बाबर पासून बहादुरशाह जफर पर्यंत विविध मुघल सम्राटानी या देशावर सत्ता गाजवली. विशेषतः बाबर (इ.स. १५२६) ते औरंगजेब (इ.स. १७०७) पर्यंत मुघलांची निरंकुश सत्ता होती म्हटल्यास वावगे ठरू नये. जे प्रादेशिक राजे वा प्रांतिक शासक शरण येत नाहीत त्यांच्यावर आक्रमण करून त्यांच्या नृशंस हत्या करायच्या, त्यांच्या जमिनी बळकवायच्या, त्यांच्या स्त्रिया पळवून आणायच्या आणि त्यांची राज्ये आपल्या अधिपत्याखाली आणून तेथील कर आपल्या तिजोरीत भरायचा, अशी सर्वसाधारणपणे मुघलांची राज्य करण्याची पद्धती होती. शेकडो ते हजारो स्त्रिया मुघल बादशाहांच्या जनानखान्यात असल्याचे सांगितले जाते. अकबर बादशहाच्या जनानखान्यात तब्बल पाच हजार स्त्रिया होत्या असे उल्लेख आहेत. या काळात मुघलांकडे प्रचंड संपत्ती आणि मालमत्ता होत्या.
(सोन्याने मढवलेला महाल: औरंगजेबाच्या वाढदिवसाच्या प्रसंगाचे युरोपियन कलाकाराने बनवलेले शिल्प)
छ. शिवरायांनी मुघलांच्या निरंकुश सत्तेस प्रथमच अतिशय कडवे असे आव्हान उभे करून त्यांच्या साम्राज्याला सुरुंग लावला. मग मात्र मुघलांच्या साम्राज्याची घरघर सुरु झाली. असे सांगितले जाते कि मृत्युसमयी औरंगजेबास आपल्यानंतर मुघल साम्राज्याचे पुढे काय होणार याची चिंता लागून राहिली होती. आणि ती चिंता अगदीच अनाठायी नव्हती. कारण औरंगजेबानंतर बहादुरशाह जफर पर्यंत या साम्राज्याने पतनकाळच पाहिला. अखेरचा मुघल बादशाह बहादुरशाह जफर याच्या दोन मुलांना त्याच्याच डोळ्यादेखत गोळ्या घालून इंग्रजांनी बहादुरशाहास कैदेत टाकले. आणि तिथेच मुघल साम्राज्याचा अंत झाला.
औरंगजेब(1658-1707)नंतरच्या मुघलांच्या पतनकाळातल्या या काही रोचक कहाण्या...
औरंगजेबच्या मृत्युनंतर सय्यद बंधू यांचे मुघल सत्तेवर अप्रत्यक्ष नियंत्रण होते. हे बंधू मुघल सैन्यात अधिकारी होते व त्यांचे राजकीय वजनही खूप होते. जहांदार शाह पासून ते मुहम्मद शाह पर्यंतच्या मुघल वंशजाना बादशहा करण्यात सय्यद बंधूची महत्वाची भूमिका होती.
१. जहांदार शाह(1712-1713): रखेल स्त्रीच्या आहारी जाऊन तिच्याकडे राज्यसूत्रे सोपवणारा "लंपट मुर्ख" बादशहा
जहांदार शाह हा इतका स्त्री लंपट होता कि एकदा तर कपडे न घालताच दरबारात आला होता असेही उल्लेख आढळतात. लाल कुंवर नावाच्या रखेल स्त्री च्या तो पूर्णपणे आहारी गेला होता. इतका कि तिच्या सांगण्यावरून त्याने तिच्या नातेवाईकांना पदे आणि जहागिरी दिल्या होत्या. म्हणूनच याला इतिहासकारांनी "लंपट मुर्ख" अशी उपाधी दिली आहे. अतिशय क्रूर आणि विकृत कृत्ये सुद्धा ती त्याच्याकडून करवून घेत असे. एकदा यमुनेच्या पात्रात लोकांनी खचाखच भरलेली नाव बादशाहने आणि लाल कुंवरने केवळ मौजेखातर पाण्यात बुडवायचे आदेश दिले होते. वीस पंचवीस लोक जीवाच्या आकांताने धडपडत प्राणांतिक किंकाळ्या फोडत पाण्यात बुडत होते. आणि हे दोघे त्यांना बुडताना मजेत पाहत होते. हा बादशहा नऊ महिने गादीवर होता.
