धागा काढायचा असं काही खरंतर ठरवलं नव्हतं, अमांच्या सांगण्यावरूनकाढत आहे.
तर झालं असं की सात महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर परवा आमच्या गुरुवारी संध्याकाळी जगभरात पोन्नियिन सेल्वन चित्रमालिकेतला दुसरा भाग प्रदर्शित झाला. १४ तारखेला तिकिटविक्री सुरू होताच मी तातडीने सदाचारी पापभीरू मध्यमवर्गीय मराठी बाण्याला जागून शनिवारची तिकिटं काढली होती. पण काही केल्या शनिवार उगवेच ना! शेवटी न राहावून गुरुवारी हाफ डे टाकून आम्ही फर्स्ट डे फर्स्ट शो बघायला गेलो.
या मध्यंतरीच्या सात महिन्यांच्या काळात मूळ तमिळ कादंबरीचा पवित्रा श्रीनिवासन यांनी केलेला अनुवाद - पाचही खंड - वाचून ऑडिबलवर ऐकून पूर्ण केले होते. 'कोण कोणाला म्हणाले आणि का', 'कोण कधी जन्मले किंवा मेले आणि कोणामुळे', 'कोणावर कसला आळ आला', 'कोण खरंतर मेलेच नाही' इत्यादी प्रश्नांचा एकमेकांकडून सराव करून घेतला होता. कुठल्याही पात्रावर दोन मार्कांची टीप किंवा 'अमक्यांच्या पराभवाची आठ कारणे' सहज लिहिता येतील इतका आत्मविश्वास आला होता.
कळवण्यास अत्यंत आनंद होतो की हा सगळा अभ्यास कावेरीत गेला.
कल्की यांच्या ऐतिहासिक कादंबरीवर आधारित असली तरी चित्रपट ही एक स्वतंत्र कलाकृती आहे, आणि तिचा कर्ताकरविता मणिरत्नम आहे याचा लखलखीत साक्षात्कार झाला. सुरुवातीला काही ठिकाणी 'पण पुस्तकात तर...' असं काहीबाही आठवलं, पण चित्रपटाचा भव्य नेत्रसुखद कॅनव्हास आणि भरधाव वेग यामुळे लवकरच त्याचा विसर पडला.
कथेची पार्श्वभूमी:
दहाव्या शतकात घडलेली तमिळनाडूतील चोळ साम्राज्याची ही गोष्ट. चोळ, चेरा आणि पंड्या या त्या भूप्रदेशातल्या तीन तत्कालीन महासत्ता म्हणून ओळखल्या जातात. पैकी पंड्या आणि चोळ यांच्यातील यादवीचा संदर्भ या कथेत येतो. राजराजा (किंग ऑफ किंग्ज!) चोळ हा या घराण्याचा मुकुटमणी शूर योद्धा होताच, पण तो कलाप्रेमी आणि त्याचबरोबर कुशल, धोरणी आणि दूरदर्शी प्रशासकही होता. अर्थातच याच्या कारकीर्दीत चोळ साम्राज्य केवळ वाढलंच नाही, तर बहरलं.
पण चित्रपटात मांडलेला कथाभाग आहे तो नंतर राजराजा म्हणून ओळखला गेलेला अरुणमौलीवर्मन राजपुत्र असतानाचा. त्याचा मोठा भाऊ आदित्य करिगालन (कळिकाळ?) याला यौवराज्याभिषेक झालेला आहे. तो महापराक्रमी आहे, पण त्याचबरोबर तापट आणि काहीसा आततायी (इम्प्लसिव्ह) आहे. त्याला राजकारणात आणि राज्यकारभारात रस नाही. त्याच्या पाठीवरची बहीण कुंदवै ही तिच्या वयाच्या मानाने अतिशय परिपक्व आणि मुत्सद्दी राजकारणी आहे, सर्वात धाकट्या अरुणमौलीच्या जडणघडणीत तिचा फार मोठा वाटा आहे. ही बहीण खरी, पण आपण शिवबाने राज्यकारभार कसा करावा त्याचे धडे जिजाऊंकडून घेतले म्हणतो तशी ही किंगमेकर आहे. सद्य चक्रवर्ती सुंदरराज चोल हे या तिघांचे वडील.
पोन्नी हे कावेरी नदीचं लाडाचं नाव. त्याचा अर्थ सुवर्णकुमारी असा आहे. कावेरीच्या खोर्यातली पुळण सोनेरी दिसते म्हणून वाच्यार्थाने आणि अतिशय सुपीक म्हणून लाक्ष्यार्थानेही मिळालेलं. राजराजा हा या कावेरीचा लाडका पुत्र म्हणून 'पोन्नियिन सेल्वन'.
