औषधांचा शरीर-प्रवेश (१)

Submitted by कुमार१ on 3 May, 2022 - 21:56

निसर्ग आपल्याला जन्मताच एक अमूल्य शरीर देतो. अगदी जन्मापासून ते मृत्यूपर्यंत हे शरीर कधी ना कधी कुठल्या तरी रोगाची शिकार बनते. रोग म्हटला की उपचार करणे आले. उपचारांमध्ये घरगुती उपायांपासून अनेक प्रकारच्या औषधांचा समावेश होतो. आधुनिक वैद्यकात रुग्णास औषध देण्याचे अनेक मार्ग(routes)आहेत. त्यातले सर्वपरिचित मार्ग म्हणजे :

औषध तोंडाने घेणे, औषधाचा वाफारा नाका/तोंडाद्वारे घेणे, स्नायू अथवा रक्तवाहिनीतून इंजेक्शन्स घेणे आणि त्वचेवर मलम लावणे.
पण शरीरात औषध पोचवण्याचे याव्यतिरिक्तही अनेक मार्ग आहेत. वरील चार परिचित प्रकारांचेही अनेक उपप्रकार आहेत. या सर्वांचा सोदाहरण आढावा या लेखद्वयात घ्यायचा आहे. काही ठराविक औषधे शरीराच्या एखाद्याच छोट्या भागात काम करण्यापुरती वापरली जातात. उदाहरणार्थ, डोळ्यात टाकायचे थेंब. परंतु बरीच औषधे शरीरात गेल्यानंतर रक्तप्रवाहाद्वारे संपूर्ण शरीरभर पसरतात. अशा औषध-प्रवासाचा विस्तृत आढावा आता घेतो.

तोंडाद्वारे घेतलेली औषधे
अशी औषधे गोळी, कॅप्सूल, चुरा किंवा द्रव स्वरूपात असतात. तोंडाद्वारे घ्यायच्या मार्गात दोन पद्धती आहेत :
1. औषध जिभेवर ठेवून गिळणे
2. औषध जिभेखाली ठेवून विरघळवू देणे
हे दोन्ही मार्ग जरी एकाच पोकळीत जवळपास असले तरी त्यांच्याद्वारे होणाऱ्या परिणामांमध्ये लक्षणीय फरक आहे ! तो आता समजून घेऊ.

१. जे औषध जिभेवर ठेवून पाण्याच्या मदतीने गिळले जाते त्याचा पुढील प्रवास संपूर्ण पचनसंस्थेतून होतो. बहुतेक औषधांचे सर्वाधिक शोषण लहान आतड्याद्वारा होते. असे शोषण झाल्यानंतर ते पचनसंस्थेच्या स्थानिक रक्तप्रवाहात (portal) जाते. तिथून पुढे यकृतात आणि पुढे मजल दरमजल करीत शरीराच्या मुख्य रक्तप्रवाहात (systemic)पोचते. तोंडातून अशा प्रकारे घेतलेल्या औषधाच्या शोषणावर पचनसंस्थेतील अनेक घटकांचा परिणाम होतो. जसे की, आहाराचे स्वरूप, विविध हॉर्मोन्स व चेतातंतूंचे परिणाम, पचनाचे आजार, इत्यादी. तसेच एखादे औषध हे गोळी, कॅप्सूल की द्रव स्वरूपात आहे यावरही त्याचे शोषण अवलंबून असते.

capsule.jpgकॅप्सूलचे विशिष्ट फायदे :
कॅप्सूल म्हणजे जिलेटिनचे एक कवच असते. त्याच्यात औषध व पूरक रसायने एकत्र घातलेली असतात. आपण कॅप्सूल गिळल्यानंतर ती पचनमार्गात ओली होऊन फुगते आणि मग त्यातले औषध बाहेर पडते. कॅप्सूलमधील औषध द्रव स्वरूपात असल्यास त्याचे शोषण तुलनेने लवकर होते. काही औषधे सामान्य गोळीच्या स्वरूपात थेट जठरात जाणे इष्ट नसते. तिथल्या तीव्र आम्लतेमुळे त्यांचा नाश होऊ शकतो. म्हणून ती कॅप्सूलमध्ये भरून पुन्हा तिच्यावर एक विशिष्ट प्रकारचे वेस्टण चढवले जाते. हे वेस्टण आम्लतारोधक असते. अशी कॅप्सूल जेव्हा जठरात येते तेव्हा तिथल्या आम्लतेचा तिच्यावर परिणाम होत नाही आणि ती मूळ स्वरूपात लहान आतड्यात पोचते. तेथील कमी आम्लता असलेल्या वातावरणात वेस्टण विरघळते आणि मग औषध बाहेर पडते. या प्रकारच्या वेस्टणाला enteric coating असे म्हणतात.

