शाळेत असताना मार्च महिना आला की वार्षिक परीक्षेचे वेध लागायचे. पण परीक्षेच्या आधी शेवटची मज्जा करायचे दोन सणही मार्चमध्येच यायचे. एक म्हणजे अर्थातच होळी. दुसरा रूढार्थाने ’सण’ नव्हे, पण ’साधुसंत येती घरा, तोचि दिवाळी दसरा’ या न्यायाने आमच्या घरी संत एकनाथांच्या पादुकांचं आगमन व्हायचं, तो दिवस आम्हाला सणासारखाच वाटायचा.
होळी किंवा शिमगा हा कोकणातला मोठा उत्सव. आमच्या श्रीवर्धन भागात बर्याच गावांमध्ये चांगली दहा दिवस रोज होळी लावली जाते. होळी पौर्णिमेचा दिवस दहावा. त्या दिवशीची होळी सर्वात मोठी. होळी पौर्णिमेनंतरही गावातला सण लगेच संपत नाही. आठवडाभर खेळी, सोंगं, काही ना काही चालू असतंच. अशी मज्जा सुरू असताना आमच्या घरी होळी पौर्णिमेच्या दुसर्या दिवशीपासूनच एकनाथ महाराज पादुकांच्या पदयात्रेच्या आगमनाची तयारी सुरू होते.
होळीनंतरची षष्ठी म्हणजे एकनाथ षष्ठी. कोकणात हर्णै गावात संत एकनाथांचं मंदिर आहे आणि तिथे एकनाथ षष्ठीचा उत्सव पूर्वापार मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. मुंबई-डोंबिवली-ठाण्यात स्थायिक झालेल्या काही हर्णैकरांनी पुढाकार घेऊन या उत्सवाच्या निमित्ताने एक दिंडी/ पदयात्रा १९८६ साली सुरू केली. नाथांच्या पादुका घेऊन मुंबईतल्या भाऊच्या धक्क्यापासून या यात्रेला सुरुवात होते. बोटीने रेवसला येऊन , पुढे अलिबाग-मुरुड-दिवेआगर-हरिहरेश्वर-बाणकोट-केळशीमार्गे ही पदयात्रा एकनाथ षष्ठीच्या आदल्या दिवशी हर्णैला पोचते. एकूण सात-आठ दिवसांचा हा प्रवास असतो. त्यापैकी एका रात्रीचा मुक्काम आमच्या घरी असतो.
पदयात्रा मुक्कामाला येणार म्हणजे तयारी तशी बरीच असते. पदयात्रेत चाळीसपन्नास माणसं असतात. याव्यतिरिक्त घरची, पाहुणी, शिवाय कामाला बोलावलेली माणसं. त्यानुसार अंदाज घेऊन स्वैपाकाची तयारी, घराची साफसफाई, मागचं-पुढचं अंगण सारवून घेणं, सतरंज्या वगैरे उन्हात तापवून घेणं, पिण्याच्या आणि वापरण्याच्या पाण्याची पुरेशी सोय करणं अशी कामं सुरू होतात. मोठी पातेली, ताटंवाट्या यांची जमवाजमव केली जाते. एरवीही आंघोळीच्या पाण्यासाठी एक चुला असला, तरी आता एवढ्या माणसांचं आंघोळीचं पाणी तापवायला एक जास्तीचा चुला तयार करून ठेवला जातो. काही स्वैपाक घरात गॅसवर केला, तरी शिवाय बाहेर दगडाच्या चुली मांडल्या जातात. लहानपणी मला या सगळ्याची खूप मजा वाटायची.
पदयात्रेच्या दिवशी सकाळपासून घरात चांगलीच लगबग असते. अर्थात आता इतक्या वर्षांच्या सवयीमुळे हे सगळं अंगवळणी पडलं आहे, त्यामुळे गोंधळ-गडबड शक्यतो होत नाहीच. शिवाय मदतीसाठी आत्या, काका-काकू, मामा-मामी वगैरे आलेले असतातच. भाज्या चिरायला, इतर कामाला मदतनीस बायकाही बोलावलेल्या असतात. त्यामुळे कामं भराभर आटपली जातात.
