
एक उनाड आणि भरगच्च दिवस @ काळा घोडा महोत्सव..
मुखपृष्ठ… (काळा घोडा परिसराचा त्रिमितीय नकाशा..)
दरवर्षी काळाघोडा महोत्सवाबद्दल पहिली बातमी ऐकली, वाचली की दरवेळेस मी ठरवायचो, 'ह्या वेळी तरी महोत्सवाला जायचं..'
या वेळेला तर मायबोलीवरतीच महोत्सवाबद्दल धागा निघाला आणि त्याला प्रतिसाद एवढे मिळायला लागले की मायबोलीकरांचं एक काळा घोडा गटगच करुया अशी टुम निघाली.
मग त्या गटगला येणाऱ्यांची यादी आणि चर्चा याच्यासाठी अजून एक वेगळा धागा निघाला. कोण कोण कुठून कुठून येणार याच्याही चर्चा सुरू झाल्या. थेट पुण्यापासून इंटरेस्टेड पार्टीज् होत्या.
माझा हात गटग मध्ये सामील होण्यासाठी सारखा वर होत होता… पर उफ ये जालीम ऑफिस, जिसने मुझे निकम्मा कर डाला.. वर्ना हम भी शौकीन थे घूमने फिरने के..
कामाच्या स्वरूपामुळे कन्फर्म कमिटमेंट आधीपासून देणं शक्य होत नव्हतं तरीही दररोज काळा घोड्याच्या धाग्यांवरती नजर फिरवणे चालूच होतं.
आता तर व्हाॅट्सअपचा ग्रुपही बनायला सुरुवात झाली होती. ऑफिसमधली सगळी कामं मार्गी लावून ॲडजस्टमेंट करून शनिवार काळ्या घोड्यासाठी मोकळा करून घेतला आणि हात वर करायला ग्रुप वर धाव मारली.
पण अरेरे.. कोणाकोणाच्या वैयक्तिक अडचणींमुळे गटग रद्द झाल्याचं वाचायला मिळालं.
शेवटी "जे नाही होत तेच गटग" ही गटगची व्याख्या आठवून मनाचे समाधान केलं.
मोठं गटग नाही पण त्यातल्या त्यात कोणी येणार आहे का म्हणूनही धाग्यावर विचारणा केली, पण कोणालाच जमतंय असं दिसलं नाही..
कमी तिथे आम्ही या नात्याने मग बायको यायला तयार झाली. तिलाच कामाला लावून महोत्सवाचे ११ तारखेचे सर्व प्रोग्रॅम्स मला पाठवायला सांगितले. त्याची ऑफिसमध्ये प्रिंट काढून घेतली, त्यांच्यावर वरवर एक नजर मारली आणि संध्याकाळी तिच्या आणि माझ्या, त्यातल्या त्यात समान आवडीच्या गोष्टी पाहून दुसऱ्या दिवशीचा प्रोग्रॅम ठरवायचं ठरलं.
संध्याकाळी काळा घोडा महोत्सवाची वेबसाईटही पाहिली. मुख्य म्हणजे काळा घोडा परिसराचा एक छान त्रिमितीय नकाशा डाऊनलोड करून ठेवला, तो वर दिलेला आहेच.
सर्व प्रोग्राम ठरवून दुसऱ्या दिवशी सकाळी दहाला निघायचं ठरलं, जेणेकरून अकरा वाजता काळा घोडा परिसरात पोहोचता येईल.
तिथे थोडाफार वेळ घालवून पुढे वेगवेगळे परिसंवाद नाटकं, चर्चासत्रं ऐकायची, पाहायची.. अधे मध्ये परत काळा घोडा परिसर पालथा घालायचा आणि जमलं तर संध्याकाळी ओपन डेक बस मधून दक्षिण मुंबईची छोटीशी सैर करायची असं ढोबळ मानाने ठरलं.
लेक आणि तिच्या मैत्रिणी व्हॅन गाॅग ३६०° शो बघायला जाणार असल्यामुळे गाडी ड्रायव्हर त्यांच्या दिमतीला असणार होता. त्यामुळे ओला, उबर शिवाय आम्हाला पर्याय नव्हता. पण एका परीने ही इष्टापत्ती असल्याचं नंतर निदर्शनास आलं.
