शोधायला गेले एक, अन.....

Submitted by कुमार१ on 4 February, 2022 - 00:39

अनेक मानवी आजारांचा मुकाबला आपण औषधांच्या मदतीने करतो. आजच्या घडीला आधुनिक वैद्यकात हजारो औषधे वापरली जातात. एखाद्या आजारावर गुणकारी औषध शोधणे हे खूप कष्टाचे काम असते. त्यासाठी संशोधकांना जिवाचे रान करावे लागते; प्रसंगी तहानभूक विसरून अशा कामात झोकून द्यावे लागते. मात्र काही मोजक्या औषधांचे शोध ह्या अनुभवापासून काहीसे वेगळे पडतात. त्यापैकी काहींच्या बाबतीत त्यांचे शोध ध्यानीमनी नसताना किंवा अगदी योगायोगाने लागून गेलेत. अन्य काहींच्या बाबतीत शोधाची कथा अजून वेगळी आणि विस्मयकारक आहे. एखाद्या विशिष्ट आजारावर गुणकारी औषधाचा शोध चालू असायचा. त्यासाठी अभ्यास करून एखादे रसायन शोधले जायचे. पण प्रत्यक्षात जेव्हा त्याचे रुग्णावर प्रयोग सुरू व्हायचे, तेव्हा त्या औषधाचा भलताच व अनपेक्षित गुणधर्म दिसून यायचा. मग मूळ आजार राहिला बाजूलाच आणि ते औषध एका नव्याच आरोग्य समस्येसाठी प्रस्थापित होऊन बसले. औषधांच्या इतिहासात डोकावता अशा सुमारे डझनभर औषधांची शोधकथा रंजक आहे. त्यातील काहींचा आढावा या लेखात घेतो. त्यापैकी काही औषधे 19 आणि 20 व्या शतकापर्यंत वापरात होती. परंतु पुढे त्यांना अधिक सक्षम पर्याय उपलब्ध झाल्याने ती आज वापरात नाहीत. तर अन्य काही औषधे आजही वापरली जातात.

या लेखात खालील औषधांची शोधकथा पाहू :
• पोटॅशियम ब्रोमाइड
• लिथियम
पेनिसिलिन
• मेप्रोबामेट
• डायझेपाम (काम्पोज)
• सिल्डेनाफिल (वायाग्रा)

१. पोटॅशियम ब्रोमाइड
एकोणिसाव्या शतकात प्रौढांमधील फीट्स येण्याच्या विकारावरील (अपस्मार) औषधाचे शोध जोमाने सुरू होते. फीट्स येण्याची नक्की कारणेही अस्पष्ट होती. तत्कालीन बहुतेक डॉक्टरांनी एक मजेशीर गृहीतक मांडले होते ते म्हणजे, अतिरिक्त हस्तमैथुन आणि फीट्स येणे यांचा घनिष्ठ संबंध असतो ! लैंगिक उर्मी कमी करण्यासाठी ब्रोमाइडचा वापर प्रचलित होता. म्हणून Charles Lockock यांनी अपस्माराचे रुग्णांना हे औषध द्यायला सुरुवात केली. त्याच्या प्रभावामुळे फीट्सचे प्रमाण कमी झाले. त्याचबरोबर या औषधाने रुग्णास गुंगी येते हेही लक्षात आले. मग त्यातून पुढे या औषधाचा चिंताशामक म्हणून वापर सुरू झाला. पुढे बरीच वर्ष तो सुरू होता. परंतु या औषधाची मर्यादित परिणामकारकता आणि दुष्परिणाम यांचा विचार करता त्याहून अधिक योग्य औषधांचा शोध लवकरच लागला. परिणामी हे औषध कालबाह्य झाले.

