एका भावानुवादाची गोष्ट

Submitted by स्वाती_आंबोळे on 25 April, 2023 - 12:24

गतवर्षी सप्टेंबरात तामिळ लेखक कल्की कृष्णमूर्ती यांच्या दीर्घकादंबरीवर आधारित त्याच नावाचा 'पोन्नियिन सेल्वन' (भाग पहिला) चित्रपट प्रदर्शित झाला.

मणिरत्नमचे चित्रपट आणि रहमानचं संगीत आवडून घेणं हा आमच्याकडचा कुळाचार आहे. हे दोघे एकत्र म्हणजेतर मणिकांचनरहमान योग! अर्थातच आम्ही मनोभावे सेवेत रुजू झालो. चित्रपटाची थिएटरमध्ये आणि मग घरी प्राइमवर पारायणं करणं, शक्य तिथे - शक्य तेव्हा - शक्य तितक्या मोठ्या आवाजात त्याची गाणी ऐकणं, मूळ कादंबरी (इंग्रजी अनुवाद) शोधून वाचणं, कुठल्याही चर्चेत सहज निघाल्यासारखा हा विषय काढणं, इष्टमित्रपरिवारातील शक्य तितक्या व्यक्तींना त्याची दीक्षा द्यायचा प्रयत्न करणं, प्रत्येक व्यक्तिरेखेचा, प्रसंगाचा, सुरावटीचा कीस काढणं इत्यादी षोडशोपचार यथासांग पार पाडले.

रहमानच्या गाण्यांत डावंउजवं करणं मुश्किलच नाही, तर नामुम्किन असतं. तरीही त्यातल्या पुंगुळली या नाविककन्येच्या तोंडी असलेल्या Alaikadal (तामिळ उच्चाराबद्दल साशंक असल्यामुळे अल्बममधलं गाण्याचं 'नाव' लिहिलं आहे) गाण्याने माझ्यावर अक्षरशः चेटुक केलं! 'पुनिपुनि कितनी सुनी सुनाई | इय की प्यास बुझत ना बुझाई ||' असा प्रकार झाला!

अशातच कधीतरी त्याचा हिंदी अवतार कानाला किती खडबडीत लागतो अशी तक्रार मी माझ्या मुलाकडे करत होते, तेव्हा त्याने 'समजा तुला मराठीत या गीताचे शब्द लिहायला सांगितले तर कसे लिहिशील ते दाखव बघू' असं आव्हान मला दिलं. मग मीही त्याला अट घातली, की जर मी शब्द लिहून दाखवले, तर त्याने ते त्याच्या आवाजात ध्वनिमुद्रित करून मला मिरवायची संधी द्यायची.

तर या द्वंद्वाचा परिपाक तुमच्यासमोर ठेवत आहे.
कसा वाटला जरूर सांगा.

हे मूळ तमिळ गाणं.
हे आदित्यने गायलेले त्या चालीवरचे माझे शब्द.

आणि हे ते शब्द :

भिरभिर वारा दरियात शहारा (येलो येलेलो)
मनभर पाऱ्यात तुझाच पुकारा (येलो येलेलो)
वादळ व्याकुळ देही होते हुरहुर जागी
सावळ पाहुन मेघ चंद्राचा अनुरागी
उलगडते नभ मोरपिसारा (येलो येलेलो)
दूर किती बघ दूर किनारा (येलो येलेलो)

गुणगुणगुण तनभर धुन लहर लहर झाली
कळ उमलुन आली फिरुन चढे गाली नवतीची लाली
देशील का सांग हातात हात
विजा पांघरू जागवू चांदरात
का छळ माझा असा
जिव जळतो बघ पळपळ तिळतिळ काहुर हे अंतरात

श्वासांत भासांत एकच नांव
तुझी सावली हाच एकच गाव
शोधीन लाटांत घालुन नाव
जावो उभा जन्म सागरात
कडकड बिजली सळसळ वारा
पाऊस वेडा कोसळणारा
येईन सोसून साऱ्या झळा

