औषधांचा शरीर-प्रवेश (१)

Submitted by कुमार१ on 3 May, 2022 - 21:56

निसर्ग आपल्याला जन्मताच एक अमूल्य शरीर देतो. अगदी जन्मापासून ते मृत्यूपर्यंत हे शरीर कधी ना कधी कुठल्या तरी रोगाची शिकार बनते. रोग म्हटला की उपचार करणे आले. उपचारांमध्ये घरगुती उपायांपासून अनेक प्रकारच्या औषधांचा समावेश होतो. आधुनिक वैद्यकात रुग्णास औषध देण्याचे अनेक मार्ग(routes)आहेत. त्यातले सर्वपरिचित मार्ग म्हणजे :

औषध तोंडाने घेणे, औषधाचा वाफारा नाका/तोंडाद्वारे घेणे, स्नायू अथवा रक्तवाहिनीतून इंजेक्शन्स घेणे आणि त्वचेवर मलम लावणे.
पण शरीरात औषध पोचवण्याचे याव्यतिरिक्तही अनेक मार्ग आहेत. वरील चार परिचित प्रकारांचेही अनेक उपप्रकार आहेत. या सर्वांचा सोदाहरण आढावा या लेखद्वयात घ्यायचा आहे. काही ठराविक औषधे शरीराच्या एखाद्याच छोट्या भागात काम करण्यापुरती वापरली जातात. उदाहरणार्थ, डोळ्यात टाकायचे थेंब. परंतु बरीच औषधे शरीरात गेल्यानंतर रक्तप्रवाहाद्वारे संपूर्ण शरीरभर पसरतात. अशा औषध-प्रवासाचा विस्तृत आढावा आता घेतो.

तोंडाद्वारे घेतलेली औषधे
अशी औषधे गोळी, कॅप्सूल, चुरा किंवा द्रव स्वरूपात असतात. तोंडाद्वारे घ्यायच्या मार्गात दोन पद्धती आहेत :
1. औषध जिभेवर ठेवून गिळणे
2. औषध जिभेखाली ठेवून विरघळवू देणे
हे दोन्ही मार्ग जरी एकाच पोकळीत जवळपास असले तरी त्यांच्याद्वारे होणाऱ्या परिणामांमध्ये लक्षणीय फरक आहे ! तो आता समजून घेऊ.

१. जे औषध जिभेवर ठेवून पाण्याच्या मदतीने गिळले जाते त्याचा पुढील प्रवास संपूर्ण पचनसंस्थेतून होतो. बहुतेक औषधांचे सर्वाधिक शोषण लहान आतड्याद्वारा होते. असे शोषण झाल्यानंतर ते पचनसंस्थेच्या स्थानिक रक्तप्रवाहात (portal) जाते. तिथून पुढे यकृतात आणि पुढे मजल दरमजल करीत शरीराच्या मुख्य रक्तप्रवाहात (systemic)पोचते. तोंडातून अशा प्रकारे घेतलेल्या औषधाच्या शोषणावर पचनसंस्थेतील अनेक घटकांचा परिणाम होतो. जसे की, आहाराचे स्वरूप, विविध हॉर्मोन्स व चेतातंतूंचे परिणाम, पचनाचे आजार, इत्यादी. तसेच एखादे औषध हे गोळी, कॅप्सूल की द्रव स्वरूपात आहे यावरही त्याचे शोषण अवलंबून असते.

capsule.jpgकॅप्सूलचे विशिष्ट फायदे :
कॅप्सूल म्हणजे जिलेटिनचे एक कवच असते. त्याच्यात औषध व पूरक रसायने एकत्र घातलेली असतात. आपण कॅप्सूल गिळल्यानंतर ती पचनमार्गात ओली होऊन फुगते आणि मग त्यातले औषध बाहेर पडते. कॅप्सूलमधील औषध द्रव स्वरूपात असल्यास त्याचे शोषण तुलनेने लवकर होते. काही औषधे सामान्य गोळीच्या स्वरूपात थेट जठरात जाणे इष्ट नसते. तिथल्या तीव्र आम्लतेमुळे त्यांचा नाश होऊ शकतो. म्हणून ती कॅप्सूलमध्ये भरून पुन्हा तिच्यावर एक विशिष्ट प्रकारचे वेस्टण चढवले जाते. हे वेस्टण आम्लतारोधक असते. अशी कॅप्सूल जेव्हा जठरात येते तेव्हा तिथल्या आम्लतेचा तिच्यावर परिणाम होत नाही आणि ती मूळ स्वरूपात लहान आतड्यात पोचते. तेथील कमी आम्लता असलेल्या वातावरणात वेस्टण विरघळते आणि मग औषध बाहेर पडते. या प्रकारच्या वेस्टणाला enteric coating असे म्हणतात.

