‘यू’ का ‘नॉन-यू' ? : एक इंग्लिश भेदभाव

Submitted by कुमार१ on 26 July, 2023 - 07:57

आणि का आनि? पुष्कळ का लई? होतं की व्हतं? किल्ली का चावी? वॉशर का वायसर? वस्तू मिळते का भेटते? ?.........
ही यादी आपल्याकडे कितीही वाढवता येईल. यातला कळीचा मुद्दा वाचकांच्या लक्षात आला असेल - संभाषणात प्रमाणभाषा की बोलीभाषा ?

आपल्या महाराष्ट्रात प्रमाणभाषा हीच जवळपास बोलीभाषा असणारा तथाकथित उच्चवर्ग एका बाजूस आणि प्रमाणभाषेशी काहीसा फटकून वागणारा आणि आपापल्या बोलीभाषेवरच जिवापाड प्रेम असलेला सामान्यवर्ग दुसऱ्या बाजूस, अशी एक भाषिक विभागणी पूर्वापार झालेली आहे; आजही ती कमीअधिक प्रमाणात जाणवते. या विषयावर पूर्वी आपल्यासारख्या व्यासपीठावरून आणि अन्यत्रही भरपूर चर्चा झडलेल्या आहेत.

पण आज आपण, “आपलं ठेवणार आहोत झाकून अन दुसऱ्याचं पाहणार आहोत वाकून”! Happy

चला तर मग, साहेबाच्या देशात सुमारे ७० वर्षे मागे. तेव्हाच्या इंग्लंडमधल्या बोलीभाषेतील फरक आणि त्यानुसार झालेली सामाजिक विभागणी हा या लेखाचा विषय आहे. याला शास्त्रशुद्ध भाषेत U & non-U English असे म्हणतात.
U = Upper class, आणि
non-U = non upper class (मध्यमवर्ग)

या सगळ्या प्रकरणाची सुरुवात सन १९५४मध्ये झाली. अ‍ॅलन रॉस या बर्मिंगहॅम विद्यापीठातील भाषाशास्त्राच्या प्राध्यापकांनी ही संकल्पना त्यांच्या एका निबंधातून मांडली. त्यावेळेस इंग्लंडची सामाजिक विभागणी उच्च, मध्यम आणि श्रमजीवी वर्ग अशी त्रिस्तरीय होती. रॉस यांच्या म्हणण्यानुसार एखाद्या व्यक्तीच्या सामाजिक स्तरानुसारच तो भाषेचा वापर करतो. त्यांच्या निबंधात त्यांनी विविध इंग्लिश लोकांच्या उच्चार व लेखन पद्धती आणि शब्दसंग्रह यासंबंधी काही विवेचन केले होते. परंतु त्यापैकी सामाजिक स्तर आणि दैनंदिन शब्दांचा वापर हा मुद्दाच सर्वात लक्षवेधी ठरला.

रॉस यांच्या निबंधातून प्रेरणा घेऊन उच्चभ्रू इंग्लिश पत्रकार-लेखिका नॅन्सी मिटफर्ड यांनी या विषयावर एक सविस्तर निबंध ‘एन्काऊंटर’ या मासिकात प्रसिद्ध केला. त्यात त्यांनी असे म्हटले की, लोक ज्या सामाजिक स्तरामध्ये असतात, त्यापेक्षा वरच्या स्तरात आहोत असं दाखवण्याचा ते सतत प्रयत्न करत असतात (वेशभूषा, देहबोली इत्यादीमधून). परंतु एखादा माणूस बोलताना जी काही भाषा वापरतो त्यातून त्याचा खरा सामाजिक स्तर कुठेतरी उघड होतोच. या संदर्भात त्यांनी उच्च आणि मध्यमवर्गीयांची तुलना केली आहे. मध्यमवर्गाचे वैशिष्ट्य असे, की ते त्यांच्या विविध शब्दवापरांमधून आपण आधुनिक/शिष्ट असल्याचा आभास निर्माण करतात. सामान्य पारंपरिक शब्दांऐवजी जड व पुस्तकी नवशब्द वापरण्याकडे त्यांचा कल असतो. खरंतर सर्वसामान्यांच्या भाषेतील काही पारंपरिक शब्द अगदी स्पष्ट आणि अर्थवाही असतात. परंतु आपण ते वापरल्यास आपल्याला अगदीच ‘हे’ समजलं जाईल, अशा समजापोटी मध्यमवर्ग त्या शब्दांऐवजी तथाकथित सभ्यतेचा मुखवटा चढवलेले गोंडस शब्द वापरत राहतो. या प्रवृत्तीमागे त्यांच्या मनात असलेली स्वतःच्या सामाजिक स्थानाबद्दलची अस्थिरता/साशंकता असते. या उलट उच्चवर्गाला त्यांच्या भक्कम सामाजिक स्थानाविषयी खात्री असल्यामुळे त्यांच्या बोलण्यात श्रमिक वर्गाच्या बोलीभाषेतील सर्वसामान्य शब्द देखील अगदी बिनधास्त वापरले जातात.

