
* * *
- प्रेसेंटेशन झकास आहे. किंमत किती असणार एका फ्लॅटची साधारण ?
- सात कोटी पासून सुरु
- म्हणजे फक्त श्रीमंत लोकं राहणार ना. त्यांना चालेल असे ‘किचनलेस होम’. नवरा बायको दोन्ही मोठ्या पदांवर काम करणारे, भरपूर पैसे कमावणारे. खूप आहेत असे कपल्स आपल्या बंगळुरूत. तेच घेतील तुझे फ्लॅट.
- तसं नाही, काही व्यापारी आणि संयुक्त कुटुंब असलेल्यांनाही इंटरेस्ट दाखवलाय.
- दाखवणारच ! व्यापारी म्हणजे स्थानिक नसणारच. श्रीमंतांच्या बायका नाहीतरी कामचुकार असतात. खायचे-प्यायचे-ल्यायचे-मिरवायचे-लोळायचे हेच त्यांचे काम. पैसा भरपूर असतो ना. गरजच नसते काही काम करायची.
- कित्ती प्रिजुडाईसेस तुझे गं आक्का !
- असेनात का. बोगस आयडिया आहे तुझी किचनलेस होम ची.
* * *
- पण करायचीच कशाला अशी उठाठेव. आशियाना विदाउट भटारखाना? किचनलेस होम म्हणे. जगतो आपण पोटासाठी. स्वतःला हवे तसे करून खाता येत नसेल तर काय उपयोग अशा मोठ्या राजेशाही घराचा?
- अरे मित्रा, प्रत्येक घरात नसले तरी मोट्ठे कॉमन किचन आहे ना प्रकल्पात. चोवीस तास सुसज्ज, अत्याधुनिक रुफटॉप किचन. चहा, नाश्ता, जेवण-खावण, दारू, आईस्क्रीम, पिझ्झा पास्ता, दहीबुत्ती विथ अम्मा स्टाईल मँगो पिकल ...सगळे मिळणारी जागा. नावही तसेच ठरवलेय मी. ‘फूड कामधेनू’ ! मागाल ते मिळेल या सामायिक किचनमध्ये. मग का पाहिजे प्रत्येक फ्लॅट ला वेगळे किचन ?
- शेवटी ते हॉटेल ना ? कधीतरी घरी पटकन करून खायला किचनेट तरी हवे ना ? आणि रात्रीबेरात्री कुणी आले तर ?
- सर्व विचार केलाय माझ्या टीम नी. चोवीस तास किचन आहे. स्वतः जाऊन करायचे तर करता येईल. फोनवर सांगितले तर मागाल ते घरी आणून देईल आमचा स्टाफ. रिझनेबल रेट मध्ये. चोवीस तास. हवे तेव्हढे. जब और जितना आप चाहो. और क्या चाहिये ?
- तरी घराची सर नाही यायची या सेटअपला. हॉटेल वाटेल ते, घर नाही.
* * *
- पण हवे तेव्हढे नोकर मिळतात. पैसे टाकले की स्वयंपाक करायला घरी लोकं येतात. आपल्यासमोर आपल्याला हवा तसा स्वयंपाक करून देतात. हे काय वेगळे असणार?
- असतं. किचन म्हणजे फक्त दोनवेळा स्वयंपाक असतो का? तुमच्या मावशी ग्रोसरी आणतात की तुम्ही स्वतः ? कोण सॉर्टींग-स्टोअरिंग करतं ? भाज्या आणि फळे ? रोजचा मेन्यू स्वतःच ठरवतात की तो ठरवायला ऑफिसच्या गंभीर मीटिंगमध्ये तुम्ही असतांना मधेच फोन करतात ? टूरवर असतांना आज मुलांचे-नवऱ्याचे जेवणाचे डबे तुम्हाला आठवत असतात का ? ज्यूस कोण तयार करतं ? बर्फासाठी फ्रीजमधे पाणी ट्रे कोण लावतं ? फ्रीझ ची स्वच्छता कोण करतं ? गार्बेज कोण रिकामं करतं ? त्यात किचनशी संबंधित कचरा किती असतो? पेस्ट कंट्रोल ? ते कोण बघतं ? भांडी घासणे? त्यासाठीची उस्तवार ? किचनची स्वच्छता ? मेंटेनन्स? कुकिंग रेंज, ग्रिल-मायक्रोवेव्ह, गॅस सिलेंडर, चिमनी, मिक्सर-ग्राइंडर-ज्युसर, रोटीमेकर, डोसा मेकर ….. सगळ्यांची खरेदी सफाई दुरुस्ती, ती कोण करतं ? उद्या डब्यात काय आणि संध्याकाळी काय आणि आज त्यासाठी करायची तयारी काय हे रोज कोण ठरवतं आणि करतं ?
- ऐकतेय मी. आगे बोलो
- बाईसाहेब, तुमच्या लक्षात येतंय का ? एका किचनने तुमचे सर्व जीवन व्यापून टाकले आहे. हजारो कामे तुम्हाला येऊन चिकटली आहेत. लाईक अ मॅग्नेट. आणि आता तुम्हाला ती सोडवत नाही आहेत. वन वे ट्रॅप. अभिमन्यू झालाय तुमचा. तुमच्यासारख्या अनेक स्त्रिया हा चक्रव्यूह भेदायला उत्सुक आहेत. माझा 'किचनलेस होम' प्रोजेक्ट अशा स्त्रियांसाठी वरदान आहे. विचार करा तुम्ही.
