धागा काढायचा असं काही खरंतर ठरवलं नव्हतं, अमांच्या सांगण्यावरूनकाढत आहे.
तर झालं असं की सात महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर परवा आमच्या गुरुवारी संध्याकाळी जगभरात पोन्नियिन सेल्वन चित्रमालिकेतला दुसरा भाग प्रदर्शित झाला. १४ तारखेला तिकिटविक्री सुरू होताच मी तातडीने सदाचारी पापभीरू मध्यमवर्गीय मराठी बाण्याला जागून शनिवारची तिकिटं काढली होती. पण काही केल्या शनिवार उगवेच ना! शेवटी न राहावून गुरुवारी हाफ डे टाकून आम्ही फर्स्ट डे फर्स्ट शो बघायला गेलो.
या मध्यंतरीच्या सात महिन्यांच्या काळात मूळ तमिळ कादंबरीचा पवित्रा श्रीनिवासन यांनी केलेला अनुवाद - पाचही खंड - वाचून ऑडिबलवर ऐकून पूर्ण केले होते. 'कोण कोणाला म्हणाले आणि का', 'कोण कधी जन्मले किंवा मेले आणि कोणामुळे', 'कोणावर कसला आळ आला', 'कोण खरंतर मेलेच नाही' इत्यादी प्रश्नांचा एकमेकांकडून सराव करून घेतला होता. कुठल्याही पात्रावर दोन मार्कांची टीप किंवा 'अमक्यांच्या पराभवाची आठ कारणे' सहज लिहिता येतील इतका आत्मविश्वास आला होता.
कळवण्यास अत्यंत आनंद होतो की हा सगळा अभ्यास कावेरीत गेला.
कल्की यांच्या ऐतिहासिक कादंबरीवर आधारित असली तरी चित्रपट ही एक स्वतंत्र कलाकृती आहे, आणि तिचा कर्ताकरविता मणिरत्नम आहे याचा लखलखीत साक्षात्कार झाला. सुरुवातीला काही ठिकाणी 'पण पुस्तकात तर...' असं काहीबाही आठवलं, पण चित्रपटाचा भव्य नेत्रसुखद कॅनव्हास आणि भरधाव वेग यामुळे लवकरच त्याचा विसर पडला.
कथेची पार्श्वभूमी:
दहाव्या शतकात घडलेली तमिळनाडूतील चोळ साम्राज्याची ही गोष्ट. चोळ, चेरा आणि पंड्या या त्या भूप्रदेशातल्या तीन तत्कालीन महासत्ता म्हणून ओळखल्या जातात. पैकी पंड्या आणि चोळ यांच्यातील यादवीचा संदर्भ या कथेत येतो. राजराजा (किंग ऑफ किंग्ज!) चोळ हा या घराण्याचा मुकुटमणी शूर योद्धा होताच, पण तो कलाप्रेमी आणि त्याचबरोबर कुशल, धोरणी आणि दूरदर्शी प्रशासकही होता. अर्थातच याच्या कारकीर्दीत चोळ साम्राज्य केवळ वाढलंच नाही, तर बहरलं.
पण चित्रपटात मांडलेला कथाभाग आहे तो नंतर राजराजा म्हणून ओळखला गेलेला अरुणमौलीवर्मन राजपुत्र असतानाचा. त्याचा मोठा भाऊ आदित्य करिगालन (कळिकाळ?) याला यौवराज्याभिषेक झालेला आहे. तो महापराक्रमी आहे, पण त्याचबरोबर तापट आणि काहीसा आततायी (इम्प्लसिव्ह) आहे. त्याला राजकारणात आणि राज्यकारभारात रस नाही. त्याच्या पाठीवरची बहीण कुंदवै ही तिच्या वयाच्या मानाने अतिशय परिपक्व आणि मुत्सद्दी राजकारणी आहे, सर्वात धाकट्या अरुणमौलीच्या जडणघडणीत तिचा फार मोठा वाटा आहे. ही बहीण खरी, पण आपण शिवबाने राज्यकारभार कसा करावा त्याचे धडे जिजाऊंकडून घेतले म्हणतो तशी ही किंगमेकर आहे. सद्य चक्रवर्ती सुंदरराज चोल हे या तिघांचे वडील.
पोन्नी हे कावेरी नदीचं लाडाचं नाव. त्याचा अर्थ सुवर्णकुमारी असा आहे. कावेरीच्या खोर्यातली पुळण सोनेरी दिसते म्हणून वाच्यार्थाने आणि अतिशय सुपीक म्हणून लाक्ष्यार्थानेही मिळालेलं. राजराजा हा या कावेरीचा लाडका पुत्र म्हणून 'पोन्नियिन सेल्वन'.