या मुद्द्याच्या समर्थनार्थ त्यांनी सामाजिक स्तरानुसार वापरात असलेल्या काही शब्दांची मोठी यादीच सादर केली. त्या यादीमधील काही महत्त्वाचे व नित्याचे शब्द खालच्या तक्त्यात दाखवले आहेत :

U table.jpg

(वरील तक्त्यातील काही शब्दांवरून आजही आपल्याला भारतातील इंग्लिश वापराबद्दल थोडेफार आत्मपरीक्षण करता येईल).

तसं पाहायला गेलं तर तर रॉस आणि मिटफर्ड यांच्या संबंधित लेखनाकडे हलक्याफुलक्या नजरेने पाहायला हरकत नव्हती. परंतु बऱ्याच लोकांनी हा विषय गांभीर्याने घेतला. काही विद्वानांनी त्या लेखावर यथेच्छ टीका केली. त्यांच्या मते मिटफर्ड बाईंनी केलेली यादी ही मनमानी होती; ती वस्तुनिष्ठ नव्हती. तसेच या विषयाचा शास्त्रशुद्ध अभ्यास केल्याशिवाय कोणतेही निष्कर्ष काढू नयेत असे त्यांनी सुचवले.
पुढे हा विषय भाषा अभ्यासकांच्या वर्तुळापुरता मर्यादित न राहता त्याचे बरेच सामाजिक पडसाद उमटले आणि त्यातून काहीसे भाषिक वादळ निर्माण झाले. प्रसारमाध्यमांनी तर याचा पुरेपूर लाभ उठवून त्यावर आधारित अनेक कार्यक्रम सादर केले. त्यातून या विषयाला नको इतकी अतिरिक्त प्रसिद्धी मिळाली.

या भाषिक भेदभावाचा परिणाम माणसांच्या सार्वजनिक वावर आणि अगदी कौटुंबिक घडामोडींवर देखील झाला. एखाद्या कुटुंबात पाहुण्यांना जेवायला बोलावले असता आमंत्रण देण्यापासून ते मेजवानीच्या विविध टप्प्यांवर कोणते शब्द वापरायचे याचा मानसिक गोंधळ होऊ लागला. लंच, सपर आणि डिनर यांच्या व्याख्या नक्की काय आहेत या बाबतीत तर संभ्रम निर्माण झाला. मेजवानीच्या संदर्भात ज्या शब्दांचा उगम फ्रेंचमधून होता ते शब्द मध्यमवर्गाला प्रिय ठरले. या उलट उच्चवर्गाने मात्र पूर्वीचेच इंग्लिश शब्द वापरण्यास पसंती दिली. एखाद्या अपरिचित व्यक्तीने आपल्याला प्रथम भेटीत,
“ हाऊ डू यु डू ?”

