तडा

Submitted by SharmilaR on 15 May, 2023 - 02:05

तडा

“.... आणी डेली मॉर्निंग रॉ मटेरियल चं स्टेटस पण स्क्रीन वर दिसू शकेल मला?” कपूर सरांनी अर्चनाला विचारलं.

साठीच्या जवळ आलेले कपूर साहेब पंजाबी असले तरी जन्मापासून महाराष्ट्रातच राहिल्यामुळे, ते चांगलं मराठी बोलू शकत होते. शिवाय इथल्या कामगारांशी सततचा संबंध येत असल्यामुळे सगळ्यांशीच जास्तीत जास्त मराठी बोलण्यावरच त्यांचा भर होता.

“हो.. का नाही? नाही तरी डेलि प्रॉडक्शन चार्ट मी मेंटेन करायला लागलेच आहे. इनफॅक्ट त्या वरून सुद्धा डेली कनझमशन घेता येईल.. त्यावर वर्किंग करून ठेवते मी. सोपं होईल मग..” अर्चना म्हणाली.

खरं तर कपूर सरांचा आज इथे येण्याचा दिवस नव्हता. आठवड्यातले तीन दिवस ते इथे यायचे आणी बाकी दिवस दिवस येथून तीस किलोमीटर वर असलेल्या त्यांच्या माळगावच्या यूनिटला असायचे. पण आज काही चेक वर सह्या आता, सकाळीच करायला हव्या होत्या, म्हणून ते आले होते. आणी मग लगेच जाण्याआधी जरा कॉफी घेता घेता त्यांच्या केबिन मध्ये ते अर्चनाशी बोलत होते.

उद्यापासून आठवडाभर कंपनीला दिवाळीच्या सुट्ट्या लागणार होत्या. कालपर्यंतचं सगळं रेडी मटेरियल डिसपॅच करून झालं होतं. त्यामुळे त्या आघाडीवर आज जरा शांतता होती. दुपारी बोनस मिळणार असल्यामुळे सगळीकडे आनंदाच अन् उत्साहाच वातावरण होतं.
अर्चना पुढे काही बोलणार इतक्यात टेबलवरच्या फोनची रिंग वाजली.

“हॅलो..” कपूर सरांनी फोन घेतला.
“हॅलो..?” थोडावेळ ते तसेच कानाला फोन लावून बसले.
“ब्लॅंक कॉल..” हातातला रीसीवर परत ठेवत ते म्हणाले. अर्चनाचा चेहरा गोरामोरा झाला. ती घाईघाईने पुढे बोलायला लागली,
“आणी काय आहे नं सर, आपण आपलं काम इतकं सोपं करू शकतो.., आता हेच बघा नं, दर महिन्याला सॅलरी करता लागणारा वेळ किती वाचतोय..”

खरं तर तो वेळ तेवढा वाचत नव्हता, हे तिला महित होतं. कारण अजून इथल्या लोकांचा, स्पेशली मॅनेजर साहेबांचा, अजून कॉम्प्युटर वर विश्वास बसलेला नव्हता. त्यामुळे अर्चनाने काढून दिलेलं पे-शिट ते परत अकाऊंटस च्या जोशींना मॅनुअली चेक करायला लावायचे. आणी स्वत: पण मग त्यात डोकं घालायचे. आणी मॅनेजर विश्वास ठेवत नाही म्हंटल्यावर बाकीची लोकंही त्यांची सगळी कामं पूर्वीच्या जुन्या पद्धतीनेच करत होती.
कंपनी तशी अगदीच लहान होती. स्मॉल स्केल यूनिट. आणी आत्ता आत्ता पर्यंत तर अगदी सगळ्याच गोष्टी मॅनुअली करण्यावरच भर होता. पण हल्ली सगळीकडे वापरतात म्हणून कपूर साहेबांनी इथेही एक कॉम्प्युटर आणला. पण त्यांनाही त्यातली काहीच माहिती नव्हती.
जेमतेम सहा सात महिन्यांपूर्वी हा कॉम्प्युटर आला, आणी मग तो चालवायला म्हणून अर्चना नोकरीवर रुजू झाली.

