिने वेढा कायम ठेवल्यावर बंदासिंग बहादूर दोन हजार सैन्यासह शरण आला. त्या सर्वाना मुस्लीम धर्म स्विकारण्याची अट ठेवण्यात आली. पण कुणीही त्यास तयार झाले नाही. फर्रूखसियरने त्या सर्व दोन हजार सैनिकांचा शिरच्छेद करण्याचे आदेश दिले. बंदासिंग बहादूरची अत्यंत क्रूरपणे हाल हाल केले गेले. त्याचे वर्णन इथे लिहू शकत नाही. कारण ज्याप्रकारे त्याचे हाल केले, त्याचे वर्णन वाचल्यावर चार दिवस जेवण जाणार नाही. अमानुष शब्दसुद्धा कमी पडेल इतके ते भयावह आणि बीभत्स आहे. अतोनात हाल करून अखेर बंदासिंग बहादूरची हत्या केली गेली.

एकदा फर्रूखसियर आजारी पडला. तेंव्हा एका ब्रिटीश डॉक्टरने याच्यावर उपचार केले. त्यामुळे खुश होऊन याने इंग्रजांना भारतात कुठेही टैक्स-फ्री व्यापार करण्याचा परवाना दिला.

ज्या सैद बंधूंमुळे तो आपल्या काकाची हत्या करून गादीवर आला त्याच सैद बंधूंनी इतरांच्या मदतीने त्याच्यावर हल्ला केला. तो पळून जाऊन जनानखान्यात स्त्रियांच्यात जाऊन लपला. तिथून ओढून काढून त्यास हाल हाल करून ठार मारले.

३. मुहम्मद शाह (1719-1748): दरबारात पेटीकोट घालून येणारा "रंगीला बादशहा"
story-of-mughal-emperor-muhammad-shah-rangeela.jpg
मुघल बादशहांची विलासी आणि रंगेल वृत्ती इतिहासाला काही नवीन नाही. पण मुहम्मद शाह याबाबत सर्वाना पुरून उरेल असा होता. कारण त्याने फक्त आणि फक्त नाचगाणी आणि स्त्रियांचा सहवास इतके आणि इतकेच केले. त्याला स्त्रियांची वस्त्रे परिधान करायला आवडत असंत. तो अनेकदा पेटीकोट घालून दरबारात येत असे. त्यामुळे "मुहम्मद रंगीला" असेच त्याचे नामकरण झाले होते. त्याला युद्ध आणि इतर राजकीय गोष्टीत जराही रस नव्हता. सकाळी उठल्यावर कोंबड्यांच्या झुंजी पाहण्यापासून त्याच्या दिवसाची सुरवात व्हायची. मग घोड्यांच्या शर्यती, संगीत, नाचगाणी, इश्कमुहब्बत इत्यादी करत करत रात्री दारू आणि स्त्रिया. असा त्याचा रोजचा दिनक्रम होता.
याच्या काळात सय्यद बंधू मारले गेले. मराठा आणि शिख साम्राज्ये बलाढ्य होऊन मुघल साम्राज्य अत्यंत दुबळे झाले. याच्याच काळात अनेक प्रदेश मुघल साम्राज्याने गमावले. लुटमारीमुळे मुघलांची आर्थिक स्थिती कमालीची खालावली.

नादिर शाहचे आक्रमण आणि दिल्लीची भीषण कत्तल
सर्वाधिक लूट इराणच्या नादिर शाहने दिल्लीवर केलेल्या आक्रमणात झाली. इराणचे राज्य चालवण्यासाठी नादिरला अतिशय तीव्रतेने धनाची निकड भासत होती. म्हणून त्याने लूटमारीच्या उद्देश्यानेच दिल्लीवर स्वारी केली. कर्नालच्या युद्धात केवळ तीन तासात मुहम्मद शाहच्या सैनाचा दारूण पराभव झाला. मुहम्मद शाहला बंदी बनवून नादिर दिल्लीत प्रवेशता झाला. तितक्यात कुणीतरी नादिरच्याच मृत्यूची अफवा पसरवली. झाले! आधीच खवळलेल्या दिल्लीकरांनी नादिरच्या सैनिकांवर हल्ले सुरु केले. तीन हजार सैनिक मारले गेले. हे समजताच नादीरशहाच्या संतापाचा उद्रेक झाला. त्याने सैन्याला दिसेल त्या नागरिकाची हत्या करण्याचा आदेश दिला आणि दिल्लीच्या भीषण कत्तलीला सुरवात झाली. पुढच्या तीन तासात तीस हजार नागरिकांची नृशंस कत्तल करण्यात आली तो दिवस होता २२ मार्च १७३९. या कत्तलीत पुरुष, स्त्रिया, लहान मुले या सर्वांचा समावेश होता. दिल्लीच्या रस्त्यांवर मृतदेहांचा खच पडला होता. कत्तल थांबवण्यासाठी मुहम्मद शाहने अक्षरशः नादिर शहाला दयेची भिक मागितली तेंव्हा कुठे हा संहार थांबला. दिल्लीची अतोनात लुट आणि जीवित व वित्तहानी करून नादीरशहा इराणला परतला. कोहिनूर हिरा, दर्यानूर हिरा, इतर कित्येक किमती हिरे, रत्नजडीत मयुरासन इत्यादी मौल्यवान वस्तूंसहित एकूण सत्तर ते ऐंशी कोटी रुपयांची लूट त्याने केली (आजच्या काळात दशअब्ज डॉलर होतात)