असे विचारले असता, त्याचे उत्तर आपण तोच प्रश्न पुन्हा उच्चारून द्यायचे असते, असा एक मध्यमवर्गीय शिष्टाचार बनला. “हाऊ डू यू डु “ला उत्तर देताना जर एखाद्याने चुकून “फाईन, थँक्स” असे म्हटले तर त्याला लगेचच प्रमाद घडल्याची भावना होई.

how do u.jpg

अशा तऱ्हेने इंग्लंडमध्ये काहीसा भाषिक वादंग चालू असताना त्याच दरम्यान अमेरिकेतही साधारण याच स्वरूपाचे लेखन प्रसिद्ध झाले. एमिली पोस्ट या उच्चवर्गीय लेखिकेने Etiquette या नावाचा एक लेख तिकडे प्रसिद्ध केला. त्या लेखात त्यांनी non-U & U या दोन संज्ञाऐवजी Never say (Ns) व Say Instead (SI) असे पर्याय निवडले होते. त्यांनी सादर केलेल्या यादीतली वेगळी दोनच उदाहरणे देतो :
• request(Ns)/ask (SI),
• converse/ talk

तसं पाहायला गेलं तर इंग्लंडच्या तुलनेत अमेरिकेत भाषा प्रमाणीकरणाचा आग्रह नव्हता. तरीसुद्धा एक गोष्ट आश्चर्यकारक ठरली. इंग्लंडच्या आणि अमेरिकेच्या ‘U’ शब्दांच्या याद्या जवळपास सारख्याच होत्या.
( एका शब्दाचा ठळक अपवाद मात्र उठून दिसणारा होता. अमेरिकेतील उच्च वर्ग ‘टॉयलेट’ म्हणे, तर मध्यमवर्ग मात्र lavatory हा शब्द पसंत करी ! हे ब्रिटिशांच्या बरोबर विरुद्ध होते).

थोडेसे विश्लेषण केल्यावर याचे कारण स्पष्ट होते. अमेरिकेतील उच्चवर्गीय हे मुळात एकेकाळच्या ब्रिटिश उच्चवर्गीयांचेच प्रतिनिधी होते. दोन्ही देशातील या शब्दयाद्या पाहिल्यानंतर एक रोचक मुद्दा दिसून आला. पारंपरिक उच्चवर्गीयांच्या शब्दसंग्रहात सोपे, छोटे आणि जोरकस अँग्लो-सॅक्सन शब्द अधिक वापरात होते. या उलट मध्यमवर्गाच्या वापरातले शब्द हे जास्त करून लॅटिनजन्य होते. दोन्हीकडचा (काठावरील) मध्यमवर्ग आपल्या संभाषणात भावनिक आणि दांभिक अशा आधुनिक शब्दांचा वापर करत होता. याचबरोबर अजून एक मुद्दा वैशिष्ट्यपूर्ण होता. उच्चवर्गाला त्यांच्या संभाषण दरम्यान भाषेच्या व्याकरणाशी फारसे देणे घेणे नसायचे; आपले बोलणे समोरच्याला समजले आहे ना, मग पुरे असा त्यांचा व्यवहारिक दृष्टिकोन होता. याबाबतीत उच्चवर्ग आणि श्रमिक वर्ग अगदी एका पातळीवर होते. परंतु मध्यमवर्ग मात्र व्याकरणाच्या बाबतीत या दोघांपेक्षा अधिक काटेकोर असायचा.
...

वरील भाषिक भेदभावानंतर सुमारे पंचवीस वर्षांचा कालावधी उलटला. दरम्यान इंग्लंड व अमेरिकेतील समाजजीवनात बऱ्यापैकी फरक झाले होते. 1978 मध्ये रिचर्ड बकल यांनी या विषयाचे पुनरावलोकन करणारे U and Non-U Revisited हे नवे पुस्तक संपादित केले. त्यात या विषयाच्या प्रगतीवर प्रकाश टाकला आहे. 1950 च्या दशकात जाणवणारा मध्यमवर्गीयांचा शिष्टपणा आता कमी झालेला होता आणि संभाषणात सामान्यजनांचे शब्द वापरण्याकडे त्यांचा कल होता. एकेकाळच्या यू आणि नॉन-यू शब्दांच्या याद्यांमध्येही बऱ्यापैकी घुसळण झाली होती. एकंदरीत पाहता, समाज आणि भाषा या दोन्ही गोष्टींची संथपणे उत्क्रांती होत असते हे खरे. उत्क्रांतीच्या ओघात काही जुने भेद अगदी त्याज्य ठरवले जातात परंतु काही विशिष्ट शब्द मात्र त्यांची ‘वर्गवारी’ टिकवून ठेवतात.