दुसऱ्या दिवशी सकाळी निघता निघता दहाचे साडेदहा झाले. ईस्टर्न फ्रीवे वरून जाताना कुठेही ट्रॅफिक लागला नाही. त्यात कोपरी पुलाचं आदल्या दिवशीच उद्घाटन झाल्यामुळे तो ही रस्ता सुसाट होता. त्यामुळे आम्ही सकाळी सव्वा अकरा वाजता एशियाटिक लायब्ररी जवळ पोहोचलो. गुगल मॅप पुढच्या ट्रॅफिक मुळे काळा घोडा अजून पंधरा मिनिटांवरती दाखवत होता.
तिथे जा.. थोडा वेळ काढा.. परत मागे या..
यामध्ये जाणारा वेळ आणि मुख्य म्हणजे अशा प्रत्येक Indoor प्रोग्रॅमला गर्दी आणि पर्यायाने लांबलचक लाईन असते असं ऐकल्यामुळे आम्ही आमची ओला जर्नी काळा घोड्या ऐवजी एशियाटिक लायब्ररी जवळच संपवायचा निर्णय घेतला.
आता इथे आम्ही तुलनेने लवकर पोहोचलो होतो. एशियाटिक लायब्ररीच्या भव्य पायऱ्यांवरती तुरळकच गर्दी होती. मुला मुलींचे थवे ग्रुप करून वेगवेगळ्या पातळ्यांवरती बसले होते. काही प्रौढ माणसे प्रोग्रॅमसाठी एकटी किंवा दुकटी बंद दारांपाशी घुटमळत होती.
त्या प्रशस्त पायऱ्या चढता चढता, या पायऱ्या दाखवलेले तेजाब पासून अनेक हिंदी चित्रपट डोळ्यांसमोरून तरळून गेले.
पायऱ्या चढता चढता भव्यता दाखवणारी ही ग्रीक आर्किटेक्चर पद्धतीची इमारत मनावर वेगळंच गारुड करते.
वरच्या पोर्टिको मध्ये पोहोचल्यानंतर, त्या उंचीवरुन दिसणाऱ्या जुन्या मुंबईतल्या इमारती आणि ते दृश्य पाहिल्यानंतर फोटो काढणं अनिवार्य होतं.
01.. एशियाटिक लायब्ररीतून दिसणारी मुंबई -01
02.. एशियाटिक लायब्ररीतून दिसणारी मुंबई -02
मागे Stock Exchange ची इमारत..
पायऱ्या चढताना त्या खांबाखांबांच्या आणि त्रिकोणी छप्पर मिळणाऱ्या पेलणाऱ्या ठाशीव, भव्य आणि डेकोरेटिव्ह इमारतीचे फोटो तर काढलेले होतेच.
03.. एशियाटिक लायब्ररी -01
04.. एशियाटिक लायब्ररी -02
तिथे पोचलो खरो पण प्रत्येक दार बंद होतं आणि लवकर उघडेल अशी कोणतीही लक्षणंही दिसत नव्हती. मात्र प्रत्येक दारावरती पुठ्ठ्यावर एक सूचना अडकवलेली होती की इमारतीचा प्रवेश डाव्या बाजूच्या प्रवेशद्वारामधून आहे.
पायऱ्या उतरुन तिथे गेल्यावर दारापाशीच एका छान वडाच्या झाडाने आमचं स्वागत केलं.
05.. एशियाटिक सोसायटीच्या आवारातील वटवृक्ष..
पहिला कार्यक्रम होता : "Repair and Restoration: Let's Talk about Mumbai's Modern Heritage".
Category : Urban Design & Architecture
Swastik Court, an Art Deco apartment building on Oval Maidan या हेरिटेज इमारतीची दुरुस्ती आणि यशस्वी जिर्णोद्धार यावर स्लाईड शो, चर्चा आणि त्या प्रक्रियेवरचे पुस्तक प्रकाशन असा कार्यक्रम होता.