पुढे अजून एका युद्धातदेखील खूप सारे मुघल सैन्य मारले गेले. ती बातमी ऐकताच "मुहम्मद शाह रंगीला" नैराश्यात गेला. त्याने एका इमारतीत स्वत:ला कोंडून घेतले. तो सतत मोठमोठ्याने रडायचा. त्याने अन्नपाणी वर्ज्य केले. आणि त्यातच एके दिवशी त्याचा मृत्यू झाला.

४. शाह आलम द्वितीय(1760-1806 ): बादशहा ज्याच्या दरबारात राजघराण्यातीलच स्त्रियांची क्रूर विटंबना केली गेली
मुघल सम्राज्य संपले तर नव्हते पण दुबळे आणि क्षीण झाले होते, त्या काळात शाह आलम द्वितीय हा बादशहा राज्य करत होता. कदाचित हा सर्वात दुर्दैवी बादशाह म्हणावा लागेल कारण याच्या काळात केवळ मुघल साम्राज्याचाच नव्हे तर मुघल राजघराण्याचासुद्धा सर्वाधिक वाईट काळ होता. मुघलांच्या काळात अफगाणिस्थानातील रोहिल्ला या पठाण समूहाच्या नेत्याची मुघलांनी हत्या केली होती. त्याचा मुलगा गुलाम कादिर हा मुघल साम्राज्य दुबळे होण्याची जणू वाटच पाहत होता. १८ जुलै १७८८ रोजी तो दिल्लीवर चाल करून आला. मुघलांनी पूर्वी केलेल्या अत्याचाराचा बदल घेण्यास टपलेले इतरही काही त्यास सामील झाले होते. वडीलांच्या मृत्यूचा बदल घेणे, राजवाड्यातील संपत्तीची लूट करणे आणि मुघलांची दुबळी सत्ता उलथवून दिल्लीचे सिंहासन बळकावण्याच्या तिहेरी हेतूने गुलाम कादिर याने आक्रमण केले होते. १८ जुलै १७८८ ते २ ऑक्टोबर १७८८ या कालावधीत त्याच्या अत्याचारांनी राजधानी आणि विशेषतः मुघल राजमहाल अक्षरशः थरारून गेला होता. १० ऑगस्ट १७८८ रोजी त्याने वृद्ध असलेल्या शाह आलम (द्वितीय) चे डोळे काढून त्याला आंधळे केले. मग खजिना लुटण्यासाठी राजघराण्यातील एकेका व्यक्तीचे हाल हाल केले. मुघल राण्या, राजपुत्र आणि राजकन्यांना निर्वस्त्र करून दरबारात नृत्य करायला भाग पाडले. त्यातल्या अनेक स्त्रियांनी नंतर यमुनेत उडी मारून आत्महत्या केल्या. या दोन अडीच महिन्याच्या कालावधीत राजघराण्यातील एकवीस व्यक्तींच्या हत्या आणि जवळपास पंचवीस करोड रुपयांच्या संपत्तीची (त्यावेळच्या मुल्यानुसार) लुटालूट झाल्याचा अंदाज आहे. इतिहासकार जदुनाथ सरकार लिहितात, "या पाशवी अत्याचारांमुळे मुघलसाम्राज्याच्या प्रतिष्ठा व इज्जतीचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले"