- काही पुरुष करत असतील घरची कामं. सगळेच काही ऐतखाऊ नसतील. बऱ्याच स्त्रिया बाय चॉईस होम मेकर असतील ना ?
- असं बघा मॅडम, जगाच्या पाठीवर एकूण पुरुष ३९७ कोटी तर महिला ३९० कोटी, म्हणजे साधारण ५०% प्रत्येकी. त्यातले प्रगत, समंजस, लिंगनिरपेक्ष, घरकाम करणारे किंवा त्यात मदत करणारे दोन-पाच टक्के पुरुष सोडले तरी जगभरात आजही प्रचंड मोठ्या प्रमाणात स्त्रियांचा वेळ हा चूल आणि मूल सांभाळण्यात जातो. मूल बाजूला ठेवू थोडावेळ, तरी अर्ध्या लोकसंख्येचा चुलीपाशीचा वेळ अन्यत्र अधिक चांगल्याप्रकारे गुंतवला तर एकूणच मानवजातीचे कल्याण होईल. प्रॉडक्टिव्हिटी वाढेल, नवनवे शोध लागतील, जगणे सुकर होईल.
- समज मला आवडच आहे स्वयंपाकाची तर ?
- ज्या स्त्री-पुरुषांना स्वयंपाकाची आवड आहे ते इतरांसाठी करतील, त्यांना पैसे मिळतील आणि आवडीचे काम करण्याचा आनंदही.
- पटतंय का ?
- नाही.
* * *
* * *
- अरे आय वॉन्ट टू गिव्ह यू अ हग फॉर धिस ! तू तर स्वर्ग साकारणारा देव वाटतोस मला. तो कोण होता नवी सृष्टी रचणारा ऋषी ? वसिष्ठ ?
- नाही, विश्वमित्र होता बहुतेक.
- त्याचे होते ना सर्व कस्टम मेड ? भन्नाट आयडिया आहे - आशियाना विदाउट भटारखाना. मी जग फिरते पण कान्ट कीप अवे द किचन फ्रॉम माय माईंड. मी ठरवले तरी माझे कुटुंब मला ते विसरू देत नाही. ५-६ दिवस ‘ऍडजस्ट’ करतात म्हणे अन मी घरात पाय ठेवला की फर्माईशी कार्यक्रम चालू. डार्लिंग भाकरी ठेचा तुझ्या हातचा... ममा बटर चिकन तुझ्या हातचे...सुनबाई प्रसादाला शिरा सोवळ्यातला, तूच कर गं .. अरे मी काय मशीन आहे काय ? काय फायदा माझ्या शिक्षणाचा, लठ्ठ पगारी नोकरीचा आणि माझ्या कामातल्या हुशारीचा ? मी घरात आले की किचनमध्ये मला ढकलायला सगळे सज्ज. वर प्रेमळपणे सगळे. नाही म्हणायला मलाच गिल्ट यावा अशी नाकेबंदी. नकोच ते किचन. सर्वांना सर्व देणारी तुझी कामधेनू हवी. वा भाई वा. तूने मेरा दिल जीत लिया. मला धर रे तुझ्या बुकिंग लिस्ट मध्ये.
- जरूर. वेलकम टू अवर किचनलेस होम फॅमिली.
- स्त्री, तिचे घर, तिचे कुटुंब, कुटुंबातील स्थान झालच तर समाजातील स्थान सगळेच 'किचन' आणि स्वयंपाक याला कसे जोडता येईल ? हुषार कमावत्या बाईने घरी येताच पदर खोचून कामाला लागावे, सगळ्यांना आवडणारा गरमागरम स्वयंपाक करावा. सगळे घर कसे तृप्त होते. घराला घरपण येते. हेच काम पुरुषाने एखाद्याच दिवशी केले तर तो दिवस सणाचा, स्त्रीसम्मानाचा ? माय फुट.
- माझा एक प्रश्न आहे. हे सगळे मास्टर शेफ संजीव कपूर, रणवीर ब्रार, विकास खन्ना, कुणाल कपूर काम संपवून घरी जातात तेव्हा त्यांच्यासाठी स्वयंपाक कोण करतं ? ते तर स्वतःच एक्स्पर्ट ना ?
- यू सिंग माय सॉंग बडी. लव्ह द साउंड ऑफ युअर वर्ड्स.
- तू तर जगभर फिरतेस, अमेरिकेतही लॉन्ग स्टे. तिकडे काय आहे परिस्थिती ?
- अमेरिकेत ? सेम. थोडे सटल आहे तिकडे, पण आहे हेच. बेकिंग युअर फ्रेश कुकीज. अमेरीकानो. विथ आफ्टरनून टी / कॉफी. उत्तम अमेरिकन फर्स्ट लेडी होण्याचं क्वॉलिफिकेशन आहे ते. हिलरी क्लिंटन असो की मिशेल ओबामा. अपेक्षा असतातच त्यांच्याकडून किचन सांभाळण्याच्या. डिफेन्स काय तर म्हणे त्यांच्या दिमतीला एवढे नोकरचाकर असतात, दिले थोडे लक्ष तर काय बिघडले ?
