सतीचं वाण घेतलेल्या बंदिवान सासुरवाशिणीच्या माहेरची माणसं

Submitted by अस्मिता. on 25 August, 2023 - 16:41

बंदिवान मी ह्या संसारी
आशा काळे, निळू फुले, लता अरुण , मोहन कोटिवान, लीला गांधी, माया जाधव.
दिग्दर्शक -अरुण कर्नाटकी
१९८८

आशा काळे(कमल) लहानपणी प्रिया अरुण असते. प्रिया अरुणची सख्खी आई लता अरुण तिची सावत्र आई झाली आहे. बाबा आधी आजोबा वाटू लागले होते . पण प्रिया मोठी होऊन आशा झाल्याने ते नंतर लेव्हल मेकप झाले. आई लहानपणापासून छळते, बालमित्र अचानक काढता पाय घेतो. सावत्र आईला हिला उजवायचं पडलेलं असतं. गरिबीमुळे निळू फुलेशी लग्न होते, तो आईबाबाला पंधराशे रुपये देऊन हे लग्न जमवतो. निफु एक 'गुरू' नावाचा गरीब, कोपिष्ट व मूर्ख भटजी असतो. त्याच्या कानशिलावरल्या नकली-स्टिकर टकलाची सुद्धा वाळवणासारखी पापडं निघत असतात.

मग गावातला एक पाटील टाईप माणूस तिच्यावर वाईट नजर ठेवतो. याची नजर इतकी वाईट आहे की हा सतत डोळे आल्यासारखा दिसत होता. मग हा तिचं जे काही बघत असतो, ते आपल्यालाही बघावं लागतं, हळूहळू आपणही पाटील होतो. नववारी पातळ किती revealing असू शकते हे मला आता कळले. गरीबाची पण 'लस्ट स्टोरी' ;)..!

या सगळ्यात गावात हातात कादंबरी घेऊन नेहरू शर्ट-पायजामा घालून इकडंतिकडं फिरणारा माधव (खर्शीकर) हिला विहिरीतून ओलेती वगैरे बाहेर काढतो, नंतर भरल्या वांग्याची भाजी खायला येतो. लाल डोळ्याचा पाटील म्हणतो माधव आणि कमलचं लफडं हाय. निळू त्यांच्यावर विश्वास ठेवतो व तिची निर्भर्त्सना करतो. ती सवाष्ण म्हणून पाटलाकडं जेवायला जात नाही, तर तो घरी येऊन छेडतो. मग शेजारच्या काकू दोडकं घेऊन येतात. पाटील पुन्हा निफुचे कानं फुंकतात. नंतर काकू जत्रेत 'जाऊन या ' वगैरे सांगायला येते. तिथेही पाटील निफुला कटवून हिला बैलगाडीत घेतो व इकडंतिकडं हात फिरवायला बघतो. दुसऱ्या गावी बालमित्र/एक्स म्हणतो की याची नजर चांगली नाही. घ्या आता..!
बालमित्र जो कोणी आहे ज्याच्यासोबत गातगात ती पाच मिनिटांत मोठी होते , तो मूर्तिमंत 'दगड' आहे. ह्यांच्या लहानपणीच्या गप्पा बघून पुन्हा पाटील निफुला म्हणतो की हिचं चारित्र्य बरं नाही, कधी माधव - कधी एक्स.

निफु म्हणतो, 'तू पातळी सोडली आहेस. आता मी काही तुला पातळं घेऊन देणार नाही Wink '. मग ती म्हणते की 'मी नागवी बसेन, नको तुमची पातळी आपलं पातळं'. अचानक सत्तावीसावं रडकं गाणं सुरू होतं व संपेपर्यंत पातळ फाटते सुद्धा. माधव गुपचूप येऊन नवीन कोरं गुलबक्षी रंगाचं पातळ ठेवून जातो. 'तुझ्या या लाडक्या भावाने गाणं संपायच्या आत पातळ आणलेलं आहे तायडे', टाईप चिठ्ठी सोडून जातो.

पुन्हा निफुला राग येतो (याला दुसरं येतंच काय). ही पोटुशी होते तर निफु संशय घेतो हे लेकरू 'भरल्या वांग्याचं' आहे म्हणून. मग निफु हिला मारायला जातो, शेजारच्या काकू म्हणतात 'हे लेकरू तुझंच आहे, वांग्याचं नाही. पाटील नालायक आहे, ही तर पवित्र 'कमल' आहे'. एका क्षणात तो शहाणा, समजदार होतो व घराची किल्ली मानाने तिला देऊन कुलूप लावतात. ते गाव सोडून निघून जातात. आनंदी 'टिडिंग टिडिंग' वाजून सिनेमा संपतो.