धन कुणाचे? लुटले कुणी? वाचवले कुणी? आणि मिळाले कुणाला
या सगळ्या गदारोळात शाह आलमचा मुलगा आग्र्याला पळून गेला. तेथून त्याने महाराष्ट्रात असलेल्या महादजी शिंदे यांना संदेश धाडून परिस्थितीची कल्पना दिली व मदत मागितली. महादजी शिंदे यांनी मोठ्या प्रमाणावर फौजफाटा घेऊन दिल्लीकडे कूच केले. मराठा सैन्याने उत्तर प्रदेशात मीरत जवळ घौसगढ येथे गुलाम कादीरच्या मुसक्या आवळल्या. तेंव्हा लॅस्टिनो(Lestineau) नावाचा एक जन्माने फ्रेंच असलेला अधिकारी महाद्जींच्या सैन्यात होता. गुलाम कादिरला पकडल्यावर गुलामने लुटलेल्या मौल्यवान संपत्तीची बॅग लॅस्टिनो च्या हाती लागली. ते घबाड हाती पडताच लॅस्टिनोने सैन्याची जबाबदारी एका कनिष्ठ अधिकाऱ्यावर सोपवली आणि पोबारा केला.

महादजींनी गुलाम कादीर यास कोणतीही इजा न करता बंदिवान करून ठेवले होते. पण शाह आलमने महादजींना, "कादीरचे डोळे काढा, अन्यथा मी मक्केत जाऊन भिक मागेन" अशी गळ घातली.त्यावर महादजींनी कादीरचे डोळे काढण्याचे आदेश दिले. मग डोळे कान नाक ओठ असे अवयव कापून महादजींनी ते शाह आलमकडे पाठवून दिले. जिवंतपणीच त्याचे हात पाय व अन्य अवयवसुद्धा कापण्यात आले. आणि अखेर सारे अवयव कापलेल्या अवस्थेत ३ मार्च १७८९ रोजी गुलाम कादीर याचा मथुरेत बघ्यांच्या गर्दीच्या उपस्थितीत एका झाडाला टांगून शिरच्छेद करण्यात आला. जेणेकरून पुन्हा असे हल्ले करण्यास कोणी धजावणार नाही.

इकडे लॅस्टिनोने ते घबाड घेऊन घेऊन पुढे इंग्लंड गाठले. इतिहासकारांच्या नोंदीनुसार, त्या संपत्तीचा ठावठिकाणा त्यानंतर कधीच कुठे लागला नाही.

५. बहादुरशाह जफर (1837-1857): स्वत:च्याच मुलांना इंग्रजांनी गोळ्या घातलेल्या पहायची वेळ आली
_98655648_zafarbed.jpg
दिनांक १६ सप्टेंबर १८५७. ब्याऐंशी वर्षाचा एक वृद्ध लाल किल्ल्याच्या महालात जमिनीकडे नजर झुकलेल्या स्थितीत उभा होता. तो गलितगात्र झाला होता, थरथरत होता. इंग्रजांनी लाल किल्ल्याला वेढा घातला होता आणि कोणत्याही क्षणी ते आत येऊन आपणास पकडून नेतील आणि फाशी देतील अशी भीती त्या वृद्धास वाटत होती. आणि म्हणून शस्त्रे ठेऊन शरण येण्यास त्याचे मन अजूनही धजावत नव्हते. हा वृद्ध म्हणजे मुघलसाम्राज्याचा अखेरचा बादशहा बहादूर शाह जफर. १९ सप्टेंबर १८५७ रोजी जफर हे कुटुंबीयांसमवेत लाल किल्ल्यातून पलायन करण्यात यशस्वी झाले. आणि २० तारखेला इंग्रजांना कळले कि ते हुमायूनच्या मकबऱ्यात लपले आहेत. त्यांनी तिथे आपला प्रतिनिधी पाठवला. बहादूर शाह जफर यांनी त्याला सांगितले कि जर जीवदान मिळणार असेल तर मी शरण यायला तयार आहे. इंग्रजी सैन्याचे कॅप्टन विलियम हॉडसन याला तसे कळवण्यात आले. खरे तर त्याला इंग्रज सत्तेविरोधात उठाव करणाऱ्या कोणत्याही क्रांतिकारीस माफ न करण्याचे आदेश वरून देण्यात आले होते. पण जफर यांचे वय लोकप्रियता आणि एकूण रागरंग पाहून इंग्रजांनी त्यांना जीवदान देण्याचे ठरवले असावे. शस्त्रे खाली ठेऊन शरणांगती पत्करल्यावर हुमायूनच्या मकबऱ्यातून ८२ वर्षाच्या वृद्ध बादशाहाला १८५७ साली इंग्रजांनी अटक केली, आणि इ.स. १५२६ पासून सुरु असलेली मुघलांची सत्ता अधिकृतरीत्या संपुष्टात आली. त्याच दिवशी जफरच्या दोन मुलांना आणि नातवाला हॉडसनने गोळ्या घालून ठार केले. ते कळताच पदच्युत बादशहा थिजला. त्याच्या तोंडून एकही शब्द बाहेर पडला नाही. अटकेत असताना त्यास अतिशय अपमानास्पद वागणूक दिली गेली. पुढे त्याच्यावर खटला दाखल केला गेला आणि पुढे रंगून येथे त्याची रवानगी करण्यात आली जिथे १८६२ साली वयाच्या ८७ व्या वर्षी त्याचे निधन झाले.