जठरातील अन्न आणि तोंडाने घेतलेल्या औषधाचे शोषण हे दोन्ही घटक एकमेकांशी चांगलेच निगडीत आहेत. औषधाच्या रासायनिक स्वरूपानुसार ते उपाशीपोटी, मुख्य जेवणापूर्वी का जेवणानंतर लगेच घ्यायचे, याचे नियम ठरलेले असतात. बहुतेक रसायनयुक्त औषधे जठराच्या आतील आवरणाचा दाह करणारी असल्यामुळे ती जेवणानंतर घेणे इष्ट असते. मात्र, ज्या औषधांचे शोषण अन्नामुळे बरेच कमी होते अशी औषधे निक्षून सकाळी उठल्यानंतर उपाशीपोटी घ्यावी लागतात; याचे सध्याचे बहुपरिचित उदाहरण म्हणजे थायरोक्सिनची गोळी. रेचक प्रकारची औषधे रात्रीच्या जेवणानंतर झोपण्यापूर्वी घ्यावी लागतात.

२. औषध जिभेखाली ठेवणे : तोंडातील अन्य भागांशी तुलना करता जिभेखालच्या भागातील म्युकस आवरण विशिष्ट प्रकारचे आहे. त्यामुळे इथे ठेवलेल्या औषधाचे शोषण तुलनेने चांगले व सहज होते. या भागातला रक्तपुरवठाही भरपूर असतो. इथल्या औषधाचे शोषण झाल्यावर ते लगेचच शरीराच्या मुख्य रक्तप्रवाहात जाते. त्यामुळे वरील १ मध्ये असलेला संपूर्ण पचनसंस्था आणि यकृत हा लांबचा प्रवास पूर्णपणे वाचतो. अशा प्रकारे घेतलेल्या औषधाचा परिणाम त्वरित आणि अधिक प्रमाणात दिसून येतो. जी औषधे तोंडाने गिळून घेतली असता जठरात गेल्यावर त्यांचा नाश होण्याची शक्यता असते, अशी औषधे या प्रकारे देता येतात. तसेच गिळण्याच्या व पचनसंस्थेच्या आजारांमध्ये या औषधमार्गाचा उपयोग केला जातो.

अर्थात या औषधमार्गाची एक मर्यादाही आहे. इथे औषधाच्या शोषणासाठी उपलब्ध असलेली जागा अत्यंत कमी आहे. त्यामुळे शक्तिमान (potent) प्रकारचीच औषधे इथून देणे सयुक्तिक ठरते. तसेच जिभेखाली ठेवलेले औषध पूर्ण विरघळून जाईपर्यंत संबंधित रुग्णाने बोलणे, पाणी पिणे आणि गिळणे या सर्व क्रिया निक्षून टाळायच्या असतात. तसे न केल्यास औषधाचा काही भाग अन्ननलिकेतून पुढे जठरात जाईल आणि मग या प्रकारे औषध देण्याच्या प्रकारालाच बाधा पोचेल. या प्रकारे दिलेल्या औषधाचे बहुपरिचित उदाहरण म्हणजे nitroglycerin. हृदयविकारातील अंजायना या स्थितीमध्ये हे औषध रुग्ण स्वतःच पटकन जिभेखाली ठेवू शकतो.

गुदद्वारातून दिलेली औषधे
बद्धकोष्ठतेसाठी देण्यात येणारा ‘एनिमा’ सर्वपरिचित आहे. या प्रसंगात संबंधित औषध हे फक्त स्थानिक काम करते. मात्र काही प्रसंगी या मार्गाने दिलेले औषध रक्तप्रवाहात शोषले जाऊन सर्व शरीरभर पोचू शकते. या मार्गातून औषध देणे अर्थातच सुखावह प्रकार नाही ! त्यामुळे काही विशिष्ट परिस्थितीतच त्याचा अवलंब केला जातो, जसे की :
• रुग्णास प्रचंड उलट्या होत असताना किंवा गिळण्याचे त्रास असताना
• बेशुद्धावस्थेतील रुग्ण
• लहान मुलांमध्ये एखादे कडूजहर औषध देण्यासाठी
Lidocaine हे या प्रकारातील एक उदाहरण. ते भूलकारक असून हृदयतालबिघाडही दुरुस्त करते.
………….
इंजेक्शनद्वारा दिलेली औषधे

injection (2).jpg

इंजेक्शन हा मुळातच लहानांपासून मोठ्यांपर्यंत कुणालाच नकोसा वाटणारा प्रकार ! त्याची कमी-अधिक भीती प्रत्येकाच्या मनात असते. इंजेक्शनचे नाव काढताच भोकाड पसरणारी मुले हे तर सार्वत्रिक दृश्य. परंतु, एरवी व्रात्य मुलांना इंजेक्शनवाल्या डॉक्टरांची भीती दाखवणारे पालक, जेव्हा स्वतःवर इंजेक्शन घ्यायची वेळ येते तेव्हा त्यांची अवस्था थोडीफार लहान मुलासारखीच झालेली असते. Happy