#दोनतासकुठंहोताकाकू
खऱ्या व्हिलन काकूच आहेत. त्यांनीच प्रेक्षकांचा लाक्षणिक अर्थाने आणि सिनेमाचा शब्दशः अर्थाने अंत बघितला. दोडकं द्यायला आल्या तेव्हा सांगितले असते तर शॉर्ट फिल्म झाली असती.

©अस्मिता

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विगो हा 'शुभमंगल सावधान' सिनेमातल्या चहात बुडवलेल्या बिस्किटासारखा
>>> हा ॲंगल माहित नव्हता किंवा आठवत नव्हता.
यथा काष्ठं च काष्ठं च
एकदम कडक….
तेव्हा आधी आशा काळे तेथे बसली होती व अचानक उठून इम्प्रॉम्प्टू नृत्य केले असावे असे समजून घेतले.
बाकी इतका वेळ पेशंटली बसले याला टोटल रिस्पेक्ट….
>>>> @फा तुम्ही बघाच हा चित्रपट…

नयनताराला समजते हो. ती आणि विगो काहीतरी बोलतातही…

'तुम्हाला बायको हवी आहे की मोलकरीण?" तर हे उत्तर देतात दोघी एकाच वेळी घरात आणण्याइतकी माझी आर्थिक परिस्थिती नाही त्यामुळे एकीलाच दोघींचीही कामे करावी लागतील!"
>>> परवडत नाही म्हणून बायकोने घरची सर्व कामे करणे इतपर्यंत झेपवून घेता येते. पण मोलकरणीने बायकोची कर्तव्य पूर्ण करणे …. Uhoh

गॅदरिंग चा विषय आहे तर खिचडी सिनेमातल्या प्रेमासाठी झुकले खाली धरणी वर आकाश(इथे धरणी आणि आकाश वेगवेगळ्या ठिकाणी झुकून ऑनलाईन योगा करतायत असा विचार अजिबात करू नये)
'तुम्ही मला हसता?बघा आता मी तुम्हाला हसतो.

त्याच्यात तो हिरो काहितरी गाणं गायला स्टेजवर गेलेला असतो आणि लोक हसतात.मग हा एक बराच मोठा मोनोलॉग म्हणतो आणि अर्चना जोगळेकर त्याच्या गाण्यावर ऐनवेळी येऊन नाच करते असं आहे.

था काष्ठं च काष्ठं च समेयातां महोदधौ |
समेत्य च व्यपेयातां तद्वद् भूतसमागम: ||..... ह्या सुभाषितात आपले दोन्ही सिनेमे कव्हर होताएत. Lol
बाळा गाऊ कशी मधले आशा काळे बाईंचे कडक, लवचिकता नसलेले काष्ठवत नृत्य आणि भूत समागम..म्हणजे काय हो चमत्कार मधील चोळी मागणारे भूत!!

अरे, नवा बकरा पकडलाय वाटतं आता Biggrin

मी आशा काळे नाव देऊन सर्च केला होता सिनेमा. (आशा, होऊ कशी उतराई?)
खुर्ची एक न-नाट्य
Rofl
सुटलेत सगळे!

मी अंगाई सिनेमा लहानपणी खेड्यातल्या तंबूत पाहिलेला आहे! माझ्यासाठी तीच या सिनेमाची भारी आठवण आहे! Lol

Rofl

आता 'समग्र आशा काळे' - चोळी पुरवणीसहित, हे पुस्तक प्रकाशित करायला हरकत नाही.
लेखिका :- अस्मिता.
सहलेखकांची यादी जोडा खाली.....