जठरातील अन्न आणि तोंडाने घेतलेल्या औषधाचे शोषण हे दोन्ही घटक एकमेकांशी चांगलेच निगडीत आहेत. औषधाच्या रासायनिक स्वरूपानुसार ते उपाशीपोटी, मुख्य जेवणापूर्वी का जेवणानंतर लगेच घ्यायचे, याचे नियम ठरलेले असतात. बहुतेक रसायनयुक्त औषधे जठराच्या आतील आवरणाचा दाह करणारी असल्यामुळे ती जेवणानंतर घेणे इष्ट असते. मात्र, ज्या औषधांचे शोषण अन्नामुळे बरेच कमी होते अशी औषधे निक्षून सकाळी उठल्यानंतर उपाशीपोटी घ्यावी लागतात; याचे सध्याचे बहुपरिचित उदाहरण म्हणजे थायरोक्सिनची गोळी. रेचक प्रकारची औषधे रात्रीच्या जेवणानंतर झोपण्यापूर्वी घ्यावी लागतात.

२. औषध जिभेखाली ठेवणे : तोंडातील अन्य भागांशी तुलना करता जिभेखालच्या भागातील म्युकस आवरण विशिष्ट प्रकारचे आहे. त्यामुळे इथे ठेवलेल्या औषधाचे शोषण तुलनेने चांगले व सहज होते. या भागातला रक्तपुरवठाही भरपूर असतो. इथल्या औषधाचे शोषण झाल्यावर ते लगेचच शरीराच्या मुख्य रक्तप्रवाहात जाते. त्यामुळे वरील १ मध्ये असलेला संपूर्ण पचनसंस्था आणि यकृत हा लांबचा प्रवास पूर्णपणे वाचतो. अशा प्रकारे घेतलेल्या औषधाचा परिणाम त्वरित आणि अधिक प्रमाणात दिसून येतो. जी औषधे तोंडाने गिळून घेतली असता जठरात गेल्यावर त्यांचा नाश होण्याची शक्यता असते, अशी औषधे या प्रकारे देता येतात. तसेच गिळण्याच्या व पचनसंस्थेच्या आजारांमध्ये या औषधमार्गाचा उपयोग केला जातो.

अर्थात या औषधमार्गाची एक मर्यादाही आहे. इथे औषधाच्या शोषणासाठी उपलब्ध असलेली जागा अत्यंत कमी आहे. त्यामुळे शक्तिमान (potent) प्रकारचीच औषधे इथून देणे सयुक्तिक ठरते. तसेच जिभेखाली ठेवलेले औषध पूर्ण विरघळून जाईपर्यंत संबंधित रुग्णाने बोलणे, पाणी पिणे आणि गिळणे या सर्व क्रिया निक्षून टाळायच्या असतात. तसे न केल्यास औषधाचा काही भाग अन्ननलिकेतून पुढे जठरात जाईल आणि मग या प्रकारे औषध देण्याच्या प्रकारालाच बाधा पोचेल. या प्रकारे दिलेल्या औषधाचे बहुपरिचित उदाहरण म्हणजे nitroglycerin. हृदयविकारातील अंजायना या स्थितीमध्ये हे औषध रुग्ण स्वतःच पटकन जिभेखाली ठेवू शकतो.

गुदद्वारातून दिलेली औषधे
बद्धकोष्ठतेसाठी देण्यात येणारा ‘एनिमा’ सर्वपरिचित आहे. या प्रसंगात संबंधित औषध हे फक्त स्थानिक काम करते. मात्र काही प्रसंगी या मार्गाने दिलेले औषध रक्तप्रवाहात शोषले जाऊन सर्व शरीरभर पोचू शकते. या मार्गातून औषध देणे अर्थातच सुखावह प्रकार नाही ! त्यामुळे काही विशिष्ट परिस्थितीतच त्याचा अवलंब केला जातो, जसे की :
• रुग्णास प्रचंड उलट्या होत असताना किंवा गिळण्याचे त्रास असताना
• बेशुद्धावस्थेतील रुग्ण
• लहान मुलांमध्ये एखादे कडूजहर औषध देण्यासाठी
Lidocaine हे या प्रकारातील एक उदाहरण. ते भूलकारक असून हृदयतालबिघाडही दुरुस्त करते.
………….
इंजेक्शनद्वारा दिलेली औषधे

