सतीचं वाण घेतलेल्या बंदिवान सासुरवाशिणीच्या माहेरची माणसं

Submitted by अस्मिता. on 25 August, 2023 - 16:41

बंदिवान मी ह्या संसारी
आशा काळे, निळू फुले, लता अरुण , मोहन कोटिवान, लीला गांधी, माया जाधव.
दिग्दर्शक -अरुण कर्नाटकी
१९८८

आशा काळे(कमल) लहानपणी प्रिया अरुण असते. प्रिया अरुणची सख्खी आई लता अरुण तिची सावत्र आई झाली आहे. बाबा आधी आजोबा वाटू लागले होते . पण प्रिया मोठी होऊन आशा झाल्याने ते नंतर लेव्हल मेकप झाले. आई लहानपणापासून छळते, बालमित्र अचानक काढता पाय घेतो. सावत्र आईला हिला उजवायचं पडलेलं असतं. गरिबीमुळे निळू फुलेशी लग्न होते, तो आईबाबाला पंधराशे रुपये देऊन हे लग्न जमवतो. निफु एक 'गुरू' नावाचा गरीब, कोपिष्ट व मूर्ख भटजी असतो. त्याच्या कानशिलावरल्या नकली-स्टिकर टकलाची सुद्धा वाळवणासारखी पापडं निघत असतात.

मग गावातला एक पाटील टाईप माणूस तिच्यावर वाईट नजर ठेवतो. याची नजर इतकी वाईट आहे की हा सतत डोळे आल्यासारखा दिसत होता. मग हा तिचं जे काही बघत असतो, ते आपल्यालाही बघावं लागतं, हळूहळू आपणही पाटील होतो. नववारी पातळ किती revealing असू शकते हे मला आता कळले. गरीबाची पण 'लस्ट स्टोरी' ;)..!

या सगळ्यात गावात हातात कादंबरी घेऊन नेहरू शर्ट-पायजामा घालून इकडंतिकडं फिरणारा माधव (खर्शीकर) हिला विहिरीतून ओलेती वगैरे बाहेर काढतो, नंतर भरल्या वांग्याची भाजी खायला येतो. लाल डोळ्याचा पाटील म्हणतो माधव आणि कमलचं लफडं हाय. निळू त्यांच्यावर विश्वास ठेवतो व तिची निर्भर्त्सना करतो. ती सवाष्ण म्हणून पाटलाकडं जेवायला जात नाही, तर तो घरी येऊन छेडतो. मग शेजारच्या काकू दोडकं घेऊन येतात. पाटील पुन्हा निफुचे कानं फुंकतात. नंतर काकू जत्रेत 'जाऊन या ' वगैरे सांगायला येते. तिथेही पाटील निफुला कटवून हिला बैलगाडीत घेतो व इकडंतिकडं हात फिरवायला बघतो. दुसऱ्या गावी बालमित्र/एक्स म्हणतो की याची नजर चांगली नाही. घ्या आता..!
बालमित्र जो कोणी आहे ज्याच्यासोबत गातगात ती पाच मिनिटांत मोठी होते , तो मूर्तिमंत 'दगड' आहे. ह्यांच्या लहानपणीच्या गप्पा बघून पुन्हा पाटील निफुला म्हणतो की हिचं चारित्र्य बरं नाही, कधी माधव - कधी एक्स.

निफु म्हणतो, 'तू पातळी सोडली आहेस. आता मी काही तुला पातळं घेऊन देणार नाही Wink '. मग ती म्हणते की 'मी नागवी बसेन, नको तुमची पातळी आपलं पातळं'. अचानक सत्तावीसावं रडकं गाणं सुरू होतं व संपेपर्यंत पातळ फाटते सुद्धा. माधव गुपचूप येऊन नवीन कोरं गुलबक्षी रंगाचं पातळ ठेवून जातो. 'तुझ्या या लाडक्या भावाने गाणं संपायच्या आत पातळ आणलेलं आहे तायडे', टाईप चिठ्ठी सोडून जातो.

पुन्हा निफुला राग येतो (याला दुसरं येतंच काय). ही पोटुशी होते तर निफु संशय घेतो हे लेकरू 'भरल्या वांग्याचं' आहे म्हणून. मग निफु हिला मारायला जातो, शेजारच्या काकू म्हणतात 'हे लेकरू तुझंच आहे, वांग्याचं नाही. पाटील नालायक आहे, ही तर पवित्र 'कमल' आहे'. एका क्षणात तो शहाणा, समजदार होतो व घराची किल्ली मानाने तिला देऊन कुलूप लावतात. ते गाव सोडून निघून जातात. आनंदी 'टिडिंग टिडिंग' वाजून सिनेमा संपतो.

#दोनतासकुठंहोताकाकू
खऱ्या व्हिलन काकूच आहेत. त्यांनीच प्रेक्षकांचा लाक्षणिक अर्थाने आणि सिनेमाचा शब्दशः अर्थाने अंत बघितला. दोडकं द्यायला आल्या तेव्हा सांगितले असते तर शॉर्ट फिल्म झाली असती.