सहभागी होते आर्ट डेकोचे विश्वस्त अतुलकुमार आणि हेरिटेज इमारतींचा जिर्णोद्धार करणारे तज्ज्ञ आर्किटेक्ट विकास दिलावरी आणि राॅबर्ट स्टीफन्स.
कार्यक्रम असणार असलेला दरबार हॉल पहिल्या मजल्यावर आहे असं कळल्यावर आम्ही तिथे गेलो.
06.. दरबार हॉलकडे जाणारा वळणदार जिना..
07.. Fluted खांबांवर तोललेले Vault Shaped Ceiling..
हॉलच्या दारापाशी एका मुलीने आमचं नाव विचारलं आणि तिच्या हातामधल्या चार पानी छापील यादी मध्ये ती ते शोधायला लागली.
एवढी मोठी यादी बघून हे फंक्शन अटेंड करायला मिळणार नाही असंच वाटलं होतं. आम्ही आधी रजिस्ट्रेशन केलं नाहीये असं सांगितल्यावर तिने आमची नावं यादीत नोंदवून घेतली आणि आत जायला सांगितलं.
दारापाशी चहा, कॉफी आणि स्नॅक्स ची व्यवस्था होती. आत मध्ये चर्चासत्राची तयारी पूर्ण झाली होती.
08.. परिसंवादाची सुरुवात..
स्वस्तिक कोर्टची आधीची जीर्ण इमारत, त्यात टप्प्याटप्प्याने करत गेलेले बदल व सुधारणा आणि तीचं अंतिम रुप हा चित्रमय प्रवास चांगला दाखवला.
अशा इतर हेरिटेज इमारतींच्या कामाबद्दल दोन्ही आर्किटेक्ट्सनी चांगली माहिती दिली.
09.. पुस्तक प्रकाशन..
एक ऐवजी हा प्रोग्राम सव्वा वाजेपर्यंत चालला.
पुढचा आम्ही पहायचा ठरवलेला प्रोग्राम Theatre कॅटेगरी मधला होता आणि तो म्हणजे : "Bullshit Jobs" हे Storia Stenza Storia या ग्रुपने सादर केलेलं हिंग्लिश नाटक.
हे दोन ते तीन या वेळामध्ये 'नॅशनल गॅलरी ऑफ माॅडर्न आर्ट' मध्ये असणार होतं. खरंतर एक ते दोन ही वेळ आम्ही जेवणासाठी ठरवली होती पण पहिल्या कार्यक्रमाला झालेला उशीर आणि लोकांच्या दृष्टिने हा तुलनेने अधिक लोकप्रिय असलेला कार्यक्रम आणि त्यामुळे त्याला असू शकणारी जास्त लांबलचक रांग याचा विचार करून आम्ही जेवण पुढे ढकललं आणि नॅशनल गॅलरीसाठी टॅक्सी शोधायला सुरुवात केली.
काळा घोडा म्हटल्यानंतर एक तर जवळचं अंतर आणि दुसरं म्हणजे 'वहाँ तो बहुत ट्रॅफिक है साब' असं म्हणून सात आठ टॅक्सीवाल्यांनी यायला नकार दिला. सुदैवाने एक टॅक्सीवाला यायला तयार झाला. वाटेत काळा घोडा परिसरात दाटलेली विशेषतः तरुणाईची प्रचंड गर्दी दिसलीच. आता टॅक्सी मधून नॅशनल गॅलरी दिसायला लागली होती आणि तिच्या बाहेरची रांग ही..
टॅक्सीही आता ट्रॅफिक जॅम मध्ये अडकली होती. रिगल सिनेमाच्या सर्कलला वळसा मारून गॅलरीसमोर टॅक्सी थांबवायची तर खूपच वेळ गेला असता. त्यामुळे टॅक्सी तिथेच सोडून आणि सिग्नल जवळच असल्यामुळे त्याच्या क्रॉसिंग वरून रस्ता पार करून रांगेचे टोक शोधत रांगेच्या शेवटी उभे राहिलो.