“हो.. ते खरं आहे. इथल्या लोकांना पण जरा..” सरांच वाक्य अर्धवटच राहिलं. परत फोन वाजला.
“हॅलो..?” आता परत थोडावेळ ते तसेच फोन कानाला लावून बसले.
“फोन ला काही प्रॉब्लेम आहे का कळत नाही.. आवाजच येत नाही.. कंप्लेंट करायला हवी.. पण दिवाळीच्या दिवसात कुणी अटेंड करणं पॉसिबल नाही.... नेहमी होतं का असं..?” सरांनी ड्रॅावर मध्ये काही तरी शोधता शोधता विचारलं.
“नाही म्हणजे.. कधी तरी..” अर्चना चाचरत बोलली. सरांच तिच्याकडे लक्षच नव्हतं. ती गप्प बसली.
तो फोन कुणाचा असेल, ह्याचा नक्की अंदाज तिला होता.
“ओके.. यू थिंक ओवर इट.. आपल्याला काय काय कॉमप्यूटराईझ करता येईल त्यावर.....” कपूर उठता उठता म्हणाले. फोनचा विषय त्यांच्या डोक्यातून गेला होता.
“विल डू.. हॅव अ गुड डे सर..” अर्चनाही उठत म्हणाली.
“मी येतोच आहे तसा आज दुपारी. सगळ्यांना गिफ्टस द्यायच्या आहेत दिवाळीच्या.. ही पोरं सगळी वाट बघत असतात ह्या दिवसाची.. आधी माळगावचं काम आटपून घेतो.. ” कपूरसाहेब बाहेर जायला निघाले. त्यांच्या केबिन मधे एका बाजूला गिफ्ट्स आणी मिठाईची खोकी रचून ठेवली होती.

अर्चना तिच्या जागेवर येऊंन बसली. आजच्या चर्चे वर तिला वर्किंग करून ठेवायचं होतं. म्हणजे मग सुटीहून आल्यावर प्रोग्राम बनवायला घेता येईल.
तिचं टेबल म्हणजे सरांच्या केबिन बाहेरच पूर्वी थोडी मोकळी जागा होती, तिथे एक टेबल खुर्ची टाकून अन् दोन कपाट आडवी लावून तयार केलेली केबिन होती. मागच्या खिडकीला जरा छान पडदे बीडदे लावल्यामुळे त्या जागेला छान केबिनचं स्वरूप आलं होतं.

पलीकडे मुख्य दारातून येण्याचा पॅसेज आणी त्याही पलीकडे थोड्या मोठ्या हॉल मध्ये चार पाच टेबल टाकून मॅनेजर सकट बाकीची मंडळी बसत होती. अर्चनाच्या ह्या जागेलाच फक्त थोडी प्रायवसी होती इथे. ती प्रायवसी इथली एकमेव बाई म्हणून, तिला होती.. की सगळ्यांना थोडी दहशत वाटणाऱ्या त्या कॉम्प्युटरला दूर ठेवायचं म्हणून, कॉम्प्युटरला होती कुणास ठाऊक! पण इतर लोकं तिच्या जागेपासून जरा अंतर राखूनच राहात होती.
तसही ऑफिस मध्ये होतेच किती लोकं इथे? म्हणायला मॅनेजर, पण ऑल ईन वन असणारे, अन् वेळ पडली तर असेंब्ली लाइन पण सांभाळू शकणारे कुमार, अन् मग बाकी प्रॉडक्शन, अकाऊंटस, परचेस, मार्केटिंग सांभाळायला प्रत्येकी एक एक जण. बाई म्हणून तर ती एकटीच.
असलेल्या लोकांमध्ये पण नेहमीच आपल्या जागेवर असणारे तर फक्त रिटायरमेन्ट च्या जवळ आलेले अकाऊंटस चे जोशीच होते. बाकी सगळे दिवसभर एकतर तिकडे आत फॅक्टरीत, नाहीतर, मग कामानिमित्त कंपनी च्या बाहेर, जात येत असायचे. अन् ह्या सगळ्यांना चहा पाणी देणारा, अन् वरकाम बघणारा एक भरत इथे तिथे फिरत असायचा. बाकी इतर कामगार वर्गाचा ह्या भागाशी काही संबंधच येत नव्हता.