फारएन्ड, आमेन! >>> परफेक्ट Happy

पर्णीका, आंबट गोड, माझे मन - माहितीबद्दल धन्यवाद Happy

बाकी इथल्या रेकोज मुळे थोडासा पाहिला काल. नेफिवरचे एकदोन इतर जनरल पिक्चर्स पाहायचा आधी प्रयत्न करत होतो पण ते इतके मनोरंजक वाटेनात. इतका इफेक्ट आहे या चित्रपटांचा Happy

काय डोक्यात जाणारे सीन्स आहेत ते सुरूवातीचे. सतत ती लग्नाबद्दलची सूचक वक्तव्ये. मधुकर तोरडमल "तुझे आहे तुजपाशी" मोड मधेच आहेत. त्यातला तो "आम्ही दोघेही एकत्रच नापास व्हायचो" संवादही बहुधा त्या नाटकात होता. लक्षात नाही. पण अगदी पहिल्या सीनपासून आशा काळेचे कॅरेक्टर ऑलरेडी लग्न झाल्यानंतर वागतात तसेच वागताना दाखवले आहे. तो विगोही तेथील वातावरण पाहून सुद्धा त्यांना वेळीच आपले ऑलरेडी ठरले आहे हे सांगत नाही. ते एकवेळ तेव्हाच्या पिक्चर्सच्या लॉजिकप्रमाणे ठीक आहे. पण निदान आवर्जून ही कशी चांगली बायको होईल वगैरे सूचक वाक्ये तरी बोलू नकोस?

यांचे तुळशी वृंदावन नक्की कोठे असते? ओपनिंग सीन घरासमोरच्या अंगणात आहे. तेथे ही दिसत नाही. पण तो सीन झाल्यावर येते आणि सांगते तुळशीला पाणी घालत होते. विगोच्या हेअरस्टाइल ई चे भरत यांचे वर्णन चपखल आहे Happy मला का कोणास ठाउक तेव्हाचा विगो व सुनील गावस्कर यात खूप साम्य वाटते. नयनतारा आधी ओळखू आली नाही पण गाण्याच्या एका कडव्यात ती साडी नेसून येते तेव्हा "यंग लीलाताई काळभोर" लगेच ओळखल्या Happy

तो लहान भाऊ वाटतो तो अ‍ॅक्च्युअली मोठा भाऊ आहे. कारण ती त्याला दादा म्हणते. अर्थात त्या कॅरेक्टरचा पराकोटीचा नम्रपणा, शालीनता वगैरे वरून ती लहान भावालाही दादा म्हणत असेल तर आश्चर्य वाटायला नको. तो अ‍ॅक्टर कोण आहे? तो अशाच रोल मधे असतो पिक्चर्समधे.

भावाच्या भूमिकेत राजा बापट असावेत

बाळा गाऊ कशी अंगाई’ या चित्रपटातील त्यांची भूमिका विशेष गाजली. ‘ असं इथे म्हटल़ंय
https://marathi.hindustantimes.com/amp/entertainment/veteran-marathi-act...

भयंकर additive आहे हा धागा ..कित्येकांच्या कल्पनेला धुमारे फुटले आहेत. इथे वाचून बंदीवान बघितला..प्रत्येक चर्चा केलेल्या सीन ला हसून हसून पुरेवाट लागली..
साधी भोळी मिरा परत मायबोलीच्या नजरेने बघितली.. "एक अबोली होती फुलली" 2.28 मिनिटांवर आशाबईंचा फेमस ओठ हनुवटी क्लोज अप आविष्कार

काय हा चमत्कार हे नाव शोधायला किती पानं मागे जाव लागलं....पण त्या चित्रपटाची भाषा किती गोड आहे .. चोळी सिन पासून पुढे बघितला..शेवट फारच गुंडाळला आहे... bdw जयश्री बाई आणि आशा काळे यात आधी फार गल्लत व्हायची..दोघी सारख्यात वाटायच्या...जशा शर्मिला टागोर आणि आशा पारेख

मीही बघायला सुरुवात केली 'बाळा गऊ कशी अंगाई' इतक्या लोकांना कामाला लावल्याबद्दल अस्मिताचा निषेध.
गाणी मात्र त्यावेळी 'आपली आवड' वर बरीच गाजली होती.

'अजिबात बोलू नकात माझ्याशी'
'मग सारा मुक्यानेच कारभार वाटतं?'

आणखी एक शकुंतला गोगटीय ड्वायलॉग.

भावाच्या भूमिकेत राजा बापट असावेत >> हो तेच वाटतात. "जावई विकत घेणे आहे" मधल्या एका गाण्यात बघितल्याचे आठवते.