टिपा:
१. चित्रपट पाहिला नसाल तर नक्की पाहा. दुसरा - आणि शेवटचा - भाग येत्या शुक्रवारी प्रदर्शित होतो आहे, तेव्हा त्वरा करा!
२. दुसर्‍या भागासाठी हिंदी गाणी गुलझारने लिहिली आहेत. गुलझारचं काव्य हादेखील लेखात उल्लेख केलेल्या कुळाचाराचा भाग आहे, तेव्हा त्याबद्द्ल अधिक सांगणे न लगे.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काव्य व गायन दोन्ही अप्रतिम झाले आहे. आवाज फार गोड आहे व मुख्यत्वे त्याने गाण्यातील करुण भाव व जागा फार व्यवस्थित पकडल्या आहेत. सुरेश वाडकरांच्या सांज ढले गगन तले ची आठव ण येते. हे रेकॉर्डिंग रहमान साहेबा परेन्त नक्की पोहोचवा.

पीएस वन मला पण आवडलेला. दोन जमेल तसे बघणार. मूळ तमिळ वाचता येत नाही ह्याची खंत वाटते त्याची भाषा फार सुरेख आहे म्हणे. चि. आदित्य ह्यांना मायबोलीचे जंगकुक ही पदवी प्रदान करण्यात येत आहे.

अजून टाका असे प्रॉजेक्ट.

मूळ तमिळ वाचता येत नाही ह्याची खंत वाटते त्याची भाषा फार सुरेख आहे म्हणे >> +१

त्या तमिळ पुस्तकात कावेरी नदीबद्दल एक खूप सुंदर कविता आहे. पवित्रा श्रीनिवासन यांनी केलेल्या पुस्तकाच्या इंग्रजी अनुवादात ती कविता मात्र मूळ तमिळमध्ये तशीच ठेवली आहे. अतिशय सुंदर, नादमधुर वाटते ऐकायला, जरी अर्थ कळला नाही तरी. स्वाती आंबोळे, तुम्ही त्या कवितेचा मराठी भावानुवाद केलात तर फार आवडेल.

या चित्रपटातील devraalan aattam गाण्यात चक चक असे जे शब्द आहेत, आणि जे नृत्य आहे ते बाली मध्ये जे केचक नृत्य असते त्याच्याशी साधर्म्य असणारे वाटले. थोडा शोध घेता ps1 मध्ये काही वानर clan असतो असे आढळले. केचक नृत्य हे सीतेच्या शोधार्थ निघालेल्या वानर सेनेचे असते. त्यामुळे इथला आणि तिथला संबंध निघाला तर ते रंजक ठरेल Happy

अगदी बरोबर. रहमानने एका मुलाखतीत हे सांगितलं आहे की ते केचकवरूनच प्रेरित आहे. (मूळ कथेतलं गीत आणि नृत्य मात्र तसं नाहीये)

केवळ अप्रतिम! माय व लेकाला हॅट्स ऑफ! तालमीविना इतका गोड आवाज गेल्या अनेक वर्षात ऐकलाच नाही.

मूळ गाणं / चित्रपट/ कथा अजिबात माहित नाहीये. पण तुमचे गीत स्वतंत्र लेखन म्हणूनही छान आहे.
आदित्यचे खास कौतुक! गाण्याचे शिक्षण न घेताही इतके सुश्राव्य गायला आहे.
माय-लेकानी एकत्र मिळून केलेला हा प्रकल्प फार आवडला.

किती सुंदर आहे हे! फारच तरल !
मुला सोबत असा काही प्रयोग करणे हेही किती छान!
आणि... जनरल त्या प्रसंगाचा/गाण्याचा भाव चित्रित करायचा प्रयत्न करतानाच त्याचा ध्वनी-स्वभाव (फोनेटिक एलिमेन्ट) जपायचा प्रयत्न केला आहे, ओळीगणिक भाषांतर नाही. ही कंसेप्ट ही नवीन वाटली मला...!
म्हणजे तसे माहिती होते..पण असे अनुभवले नव्हते!
फार छान, सुखद अनुभूती!
Happy लाटांवर सोपवून दिलेल्या नावेसारखेच शब्द आणि सूर हेलकावे घेतात. .... ही अनुभवायचीच गोष्ट आहे.