जहांदर आपल्याच भावाची हत्या करून गादीवर आला. यात त्याला सय्यद बंधूनी मदत केली. असे उल्लेख आहेत कि सत्तेत आल्यानंतर सुद्धा याने अनेक विरोधकांची (दरबारी आणि नातेवाईक) क्रूरपणे हत्या केली. इतकेच नव्हे तर सर्वांचे मृतदेह आठ दिवस सडत ठेवले. यापूर्वी कोणत्याही बादशाहने असे घृणास्पद कृत्य केले नव्हते. त्यामुळे जहांदर विषयी अनेकांच्या मनात प्रचंड रोष होता. अखेर त्याच्याच पुतण्या असलेल्या फर्रूखसियर याने त्याच्या विरोधात मोहीम उघडून त्यास कैद केले. आणि अखेर बेदम मारहाण करून व शिरच्छेद करून जहांदरची हत्या केली.
२. फर्रूखसियर (1713-1719): शिखांविरुद्ध क्रौर्याची परिसीमा
जहांदार शाहच्या काळात बंदासिंग बहादूर या शीख योद्ध्याने साठ हजार शिखांच्या फौजेसहित मुघलांच्या विरोधात आक्रमण करून दिल्ली आणि लाहोर यांच्यामधला पंजाब प्रांत काबीज केला होता. शिखांच्या वाढत्या प्रभावामुळे मुघल अस्वस्थ झाले होते. फर्रूखसियरने वीस हजार मुघल सैन्य पाठवून बंदासिंग बहादूर आणि त्याचे साथीदार असलेल्या एका किल्ल्यास वेढा घातला. तब्बल आठ महिने वेढा कायम ठेवल्यावर बंदासिंग बहादूर दोन हजार सैन्यासह शरण आला. त्या सर्वाना मुस्लीम धर्म स्विकारण्याची अट ठेवण्यात आली. पण कुणीही त्यास तयार झाले नाही. फर्रूखसियरने त्या सर्व दोन हजार सैनिकांचा शिरच्छेद करण्याचे आदेश दिले. बंदासिंग बहादूरची अत्यंत क्रूरपणे हाल हाल केले गेले. त्याचे वर्णन इथे लिहू शकत नाही. कारण ज्याप्रकारे त्याचे हाल केले, त्याचे वर्णन वाचल्यावर चार दिवस जेवण जाणार नाही. अमानुष शब्दसुद्धा कमी पडेल इतके ते भयावह आणि बीभत्स आहे. अतोनात हाल करून अखेर बंदासिंग बहादूरची हत्या केली गेली.
एकदा फर्रूखसियर आजारी पडला. तेंव्हा एका ब्रिटीश डॉक्टरने याच्यावर उपचार केले. त्यामुळे खुश होऊन याने इंग्रजांना भारतात कुठेही टैक्स-फ्री व्यापार करण्याचा परवाना दिला.
ज्या सैद बंधूंमुळे तो आपल्या काकाची हत्या करून गादीवर आला त्याच सैद बंधूंनी इतरांच्या मदतीने त्याच्यावर हल्ला केला. तो पळून जाऊन जनानखान्यात स्त्रियांच्यात जाऊन लपला. तिथून ओढून काढून त्यास हाल हाल करून ठार मारले.
३. मुहम्मद शाह (1719-1748): दरबारात पेटीकोट घालून येणारा "रंगीला बादशहा"
मुघल बादशहांची विलासी आणि रंगेल वृत्ती इतिहासाला काही नवीन नाही. पण मुहम्मद शाह याबाबत सर्वाना पुरून उरेल असा होता. कारण त्याने फक्त आणि फक्त नाचगाणी आणि स्त्रियांचा सहवास इतके आणि इतकेच केले. त्याला स्त्रियांची वस्त्रे परिधान करायला आवडत असंत. तो अनेकदा पेटीकोट घालून दरबारात येत असे. त्यामुळे "मुहम्मद रंगीला" असेच त्याचे नामकरण झाले होते. त्याला युद्ध आणि इतर राजकीय गोष्टीत जराही रस नव्हता. सकाळी उठल्यावर कोंबड्यांच्या झुंजी पाहण्यापासून त्याच्या दिवसाची सुरवात व्हायची. मग घोड्यांच्या शर्यती, संगीत, नाचगाणी, इश्कमुहब्बत इत्यादी करत करत रात्री दारू आणि स्त्रिया. असा त्याचा रोजचा दिनक्रम होता.