पंड्यांच्या राजाचा पराभव आणि शिरच्छेद आदित्याने केल्यामुळे पंड्या सरदार सूडाने पेटलेले आहेत. त्यांच्या गुप्तहेरांनी चोळ साम्राज्य पोखरायला सुरुवात केलेली आहे. चोळांचा नायनाट करून त्यांना पंड्याच्या अल्पवयीन मुलाला गादीवर बसवायचं आहे. दक्षिणेला श्रीलंकेच्या राजाचा अरुणमौलीने पराभव केल्यामुळे तेही चवताळलेले आहेत. तशातच चोळांच्या एका अंतर्गत कलहालाही हळूहळू उकळी फुटते आहे. सुंदरराज चोलाकडे राज्याची धुरा आली ती त्याचे थोरले काका गंधरादित्य लढाईत मारले गेले तेव्हा त्यांचा मुलगा मधुरांतक लहान असल्यामुळे. पण आता तो मोठा झाला आहे, आणि त्याला त्याचं राज्य परत हवं आहे. त्याचा बाहुलं म्हणून वापर करून राज्यावर कबजा करता येईल अशी स्वप्नं बाळगून असलेले आणि त्यासाठी त्याला पाठिंबा देणारे काही सरदारही आहेत.
इथे या कादंबरीतलं - आणि चित्रपटातलंही - काल्पनिक, पण सर्वात महत्त्वाचं पात्र 'नंदिनी' आपला डाव मांडतं. नंदिनीचं वर्णन 'साक्षात सर्पिणी' असं केलं गेलं आहे. ती महत्त्वाकांक्षी तर आहेच, पण तिच्या ध्येयप्राप्तीच्या आड कुठलाही विधिनिषेध येत नाही. वयात येत असताना तिचं असामान्य सौंदर्य पाहून आदित्य तिच्या प्रेमात पडला होता, पण तिच्या कुलशीलाचा ठावठिकाणा नसल्यामुळे राजघराण्यात तिचा समावेश अशक्य होता. त्या घटनेमुळे नंदिनीच्या महत्त्वाकांक्षेला खीळ बसली नाहीच, उलट आता त्याला सूडाग्नीची जोड मिळाली आहे.
यापुढचा तपशील मी अर्थातच सांगणार नाही.
ही पाच खंडांत लिहिली गेलेली कथा दोन चित्रपट मिळून सहा तासांत दाखवण्याचं शिवधनुष्य मणिरत्नमने पेललं आहे. अश्या वाक्यांत सहसा 'लीलया' हे विशेषण येतं. मी ते मुद्दाम वापरलेलं नाही. कारण या प्रयत्नात त्याची धावपळ झालेली जाणवते. विशेषत: या दुसर्या भागात. पहिल्या भागाने काहीश्या विलंबित लयीत रागाची ओळख करून दिली होती. हा भाग द्रुतलयीत एकाहून एक इन्टेन्स प्रसंगांची अशी आतषबाजी सुरू करतो की जीव दडपतो! त्यात निसर्गाचे रौद्रभीषण आविष्कार आहेत, राजकीय डावपेच आहेत, विश्वासघात, कटकारस्थानं आणि त्यांना हिकमतीने दिलेली मात आहे, थक्क करणारे गौप्यस्फोट आहेत, नेत्रदीपक लढाया आहेत...
आणि या सगळ्याला पुरुन उरणारे प्रेमिकांतले, भावाबहिणींतले, मित्रामित्रांतले अतिशय हळुवार आणि हृद्य क्षणही आहेत. असे क्षण मोजक्या ब्रशस्ट्रोक्समधून नेमकेपणाने पोर्ट्रे करणं यात मणिरत्नमचा हातखंडा आहे. हा शेवटी ह्यूमन ड्रामा आहे याचा विसर तो पडू देत नाही.
चित्रपट संपल्यावर बाहेर येताना लढाया आणि आतषबाजी आठवत नाही, या क्षणांचा अंतःप्रवाहच उचंबळून येतो!
आणि हृदयात रुंजी घालत राहातं ते रहमानचं संगीत.
सर्व कलाकारांनी आपापल्या भूमिका अक्षरशः जीव ओतून केल्या आहेत. राजबिंडा अरुणमौली, मिश्किल/चार्मिंग/फ्लर्टी वंद्यदेव, संस्कृत नाटकांतल्या सूत्रधार-कम-विदुषकासारखा आलवारकडियान, सगळे सरदार, मानकरी, वानदी/कुंदवै/पुंगुळली/सेंबियन महादेवी - सगळी पात्रं या कलाकारांनी प्राण फुंकून जिवंत केली आहेत. पण नंदिनी झालेली ऐश्वर्या आणि आदित्यच्या भूमिकेतल्या विक्रमचा खास उल्लेख करणं मला इथे अपरिहार्य आहे. त्यांचे रोल भावखाऊ आहेत हे खरंच, पण ते तितक्याच ताकदीने पेलले गेले नसते तर चित्रपट फसला असता! दोघांनी कमाल केली आहे!
