आणि का आनि? पुष्कळ का लई? होतं की व्हतं? किल्ली का चावी? वॉशर का वायसर? वस्तू मिळते का भेटते? ?.........
ही यादी आपल्याकडे कितीही वाढवता येईल. यातला कळीचा मुद्दा वाचकांच्या लक्षात आला असेल - संभाषणात प्रमाणभाषा की बोलीभाषा ?
आपल्या महाराष्ट्रात प्रमाणभाषा हीच जवळपास बोलीभाषा असणारा तथाकथित उच्चवर्ग एका बाजूस आणि प्रमाणभाषेशी काहीसा फटकून वागणारा आणि आपापल्या बोलीभाषेवरच जिवापाड प्रेम असलेला सामान्यवर्ग दुसऱ्या बाजूस, अशी एक भाषिक विभागणी पूर्वापार झालेली आहे; आजही ती कमीअधिक प्रमाणात जाणवते. या विषयावर पूर्वी आपल्यासारख्या व्यासपीठावरून आणि अन्यत्रही भरपूर चर्चा झडलेल्या आहेत.
पण आज आपण, “आपलं ठेवणार आहोत झाकून अन दुसऱ्याचं पाहणार आहोत वाकून”!
चला तर मग, साहेबाच्या देशात सुमारे ७० वर्षे मागे. तेव्हाच्या इंग्लंडमधल्या बोलीभाषेतील फरक आणि त्यानुसार झालेली सामाजिक विभागणी हा या लेखाचा विषय आहे. याला शास्त्रशुद्ध भाषेत U & non-U English असे म्हणतात.
U = Upper class, आणि
non-U = non upper class (मध्यमवर्ग)
या सगळ्या प्रकरणाची सुरुवात सन १९५४मध्ये झाली. अॅलन रॉस या बर्मिंगहॅम विद्यापीठातील भाषाशास्त्राच्या प्राध्यापकांनी ही संकल्पना त्यांच्या एका निबंधातून मांडली. त्यावेळेस इंग्लंडची सामाजिक विभागणी उच्च, मध्यम आणि श्रमजीवी वर्ग अशी त्रिस्तरीय होती. रॉस यांच्या म्हणण्यानुसार एखाद्या व्यक्तीच्या सामाजिक स्तरानुसारच तो भाषेचा वापर करतो. त्यांच्या निबंधात त्यांनी विविध इंग्लिश लोकांच्या उच्चार व लेखन पद्धती आणि शब्दसंग्रह यासंबंधी काही विवेचन केले होते. परंतु त्यापैकी सामाजिक स्तर आणि दैनंदिन शब्दांचा वापर हा मुद्दाच सर्वात लक्षवेधी ठरला.
रॉस यांच्या निबंधातून प्रेरणा घेऊन उच्चभ्रू इंग्लिश पत्रकार-लेखिका नॅन्सी मिटफर्ड यांनी या विषयावर एक सविस्तर निबंध ‘एन्काऊंटर’ या मासिकात प्रसिद्ध केला. त्यात त्यांनी असे म्हटले की, लोक ज्या सामाजिक स्तरामध्ये असतात, त्यापेक्षा वरच्या स्तरात आहोत असं दाखवण्याचा ते सतत प्रयत्न करत असतात (वेशभूषा, देहबोली इत्यादीमधून). परंतु एखादा माणूस बोलताना जी काही भाषा वापरतो त्यातून त्याचा खरा सामाजिक स्तर कुठेतरी उघड होतोच. या संदर्भात त्यांनी उच्च आणि मध्यमवर्गीयांची तुलना केली आहे. मध्यमवर्गाचे वैशिष्ट्य असे, की ते त्यांच्या विविध शब्दवापरांमधून आपण आधुनिक/शिष्ट असल्याचा आभास निर्माण करतात. सामान्य पारंपरिक शब्दांऐवजी जड व पुस्तकी नवशब्द वापरण्याकडे त्यांचा कल असतो. खरंतर सर्वसामान्यांच्या भाषेतील काही पारंपरिक शब्द अगदी स्पष्ट आणि अर्थवाही असतात. परंतु आपण ते वापरल्यास आपल्याला अगदीच ‘हे’ समजलं जाईल, अशा समजापोटी मध्यमवर्ग त्या शब्दांऐवजी तथाकथित सभ्यतेचा मुखवटा चढवलेले गोंडस शब्द वापरत राहतो. या प्रवृत्तीमागे त्यांच्या मनात असलेली स्वतःच्या सामाजिक स्थानाबद्दलची अस्थिरता/साशंकता असते. या उलट उच्चवर्गाला त्यांच्या भक्कम सामाजिक स्थानाविषयी खात्री असल्यामुळे त्यांच्या बोलण्यात श्रमिक वर्गाच्या बोलीभाषेतील सर्वसामान्य शब्द देखील अगदी बिनधास्त वापरले जातात.