२. लिथियम
मुळात या धातूचा शोध १८१७मध्ये लागला. नंतर १८६०च्या दरम्यान लिथियम कार्बोनेटचे प्रयोगशाळेत विविध प्रयोग करत असताना असे लक्षात आले की, त्याच्या प्रभावामुळे यूरिक ॲसिडचे खडे विरघळतात. या ऍसिडच्या अधिक्याने होणारा गाऊट हा प्राचीन आजार माहित होताच. मग या रुग्णांसाठी त्यांचा वापर सुरू झाला. दरम्यान विविध मनोविकारांच्या उपचारांचा अभ्यास चालू होता. त्यातून एक गृहीतक असे मांडले गेले की यूरिक ॲसिडचे अधिक्याने मेंदूवर परिणाम होतो आणि त्यातूनच मनोविकार निर्माण होतात.
मग १९४०मध्ये लिथियमचे काही मनोविकारांसाठी (mania) प्रयोग केले गेले. परंतु लिथियमचे शरीरात दुष्परिणामही बर्यापैकी असतात. ते समजण्यासाठी रक्तातील लिथियमची पातळी समजणे आवश्यक होते. 1960 च्या दरम्यान लिथियमची पातळी मोजण्याचे तंत्रज्ञान उपलब्ध झाले. त्यानुसार लिथियमचा शरीरासाठी सुरक्षित डोस ठरवता आला. तेव्हापासून ‘बायपोलर’ या मनोविकारांसाठी लिथियम हे औषध प्रस्थापित झाले. आजही त्याचा काही प्रमाणात वापर होतो. अशातऱ्हेने गाऊटच्या सांधेदुखीसाठी योजलेले औषध शेवटी विशिष्ट मानसोपचारांच्या यादीत जाऊन बसले.

३. ‘पेनिसिलिन’
जिवाणूनाशक औषधांचा शोध घेण्याचे काम अगदी प्राचीन काळापासून चालू होते. असे संशोधन प्रयोग सूक्ष्मजीवशास्त्राच्या प्रयोगशाळांत होत असत. त्यासाठी निरनिराळे सूक्ष्मजीव culture च्या रुपात वाढवावे लागत. बऱ्याचदा अशी cultures डिशमध्ये पडून राहिली की त्यावर बुरशीचा थर चढे. त्यातून एक गंमत होई. एकदा का अशी बुरशी चढली की त्यानंतर तिथली जीवाणूंची वाढ बंद होई. हे काहीसे आश्चर्यकारक वाटे. सन १८७१मध्ये Joseph Lister यांनाही असा एक अनुभव आला. ते रुग्णांच्या लघवीच्या नमुन्यांचे निरीक्षण करीत होते. टेबलावर बराच काळ पडून राहिलेल्या नमुन्यांत बुरशी चढू लागे आणि मग त्यांच्यात पुढे जीवाणूंची वाढ होत नसे. त्यातून प्रेरित होऊन त्यांनी या बुरशीचा (mold) अभ्यास सुरु केला. त्यातील एका प्रकाराला त्यांनी Penicillium असे नाव दिले. ‘Penicillus’ चा शब्दशः अर्थ ‘रंगकामाचा ब्रश’ असा आहे. त्याच्या दिसण्यावरून तसे नाव पडले. मग त्याचे प्रयोग काही सुट्या मानवी पेशींवर केले गेले. त्याकाळी घोडे हे वाहतुकीचे एक महत्वाचे साधन होते. त्या घोड्यांना बऱ्याच जखमा होत. त्यावर बुरशी चोपडणे हा एक घरगुती उपचार तेव्हा रूढ होता. पुढे लुई पाश्चर आणि अन्य बऱ्याच संशोधकांनी असे प्रयोग करून Penicillium ला जंतुनाशक गुणधर्म असल्याचे मत मांडले. इथपर्यंतचे संशोधन हे डॉ. फ्लेमिंग यांच्यासाठी पायाभूत व मार्गदर्शक ठरले.
डॉ. फ्लेमिंग हे १९२०च्या दशकात लंडनमधील एका रुग्णालयात सूक्ष्मजीव विभागात काम करीत होते. त्यांच्या टेबलावर जीवाणू culture केलेल्या डिशेस कायम पडलेल्या असत. एकदा ते सुटी घेऊन स्कॉटलंडला गेले होते. तिथून परतल्यावर ते कामावर रुजू झाले. त्यांचे सगळे टेबल पसाऱ्याने भरले होते. मग त्यांनी एक डिश कामासाठी उचलली. त्यात त्यांनी Staphylococcus हे जंतू वाढवलेले होते. आता ते बघतात तर त्या डिशमध्ये बऱ्यापैकी बुरशी लागली होती. त्यांना त्याचे कुतूहल वाटले. मग त्यांनी त्या डिशचे सूक्ष्मदर्शकाखाली बारकाईने निरीक्षण केले. हाच तो “युरेका’’ चा क्षण होता ! त्यांना असे दिसले की डिशच्या ज्या भागात बुरशी होती त्याच्या भोवताली जंतू बिलकूल दिसत नव्हते. अन्यत्र मात्र ते झुंडीने होते. याचा अर्थ स्पष्ट होता. त्या बुराशीतून जे काही बाहेर पडत होते त्यामुळे त्याच्या बाजूचे जंतू मरत होते. मग फ्लेमिंगनी या कामाचा ध्यास घेतला. त्यांनी त्या बुरशीस वेगळे काढून तिचे culture केले आणि त्यातून तो रासायनिक पदार्थ वेगळा केला. मग या पदार्थाचे नामकरण त्याच्या जननीस अनुसरून ‘पेनिसिलिन’ असे झाले.