संध्याकाळी पदयात्रा येऊन पोचते. आघाडीवर चालणार्यांच्या हातात ध्वज असतो. झांजांच्या तालावर भजनं म्हणतच ते येतात. आल्याआल्या आधी अंगणात फेर धरून भजनाच्या तालावर भोवरी नृत्य करतात. सुरात, दमदार आवाजात म्हटलेली ती भजनं आणि त्या तालावर केलेल्या नृत्याने एक वेगळीच वातावरणनिर्मिती होते. दिवसभराच्या चालीने सगळे दमलेले असतातच, कुणाकुणाच्या पायांना चालून चालून फोडही आलेले असतात. पण तरी हा उत्साह पाहण्यासारखा असतो. भोवरी नृत्य संपल्यावर मग हातपाय वगैरे धुवून चहापाणी होतं. सगळे जरा विसावतात. पदयात्रींपैकी बरेचजण वर्षानुवर्षं येणारे असतात, तर काहीजण नव्याने सामील झालेलेही असतात. सुरुवातीच्या वर्षांमध्ये पदयात्रेत फक्त पुरुष असायचे. नंतर महिलाही येऊ लागल्या. विविध ठिकाणचे, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये नोकरी-व्यवसाय करणारे लोक इथे एकत्र आलेले असतात. त्यात जसे उच्चशिक्षित, उच्चपदावर काम करणारे असतात, तसेच सर्वसामान्यही असतात. पण कुठल्याही प्रकारचा भेदभाव कुणाच्याच मनात नसतो. पंढरपूरच्या वारीत सर्वांची जशी ’वारकरी’ ही एकच ओळख, अगदी तसाच भाव इथेही.
तिन्हीसांजेला एकनाथ महाराजांच्या पादुकांची पूजा होते. संकष्ट चतुर्थी असेल तर यथाशक्ती अथर्वशीर्षाची आवर्तनं होतात. पदयात्रेचा दिवस तारखेने ठरलेला असला, तरी तिथीच्या क्षयामुळे त्या दिवशी कधी तृतीया, तर कधी चतुर्थी येते. मग आरती होते. पादुकांचं दर्शन घ्यायला आमच्या गावातले गावकरी येतात. संत एकनाथ हे वारकरी संप्रदायातले अतिशय महत्त्वाचे संत. त्यांनी ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण केलं. एकनाथी भागवत, भावार्थ रामायण असे ग्रंथ लिहिले. अभंग, भारुडं, गवळणी अशा रचना करून त्याद्वारे समाजात प्रबोधनाचा प्रयत्न केला. अस्पृश्यतेसारख्या समाजातल्या अनिष्ट प्रथांवर त्यांनी आपल्या उपदेशातून आणि आचरणातून हल्ला चढवला. एकनाथांचं गाव पैठण. मराठवाड्यातल्या पैठणपासून इतक्या दूर, कोकणात हर्णैला सुमारे दोन-अडीचशे वर्षांपूर्वी श्री. गैलाड नामक एका एकनाथभक्तांच्या श्रद्धेमुळे एका साध्याशा देवळात नाथांच्या पादुका स्थापन झाल्या. तेव्हापासूनच एकनाथ षष्ठीचा उत्सवही तिथे सुरू झाला. हर्णैच्या सुवर्णदुर्गावर कान्होजी आंग्र्यांचं ठाणं होतं. आंग्रे घराण्याच्या मदतीने एकनाथांचं पक्कं मंदिर मग बांधण्यात आलं. तेच मंदिर अजूनही आहे. माझ्या आजीचं माहेर हर्णैचं असल्यामुळे तिला साहजिकच या उत्सवाबद्दल जिव्हाळा होता. या पदयात्रेच्या निमित्ताने तिचंही उत्सवाशी असलेलं नातं अधिक दृढ झालं. गेली पस्तीस-छत्तीस वर्षं पदयात्रींशी असलेला आमचा हा ऋणानुबंध वाढत गेला आहे. पहिल्यापासून पदयात्रेत येणार्यांची पुढची पिढीसुद्धा आता यात सामील होते. सुरुवातीच्या काळात पदयात्रींची तीसच्या दरम्यान असणारी संख्या वाढत जाऊन मध्यंतरीच्या काळात अगदी ऐंशी-शंभरला जाऊन पोचली होती. ती आता चाळीस-पन्नासवर स्थिरावली आहे.