injection (2).jpg

इंजेक्शन हा मुळातच लहानांपासून मोठ्यांपर्यंत कुणालाच नकोसा वाटणारा प्रकार ! त्याची कमी-अधिक भीती प्रत्येकाच्या मनात असते. इंजेक्शनचे नाव काढताच भोकाड पसरणारी मुले हे तर सार्वत्रिक दृश्य. परंतु, एरवी व्रात्य मुलांना इंजेक्शनवाल्या डॉक्टरांची भीती दाखवणारे पालक, जेव्हा स्वतःवर इंजेक्शन घ्यायची वेळ येते तेव्हा त्यांची अवस्था थोडीफार लहान मुलासारखीच झालेली असते. Happy

या प्रकारात त्वचेतून सुई टोचून औषध शरीरात सोडले जाते. खालील परिस्थितीत या मार्गे औषध देण्याचा निर्णय घेतला जातो:
१. काही औषधे पचनसंस्थेद्वारे शोषली जाऊ शकत नाहीत. तर अन्य काही (उदा. इन्सुलिन) पचनसंस्थेतच नाश पावतात.
२. बेशुद्धावस्थेतील रुग्ण
३. जेव्हा औषधाचा परिणाम तातडीने होण्याची गरज असते तेव्हा.

या प्रकारे औषध देण्याचे ३ उपप्रकार आहेत :
१. सामान्य इंजेक्शन : जेव्हा औषध द्रव स्वरूपात लहान प्रमाणात द्यायचे असते तेव्हा ते सिरींजमध्ये भरून सुईद्वारा टोचले जाते.
२. इन्फ्युजन : जेव्हा द्रव औषध मोठ्या प्रमाणात द्यायचे असते तेव्हा ते रक्तवाहिनीतून हळूहळू सोडले जाते.
३. इम्प्लांट : यात एखादे औषध त्वचेवर छेद घेऊन तिच्याखाली ठेवले जाते.

सामान्य इंजेक्शन : हा प्रकार तिघांमध्ये सर्वाधिक वापरला जाणारा असल्याने त्याबद्दल सविस्तर पाहू. सामान्य इंजेक्शन शरीरात ४ प्रकारे देता येते :

१.स्नायूंमध्ये.
२. रक्तवाहिनीत
३. त्वचेखालच्या निकटच्या भागात
४. त्वचेमध्येच

*
१. स्नायूंमध्ये (IM) :
IM inject.jpg

हा प्रकार खूप औषधांच्या बाबतीत वापरला जात असल्याने सर्वपरिचित आहे. आपल्यातील प्रत्येकाने कधी ना कधी या प्रकारचे इंजेक्शन घेतलेले असते. अलीकडील उदाहरण म्हणजे कोविडची लस. या प्रकारे इंजेक्शन देताना शरीरातील तीन जागा गरजेनुसार निवडता येतात :

अ) दंडाची बाहेरील बाजू : इथे २ ml पर्यंत द्रव टोचता येतो. इथून टोचलेल्या औषधाच्या शोषणाची गती चांगली असते.
आ) खुब्यावर : इथे ८ ml पर्यंतचा द्रव टोचता येतो. मात्र येथून होणारी शोषणाची गती वरील १ पेक्षा कमी असते.
इ) मांडीची बाहेरील बाजू : इथे ५ ml पर्यंत द्रव टोचता येतो. ही जागा लहान मुलांमध्ये निवडली जाते.

स्नायूमध्ये टोचलेले औषध हळूहळू झिरपत रक्तप्रवाहात पोचते. जी औषधे स्नायूदाह करणारी असतात ती या प्रकारे देता येत नाहीत; ती थेट रक्तवाहिनीतच द्यावी लागतात.