या मुद्द्याच्या समर्थनार्थ त्यांनी सामाजिक स्तरानुसार वापरात असलेल्या काही शब्दांची मोठी यादीच सादर केली. त्या यादीमधील काही महत्त्वाचे व नित्याचे शब्द खालच्या तक्त्यात दाखवले आहेत :
(वरील तक्त्यातील काही शब्दांवरून आजही आपल्याला भारतातील इंग्लिश वापराबद्दल थोडेफार आत्मपरीक्षण करता येईल).
तसं पाहायला गेलं तर तर रॉस आणि मिटफर्ड यांच्या संबंधित लेखनाकडे हलक्याफुलक्या नजरेने पाहायला हरकत नव्हती. परंतु बऱ्याच लोकांनी हा विषय गांभीर्याने घेतला. काही विद्वानांनी त्या लेखावर यथेच्छ टीका केली. त्यांच्या मते मिटफर्ड बाईंनी केलेली यादी ही मनमानी होती; ती वस्तुनिष्ठ नव्हती. तसेच या विषयाचा शास्त्रशुद्ध अभ्यास केल्याशिवाय कोणतेही निष्कर्ष काढू नयेत असे त्यांनी सुचवले.
पुढे हा विषय भाषा अभ्यासकांच्या वर्तुळापुरता मर्यादित न राहता त्याचे बरेच सामाजिक पडसाद उमटले आणि त्यातून काहीसे भाषिक वादळ निर्माण झाले. प्रसारमाध्यमांनी तर याचा पुरेपूर लाभ उठवून त्यावर आधारित अनेक कार्यक्रम सादर केले. त्यातून या विषयाला नको इतकी अतिरिक्त प्रसिद्धी मिळाली.
या भाषिक भेदभावाचा परिणाम माणसांच्या सार्वजनिक वावर आणि अगदी कौटुंबिक घडामोडींवर देखील झाला. एखाद्या कुटुंबात पाहुण्यांना जेवायला बोलावले असता आमंत्रण देण्यापासून ते मेजवानीच्या विविध टप्प्यांवर कोणते शब्द वापरायचे याचा मानसिक गोंधळ होऊ लागला. लंच, सपर आणि डिनर यांच्या व्याख्या नक्की काय आहेत या बाबतीत तर संभ्रम निर्माण झाला. मेजवानीच्या संदर्भात ज्या शब्दांचा उगम फ्रेंचमधून होता ते शब्द मध्यमवर्गाला प्रिय ठरले. या उलट उच्चवर्गाने मात्र पूर्वीचेच इंग्लिश शब्द वापरण्यास पसंती दिली. एखाद्या अपरिचित व्यक्तीने आपल्याला प्रथम भेटीत,
“ हाऊ डू यु डू ?”
असे विचारले असता, त्याचे उत्तर आपण तोच प्रश्न पुन्हा उच्चारून द्यायचे असते, असा एक मध्यमवर्गीय शिष्टाचार बनला. “हाऊ डू यू डु “ला उत्तर देताना जर एखाद्याने चुकून “फाईन, थँक्स” असे म्हटले तर त्याला लगेचच प्रमाद घडल्याची भावना होई.