‘भाजीपाला’ यासाठी वापरल्या जाणाऱ्या दोन इंग्लिश शब्दांचे संक्रमण पहाणे मजेशीर ठरेल. आजच्या घडीला इंग्लंड आणि त्यांच्या राष्ट्रकुलातील भारतासह सर्व देशांमध्ये ‘व्हेजिटेबल्स’ हा शब्द सर्रास वापरतात. मात्र अमेरिकेत ‘ग्रीन्स’ हा शब्द अधिक लोकप्रिय झालेला आहे. वास्तविक ‘ग्रीन्स’ हा तर एकेकाळचा बिगर-यू शब्द होता. परंतु इंग्लिशच्या अमेरिकीकरणानंतर तो आता फॅशनेबल शब्द मानला जातो. कालौघात सोपे व सुटसुटीत शब्द संपूर्ण समाजाकडूनच स्वीकारले जाण्याची शक्यता अधिक असते असे म्हणता येईल.

प्राध्यापक रॉस यांच्या मूळ निबंधात शब्दसंग्रहाखेरीज समाजातील शब्दांच्या उच्चारभेदावर देखील काही टिपणी होती. 1950 ते 1980 या तीन दशकांच्या दरम्यान इंग्लंडमध्ये उच्चारांच्या संदर्भात विशेष फरक पडलेला नाही. अर्थात काही बाबतीत ब्रिटिश व अमेरिकी भेद मात्र जाणवण्याइतके उघड झालेत. काही शब्दांमध्ये सुरुवातीचे अक्षर उच्चारित की अनुच्चारित हे ठरवण्यावरून ते फरक पडलेत. उदा., history मधील h इंग्लंडमध्ये उच्चारला जातो तर अमेरिकेत तो अनुच्चारीत असतो. त्यानुसार लेखनात a historic / an historic असे भेद होतात.

आज एकविसाव्या शतकात ‘यू’/ ‘नॉन-यू' या भेदभावाची काय परिस्थिती आहे, या संदर्भात भाषा अभ्यासकांमध्ये मतभेद आहेत. काहींच्या मते आता असे काही राहिलेले नसून इंग्लिश समाजात एकंदरीतच शब्दमिसळ झालेली दिसते. तर अन्य काहींच्या मते आजही त्या मूळच्या याद्यांमधले काही शब्द त्यांच्या सामाजिक वर्गवारीशी घट्ट नाते टिकवून आहेत.
….

1950 च्या दशकात इंग्लंडमध्ये उगम पावलेला हा विषय. आज अचानक या विषयात मला डुबकी मारावीशी का वाटली, असा प्रश्न वाचकांना पडू शकेल. याला कारण झाले ते म्हणजे अरुण टिकेकर यांचे 'अक्षरनिष्ठांची मांदियाळी' हे पुस्तक. त्याचा परिचय यापूर्वी वाचकांना करून दिलेला आहे (https://www.maayboli.com/node/80912). त्या पुस्तकात टिकेकर यांनी या विषयाचा ओझरता उल्लेख केलाय. त्यातला एक मजेशीर किस्सा सांगून हा लेख संपवतो.

टिकेकर हे इंग्रजी वाङमयशाखेचे गाढे अभ्यासक. त्यांनी जेव्हा या विषयावरील पुस्तके वाचली तेव्हा त्यांना जाणवले, की ब्रिटिशांनी भारतात असताना आपल्याला जे इंग्रजी शिकवलं ते सगळं नॉन-यू होते. एकदा टिकेकर यांना ब्रिटनच्या मुंबईतील उप-उच्चायुक्तांबरोबर जेवणाची संधी मिळाली होती. तेव्हा टिकेकरांनी त्यांना त्यांचे हे निरीक्षण सांगितलं. त्यावर ते उच्चायुक्त हसले आणि म्हणाले,

"इंग्लंडमध्ये मलाही नॉन-यू इंग्रजीच शिकवलं गेलं आहे" !
*********************************************
संदर्भ :
१. https://core.ac.uk/download/pdf/59291665.pdf
२. https://en.wikipedia.org/wiki/U_and_non-U_English

३. https://vhbelvadi.com/u-and-non-u
४. अक्षरनिष्ठांची मांदियाळी : अरुण टिकेकर,
दुसरी आवृत्ती २०११, रोहन प्रकाशन

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभिप्राय व पूरक माहितीबद्दल सर्वांना
धन्यवाद !
..
निदान भाषेची श्रीमंती तशी लवचिक आहे >>> +१
चांगला मुद्दा.
..
२. एकूण यातील शब्द ब्रिटिश इंग्रजीच्या संदर्भाने वाटले. >>>
बरोबर.
ही मूळ संकल्पना ब्रिटिशच आहे आणि इंग्लंडमध्येच त्यावर जास्त काथ्याकूट झालेला होता.