पंड्यांच्या राजाचा पराभव आणि शिरच्छेद आदित्याने केल्यामुळे पंड्या सरदार सूडाने पेटलेले आहेत. त्यांच्या गुप्तहेरांनी चोळ साम्राज्य पोखरायला सुरुवात केलेली आहे. चोळांचा नायनाट करून त्यांना पंड्याच्या अल्पवयीन मुलाला गादीवर बसवायचं आहे. दक्षिणेला श्रीलंकेच्या राजाचा अरुणमौलीने पराभव केल्यामुळे तेही चवताळलेले आहेत. तशातच चोळांच्या एका अंतर्गत कलहालाही हळूहळू उकळी फुटते आहे. सुंदरराज चोलाकडे राज्याची धुरा आली ती त्याचे थोरले काका गंधरादित्य लढाईत मारले गेले तेव्हा त्यांचा मुलगा मधुरांतक लहान असल्यामुळे. पण आता तो मोठा झाला आहे, आणि त्याला त्याचं राज्य परत हवं आहे. त्याचा बाहुलं म्हणून वापर करून राज्यावर कबजा करता येईल अशी स्वप्नं बाळगून असलेले आणि त्यासाठी त्याला पाठिंबा देणारे काही सरदारही आहेत.
इथे या कादंबरीतलं - आणि चित्रपटातलंही - काल्पनिक, पण सर्वात महत्त्वाचं पात्र 'नंदिनी' आपला डाव मांडतं. नंदिनीचं वर्णन 'साक्षात सर्पिणी' असं केलं गेलं आहे. ती महत्त्वाकांक्षी तर आहेच, पण तिच्या ध्येयप्राप्तीच्या आड कुठलाही विधिनिषेध येत नाही. वयात येत असताना तिचं असामान्य सौंदर्य पाहून आदित्य तिच्या प्रेमात पडला होता, पण तिच्या कुलशीलाचा ठावठिकाणा नसल्यामुळे राजघराण्यात तिचा समावेश अशक्य होता. त्या घटनेमुळे नंदिनीच्या महत्त्वाकांक्षेला खीळ बसली नाहीच, उलट आता त्याला सूडाग्नीची जोड मिळाली आहे.
यापुढचा तपशील मी अर्थातच सांगणार नाही.
ही पाच खंडांत लिहिली गेलेली कथा दोन चित्रपट मिळून सहा तासांत दाखवण्याचं शिवधनुष्य मणिरत्नमने पेललं आहे. अश्या वाक्यांत सहसा 'लीलया' हे विशेषण येतं. मी ते मुद्दाम वापरलेलं नाही. कारण या प्रयत्नात त्याची धावपळ झालेली जाणवते. विशेषत: या दुसर्या भागात. पहिल्या भागाने काहीश्या विलंबित लयीत रागाची ओळख करून दिली होती. हा भाग द्रुतलयीत एकाहून एक इन्टेन्स प्रसंगांची अशी आतषबाजी सुरू करतो की जीव दडपतो! त्यात निसर्गाचे रौद्रभीषण आविष्कार आहेत, राजकीय डावपेच आहेत, विश्वासघात, कटकारस्थानं आणि त्यांना हिकमतीने दिलेली मात आहे, थक्क करणारे गौप्यस्फोट आहेत, नेत्रदीपक लढाया आहेत...
आणि या सगळ्याला पुरुन उरणारे प्रेमिकांतले, भावाबहिणींतले, मित्रामित्रांतले अतिशय हळुवार आणि हृद्य क्षणही आहेत. असे क्षण मोजक्या ब्रशस्ट्रोक्समधून नेमकेपणाने पोर्ट्रे करणं यात मणिरत्नमचा हातखंडा आहे. हा शेवटी ह्यूमन ड्रामा आहे याचा विसर तो पडू देत नाही.
चित्रपट संपल्यावर बाहेर येताना लढाया आणि आतषबाजी आठवत नाही, या क्षणांचा अंतःप्रवाहच उचंबळून येतो!
आणि हृदयात रुंजी घालत राहातं ते रहमानचं संगीत.