अशा तऱ्हेने इंग्लंडमध्ये काहीसा भाषिक वादंग चालू असताना त्याच दरम्यान अमेरिकेतही साधारण याच स्वरूपाचे लेखन प्रसिद्ध झाले. एमिली पोस्ट या उच्चवर्गीय लेखिकेने Etiquette या नावाचा एक लेख तिकडे प्रसिद्ध केला. त्या लेखात त्यांनी non-U & U या दोन संज्ञाऐवजी Never say (Ns) व Say Instead (SI) असे पर्याय निवडले होते. त्यांनी सादर केलेल्या यादीतली वेगळी दोनच उदाहरणे देतो :
• request(Ns)/ask (SI),
• converse/ talk
तसं पाहायला गेलं तर इंग्लंडच्या तुलनेत अमेरिकेत भाषा प्रमाणीकरणाचा आग्रह नव्हता. तरीसुद्धा एक गोष्ट आश्चर्यकारक ठरली. इंग्लंडच्या आणि अमेरिकेच्या ‘U’ शब्दांच्या याद्या जवळपास सारख्याच होत्या.
( एका शब्दाचा ठळक अपवाद मात्र उठून दिसणारा होता. अमेरिकेतील उच्च वर्ग ‘टॉयलेट’ म्हणे, तर मध्यमवर्ग मात्र lavatory हा शब्द पसंत करी ! हे ब्रिटिशांच्या बरोबर विरुद्ध होते).
थोडेसे विश्लेषण केल्यावर याचे कारण स्पष्ट होते. अमेरिकेतील उच्चवर्गीय हे मुळात एकेकाळच्या ब्रिटिश उच्चवर्गीयांचेच प्रतिनिधी होते. दोन्ही देशातील या शब्दयाद्या पाहिल्यानंतर एक रोचक मुद्दा दिसून आला. पारंपरिक उच्चवर्गीयांच्या शब्दसंग्रहात सोपे, छोटे आणि जोरकस अँग्लो-सॅक्सन शब्द अधिक वापरात होते. या उलट मध्यमवर्गाच्या वापरातले शब्द हे जास्त करून लॅटिनजन्य होते. दोन्हीकडचा (काठावरील) मध्यमवर्ग आपल्या संभाषणात भावनिक आणि दांभिक अशा आधुनिक शब्दांचा वापर करत होता. याचबरोबर अजून एक मुद्दा वैशिष्ट्यपूर्ण होता. उच्चवर्गाला त्यांच्या संभाषण दरम्यान भाषेच्या व्याकरणाशी फारसे देणे घेणे नसायचे; आपले बोलणे समोरच्याला समजले आहे ना, मग पुरे असा त्यांचा व्यवहारिक दृष्टिकोन होता. याबाबतीत उच्चवर्ग आणि श्रमिक वर्ग अगदी एका पातळीवर होते. परंतु मध्यमवर्ग मात्र व्याकरणाच्या बाबतीत या दोघांपेक्षा अधिक काटेकोर असायचा.
...
वरील भाषिक भेदभावानंतर सुमारे पंचवीस वर्षांचा कालावधी उलटला. दरम्यान इंग्लंड व अमेरिकेतील समाजजीवनात बऱ्यापैकी फरक झाले होते. 1978 मध्ये रिचर्ड बकल यांनी या विषयाचे पुनरावलोकन करणारे U and Non-U Revisited हे नवे पुस्तक संपादित केले. त्यात या विषयाच्या प्रगतीवर प्रकाश टाकला आहे. 1950 च्या दशकात जाणवणारा मध्यमवर्गीयांचा शिष्टपणा आता कमी झालेला होता आणि संभाषणात सामान्यजनांचे शब्द वापरण्याकडे त्यांचा कल होता. एकेकाळच्या यू आणि नॉन-यू शब्दांच्या याद्यांमध्येही बऱ्यापैकी घुसळण झाली होती. एकंदरीत पाहता, समाज आणि भाषा या दोन्ही गोष्टींची संथपणे उत्क्रांती होत असते हे खरे. उत्क्रांतीच्या ओघात काही जुने भेद अगदी त्याज्य ठरवले जातात परंतु काही विशिष्ट शब्द मात्र त्यांची ‘वर्गवारी’ टिकवून ठेवतात.