४ व ५. मेप्रोबामेट व डायझेपाम
जिवाणूनाशक म्हणून पेनिसिलीनचा वापर सुरू झाल्यानंतर लक्षात आले की ते औषध काही ठराविक प्रकारच्याच जिवाणूंचा नाश करते. मग अन्य प्रकारच्या जीवाणू संसर्गासाठी वेगळ्या औषधांचा शोध सुरू झाला. त्यावेळेस असा गुणधर्म असणारे phenoxetol हे एकच रसायन विचाराधीन होते. मग त्याचा कसून अभ्यास सुरू झाला. त्याची पहिली पायरी म्हणजे प्राण्यांवर प्रयोग. त्यातून एक आश्चर्यकारक निरीक्षण समोर आले. या औषधाच्या प्रभावाने प्राण्यांना गुंगी आल्यासारखे होई आणि त्यांचे ताणलेले स्नायू शिथील (relaxed) पडत. 1950 मध्ये या औषधाचे पृथक्करण करून त्यापासून एक सुधारित असे मेप्रोबामेट औषध बनवले गेले. पुढे मानवी प्रयोगांती असे सिद्ध झाले की हे औषध ताणतणाव कमी करते आणि स्नायूंनाही आराम देते. या संशोधनावरून लक्षात येईल की इथे तर अगदी ‘शोधायला गेले एक’ हा प्रकार झालाय. वेगळ्या प्रकारच्या जिवाणूनाशकाच्या शोधाच्या प्रयत्नात चक्क एक तणावमुक्तीचे औषध सापडून गेले !

नंतर या औषधाच्या सुधारित स्वरूपासाठी प्रयत्न चालू झाले. त्यात एका संशोधकाला थोडे यश आले. त्याने ते औषध तात्पुरता शोध म्हणून प्रयोगशाळेच्या फडताळात ठेवून दिले. दरम्यान त्याचे अन्य काही प्रकल्प चालू असल्याने तो याबद्दल विसरून गेला. पुढे 1957 मध्ये त्या प्रयोगशाळेची साफसफाई चालू असताना अचानक ते बाजूला ठेवून दिलेले औषध सापडले. आता त्याच्यावर अधिक काम करून त्यापासून डायझेपाम हे औषध विकसित झाले. 1960-70च्या दशकात हे औषध तुफान लोकप्रिय झाले आणि संबंधित औषध उद्योगाला त्यातून अभूतपूर्व नफा झाला. आजही हे औषध वापरात आहे. सर्वसामान्य जनतेमध्ये ‘काम्पोज’ या व्यापारी या नावाने परिचित असलेले हेच ते औषध.