- पण तुला माहिताय का ? याच अमेरिकेत मोठ्या शहरातल्या १९२० सालापूर्वीच्या घरांमध्ये किचन नव्हतेच. सर्वांचे एकच सामायिक किचन. सगळे लंगर का खाना वाले. नो किचनेट टू. पण पुढे रशियन असेच कम्यून बांधतात म्हणून अमेरिकेत किचनलेस हाऊसिंग ही शिवी झाली म्हणे. सामायिक किचन म्हणजे रशिया, त्यांची कम्युनिस्ट थेरं. बंद पडला तो प्रकार आणि बायका जुंपल्या गेल्या घराघरातल्या किचन कामात. ऐकलं का तू आधी कधी हे ?
- नाही ऐकले हे आधी. बराच रिसर्च केला आहेस. आय एम इन. माझं बुकिंग नक्की, पटवते मी घरात सगळ्यांना.
* * *
- चिन्नू, हा विचार वेगळा आहे बेटा. कोण ती बया ? काय तरी नाव म्हणे –
- आना पुईजानेर ..
- आर्किटेक्ट? कुठं अमेरिकेत राहते का ती ?
- नाही अम्मा, स्पेन.
- तेच ते सेमच रे. गोऱ्या लोकांची थेरं. नकोच आपल्याकडे हे.
- किती रे वय तिचं ?
- असेल तिशीची -फार तर पस्तीस.
- किचनलेस होम या कल्पनेसाठी तिने जगभर फिरून अभ्यास केला अम्मा. स्वतः तसे प्रॉजेक्ट उभारलेत. उत्तमरीत्या चालवलेत. तिला पुरस्कार मिळालेत भरपूर आणि पुढील कामासाठी फंडिंग सुद्धा.
- फार इंप्रेस झालेला दिसतो माझा बिल्डर मुलगा.
- होय अम्मा, मला तिचा विचार पटतो आहे. शिवाय किचनलेस होम हा चांगला मार्केटिंगचा मुद्दा ठरेल असे माझ्यातला बिझनेसमन मला सांगतोय अम्मा.
- पण आता आमच्यावेळसारखं नाही चिन्नू. जात्यावरचं दळण, पाटा वरवंटा, खलबत्ता जाऊन आता किती सोयीचा झालाय स्वयंपाक ? आपल्याच घरातले ग्याजेटस बघ. नाही का पुरेसे ?
- कितीही नवनवीन उपकरणे आणि सोयीसुविधा आल्या तरी महिन्याकाठी किचनमध्ये लागणार वेळ फार कमी काही झालेला नाही. घर आणि विशेषतः किचन स्वच्छ आणि टापटीप ठेवण्यामध्ये दिवसाचा आणि आयुष्याचा एक फार मोठा भाग खर्च होतो. बहुतेक जागी हा वेळ आणि हे श्रम स्त्रियांचे असतात.
- व्हॉट अबाऊट द फूड रुटीनस चिन्नू ? सच लव्हली फूड रिच्युअल्स, एज ओल्ड. डीप रूटेड इन अवर प्राउड हेरिटेज ! व्हॉट अबाऊट देम ? आपलं घर अन्नाभोवती फिरतं. सगळ्यांच्या पसंतीचे खाणे-पिणे यात मजा नाही का ?
- ते काम घरातच स्वतः एकाच व्यक्तीने आयुष्यभर करत राहावे हा हट्ट का ? आमच्या खाण्यापिण्याची आबाळ होईल म्हणून तू धड ४ दिवस माहेरी तरी राहिलीस का अम्मा ?
- एक सांगू ? वेडी आहे ती कोण आना का फाना पुईजानेर. तिला काय आम्हा सर्व बायकांपेक्षा जास्त समजतं का ? केस उन्हात पांढरे नाहीत केले हे. स्वयंपाक आणि अन्न घराला बांधून ठेवते. चार दिवस घरी स्वयंपाक नाही झाला तर बाहेरचे खाऊन आजारी तरी पडतील नाही तर कंटाळतील तरी. स्वयंपाकघराविना कसले घर? घराचे हॉटेल होईल.
- आपल्याकडे नाही पण अनेकांकडे घरातले किचन म्हणजे धगधगते अग्निकुंड. ठिणगी पडायचा अवकाश की युद्ध सुरु. टीव्हीवरच्या तुझ्या त्या दळणदळू मालिकांमध्ये किचन आणि डायनींग टेबल हा कट कारस्थानाचा आणि खलबतांचा अड्डा म्हणूनच दाखवले जाते, ते उगाच नाही अम्मा. अनेक कुटुंबात, विशेषतः मोठ्या संयुक्त कुटुंबात अन्न आणि स्वयंपाक याचा एखाद्या शस्त्रासारखा वापर केला जातो. तिथे किचनचे रणांगण होते. फार दूर कशाला मुत्थुमामाकडेच बघ.
- माझ्या माहेरच्या लोकांबद्दल बोलायचं काम नाही चिन्नू. आणि ऐक, असे तर कुणीच कुणासाठी काही करायला नको मग. सगळेच मोल देऊन विकत घ्या. भावना, ओलावा, एकमेकांबद्दल प्रेम राहील का लोकांमध्ये ?
- अम्मा, प्रेम फक्त एखाद्यासाठी स्वयंपाक करून दिला तरच आणि त्यातच असतं का ?
- नॉट दॅट वे चिन्नू, पण प्रेमाचा मार्ग पोटातून जातो हे ऐकलंय ना ?