©अस्मिता

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अबोल पापणीला >>>>

गाणं बरं आहे. पण शब्द, चाल व नृत्य डिस्कनेक्टेड वाटतात.
मुळात ते स्विस आल्पस् वर समुहनृत्य का करत आहेत? रोमॅंटीक गाणं दोघातच का बरं नाही? केतकी दिया मिर्झासारखं दिसण्याचा प्रयत्न का करते आहे?

मुळात ते स्विस आल्पस् वर >>> छे ! कुठल्याश्या पार्किंगमध्ये शूट केलंय एक कडवं चक्क. इतकं चांगलं लोकेशन असून वाया घालवलंय.

गाणं बरं आहे. पण शब्द, चाल व नृत्य डिस्कनेक्टेड वाटतात.
मुळात ते स्विस आल्पस् वर समुहनृत्य का करत आहेत? >>>>>

गाणे आवडले. केतकी आणि हृषिकेश दोघांनीही जान ओतलीय. पण कोरिओग्राफर हिन्दी ताथैया ताथैया मध्ये अडकलाय बहुतेक. आता असले डान्स कोणी करत नाही हे कोणितरी त्याला सांगा.

हिरोचा बापच प्रोड्युसर असावा असे त्याला बघुन वाटतेय. खुप अबघडलाय.

पार्किन्गमधुन त्याच स्टेप्स करत थेट रेल्वे स्टेशन….

फा, कुठून शोधून काढतोस रे असली रत्न? >>> अरे तो आत्मपॅम्प्लेट चा ट्रेलर शोधला तर यू ट्यूबने एकदम समुद्रमंथनच केले Happy

सध्या युट्यूबवर बेटा ( अनिल कपूर माधुरी) चे तुकडे दिसतात ते बघतोय. त्यामुळं मराठी सिनेमे बघायला वेळ नाही.
सासू सूनेच्या कुरघोड्या, ठणठणाटी पार्श्वसंगीत, एकमेकींकडे बघून कटा़क्ष टाकणे, इशारे देणे इ. पाहून एकता कपूरच्या मालिकांची प्रेरणा कुठून घेतली असेल हे समजलं. हा चित्रपट कसा काय मिस झाला ?

अनेक दिवसांनी हा बाफ आठवण्याचे कारण म्हणजे यू ट्यूबने ब्राउज करता करता मला किशोरचे हे गाणे दाखवले
https://www.youtube.com/watch?v=2Yu17gYzQxY

'बंदिवान मी' मधे आशा काळेचे लग्न होते व त्या विहिरीच्या सीन पर्यंत कथा पोहोचते तेव्हा तिला प्ले बॅक म्हणून हे गाणे शोभले असते. यातली विहीरही त्यातल्या विहिरीइतकीच दिसत आहे. जुन्या वाड्यांमधल्या विहिरी व सरकारी कूपनलिका यांच्या मधला साइज.

Happy

जुन्या वाड्यांमधल्या विहिरी व सरकारी कूपनलिका यांच्या मधला साइज.
>>>> Lol बघितलं, 'फॅन्सी ड्रेस' स्पर्धा आहे बाकीचे गाणे.

आकांचा एक्स नाही तरी चिकनच होता त्याला कूपनलिकेत ढकलून द्यायचे असते. 'चिकन- "कूप"नलिका' म्हणता आले असते. प्रेक्षकांनाही 'चिकन कूप फॉर द सोल' वाटले असते. Proud

विहिरीत पडताना अडकायची भिती, बुडून मरण्यापेक्षा अडकून 'वाचवा,वाचवा' म्हणणं लाजिरवाणंच. वर 'ओलेती' दाखवायला बाहेर आल्यावर पाण्याचा स्प्रे मारावा लागायचा.

किशोर आणि आशा यांनी गायलेलं मेहमूद आणि अरूणा इराणी यांच्यावर चित्रित झालेले हे गाणं 'आजा मेरी जान येऊ है जून का महिना' सरळसरळ विहिरीतच (की आडातच) आहे. पायऱ्या आहेत विहिरीत , त्यावर उभे राहून. पण दोघेही जबरदस्त आहेत, त्यांची केमिस्ट्री आणि सहजता धमाल आहे. प्रचंड अवघड असेल असं चित्रिकरण. एका सीनमधे मेहमूद पोहऱ्यात पाय देऊन लटकत आहे.
https://youtu.be/C6rSRvgL-Ig?si=3dIu-HgGGGzrSKvw

*चिकन - घाबरून पळून जाणारा
**कूप -Coop - खुराडे

दुसर्‍या एका धाग्यावर आला आला वारा या गीताचा उल्लेख झाला आणि आशा काळेचा हा खेळ सावल्यांचा हा चित्रपट आठवला. बाईंची एंट्री चक्क घोड्यावरून आहे.

Pages