‘भाजीपाला’ यासाठी वापरल्या जाणाऱ्या दोन इंग्लिश शब्दांचे संक्रमण पहाणे मजेशीर ठरेल. आजच्या घडीला इंग्लंड आणि त्यांच्या राष्ट्रकुलातील भारतासह सर्व देशांमध्ये ‘व्हेजिटेबल्स’ हा शब्द सर्रास वापरतात. मात्र अमेरिकेत ‘ग्रीन्स’ हा शब्द अधिक लोकप्रिय झालेला आहे. वास्तविक ‘ग्रीन्स’ हा तर एकेकाळचा बिगर-यू शब्द होता. परंतु इंग्लिशच्या अमेरिकीकरणानंतर तो आता फॅशनेबल शब्द मानला जातो. कालौघात सोपे व सुटसुटीत शब्द संपूर्ण समाजाकडूनच स्वीकारले जाण्याची शक्यता अधिक असते असे म्हणता येईल.
प्राध्यापक रॉस यांच्या मूळ निबंधात शब्दसंग्रहाखेरीज समाजातील शब्दांच्या उच्चारभेदावर देखील काही टिपणी होती. 1950 ते 1980 या तीन दशकांच्या दरम्यान इंग्लंडमध्ये उच्चारांच्या संदर्भात विशेष फरक पडलेला नाही. अर्थात काही बाबतीत ब्रिटिश व अमेरिकी भेद मात्र जाणवण्याइतके उघड झालेत. काही शब्दांमध्ये सुरुवातीचे अक्षर उच्चारित की अनुच्चारित हे ठरवण्यावरून ते फरक पडलेत. उदा., history मधील h इंग्लंडमध्ये उच्चारला जातो तर अमेरिकेत तो अनुच्चारीत असतो. त्यानुसार लेखनात a historic / an historic असे भेद होतात.
आज एकविसाव्या शतकात ‘यू’/ ‘नॉन-यू' या भेदभावाची काय परिस्थिती आहे, या संदर्भात भाषा अभ्यासकांमध्ये मतभेद आहेत. काहींच्या मते आता असे काही राहिलेले नसून इंग्लिश समाजात एकंदरीतच शब्दमिसळ झालेली दिसते. तर अन्य काहींच्या मते आजही त्या मूळच्या याद्यांमधले काही शब्द त्यांच्या सामाजिक वर्गवारीशी घट्ट नाते टिकवून आहेत.
….
1950 च्या दशकात इंग्लंडमध्ये उगम पावलेला हा विषय. आज अचानक या विषयात मला डुबकी मारावीशी का वाटली, असा प्रश्न वाचकांना पडू शकेल. याला कारण झाले ते म्हणजे अरुण टिकेकर यांचे 'अक्षरनिष्ठांची मांदियाळी' हे पुस्तक. त्याचा परिचय यापूर्वी वाचकांना करून दिलेला आहे (https://www.maayboli.com/node/80912). त्या पुस्तकात टिकेकर यांनी या विषयाचा ओझरता उल्लेख केलाय. त्यातला एक मजेशीर किस्सा सांगून हा लेख संपवतो.
टिकेकर हे इंग्रजी वाङमयशाखेचे गाढे अभ्यासक. त्यांनी जेव्हा या विषयावरील पुस्तके वाचली तेव्हा त्यांना जाणवले, की ब्रिटिशांनी भारतात असताना आपल्याला जे इंग्रजी शिकवलं ते सगळं नॉन-यू होते. एकदा टिकेकर यांना ब्रिटनच्या मुंबईतील उप-उच्चायुक्तांबरोबर जेवणाची संधी मिळाली होती. तेव्हा टिकेकरांनी त्यांना त्यांचे हे निरीक्षण सांगितलं. त्यावर ते उच्चायुक्त हसले आणि म्हणाले,
"इंग्लंडमध्ये मलाही नॉन-यू इंग्रजीच शिकवलं गेलं आहे" !