- क्लिशे.
- क्लिशे ईज क्लिशे फॉर अ रीझन चिन्नू बेटा.
* * *
- मैं हुसैन. और ये है डॉ. नफिसा, मेरी मंगेतर. वी आर गेटिंग मॅरीड नेक्स्ट मंथ. माझा एक्स्पोर्ट बिझनेस आहे आणि नफिसा नेफ्रोलॉजिस्ट, मुंबईतच मोठ्या हॉस्पिटलमध्ये काम करते. मेरे चाचा हैं मोहम्मद वाजुद्दीन जिनका आपने जिक्र किया.
- तुमचे चचाजान सांगत होते की तुम्ही आधीच ‘किचनलेस होम’ वाले आहात, खरे का ?
- हो, साधारण २००८ सालापासूनच.
- वॉव. कसे जमवले ? घरातल्या लोकांना कसे पटवले ?
- पटवायचे काय त्यात ? हिचे आणि माझे आई- बाबा दोघे डॉक्टर आहेत. फुलटाईम वर्किंग कपल्स. आमच्यासारखेच. सगळ्यांना सोयीचं आहे किचनलेस होम.
- पण मुळात ही आयडिया आली कशी ?
- मैं बताती हूं. आमचा बोहरा मुस्लिम समाज व्यापार आणि शिक्षण दोन्हीकडे आधीपासून पुढे आहे. सर्वांनीच, विशेषतः स्त्रियांनी भरपूर शिकावे आणि पूर्णवेळ व्यवसाय-नोकरी करावी यावर आमच्या समाजाचा भर आहे. मॅनेजिंग किचन अँड फुलटाईम करियर डोन्ट गो हॅन्ड इन हॅन्ड.
- मग ? तुमची संस्था FMB, त्याबद्दल तुमचे काका सांगत होते ते काय ?
- आमचे धर्मगुरू सैय्यदना. समाजाचे मार्गदर्शक, आमचे मौला, वली, खलिफा. ५२ वे धर्मगुरू सैयदाना बुऱ्हानुद्दीन यांच्या कल्पनेतून फैझ-अल-मावैद-अल-बुरहानीया म्हणजे FMB हे अन्नछत्र सुरु झाले आधी. गरिबांसाठी फुकट खाना. रोज, दिवसातून तीन वेळ. समाज श्रीमंत असल्यामुळे लोकांना 'फुकट' अन्नाची गरज कमी. सैयदना स्वतः स्रियांनी स्वयंपाकघरातून मुक्त होऊन स्वतःच्या व्यवसायाकडे आणि करियरकडे पूर्णवेळ लक्ष द्यावे या मताचे. त्यामुळे पुढे सर्वांसाठीच 'तयार' खाना दिवसातून १-२-३-४ वेळेला, जसे हवे तसे उपलब्ध करून द्यावा यावर त्यांचा भर. ब्रेकफास्ट, लंच, मिड इव्ह स्नॅक्स, डिनर. दॅट वॉज द स्टार्ट.
- सर्वांना फुकट ?
- नाही. फुकट घेणे आम्हाला कमीपणाचे वाटते. ठराविक रक्कम महिन्याला भरून ही सोय मिळवता येते आणि आर्थिक अडचण असेल तर विनामूल्य. सर्व सधन कुटुंबे पैसे देतांना स्वतःतर्फे काही जादा पैसे भरून अन्य कोणाला तेच अन्न कमी पैश्यात किंवा विनामूल्य मिळेल अशी व्यवस्था करतात. गुप्तपणे. थोडे क्रॉस सबसिडी सारखे. अन्नासाठी पैसे कमी पडलेच तर समाजाच्या संयुक्त फंडातून दिले जातात.
- वा. म्हणजे घरी किचन नाहीच ? किती लोक वापरतात ही सोय ?
- भरपूर. साधारण १ लाख बोहरा मुंबईत राहतात. फोर्ट भागात बद्री महल हे समाजाचं मुख्यालय आहे, तेथून हे कामकाज चालते. आम्ही लोकं स्वतःच्या कामातून वेळ काढून 'सेवा' म्हणून काम करतो. अन्न शिजवायला, त्याचे पॅकिंग आणि वाटप करायला पगारी सेवक मोठ्या प्रमाणात ठेवलेले आहेत, त्यामुळे काम सोपे आणि व्यावसायिक पद्धतीने होते. आहारतज्ञ महिन्याचा मेन्यू बनवून देतात, समाजातील लोक वापरण्यात येणाऱ्या कच्च्या मालाच्या, स्वच्छतेच्या आणि एकूणच कामाच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्याचे काम करतात.
- जास्त कमी नाही होत का ? वेस्टेज वगैरे ?
- त्यासाठी एक 'दाना कमिटी' आहे. सर्व लोकांना जेवण पाठवले की उरलेल्या अन्नाचा एकही कण वाया जाऊ देत नाही. ते अन्न गोरगरिबांना विनामूल्य वाटतो, अगदी खाली सांडलेल्या अन्नाचे कण नीट गोळा करून मांजरी आणि पक्ष्यांसाठी ठेवतो आम्ही.
- मुंबईबाहेरच्या लोकांचं काय ?