या प्रकारात त्वचेतून सुई टोचून औषध शरीरात सोडले जाते. खालील परिस्थितीत या मार्गे औषध देण्याचा निर्णय घेतला जातो:
१. काही औषधे पचनसंस्थेद्वारे शोषली जाऊ शकत नाहीत. तर अन्य काही (उदा. इन्सुलिन) पचनसंस्थेतच नाश पावतात.
२. बेशुद्धावस्थेतील रुग्ण
३. जेव्हा औषधाचा परिणाम तातडीने होण्याची गरज असते तेव्हा.

या प्रकारे औषध देण्याचे ३ उपप्रकार आहेत :
१. सामान्य इंजेक्शन : जेव्हा औषध द्रव स्वरूपात लहान प्रमाणात द्यायचे असते तेव्हा ते सिरींजमध्ये भरून सुईद्वारा टोचले जाते.
२. इन्फ्युजन : जेव्हा द्रव औषध मोठ्या प्रमाणात द्यायचे असते तेव्हा ते रक्तवाहिनीतून हळूहळू सोडले जाते.
३. इम्प्लांट : यात एखादे औषध त्वचेवर छेद घेऊन तिच्याखाली ठेवले जाते.

सामान्य इंजेक्शन : हा प्रकार तिघांमध्ये सर्वाधिक वापरला जाणारा असल्याने त्याबद्दल सविस्तर पाहू. सामान्य इंजेक्शन शरीरात ४ प्रकारे देता येते :

१.स्नायूंमध्ये.
२. रक्तवाहिनीत
३. त्वचेखालच्या निकटच्या भागात
४. त्वचेमध्येच

*
१. स्नायूंमध्ये (IM) :
IM inject.jpg

हा प्रकार खूप औषधांच्या बाबतीत वापरला जात असल्याने सर्वपरिचित आहे. आपल्यातील प्रत्येकाने कधी ना कधी या प्रकारचे इंजेक्शन घेतलेले असते. अलीकडील उदाहरण म्हणजे कोविडची लस. या प्रकारे इंजेक्शन देताना शरीरातील तीन जागा गरजेनुसार निवडता येतात :

अ) दंडाची बाहेरील बाजू : इथे २ ml पर्यंत द्रव टोचता येतो. इथून टोचलेल्या औषधाच्या शोषणाची गती चांगली असते.
आ) खुब्यावर : इथे ८ ml पर्यंतचा द्रव टोचता येतो. मात्र येथून होणारी शोषणाची गती वरील १ पेक्षा कमी असते.
इ) मांडीची बाहेरील बाजू : इथे ५ ml पर्यंत द्रव टोचता येतो. ही जागा लहान मुलांमध्ये निवडली जाते.

स्नायूमध्ये टोचलेले औषध हळूहळू झिरपत रक्तप्रवाहात पोचते. जी औषधे स्नायूदाह करणारी असतात ती या प्रकारे देता येत नाहीत; ती थेट रक्तवाहिनीतच द्यावी लागतात.

२. रक्तवाहिनीतून दिलेले इंजेक्शन (IV):
याप्रकारे दिलेले औषध थेट रक्तप्रवाहात जात असल्याने त्याची पूर्ण मात्रा शरीरासाठी उपलब्ध होते.
सर्वसाधारणपणे या प्रकारचे इंजेक्शन नीलावाहिन्यांमधून (veins) देतात. या वाहिन्या त्वचेखालोखाल असतात आणि त्या त्वचेवरून सहज दिसतात. बहुतेक वेळा कोपर किंवा मनगटाच्या पुढील बाजूच्या नीलांची निवड केली जाते.
या इंजेक्शनचे दोन प्रकार आहेत :

a. एका दमात दिलेले इंजेक्शन : यात सिरींजमध्ये द्रव भरून तो रक्तवाहिनीत वेगाने सोडला जातो. अशा प्रकारे जास्तीत जास्त १० ml द्रव देता येतो. रक्तात शिरलेले औषध आधी हृदय, मग फुफ्फुसे आणि मग रोहिणी वाहिन्यांद्वारा सर्व शरीरात पोचते. अशा औषधी इंजेक्शनचा परिणाम सुमारे 20 ते 40 सेकंदात दिसतो. अशा इंजेक्शनचे एक उदा. म्हणजे Calcium gluconate.