जवळजवळ दीड वाजला होता.
ह्या गर्दीत आणि दरबार हॉलच्या गर्दीत लक्षणीय फरक होता. दरबार हॉल मधले बहुसंख्य लोक ४० प्लस होते आणि काही आर्किटेक्चरचे तरुण स्टुडंट्स..
पण इथे मात्र एकदम कॉस्मोपॉलिटन तरुणाई फुलली होती.
10.. रांगेतील टाईमपास..
11.. मुंबईतील हिरवाई..
साधारणपणे दहा मिनिटांनी दोन व्हाॅलेंटियर्स आले ते माणसं मोजत मोजतच. नाट्यगृहाच्या क्षमतेएवढी माणसं झालेली आहेत हे पाहून त्यांनी रांगेचा शेवट करून टाकला. ही गोष्ट ही आम्हाला खूप आवडली कारण एवढ्या मोठ्या रांगेत उभं राहायचं आणि प्रवेश करताना बस हुआ, बस हुआ असं ऐकल्यावर सात्विक किंवा तामसी रागाने हिरवंपिवळं होउन वाद घालत किंवा निमूटपणे वाया गेलेल्या वेळाचा विचार करत तिथून चालू पडायचं, यापेक्षा हे खूपच चांगलं. अजून पाच एक मिनिटात रांग पुढे सरकायला सुरुवात झाली.
12.. National Gallery of Modern Arts..
13.. पर्यावरणची काळजी घ्या अभियान..
आता 'काळा घोडा' होणार 'हरा घोडा'
मिनी थिएटर ऑडिटोरियम दुसऱ्या मजल्यावर होतं. अर्धा तास आधी येऊनही आम्ही आत शिरलो तेव्हा जवळ जवळ ७० टक्के हॉल भरला होता. आयोजकांनी पायऱ्या भरल्यानंतर काही तरुण मुलांना जमिनीवर बसवून जास्तीत जास्त प्रेक्षकांची सोय करण्याचा प्रयत्न केला.
14.. नॅशनल गॅलरी मिनी थिएटर..
15.. पूर्ण भरलेलं मिनी थिएटर..
बरोबर दोन वाजता प्रेक्षकांना अभिवादन करून प्रयोग सुरू झाला.
16.. नाटकातील एक दृश्य.. ऑफिस गोअर्स लिफ्टमधेही मोबाईलमधे गर्क. जमिनीवरचा पांढरा चौकोन लिफ्टचा..
17.. नाटकातील अजून एक क्षण..
बाॅसचं बाॅसपण, महत्त्व अधोरेखित करणारा लांबलचक टाय..
हे साधारणतः 45 मिनिटांचं सध्याच्या कॉर्पोरेट जगाचं, ऑफिसचं चित्रीकरण करणारं, उपहासात्मक शैलीमधलं विनोदी आणि खरंतर त्याच वेळेला करुण असं हिंग्लिश नाटक होतं.
संपूर्ण नाटक हे एका लिफ्ट मध्ये घडतं. लिफ्टमन, खरंतर लिफ्ट-होस्टेस असलेली एक मुलगी, दोन आपापसात प्रचंड स्पर्धा असलेले एक्झिक्यूटिव्ह लेव्हलचे कर्मचारी आणि त्यांचा बॉस अशी चार पात्रं.
तळमजल्या पासून वरचे अनेक मजले लिफ्टमधून वेगवेगळ्या दिवशी पार करणं ही एकमेव घटना.
पण त्यावेळेस कॉर्पोरेट जगात चालणारी कामाची टाळाटाळ, हात झटकणं, दुसऱ्यावर जबाबदारी टाकणं, झालेल्या चुका तिसऱ्याच्या गळ्यात मारणं, हे सगळं करताना आपला उत्कर्ष साधणं आणि जे या गोष्टींशी संबंधितही नाहीत त्यांचा निष्ठुरपणे बळी देणं, बॉसच्या मूर्ख सूचनांची वाहवा करणं..