याच्या काळात सय्यद बंधू मारले गेले. मराठा आणि शिख साम्राज्ये बलाढ्य होऊन मुघल साम्राज्य अत्यंत दुबळे झाले. याच्याच काळात अनेक प्रदेश मुघल साम्राज्याने गमावले. लुटमारीमुळे मुघलांची आर्थिक स्थिती कमालीची खालावली.
नादिर शाहचे आक्रमण आणि दिल्लीची भीषण कत्तल
सर्वाधिक लूट इराणच्या नादिर शाहने दिल्लीवर केलेल्या आक्रमणात झाली. इराणचे राज्य चालवण्यासाठी नादिरला अतिशय तीव्रतेने धनाची निकड भासत होती. म्हणून त्याने लूटमारीच्या उद्देश्यानेच दिल्लीवर स्वारी केली. कर्नालच्या युद्धात केवळ तीन तासात मुहम्मद शाहच्या सैनाचा दारूण पराभव झाला. मुहम्मद शाहला बंदी बनवून नादिर दिल्लीत प्रवेशता झाला. तितक्यात कुणीतरी नादिरच्याच मृत्यूची अफवा पसरवली. झाले! आधीच खवळलेल्या दिल्लीकरांनी नादिरच्या सैनिकांवर हल्ले सुरु केले. तीन हजार सैनिक मारले गेले. हे समजताच नादीरशहाच्या संतापाचा उद्रेक झाला. त्याने सैन्याला दिसेल त्या नागरिकाची हत्या करण्याचा आदेश दिला आणि दिल्लीच्या भीषण कत्तलीला सुरवात झाली. पुढच्या तीन तासात तीस हजार नागरिकांची नृशंस कत्तल करण्यात आली तो दिवस होता २२ मार्च १७३९. या कत्तलीत पुरुष, स्त्रिया, लहान मुले या सर्वांचा समावेश होता. दिल्लीच्या रस्त्यांवर मृतदेहांचा खच पडला होता. कत्तल थांबवण्यासाठी मुहम्मद शाहने अक्षरशः नादिर शहाला दयेची भिक मागितली तेंव्हा कुठे हा संहार थांबला. दिल्लीची अतोनात लुट आणि जीवित व वित्तहानी करून नादीरशहा इराणला परतला. कोहिनूर हिरा, दर्यानूर हिरा, इतर कित्येक किमती हिरे, रत्नजडीत मयुरासन इत्यादी मौल्यवान वस्तूंसहित एकूण सत्तर ते ऐंशी कोटी रुपयांची लूट त्याने केली (आजच्या काळात दशअब्ज डॉलर होतात)
पुढे अजून एका युद्धातदेखील खूप सारे मुघल सैन्य मारले गेले. ती बातमी ऐकताच "मुहम्मद शाह रंगीला" नैराश्यात गेला. त्याने एका इमारतीत स्वत:ला कोंडून घेतले. तो सतत मोठमोठ्याने रडायचा. त्याने अन्नपाणी वर्ज्य केले. आणि त्यातच एके दिवशी त्याचा मृत्यू झाला.