सर्व कलाकारांनी आपापल्या भूमिका अक्षरशः जीव ओतून केल्या आहेत. राजबिंडा अरुणमौली, मिश्किल/चार्मिंग/फ्लर्टी वंद्यदेव, संस्कृत नाटकांतल्या सूत्रधार-कम-विदुषकासारखा आलवारकडियान, सगळे सरदार, मानकरी, वानदी/कुंदवै/पुंगुळली/सेंबियन महादेवी - सगळी पात्रं या कलाकारांनी प्राण फुंकून जिवंत केली आहेत. पण नंदिनी झालेली ऐश्वर्या आणि आदित्यच्या भूमिकेतल्या विक्रमचा खास उल्लेख करणं मला इथे अपरिहार्य आहे. त्यांचे रोल भावखाऊ आहेत हे खरंच, पण ते तितक्याच ताकदीने पेलले गेले नसते तर चित्रपट फसला असता! दोघांनी कमाल केली आहे!
चित्रटाची भव्यता, सेट्स, लोकेशन्स, कॅमेरावर्क, नेमक्या प्रसंगांत जवळून वा दुरून चित्रण, कपडेपट, रंगसंगती - यांत बोलण्याइतका माझा अधिकार नाही, तेव्हा सामान्य प्रेक्षक म्हणून ते भारी वाटतं आणि अर्थातच चित्रपटाच्या परिणामकारकतेत मोलाची भर पडत जाते इतकंच म्हणू शकते.
रहमानच्या संगीताचा मी उल्लेख केला का? गाणी बहुतांशी गायली न जाता पार्श्वसंगीत म्हणूनच वाजतात, तीही अपूर्ण, आणि तरीही नेमका परिणाम साधतात. पार्श्वसंगीत हे यातलं एक महत्त्वाचं पात्रच आहे म्हटलं तर ती अतिशयोक्ती होणार नाही.
काही बाबी (बहुधा पुस्तकं वाचलेली असल्यामुळे) मला खटकल्या. स्वतंत्र कलाकृती म्हणून पाहणार्यांना कदाचित जाणवणारही नाहीत.
दुसर्या भागात नंदिनी आणि काही प्रमाणात कुंदवै वगळता यातल्या स्त्री पात्रांकडे अक्षम्य दुर्लक्ष झालं आहे. पुस्तकांचं माझ्यासाठी एक मोठं अपील त्यातली अतिशय स्ट्राँग स्त्रीपात्रं हे होतं. इथे बहुधा काटछाटीत त्या शोभेच्या वस्तू होऊन उरल्या आहेत. नंदिनीचे विषारी आणि विखारी डावपेच चित्रपटात बरेच डायल्यूट केले आहेत. खुद्द पोन्नियिन सेल्वनही 'शूर? चेक! मुत्सद्दी? चेक! निष्ठावंत मित्र? चेक! उदार? चेक! कलाप्रेमी? चेक!' अश्या प्रकारची एक 'चेकलिस्ट' होऊन राहिला असं वाटत राहातं.
पाच दिवस अटीतटीने खेळल्या गेलेल्या टेस्ट क्रिकेटमधल्या सामन्याची क्षणचित्रं अर्ध्या तासात बघावीत तसं होतं. डोळे दिपतात, पण रुचे-पचेतो हातातली वाळू निसटून जाते. दोनाऐवजी तीन सिनेमांत गोष्ट विभागली असती तर बरं झालं असतं का? की मग चार हवे होते असंही वाटलं असतं, कोणी सांगावं!
अर्थात पडद्यावर ही प्रतिसृष्टी निर्माण केल्याबद्दल आणि त्यात ते हळवे क्षण गुंफल्याबद्दल मणिरत्नमला असे शंभर अपराध माफ आहेत!
म्हणूनच तर मी ती आधी काढलेली शनिवारची तिकिटं कॅन्सल केली नाहीत.
छान लिहिले आहे. एकदम प्रसन्न
छान लिहिले आहे. एकदम प्रसन्न शैली आहे.
बरं झालं मी केलाच नाही.
अभ्यास कावेरीत गेला.
मला वाटलं नंदिनी आणि कुंदवै अजून पाताळयंत्री दाखवतील पण शेवटचा परिच्छेद वाचून थोडी निराशा झाली. पहिल्या भागात त्यांना सगळ्या पुरूषांना पुरुन उरतील असे राजकारणी डावपेच खेळताना बघून शकुनी सारखा आसुरी आनंद झाला होता, हेराला करू दिलेल्या फ्लर्टिंग सह.. ! ह्या सिनेमाची गंमत म्हणजे कोणत्याही पात्रावर पूर्ण विश्वास टाकता येत नाही. प्रत्येकाला आपापली 'धार' आहे.
पहिलाच पुन्हा एकदा शांत चित्ताने बघायचा आहे. मग दुसरा बघेन.