निव्वळ कपूर साहेबांचा आग्रह म्हणून इथे नवीन कॉम्प्युटर आला होता. बाकी सगळ्यांच्या दृष्टीने कॉम्प्युटर शिवाय कुणाचं काही अडत तर नव्हतंच.. किंबहुना त्याची काही गरजच कुणाला वाटत नव्हती. त्यामुळे अर्चनाकडे कुणी स्वत:हुन काही काम घेऊन येतच नव्हतं. तीच आपली इथून तिथून थोडं समजावून घेऊन काम करत होती.

अर्चना खरं तर मुळची कॉम्प्युटर प्रोग्रॅमर. पण लग्नानंतर चार महिन्यातच आजेसासूबाईंच्या आजारपणात जुनी नोकरी सोडायला लागली. मग तिचं बाळंतपण आलं.. मग आशू लहान.. त्याला सांभाळायला सासूसासरे तयार नाहीत.. घर कोण सांभाळेल..? आता सासूबाईंना झेपत नाही.. अशी एक ना दहा कारणं पुढे येत गेली. ‘शिवाय हिला काय गरज? आमचा मुलगा कमावतोय नं चांगला..?’ हे तिला नोकरी नं करू देण्याचं मुख्य कारण होतंच.
विशाल येथे असेपर्यंत तर अर्चनाला फार काही वाटलं नाही. पण त्याला वर्षभराच्या प्रोजेक्ट करता उत्तर प्रदेशात जायला लागलं. तिथे गाव छोटं होतं.. शिवाय आशू लहान.. त्याला घेऊन नको जायला.. म्हणून अर्चना इथेच राहिली.

पण हळूहळू तिला एकटेपणाचा कंटाळा यायला लागला होता. शिवाय एवढं शिकून सवरून घरात बसायला लागतय ह्याचं फ्रसट्रेशन तर आधीपासूनच येत होतं. घरात असतांना घरातली कामं तर कधी संपतच नव्हती. आशूची नर्सरी चालू झाली.. घरातल्यांच्या मागण्या अन् अपेक्षा तर कधीच नं संपणाऱ्या होत्या... अर्चना अगदी वैतागून गेली होती. मग तिने आशू करता एक चांगलं डे केअर शोधलं अन् सासूबाईंच्या मनाविरूद्ध नोकरी शोधायला सुरवात केली.

एवढी गॅप गेल्यानंतर लगेच नोकरी मिळणं सोपं नव्हतं. कॉम्प्युटर क्षेत्रात तर रोजच काहीतरी बदल होत असतात. शिवाय नाही म्हंटलं तरी अर्चनाचा कॉनफीडंस थोडा कमी झाला होता. पण एका प्रायवेट एक्स्चेंज मधून ही नोकरी मिळाली अन् मग तिने पकडलीच ती लगेच, इथे काय पडेल ते काम करायची तयारी ठेऊनच. आधी तिचं घराबाहेर पडणं महत्वाचं होतं.

इथे एक बरं होतं. कुणाला काहीच माहिती नव्हती ह्या कॉम्प्युटर क्षेत्राची. अन् माहिती करून घेण्याची कुणाची फारशी इच्छाही नव्हती. पण त्यामुळे तिला श्वास घ्यायला अन् हात साफ करायला भरपूर उसंत मिळत होती. तिचं आपलं काय काय नवीन करता येईल, ह्याचा विचार करून उकरून कामं काढत होती अन् करत होती. काही दिवस इथे काम करून जरा कॉनफीडंस आला की चांगल्या ठिकाणी नोकरी शोधायचा विचार होताच तिचा.
फोन च्या घंटी ने अर्चना भानावर आली.

“गुडमॉर्निंग! परफेक्ट प्रीसीजन..” अर्चनाने फोन घेतला.