घरात इतकी सूचक वाक्ये सतत इकडून तिकडे उडत असताना आशा काळेच्या वडिलांना पत्ताच नाही की तिची आई लग्न ठरवू म्हणत आहे ते कोणाचे. तो संवाद ऐकल्याऐकल्या आका लगेच "संसार मांडते" गाणे लाजत लाजत गाऊ लागते. मला प्रश्न पडला म्हणजे वेगळे काय करणार ही - नक्की कधी संसार मांडत नव्हती पिक्चरमधे आत्तापर्यंत.

लग्नानंतर विगो आंघोळ करून बाथरूम मधून बाहेर येतो तेव्हा त्याच्या अचानक लक्षात येते की आता आका आपले कपडे घेउन समोर उभी नाही. मग त्याच्यात आणि नयनतारामधे भांडण होते. तेथे *** शी असलेल्या कपाटातून कपडे काढण्याबद्दल. तो म्हणतो ते बायकोचे काम आहे. ती म्हणते मोलकरणीचे. मला वाटले आता आका घुसून ते कपडे (कपाटातून) काढते की काय कारण ती एरव्हीही विंगेत उभी असल्यासारखी तेथेच पडद्यामागे अनेकदा उभी दाखवली आहे. तसेच आका व नयनतारा मिळून विगो ला "लेका तुझे कपडे कपाटातून तूच काढ" सांगतात असाही काहीतरी सीन असेल असे वाटले होते. पण हा पडला ७०ज मधला पिक्चर. या सीन मधे ती नयनतारा व्हिलनसारखी बळंच दाखवली आहे. एकतर तिला तिची स्पेस वगैरे नाही. विगो कॉलेजला निघाला की एका गॅलरीत ही तर दुसर्‍या गॅलरीत आका त्याला टाटा करायला उभी.

फॉर द रेकॉर्ड याची नोंद घेणे गरजेचे आहे. संसार मांडते या गाण्यात "हळुवार स्पर्श होता वेलीस फूल यावे" अशी एक ओळ आहे. त्यानंतर सीन मधे लगेच एक बाळ दाखवले आहे. हळुवार स्पर्शातील पॉवर.

या लोकांना बायकांनी कपडे घेऊन उभं असलेलं चालायचं का?म्हणजे सिलेक्शन बायकांचं.'मला आज या जीन्स बरोबर तो शर्ट घालायचा नाही, मला तो आवडत नाही,मला ते टमके बूट घालायचेत, ही पॅन्ट का निवडली' वगैरे भानगडी नाहीत Happy सालस पुरुष होते बहुधा त्या काळात.

Lol
मला हल्ली बंदिवान मी या संसारी या धाग्यावर दोनचार तरी नवीन कमेंट्स दिसल्याशिवाय दिवसाचे सार्थक झाल्यासारखे वाटत नाही. धागा असाच बहरता ठेवा, लोकहो!

आका Biggrin
ह्या दोघीही विक्रम कडेच राहत असतात का?
त्या नयनतारा ला व्हिलन दाखवले नसते, तर आपली अशा काळे बिचारी कशी ठरली असती? Happy

असलेल्या कपाटातून कपडे काढण्याबद्दल. तो म्हणतो ते बायकोचे काम आहे. ती म्हणते मोलकरणीचे. >>> बायको चे काम आहे का नाही हा वादाचा मुद्दा असू शकेल. पण मोलकरणीचे ?? कोणती बायको मोलकरणीला आपल्या नवर्याचे कपडे निवडायचं काम देईल आणि आंघोळ करून बाथरूम मधून बाहेर येताना तिथे कपडे घेऊन उभे रहायला सांगेल. डोक्यावर पडले आहेत का सगळे ??? (सगळे म्हणजे तुम्ही सगळे नाही , ते चित्रपट वाले Biggrin )

पण कपडे(कपाटातून) काढून बेडवर ठेवायला काय प्रॉब्लेम आहे?
म्हणजे मोलकरीण पण करू शकेल.तसंही माणसाच्या हातात शर्ट आणि पॅन्ट दिली तर त्याला पहिला कपडा घालताना दुसरा कुठेतरी ठेवायला लागेलच की. तो काय तिरंगा आहे का, फर्निचर पृष्ठभागावर स्पर्श नको, एकतर मानाने हातात किंवा डायरेक्ट (इन केस ऑफ तिरंगा,डायरेक्ट खांबावर) कपडा अंगावर.