४. शाह आलम द्वितीय(1760-1806 ): बादशहा ज्याच्या दरबारात राजघराण्यातीलच स्त्रियांची क्रूर विटंबना केली गेली
मुघल सम्राज्य संपले तर नव्हते पण दुबळे आणि क्षीण झाले होते, त्या काळात शाह आलम द्वितीय हा बादशहा राज्य करत होता. कदाचित हा सर्वात दुर्दैवी बादशाह म्हणावा लागेल कारण याच्या काळात केवळ मुघल साम्राज्याचाच नव्हे तर मुघल राजघराण्याचासुद्धा सर्वाधिक वाईट काळ होता. मुघलांच्या काळात अफगाणिस्थानातील रोहिल्ला या पठाण समूहाच्या नेत्याची मुघलांनी हत्या केली होती. त्याचा मुलगा गुलाम कादिर हा मुघल साम्राज्य दुबळे होण्याची जणू वाटच पाहत होता. १८ जुलै १७८८ रोजी तो दिल्लीवर चाल करून आला. मुघलांनी पूर्वी केलेल्या अत्याचाराचा बदल घेण्यास टपलेले इतरही काही त्यास सामील झाले होते. वडीलांच्या मृत्यूचा बदल घेणे, राजवाड्यातील संपत्तीची लूट करणे आणि मुघलांची दुबळी सत्ता उलथवून दिल्लीचे सिंहासन बळकावण्याच्या तिहेरी हेतूने गुलाम कादिर याने आक्रमण केले होते. १८ जुलै १७८८ ते २ ऑक्टोबर १७८८ या कालावधीत त्याच्या अत्याचारांनी राजधानी आणि विशेषतः मुघल राजमहाल अक्षरशः थरारून गेला होता. १० ऑगस्ट १७८८ रोजी त्याने वृद्ध असलेल्या शाह आलम (द्वितीय) चे डोळे काढून त्याला आंधळे केले. मग खजिना लुटण्यासाठी राजघराण्यातील एकेका व्यक्तीचे हाल हाल केले. मुघल राण्या, राजपुत्र आणि राजकन्यांना निर्वस्त्र करून दरबारात नृत्य करायला भाग पाडले. त्यातल्या अनेक स्त्रियांनी नंतर यमुनेत उडी मारून आत्महत्या केल्या. या दोन अडीच महिन्याच्या कालावधीत राजघराण्यातील एकवीस व्यक्तींच्या हत्या आणि जवळपास पंचवीस करोड रुपयांच्या संपत्तीची (त्यावेळच्या मुल्यानुसार) लुटालूट झाल्याचा अंदाज आहे. इतिहासकार जदुनाथ सरकार लिहितात, "या पाशवी अत्याचारांमुळे मुघलसाम्राज्याच्या प्रतिष्ठा व इज्जतीचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले"
धन कुणाचे? लुटले कुणी? वाचवले कुणी? आणि मिळाले कुणाला
या सगळ्या गदारोळात शाह आलमचा मुलगा आग्र्याला पळून गेला. तेथून त्याने महाराष्ट्रात असलेल्या महादजी शिंदे यांना संदेश धाडून परिस्थितीची कल्पना दिली व मदत मागितली. महादजी शिंदे यांनी मोठ्या प्रमाणावर फौजफाटा घेऊन दिल्लीकडे कूच केले. मराठा सैन्याने उत्तर प्रदेशात मीरत जवळ घौसगढ येथे गुलाम कादीरच्या मुसक्या आवळल्या. तेंव्हा लॅस्टिनो(Lestineau) नावाचा एक जन्माने फ्रेंच असलेला अधिकारी महाद्जींच्या सैन्यात होता. गुलाम कादिरला पकडल्यावर गुलामने लुटलेल्या मौल्यवान संपत्तीची बॅग लॅस्टिनो च्या हाती लागली. ते घबाड हाती पडताच लॅस्टिनोने सैन्याची जबाबदारी एका कनिष्ठ अधिकाऱ्यावर सोपवली आणि पोबारा केला.
महादजींनी गुलाम कादीर यास कोणतीही इजा न करता बंदिवान करून ठेवले होते. पण शाह आलमने महादजींना, "कादीरचे डोळे काढा, अन्यथा मी मक्केत जाऊन भिक मागेन" अशी गळ घातली.त्यावर महादजींनी कादीरचे डोळे काढण्याचे आदेश दिले. मग डोळे कान नाक ओठ असे अवयव कापून महादजींनी ते शाह आलमकडे पाठवून दिले. जिवंतपणीच त्याचे हात पाय व अन्य अवयवसुद्धा कापण्यात आले. आणि अखेर सारे अवयव कापलेल्या अवस्थेत ३ मार्च १७८९ रोजी गुलाम कादीर याचा मथुरेत बघ्यांच्या गर्दीच्या उपस्थितीत एका झाडाला टांगून शिरच्छेद करण्यात आला. जेणेकरून पुन्हा असे हल्ले करण्यास कोणी धजावणार नाही.
इकडे लॅस्टिनोने ते घबाड घेऊन घेऊन पुढे इंग्लंड गाठले. इतिहासकारांच्या नोंदीनुसार, त्या संपत्तीचा ठावठिकाणा त्यानंतर कधीच कुठे लागला नाही.