हे असं कपूर साहेबांचे फोन अटेंन्ड करण्याचं काम अर्चनाने स्वत:हुन ओढवून घेतलं होतं. कपूर साहेब त्यांच्या केबिन मध्ये असले तर, त्यांचे फोन तेच घेत. पण ते नसतांना त्यांच्या केबिन मध्ये कुणी जायला यायला नको म्हणून एक एक्स्टेंशन बाहेर होतं. पूर्वी ही एक्स्टेंशन लाइन पलीकडच्या मोकळ्या टेबलवर होती. पण कधी तिथे इतर कुणी नसलं तर जोशींना स्वत:चे गूढगे सांभाळत उठायला किंवा भरतला लांबून धावत यायला सारखाच वेळ लागायचा. मग अर्चनाने तो फोनच इथे बसवून घेतला. तेवढंच जरा तोंड उघडायला संधी मिळत होती. बाकी लोकां करता आणखी एक फोन मॅनेजर च्या टेबल वर होताच.

“फायनली!!! आखीर फोन पे मिलही गयी तुम!” त्या मधाळ रेशमी आवाजाला त्याचं स्वत:चं नाव सांगण्याची गरजच नव्हती.
“ओ.. हॅलो शर्माजी.. कैसे हो आप..?” अर्चनाने मोहरून विचारलं.
“क्या यार.. सुबह से तुमसे बाते करने की कोशिश कर रहा था.. हर बार किसी दुसरे ने उठाया.. थी कहा तुम?
“जी.. आज सर आये थे सुबह.. सो.. उन्होने..”
“अरे.. कपूर आज यहा है? मै सोचही रहा था.. आज ये यहा कैसे..? चलो अच्छा है.. उससे मेरा चेक भी लेना था....”
“जी अभी तो सर नही है यहा पे.. बट ही विल बी हिअर ईन द आफ्टरनून..” अर्चनाच्या अंगावर रोमांच आले.

शर्मा हा कंपनीचा एक सप्लायर. फोनवरच्या त्याच्या बोलण्यावरूनच कळत गेलेला. आज पर्यंत कधी तिने शर्माला प्रत्यक्ष बघितलं नव्हतं. तसा कंपनीच्या बाहेरच्या लोकांशी तिचा प्रत्यक्ष संबंध असा कधी येतच नव्हता.
कपूर इथे असले की त्यांना भेटायला येणारे लोकं सरळ त्यांच्या केबिन मध्येच जात. नाही तर मग त्यांच जे काय काम असेल, ते तिकडे पलीकडे मॅनेजरकडे असायचं. तिच्याकडे कुणी येण्याची काही गरजच नव्हती. कपूरसाहेब इथे नसतील तेव्हा त्यांना येणारे फोन घेऊन ती फक्त त्यांचे मेसेजेस घेऊन ठेवायची. काही माहिती देता येण्यासारखी असेल तर द्यायची.

असे फोन घेता घेताच तिची शर्माशी फोन वरच ओळख झाली होती. पहिल्यांदा जुजबी बोलणं.. मग ते बोलणं थोडं थोडं वाढत गेलं.. आणी आता तर त्याचे फोन खास तिच्याकरताच यायला लागले होते, कपूर इथे नसण्याच्या वेळा बघून.

अतिशय मधाळ आवाज होता त्याचा. आणी इतका हळुवार पणे तो अर्चनाशी चौकशी करायचा.. त्याचं असं गोड बोलणं.. प्रेमाने तिची विचारपूस करणं.. तिला आवडायला लागलं होतं. नाही तर प्रेमाने तर नाहीच, पण साधं बोलायला.. थोडं मोकळं व्हायलाही तिला हल्ली जागाच उरली नव्हती.
इथे ऑफिस मध्ये तिच्याशी बरोबरीने संवाद साधायला कुणी नव्हतं अन् घरी गेल्यावर घरातली काम.. आशूला सांभाळणं ह्यातच सगळा वेळ जायचा तिचा. सासूसासऱ्यांच्या मनाविरुद्ध नोकरी म्हणून, त्यांनी तिच्याशी पूर्ण असहकार पुकारलेला.. तिच्याशी त्यांच बोलणं म्हणजे काहीतरी टोमणे मारणं एवढंच उरलं होतं. विशालचा फोन त्याला वेळ मिळेल तेव्हा.. तोही घरीच.. त्यामुळे त्याच्याशी बोलणही तसं जुजबीच. तसही त्याला घरचं हे सगळं सांगून काही उपयोग होणार नव्हताच म्हणा. ‘तू नोकरी सोड..’ हा एकच उपाय त्याच्याकडे असणार होता.