b. हळू दिलेले इन्फ्युजन : जेव्हा एखादे औषध मोठ्या प्रमाणात बऱ्याच वेळासाठी द्यायचे असते तेव्हा या पद्धतीचा वापर केला जातो. यात मूळ औषध एखाद्या सलाईनच्या बाटलीमध्ये मिसळले जाते. आणि मग हे मिश्रण थेंब थेंब स्वरूपात रक्तात सोडले जाते. रुग्णालयात दाखल झालेल्या विविध प्रकारच्या रुग्णांच्या बाबतीत अशा प्रकारे औषधे दिली जातात.

c. रोहिणीवाहिन्यांतून (arteries) दिलेले इंजेक्शन (IA):
याचा वापर अत्यंत मर्यादित असून काही ठराविक आजारांतच केला जातो. अशा प्रकारे दिलेले औषध फक्त निवडक पेशींपुरते काम करते. उदाहरणार्थ, एखाद्या कर्करोगाची गाठ. अशा प्रकारे इंजेक्शन दिल्याने त्याचा जास्तीत जास्त परिणाम संबंधित गाठीवर होतो आणि संपूर्ण शरीरावर होणारे दुष्परिणाम कमीत कमी राहतात. तसेच विशिष्ट रोहिणीमध्ये रक्ताच्या गुठळ्या झाल्यासही या प्रकारे इंजेक्शन देतात.

३. त्वचेच्या खालच्या निकटच्या मेदथरात (SC):
अशी इंजेक्शन्स सहसा दंड/मांडीच्या बाहेरील बाजूस किंवा पोटावर देतात. स्नायूमध्ये दिलेल्या इंजेक्शनपेक्षा यात कमी प्रमाणात औषध टोचता येते. त्या औषधाचे शोषण स्नायूपेक्षा कमी गतीने परंतु तोंडाने घेतलेल्या औषधापेक्षा जास्त गतीने होते. या प्रकारात ३ उपप्रकार असून त्यांची उदाहरणे अशी आहेत :
a. एका दमात दिलेले इंजेक्शन: इन्सुलिनचा एक डोस किंवा रक्तगुठळ्यांच्या उपचारासाठी दिलेले हेपारिन ही त्याची परिचित उदाहरणे.
b. इन्फ्युजन : सध्या विविध प्रकारचे इन्शुलिन पंप उपलब्ध आहेत. त्यातून गरजेनुसार इन्शुलिन शरीरात सोडले जाते.
c. इम्प्लांट : यात त्वचेवर छोटीशी शस्त्रक्रिया करून औषध आत छोट्या वडीच्या स्वरूपात ठेवले जाते. गर्भनिरोधक हॉर्मोन्स हे याचे उत्तम उदाहरण आहे. अशा वडीतून संबंधित औषध सुमारे 3 ते 5 वर्षे हळूहळू शरीरात सोडले जाते.

४. त्वचेमध्ये दिलेले इंजेक्शन (ID) :
साधारणपणे ते हाताच्या कोपर ते मनगट या पट्ट्यातील पुढच्या बाजूस दिले जाते. अशा प्रकारे दिलेले औषध रक्तप्रवाहात जवळजवळ शोषले जात नाही. याची ठळक उदाहरणे :
a. काही रोगांसाठी लसीकरण
b. रोगनिदान चाचण्यांसाठी टोचलेला द्रव.
….
पारंपरिक इंजेक्शन पद्धतीत सिरींजमध्ये औषध भरले जाते आणि तिला जोडलेल्या सुईमार्फत शरीरात सोडले जाते. यामध्ये रुग्णाला सुई टोचणे हा भाग वेदनादायी असतो. त्या दृष्टीने सुईविरहित इंजेक्शन ही संकल्पना गेल्या दशकात मांडली गेली. त्यावर अव्याहत संशोधन चालू आहे. या तंत्रज्ञानात विशिष्ट औषध खालील प्रकारे त्वचेतून आत वेगाने सोडले जाते :
• धक्का लहरींचा वापर
• वायुदाबाचा वापर
• सूक्ष्म वीजवापर
• लेझर तंत्र

या नव्या पद्धतीचे फायदे आणि तोटे दोन्ही लक्षात घ्यावे लागतील.
• फायदा : काही औषधे मुळातच घट्ट व चिकट स्वरूपाची असतात. ती पारंपरिक इंजेक्शनने देता येत नाहीत. ती देणे आता शक्य होईल.
• तोटा : औषध त्वचेखाली सोडण्यासाठी उच्च दाबाचा वापर केला जातो. त्यातून त्वचेखालील थरांना इजा होऊ शकते.
एक महत्त्वाचे : या नव्या तंत्राने रक्तवाहिनीतून इंजेक्शन देता येत नाही. इंजेक्शनचे बाकी वर वर्णन केलेले इतर मार्ग या प्रकारे हाताळता येतील.
....