६• सिल्डेनाफिल (वायाग्रा)
या औषधाची कथा ही तर या लेखाचा कळसाध्याय शोभावी अशी आहे. या रसायनाचा शोध 1989मध्ये लागला. त्याच्या प्राण्यांवरील प्रयोगादरम्यान लक्षात आले की, त्याच्या प्रभावाने रक्तवाहिन्या रुंदावतात (dilate). या निरीक्षणावरून फायझर औषधउद्योगाने हे औषध करोनरी हृदयविकार आणि उच्चरक्तदाब यांच्या उपचारासाठी विकसित करण्याचे ठरवले. त्यानुसार रुग्णप्रयोग सुरू झाले. त्यात असे लक्षात आले की ज्या आजारांसाठी ही चाचणी चालू आहे त्याचे निष्कर्ष असमाधानकारक आहेत. पण त्याचबरोबर या रुग्णांमध्ये एक अजब प्रकार आढळला. असे पुरुष रुग्ण जेव्हा संशोधन कक्षात तपासणीसाठी येत, तेव्हा ते पलंगावर पडताक्षणी पटकन पोटावर झोपणे पसंत करीत ! ही गोष्ट एका चाणाक्ष परिचारिकेच्या लक्षात आली. मग तिने या रुग्णांची बारकाईने चौकशी केली तेव्हा त्याचे कारण उमगले. या रुग्णांना चांगल्यापैकी लिंग ताठरता येत होती आणि ती बराच काळ टिकत असे. त्यामुळे लज्जित होऊन ते पटकन पोटावर झोपत असत.

या मुद्द्यावर अधिक अभ्यास करता हे समजले की, या औषधामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यांऐवजी पुरुष लिंगाच्या रक्तवाहिन्याच चांगल्यापैकी रुंदावत आहेत. परिणामी मूळ संशोधनाची दिशा पूर्णपणे बदलण्यात आली. ज्या पुरुषांना संभोगसमयी लिंग ताठरतेची दुर्बलता येते त्यांच्यावर याचे नव्याने प्रयोग सुरू झाले. त्या प्रयोगांना यश येऊन 1996 पर्यंत हे औषध पुरुषांच्या लैंगिक दुर्बलतेवरील ( Erectile Dysfunction) एक उपाय म्हणून प्रस्थापित झाले.
....
सन 1857 ते 1996 या दीर्घ कालखंडात आधुनिक वैद्यकात योगायोगाने शोधल्या गेलेल्या काही औषधांच्या कथा आपण पाहिल्या. विज्ञानामध्ये अशा प्रकारच्या शोधाला “serendipity” हे वैशिष्ट्यपूर्ण नाव आहे. या शब्दाची व्युत्पत्ती मोठी रंजक आहे.
‘serendip’ याचा अरबी भाषेतील अर्थ म्हणजे श्रीलंका(सिंहलद्वीप) ! पर्शियन भाषेत एक परीकथा आहे. सेरेंदीपचे तीन राजपुत्र सतत भ्रमण करीत असत. त्यांचे भ्रमण हे कुठल्याही विशिष्ट हेतूने नसायचे. परंतु त्या दरम्यान त्यांना विविध गोष्टींचे शोध निव्वळ योगायोगाने लागत. त्यामध्ये त्यांच्या कष्टापेक्षा चातुर्याचा भाग अधिक असे. या कथेतून आलेला तो शब्द पुढे भाषेत रूढ झाला.

अनेक प्रकारचे वैज्ञानिक शोध आणि नव्या उत्पादनांच्या कल्पना याप्रकारे उगम पावतात. त्याचाच एक भाग म्हणजे वैद्यकातील काही औषधांचे शोध. काही निवडक औषधांच्या वर सादर केलेल्या शोधकथा वाचकांना रंजक वाटतील अशी आशा आहे.
कुठल्याही क्षेत्रातील अशा प्रकारच्या शोधांबद्दल वाचकांनी प्रतिसादांमध्ये जरूर लिहावे.
…………………………………………………………………………………………………………………

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

थोडे अवांतर
औषधांसंबंधी बातमी असल्याने इथे दुवा देतो:

अ‍ॅमेझॉनवर गर्भपाताच्या औषधांची विक्री, अन्न आणि औषध प्रशासनाकडून कारवाई
(डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय)
https://marathi.abplive.com/crime/case-against-e-commerce-portal-amazon-...