२. रक्तवाहिनीतून दिलेले इंजेक्शन (IV):
याप्रकारे दिलेले औषध थेट रक्तप्रवाहात जात असल्याने त्याची पूर्ण मात्रा शरीरासाठी उपलब्ध होते.
सर्वसाधारणपणे या प्रकारचे इंजेक्शन नीलावाहिन्यांमधून (veins) देतात. या वाहिन्या त्वचेखालोखाल असतात आणि त्या त्वचेवरून सहज दिसतात. बहुतेक वेळा कोपर किंवा मनगटाच्या पुढील बाजूच्या नीलांची निवड केली जाते.
या इंजेक्शनचे दोन प्रकार आहेत :

a. एका दमात दिलेले इंजेक्शन : यात सिरींजमध्ये द्रव भरून तो रक्तवाहिनीत वेगाने सोडला जातो. अशा प्रकारे जास्तीत जास्त १० ml द्रव देता येतो. रक्तात शिरलेले औषध आधी हृदय, मग फुफ्फुसे आणि मग रोहिणी वाहिन्यांद्वारा सर्व शरीरात पोचते. अशा औषधी इंजेक्शनचा परिणाम सुमारे 20 ते 40 सेकंदात दिसतो. अशा इंजेक्शनचे एक उदा. म्हणजे Calcium gluconate.

b. हळू दिलेले इन्फ्युजन : जेव्हा एखादे औषध मोठ्या प्रमाणात बऱ्याच वेळासाठी द्यायचे असते तेव्हा या पद्धतीचा वापर केला जातो. यात मूळ औषध एखाद्या सलाईनच्या बाटलीमध्ये मिसळले जाते. आणि मग हे मिश्रण थेंब थेंब स्वरूपात रक्तात सोडले जाते. रुग्णालयात दाखल झालेल्या विविध प्रकारच्या रुग्णांच्या बाबतीत अशा प्रकारे औषधे दिली जातात.

c. रोहिणीवाहिन्यांतून (arteries) दिलेले इंजेक्शन (IA):
याचा वापर अत्यंत मर्यादित असून काही ठराविक आजारांतच केला जातो. अशा प्रकारे दिलेले औषध फक्त निवडक पेशींपुरते काम करते. उदाहरणार्थ, एखाद्या कर्करोगाची गाठ. अशा प्रकारे इंजेक्शन दिल्याने त्याचा जास्तीत जास्त परिणाम संबंधित गाठीवर होतो आणि संपूर्ण शरीरावर होणारे दुष्परिणाम कमीत कमी राहतात. तसेच विशिष्ट रोहिणीमध्ये रक्ताच्या गुठळ्या झाल्यासही या प्रकारे इंजेक्शन देतात.

३. त्वचेच्या खालच्या निकटच्या मेदथरात (SC):
अशी इंजेक्शन्स सहसा दंड/मांडीच्या बाहेरील बाजूस किंवा पोटावर देतात. स्नायूमध्ये दिलेल्या इंजेक्शनपेक्षा यात कमी प्रमाणात औषध टोचता येते. त्या औषधाचे शोषण स्नायूपेक्षा कमी गतीने परंतु तोंडाने घेतलेल्या औषधापेक्षा जास्त गतीने होते. या प्रकारात ३ उपप्रकार असून त्यांची उदाहरणे अशी आहेत :
a. एका दमात दिलेले इंजेक्शन: इन्सुलिनचा एक डोस किंवा रक्तगुठळ्यांच्या उपचारासाठी दिलेले हेपारिन ही त्याची परिचित उदाहरणे.
b. इन्फ्युजन : सध्या विविध प्रकारचे इन्शुलिन पंप उपलब्ध आहेत. त्यातून गरजेनुसार इन्शुलिन शरीरात सोडले जाते.
c. इम्प्लांट : यात त्वचेवर छोटीशी शस्त्रक्रिया करून औषध आत छोट्या वडीच्या स्वरूपात ठेवले जाते. गर्भनिरोधक हॉर्मोन्स हे याचे उत्तम उदाहरण आहे. अशा वडीतून संबंधित औषध सुमारे 3 ते 5 वर्षे हळूहळू शरीरात सोडले जाते.