६. मिर्झा जवान बख्त: दिल्लीच्या रस्त्यावर भिक मागणारा मुघल
बहादुरशाह जफर हा अधिकृतरीत्या अखेरचा मुघल बादशहा होता. मिर्झा जवान बख्त हा त्याचा पंधरावा मुलगा. १८५७ च्या उठावाच्या रणधुमाळीमधून त्याच्या आईने त्याला इतर भावंडांपासून बाजूला ठेवले होते. त्यामुळे इतर सर्व कुटुंब बहादुरशाह जफरसोबत रंगूनला गेले तरी मिर्झा जवान बख्तला घेऊन त्याच्या आईने मोठी कसरत करत दिल्लीतच थांबण्यात यश मिळवले. बादशाही गेल्याने उत्पन्नाचे सारे स्त्रोत बंद झाले होते. इंग्रजांनी त्यांच्या कुटुंबियांना पेन्शन सुद्धा दिली नव्हती. अशा परिस्थितीत प्रचंड आर्थिक तंगीचा सामना या कुटुंबास करावा लागला. याच्यावर अक्षरशः भिक मागायची वेळ आली. रात्र पडली कि चेहरा झाकून हा बादशहाचा वंशज बाहेर पडत असे आणि दिल्लीच्या रस्त्यावर उभा राहून भिक मागत असे. त्यातूनही अनेक नागरिक त्याच्या एकंदर देहबोलीकडे पाहून त्याला ओळखत आणि भिक दिल्यानंतर त्याला सलाम करून पुढे जात असत.

या पुढच्या मुघल वंशजांची फारशी दखल इतिहासाने घेतलेली दिसत नाही. पण ज्या काही किरकोळ नोंदी कुठेकुठे आहेत त्यावरून ते फार चांगल्या स्थितीत नसावेत असे दिसून येते. पंचम जॉर्जच्या स्वागतानंतर त्याची जी मिरवणूक काढण्यात आली तेंव्हा तिथे रस्त्याकडेला मुघलांचा वंशज भिक मागताना आढळला होता अशी नोंद एका इतिहासकाराने केली आहे. बहादुरशाह जफरचा अखेरचा थेट वंशज म्हणून मिर्झा बेदर बख्त या नावाचा उल्लेख आढळतो. १९८० साली त्याचा मृत्यू झाला. कलकत्याच्या झोपडपट्टी भागात तो राहत असे व भांड्यांना कल्हई करणे किंवा चाकूला धार काढून देणे वगैरे सटरफटर कामे तो करत असे. आजच्या काळात त्याची मुलगी वृद्ध झाली आहे. ती व तिची नातवंडे हेच कुटुंब मुघलांचे वंशज म्हणून आज ओळखले जातात. कलकत्त्याच्या त्याच वस्तीत हे कुटुंबीय आज राहतात.