५. बहादुरशाह जफर (1837-1857): स्वत:च्याच मुलांना इंग्रजांनी गोळ्या घातलेल्या पहायची वेळ आली
दिनांक १६ सप्टेंबर १८५७. ब्याऐंशी वर्षाचा एक वृद्ध लाल किल्ल्याच्या महालात जमिनीकडे नजर झुकलेल्या स्थितीत उभा होता. तो गलितगात्र झाला होता, थरथरत होता. इंग्रजांनी लाल किल्ल्याला वेढा घातला होता आणि कोणत्याही क्षणी ते आत येऊन आपणास पकडून नेतील आणि फाशी देतील अशी भीती त्या वृद्धास वाटत होती. आणि म्हणून शस्त्रे ठेऊन शरण येण्यास त्याचे मन अजूनही धजावत नव्हते. हा वृद्ध म्हणजे मुघलसाम्राज्याचा अखेरचा बादशहा बहादूर शाह जफर. १९ सप्टेंबर १८५७ रोजी जफर हे कुटुंबीयांसमवेत लाल किल्ल्यातून पलायन करण्यात यशस्वी झाले. आणि २० तारखेला इंग्रजांना कळले कि ते हुमायूनच्या मकबऱ्यात लपले आहेत. त्यांनी तिथे आपला प्रतिनिधी पाठवला. बहादूर शाह जफर यांनी त्याला सांगितले कि जर जीवदान मिळणार असेल तर मी शरण यायला तयार आहे. इंग्रजी सैन्याचे कॅप्टन विलियम हॉडसन याला तसे कळवण्यात आले. खरे तर त्याला इंग्रज सत्तेविरोधात उठाव करणाऱ्या कोणत्याही क्रांतिकारीस माफ न करण्याचे आदेश वरून देण्यात आले होते. पण जफर यांचे वय लोकप्रियता आणि एकूण रागरंग पाहून इंग्रजांनी त्यांना जीवदान देण्याचे ठरवले असावे. शस्त्रे खाली ठेऊन शरणांगती पत्करल्यावर हुमायूनच्या मकबऱ्यातून ८२ वर्षाच्या वृद्ध बादशाहाला १८५७ साली इंग्रजांनी अटक केली, आणि इ.स. १५२६ पासून सुरु असलेली मुघलांची सत्ता अधिकृतरीत्या संपुष्टात आली. त्याच दिवशी जफरच्या दोन मुलांना आणि नातवाला हॉडसनने गोळ्या घालून ठार केले. ते कळताच पदच्युत बादशहा थिजला. त्याच्या तोंडून एकही शब्द बाहेर पडला नाही. अटकेत असताना त्यास अतिशय अपमानास्पद वागणूक दिली गेली. पुढे त्याच्यावर खटला दाखल केला गेला आणि पुढे रंगून येथे त्याची रवानगी करण्यात आली जिथे १८६२ साली वयाच्या ८७ व्या वर्षी त्याचे निधन झाले.
६. मिर्झा जवान बख्त: दिल्लीच्या रस्त्यावर भिक मागणारा मुघल
बहादुरशाह जफर हा अधिकृतरीत्या अखेरचा मुघल बादशहा होता. मिर्झा जवान बख्त हा त्याचा पंधरावा मुलगा. १८५७ च्या उठावाच्या रणधुमाळीमधून त्याच्या आईने त्याला इतर भावंडांपासून बाजूला ठेवले होते. त्यामुळे इतर सर्व कुटुंब बहादुरशाह जफरसोबत रंगूनला गेले तरी मिर्झा जवान बख्तला घेऊन त्याच्या आईने मोठी कसरत करत दिल्लीतच थांबण्यात यश मिळवले. बादशाही गेल्याने उत्पन्नाचे सारे स्त्रोत बंद झाले होते. इंग्रजांनी त्यांच्या कुटुंबियांना पेन्शन सुद्धा दिली नव्हती. अशा परिस्थितीत प्रचंड आर्थिक तंगीचा सामना या कुटुंबास करावा लागला. याच्यावर अक्षरशः भिक मागायची वेळ आली. रात्र पडली कि चेहरा झाकून हा बादशहाचा वंशज बाहेर पडत असे आणि दिल्लीच्या रस्त्यावर उभा राहून भिक मागत असे. त्यातूनही अनेक नागरिक त्याच्या एकंदर देहबोलीकडे पाहून त्याला ओळखत आणि भिक दिल्यानंतर त्याला सलाम करून पुढे जात असत.