आतापर्यंत आपण पचनसंस्थेद्वारा आणि विविध इंजेक्शन्सच्या स्वरूपात देण्यात येणाऱ्या औषधमार्गांचा आढावा घेतला. बहुसंख्य रोगोपचारांत हे दोन मार्ग प्रामुख्याने वापरले जातात. याव्यतिरिक्त औषध देण्याचे जे अन्य शरीरमार्ग आहेत त्यांचे विवेचन पुढील भागात करेन.
...................................................
क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद ! चांगले प्रश्न.

१. कॅप्सूल आख्खी न गिळता काही जण त्याचे आवरण फोडून >>>
हे अयोग्य आहे कारण यात मूळ कॅप्सूल तयार करणे या हेतूलाच बाधा पोचते.
...
२.(क्रोसिनादी) गोळ्यांना जे कोटिंग असतं, त्याचेही काही प्रयोजन >>>

इथे थोडा वेगळा विचार करावा लागेल. काही गोळ्यांना enteric कोटींग असतं ते लेखात दिले आहे. त्यांच्याबाबतीत ती गोळी तोडू नये हे बरोबर.
परंतु काही गोळ्यांना सामान्य कोटिंग असतं. त्याचा हेतू मूळ रसायनाची कडूजहर चव लपवणे हा असतो.
अशा गोळीच्याबाबतीत अर्धी तोडल्यास काही फरक पडू नये.
अर्थात या संदर्भात माझ्यापेक्षा औषधनिर्माण शास्त्रज्ञांचे मत घेणे योग्य राहील.

२. शीर सापडत नसेल तर पाणी प्यायला सांगून थांबतात थोडा वेळ,
>>>
हे मी तरी नाही ऐकलेले. त्यामागे कुठला वैद्यकीय तर्क मला दिसत नाही.
नीला सापडत नसेल तर दंडावर आवळपट्टी बांधणे वगैरे उपाय आहेत.>>>
हो डॉक्टर. माझी शिर सापडत नव्हती तेव्हा नर्सने पाणि भरपुर पीत चला म्हणुन सल्ला दिलेला. डिहायड्रेशन झाल असेल तर शीर सापडत नाही लवकर असा अर्थ घेतला मी त्याचा. माहित नाही बरोबर काय ते.

नीला अजिबात न सापडण्या इतके डीहायड्रेशन झाले असेल तर असा रुग्ण स्वतः चालत रुग्णालयात येणे अवघड वाटते ! त्यामुळे बाह्यरुग्ण विभागापुरता असा सल्ला देण्यात काही अर्थ नाही.

जे रुग्ण तीव्र डीहायड्रेशनमुळे रुग्णालयात भरती झालेले आहेत त्यांच्या बाबतीत तोंडाने पाणी पिऊन पुरणार नाही. त्यांना आधी विशेष मार्गांनी रक्तातून विविध द्रव देऊन नॉर्मल करावे लागेल; म्हणजे मग नीला दिसू शकतील.

बाह्यरुग्ण विभागातील रुग्णाला पाणी पिऊन थोडा वेळ बसा, हा सल्ला मला अयोग्य वाटतो.
२०० मिली पाणी पिऊन रक्ताचा volume वाढेल व लगेच नीलावाहिनी उठून दिसेल हे तर्कापलीकडचे आहे. Happy

नेहमीप्रमाणे लेख व प्रतिसाद माहितीपूर्ण.
काही वेळेला औषध न भरलेली कॅप्सूल प्लॅसिबो म्हणून दिली जाते हे खरे आहे का?

*औषध न भरलेली कॅप्सूल प्लॅसिबो म्हणून दिली जाते हे खरे आहे का?
>>
चांगला प्रश्न.
एखाद्या औषधाच्या संशोधना दरम्यान असा वापर केला जातो. या प्रयोगात लोकांचे दोन गट केलेले असतात. एका गटाला औषधी कॅप्सूल देतात तर दुसऱ्या गटाला त्याच रंग व आकाराची पण औषध नसलेली कॅप्सूल देतात. पण इथे एक अजून काळजी घेतली जाते. रिकामी कॅप्सूल दिल्यास संबंधित लोकांना तिच्या वजनावरून ती रिकामी असल्याचा संशय येऊ शकतो. म्हणून तिच्यात औषधाऐवजी रासायनिक गुणधर्म नसलेली भुकटी भरतात.