*********************************************
संदर्भ :
१. https://core.ac.uk/download/pdf/59291665.pdf
२. https://en.wikipedia.org/wiki/U_and_non-U_English
३. https://vhbelvadi.com/u-and-non-u
४. अक्षरनिष्ठांची मांदियाळी : अरुण टिकेकर,
दुसरी आवृत्ती २०११, रोहन प्रकाशन
एखादी उच्चभ्रू संस्कृती
एखादी उच्चभ्रू संस्कृती खालच्या वर्गाला प्रयत्नांती आत्मसात करता येते याचं आपल्या सर्वांच्या परिचयाचे उदाहरण म्हणजे "Pygmalion" अर्थात आपले "ती फुलराणी"
छान लेख...
मला यातले सर्व नॉन यु शब्द
मला यातले सर्व नॉन यु शब्द जास्त आवडले
ही माहिती नवी आहे.धन्यवाद. मला आधी नेबर, कलर मधला यु वाटला.
उद्घाटनाबद्दल धन्यवाद !
उद्घाटनाबद्दल धन्यवाद !
"Pygmalion" >>>
वा ! छान उदाहरण.
या पुस्तकाच्या प्रस्तावनेत बर्नार्ड शॉ यांनी असे म्हटलेले आहे,
"It's impossible for an Englishman to open his mouth without making some other Englishman hate or despise him".
>>>>Englishman hate or
>>>>Englishman hate or despise him".>>>
मनुष्य स्वभाव दुसरं काय...
मला यातले सर्व नॉन यु शब्द
मला यातले सर्व नॉन यु शब्द जास्त आवडले Happy
+ 786
मलाही
लेख छान।
मलाही नॉन यू शब्दाच जास्ती
मलाही नॉन यू शब्दच जास्ती आवडले..म्हणजे मला तर असे वाटत होते की काहीतरी चुकते आहे..हेच शब्द तर जास्ती ' स्टँडर्ड ' वाटताहेत...!
उदा : काऊच, पार्डन? ई ई....
हेच शब्द तर जास्ती ' स्टँडर्ड
हेच शब्द तर जास्ती ' स्टँडर्ड ' वाटताहेत...!
उदा : काऊच, पार्डन? ई ई....
>>>>+१
आंबट गोड + 200000.
आंबट गोड + 200000.
U and non U ची definition परत वाचली , म्हणून .
भाजीपाला’ यासाठी वापरल्या
भाजीपाला’ यासाठी वापरल्या जाणाऱ्या दोन इंग्लिश शब्दांचे संक्रमण पहाणे मजेशीर ठरेल. आजच्या घडीला इंग्लंड आणि त्यांच्या राष्ट्रकुलातील भारतासह सर्व देशांमध्ये ‘व्हेजिटेबल्स’ हा शब्द सर्रास वापरतात. मात्र अमेरिकेत ‘ग्रीन्स’ हा शब्द अधिक लोकप्रिय झालेला आहे. वास्तविक ‘ग्रीन्स’ हा तर एकेकाळचा बिगर-यू शब्द होता. >> फळभाज्या / कंदमुळे / पाले भाज्या यांना एकत्रितपणे व्हेजटेबल्स ( व्हेजीटेबल्स हा खास भारतीय उच्चार ! ) म्हणतात अमेरिकेत. पालेभाजी किंवा सॅलडकरता वापरली जाणारी पाने यांना ग्रीन्स म्हणतात.
उदा कांदे बटाटे झुकिनी ब्रॉकोली हे व्हेजटेबल्स तर पालक, अरुगुला , केल हे ग्रीन्स.
छान लेख. ही माहिती आधी माहिती
छान लेख. ही माहिती आधी माहिती नव्हती.
U >> ठाऊक नव्हती
Non U >> माहिती नव्हती
अभिप्राय व पूरक माहितीबद्दल
अभिप्राय व पूरक माहितीबद्दल सर्वांना
धन्यवाद !
चला, इथे नॉन यूचे बहुमत आहे तर
आंबटगोड+१
आंबटगोड+१
अलीकडे उच्चमध्यम वर्गात(
अलीकडे उच्चमध्यम वर्गात( इंग्लिश medium वाल्या ) ग्रीनस म्हणणं प्रतिष्ठेचं आणि अद्ययावतपणाचं लक्षण झालेलं आहे.