- जिथे जिथे समाजाची पुरेशी संख्या आहे तिथे आहे ही सोय. गुजरातमध्ये राजकोट सारख्या छोट्या शहरात २२०० बोहरा परिवार आहेत आणि त्यांना सोयीच्या ठिकाणी ५ वेगवेगळी कम्युनिटी किचन आहेत. राजस्थानातल्या कोटा शहरात १५०० बोहरा एकाच भागात राहत असल्याने एकच मोठे किचन त्यांना पुरेसे आहे. सुरत, खंबात, पाकिस्तानात कराची, श्रीलंकेत कोलंबो, सब जगह शुरू है. दिन में चार दफे. घरमें किचन नही है, किचनलेस होम इज अ रियालिटी !
- अरे यार. माझे 'किचनलेस होम' वाले अपार्टमेंट्स म्हणजे काही नवीन नाही. यू गाईज आर ऑलरेडी डुईंग इट लाईक अ प्रो. आशियाना विदाउट भटारखाना !
* * *
तर मित्रांनो, बिल्डर चिन्नू उर्फ चिन्नासामी आणि त्याच्या गोतावळ्यातला हा संवाद संपला नाहीये अजून. जितने मुंह उतनी बातें. चर्चा सुरूच आहे, ती तुम्ही पुढे न्या; तुमचे, तुमच्या मित्रांचे, कुटुंबियांचे, कल्पनेतल्या मित्रांचे मत - संवाद लिहा. थोडे विचारमंथन होईल, झाली तर चिन्नूला मदतच होईल. व्हॉट से ?
* * *
मस्त आईडिया
मस्त आईडिया
बिल्डर चिन्नू उर्फ चिन्नासामी
बिल्डर चिन्नू उर्फ चिन्नासामी आणि त्याच्या गोतावळ्यातला हा संवाद भलताच आवडला आहे !
हे माझंही ड्रीम होतं / आहे.
हे माझंही ड्रीम होतं / आहे. किचनलेस घर.
नेहमीप्रमाणेच मस्त लेख.
उत्कृष्ट लेख आणि आयडिया
उत्कृष्ट लेख आणि आयडिया
लेख आवडला.आयडिया म्हणून ठीक
लेख आवडला.आयडिया म्हणून ठीक आहे पण प्रत्यक्षात येणं कठीण भारतात तरी!
कल्पना अगदी रोमँटीक आहे,
कल्पना अगदी रोमँटीक आहे, प्रेमात पडायला झाले अगदी. पण हनिमुन संपला की पाय जमिनीला लागतात आणि दोष दिसायला लागतात.
जेवणाबाबत माझे विचार थोडे वेगळे आहेत. काहींना ते मागासलेले वाटतील.
अन्न ही प्राथमिक गरजांमधली प्रथम गरज आहे. उद्या अन्न मिळणे बंद झाले तर माणसे त्यांची प्रशस्त घरे, मानाची पदे, करियर वगैरे सर्व बाजुला ठेउन आधी अन्न मिळवण्याच्या मागे लागतील. प्रसंगी प्राण घेतील/देतील. अन्न आधी, मग वस्त्र व निवारा.
माझ्या पोटात नियमित अन्न जात नसले तर माझे अस्तित्व संपायला फारसा वेळ लागणार नाही. अन्न नसले तर माझे ज्ञान, विद्वत्ता यांचा मला काहीही उपयोग नाही. ह्या गोष्टी माझ्यासाठी शुन्यातुन अन्न निर्माण करु शकणार नाहीत.
अन्नाशिवाय माझे अस्तित्व शुन्य, मग मी हे अन्न तयार करण्याची जबाबदारी एका फेसलेस व्यवस्थेच्या हाती देऊ? रोजच्या जेवणाचे ताट तयार करायची जबाबदारी अर्थात अन्नासाठी लागणारा कच्चा माल मला पुरवायची जबाबदारी अशाच
एका फेसलेस व्यवस्थेच्या हातात आहे आणि त्याचे भयंकर दुष्परिणाम माझे शरीर भोगतेय. कच्च्या मालात होणारी भयानक भेसळ, वापरण्यात येणारी खते व किटकनाशके यांनी फक्त माझेच नाही तर इतर सजिवांचे अस्तित्व धोक्यात आणले आहे.
आता असल्या भयंकर कच्च्या मालापासुन अन्न बनवण्याची जबाबदारी कोणी दुसरा घेत असेल तर तिथेही परत तसेच काही घडण्याची शक्यता खुप मोठी आहे. डोळ्यांना मोहक दिसणारे अन्न प्रत्यक्षात किती हानीकारक ठरेल हे लगेच कळणार नाही. कच्च्या माल निर्मितीमध्ये जे निर्णय घेतले गेले त्याचे परिणाम पन्नास वर्षांनी दिसताहेत.
बोहरी समाजाने उदाहरण घालुन दिलेले आहे. पुर्ण खात्री असेल तरच मी माझ्यासाठी अशा व्यवस्थेस परवानगी देईन.
साधना +१.
साधना +१.
बाकी उरलेल्या वेळाचे करायचे काय? आणखी टीव्ही बघायचा, व्हॉट्सअॅप फॉरवर्ड करायचे आणि टिकटॉक बघायचे?
असे इतके भयंकर बिझी लोक रोजच्या बघण्यात तरी नाहीत. इतके महत्त्वाचे प्रॉब्लेम रोज उठुन कोण सोडवते त्याची कल्पना नाही. पण असतील बाबा, त्यांनी खाण्यापिण्याची आधीच सोय करुन घेतली असेलच.