४. त्वचेमध्ये दिलेले इंजेक्शन (ID) :
साधारणपणे ते हाताच्या कोपर ते मनगट या पट्ट्यातील पुढच्या बाजूस दिले जाते. अशा प्रकारे दिलेले औषध रक्तप्रवाहात जवळजवळ शोषले जात नाही. याची ठळक उदाहरणे :
a. काही रोगांसाठी लसीकरण
b. रोगनिदान चाचण्यांसाठी टोचलेला द्रव.
….
पारंपरिक इंजेक्शन पद्धतीत सिरींजमध्ये औषध भरले जाते आणि तिला जोडलेल्या सुईमार्फत शरीरात सोडले जाते. यामध्ये रुग्णाला सुई टोचणे हा भाग वेदनादायी असतो. त्या दृष्टीने सुईविरहित इंजेक्शन ही संकल्पना गेल्या दशकात मांडली गेली. त्यावर अव्याहत संशोधन चालू आहे. या तंत्रज्ञानात विशिष्ट औषध खालील प्रकारे त्वचेतून आत वेगाने सोडले जाते :
• धक्का लहरींचा वापर
• वायुदाबाचा वापर
• सूक्ष्म वीजवापर
• लेझर तंत्र

या नव्या पद्धतीचे फायदे आणि तोटे दोन्ही लक्षात घ्यावे लागतील.
• फायदा : काही औषधे मुळातच घट्ट व चिकट स्वरूपाची असतात. ती पारंपरिक इंजेक्शनने देता येत नाहीत. ती देणे आता शक्य होईल.
• तोटा : औषध त्वचेखाली सोडण्यासाठी उच्च दाबाचा वापर केला जातो. त्यातून त्वचेखालील थरांना इजा होऊ शकते.
एक महत्त्वाचे : या नव्या तंत्राने रक्तवाहिनीतून इंजेक्शन देता येत नाही. इंजेक्शनचे बाकी वर वर्णन केलेले इतर मार्ग या प्रकारे हाताळता येतील.
....

आतापर्यंत आपण पचनसंस्थेद्वारा आणि विविध इंजेक्शन्सच्या स्वरूपात देण्यात येणाऱ्या औषधमार्गांचा आढावा घेतला. बहुसंख्य रोगोपचारांत हे दोन मार्ग प्रामुख्याने वापरले जातात. याव्यतिरिक्त औषध देण्याचे जे अन्य शरीरमार्ग आहेत त्यांचे विवेचन पुढील भागात करेन.
...................................................
क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

४. जिभेखालच्या भागात वाटेल त्या पदार्थाचे शोषण होत नाही. पूर्णपणे मेदप्रेमी किंवा पूर्णपणे जलप्रेमी अशी रसायने फारशी शोषली जात नाहीत. परंतु या दोघांच्या मध्यावर गुणधर्म असणारी रसायने इथून शोषली जातात. लेखात म्हटल्याप्रमाणे खूप शक्तीमान प्रकारचीच औषधे तिथे ठेवली असता काही सेकंदात शोषली जाऊ शकतात. (अन्नाच्या तुलनेत औषधाचे कण सूक्ष्म रूपात असतात)

५. एरवी आपण जे पाणी पितो त्याचा बहुतांशी भाग जिभेवरून अन्ननलिकेत पुढे जातो. त्याचा किरकोळ भाग जिभेखाली जाऊन पुरेसा वेळ तिथे राहील ही शक्यता फार कमी आहे. तसेच तोंडात सतत स्रवणारी लाळ ही तोंडातील बहुतेक घटकांना अन्ननलिकेत जाण्यास भाग पाडते.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

कुठेतरी वाचलेले, ऐकलेले ते असे (कितपत वैज्ञानिक आहे माहीत नाही) -
आपण अन्नाचा घास तोंडात घालून चावत असताना जिभेवरची काही केंद्रं ही तोंडात कुठल्या प्रकारचे अन्न चघळले जात आहे, याची पूर्वसूचना मेंदूला पाठवतात, जेणेकरून मेंदू ते अन्न पचवण्यास लागणार्‍या रसायनांच्या योग्य मात्रेची जठरात तजवीज करून ठेवतो.

तर जिभेखालच्या या भागाचा याच्याशी काही संबंध असावा असे वाटले.

(फारच अवांतर आणि फाटे फोडणारे झाले का? माफ करा.)

जेणेकरून मेंदू ते अन्न पचवण्यास लागणार्‍या रसायनांच्या
>>>हा भाग सवडीने पचनविज्ञान धाग्यावर घेता येईल.
चांगली चर्चा .

डॉं., अँटीअ‍ॅसिड आणि हार्ट्बर्न साठीच्या गोळ्या ह्या शक्यतो चावून खायच्या प्रकारात किंवा लिक्विड प्रकारात येतात पण त्याचा उपयोग हा अन्ननलिकेच्या आतील आवरणावर काम करणे हा असतो का?