म्हणजे म्हटलं तर बराचसा चावून चघळलेला विषय पण अतिशय सरकॅस्टिक मांडणी, चुरचुरीत संवाद आणि चांगला अभिनय.. शिवाय या सगळ्याला प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद.. त्यामुळे प्रयोग बघायला मजा आली.
प्रयोग संपवून कलाकारांनी प्रेक्षकांना अभिवादन करुन आभार मानल्यावर लेखिका, दिग्दर्शिका (लिफ्ट-होस्टेस असलेली मुलगी) पुढे झाली.
तिने त्यांच्या संस्थेची थोडक्यात माहिती दिली आणि पृथ्वीला बऱ्याच वेळेला त्यांचे प्रयोग होतात आणि इंटरनेट वर त्यांच्या ग्रुपच्या प्रयोगांच्या तारखा बघून, आवडत असेल तर जरूर बघायला या अशी विनंती केली..
तीन वाजले होते आता पोटापाण्याची सोय करणे गरजेचे होतं त्यामुळे रस्ता क्रॉस करून रिगल सिनेमाच्या रस्त्यावर रेस्टॉरंट बघायला सुरुवात केली. कॅफे माॅन्डेगारच्या बाहेर प्रचंड रांग होती. वाटेतलं कुठलंही हॉटेल, टपरी, भेळवाले, वडापाववाले, सँडविचवाले पोटभरुंच्या गर्दींनी वेढलेले होते. लिओपोल्डला तीच स्थिती, कॅफे चर्चिललाही तीच स्थिती..
इथे डाळ शिजणार नाही हे उमजून आम्ही ओव्हल आणि चर्चगेट इथली रेस्टॉरंट्स पाहायचं ठरवलं आणि टॅक्सी पकडली. नशीबाने ही टॅक्सी लवकर मिळाली.
चालत्या टॅक्सी मधून मैदानाच्या पलीकडचा राजाबाई टॉवर, मुंबई उच्च न्यायालय आणि पश्चिम रेल्वे मुख्यालय या काही छान इमारती क्लिक करता आल्या..
18.. राजाबाई टॉवर..
19.. मुंबई उच्च न्यायालय..
20.. पश्चिम रेल्वे मुख्यालय..
मैदानांमधे काळाघोडा महोत्सवाच्या फूडस्टॉल्स साठी जागा दिलेली होती. पण प्रचंड ऊन आणि रुक्ष वातावरण शिवाय तिथेही प्रचंड गर्दी यामुळे वीर नरिमन रस्त्यावरची रेस्टॉरंट्स पालथी घातल्यावर, तिथेही अर्ध्या अर्ध्या तासाचं वेटिंग असल्याचं समजलं. टॅक्सी तर सोडून दिलेली होती. मग हॉटेल फाउंटन सिझलरला फोन लावून टेबल बुक केलं आणि परत दुसरी टॅक्सी पकडून फ्लोरा फाउंटन ला गेलो. इथे टॅक्सी मिळणं महा कठीण गेलं पण त्यामुळे मधला वेटिंग पिरियड मात्र आपोआपच उत्कंठावर्धक झाला.
21.. सिझलींग सिझलर -01..
22.. सिझलींग सिझलर -02..
जेवण तर झकासच झालं. पण इथून मात्र माझा आणि माझ्या पत्नीचा मार्ग वेगवेगळा होणार होता.
कारण तिला "Mythology and the Millennial" हा देवदत्त पटनाईकचा Literature Category मधला कार्यक्रम काही झालं तरी बघायचा होता. (Venue : IF.BE, Ballard Estate).
आणि मला मात्र Heritage Walk कॅटेगरीमधली
"Fort on Four Wheels - A heritage bus ride". (A rambling ride through the heart of the city, in an open deck bus.) (Venue : Kala Ghoda Precinct) ही ओपन बस राईड वरच्या मजल्यावरुनच करायची होती आणि या दोन्ही गोष्टींच्या वेळा क्लॅश होत होत्या.