"इकडे तिकडे उगाच हँग करणाऱ्या पात्रांना जरा वेळ हँगरचे काम करायला सांगितले (कपडे घेऊन उभे रहाणे) तर काय बिघडतं?" असा टोमणेवजा सल्ला दिग्दर्शकाला 'चित्रीकरण वस्तु' व्यवस्थापकाने वेळेवर "अरे हँगर आणा पटकन एक हँगssर" अशी मागणी झाल्यावर दिला असेल.

कोणती बायको मोलकरणीला आपल्या नवर्याचे कपडे निवडायचं काम देईल आणि आंघोळ करून बाथरूम मधून बाहेर येताना तिथे कपडे घेऊन उभे रहायला सांगेल
>>>
तेच की

सीन मधे ती नयनतारा व्हिलनसारखी बळंच दाखवली आहे.
>> अख्ख्या पिक्चरमधे नयनताराला बळंच व्हिलन दाखवलंय. काय तर म्हणे ती झुळझुळीत साड्या नेसते, फ्लर्टी नाईटगाऊन्स घालते - आकासारख्या टिपीकल साड्या नाही नेसत
मुलाला आकावर सोपवून विगोशी रोमान्स करते. - सख्ख्या लग्नाच्या बायकांना नवर्याशी रोमान्स करायला मुल (तेही तान्हे) दुसर्याकडे सोपवायची गरज पडत नसे हे अखिल भारतीय सत्य दिग्दर्शकाला ठाऊक नव्हते का?

हळुवार स्पर्शातील पॉवर >>> Lol
अवांतर : यावरून मला 'पॉवर ऑफ लव्ह' गाणे आठवले. चांगले आहे.

"इकडे तिकडे उगाच हँग करणाऱ्या पात्रांना जरा वेळ हँगरचे काम करायला सांगितले (कपडे घेऊन उभे रहाणे) तर काय बिघडतं?" >>> Lol

सगळ्या नव्या पोस्टी Rofl

हळुवार स्पर्शातील पॉवर >>> फारएण्ड फोकस्ड आहे एकदम Biggrin

हळुवार स्पर्शातील पॉवर.<<<<< Lol

'जो जीता वोही सिकंदर' या सिनेमातला 'तेरी हलकीफुलकी पप्पी पप्पा के बराबर होती है' हा डायलॉग या ओळीवरून प्रेरित असावा.

पण आशा काळे आणि विक्रम गोखले एकाच घरात का राहत असतात? आणि ती त्याचे कपडे बिपडे तयार ठेवते म्हणजे हे परिणीतासारखं काही आहे का?

पण आशा काळे आणि विक्रम गोखले एकाच घरात का राहत असतात?
>>>>>
मला वाटते त्याप्रमाणे विगो आशा काळेंच्या वडिलांच्या मित्राचा मुलगा असतो व उच्च शिक्षणासाठी त्यांच्याकडे राहत असतो. पण लग्न झाल्यावरही तो तिथेच का राहतो हे आत्ता आठवत नाही.

अनु.. Lol ..
नवरा आंघोळ करून आल्यावर..बायकोने कपडे हातात घेऊन उभे असणे..
या मराठी सिनेमा वाल्यांच्या रोमँटिक कल्पनेचा तुम्ही लोकांनी पार धुव्वा उडवला!
तुझी झेंड्याची अ‍ॅनालॉजी मस्त!! Happy

मला आठवतय एकदा 'बाळा गाऊ कशी अंगाई' हा चित्रपट सुरु होता आणि 'साधी भोळी मीरा तुला कळली नाही' हे गाणे सुरुझाले. तर माझा भाऊ म्हणाला होता की या गाण्यात 'साधी भोळी' या ऐवजी 'जाडी ढोली मीरा तुला कळली नाही' असे शब्द असायला हवे होते.

फायनली ते गाणं पाहिलं.बरंच चांगलं आहे.हावभाव वगैरे पण,साडी अप्सरा आली सारखी आहे(अप्सरा ने इथून प्रेरणा घेतली असावी.)
फक्त स्टेप्स मुद्दाम जास्त कंबर लचकायच्या न देता उड्या मारणे, धावणे अश्या दिल्या आहेत.त्या काळी बहुतेक तमाश्यात नसलेल्या नायिकेने खूप कंबर हलवून नाचणं समाजमान्य नसेल.
विगो एक्सप्रेशन मी कस्टमर मीटिंग मध्ये विशेष न कळणारा विषय आला आणि आपल्याला कळतं आहे असं दाखवायला जी पोझ घेते तसे आहे Happy

Pages