अँटीअ‍ॅसिड आणि हार्ट्बर्न साठीच्या गोळ्या >>>

अशा गोळ्या ३ प्रकारे काम करतात :
१. जठरातील आम्लाचे neutralization
२. आतील आवरणाचे आम्लापासून संरक्षण
३. अन्ननलिकेत वर येऊ पाहणारे आम्ल खाली ढकलणे

चघळायच्या व गिळायच्या गोळ्या >>>

या दोन प्रकारांमध्ये चांगलं किंवा वाईट असं नाही म्हणता येत. गोळीच्या रासायनिक गुणधर्मानुसार काही औषधे चघळायच्या स्वरूपात करता येतात. विशेषता मुलांमध्ये अशा गोळ्यांचा फायदा होतो. तसेच ज्या वृद्धांना गोळी किंवा कॅप्सूल गिळण्याची नेहमी भीती वाटते त्यांनाही अशा गोळ्यांचा फायदा होतो.

चघळायच्या गोळ्यांचे अन्य काही फायदे असे:
१. प्रवासात बरोबर पाणी नसेल तरी त्या पटकन घेता येतात

२.गिळण्याच्या गोळीला तयार करताना ठराविक वजनाची मर्यादा असते (एक ग्रॅमपेक्षा कमी).चघळायच्या गोळ्या अधिक वजनाच्या बनवता येतात.

३. अशा गोळ्यांचा परिणाम लवकर व अधिक दिसतो.

धन्यवाद डॉ.
>>> गोळी किंवा कॅप्सूल गिळण्याची नेहमी भीती वाटते त्यांनाही अशा गोळ्यांचा फायदा होतो.>>> पटले.

धन्यवाद.
….
गर्भनिरोधना संबंधी असल्याने इथे लिहितो.

उद्यानशेती संघटनेच्या विद्यमाने नव्या प्रकारचे पर्यावरणपूरक निरोध तयार केलेले आहेत.
हे वापरून झाल्यावर कुंडीतल्या मातीत पुरता येतात. तिथे त्यांचे नैसर्गिक विघटन होते.

https://www.aninews.in/news/lifestyle/quirky/vegetable-themed-condoms-fu...

व्यक्तिगत संपर्कातून एक चांगला प्रश्न आलाय. तो इथे घेतो.
*एखादे औषध शरीरात योग्य तिथेच जाऊन कसे काम करते?

औषधांच्या रासायनिक गुणधर्मानुसार ती तीन प्रकारची असतात :
१. अत्यंत निवडक कृती करणारी
२.मध्यम निवडक
३.विशिष्ट पेशी निवड नसणारी

म्हणजेच,
पहिल्या गटातील औषधे शरीरातील अत्यंत निवडक प्रकारच्या पेशींवरच काम करतील. तर तिसऱ्या गटातील औषधे एकदा का रक्तप्रवाहातून सर्वत्र पोहोचली की शरीरभर परिणाम दाखवू शकतील.
आता हे असे का होते ?
औषध जेव्हा रक्तप्रवाहमार्फत एखाद्या वैयक्तिक पेशीच्या आवरणापर्यंत पोचते, तिथे त्याचे स्वागत करण्यासाठी काही विशिष्ट प्रथिने असतात (Receptors). या प्रथिनांचे वेगवेगळे प्रकार असतात.
काही औषधांच्या बाबतीत, ते औषध फक्त एकाच प्रकारच्या R शी सलगी करू शकते आणि मगच त्याला पेशीच्या आत घेतले जाते.
( एक कुलूप ; एकच किल्ली).
परंतु, काही औषधांच्या बाबतीत परिस्थिती एकदम उलट आहे. ती औषधे कुठल्याही प्रकारच्या Rs शी संयोग करू शकतात. त्यामुळे त्यांचा प्रवेश अनेक प्रकारच्या पेशींमध्ये होऊ शकतो.
( येथे मास्टर की ची उपमा द्यावी लागेल!)

आता वरील प्रत्येक गटाचे एकेक उदाहरण :

1.digoxin : मुख्यतः हृदयपेशीशी सलगी करते.

2. aspirin : शरीरात जिथे जिथे दाह झाला असेल तिथे काम करते

3. atropine : पचनसंस्था, डोळ्यांचे स्नायू आणि श्वसनसंस्था अशा विविध ठिकाणी काम करू शकते.