<<कळवण्यास अत्यंत आनंद होतो
<<कळवण्यास अत्यंत आनंद होतो की हा सगळा अभ्यास कावेरीत गेला.>>
इथे फुटलेच...
आधी भाग १ पाहतो आणि मग हे नीट
आधी भाग १ पाहतो आणि मग हे नीट वाचतो परत. तोपर्यंत फक्त अभ्यास कावेरीत गेला ला एक लोल.
सुंदर परीक्षण.
सुंदर परीक्षण.
हे चित्रपट आणो कादंबरी
हे चित्रपट आणो कादंबरी माझ्याकडून कधी पाहिले -वाचले जातील आणि जातील का ते माहीत नाही. लेखातली भाषा फार फार आवडली.
रिव्ह्यू सुरेख लिहिला आहे.
रिव्ह्यू सुरेख लिहिला आहे.
चित्रपट अजून बघायचा आहे. पण
चित्रपट अजून बघायचा आहे. पण नंदिनी बच्चन घराण्याची सून असल्याने मूळ पटकथेत बदल झाले, हे कळल्याने तो लगेच बघायची इच्छा काहीशी कमी झाली.
वा! धागा आला का? हे बेस्ट
वा! धागा आला का? हे बेस्ट झालं. आता वाचतो. बर्याच गोष्टी आधी विपूत दिल्यामुळे इथे हव्यातर चोपपस्ते करीन.
बाकी एक गोष्ट सांगायची राहिली. त्या नंदिनी-आदित्त प्रसंगात वंद्यतेवन जेव्हा जमिनीवर वाघाच्या कातड्याच्या खाली जातो, तिथे मी आणि बायकोने मिश्किल चेहर्याने एकमेकांकडे पाहिलं आणि 'अशोक सराफ' असं म्हणून दोघंही फुटलो. आजूबाजूच्या बिचार्या तमिळ प्रेक्षकांनी बाजीराव रणगाडे पाहिला नसावा.

सुंदर लेख. पटला. पुस्तकं अजून
सुंदर लेख. पटला. पुस्तकं अजून दीडच ऐकली आहेत. अजून सडेतीन बाकी आहेत.
माझ्या चित्रपटाबद्दलच्या मतांची क्षणचित्रे -
पार्श्वसंगीत फुल मार्क्स. जरी युरोपीय वाद्य, कॉयर वगैरे असले, तरी मला ते संगीत आवडलं. या दुसर्या चित्रपटाचा पूर्वार्ध दिग्दर्शन, अभिनय - १०५% गुण. उत्तरार्ध कमी गुण, शिवाय खराब हस्ताक्षराचे आणखी २ गुण कापेन (ती मारामारी जरा कंटाळवाणी झाली म्हणून). ऐश्वर्या बोर्ड फाडून पास, परीक्षकाची आवडती म्हणून, पक्षपात म्हणा.
मी तमिळमध्ये पाहिला. गुलजारला मुकलो, पण ते काय नंतर ऐकता येईल. बघताना काही अडचण आली नाही. Subtitles फार जोरात पळत नव्हते आणि कथा व्यवस्थित कळत होती. तीन भावंडं भेटतात तो प्रसंगही खूप सुंदर दाखवला आहे. मला गदगदून आलं तिथे.
माझ्यापुरतं या चित्रपटाचं नाव 'नंदिनी' ठेवलं आहे मी. पोन्नियीन सेल्व्हन नाही. तीच आहे जळी स्थळी काष्ठी पाषाणी. संपूर्ण कथाविश्वाला पुरून वर दशांगुळे उरली आहे. फक्त दोनच प्रसंग - ते इथे लिहित नाही, पडद्यावर बघा - तिथे गोष्टी तिच्या हातून सुटत आहेत असं वाटलं. पण नाहीतर शी इज ऑलवेज इन कमांड. ती जगात काहीही करू शकते यावर विश्वास बसलेला असतो आपला. बाकी कुंदवै, वाणती, पुंगुळली - सर्वांवरच अन्याय झाला आहे या चित्रपटात. त्यामुळे आता राहिलेली पुस्तकं ऐकून काढण्याला गत्यंतर नाही.
धन्यवाद बाई. एक एक पॉइन्ट
धन्यवाद बाई. एक एक पॉइन्ट आठवेल तसा लिहिते. काही स्पॉयलर चुकून आले तर अलर्ट
पार्श्वसंगीत फुल मार्क्स.>> अनुमोदन. मी काही काही वेळा डोळे बंद करुन पार्श्वसंगीतच ऐकत होते. रहमानची वेगळी टीम आहे काय पार्श्वसंगीतासाठी? ए आर रहमान साठी दोन साउंड इंजिनेअर्सची नावे पाहिली.