या पुढच्या मुघल वंशजांची फारशी दखल इतिहासाने घेतलेली दिसत नाही. पण ज्या काही किरकोळ नोंदी कुठेकुठे आहेत त्यावरून ते फार चांगल्या स्थितीत नसावेत असे दिसून येते. पंचम जॉर्जच्या स्वागतानंतर त्याची जी मिरवणूक काढण्यात आली तेंव्हा तिथे रस्त्याकडेला मुघलांचा वंशज भिक मागताना आढळला होता अशी नोंद एका इतिहासकाराने केली आहे. बहादुरशाह जफरचा अखेरचा थेट वंशज म्हणून मिर्झा बेदर बख्त या नावाचा उल्लेख आढळतो. १९८० साली त्याचा मृत्यू झाला. कलकत्याच्या झोपडपट्टी भागात तो राहत असे व भांड्यांना कल्हई करणे किंवा चाकूला धार काढून देणे वगैरे सटरफटर कामे तो करत असे. आजच्या काळात त्याची मुलगी वृद्ध झाली आहे. ती व तिची नातवंडे हेच कुटुंब मुघलांचे वंशज म्हणून आज ओळखले जातात. कलकत्त्याच्या त्याच वस्तीत हे कुटुंबीय आज राहतात.
संदर्भ:
1. https://en.wikipedia.org/wiki/Jamshed_Bakht
2. https://en.wikipedia.org/wiki/Bahadur_Shah_Zafar
3. https://en.wikipedia.org/wiki/Mirza_Jawan_Bakht_(born_1841)
4. https://en.wikipedia.org/wiki/Battle_of_Karnal
5. https://navbharattimes.indiatimes.com/visual-story/india/farrukhsiyar-hi...
6. https://navbharattimes.indiatimes.com/visual-story/india/why-mughal-empe...
7. https://zeenews.india.com/hindi/web-stories/mughal-black-history-bahadur...
8. https://navbharattimes.indiatimes.com/visual-story/india/mughal-history-...
9. https://navbharattimes.indiatimes.com/india/bahadur-shah-zafar-last-mugh...
10. https://www.opindia.com/2022/05/aurangzeb-mughals-kolkata-howrah-last-su...
11. https://www.jansatta.com/jansatta-special/mughal-emperor-jahandar-shah-w...
12. https://zeenews.india.com/hindi/india/mughal-emperor-jahandar-shah-known...
मौर्य साम्राज्य लयास जाण्याचे
मौर्य साम्राज्य लयास जाण्याचे एक कारण असे वाचण्यात आले की अशोकाने बौध्द धर्माचा प्रसार करण्यासाठी क्षत्रिय धर्माला तिलांजली दिली, सैन्यात मोठ्या प्रमाणात कपात केली
हिंसा आणि युद्ध नकोच असं करत साम्राज्य दुबळे केले
नंतरचे मौर्य राजे याच विचारांचे होते अखेरीस बृहदरथ चा वध त्याच्याच सेनापती श्रुंग ने केला आणि आपली राजवट स्थपन केली
तिथेच मौर्य साम्राज्य लयास गेले
Thanks आशुचँप
Thanks आशुचँप
I had similar theory as put in my previous comments. >>
माझ्या थोड्याफार वाचण्या प्रमाणे मी याचा भार बुद्ध धर्माच्या प्रसारास देते, जास्तच अणि नको तिथे दया, क्षमा आणि अहिंसा याचा वापर.
बृहदरथ चा वध त्याच्याच सेनापती श्रुंग ने केला आणि आपली राजवट स्थपन केली
तिथेच मौर्य साम्राज्य लयास गेले >> Interesting. Will read on it.
सेनापती श्रुंग >> पुष्यमित्र
सेनापती श्रुंग >> पुष्यमित्र शुंग ना? तिथून पुढे शुंग घराण्याची सत्ता आली. अर्थात ती फार काळ चालली नाही.
एक उल्लेखनीय गोष्ट म्हणजे कालिदासाने लिहिलेलं मालविकाग्निमित्रम् हे पुष्यमित्रचा मुलगा अग्निमित्र याच्याबद्दल आहे.
हो शुंग च
हो शुंग च
दीडशे वर्षे होती की पुढे त्यांची सत्ता, त्या मानाने बरीच होती
मग नंतर सातवाहन आले
Pages