शर्माशी बोलताना.. त्याचं बोलणं ऐकतांना अर्चनाला खूप छान वाटायचं.. आधार वाटायचा. त्याचं ते मखमली बोलणं ऐकतांना परत विशीत गेल्यासारखं वाटायचं तिला...
अर्चनाला कळत होतं.. तिला असं वाटणं चुकीचं आहे. तिचं लग्न झालेलं आहे.. एका मुलाची आई आहे ती.. पण.. पण.. तिला वाटलं होतं तसा नोकरीने तिचा एकटेपणा संपवला नव्हता. फक्त घरातल्या रोजच्या कटकटीतून काही वेळ बाहेर पडायला मुभा मिळाली होती तिला.

घरातली रोजची कटकट.. धुसफूस तर वाढतच होती. पूर्वी ती घरी असायची तेव्हा तरी कुठे सगळं चांगलं होतं..? ‘घरीच तर असते.. कुठे बाहेर जाऊन पैसे कमवायला लागतात ह्यांना.. आम्ही सगळं तर उभं करून दिलंय.. तो पोरगा बिचारा एवढं कष्ट करून कमावतोय.. ह्यांना काय.. ’ असं सतत ऐकवून तिला चार उसंतीचे क्षण मिळू द्यायचे नाही.

अन् आता ती पैसे मिळवतेय तर, ‘केवढे त्या लहान पोरचे हाल.. काही अडलय का..? रोज मारे ठमकत जायचं.. घरदार तर नकोच ह्यांना.. म्हातारे लोकं राहतात एकटे घरात..’ असं ऐकवतच तिच्या दिवसाची सुरवात व्हायची.
तरी बरं.., रोज पहाटे घरातलं सर्व आवरून.. आशूला शाळेत सोडून ती इथे यायची. बरं आशूची काही जबाबदारी पण ती कुणावर टाकत नव्हती.. पण धड पायी चालू द्यायचं नाही.. अन् घोड्यावरही बसू द्यायचं नाही अशी तिची अवस्था झाली होती. कसं वागावं घरात, हेच तिला कळेनासं झालं होतं.. रोजचीच धुसफूस.. अन् मग रोजच रात्री तिचं डोळ्यातून पाणी गाळणं...

“सो.. कैसी हो तुम? कल से तो छूट्टी है ना? फिर कुछ दिन बात नही होगी हमारी| मै तो अभी से मिस कर रहा हू तुम्हे| ..” शर्मा बोलत होता.
“जी..” अर्चनाला काय बोलावं ते सुचलच नाही. तिची धडधड वाढली होती..
“क्या प्रोग्राम है दिवाली का? घर से बाहर कही.. ” शर्मा विचारत होता.
“विशाल आनेवाला है.. एक हफ्ते के लीये.. तो फिर घर मे दिवाली.. थोडा इधर उधर घुमना..” अर्चना घाईघाईने म्हणाली.
“ओ.. तो, दिवाली मे तुम दिये की तरह चमकोगी.. और मै तुम्हे देख नही पाऊंगा..” त्याच्या आवाजात नक्की काय होतं?
‘सावर.. स्वत:ला सावर.. हे बोलणं जरा पुढे चाललय..’ तिचं एक मन तिला इशारा देत होतं.
“सुनिये.. प्लीज.. शर्माजी.. ऐसी बाते ना किया करो..| डर लगता है| हम दोनो को भी अपना घर.. परिवार है..” अर्चना म्हणाली पण तिचा आवाज तिलाच नीट ऐकू येत नव्हता.
“अरे.. अरे.. लगता है तुम तो एकदम सीरियस हो गई.. चलो, कुछ दुसरी बाते करते है.. अपना हाल सुनाओ.. तुम्हे पता है.. ” शर्मा काहीतरी बोलत होता. अर्चना फक्त हं .. हं.. करत त्याचा गुंगवून टाकणारा आवाज ऐकत होती.
खिडकीतून बाहेरचे आवाज यायला लागले. लंच टाइम झाला असावा. काही कामगार बाहेर झाडाखाली बसून डबे खायचे.
“जी.. जी.. सुनिये.. अभी रखती हू मै फोन | लंच टाइम हो गया.. सर आते ही होंगे..”
“ओके.. बाय.. सी यू..” शर्माने फोन ठेवला.