article-2424410-1BE45666000005DC-959_634x491.jpgसंदर्भ:
1. https://en.wikipedia.org/wiki/Jamshed_Bakht
2. https://en.wikipedia.org/wiki/Bahadur_Shah_Zafar
3. https://en.wikipedia.org/wiki/Mirza_Jawan_Bakht_(born_1841)
4. https://en.wikipedia.org/wiki/Battle_of_Karnal
5. https://navbharattimes.indiatimes.com/visual-story/india/farrukhsiyar-hi...
6. https://navbharattimes.indiatimes.com/visual-story/india/why-mughal-empe...
7. https://zeenews.india.com/hindi/web-stories/mughal-black-history-bahadur...
8. https://navbharattimes.indiatimes.com/visual-story/india/mughal-history-...
9. https://navbharattimes.indiatimes.com/india/bahadur-shah-zafar-last-mugh...
10. https://www.opindia.com/2022/05/aurangzeb-mughals-kolkata-howrah-last-su...
11. https://www.jansatta.com/jansatta-special/mughal-emperor-jahandar-shah-w...
12. https://zeenews.india.com/hindi/india/mughal-emperor-jahandar-shah-known...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ते अ नंतर त आला की त्या बिनडोक प्रणालीला वाटतं की हे अ‍ॅट नावाचं फन्क्शन आहे. आता ही प्रणाली कोण म्हणून विचारू नका. असेल मुघलांपैकी कुणीतरी.

पण मी टाइप केले अत्याचार ते का सलग दिसते ?? की फक्त मलाच सलग दिसते आणि इतरांना function at() { [native code] }याचार असे दिसते आहे !!

तुम्ही स्वतःच्या उपकरणातला मराठी/गूगल इंडिकादि कळपाट वापरून टंकले तर ते बरोबर येते. मायबोलीच्या जालीय आवृत्तीत तिथले मूलभूत लिप्यंतर वापरून टंकले तर ही function at() {
[native code]
}अ समस्या येते. मिसळपाववरही ही येते. मी वेमांना विचारले होते, पण ती चूक त्यांच्याकडून झालेली नाही. काहीतरी जावास्क्रिप्टमधला किडा आहे.

ओके.
म्हणजे मायबोली अत्याचार करते तेव्हा फक्त function at() { [native code] }ची पावती फाडली जाते.

उत्तम माहितीपूर्ण लेख!

मलाही आधी रोचकच्या जागी विकृत शब्द हवा असे वाटले होते. पण हा लेख वाचल्यावर महमद्शहाने कलेला प्रोत्साहन देणारे प्रतिसाद आलेले बघून हतबुद्ध झालो. त्याने दिलेही असेल गाण्याला प्रोत्साहन, पण त्याची किंमत कुणी आणि किती मोजली ते वाचल्यावरदेखील त्याच्या कलेला प्रोत्साहन देण्याचा आवर्जून उल्लेख करावासा वाटला त्यावरून विकृतच्या जागी रोचक हाच शब्द योग्य आहे हे पटले.

बहादूरशहाबद्दल वाईट वाटल्याचे वाचून एक प्रश्न पडला - जर का त्याच्याबद्दल वाईट वाटावे अशी परीस्थीती नसती तर तो कसा वागला असता? जर-तर या बोलण्याला काही अर्थ नाही आणि ते बोलणे शस्त्रीयही नाही. पण स्टॅटीस्टीक्स ही एक शास्त्रमान्य शाखा आहे आणि ते सांगते की नीयमानुसार गोष्टी घडण्याची शक्यता ही अपवादाने गोष्टी घडण्याच्या शक्यतेपेक्षा कैक पटीने जास्त असते.

नीयम १ - Power tends to corrupt; absolute power corrupts absolutely
नीयम २ - माणसाची घडण ही आनुवंशिकतेवर आणि त्याला भवतालातून दिसणार्‍या/मिळणार्‍या वागणुकीतून होत असते

अपवाद १ - भांगेत तुळस

मग दोन नियम विरुद्ध एक अपवाद अशा परीस्थीतीत बहादूरशा चांगला राज्यकर्ता झाला असता याची शक्यता किती वाटते?

माहीतीपुर्ण लेख.

अति क्रूर अत्याचार, बापरे काटा आला अंगावर.

दुरदर्शनवर बहादुरशाह जफर वर सिरीयल होती एक हिंदी, काही दिवस बघितलेली, पुर्ण नव्हती बघितली. माध्यमिक शाळेत किंवा कॉलेजात होते बहुतेक तेव्हा.

माहीतीपुर्ण लेख.

अति क्रूर अत्याचार, बापरे काटा आला अंगावर::+1

भयंकर अंधारमय तमो युग होते ते. काय झाले होते की भारत वर्षाने शरणागती पत्करली? . माझ्या थोड्याफार वाचण्या प्रमाणे मी याचा भार बुद्ध धर्माच्या प्रसारास देते, जास्तच अणि नको तिथे दया, क्षमा आणि अहिंसा याचा वापर.