पी एस वन चे आर्ट डिरेक्षन खूप मस्त आहे. जुन्या काळातले कलाकार नाटके परफेक्ट ऐश्वर्या राय तर काही प्रश्नच नाही पण त्रिशा फार सुरेख दिसते त्या केश कलाप व साड्यां मध्ये. आज बघते परत एकदा गाणी फॉरवर्ड केलेली होती.

स्पॉटिफाय वर एफ सी पॉपकॉर्न असा एक पॉड कास्ट आहे त्यावर आज एक भाग आलेला आहे. पी एस : बुक का फिल्म?

चांगले डिस्कशन व माहिती आहे. इच्छुकांनी जरुर ऐका.

ही कथा सिनेमात रुपांतर करायचे एम जी आर काळा पासुन चालूहोते जयललिता व रजनी कांत ह्यांना पण काम करायचे होते.

मी जे ऐकलं त्यानुसार या चित्रपटातलं तामिळ बरंच आर्केइक आहे, आणि अनेक तामिळभाषकांनाही सबटायटल्सचाच आधार घ्यावा लागतो.

अमा,
हो हो, वेषभूषा/केशभूषा फार सुंदर आहेत - आणि अर्थपूर्णही आहेत असं ऐकलं. म्हणजे उदा. आंडाल स्त्रियांचे साइड बन्स आणि शैव स्त्रियांचे टॉप बन्स इत्यादी त्या प्रथांशी सुसंगत आहेत. यूट्यूबवर कापडचोपड कसं निवडलं त्याचीही माहिती होती ती छान होती, लिंक शोधून देते.
पॉडकास्ट ऐकते, धन्यवाद. Happy
मनिरत्नमचा हा ड्रीम प्रोजेक्ट होता आणि कधीकाळी नंदिनीच्या रोलसाठी रेखाला घ्यायचं त्याच्या मनात होतं असंही ऐकलं. काय मजा केली असती रेखाने!

मनमोहन, PS2ची गाणी आणि अ‍ॅन्थम आलंय, तेही ऐका.

ह.पा., नक्की प्रयत्न करेन.
पुस्तकात कथेच्या ओघात बरीच काव्यं (पासुरम, पदिगम इ. प्रकार) येतात, आणि सगळेच कानाला अतिशय गोड लागतात. Happy

सर्व अभिप्रायदात्यांचे खूप खूप आभार! Happy

Rekha would have been perfect. I just adore her. Even bought a poster of her in a blue saree from hongkong lane way back. And she is a Tam. As opposed to Tulu princess.

व्वा! मरठी भावानुवादतिल शब्द अगदी सुन्दर बसले आहेत आदित्य ने गायलेल्य सुरात. मला तर फार भवुन गेले हे गाणे. खास करुन मरठी शब्द या लयीत ऐकताना फारच छान वाटले. अजुनही असे प्रयोग ऐकायला नक्की आवडतील.

रहमानने एका मुलाखतीत हे सांगितलं आहे की ते केचकवरूनच प्रेरित आहे. (मूळ कथेतलं गीत आणि नृत्य मात्र तसं नाहीये):
या माहिती बद्दल धन्यवाद ह पा Happy

आता हे आदित्य ने गायलेलं गाणं दिसत नाहीये का? का?
ह. पांच्या प्रतिसादात वाचल्यावर मला एकदम पी एस 1 ची आठवण झाली.
आणि असे वाटले..की स्वातीने किती सुंदर लिहिलं आहे या पोंनियन सेलवन वर!
ते अधूनमधून वाचायला पाहिजे...शास्त्र असतं ते.
स्वतः ला रिफ्रेश करायचं...!!
Happy

Pages