शंकानिरसनाबद्दल धन्यवाद कुमार सर.

शीर सापडत नसेल तर पाणी प्यायला >>>>
आमच्या पेशंटला औषधोपचारामुळे अन्न कमी प्रमाणात जायचे. बोटाने दाबून मसाज देऊन, आवळपट्टी कशानेच शीर नाही मिळाली की पाण्याचा सल्ला देऊन थांबवायचे व पुढचा पेशंट घ्यायचे. २०० मिली पाणी पिऊन रक्ताचा volume लगेच वाढेल हे मलाही नाही खरे वाटायचे.
पण शेकडो पेशंट असताना ते तरी एकाशी किती वेळ झटापट करणार...... मग १५ मिनीटाच्या इन्फ्यूजनला २ तास वाट बघणे. नंतर आम्हीच हॉस्पीटलला जायच्या ४-५ दिवस आधीपासून फळांचे पल्प, सूप, पेज, शहाळ्याचे पाणी आवर्जून वाढवायचो. त्याने हा प्रकार निपटला.

स्तनांच्या कर्करोगाची शस्त्रक्रिया झालेली असल्यास त्या बाजूच्या शिरेने आयव्ही देणे वर्ज्य का असते? >>>
हे कोणी अधिकृत व्यक्तीने सांगितले आहे का, किंवा संदर्भ >>>>>
हो. शस्त्रक्रिया म्हणजे पेशंटची एक बाजू पूर्ण काढली होती काही वर्षांपूर्वी, तर Metastasis उपचारात तसे खास विचारून केमोची इन्फ्यूजन दुसर्‍या हाताला लावायचे. तपासणीचे रक्तही त्या बाजूने घ्यायचे नाहीत. एकूणात त्या बाजूला नो टोचाटोची. त्यामुळे नीला शोधण्यातही एक हात बाद असायचा.

इन्फ्युजन देताना नेहमी हृदयापासूनची सर्वात लांब असलेली (distal) जागा आधी निवडतात >>>>
मग मनगट का? घोट्यापासून वर का नाही येत. ते जास्त distal होईल ना. की हृदयापासूनचे अंतरही फार असून चालत नाही? हा प्रश्न उत्तर वाचून मनात आला म्हणून विचारतेय. आगाऊ वाटला तर माफ करा.

हृदयापासून लांबची नीला निवडताना हाताची मागची बाजू की घोटा हा प्रश्न रोचक आहे.

या संदर्भात वाचन केले असता काही गोष्टी लक्षात आल्या. मोठ्या माणसांच्या बहुतेक सूचनांमध्ये पहिला क्रमांक हाताच्या मागची बाजू दिलेला आहे व त्यानंतर घोटा. हा फार मोठा फरक आहे असं नाही. तरीपण जे थोडे फरक त्या दोन जागांमध्ये आहेत ते असे :
हाताच्या मागच्या नीला तुलनेने मोठ्या असून अधिक स्पष्टपणे दिसतात आणि हाताला लागतात.

दुसरा मुद्दा.
जरनीलेत घातलेली सुई दीर्घकाळ चिकटपट्टी लावून तशीच ठेवून द्यायची असेल तर मग ती हलू नये म्हणून बारीकसा फळकुटाचा आधार द्यावा लागतो. हे प्रकार बघता हातावर असे सगळे उद्योग करणे सोयीचे आहे. पायावर केले किती रुग्णाची चालण्यापासूनच अडचण होऊ लागते.

या मुद्द्याकडे विज्ञानापेक्षा रुग्णांची सोय या दृष्टिकोनातून बघावे लागेल.

>>>एखाद्या औषधाच्या संशोधना दरम्यान असा वापर केला जातो.>>> धन्यवाद डॉक्टर.
काही आयसीयू तल्या पेशंटना मानेतून IV इंजेक्शन का देतात ?

**Metastasis उपचारात तसे खास विचारून केमोची इन्फ्यूजन दुसर्‍या हाताला लावायचे. तपासणीचे रक्तही त्या बाजूने घ्यायचे नाहीत. एकूणात त्या बाजूला नो टोचाटोची. त्यामुळे नीला शोधण्यातही एक हात बाद असायचा.
>>>

या संदर्भात मी विचार केल्यानंतर एक मुद्दा माझ्या मनात आला. पण त्यासाठी संदर्भ मला कुठे मिळेना. मग मी अजून एका वरिष्ठ डॉक्टरांशी सल्लामसलत केली. ते म्हणाले ते आता लिहितो.

१. पहिली गोष्ट म्हणजे शस्त्रक्रिया झालेली हाताची बाजू वापरूच नये असे बिलकुल नाही. तसा नियम नाही करता येणार.