गाण्याच्या क्लासमध्ये मुलतानी रागातली बंदिश शिकवली होती. ती सदारंगची होती.

ए गोकुल गांव के छोरा रे
बरसाने की नार रे ।

इन दोउन मन मोह लियो है
रहे सदारंग निहार रे ॥

यात हतबुद्ध होण्यासारखं काय आहे? त्याचा तोही एक वारसा आहे. मोहम्मद शाह रंगीला हे अनेकवेळा ऐकलं होतं. ते आठवलं म्हणून लिहिलं.

आता कालानुरूप त्या सगळ्या बंदिशींवर बंदी आणायला हवी असेल. किंवा ते शब्द बदलता येतील. मुगल गार्डन्सचं नाव बदललं ना?

तसं तर मध्ययुगात आणि त्यापूर्वीच्या काळात जगात बहुतेक सगळ्याच संस्कृतींत ज्या ज्या आता महान म्हणवल्या जाणार्‍या गोष्टी - विशेषतः वास्तु घडवल्या गेल्या त्यांचा पाया शोषण हाच आहे.

<काय झाले होते की भारत वर्षाने शरणागती पत्करली?> तेव्हा भारतवर्ष असं काही होतं का? सगळे राजे एकमेकांशी लढत होते आणि एकमेकांच्या प्रजांना लुटत होते. शिवाजीमहाराजांसारखा कोणी अपवाद.

रोचक माहिती छान लेख
इतके दिवस वाचायचे टाळत होतो हा आपल्या आवडीचा विषय नाही म्हणून..

जहांदार शाह(1712-1713): दुप्पट वयाची स्त्री रखेल म्हणून ठेवणारा आणि तिच्याकडे राज्यसूत्रे सोपवणारा "लंपट मुर्ख" बादशहा

लाल कुंवर : ही स्त्री आपल्यापेक्षा दुप्पट वयाच्या जहांदार शाह (1712-1713) बरोबर रहात होती.
Lal Bangla, a landmark of the Delhi Golf Club, has undergone repairs and one is tempted to relate the story of the vivacious Lal Kanwar, the courtesan supposed to be buried there. Jahandar Shah’s concubine, as she is known in history, held centre-stage in Delhi, Agra and Lahore during the one-year rule of that frivolous emperor in 1712. He ascended the throne after a battle of succession following the death of Bahadur Shah I, Aurangzeb’s son and successor.
Lal Kunwar was the daughter of Khasuriat Khan, a descendant of Mian Tansen, and captivated Jahandar Shah, who was more than double her age. She had wit, charm, coquetishness and skill in dancing. . Her family was one of singers, drummers and fiddlers (Kalawant) and earned its livelihood as such.
https://www.thehindu.com/society/history-and-culture/the-lady-who-left-a...

औरंगजेबने जे महाराष्टात पेरले त्याचे पुरेपूर उट्टे त्याच्या पुढच्या पिढ्याना भोगावे लागले असे म्हणालं तरी चालेल. >>> हो. त्याचाही ताराराणीमुळे दक्षिणेकडे (पश्चिम महाराष्ट्र) निभाव लागला नाही. मराठवाडा, नगर इथेच त्याचं वर्चस्व होतं. सातारा, कोल्हापुर भागात काही चाललं नाही. जाम जेरीस आणलेलं ताराराणी यांनी.

प्रतिसादासाठी मन:पूर्वक धन्यवाद सर्वाना _/\_

@mi_anu, @अस्मिता,

अगदी अगदी. सहमत आहे.

@झकास,
>> औरंगजेबने जे महाराष्टात पेरले त्याचे पुरेपूर उट्टे त्याच्या पुढच्या पिढ्याना भोगावे लागले असे म्हणालं तरी चालेल.

होय, असेही interpretition केले गेले आहे. काही जणांच्या मते काव्यागत न्याय. पण यावर मतमतांतर आहेत.

@सामो
माझ्या माहितीनुसार "न किसी की आँख का नूर हूँ" हि बहादुरशाह यांनी लिहिलेली नाही. ती मुज़्तर ख़ैराबादी यांची गझल आहे.

@भरत, @हरपा
तुमच्या प्रतिसादांतून खूप छान माहिती दिलीत. धन्यवाद.