फा.. Lol
यातील ' पॉश लोक ' हा शब्द मात्र खास मराठी आहे हं... !!

दिवसाच्या निरनिराळ्या वेळी घेतलेले खाणे/ जेवण आणि चहा या संदर्भात तर इंग्लंडमधील यू/ नॉन यू आणि इंग्लंड अमेरिकेतले फरक अगदी गोंधळात टाकणारे आहेत :
https://separatedbyacommonlanguage.blogspot.com/2008/02/high-tea.html

‘high tea’ हा खास अमेरिकी शब्दप्रयोग आहे; ब्रिटिश तो वापरत नाहीत. ब्रिटिशांच्या दृष्टीने त्याचा अर्थ “ meat tea" (डिनर) असा आहे !

एकंदरीत या विषयावर तिकडे सुद्धा भरपूर मतभिन्नता आहे.

@कुमार१
रोचक लेख आणि काही प्रतिसादही छान.

2. England ( U)
Britain ( nU)

हे काही पटले नाही.

ब्रिटन / ग्रेट ब्रिटन ह्या बेटावर इंग्लंड, स्कॉटलंड आणि वेल्स हे तीन देश येतात. थोडक्यात ब्रिटनचा इंग्लंड हा एक भाग आहे. (आणि अर्थातच ग्रेट ब्रिटन आणि उत्तर आयर्लंड मिळून युनायटेड किंगडम हे राष्ट्र बनते).

सर्वांना धन्यवाद !
..
@sunlit

**England ( U)
Britain ( nU) >>>
हे मला देखील पटलेले नाही.. म्हणूनच विचित्र वाटते असे म्हटले.
1954 मध्ये रॉस आणि मिटफर्ड यांना काय वाटले ते तेच जाणोत. ते दोघेही U गटातले असल्यामुळे त्यांनी पक्षपात केल्यासारखे वाटते.

म्हणूनच तेव्हा सुद्धा त्यांच्या यादीवर इंग्लंडमध्ये भरपूर टीका झाली होती.

@ ऋ
इथे (http://www.differencebetween.net/miscellaneous/what-is-the-difference-be...)
त्याचे सविस्तर स्पष्टीकरण आहे.
थोडक्यात, इंग्लंडचा नागरिक हा इंग्लिश आणि ब्रिटिश दोन्ही असतो. पण प्रत्येक ब्रिटिश हा इंग्लिश असेलच असे नाही.

@अस्मिता

अमेरिकेत मोठा प्रॉब्लेम म्हणजे त्यांना पर्यायी शब्द माहिती नसतात

पर्यायी शब्द तर सोडाच पण त्यांना साध्या साध्या संकल्पनाही नीट उलगडून सांगाव्या लागतात! उदा -

१) Eyeglasses - आता चष्मा डोळ्यावर नाहीतर कुठे लावणार. नुसते Glasses पुरे. पण नाही, Eyeglasses च म्हणणार!

२) Horseback riding - घोड्याच्या पाठीवर नाहीतर काय शेपटीला धरून धावणार? नुसते Horse riding म्हणणे पुरेसे नाही??

३) Wastepaper basket - चांगले, न वापरलेले कागद कोण डब्यात टाकते?

शेवट थोडा चावट आहे पण हा विडिओ मजेशीर आहे!
https://www.youtube.com/watch?v=UCo0hSFAWOc&ab_channel=MichaelMcIntyre

यात पुन्हा भारतातील इंग्लीश हा एक स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकेल.
Happy
वरील यू के च्या डेफीनेशन नुसार, "आमचा मुलगा यू के ला आहे " असेच सर्वजण म्हणतात ना ? ... तो लंडनला , म्हणजे अ‍ॅक्च्युअली इंग्लंड ला असला तरी....!!
आपण जर इंग्लंड ला आहे असे म्हटले तर इथलेच लोक विस्मयाने... जणू 'विलायतेला' आहे असे म्हटल्या सारखे पाहतील !!