औषधे, औषधनिर्माण शास्त्र आणि आरोग्य यासंबंधीच्या काही घडामोडींचे संकलन या धाग्यावर करीत राहीन.

ही एक भारतातील बातमी :
सध्या निर्माण होणाऱ्या औषधांपैकी तब्बल 88 % औषधांमध्ये कच्चामाल म्हणून वापरले जाणारे आयसोप्रोपील अल्कोहोल हे नॉन-आयपी दर्जाचे असून ही औषधे सेवन करणाऱ्याबरोबरच निर्माण करणाऱ्या लोकांनाही धोकादायक आहेत

( संदर्भ : छापील सकाळ मुख्य अंक पान 2, ५ मे २०२२ )

28 वर्षाच्या तरुणाने स्वतःच्या मनाने वायग्राचा प्रचंड मोठा डोस घेतला आणि हा आचरटपणा चांगलाच अंगाशी आला.
त्यातून सुटका होण्यासाठी दोन शस्त्रक्रिया कराव्या लागल्या.

https://timesofindia.indiatimes.com/city/allahabad/viagra-overdose-lands...

Thalidomide या औषधाचा इतिहास रंजक आहे. 1960 मध्ये हे औषध गरोदरपणातील मळमळ कमी करण्यासाठी वापरात होते. परंतु त्याचा अत्यंत विपरीत परिणाम गर्भावर दिसून आला. अशा अनेक स्त्रियांना जन्मजात व्यंग असलेली मुले झाली. परिणामी 1961 मध्ये या औषधावर बंदी घातली गेली.

पुढे सुमारे 25 वर्षांनी या औषधाचे अन्य गुणधर्म लक्षात आले. 1998 मध्ये त्याला एक प्रकारच्या कुष्ठरोगाच्या उपचारासाठी मान्यता मिळाली.

त्याही पुढची प्रगती पुढील दशकात दिसून आली. 2012 मध्ये त्याला अस्थिमज्जेच्या कर्करोगाच्या उपचारांसाठी मान्यता मिळाली.

गरोदर स्त्रिया वगळता हे औषध वरील आजारांसाठी वापरले जाते.

अभिप्रायाबद्दल आपणा सर्वांचे आभार !
................................................
Vinblastine हे औषध सदाफुली (आणि तत्सम जाती) पासून तयार केले आहे. त्याच्या शोध व उपयुक्ततेची कथा रंजक आहे.
ही वनस्पती उकळून तयार केलेला चहा मधुमेहावर गुणकारी असतो असा समज होता. त्या दृष्टीने संशोधन सुरू झाले. जेव्हा या वनस्पतीचा अर्क उंदरांना टोचण्यात आला तेव्हा त्यांच्या रक्तातील पांढऱ्या पेशींची संख्या प्रचंड कमी झाली आणि ते उंदीर मेले.

या गुणधर्मावर अधिक अभ्यास केल्यावर हे औषध पांढऱ्या पेशींच्या संबंधित कर्करोगावर उपयुक्त असल्याचे दिसून आले. आता ते कर्करोगविरोधी औषध म्हणून प्रस्थापित झाले आहे.

एक चांगला लेख : https://www.loksatta.com/chaturang/patent-law-on-breast-cancer-medicine-...

पेटंट कायदा जागते रहो!