चित्रटाची भव्यता, सेट्स, लोकेशन्स, कॅमेरावर्क, नेमक्या प्रसंगांत जवळून वा दुरून चित्रण, कपडेपट, रंगसंगती - यांत बोलण्याइतका माझा अधिकार नाही, तेव्हा सामान्य प्रेक्षक म्हणून ते भारी वाटतं आणि अर्थातच चित्रपटाच्या परिणामकारकतेत मोलाची भर पडत जाते इतकंच म्हणू शकते.
रहमानच्या संगीताचा मी उल्लेख केला का? गाणी बहुतांशी गायली न जाता पार्श्वसंगीत म्हणूनच वाजतात, तीही अपूर्ण, आणि तरीही नेमका परिणाम साधतात. पार्श्वसंगीत हे यातलं एक महत्त्वाचं पात्रच आहे म्हटलं तर ती अतिशयोक्ती होणार नाही.
काही बाबी (बहुधा पुस्तकं वाचलेली असल्यामुळे) मला खटकल्या. स्वतंत्र कलाकृती म्हणून पाहणार्यांना कदाचित जाणवणारही नाहीत.
दुसर्या भागात नंदिनी आणि काही प्रमाणात कुंदवै वगळता यातल्या स्त्री पात्रांकडे अक्षम्य दुर्लक्ष झालं आहे. पुस्तकांचं माझ्यासाठी एक मोठं अपील त्यातली अतिशय स्ट्राँग स्त्रीपात्रं हे होतं. इथे बहुधा काटछाटीत त्या शोभेच्या वस्तू होऊन उरल्या आहेत. नंदिनीचे विषारी आणि विखारी डावपेच चित्रपटात बरेच डायल्यूट केले आहेत. खुद्द पोन्नियिन सेल्वनही 'शूर? चेक! मुत्सद्दी? चेक! निष्ठावंत मित्र? चेक! उदार? चेक! कलाप्रेमी? चेक!' अश्या प्रकारची एक 'चेकलिस्ट' होऊन राहिला असं वाटत राहातं.
पाच दिवस अटीतटीने खेळल्या गेलेल्या टेस्ट क्रिकेटमधल्या सामन्याची क्षणचित्रं अर्ध्या तासात बघावीत तसं होतं. डोळे दिपतात, पण रुचे-पचेतो हातातली वाळू निसटून जाते. दोनाऐवजी तीन सिनेमांत गोष्ट विभागली असती तर बरं झालं असतं का? की मग चार हवे होते असंही वाटलं असतं, कोणी सांगावं!
अर्थात पडद्यावर ही प्रतिसृष्टी निर्माण केल्याबद्दल आणि त्यात ते हळवे क्षण गुंफल्याबद्दल मणिरत्नमला असे शंभर अपराध माफ आहेत!
म्हणूनच तर मी ती आधी काढलेली शनिवारची तिकिटं कॅन्सल केली नाहीत.
मी ऑडीबलवर ऐकली.
मी ऑडीबलवर ऐकली. स्टोरीटेलवरही आहेत मला वाटतं.
ओके बघते
ओके बघते
काय नाव आहे पुस्तकाचं?
काय नाव आहे पुस्तकाचं?
दोन्ही चित्रपट नुकतेच बघितले.
दोन्ही चित्रपट नुकतेच बघितले. आवाका खूप आहे पण चांगले घेतले आहेत. दुसरा जास्त आवडला. कार्थी आणि कुंदवेई विशेष आवडले. त्यांना एकत्र जरा जास्त स्क्रीन टाईम हवा होता असं वाटलं. ऐश्वर्या नाही आवडली. दिसायलाही जरा विचित्र दिसते, आधी सुंदर दिसायची पण या चित्रपटात अजिबातच सुंदर नाही वाटली (हे वाचून अनेकांना धक्का बसेल याची जाणीव आहे :)) नंदिनीच्या रूपामुळे कुंदवेई तिच्यावर जळत असते असा एक उल्लेख आहे चित्रपटामधे पण जेव्हा दोघी समोरासमोर येतात तेव्हा कुंदवेईच मला जास्त देखणी आणि राजबिंडी वाटली. रुआ रुआ (तमिळमधले अग नाग) गाणं खूप आवडलं..संपूर्ण असायला हवं होतं चित्रपटामधे.
रुआ रुआ (तमिळमधले अग नग) गाणं
रुआ रुआ (तमिळमधले अग नग) गाणं खूप आवडलं
>>> दोन्ही वर्जन्स फेव्हरीट आहेत माझी व लेकीची. लिरीक्स, पिक्चरायझेशन, म्युझिक, कार्ती व त्रिशाची केमिस्ट्री सगळंच गोड आहे. शक्तिश्री व शिल्पा राव दोघींनीही छान गायलंय.
Pages