खेडेगावातलं घर म्हटलं की समोर छान अंगण असतंच. त्यामुळे कितीही माणसं पाहुणी आली, तरी बसायला, जेवायला, झोपायला जागा कमी पडत नाही. पादुकांच्या दर्शनाचा कार्यक्रम आटपला, की थोड्या वेळातच अंगणात आणि ओटी-पडवीत पानं मांडून जेवणाची तयारी होते. घरच्या माणसांच्या बरोबरीने, खरं तर आमच्यापेक्षा जास्त काम पदयात्रीच भराभर आटपतात. काहीजण पहिल्या पंगतीत पदार्थ वाढण्याचंही काम करतात. पोळी-भाजी, चटणी, कोशिंबीर, आमटी-भात, प्रसादाचा शिरा असा साधाच, पण चवदार बेत असतो. दुसर्या पंगतीला मग उरलेल्या पदयात्रींबरोबर आम्ही घरची आणि कामाला बोलावलेली माणसं जेवायला बसतो. जेवणं उरकतात, मागची आवराआवरी, स्वच्छताही चटचट होते आणि कीर्तनासाठी अंगण मोकळं होतं.
रेवदंडा गावचे प्रसिद्ध कीर्तनकार श्री. केळकरबुवा वर्षानुवर्षे या पदयात्रेला यायचे. पदयात्रेचा एक मुक्काम त्यांच्याकडेही असतो. सुरुवातीला अनेक वर्षं ते चालतच यायचे. नंतर वयानुसार ते जमेनासं झाल्यावर चालत न येता गाडीने थेट आमच्याकडच्या मुक्कामाला यायचे, पण सुश्राव्य कीर्तन मात्र दरवर्षी नक्की करायचे. काही वर्षांपूर्वी त्यांचं दुःखद निधन झाल्यानंतर श्री. बाळ हे कीर्तनकार येतात. साथीसाठी पेटी-तबलावादक दिवेआगरहून येतात. घरची, गावातली माणसं, पदयात्री कीर्तन ऐकायला बसतात. ज्ञानदान, प्रबोधन आणि रंजन करणारी कीर्तन ही महाराष्ट्रातली वैशिष्ट्यपूर्ण पारंपरिक कला. शहरांमध्ये पूर्वीपासून विविध निमित्तांनी कीर्तनं आयोजित केली जातात. हल्ली टीव्हीवरही कीर्तन पहायला मिळणं सोपं झालं आहे. पण आमच्या ग्रामीण भागात पूर्वी कीर्तन पहायला-ऐकायला मिळणं ही तशी दुर्मिळ बाब होती. पदयात्रेमुळे ही संधी आमच्या गावाला मिळत असे.
रात्री बारा-साडेबारानंतर कीर्तन संपलं की लगेचच निजानीज होते. कारण पदयात्रींना पहाटे लवकर उठून परत चालायला सुरुवात करायची असते. पहाटे चार-साडेचारला उठून, चहा पिऊन, काकडआरती करून पदयात्री निघतातसुद्धा! अशा प्रकारे दरवर्षी येणारा, पण प्रत्येक वेळी नवा आनंद देणारा हा सण संपतो!
गेल्या वर्षी जानेवारीत प्रथम प्रकाशित झालेला हा लेख इथे पुन्हा प्रकाशित करण्याची परवानगी दिल्याबद्दल मी बंगळुरू महाराष्ट्र मंडळाच्या सनविवि मासिकाच्या संपादक मंडळाची आभारी आहे.
किती छान वर्णन! सगळे
किती छान वर्णन! सगळे डोळ्यापुढे उभे राहिले.
एक बावळट प्रश्न :पादुका स्थापन झाल्या म्हणजे काय? मला वाटायचे अशा पादुका म्हणजे खरच त्या त्या संतांनी घातलेल्या की काय..
सुंदर….
सुंदर….
खुपच छान लिहिलय. प्रसन्न
खुपच छान लिहिलय. प्रसन्न वाटले वाचून.
अजूनही असा सण आणि पदयात्रा
अजूनही असा सण आणि पदयात्रा होत आहेत हे आश्चर्य आहे कारण होळीच्या काळात थंडी संपून ऊन जाणवू लागलेले असते.
लेख आवडला.
पादुका स्थापन झाल्या म्हणजे .
पादुका स्थापन झाल्या म्हणजे . . . संतांनी घातलेल्या की काय?
काही पादुका तशा खऱ्या आहेत. मुंबईत महालक्ष्मी मंदिराच्या मागे अक्कलकोट मंदिरात महाराजांच्या आहेत त्या तशा आहेत.
छान आहे लेख. जिव्हाळ्याने ओत
छान आहे लेख. जिव्हाळ्याने ओत:प्रोत भरलेला.
काही वर्षापूर्वी मिसळपाव ह्या संकेत स्थळावर सोलापूर इथल्या षष्ठी च्या पालखीयात्रेसंबंधी एक लेख प्रसिद्ध झाला होता. त्याची आठवण झाली.