.....जयंती मुरलीधरन या एक सेवानिवृत्त बँक कर्मचारी होत्या. त्यांना महिन्याला २८,००० रुपये निवृत्तिवेतन मिळत होते. ‘मासिक उत्पन्न इतके असताना त्याच्या दुप्पट किमतीचे औषध मला परवडणेच शक्य नाही. माझा आणि माझ्यासारख्या अनेक कर्करोगग्रस्त स्त्रियांचा जीव वाचावा म्हणून सरकारने हे औषध स्वस्तात उपलब्ध करून देण्यासाठी पावले उचलावीत,’ असा विनंती अर्ज जयंती यांनी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयासह औषध आणि व्यापारविषयक विविध विभागांना केला. त्यावर पुढे काही विशेष घडले नाही. सरकारने या बाबतीत लक्ष घालावे आणि पेटंट कायद्यातील सोयी वापरून या औषधाच्या किमती कमी कराव्यात, असे केरळ उच्च न्यायालयाने जून २०२२ मध्ये सरकारला सांगितले. दुर्दैवाने दरम्यान जयंती यांचा कर्करोगाने बळी घेतला. हे केरळ उच्च न्यायालयाच्या निदर्शनाला येताच १६ सप्टेंबर २०२२ रोजी न्यायालयाने स्वत:हून याची दखल घेतली आणि सरकारला औषधाच्या किमती कमी करण्यास बजावले.....

Paracetamol च्या गोळ्या ऑस्ट्रेलियामध्ये सुपर मार्केटमध्येही विकण्यास ठेवलेल्या असतात. परंतु या गोळ्यांची घाऊक खरेदी करून लोक घरी साठवतात. त्यातून आत्महत्येचे प्रकार वाढतात असे लक्षात आले.

म्हणून तज्ञांच्या एका समितीने अशा विक्रीवर निर्बंध घालावेत आणि अठरा वर्षाखालील मुलांना ती सुपर मार्केटमधून घेता येऊ नयेत अशी शिफारस केली आहे. त्यावरील उलट सुलट प्रतिक्रिया:

https://amp-smh-com-au.cdn.ampproject.org/v/s/amp.smh.com.au/national/pa...

'Goodyear टायर्स' आपल्याला परिचित आहेत. ते व्यापारी नाव Alan Goodyear यांच्यावरून दिलेले आहे. त्यांनी संशोधन करून तयार केलेले विशिष्ट रबर हे serendipity चे एक उत्तम उदाहरण आहे.

इंडियन रबर कमी चिकट करण्याचे Goodyear सातत्याने प्रयत्न करीत होते पण त्यांना यश येत नव्हते. एकदा त्यांच्या हातून गंधक लावलेले रबर चुकून विस्तवात पडले आणि त्यातून त्यांना अपेक्षित दर्जाचे रबर मिळाले. हे नवे रबर करण्याच्या प्रक्रियेला त्यांनी vulcanization असे नाव दिले. Vulcan ही रोमच्या लोकांची अग्निदेवता आहे.

Vulcanised rubber च्या जन्माची माहिती खूप छान. शब्दाचा संदर्भही माहीत नव्हता. धन्यवाद कुमार जी.

Vulcanised rubber च्या जन्माची माहिती खूप छान.+१

Vulcan लोहारांची देवता किंवा श्रमिकांचा आश्रयदाताही आहे. रोम मधलीही 'साधी माणसं' व्हल्कनला 'ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे' म्हणत असतील ! Happy

Vulcan लोहारांची देवता किंवा श्रमिकांचा आश्रयदाता
>>>
वा, छान पूरक माहिती !
Goodyear भांड्यांना कल्हई करण्यात वाकबगार होते.

गोड गोड शोध !

Saccharine, cyclamate, aspartame & Sucralose हे रासायनिक पदार्थ नैसर्गिक साखरेला पर्याय म्हणून अस्तित्वात आले. त्यांचे शोधही वैज्ञानिकांना योगायोगानेच लागले आहेत. प्रत्यक्षात काही वेगळी रसायने किंवा औषधांचा शोध चालू असताना एखाद्या वैज्ञानिकाने आपले बोट चुकून चाटले आणि त्याला एकदम तीव्र गोड चव जाणवली ! त्यावर अधिक संशोधन करता एका वेगळ्याच गोड रसायनाचा शोध लागून गेला.
अशी काही रसायने आणि प्रत्यक्षात चालू असलेले संशोधन असे होते :

1. Saccharine : दगडी कोळशावरील प्रयोग.
2. Cyclamate : तापशामक औषधाचा शोध.

3. Aspartame : जठराच्या अल्सरवरील औषधाचा शोध. हा चालू असताना संबंधित वैज्ञानिकाने एक कागद उचलण्यासाठी म्हणून बोटाला थोडीशी थुंकी लावली होती.