२. आता एक शक्यता अशी राहते. जेव्हा एका बाजूची स्तनांची शस्त्रक्रिया झालेली आहे तेव्हा त्याच बरोबर तिकडच्या काखेतील लिंफ ग्रंथीही काढून टाकल्या जातात. समजा, कालांतराने आपण त्या बाजूला टोचाटोची केली आणि चुकून जंतुसंसर्ग झाला, तर ती बाजू सुजण्याचा संभव असतो.

३. परंतु शरीरातील लिंफ प्रवाह आणि मुख्य रक्तप्रवाह या दोन वेगळ्या प्रणाली आहेत. त्यामुळे सरसकट असा नियम होऊ शकणार नाही.

काही आयसीयू तल्या पेशंटना मानेतून IV इंजेक्शन का देतात ? >>>>

जेव्हा रुग्णाला सलग सहा दिवसांहून अधिक काळ रक्ताद्वारे विविध द्रव औषधे द्यायची असतात तेव्हा हातापायांच्या नीलांपेक्षा थेट हृदयाजवळ असलेली महानीला सोयीची असते. मानेतून तिच्यात एक विशिष्ट नळी (कॅथेटर) सरकवली जाते (central line). त्याचे काही अन्य फायदे असतात :

१. या नळीला एकाहून अधिक मार्गिका असतात. त्यामुळे अशा रुग्णांना आवश्यक असलेली निरनिराळ्या प्रकारची औषधे स्वतंत्र मार्गिकेतून देता येतात. एका मार्गिकेतून फक्त रक्त काढण्याचे कामही करता येते. ही नळी दीर्घकाळ ठेवता येते.

२. काही कर्करोगविरोधी औषधे खूप दाहकारक असतात. ती जर हातापायांवरच्या नीलामधून दिली तर तिथपासून दाहप्रक्रिया होत राहील. पण ती या मध्यवर्ती यंत्रणेतून दिल्यास हा त्रास खूप कमी होतो.

धन्यवाद सर. तुम्ही एकदम सल्लामसलत वगैरे करून उत्तरे शोधताय आमच्यासाठी.... Happy

हृदयापासून लांबची नीला >>>
कळले आता. हाताच्या नीला सापडायला सोप्या आहेत खर्‍या. पायाच्या तितक्या दिसत नाहीत. कातडी जास्त निबर वाटते. पण वापरता येतील प्रसंगानुरूप.

शस्त्रक्रिया झालेली हाताची बाजू टोचाटोचीसाठी टाळणे >>>>
एक लाल पट्टेवाल्या सिस्टर म्हणाल्या होत्या इन्फेक्शन होऊ नये म्हणून टाळतो. पण बाकी शरीराला टोचून चालते, एक हातच वर्ज्य का हे कळले नव्हते. त्यांच्या कामाची घाई बघून पुढे विचारले नाही. लिंफ ग्रंथीचे कारण आज मिळाले. पुढे वाचते नेटवर.
जंतुसंसर्ग शक्यता मात्र असणारच कारण त्यांची पांढर्‍या पेशी व प्लेटलेट्स तपासणी नेमाने करायची होती. ठराविक आकडा गाठला की उपचार होल्डवर जायचे आणि पांढर्‍या पेशी व प्लेटलेट्स नैसर्गिकरीत्या वाढल्यानंतर पुन्हा सुरू व्हायचे. ती शरीराची अंतर्गत क्षमता कमी झाल्यावर मग बाहेरून पुरवून आवश्यक पातळी राखली जायची. संसर्ग होण्यासारख्या जागा / कृती / हवामान बदल या घटकांपासून सावध रहाण्याच्या सूचना नित्य असायच्या.
त्यामुळे नियम नसला तरी नित्यक्रमात कटाक्षाने पाळले जाते बहुतेक ती बाजू टाळणे.

पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद

डिहायड्रेशन झाल्याने उलट व्हेन्स जास्त दिसतात... बॉडीबिल्डर्स पाणी अल्मोस्ट बंदच करतात शो आधी कि व्हेन्स दिसाव्या...

>>>म्हणून तिच्यात औषधाऐवजी रासायनिक गुणधर्म नसलेली भुकटी भरतात.>>>
>>> (central line). त्याचे काही अन्य फायदे असतात :>>>
माहितीसाठी अनेक धन्यवाद ! उपयुक्त चर्चा

होय,
तसे लेखाच्या सुरवातीसच स्पष्ट केले आहे :

आधुनिक वैद्यकात रुग्णास औषध देण्याचे अनेक मार्ग(routes)आहेत.