प्रतिष्ठेचं आणि अद्ययावतपणाचं
प्रतिष्ठेचं आणि अद्ययावतपणाचं लक्षण झालेलं आहे
>>>
आपल्याकडे हे चालूच राहते. भारतीय लोक इंग्लिशला भारी आणि आपल्या भाषांना डाऊन मार्केट समजतात. (हे उगाच नाकारण्यात अर्थ नाही). आज सर्वांचीच पोरे इंग्लिश मिडीयम मध्ये जात असल्याने ही भाषा येण्यात नावीन्य उरले नाही. मग आता त्यातही आपला दर्जा आणखी वरचा दाखवायला काहीतरी पुढचे करणे गरजेचे आहे ना. त्यामुळे हे विविध शब्द आणि accent वापरणे आता सुरू झालेय.
बरोबर.
बरोबर.
अजून एक मुद्दा :
जसे कालचक्र पुढे सरकते त्यानुसार भाषा, परंपरा आणि संस्कृती पण सरकत राहतात. एकेकाळी जे शब्द U मानले गेले होते ते त्यांच्या अतिवापराने कालांतराने कंटाळवाणे होतात. मग त्यांना पर्याय म्हणून पूर्वीच्या Non-U यादीतले काही शब्द वापरात येतात आणि ते चक्क आकर्षक व फॅशनेबल बनतात.
Vegetables>>> greens
हे त्याचे उत्कृष्ट उदाहरण मानलं जातं.
रोचक लेख!
रोचक लेख!
मलाही non u शब्द आवडले
आणि ते चक्क आकर्षक व फॅशनेबल
आणि ते चक्क आकर्षक व फॅशनेबल बनतात
>>>
कपड्यांच्या फेशनबाबतही हेच होते.
रोचक आहे!
रोचक आहे!
आपल्याकडे 'बिल'ऐवजी कुणी कुणी 'चेक' म्हणतात अमेरिकन्ससारखे. लिफ्टलाही हल्ली खूप जण एलेव्हेटर म्हणतात. टॉयलेटऐवजी रेस्टरूम.
धन्यवाद व सहमती !
धन्यवाद व सहमती !
..
कपड्यांच्या फॅशनबाबतही हेच होते. >>>
माझ्या तारुण्यातली बेलबॉटमची फॅशन परत येईल काय ?
आल्यास त्याला U म्हणायचे की nU ?
बेलबॉटमशी साधर्म्य राखणारी
बेलबॉटमशी साधर्म्य राखणारी पलाझो मुलींमध्ये आलीय. मुलांमध्ये देखील मोडीफाय वर्जन येईलच.
असो, फार विषयांतर नको. अन्यथा कोणीतरी मला बेलबॉटम आणि पलाझोमधील फरक समजावून चर्चा वाढवेल
आता माझी सटकली.
आता माझी सटकली.
आंबटगोड आणि स्वस्ति +१.
आंबटगोड आणि स्वस्ति +१.
वर बहुतेकांनी म्हटल्याप्रमाणे
वर बहुतेकांनी म्हटल्याप्रमाणे आपल्याला नॉन यू शब्दच भावतात हे खरे. प्राध्यापक रॉस यांच्या मूळ यादीतील खालील दोन शब्दांची U/nU तुलना तर विचित्र वाटेल :
1.Friday-monday (U) !!
Week-end ( nU)
(मग आपल्या सर्वांचा विकांत तर उत्तमच की
2. England ( U)
Britain ( nU)
वर बहुतेकांनी म्हटल्याप्रमाणे
दु प्र
हे पाहता..
हे पाहता..
U म्हणजे अप्पर नसून ' Unused ' आणि nU म्हणजे Normally Used ...
अशा व्याख्या करायला हव्या!!!
नाहीतर निदान रकाने तरी स्वॅप करायला हवेत...
***अशा व्याख्या करायला हव्या!
***अशा व्याख्या करायला हव्या!!!
खरंय....