"विलायत"
या शब्दाची गंमत आणि भिन्न अर्थ तर पाहण्यासारखे आहेत !

त्याचा पहिला अर्थ मूळ देश/स्वदेश आहे; परंतु रूढ अर्थ परदेश; परकीय देश; विशेषतः इंग्लंड, यूरोप !

https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%...
जेव्हा ब्रिटिश भारतात राहत होते आणि सुट्टीसाठी आपल्या मूळ देशी ( म्हणजे इंग्लंडला ) जात, त्याला विलायतेला जाणे असे म्हटले जाई !

सोप्पं हाय...
जिमी यू यू म्हणून जिमी कुत्र्याला बोलावलं तर तो येत नाय...
जिम्या भाड्या ये की म्हणावं लागतं.... ज्याला जसं समजतं तसं बोलावं. सुशिक्षित राजकारणी ग्रामीण भाषा का बोलतात याचं हेच गमक असावं.
Happy कृ. ह. घ्या.

आमचा मुलगा यू के ला आहे असेच सर्वजण म्हणतात ना ? ... तो लंडनला , म्हणजे अ‍ॅक्च्युअली इंग्लंड ला असला तरी....! >>>> आणि उरळी कांचनला असला तरी

द सा
तुमच्या प्रतिसादाशी अनुरूप असलेला या लेखाच्या मुख्य संदर्भातला (क्र. १) एक मुद्दा आता लिहितो..

त्यांनी दोन गोष्टी वेगळ्या काढलेल्या आहेत :
१. सामाजिक दृष्ट्या उच्च /कनिष्ठ असणे ही एक बाब.
२. U / nU-वक्ता असणे ही दुसरी बाब.

पुढे ते लेखक असे म्हणतात, की पैसा किंवा राजकारण याच्या बळावर एखादा माणूस एका रात्रीतून निम्नवर्गीयाचा उच्चवर्गीय होऊ शकतो. परंतु याचा अर्थ तो लगेच U-वक्ता होत नाही; त्याच्या बोलण्यात मूळचे नॉन- U शब्द येतच राहतात.

ज्यांना U/nU जमतं त्यांचा दोन्ही समाजस्थरात अगदी सहज वावर असतो. त्यामुळे त्यांचं दोन्हीकडंचं आकलन विस्तारतं. निम्नवर्गीय उच्चवर्गीय झाला तरी मूळ संस्कार लगोलग पुर्णतः नाहीसे होणारच नाहीत. पुढची पिढी पुर्णतः उच्चवर्गीयच असेल.

Sunlit,
व्हिडिओ मस्त व रंजक आहे.

वैद्यकातील काही पूर्वीचे ब्रिटिश शब्दप्रयोग मात्र अमेरिकेने नवे शब्द वापरून सुलभ आणि अर्थवाही केले आहेत. तूर्त एकच उदाहरण देतो.

कुटुंबवैद्याला ‘जनरल प्रॅक्टिशनर’ असे म्हणणे ही ब्रिटिश परंपरा. पण पुढे भारतात काय झाले बघा. ‘जनरल’ शब्दाचे फारच सामान्यीकरण झाले. मग त्याचे लघुरूप gp असे आणि मग त्याचा टिंगलस्वरूप अपभ्रंश देखील झाला ( आणि ते निषेधार्ह आहे).

अमेरिकेने मात्र कुटुंबवैद्यासाठी ‘प्रायमरी केअर फिजिशियन’ (PCP) हा अतिशय सुरेख शब्द प्रचारात आणला.

स्वासु
चर्चेत स्वागत.
Provider शब्द लॅटिनमधून आला असून पाचशे वर्षे जुना आहे. परंतु HCP हे नव -अमेरिकी रूप आहे.

https://www.kevinmd.com/2012/04/implications-provider-doctor.html#:~:tex...'s%20industrialized%20medical%20machine.