हाडांच्या जंतुसंसर्गासाठी स्थानिक औषध implant करण्याचे नवे तंत्रज्ञान विकसित होत आहे. यामध्ये एखादे प्रतिजैविक बोन सिमेंटमध्ये मिसळून या मिश्रणाचा implant हाडां मध्ये केला जातो त्यातून उपयुक्तता खूप वाढते

https://www.nature.com/articles/s41551-022-00950-x

Tab आणि capsule हे वेगळे का.
दोन घटक एकत्र करून दोन स्तराच्या टॅबलेट पण असतात.
मग capsule मध्ये काय वेगळे असते.

डॉक्टर हा विषय तसा खूप अवघड आणि गुंता गुंतीचा आहे.
तुम्ही सोपा केला असला तरी एका लेखात वर वरचे सांगायचं प्रयत्न केला आहे.

. मला एक प्रश्न नेहमी पडतो.
तुम्ही मला काय विचारायचे आहे ते समजून घ्या मला सांगता येत नाही .
उदाहरण देतो.
Crocin किंवा dolo सारख्या गोळ्या ताप उतरण्या साठी देतात.
त्या मेंदू मध्ये शरीराचे तापमान नियंत्रित करणारे केंद्र असते त्याच्या कामात हस्तक्षेप करून ताप उतरवतात.
आता प्रश्न हा आहे.
ताप येण्याचे काही तरी कारण असते ते कारण तसेच राहतें

म्हणजे विषाणू नी प्रवेश केल्या मुळे होणाऱ्या संघर्ष मध्ये तापमान वाढले असेल तर त्या वर उपाय होत नाही.
पण सरळ मेंदू मधील केंद्रात हस्तक्षेप करून ताप उतरतो.
म्हणजे गावातील प्रश्न सोडवण्यासाठी पंतप्रधान ना कामाला लावण्या सारखे आहे.
मग ग्रामपंचायत,zp, राज्य सरकार ह्यांना काहीच काम राहतं नाहीं
आणि
ह्या मुळे हे लोकल अवयव (म्हणजे मेंदू व्यतिरिक्त बाकी अवयव ज्यांच्या वर सुरक्षा करण्याची आणि उपाय करण्याची जबाबदारी आहेत ते) chya kamat अडथळा तर नाही येत ना

म्हणजे विषाणू नी प्रवेश केल्या मुळे होणाऱ्या संघर्ष मध्ये तापमान वाढले असेल तर त्या वर उपाय होत नाही.
>> चांगला प्रश्न.
जेव्हा जंतुसंसर्ग झालेला असतो तेव्हा उपचारांचे दोन स्तर असतात :
१. जंतू विरोधी औषधे देणे : यांचे काम मुख्य असते.
२. खूप चढलेला ताप लवकर उतरण्यास मदत व्हावी म्हणून पूरक तापशामक औषधे देणे. (लक्षण केंद्रित उपचार)

या दोन्हींच्या सहयोगाने आजार नियंत्रणात येतो.

आता एखादा सौम्य संसर्गाचा आजार पाहू.

ताप आलेला आहे परंतु परिस्थिती सौम्य आहे. अशा वेळेस फक्त तापशामक औषध दिले असता ताप उतरून तापमानाचे दुष्परिणाम वाचवता येतात.
संसर्गाचा प्रतिकार शरीराची प्रतिकार शक्तीच करते. प्रत्येक जंतुसंसर्गामध्ये लगेच जंतू विरोधी औषधे द्यायची नसतात..

तारतम्य महत्त्वाचे

औषधांमधील बनवाबनवी
https://maharashtratimes.com/editorial/article/10-to-30-percent-of-drugs...

अलीकडेच मुंबईतील एका नामांकित रुग्णालयात एका रुग्णाला लोहाचे (आयर्न) इंजेक्शन दिल्यानंतर, रुग्ण मृत्यू पावला आणि खळबळ माजली. उत्पादकाकडून काही चूक झालीये की हे औषधे बनावट होते, याचा तपास झाला. हे औषध मूळ कंपनीने बनवलेले नव्हतेच, तर त्या नामांकित ब्रँडची हुबेहूब नक्कल केलेले बनावट इंजेक्शन होते.

https://www.sciencealert.com/death-toll-rises-in-outbreak-linked-to-cont...