छान लिहिले आहे. लेखनाला
छान लिहिले आहे. लेखनाला असलेली मिश्किल छटा आवडली.
आंबटगोड +१
अमेरिकेत मोठा प्रॉब्लेम म्हणजे त्यांना पर्यायी शब्द माहिती नसतात, 'लिफ्ट' म्हटलं तर बऱ्याच जणांना अजिबात समजत नाही. 'एलेव्हेटरच' म्हणावं लागतं. मी सुरवातीला पाणी मागताना 'without ice द्या' म्हटलं तर आधी कळायचं नाही मग 'म्हणजे 'No Ice का' विचारायचे. शब्द सुद्धा तेच वापरावे लागतात नाही तर गडबड होते.
बहुतेक वेळा कॅनडात बाथरूमला वॉशरूम म्हणायचे, अमेरिकेत रेस्टरूम म्हणतात. पार्डन शब्दात "sorry ,come again" हे सौजन्य अभिप्रेत आहे, what मधे ते नाही. जास्तीत जास्त पॉलिश्ड भाषा म्हणजे उच्चभ्रू असावी. मध्यमवर्गीय आपली भाषा समोरच्या माणसाच्या स्तराप्रमाणे U ची nU किंवा त्याच्या उलट करु शकतात, निदान भाषेची श्रीमंती तशी लवचिक आहे.
अस्मिता, छान प्रतिसाद!
अस्मिता, छान प्रतिसाद!
इंटरेस्टिंग टॉपिक आहे आणि
इंटरेस्टिंग टॉपिक आहे आणि मुख्य पॉईंट पटला. पण उदाहरणे समजली नाही. आंबटगोड यांनी लिहील्याप्रमाणे नॉन-यू वाली बरीचशी कॉमन वाटतात (सायकल, परफ्यूम, मिरर, आइसक्रीम, टॉयलेट, काउच/कोच) - पण सगळीच नाही.
पण मला एकूण यातील शब्द ब्रिटिश इंग्रजी च्या संदर्भाने वाटले. अमेरिकन इंग्रजीत यातील अनेक शब्द मुळातच वापरत नाहीत (लॅव्हेटरी, फॉल्स टीथ ई). हाउस आणि होम हे दोन्ही वेगळ्या अर्थाने/संदर्भाने वापरतात - पण दोन्ही शब्द नेहमीच्या वापरात आहेत व सगळ्याच स्तरातील लोक वापरतात.
मात्र कोच्/काउच वरून आठवले. काही बाबतीत शब्द तोच असला तरी त्याचा "जन्ता" उच्चार व उच्चभ्रू उच्चार वेगळा असतो. कोच चे काउच बहुधा अमेरिकन उच्चारातून आले असेल. पण ओव्हन चे "अव्हन" कधी झाले माहीत नाही. ओनियनचे अनियनही.
याचे एक गमतीशीर उदाहरण - "सांता क्रूझ" चा उच्चार आपल्याकडे इंग्रजीतच काय पण मराठीत सुद्धा पॉश लोक सॅण्टा क्रूज असा करतात. सांता क्रूझ हे डाउनमार्केट वाटते. पण हे नाव मूळचे इंग्रजी नाही. स्पॅनिश असावे. आणि स्पॅनिश मधे त्याचा अस्सल उच्चार सांता क्रूझ असा मराठीसारखाच होतो
फा, सहमत. हे म्हणजे
फा, सहमत. हे म्हणजे
टागोर, रे, डेल्ही > U
ठाकूर, राय, दिल्ली > non U
अश्यापैकी झालं. ह्यात मुळातले उच्चार काय आहेत यापेक्षा कुठले ट्रेंडी आहेत यावर तो U होणार की नाही हे ठरतं.
ता.क.
टॅगोर (गो हे stressed syllable करून), राए, डेsली (ड चा उच्चार द आणि ड च्या मधला करून) >> अल्ट्रा U pro max होईल का?
माझ्या डोळ्यासमोर माया साराभाई येते आहे. 'टॅगोर' कहो मोनिशा. ठाकूर इज जस्ट अॅनॅक्रोनिकली नॉन यू.
Pages