डॉक्टरशी तुलना करता HCP याचा अर्थ अधिक व्यापक आहे. . https://en.m.wikipedia.org/wiki/Health_care_provider

ओह डॉ. तुम्ही स्कोपी करावी तसे शब्दांमध्ये खोलवर डोकावता..आणि अर्थ निदान करता!!

((परंतु HCP हे नव -अमेरिकी रूप आहे.))
म्हणजे हे शब्द बोलीभाषेत (अमेरिका व पाश्चात्य देशात) रूढ आहेत की नाही... जसं आपण बरं नसेल तर "डॉक्टर" कडे जाऊन ये असं म्हणतो त्याऐवजी हे लोक HCP/PCP कडे जा असे दैनंदिन संवादात म्हणतात की हे केवळ औपचारिक शब्दप्रयोग आहेत ?

मला वैद्यकीय संस्थलावरून मिळालेली थोडी माहिती लिहीतो .
अमेरिकेत नर्स प्रॅक्टिशनर असा पण एक मान्यताप्राप्त व्यवसाय आहे.

HCP मध्ये अशा नर्सेस, फिजिओथेरपीस्ट, चष्म्याचा नंबर काढून देणारे शास्त्रशुद्ध व्यावसायिक..... असे सर्व समाविष्ट आहेत.
असे व्यापक शब्द अर्थातच चांगले वाटतात.
सामान्य लोक दैनंदिन संवादात यातले नक्की कुठले शब्द वापरतात हे सध्याच्या अमेरिकास्थित मंडळींनी सांगावे.

अ बा,
इथे (https://web.archive.org/web/20150415113336/http://www.helsinki.fi/jarj/u...)
रॉस यांचा 38 पानी मूळ निबंध आहे. परंतु त्यात अशा शब्दांचा संपूर्ण तक्ता नाही. ( एका ठिकाणी छोटासा आहे; त्यात हे नाहीत).
त्यामुळे सांगता येत नाही. त्या संपूर्ण गद्यलेखनातून असे एकेक शब्द शोधणे अवघड आहे.

विकीसह इतर बहुतेक ठिकाणी उदा. म्हणून फक्त 30 शब्दांचा तक्ता दिसतोय

भारी !
डॉक्टर साहेबांचे वैद्यकीय विषयांच्या बरोबरीने भाषेच्या संदर्भातील लेख देखील माहितीपूर्ण आणि छान असतात.
मला तर बाईक, पर्फ्यूम, काऊच, लॅव्हेट्री, पार्डन हे शब्द हूच्भ्रू वाटतात.

शेवटी काय तर युझर फ्रेंडली (U) असेल ते टिकेल आणि कालौघात नॉन युझर फ्रेंडली (non U) असेल ते नष्ट होईल.

सर्वांना धन्यवाद !
युझर फ्रेंडली (U) असेल ते टिकेल >>+१
....
काही वर्षांपूर्वी ब्रिटिश डॉक्टरांशी बऱ्यापैकी संभाषण व्हायचं तेव्हा एक मुद्दा जाणवला.
ते लोक "हाऊ डू यु डू" असे न म्हणता "हाऊ आर यू" असे सोपे रूप वापरतात.

मूळ आफ्रिकी वंशाच्या पण UK चे नागरिकत्व मिळालेल्या एका माणसाशी एकदा संभाषणाचा प्रसंग आला होता. मी "हाऊ डू यु डू" अशी सुरुवात केली. त्यावर त्याने मला आपादमस्तक न्याहाळले आणि मग म्हणाला,
"अं.. हं… do….?"

"हाऊ डू यु" हे एकेकाळी आपल्याला शिकवलेले शालेय इंग्लिश आहे असे दिसते.

@कुमार१
"हाऊ डू यु" हे एकेकाळी आपल्याला शिकवलेले शालेय इंग्लिश आहे असे दिसते.

आपले पाठ्यपुस्तकीय इंग्रजी हे १९४७ सालापासून बदललेले नसावे! सध्या इंग्लंडात कुणी भेटल्यास "You alright?", असे म्हणायची पद्धत आहे.

@sunlit,
आता बऱ्याच वर्षापासून पाठ्यपुस्तकांमध्ये How are you ? I am fine असे शिकवले जातेय. How do you do नाही

Pages