*अनेक औषधे घ्यायची असतात तेव्हा किती अंतर असावे कमीत कमी?
>>>>
प्रश्न चांगला आहे परंतु याचे एकच उत्तर असणार नाही.
जी औषधे एकमेकांसोबत घ्यायची नसतात तशा सूचना डॉक्टर आधी देतातच.
तशी काही सूचना दिली नसेल, तर दिलेली औषधे एका पाठोपाठ एका वेळेस घेतली तरी चालतात.

काही औषधांमुळे जठर आम्लता खूप वाढते. त्यासाठी ती आम्लता वाढू नये म्हणून जी गोळी दिलेली असते, ती आधी घेतात आणि मग अर्ध्या तासाने मुख्य औषध घेतले जाते.

बाकी काही औषधांना दिवसाच्या ठराविक वेळा सांगितलेल्या असतात. त्यांच्या बाबतीत तसा प्रश्न उद्भवत नाही.

धन्यवाद डॅाक्टर. काहीवेळा मुख्य औषध, त्यामुळे आम्लता वाढू नये म्हणून दुसरे औषध, आणि त्याचे side effects होऊ नये म्हणून तिसरे औषध अशी रांगच लागते.

वरील सर्वांचे आभार !
*औषधाच्या संशोधना दरम्यान कॅप्सूलचा असा वापर केला जातो.
>>>>
हा जो मुद्दा आहे त्याबाबत अजून एक मजेदार माहिती. बऱ्याचदा अशा संशोधन प्रकल्पांमध्ये ज्या लोकांना अशा कॅप्सूल दिल्या जातात त्यांना त्या उघडून बघण्याचे कुतूहल असते.
यावर उपाय म्हणून कॅप्सूलमध्ये आता सुधारणा करण्यात आली आहे. कॅप्सूल तयार करताना तिच्या खालच्या भागात भुकटी भरून झाली कि वरची टोपी थोडी लांब निवडली जाते आणि खालच्या भागावर दाबून बसवली जाते.
ती इतकी घट्ट बसते की सहजासहजी उघडता येत नाही.

सर ,
नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण व उपयुक्त लेख !!!

एकदा कॅप्सूल घश्यात ढकलताना नेमकी फुटली तेव्हा प्रचंड त्रास झाला होता.

छान माहीती. मी टाइम रिलीज कॅपसूल वर एक फिल्म चे स्क्रिप्ट लिहिले होते. त्यात ही कॅपसून पोटात घेतली की अंतरा अंतराने औषध रिलीज करते. आता सध्या कॉम्बी ग्लाइज ही साधारण अश्या स्वरुपाची गोळी घेत आहे.

अभिप्राय व अनुभवकथनाबद्दल वरील सर्वांचे आभार !

कॅप्सूल घेण्याबाबत भीती असलेले काही लोक असतात.
त्यांना ती घशाला चिकटण्याची / अडकण्याची भीती वाटते.

छान माहिती आणि प्रतिसाद.

तोंडातील अन्य भागांशी तुलना करता जिभेखालच्या भागातील म्युकस आवरण विशिष्ट प्रकारचे आहे. त्यामुळे इथे ठेवलेल्या औषधाचे शोषण तुलनेने चांगले व सहज होते. <<< हा भाग विशिष्ट प्रकारचा असण्याचे कारण काय असावे? आपण सेवन करत असलेल्या अन्न/पाण्याच्या काही प्रमाणाचेही याद्वारे थेट रक्तात शोषण होते का?

< हा भाग विशिष्ट प्रकारचा असण्याचे कारण काय असावे? >>

प्रश्न चांगला आणि शरीर विज्ञानाच्या खोलात शिरणारा आहे. आपल्या तोंडामध्ये विविध भागांची कामे निरनिराळी आहेत.

१. ज्या भागांना प्रत्यक्ष अन्न चावण्यासंबंधी काम आहे तिथले म्युकस आवरण काहीसे दणकट व खडबडीत असते.
२. याउलट जिभेखालचा भाग चावण्याशी थेट संबंधित नसल्याने तिथले आवरण मऊ राहिलेले आहे. या भागातून एकंदरीत शोषण फार मर्यादित होते. तुलना करायची झाल्यास, लहान आतड्याचा सुरवातीचा जो भाग आहे तो या जिभेखालच्या भागापेक्षा दहा हजार पट अधिक शोषण क्षमतेचा आहे.

३. दुसरा मुद्दा. आपण जे अन्न खातो ते मुळात कॉम्प्लेक्स स्वरूपात असते. त्यातील सर्व घटकांचे लहान आतड्यात छानपैकी पचन व्हावे लागते. मगच त्यातून निर्माण होणारी मूलभूत रसायने (micromolecules) शोषली जाऊ शकतात.
पुढे चालू...

Pages