आज लंच नंतर पलिकडल्या कुणाचाच कामाचा मूड नव्हता. सगळ्यांना दिवाळी चढायला लागली होती. अर्चनाही थोडा वेळ मग त्यांच्यात सामील झाली.

बाहेर गाडीचा आवाज आला तसे सगळेच थोडे सावरून बसले. कपूर साहेब येऊन त्यांच्या केबिन कडे वळले. जोशींनी बोनसची पाकीटं तयार ठेवली होती. कुमार जोशींच्या शेजारी खुर्ची घेऊन बसले. भरतच्या हातात नावांची यादी होती. तो लोकांना बोलवायला वळला.
अर्चना आपल्या जागेवर येऊंन बसली. तिने नवीन प्रोग्रामचा फ्लो चार्ट करायला घेतला. भरत साहेबांच्या केबिनच्या आत बाहेर करत होता. तिथे आता येणाऱ्या कामगारांची वर्दळ सुरू झाली होती. पलीकडे बोनस घेऊन एक एक जण मग केबिन मध्ये गिफ्ट आणी मिठाई घ्यायला जात येत होता. दिवाळी शुभेच्छांची देवाण घेवाण होत होती. अर्चना तिच्या कामात गुंतून गेली.
“मॅडम, साहेबांनी बोलावलं..” भरत तिच्या समोर येऊंन उभा होता.
‘इतक्यात..? आटपले सगळे लोकं..?’ वेळेकडे तिचं लक्षच नव्हतं. तिने वर बघितलं. अजून काही जण इथे तिथे उभे होते.

अर्चना केबिन कडे गेली. कपूरसरांच्या समोरच्या खुर्चीवर कुणी तरी पाठमोरं बसलेलं होतं.

“कम.. कम.. अर्चना.. ये..” तिला पहाताच कपूर म्हणाले.
“यू कॉल्ड मी सर..?”
“येस.. हे माझे मित्र... आपले सप्लायर पण आहेत ते. ह्यांना नवीन कॉम्प्युटर घ्यायचा आहे. त्यात त्यांना जरा तुझी जरा मदत हवीय..”
“ शुअर सर....” अर्चनाचं लक्ष त्या नवीन माणसाकडे गेलं. पन्नाशीचा तो माणूस अर्चनाकडेच रोखून पहात होता.
“शर्मा, ही अर्चना. हुशार आहे तिच्या कामात. ती करेल तुला मदत....”
अर्चना थरथरली. ‘हा शर्मा..?’ तिच्या मनात आत कुठे तरी तडा गेला होता. ‘काय विचार करत होतो आपण..?’
“हॅलो.. अर्चनाजी.. कब फ्री हो आप..? ” तोच तो मधाळ रेशमी आवाज. अर्चना भानावर आली.

शर्माची नजर तिच्यावरच होती. अर्चनाच्या अंगावर काटा आला. आतापर्यंत उबदार वाटणाऱ्या रेशमी आवाजाची नजर तिला आरपार न्याहाळत होती, तिचे कपडे भेदून...
****************

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

डेलि प्रॉडक्शन चार्टवरून डेली कनझमशन कसे काय घेता येईल, याचा विचार केला.

मधाळ आवाज, आलेले ब्लँक कॉल, न पाहिलेल्या सप्लायरबद्दल आपुलकी वगैरे कल्पनाविलास छान आहे. याचा संबंध मायबोली फेम लव्ह जिहाद स्टोरीशी आहे काय, असे उगीचच मनात आले.