अमेरिकेत भारतात बनवल्या गेलेल्या eye drop मुळे काही लोक मृत्यू मुखी पडली आहेत.
हे eye drops बनावट नाहीत.
पण योग्य ती काळजी निर्मिती करताना घेतली नाही.
दर्जा राखला गेलेला नाही.
भारतात बनवलेल्या औषध मुळे जगात मृत्यू होण्याच्या घटना घडलेल्या आहेत

होय, ती डोळ्यांची बातमी मी कालच वाचली होती. तो प्रकार सर्वप्रथम मे 2022 मध्येच लक्षात आलेला होता.
आता कंपनीने बाजारातील सर्व बाटल्या परत मागवल्यात.
https://www.fda.gov/safety/recalls-market-withdrawals-safety-alerts/glob...

+१११
.....
गेल्या काही वर्षांमध्ये संगणक वापरामुळे डोळे कोरडे पडण्याच्या समस्या वाढल्या आहेत. त्यावर उपाय म्हणून विविध प्रकारचे औषधी थेंब उपलब्ध आहेत. अशा थेंबांचा वापर करताना काही सूचना:

१. त्या थेंबाच्या बाटलीवर स्पष्ट लिहिलेले असते की, बाटली उघडल्यानंतर जास्तीत जास्त एक महिना ते वापरावेत. हे काटेकोरपणे पाळले गेले पाहिजे.

२. एक महिन्यानंतर औषध उरले आहे आणि ते महाग आहे म्हणून काही वेळेस लोक ते पुढे रेटताना दिसतात. असे अजिबात करू नये.

३. मी तर त्याही पुढे जाऊन असे म्हणेन की, शक्यतो ते तीन आठवडेच वापरावे.

४. त्यातही, बाटली उघडल्यानंतर पंधरा दिवसांनी थेंब टाकताना अजून एक काळजी घ्यावी. बाटली दाबल्यानंतरचा पहिला थेंब बाहेर सोडून द्यावा (वाया गेला तरी हरकत नाही) आणि मग पुढचा थेंब डोळ्यात टाकावा.

'स्तनांच्या कर्करोगाची शस्त्रक्रिया झालेली असल्यास त्या बाजूच्या शिरेने आयव्ही देणे वर्ज्य का असते? >>>

हे कोणी अधिकृत व्यक्तीने सांगितले आहे का, किंवा संदर्भ आहे का ?
मला तरी यामागे काही तर्क दिसत नाही. मी माझ्या सर्जन मित्राशी फोनवर चर्चा केली.
तोही म्हणाला की यात काही तथ्य नाही.'
या बाबतीत माझ्या निकटच्या नात्यातील एक स्त्रीची स्तनांच्या कर्करोगाची शस्त्रक्रिया झालेली असून तिचे lymph nodes (लसिका ग्रंथी ) काढलेल्या आहेत. तिला डॉक्टरांनी बाजावून सांगितले, 'या हातावर कोणतेही इंजेक्शन घ्यायचे नाही, रक्तदाब देखील या हातावर तपसायचा नाही. ही गोष्ट दहा ते बारा वर्षांपूर्वीची आहे.

ससु
माझे स्पष्टीकरण मी इथे दिलेले आहे:
Submitted by कुमार१ on 5 May, 2022 - 16:47

काही डॉक्टरांच्या मते हा अति अतिरिक्त काळजी घेण्याचा एक भाग दिसतोय. विशेषतः मधुमेह आणि अन्य काही व्याधी असतील तर मग अजूनच काळजी वगैरे...

रक्तदाबासंबंधी नाही पटले.

Ear buds च वाढत असलेला वापर!!
मी जन्म पासून आज पर्यंत मला कळत आहे तसे earbuds वापरले नाहीत.
पण कानात मळ वैगेरे काही जमा नाही.
शरीर त्याची विल्हेवाट लावते असा अनुभव आहे.
आता नवीनच नेट वर वाचायला मिळते.
स्त्री ची योनी clean करण्याचे पण औषध उपलब्ध आहे.
पण तज्ञ .
ची मत पण वाचनात आहेत की ते धोकादायक आहे.
शरीरात स्वतःची यंत्रणा आहे ती साफसफाई ठेवते.
अवांतर आहे .
पण महत्वाचे पण आहे.
तेच eye drop बाबत पण आहे .
लोक स्वतःच आय drop वापरतात.

>>>औषधांमधील बनवाबनवी>>>
बापरे ! भयानक प्रकार आहेत हे. दोषी लोकांना कडक शिक्षा झाल्या पाहिजेत

Pages