भाबडे पणा करुन मला वाटत राहिले की रा ष्टृ कूट लोकांशी फाइटिन्ग हे तिसर्या भागात असावे पण नाही इथेच उरकून टाकले व स्टोरी संपवुन टाकली . ती लढाई छान चित्रित केली आहे. थोडे रोमन युद्धांशी साधर्म्य आहे. ते मागून पळीतून आगीचे गोळे फेकतात ते. आयताकृती फॉर्मेशन्स वगैरे. वानर कुलाचा वंदेश्वर पण गोड व हसरा आहे.
अरुण मोळी वर आत्मघातकी हल्ल्याचा क्राउड सीन अमेझिंग आहे. दिदर्शक विचार करु देत नाही. इतके मोरपिसांचे पंखे करु शकत होते लोक तेव्हा. आमची लाडकी शोभिता धुलीपाला हिला बघुन आनंद झाला.
नागपट्टिनम म्हणजे पाँडिचेरीच्या थोडे पुढे पडते तेच का? मी कामानिमित तामिळनाडू पाँडी भरपूर फिरले आहे पण नाग पट्टिनमला जाणे झाले नाही. नुसते मॅप वर बघितले आहे. पण आमच्या टीम मधील पट्टीच्या सेल्सवाल्यांकडूनही ही जागा दूर, व लेस अॅक्सेसिबल असे ऐकले आहे .
कडंबूर म्हणजे सध्याचे काय गाव येते?
तंजावुरचा पॅलेस एकदम भारी वाटला सीजीआय असला तरी. कुंदा वई, इतर राण्या राजपुत्री, गावातील महिला व टॉप ऑफ द हीप ऐश्वर्या ह्या
सर्वांचे दागिने फारच फारच मस्त आहेत. मी तर डोळे फाडुन बघितले. आदल्या दिवशी नल्ली मधून एक रेड गोल्ड कांची सिल्क घेतली आहे. तशीच एका सीनमध्ये वानिती( शोभिता धुली पालाची आहे.) फॉर्मल ऑकेजन्स ना कुंदवईची टॉवरिंग हेअर स्टाइल लै भारी. एकदम राजकन्या.
कुंदावई व वंदेश्वर एका बेटावर भेटतात त्या सीन मध्ये तिने हल्क्या गुलाबी रंगाची साडी व नाजुक दागिने घातले आहेत. तो क्षण फार सुरेख टिपला आहे. भगवान नेक्स्ट लाइफ में मै उधर जाएगी बॉयफ्रेंड के साथ याद रखियो. ते लोकेशन कुठे असावे? तिथे नेटवर्क नाही नक्की.
पण मंदाकिनीचे पांढरे केसही आव्डले. इतके केस वाढवून काटन साडी नेसुन त्या वयात पळता येते का? नटीला येत असावे.
हिचे डोळे ऐश्वर्याचे ओरिजिनल आहेत. व नंदिनीचे ब्राउन केले आहेत लेन्सा घालुन.
कदंबूर अजून त्याच नावाने आहे.
कदंबूर अजून त्याच नावाने आहे.
महत्वाचे म्हणजे कथेचे मूळ
महत्वाचे म्हणजे कथेचे मूळ बीज हे आदित्य कारिगलन चे नंदिनीवरील प्रेम. पहिले प्रेम. जे कधीच मीलनात रुपांतरित होउ शकत नाही व गैर समजांमुळे एकमेकांच्या द्वेषात हेट मध्ये रुपांतरित होते हे वीष च त्यांच्या जीवनावर स्वार होउन वार करत राहते. एकत्र येउ देत नाही व नंदिनीने बोटे मोडत चोलांना खतम करायचे मनावर घेतले ते ही त्यामुळेच. हा कथेचा गाभा आहे. बाकी लोक काही पण करत राहतात. व ह्यांच्या युद्धात मध्ये येउन जखमी होतात. मरतात सुद्धा. नंदिनी सोडून गेल्यावर, वीरपांड्याचा वध केल्यावर आदित्य ह्या अन फुलफिल्ड प्रेमाच्या आगीत जळत धुमसत राहतो. पहिल्या पी एस वन मध्ये ह्याचा ह्या भावना दाख विणारा सीन उत्तम अॅक्ट व चित्रित केला आहे. कोणी ही ओवर अॅक्टिन्ग व हॅमिन्ग केलेले नाही.