इतकं बिझी असू ही नये असं आपलं मला वाटतं. पण अशी सोय समाजात जरुर असावी, कोणावर अशी वेळ आली तर ताठ मानेने जगता यायलाच हवे, ही सोय त्यांना जरुर मदत करेल. अनेक लोक दोन/ तीन नोकर्या करुन तोंडमिळवणी करतात. त्यांना याचा फायदा होईल पण त्यांना परवडेल असं नाही.. असा कॅच २२ ही दिसतोय.
स्त्रीयांना जुंपणे वाला मुद्दा खरा आहे. तो प्रश्न सोडवायला इतका जालिम उपाय करावा लागतोय त्याचा विषाद ही वाटला.
रच्याकने, वुडहाऊसचे काही
रच्याकने, वुडहाऊसचे काही श्रीमंत नायक ज्या अपार्ट्मेंटमध्ये राहायचे त्यांना कॉमन किचन असायचे आणि तिथुन जेवण मागवले जायचे असे वाचल्याचे आठवतेय.
अरे पण कॉमन किचनमध्ये तुम्ही
अरे पण कॉमन किचनमध्ये तुम्ही जाऊन करू शकता ना स्वयंपाक वेळ/मूड/कारणानुसार? मग काय प्रॉब्लेम आहे?
मला आवडलेली आहे कल्पना! आय अॅम इन!
स्वयंपाकघराशिवाय घर अशी कल्पना करायला कष्ट पडत आहेत हे मान्य करायला हवं तरीही. आरती प्रभू म्हणाले तसं 'नुस्ते नुस्ते घर, नाही छपराशी धूर'

किती खोल कंडिशनिंग झालेलं असतं आपलं!
>>> बाकी उरलेल्या वेळाचे करायचे काय? आणखी टीव्ही बघायचा, व्हॉट्सअॅप फॉरवर्ड करायचे आणि टिकटॉक बघायचे?
का? कोणाला काही क्रिएटिव्ह करावंसं वाटतंय पण ऑफिस-किचन-ऑफिस या चाकोरीतून वेळच मिळत नाही असंही होऊ शकतंच की.
बायका जुंपल्या जाण्याचा मुद्दा आलाच आहे - का बरं क्रिएटिव्ह फील्ड्समध्ये बायका कमी दिसतात? कारण त्यांचा वेळ अॅक्टिवली स्वयंपाक करण्यात आणि एरवीही त्याचं नियोजन करण्यात जातो.
स्वाती आंबोळे यांच्या
स्वाती आंबोळे यांच्या प्रतिसादाशी अंशत: सहमत.
कल्पना चांगली आहे आणि नवीन ही
कल्पना चांगली आहे आणि नवीन ही आहे. फक्त सात कोटीं पासून सुर हे थोडसं ना पचण्यासारखं आहे. तरीही आपल्याकडे हळूहळू हे प्रत्यक्षात येऊ शकेल.
मला खूपच आवडलेली आहे ही
मला खूपच आवडलेली आहे ही कल्पना. मला आवडेल नो-किचन होम.
कल्पना चांगली आहे.
कल्पना चांगली आहे. Theoretically पटतं. खरच फक्त किचन मॅनेज करणे ह्यात आपण आयुष्यातला भरपूर वेळ घालवतो. हाताशी नोकर चाकर असले, modern kitchen gadgets असली तरीही वेळ जातोच. पण अनेक वर्ष आपल्या कडे काम करणार्या मावशींवर आपण किचन सोपवू शकत नाही, तर मग एखाद्या अवाढव्य common kitchen मधल्या chef ने बनवलेले पदार्थ खरचं आपण रोज, न कंटाळता खाऊ शकू? ते आपल्या आवडतील, आपल्या तब्येतीला मानवतील, ह्याची खात्री कोण देईल?
ते आपल्या आवडतील, आपल्या
ते आपल्या आवडतील, आपल्या तब्येतीला मानवतील, ह्याची खात्री कोण देईल? >> आपणच केलेले किंवा घरच्या स्त्रीने केलेले सर्वच प्रकार घरच्या सर्वांना सर्व काळ कुठे आवडतात ? शिवाय १९००-१९४० / १९५० पर्यंत जन्माला आलेल्या पिढीत बाहेर खाणे , बाह्रेरचे / तयार खाणे हे आजच्या पिढीपेक्षा कितीतरी प्रमाणात होते. पण उच्च रक्तदाब , मधुमेह , स्मृतीभ्रंश , सांधे दुखी अशा व्याधी होत्याच की.
घरच्या स्त्रीने केलेले सर्वच
घरच्या स्त्रीने केलेले सर्वच प्रकार घरच्या सर्वांना सर्व काळ कुठे आवडतात ?>> ही मानसिकता बदलणे महत्त्वाचे. मुद्दामून वाईट/ बेचव पदार्थ कोण का करेल? पण खाणार्याची अपेक्षा, "अगदी restaurant मधल्या चवीचा पदार्थ हवा" अशी असते. घरी तशी चव साधायची तर मग त्यात भरपूर तेल्/बटर/ मीठ/ साखर घालायला लागेल. आणि ह्या सर्व पदार्थांचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे ह्याबद्दल तरी कोणाचे दुमत नसावे.