अतिअवांतर: "वेळ पडली तर असेंब्ली लाइन पण सांभाळू शकणारे कुमार" आणि "चहा पाणी देणारा, अन् वरकाम बघणारा एक भरत" हे वाचून इतर पात्रांची नावे (आणि लेखकाचे नाव पण) परत एकदा तपासून बघितली. Light 1

मधाळ आवाज, आलेले ब्लँक कॉल, न पाहिलेल्या सप्लायरबद्दल आपुलकी वगैरे कल्पनाविलास छान आहे. याचा संबंध मायबोली फेम लव्ह जिहाद स्टोरीशी आहे काय, असे उगीचच मनात आले.>>> नाही नाही... तसे अजिबात नाही.
ह्या कथेचा 'लव्ह जिहाद ' शी काहीही संबंध नाही.

डेलि प्रॉडक्शन चार्टवरून डेली कनझमशन कसे काय घेता येईल, याचा विचार केला.>>>

प्रॉडक्ट ला किती आणी कोणतं raw मटेरियल लागेल ह्या चार्ट वरून.

<< ह्या कथेचा 'लव्ह जिहाद ' शी काहीही संबंध नाही. >>
हो, नंतर आले लक्षात.

छान आहे.
अशाच धाटणीची वपु किंवा शन्ना ह्यांची कथा आहे का?>>> मला अंधुकशी आठवतेय. कुणाची आहे माहिती नाही. स्टेनो म्हणून लागलेली मुलगी. मालकाच्या मर्जीत बसते. मग स्वतःला मालकाच्या बरोबरची समजायला लागते. त्यातला लक्षात राहीलेला प्रकार म्हणजे कंपनीत फिरणारी "थंड नोट" की "सो अँन्ड सो या पुढे या कंपनीत काम करत नाहीत".
माबोवरच आहे बहुतेक.

धन्यवाद चिन्मयी.
ती बेफिंची कथा मला पण आठवते. फारच छान होती.
नोकरीत असणारी (आणी बरंच सांभाळू शकणारी) स्त्री एवढंच साम्य मला दोन्ही ठिकाणी आढळलं. त्यांची नायिका काही दिवसांनी स्वत:च कंपनीची बॉस असल्यासारखी वागू लागते.
माझ्या कथेतील अर्चना घरातल्या कटकटींनी वैतागलेली अन् एकटी पडलेली आहे. तिला प्रेमाचे चार शब्द हवे आहेत. शेवटी शर्माला बघून.. त्याची नजर बघून तिला धक्का बसला. पण कदाचित तो आकर्षक .. तरुण असता तर ती वहावत जाऊ शकली असती.. किंवा किमान सुखावली तरी असती.

आवडली कथा.
बेफिंच्या त्या कथेतल्या मुलीचं नाव 'चारू' होतं वाटतं. मला त्या कथेची नाही, पण इन जनरल बेफिकीर यांच्या कथांची आठवण झाली. अशा प्रकारच्या इंडस्ट्री/ऑफिसच्या पार्श्वभूमीवरच्या त्यांच्या अनेक मस्त कथा आहेत.

अशा प्रकारच्या इंडस्ट्री/ऑफिसच्या पार्श्वभूमीवरच्या त्यांच्या अनेक मस्त कथा आहेत. >> +१

वपुंचीही एक आहे. वृद्ध बॉस आपल्या सहकारी कर्मचार्‍याला (स्त्री का पुरूष ते लक्षात नाही) हनीमून ट्रिपचे रेकॉर्डिंग करून त्याला द्यायला सांगतो. टोटली क्रिंजवर्दी कथा होती.

शर्मिला, क्रमशः आहे ना?
रोचक आहे आतापर्यंत.
या थीम वर बऱ्याच कथा बनतात, त्यामुळे एका पूर्ण ओरिजिनल लिहिलेल्या तून दुसऱ्या ची आठवण येणं साहजिक आहे.

मला वपु वालया 2 आठवल्या.
ती हनिमून वाली फारच बाद आहे.
दुसरी एक सेक्रेटरी बिघडल्याची आणि तिला बिघडण्या आधीपासूनच निनावी चिठ्ठ्या येतात ती.

धन्यवाद वावे, केशवकूल.

शर्मिला, क्रमशः आहे ना? >> नाही. कथा संपली इथेच. अर्चना भानावर आली..