ह्या सीनची परिसीमा व कळसाध्याय दुसर्या चित्रपटा त दाखवला आहे तो मुळातूनच बघा. ऑलमोस्ट शेक्स्पिरीअन ट्रॅजिडीचे फील्स येते.( मला भाबडी समजा हवे तर) पण ह्या सीन साठी चित्रपट बघावा. उत्तम अॅक्टिन्ग.
ते वाघाच्या कातडीत लपून पुढे पुढे सरकायचे बघून मला पण मजा वाटलेली. वानरच ते.
मी हिंदीतून बघितला पण गुलजारची गाणी आहेत तिथे आहेत. सुरेख आहेत पण अनुभवात काही फार फरक प्डत नाही. स्पॉटिफाय वर ऐकली पाहिजेत वेळ देउन. चित्रपटात घटना इतक्या वेगाने घडतात की गाणी आली ऐकली गेली असे होते. मूळ तमीळ मधून बघितले तर जास्त बरे. सब टायटल अॅडिक्वेट लिहिली आहेत व पळत नाहीत.
ऑल मेल कॅरे क्टरस आर नॅचरली गुड लुकींग. त्यांचे दाग दागिने पण फार लक्ष देउन बनवले असावेत. अरुण मोळी बरा झाल्यावर दागिने घालुन सिल्क धोती घालुन येतो तेव्हा एकदम राजबिंडा दिसतो. आदित्याचे दागिने त्याच्या व्यक्तिरेखेला साजेसेच आहेत. व वीर पांड्या, रविदास ह्यांचे पण . सिल्व्हर टाइप मेटलचे कॉमन लोकांचे दागिने आहेत.
शेवटाला किलर्स मोठ्या राजाला मारायला येतात तेव्हा ती दासी लपून छपून येते पण पायात पैंजण!!! काय हे.
मी पुस्तक वाचायला घेतलं पण
मी पुस्तक वाचायला घेतलं पण थोड्या वेळाने मला चांदोबा वाचतोय असा भास व्हायला लागला
नेटाने अजून थोडा वेळ वाचलं तरी तेच मग ठेऊन दिलं
सिनेमा अजून पहिलाच नाहीये पण बघण्याच्या लिस्ट मध्ये आहे
छान परीक्षण.
छान परीक्षण.
मला सुद्धा PS1 परत बघून मग हा बघावा लागेल.
पीएस १ वर एक १०० मार्कांचा
पीएस १ वर एक १०० मार्कांचा पेपर काढा म्हणजे पहिला भाग नीट पाहून लक्षात राहील. नाहीतर
कोण कुणाचा का, कधी, कसा काटा काढतंय कळणार का ?
ऐश्वर्या रायचं नाव नंदिनी आहे म्हटल्यावर हवा का झोंका सिनेमात असेल ही अपेक्षा.
मस्त परिचय केलाय.. नक्की
मस्त परिचय केलाय.. नक्की बघणार..
काय सुरेख ओळख करुन दिलीयेस.
काय सुरेख ओळख करुन दिलीयेस. ते हळवे क्षण खरच पहावे अशी इच्छा होते.
>>>>>चित्रपट संपल्यावर बाहेर येताना लढाया आणि आतिषबाजी आठवत नाही, या क्षणांचा अंतःप्रवाहच उचंबळून येतो!आणि हृदयात रुंजी घालत राहातं ते रहमानचं संगीत.
हे वाक्य तर कोंदणातील हीरा आहे.
चित्रपट कदाचित पाहीन. फक्त तुझ्या परीक्षणामुळे.
सर्व प्रतिसादकांचे अनेक आभार.
सर्व प्रतिसादकांचे अनेक आभार.
>>> बाजीराव रणगाडे
हो हो, हपा! ते बघताना त्या प्रसंगीही हसू आल्याशिवाय राहात नाही!
>>> माझ्यापुरतं या चित्रपटाचं नाव 'नंदिनी' ठेवलं आहे मी.
गंमत म्हणजे 'नंदिनी'चा अर्थ कन्या, पण ही नक्की कोणाची कन्या आहे याचा पुस्तकात बराच काळ पत्ता लागत नाही, आणि ती त्याही गोंधळाचा उपयोग करून घेते.
>>> हे चित्रपट आणो कादंबरी माझ्याकडून कधी पाहिले -वाचले जातील आणि जातील का ते माहीत नाही
नाही नाही, असं म्हणू नका. तमिळ भाषेतल्या अभिजात साहित्यात याची गणना होते. वाचताना महाभारताची आठवण आल्याशिवाय राहात नाही, आणि कल्कीदेखील त्यातले संदर्भ प्रेमाने देतात. मला उलट मणिरत्नमने हे चित्रपट काढले नसते तर असं लिटररी रत्न आपल्या देशात लिहिलं गेलं आहे याचा कधी पत्ताच लागला नसता असं वाटलं. सिनेमा पाहाल न पाहाल, पण कादंबरीची अगदी आवर्जून शिफारस करेन मी!