मग यांत हाउस्किपिंग
हाउस्किपिंग इंन्क्लुडेड? असेल तर बेस्ट ऑफ बोथ द वर्ल्ड्स, शिवाय नॉट लिविंग इन ए सुटकेस...
वाचायला मजा आली.अंमलात आणायला
वाचायला मजा आली.अंमलात आणायला विशेष पटणार नाही.थोडं क्लिनिंग इत्यादी सोडलं तर कुकिंग ही एक थेरपी असते.कुकिंग शी संबंधित बऱ्याच आठवणी असतात.किचनलेस होम ने होम आणि वेळ नक्की मिळेल, पण मजा येणार नाही.लोक मग चोरून चोरून(दारूबंदी वाल्या राष्ट्रात दारू चोरून विकत घेतात तसे) घरी काहीतरी छोटा किचन सेटअप बनवून कम्युनिटी किचन पर्यंत चालत जायचा वेळ वाचवतील.
मला १००% किचनलेस होमची आयडिया
मला १००% किचनलेस होमची आयडिया आवडेल असं वाटत नाही. घरात किचन सोय आणि कॉमन किचनची सोय असणं हे बेस्ट वाटतंय.
हे इको फ्रेंडली नसेल.
हे इको फ्रेंडली नसेल. प्रत्येक घरात सर्व जेवणे बाहेरूनच आली तर मग त्यांचे पॅकिंग वगैरे प्रचंड कचरा निर्माण होईल.
इंटरेस्टिंग पद्धतीने लिहीले
इंटरेस्टिंग पद्धतीने लिहीले आहे आणि कन्स्पेटही इंटरेस्टिंग. जेथे लोकांना कामातून वेळ काढणे अवघड असते - १२-१४ तासांचे जॉब्ज असलेले लोक, जेथे स्त्रियांना व पुरूषांना असलेल्या जबाबदार्यांमधे प्रचंड तफावत आहे असे समाज का गट जे काय असेल ते - अशा ठिकाणी फार उपयोगी आहे.
आधुनिक समाजात किती चालेल शंका आहे. एका घाउक चवीचा केलेला असा किती लोकांना आवडेल माहीत नाही. हे म्हणजे स्टारबक्स मधे एकाच चवीची एकाच दुधाची कॉफी मिळेल असे जाहीर केले व कोणालाही अमुक टाइपचे दूध, साखर हवी/नको, पंपकिन स्पाइस लाटे टाइप काहीही नसेल. प्रत्येकाच्या चवीचे व हौस्/आरोग्यानुसार असलेले डाएट व्हेरिएशन्स कसे मॅनेज करणार.
त्याहीपुढे जाउन - हे प्रकार फक्त घट्ट बांधलेले समाज असतात तेथेच चालतील. अजून बहुतांश जुन्या वळणाचे (स्त्रिया घरात, पुरूष बाहेर), समाजाचे एकत्रित नियम असतात ते पाळणारे, एकमेकांना समाजबांधव म्हणून विशेष मदत करणारे, एकमेकांकडूनच वस्तू खरेदी वगैरे करणारे - असे अनेक समाज भारतात आहेत. तेथे हे चालेल. जेथे आधुनिक विचार्/वागणे आहे तेथे चालेल असे वाटत नाही.
पण याची गरज ही बहुधा अशाच गटांना जास्त आहे, जेथे अजून हे स्त्रियांचे काम व हे पुरूषांचे - अशी मेण्टॅलिटी आहे.
पण याची गरज ही बहुधा अशाच
पण याची गरज ही बहुधा अशाच गटांना जास्त आहे, जेथे अजून हे स्त्रियांचे काम व हे पुरूषांचे - अशी मेण्टॅलिटी आहे. >> आणि आयरनीच्या देवा म्हणजे ... हे कोणी केलंच तर हे समाज सर्वात शेवटी करतील.
हे जरा विचित्र वाटलं. घरात एक
हे जरा विचित्र वाटलं. घरात एक फ़ंक्शनल किचन असायलाच हवं. कॉमन डायनिंग हॉलची सोय सिनियर कम्युनिटीजमध्ये असतेच. पण शिवाय घरात किचनही असतं.उदा- पुण्यातली परांजपे बिल्डर्सची अथश्री प्रोजेक्ट्स. बाकी ज्यांना आउटसोर्स करायचंच आहे त्यांना भारतात तर पोळीभाजीचा घरगुती डबा ते 24 तास स्विगीवर जगभरातील पर्याय उपलब्ध आहेतच.
घरात बाईवर काम पडतं म्हणून किचनच नको हे म्हणजे राखी सावंत म्हणाली होती की घरात पंखेच नकोत (लोक आत्महत्या करतात म्हणून) तसं वाटलं. बाईचं शोषण होत असेल तर त्याला तिने लग्नाआधीच आपण किती घरकाम करणार याची स्पष्ट कल्पना देणं,स्वतः ठाम राहून पुश बॅक करणे, प्रसंगी घटस्फोटाची तयारी असणे हेच पर्याय आहेत. बिचाऱ्या किचनचा काय दोष त्यात.
लग्नाआधीच आपण किती घरकाम
लग्नाआधीच आपण किती घरकाम करणार याची स्पष्ट कल्पना देणं >> मला घरात किचनच नको हे 'मी किचनमध्ये शून्य टक्के काम करणार आहे' अशी कल्पना देणंच तर आहे ह्यापेक्षा अजून स्पष्ट काय सांगणार?