आत्तापर्यंतचा चर्चासत्र, परिसंवाद किंवा शो यांना मिळणारा प्रचंड प्रतिसाद आणि त्यासाठी लागलेल्या रांगा बघता आणि देवदत्त पटनाइकांची लोकप्रियता पाहता, त्यांच्या सहाच्या शोसाठी किमान पाच वाजता तिथे पोहोचणं गरजेचं होतं आणि बस राईड पाच ते साडेसहाची होती.
आता सव्वाचार झाले होते. तिथे पोहोचण्यासाठी लागणारा वेळ बघितला तर मध्ये काही विशेष करण्यासारखं नव्हतं त्यामुळे पत्नी फाऊंटन मधूनच परस्पर बेलाॅर्ड पियरला जायला निघाली आणि मी गर्दी मधून चालत चालत ओपन बस राईडच्या रिगल सिनेमाजवळच्या स्टॉपच्या दिशेने निघालो.
वाटेत परत काळा घोडा प्रिसिंक्टच्या दिशेने जाणाऱ्यांची गर्दी लागली. ही गर्दी आता सकाळपेक्षा वाढलेली होती. परिसर अजूनच फुलून निघाला होता.
23.. रंगीत कपड्यांच्या पट्ट्यांखाली काळा घोडा कला महोत्सव.. लोटलेली तरुणाई..
24.. काळा घोडा कला महोत्सव : Enclosure..
25.. विक्रेता कम कलाकार..
26.. भिरभिरे..
27.. उशांची प्रवेशकमान.. खर तर Exit Way..
28.. उशांची कमान : Close-Up
29.. Live Portrait Sketching..
त्यानंतर लागली जहांगीर आर्ट गॅलरी. ती पार करुन रिगलच्या दिशेने जाताना अप्रसिद्ध चित्रकारांच्या कलाकृतींचं प्रदर्शन मांडलेलं होतं. ते पहात पहात गेल्यामुळे प्रवास थोडा थबकत थबकतच होत होता. अर्थात फार काही थांबता येईल एवढा वेळ नव्हता.
30.. जहांगीरचा फूटपाथ आणि रस्ता यामधल्या जागेतील चित्रप्रदर्शन.. मागे एल्फिन्स्टन काॅलेज..
त्यानंतर लागलं छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय (म्युझियम). त्याच्या आवारातल्या बागेमध्ये पहुडलं होतं गौतम बुद्धांचं मस्तकशिल्प.. आणि पार्श्वभूमीवर होती
Indo-Saracenic architecture स्टाईल मधली संग्रहालयाची इमारत. इथेही फोटो काढणं अर्थातच अनिवार्य होतं.
31.. छत्रपती शिवाजीमहाराज वस्तुसंग्रहालय.. (आधीचे Prince of Wales Museum) आणि निद्रिस्त बुद्धाचे मस्तकशिल्प..
32.. निद्रिस्त मस्तकशिल्प - जवळून..
तिथून बाहेर पडल्यावर जिथे म्युझियम संपतं तिथे ओपन डबलडेकर बसेसचा नीलांबरी स्टॉप आहे. दोन बसेस स्टॉपवर उभ्या बघून मला तर आनंदाचा भरतंच आलं. पण कंडक्टर साहेब बोलले की बुकिंगऑफिस मधून तिकीट घ्या आणि मग बस मध्ये बसा. फुटपाथवरच्या ऑफिस पाशी गेलो तर तिथेही रांग होतीच. सहा सातच माणसं होती पण अनिश्चितता वाढवायला पुरेशी होती. माझा नंबर आल्यावर अप्पर डेकचं तिकीट मागितलं तर फक्त आजच्या आठ वाजताच्या बसचं शिल्लक आहे असं कळलं. पाचची बस संपूर्ण फुल होती आणि साडेसहाच्या बस मध्ये खालच्या मजल्यावर काही तिकीटं उपलब्ध होती. थोडक्यात दुमजली बसच्या वरच्या मजल्यावरुन मुंबई बघायची इच्छा आज तरी अपूर्णच राहणार होती.
तरी पण याला इष्टापत्ती समजून पावलं परत जहांगीर जवळच्या अप्रसिद्ध चित्र प्रदर्शनाकडे वळवली. आता ती निवांतपणे बघणं, कलाकृती आवडलेल्या चित्रकारांचे नंबर घेणं हे सगळं जमण्यासारखं होतं.