>>> नंदिनी बच्चन घराण्याची सून असल्याने मूळ पटकथेत बदल झाले, हे कळल्याने तो लगेच बघायची इच्छा काहीशी कमी झाली
आय अॅम होल्डिंग ऑन टु 'काहीशी'
>>> कथेचे मूळ बीज हे आदित्य कारिगलन चे नंदिनीवरील प्रेम
पटकथेचे. मूळ कादंबरीत... पण ते असो.
प्रेमकथेची फोडणी - तीही ट्रॅजिक असली तर आणखीनच खमंग - बसली की चित्रपट अधिक भिडतो यात काही गुपित नाही. मणिरत्नमने स्वतः इतर सोशोपोलिटिकल चित्रपटांत (आठवा: रोजा, दिल से, कन्नत्तिल मुत्तमिट्टाल, बॉम्बे इ. इ.) त्याचा वापर केला आहेच.
फार कशाला, जॅक आणि रोज नसते तर टायटॅनिक नुसती डॉक्युमेन्टरी झाली असती, नाही का?
>>> चित्रपट कदाचित पाहीन. फक्त तुझ्या परीक्षणामुळे.
धन्यवाद, असं एका वाचकाला जरी वाटलं तर ते परीक्षण लिहिल्याचं सार्थकच!
लेख फारच आवडला. पहिला ही
लेख फारच आवडला. पहिला ही बघितलेला नाही. तो आधी बघतो.
Ps1 बघताना मला दहा वेळा
Ps1 बघताना मला दहा वेळा google /विकीपेडिया उघडावा लागला होता... अचानक पडद्यावर कोणी यायचे आणि हा कोण/ हि कोण असे प्रश्न पडत... अत्यंत फेल डायरेक्शन.. कॅरॅक्टर बिल्ड करायला जराही कष्ट घेतले नव्हते...
तरी ps 2 बघायचा आहे...
तुम्ही जळीस्थळी पीएस बद्दलच
दुसर्या भागातही पीएसचं कॅरेक्टर नीट उभं केलं नाही यानं निराशा झाली. एकुणात पीएस-२ चा कॅनव्हास फारच भरगच्च आहे. तीन किंवा चार भाग हवे होते याला अनुमोदन. एकाच गतीनं जाणारे पण थोड्या कमी लांबीचे ३-४ भाग बघायला आवडले असते.
मंदाकिनी टपाटप उड्या मारते ते फारच हास्यास्पद झालं आहे. खुद्द बच्चन बाईंची मेक-अप अन फलाणी आर्मी असताना म्हातार्या बाईचा मेक-अप किती कच्चा केलाय. केस कधी सोनेरी, कधी ग्रे. मीच २ वेळा चष्मा पुसून घेतला. बरं ऐश्वर्या रायनं काही तरी सर्जरी केली आहे, तोंड काही तरी विचित्रच दिसतं तिचं.
हो, मंदाकिनी हे आणखी एक
हो, मंदाकिनी हे आणखी एक अक्षम्य दुर्लक्ष झालेलं पात्र.
*** स्पॉइलर अलर्ट ***
)
पंड्या राजाने तिचं अपहरण केलं, तिला अपत्यप्राप्ती झाली, हे सुंदरराज चोलाला खिजवण्यासाठी अशा अर्थाचा उल्लेख येतो फक्त. पण सुंदरराजला ती जिवंत आहे हेच माहीत नसताना तो खिजवला जाणार कसा? बरं, ती इतक्या वर्षांनी अचानक नेमक्या त्या वेळी तंजावुरमध्ये कशी आणि का उगवते? याची उत्तरं सिनेमात मिळत नाहीत. (पुस्तकात मिळतात, तेव्हा पुस्तकं वाचा!
हा जमला नाही. पहिला त्या
हा जमला नाही. पहिला त्या मानाने चांगला जमला होता. ह्यात काटछाटीमुळे काही प्रसंग आणि पात्रं अतर्क्य आणि अविश्वसनीय झाले. ३ भाग असायला हवे होते.
अवांतर - ऐश्वर्याला लावलेला व्हाईट फिल्टर दगडांच्या पार्श्वभूमीवर तिच्या डोक्याच्या मागचे दगडही उजळ करतो, ही गंमत दिसली. कॅमेरा गोल फिरताना ते प्रकर्षाने दिसलं.
