ध्रुवतारा!

Submitted by mi manasi on 5 June, 2023 - 01:12

आवडलं असतं मला..
तुझ्या स्वप्नांच्या दुनियेत जगायला
आवडलं असतं..तुझा चंद्र व्हायला

आवडलं असतं..
जर मीच असते तुझ्या हृदयात
कलेकलेने वाढणारं प्रेमसुद्धा
आणि दुराव्यातला विरहसुद्धा..
आवडलं असतं..
जर दोन्हीचं कारण मीच असते
आणि तसं तू म्हणाला असतास
असंख्य नक्षत्र ताऱ्यांना विसरुन..
मलाच शोधत हरवला असतास
तर आवडलं असतं मला.. हरवायला
आवडलं असतं..तुझा चंद्र व्हायला

दिली असती रोज नव्याने भेट
उतरलेही असते काळजात थेट
घातली असती फुंकर वेदनेवर
शमवलं असतं मनातलं वादळ अनावर
फुलवल्या असत्या रोज स्वप्नांच्या कळ्या
जागवल्या असत्या रात्री सगळ्या वेगळ्या
आवडलं असतं..हे सगळं करायला
आवडलं असतं..तुझा चंद्र व्हायला..

पण तू तर तारा ध्रुवाचा
आदर्श.. अढळ , निश्चल मनाचा
आदर्श.. हट्टी, एकांगी जीवनाचा
तुला तमा नाही स्वप्नांची चंद्राची
चंद्राच्या असण्या नसण्याची
कशा कशाचीही..

म्हणूनच आता..
जगणं तुझं बाकी
तुझ्याच अवकाशात
अढळ, निश्चल, एकाकी!!

मी मानसी

Group content visibility: 
Public - accessible to all site users