4. Sucralose : याच्या शोधाची कथा अजूनच मजेशीर. Sucrose व chlorine या दोन रसायनांचे संयोग करण्याचे प्रयोग चालू होते. त्यातील वरिष्ठ वैज्ञानिकाने अन्य एकाला तोंडी सांगितले, की आता हे रसायन “test” करून बघ. पण संबंधित व्यक्तीच्या ऐकण्यात “taste” अशी गफलत झाली !
त्याने ते “टेस्ट” करून बघितले आणि त्याला अतिशय गोड चव जाणवली.

लेखात उल्लेख केलेल्या औषधांच्या यादीत अजून एकाची भर घालतो.
छातीच्या अंजायनासाठी नायट्रोग्लिसरीन (NTG) या औषधाची गोळी जिभेखाली ठेवतत. हा एक तातडीचा प्रथमोपचार असतो. या औषधाचा शोधही खूप रंजक आहे.

सुरुवातीस Sobrereo या वैज्ञानिकांनी त्याचा शोध लावला परंतु त्यांना त्याचा उपयोग काही माहीत नव्हता. त्यानंतरच्या काळात अनेक बांधकामाच्या मोठ्या कामांसाठी विविध स्फोटकांचे शोध घेणे सुरू होते. या कामी अल्फ्रेड नोबेल यांचा पुढाकार होता. त्यांनी या रसायनामध्ये अन्य रसायन मिसळले आणि त्यातून त्यांना एक स्फोटक मिळाले. त्याला डायनामाइट असे म्हटले गेले. त्याचा अनेक बांधकामांमध्ये वापर केला गेला. याच घटकाचे पुढे औषधे कसे बनले हेही रंजक आहे.

Sobrereo यांनी एकदा ते जिभेवर ठेवून त्याची चव घेतली होती. त्यांना ते खूप गोड लागले आणि त्यानंतर प्रचंड डोकेदुखी झाली. यावर अधिक संशोधन करून पुढील वैज्ञानिकांनी असे शोधले की हे औषध ठराविक प्रमाणात पोटातून दिले असता रक्तदाब कमी होतो आणि हृदयाच्या आणि अन्य रक्तवाहिन्या देखील प्रसरण पावतात. अशा तऱ्हेने हे औषध अंजायनावरील प्रथमोपचार म्हणून प्रस्थापित झाले

अजून एक मजेदार गोष्ट.
या औषधाचा मोठा साठा जर एखाद्या बॅगेत भरून विमानतळावर नेलेला असेल आणि तो जर तिथल्या बॉम्बशोधक यंत्रणा व कुत्री यांच्या संपर्कात आला तर स्फोटक असल्याचा सिग्नल येतो ! अशा एक दोन घटना विमानतळांवर घडल्यात.

विनापरवाना औषधं विकणं महागात, ई-फार्मसींना DCGI ची कारणे दाखवा नोटीस
https://marathi-abplive-com.cdn.ampproject.org/v/s/marathi.abplive.com/n...

DCGI ने शुक्रवारी 10 फेब्रुवारी रोजी Tata 1 MG, Amazon आणि Flipkart सह अनेक ऑनलाईन फार्मसींना नोटिसा बजावल्या आहेत.

डॅाक्टर, तुमचे लेख नेहेमीच अभ्यासपुरक आणि माहितीपूर्ण असतात.
मध्यंतरी groupमध्ये discussion चाललं होतं Tinnitus वर काही खात्रीदायक treatment आहे का? असली तर काय आहे? आणि तो कोणाला आणि का होऊ शकतो?