पण काही केल्या शनिवार उगवेच
पण काही केल्या शनिवार उगवेच ना! शेवटी न राहावून गुरुवारी हाफ डे टाकून आम्ही फर्स्ट डे फर्स्ट शो बघायला गेलो>>>>>
ह्याला म्हणतात खरी आवड! 
कळवण्यास अत्यंत आनंद होतो की हा सगळा अभ्यास कावेरीत गेला.>>>> टोटली फुटलो इथे
बाकी आता दुसर्यांदा (की कितव्यांदा?
) असं होतय की तुमच्या स्टोरीटेलिंग मुळे ज्या स्टोरीबद्दल तुम्ही स्टोरी लिहिलीत ती आवर्जून वाचावी, बघावीशी वाटते. एखादी गोष्ट आवडणे ठीक आहे पण ती आवडताना म्हणजे त्यातल्या किती बारिक साइर्क नुआनन्सेस कडे लक्ष दिल्यामुळे ती आवडली ह्यात प्रत्येक माणसाच्या आवडीमधली डेप्थ दिसून येते. ह्याचा अर्थ इतर लोकांची आवड ही आवड नाही असं नाही. मला हेवा ह्या गोष्टीचा वाटतो की एखादी गोष्ट आवडून घेताना त्यात ओतलेला वेळ, इतर डिटेल्स माहित करुन घेण्यासाठी घेतलेले परिश्रम ह्यात तुम्हाला मनापासून आनंद वाटतो, ह्याचा.
आमच्या बारक्याला (माझ्या मुलाला) मध्यंतरी मी म्हणालो होतो की I feel sometimes you have to learn to how to be happy if you want your life to be a truly rich experience. You (and I for that matter) are born in an era of instant gratification. True to it's name it does instantly gratify you but in reality, I feel it is the ultimate vehicle to mind burnout and making for a truly unfulfilling experience and life, eventually.
The truth is, the toiling to learn a musical instrument or gardening or learning any useful skill (or doing detailed research on the story on which a movie is based before watching it) is what makes the experience of being able to play a musical instrument, plant a garden all by yourself (and watching the actual movie
) truly enjoyable and long lasting.
I just feel this happiness is of much higher level in terms of it's quality and duration. It just makes for a much more meaningful life.
एक मात्र नक्की हा चित्रपट PS
एक मात्र नक्की हा चित्रपट PS चा नक्की नाही वाटला. ईतर अनेक व्यक्तिरेखा जास्त footage घेऊन गेल्या आहेत.
तुमचा लेख वाचुन पोनियन
तुमचा लेख वाचुन पोनियन सेल्व्हन १ बघायला घेतलाय पण फारच गुन्तागुन्त आहे.
मस्त लिहिलंय.
मस्त लिहिलंय.
अजून पीएस-१ च पाहिलेला नाही. इच्छाच झाली नव्हती. पण आता हे वाचून दोन्ही बघावेसे वाटले.
पी एस १ बघू इच्छिणार्यांसाठी
पी एस १ बघू इच्छिणार्यांसाठी - आधी थोडा अभ्यास आवश्यक आहे. जमल्यास इथे वेगळ्या धाग्यात पार्श्वभूमी टाकेन म्हणजे कळायला सोपा जाईल. तिथे पार्श्वभूमी माहीत नसताना तडक बघायला गेलात तर पार गोंधळ उडण्याची शक्यता आहे. हूज हू झेपत नाही. कोन कुणाच्या बाजूने आहे, कळत नाही. वरती च्रप्स म्हणाले तसं बरेच जण म्हणाले होते त्या वेळेला.
स्वाती, अमा, आणि अजून कुणी इच्छुक असेल तर असा एकत्र धागा काढायचा का? 'पी एस शून्य'
स्वाती, अमा, आणि अजून कुणी
स्वाती, अमा, आणि अजून कुणी इच्छुक असेल तर असा एकत्र धागा काढायचा का? 'पी एस शून्य'>> काढा की. आदित्य करिकालन साठी कैपण.
मी देखिल पहिलाही पाहिला
मी देखिल पहिलाही पाहिला नाहीये. सुरवात केली होती पण बघणारे अनेकजणं होते त्यामुळे आपापसात गप्पा आणि खिदळणं यात सिनेमा घरंगळून गेला. नेटानं बघितला पाहिजे. संदर्भासाठी हा तुझा लेख हाताशी ठेवेन,
Pages