@आंबट गोड, @मानव, @अज्ञानी
Lol function at() { [native code] }

@माधवजी
खरेच आहे. विचारमंथन करायला भाग पाडणारे मुद्दे मांडले आहेत Happy विकृती, क्रौर्य, कारुण्य, बीभत्सपणा अशा अनेक छटा आहेत या किश्श्यांमध्ये. पण मोहम्मद शाह रंगीला, बहादुरशाह जफर आणि इतरही एक दोन मुघल बादशहा/नवाब आहेत ज्यांच्या काळात कला क्षेत्रास बरेच योगदान मिळाले हे देखील खरेच आहे.

@अन्जू
होय, बहादुरशाह जफरवर पूर्वी दूरदर्शनवर एक सिरीयल आली होती. त्यामुळेच या बादशहा अनेकांना विषयी माहिती झाले.

@भरत
>> तेव्हा भारतवर्ष असं काही होतं का? सगळे राजे एकमेकांशी लढत होते आणि एकमेकांच्या प्रजांना लुटत होते. शिवाजीमहाराजांसारखा कोणी अपवाद.

अगदी सहमत आहे. त्या काळात स्त्रियांकडे commodity म्हणून पाहिले जात होते. मुघलच नव्हे आणि केवळ भारतातच नव्हे, तर जगातच सर्वत्र सम्राटांचे जनानखाने (Harem) होते. इतर राजांचे धन, जमिनी आणि स्त्रिया लुटल्या जात. इतर राजांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी त्यांना भेट दिल्या जात. हे सर्वत्रच घडत होते. एक शिवाजी महाराजच आहेत (किंवा अजून एखाद दुसरे उदाहरण असेल) ज्यांनी स्त्रियांचा सन्मान केला. त्यांचे असे जनानखाने नव्हते. म्हणूनच छ. शिवराय हा फार फार वेगळा राजा होऊन गेला.

@जुनैद मियां
हे निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद. दुप्पट वयाची स्त्री हा उल्लेख मी जनसत्ता मधील लेखात वाचला होता.
https://www.jansatta.com/jansatta-special/mughal-emperor-jahandar-shah-w...
पण विकिपीडिया व इतर ठिकाणचे संदर्भ पाहता बादशहाचे वय दुप्पट होते असे दिसून येते. तसा बदल धाग्यात केला आहे.

माधव, एकतर हा इतिहास आहे. दोन बाजू नसलेलं नाणं अस्तित्त्वात नाही. काळं पांढरं असं जगात, मागेवळून बघताना तर अजुनच, काही असेल असं वाटत नाही.
अगदीच रच्याकने: परवाच श्रोडिंजर बद्दल काही वाचताना त्याचं विकीपेज वाचलं. पर्सनल लाईफ भागात किळस येईल असे उल्लेख आहेत. काय बोलणार! जे आहे ते असं आहे. बस्स इतकंच.

+
आणि जे कधी घडलेच नाही, त्याबद्दल कल्पना करुन आज आपण आपलं मन कलुषित का करायचं ?? ती माझी कमेंट होती.
------------------------
मी एखाद्याने स्वतंत्र व्यक्ती म्हणून जगाला काय चांगलं दिलंय ते बघते , मला त्यांच्या वंशावळीत व त्यामुळे त्यांना मिळालेल्या प्रिव्हिलेजसमधे रस नसतो. पूर्वज/वंशज/कुळ/सत्ता/धर्म/पंथ/वारसा/समाजातलं स्थान /स्त्री -पुरुष/जातपात/श्रीमंती -गरिबी ई ई गोष्टी गृहितकांतून कालबाह्य व्हायला हव्यात, तो हक्क संविधानानाने दिला आहे पण मनातून जात नाही. प्राप्त परिस्थितीत आपण काय करू शकतो, हे इतिहासात काय घडले होते किंवा घडू शकले असते या विचारांपेक्षा जास्त महत्त्वाचे आहे असे माझं मत आहे, म्हणून मन यात रमत नाही.

>>>>>>माझ्या माहितीनुसार "न किसी की आँख का नूर हूँ" हि बहादुरशाह यांनी लिहिलेली नाही. ती मुज़्तर ख़ैराबादी यांची गझल आहे.
ओह ओके ओके.