@ आर्च
Tinnitus
याचे अनेक प्रकार आहेत:
१. काही जणांना बंदुकीचा गोळीबार किंवा डीजे-निर्मित कर्कश्य संगीत ऐकल्यानंतर हा होऊ शकतो. परंतु तो काही तासांमध्येच आपोआप निवळतो.
२. श्रवण मार्गातील चेता-तंतूंवर काही परिणाम झाल्यामुळे श्रवणशक्तीवर देखील परिणाम होतो. त्याच्याशी हा प्रकार निगडित आहे. समाजातील सुमारे दहा ते पंधरा टक्के लोकांना हा असतो.
३. मानसिक पातळीशी निगडीत.

उपचार
विविध प्रकारच्या उपचारांनी हे लक्षण नियंत्रणात ठेवता येते; सहसा ते पूर्ण बरे होत नाही. हा विशेष तज्ञांचा प्रांत असल्याने त्यासंबंधी अगदी थोडक्यात मूलभूत माहिती देतो .

या प्रकारचे उपचार करून बघता येतात:
• विद्युत चेतावणी
• चुंबकीय चेतावणी
• श्रवणयंत्रांचा वापर
• मनशांतीचे उपाय आणि मानसोपचार / औषधे
• संवेदना कमी करण्याचे विशिष्ट उपचार

Meftal Spas
हे औषध वेदनाशामक म्हणून मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. मासिक पाळीतील पोट दुखणे आणि विविध सांधेदुखीसाठी ते वापरतात.
भारतात ते डॉक्टरांच्या चिठ्ठीविनाही सर्रास विकले आणि खरेदी केले जात आहे.

या औषधाच्या संदर्भात भारतीय औषधनिर्माण आयोगाने (IPC) सावधानतेचा इशारा दिलेला आहे. या औषधामुळे एक गंभीर स्वरूपाची allergic प्रक्रिया होऊ शकते. त्यामुळे ते डॉक्टरांच्या सल्ल्यानेच योग्य तेवढ्या कालावधीपुरतेच घेतले पाहिजे.

https://www.zeebiz.com/trending/news-government-issues-safety-warning-ag...

मासिक पाळीतील वेदना कमी करण्यासाठी काही वेळेस ठराविक गर्भनिरोधक गोळ्यांचा उपयोग केला जातो. अर्थात अशा वापराबद्दल वैज्ञानिकांमध्ये मतभेद आहेत. या वेदना कमी करण्याचा तो काही सरसकट उपाय नाही. जर वेदना असह्य होत असतील तर नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच असे काही हार्मोन्सचे उपचार करावेत.

इंग्लंडमध्ये नुकतीच या संदर्भातील एक दुर्दैवी घटना घडली. 16 वर्षाच्या मुलीने तिच्या अशा वेदनांपासून सुटका होण्यासाठी केवळ मैत्रिणींच्या सल्ल्याने अशा गोळ्या घेतल्या. जेमतेम आठवडाभर गोळ्या घेतल्यानंतर त्याचे गंभीर दुष्परिणाम होऊन तिच्या मेंदूत रक्तगुठळी झाली व त्यातच तिचा मृत्यू झाला.

या प्रकारच्या गोळ्यांमध्ये अनेक प्रकार असून त्यात २ हार्मोन्सच्या मात्रा कमीअधिक असतात. रक्तगुठळीचा दुष्परिणाम दुर्मिळ असला तरी तो कधीकधी जीवावर बेतू शकतो.
सदर बातमी अनेक ठिकाणी वाचण्यात आली. परंतु तिच्या मरणोत्तर या संबंधित काही वैद्यकीय अहवाल प्रसिद्ध झालेला सापडला नाही.

https://www.indiatoday.in/world/story/uk-girl-dies-of-blood-clot-3-weeks...

एक नामवंत लेखक# विविध क्षेत्रातील मान्यवरांना बरोबर घेऊन पुस्तके लिहितात. ते एकदा तुमच्याकडे येणार. चला आपण असे पुस्तक लिहूया.
# ओळखलंच असेल कोण ते.

Pages