पुश बॅकही करणं नको आणि निदान 'जेवण कोण बनवणार' ह्या कारणावरून घटस्फोटही नको.
ईंटेरेस्टींग संकल्पना. पण
ईंटेरेस्टींग संकल्पना. पण कल्पनातित वाटत आहे. जर मला स्वैपाक करायचा झटका आला, आणि मी कॉमन किचन मधे गेले आणि तिकडे
एखाद्या उनाड शनिवारी काही विशेष बनवीन असे झटके आलेल्या ४ बायका/पुरूष आधीच मौजूद असल्या तर काय करावे बरे?
शिवाय मी स्वैपाक करत असताना मला सल्ले दिलेले आवडत नाहीत, तिथे सामुदायिक किचन मधल्या भोचक बायकांनी/पुरूषांनी सल्ला सुत्र सुरू केले तर!
असाच कल्पनाविलास
कल्पना इंटरेस्टिंग आहे..पण
कल्पना इंटरेस्टिंग आहे..पण आपल्या विविधतेने नटलेल्या खाद्यपरंपरांचं काय? तुम्ही वर बंगळूरचा उल्लेख केलाय.. इथे दीडशे फ्लॅट्सच्या सोसायटीत बंगाल, पंजाब, उत्तर प्रदेश,. बिहार, उडिसा, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ, तमिळनाडू, कधीकधी आसाम-मणिपूरसुद्धा, एवढ्या राज्यांमधली माणसं असू शकतात.
अमितचा 'फेसलेस व्यवस्था' हाही मुद्दा पटला.
कल्पना छान आहे. वरचा वावे
कल्पना छान आहे. वरचा वावे यांचा मुद्दा माझ्या डोक्यात आला . सगळ्यांची खाद्यसंस्कृती एकच असेल तर निभून जाईल.
पण प्रत्येकाला लिटरली वेगवेगळं काही हवं असेल तर " मागाल ते मिळेल या सामायिक किचनमध्ये." हे जमवणं कठीण वाटतंय. त्यासाठी लागणारं मनुष्यबळ, जागा, वेळ या सगळ्यांचं गणित रिझनेबल रेटच्या बाहेर जाऊ शकेल. *
*आणखी विचार करता आपण आपल्या किचनमध्ये काही शिजवतो तेव्हा त्याची कॉस्ट काढताना बर्याच गोष्टी धरत नाही. त्या धरल्या तर हे रिझनेबलच असेल असं वाटतं.
'कॉमन किचन' वाले बिल्डर्स
'कॉमन किचन' वाले बिल्डर्स 'कॉमन संडास/बाथरूम'ची कल्पना का राबवत नाहीत? म्हणजे बघा, तुम्ही ७ कोटीचा फ्लॅट घेणार म्हणजे समजा रुपये ५०,००० प्रती स्क्वेअरफूट दर आहे, २ संडास/बाथरूम आहेत १०० स्क्वेअरफूटचे, तर ५० लाखाची एक्स्ट्रा जागा मिळेल तुम्हाला वापरायला. घरातल्या २ ऐवजी, १० कॉमन संडास/बाथरूम बांधून देतो. रात्री गरज लागली तर बेडपॅन वापरा, आमचा स्टाफ त्याची स्वच्छता करेल.
किती लोक तयार होतील या ऑप्शनला?
किचनचे पण तसेच आहे. जर माझ्याकडे पैसा असेल तर मला सोय हवी, मग मी ती वापरेन किंवा नाही, माझी मर्जी. अनेकांच्या घरात मीडिया रूम असतेच ना? ती किती वेळा वापरली जाते? थेटरात सिनेमा बघता येतोच की, तरी घरात पण मीडिया रूमची सोय का असते? याचे सोपे उत्तर म्हणजे माझी मर्जी.
आता जर जागेचाच तुटवडा असेल (उदा. न्यूयॉर्क, हाँगकाँग, टोक्योसारख्या जागा) तर घरात किचन न ठेवता बाहेरून जेवण मागवणे किंवा बाहेर खाणे सोयीस्कर पडते, कारण किचन ची जागा वाया जाते ती इतर कारणासाठी वापरता येते. पण ७ कोटीच्या फ्लॅटमध्ये तरी तशी परिस्थिती नसावी, असा अंदाज आहे.
अनेक कुटुंबांत आईची, आजीची,
अनेक कुटुंबांत आईची, आजीची, पणजीची, कुठल्या कुठल्या आत्याकाकू माम्यांची खास चव पुढे पोचवण्याची परंपरा/पद्धत असते. त्या खास चवीला मुकू आपण. ( अर्थात customized चव न मिळण्याचा मुद्दा आधी कवर झालेला आहेच).
मूळ कल्पनेमागे आणखीही काही
मूळ कल्पनेमागे आणखीही काही उद्देश आहेत असं दिसतं.
गगनचुंबी इमारतींमध्ये काही
गगनचुंबी इमारतींमध्ये काही ठिकाणी वॉशिंग मशिन्स अधल्या मधल्या मजल्यांवर सार्वजनिक अशी ठेवलेली असत. त्यांचा वापर करण्यासाठी कित्येकदा रांगेत आपला रुमाल टाकून ठेवावा लागे. संडासच्या बाबतीत तशी परिस्थिती आली तर?
चक्र उलट फिरेलही कधी तरी. गगनचुंबींपासून चाळींकडे .
Pages