सगळे राजे एकमेकांशी लढत होते आणि एकमेकांच्या प्रजांना लुटत होते::
हे कारण नाही. हे राजे पराक्रमी होते तर ते परकीय आक्रमणे का थोपवू शकले नाही असा प्रश्न आहे. अफगाणिस्तान पर्यंत अशोक आणि चंद्रगुप्त मौर्य साम्राज्य होते. याचा र् हा स कसा झाला हा मला नेहमी प्रश्न पडतो. त्याची उत्तरे farshi कुठे आढळत नाही. मला इतिहास आवडतो आणि अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा मी प्रयत्न करते. Facts are facts. त्याने मने कलुषित वगैरे प्रकार मी करत नाही.

मी आताच गाजलेल्या प्रस्तावना हे पुस्तक वाचलं. त्यातल्या तीन प्रस्तावना मराठेशाहीच्या इतिहासाशी संबंधित पुस्तकांच्या आहेत. त्यात त्या त्या प्रस्तावनाकारांनी मराठा साम्राज्य / स्वराज्य आधी का निर्माण होऊ शकले नाही आणि नंतर त्याचा र्‍हास कसा झाला हे मुद्दे चर्चिले आहेत. त्यात आधुनिक शस्त्रे हा एक मुद्दा आहे.

मुगल साम्राज्याचा र्‍हास झाला याचं मुख्य कारण पुढचे वारसदार कर्तृत्वात कमी पडले तसंच मौर्यांच्या बाबत झालं असेल. आपल्याला एखादं साम्राज्य तळपत असतं तोवरचाच इतिहास माहीत असतो, पुढचा नाही.

मस्तच लेख माहितीपूर्ण. निवांत वाचायला बाजूस ठेवला होता. ह्या कालखं डा बद्दल अजून रोचक माहिती ऐकायची असेल तर विलयम डॅलिरिंपल व अनिता आनंद ह्यांचा द एंपायर हा पॉडकास्ट नक्की ऐका. विल्यम ची पुस्तके पण आहेत ह्या काळावर. इस्ट इंडिया कंपनी कल कत्ता इथे पॉड कास्ट सुरू होतो. कोहिनूर च्या प्रवासावर तीन चार भाग आहेत. एकदम रंजक स्वरुपात माहिती आहे. ते सोन्याचे शिल्प किती छान आहे.

भरत / अमित, 'महमदशा रंगिले' ही चीज माझीही खूप आवडती आहे - पंडीतजींनी आणि लतानेही अप्रतिमच गायली आहे. महमदशहाचा उल्लेख झाल्यावर सगळ्यात पहिली तीच चीज आठवली. कुठल्याही नाण्याला दोन बाजू असतात हेही मान्यच. पण लेख जे काही सांगायचा प्रयत्न करतोय त्याच्याशी तो प्रतिसाद मला विसंगत वाटला. तो प्रतिसाद कलेच्या संबंधीत धाग्यावर असता तर कदाचीत काहीच खटकलं नसतं त्यात. एखाद्या स्त्रीवर अत्याचार झाल्याची बातमी वाचल्यावर लगेचच आपण अत्याचार करणार्‍याची थोरवी (तो कितीही थोर असला तरी) गाऊ का? इथे फरक इतकाच की बातमी असल्यामुळे ती स्त्री वर्तमानातली असेल आणि लेखात उल्लेख झालेले अत्याचार भोगलेल्या स्त्रीया भूतकाळातील होत्या.

अस्मिता. , इतिहासात काय घडले होते किंवा घडू शकले असते याचा विचारच करायचा नाही तर बहादूरशहाबद्दल वाईट वाटायचेही कारण नाही.

छान लेख. या सगळ्यांबद्दल काही माहिती नव्हती.

बहादूर शाह जफर यांच्याबद्दल नितांत आदर वाटतो. दुर्दैवाने त्यांच्या इंग्रजांविरुद्धच्या लढ्याला यश मिळाले नाही व त्यांचं तितकं कौतुक झालं नाही. >>> त्याच्या लढा त्याचे म्हणजे मोगलांचे साम्राज्य परत स्थापित करण्यासाठी होता, लोकशाहीसाठी नव्हता. या लढ्याला यश मिळाले नाही हे बरेच झाले कारण तसे झाले असते तर कदाचित आजही भारतात मोगल साम्राज्य असले असते. असो. ह्या सगळ्या जरतर च्या गोष्टी. १८५७ चा उठाव अयशस्वी झाला पण त्याचा भारताच्या एकुणच राजकारणावर खुप मोठा प्रभाव पडलेला आहे.

Pages