सर्वच गोष्टी यजमानांवर न टाकता सगळ्यांनी आनंदाने आणि शिस्तीने सेवा देऊन कार्यसिद्धी करणे हा गुण ठळकपणे जाणवला, ज्याची आज वा न वा आहे.
छान झालाय लेख वावे.
छान झालाय लेख वावे.
धन्यवाद _/\_
धन्यवाद _/\_
Srd >> हो, ऊन व्हायला लागलेलं असतं. म्हणूनच कदाचित पहाटे लवकर उठून जास्तीत जास्त अंतर उन्हाच्या आधी कापण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
पादुका>> या बऱ्याच ठिकाणी प्रतीकात्मक असतात मला वाटतं. हीरांनी सांगितलंय त्याप्रमाणे काही ठिकाणी खऱ्या असतील.
कालच पदयात्रा आमच्या घरी मुक्कामाला होती. मी गेल्या अनेक वर्षांत त्यासाठी जाऊ शकले नाहीये. मी केलेलं वर्णन हे मुख्यतः माझ्या लहानपणच्या आठवणींचं आहे. अर्थात कार्यक्रमात फारसा फरक पडलेला नाही. काळानुसार जेवढा पडायचा, तेवढाच.
खूपच छान लिहिले आहे . आवडले.
खूपच छान लिहिले आहे . आवडले.
खूप छान लेख आणि वर्णन....मला
खूप छान लेख आणि वर्णन....मला अशी पदयात्रा वगैरे करणाऱ्या लोकांचे खूप कौतुक वाटते...
थोडे अवांतर
थोडे अवांतर
"Elephant whisperer" ला ऑस्कर मिळाले हे वाचून
सूत्रांतर
https://www.maayboli.com/node/79735 ची आठवण झाली.
अश्विनी ११ आणि ९९९, आभारी आहे
अश्विनी ११ आणि ९९९, आभारी आहे
केशवकूल, धन्यवाद
वावे खूप छान लेख आणि वर्णन..
वावे खूप छान लेख आणि वर्णन..
सुत्रंतर तर अप्रतिमच
केशवकुल लिंक साठी धन्यवाद
फार छान लिहीले आहे, वावे!
फार छान लिहीले आहे, वावे! एकनाथांनी केलेल्या समाज प्रबोधनाच्या प्रचंड कामाबद्दल खुप आदर आहे. तुमचा लेख वाचुन परंपरा कशा संपन्न होत जातात ते जाणवलं. या परंपरांची सुरुवात, प्रवास आणि चालु ठेवण्यासाठी लागणारा उत्साह, श्रद्धा व घेतले जाणारे कष्ट, सगळे तुम्ही सहज, ओघवते लिहीले आहे.
खूप छान आहे लेख. आवडला.
खूप छान आहे लेख. आवडला.
छान लिहिले आहे.
छान लिहिले आहे.
केळकर बुवांचं कौतुक वाटलं.
छान लेख...
छान लेख...
अप्रतिम लेख, वर्णन आणि अनुभव
अप्रतिम लेख, वर्णन आणि अनुभव कथन! एका खूपशा दुर्मिळ गोष्टीचा चांगला परिचय करून दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! सामुदायिक आयोजन ही आता खूप दुर्मिळ होत जाणारी गोष्ट आहे. श्रीवर्धन- हर्णेमुळे अजून जवळची वाट्ली ही यात्रा. लेखामध्ये इतरही तपशील आणि संदर्भ छान आले आहेत.
छान लेख छान वर्णन..
छान लेख छान वर्णन..
संध्याकाळी चालून दमून भागून मुक्कामाला पोहोचल्यावर तिथे फेर धरून नाचणे आणि भजन करणे यासाठी प्रचंड ईच्छाशक्ती हवी जी श्रद्धेतून येत असावी.
मी स्वत: अनुभव नाही घेतला तरीही रिलेट झाले. कारण माझा लहानपणापासून आजवरचा एक खास मित्र जायचा वारीला. त्याच्या तोंडून ऐकायचो किस्से आणि वर्णन.
त्याने वारकरी होताना माळ घातली आणि दारू कायमची सोडली होती. सोबतच्या पिणाऱ्या मित्रांनी त्याला उकसावलेही होते की माळ कानाला लाऊन प्यायची. चालते तसे वगैरे. पण तो नाही बधला. त्यामुळे त्याचे कौतुकही वाटायचे.
सुंदर!
सुंदर!