33.. एल्फिन्स्टन काॅलेज- 01
34.. एल्फिन्स्टन काॅलेज- 02
35.. रस्त्यावरील चित्र प्रदर्शन : कृष्णधवल चित्रे..
या चित्रप्रदर्शनाची एक चांगली गोष्ट म्हणजे रस्त्यावर असल्यामुळे ते सहज पोहोचण्यायोग्य होतं.
महोत्सव समजून असो किंवा प्रदर्शन किंवा अगदी जत्रा समजून असो, पण समाजाचा कोणताही स्तर इथे बिनधास्तपणे वावरु शकत होता. वाजवी दरांमुळे पोर्ट्रेट बनवून घेण्याची हौसही पुरवता येत होती आणि आवडलेली चित्रंही खरेदी करता येत होती.
अंगभूत आकर्षक प्रकार असल्यामुळे मोठ्यांच्या बरोबरीने लहान मुलंही हे स्वारस्य घेऊन बघत होती.
समाजात एवढ्या मोठ्या प्रमाणामधे कलेबदद्ल कुतूहल निर्माण करण्याचं काम प्रतिथयश आर्ट गॅलरीज करु शकत नाहीत. एका वरच्या पातळीवर त्यांचं योगदान नक्कीच आहे पण एरवी या विषयापर्यंत जे पोहोचूही शकत नाहीत त्या समाजामधे याबाबत कुतूहल निर्माण करण्याचं काम, हे या आणि अशा महोत्सवांचं यश मानलं पाहिजे.
अजून एक निरिक्षण : लहान मुलांना चित्र दाखवण्यात त्यांच्या आया पुढे होत्या आणि पौगंडावस्थेतील गंभीर मुलांबरोबर बाबा..
36.. पुन्हा एकदा पोर्ट्रेट स्केचिंग..
जहांगीर आर्ट गॅलरीचा एंट्रन्स. पण इथेही गर्दी असल्यामुळे मी बाहेरची चित्र बघणंच पसंत केलं.
37.. जहांगीर आर्ट गॅलरी..
38.. उभरत्या चित्रकारांची चित्रे -01
39.. उभरत्या चित्रकारांची चित्रे -02
40.. उभरत्या चित्रकारांची चित्रे -03 (काळा नव्हे, रंगीत घोडा..)
41.. उभरत्या चित्रकारांची चित्रे -04 (तपकीरी घोडा..)
यानंतर उशांनी बनवलेली काळाघोडा प्रदर्शनाची कमान लागली.
तुलनेने गर्दी कमी होती म्हणून मी खुश होऊन आत शिरायला लागलो तेव्हा तिथल्या सिक्युरिटी गार्ड्सनी मला अडवलं आणि हा एक्झिट असल्याचं सांगितलं. ही एक्झिट जहांगीर आर्ट गॅलरीच्या बाजूला होती आणि एन्ट्री फ्लोरा फाउंटनच्या दिशेला होती.
तिथे तर अलोट, अलोट गर्दी लोटली होती आणि गठ्ठ्या गठ्ठ्याने लोक आत शिरण्यासाठी उभे होते.
42.. कलामहोत्सव - गर्दी..
फक्त एकच चांगली गोष्ट होती ती म्हणजे लोक सतत पुढे सरकत होते, रांग कुठेही थांबलेली नव्हती. जरा पुढे गेल्यानंतर ही गर्दी वेगवेगळ्या सहा रांगांमधून विभागलेली होती आणि या रांगाही शिस्तशिरपणे पुढे सरकत होत्या. रांग थोडी लांब असली तरी तिच्या प्रवाहीपणामुळे कंटाळा आला नाही. आणि प्रवेशद्वारापाशी पोहोचायला वेळही अपेक्षेपेक्षा कमी लागला. सुरक्षा तपासणी झाल्यावर एकदाचा आत प्रवेश मिळाला.
43.. कला-महोत्सव : प्रवेशद्वार (याचसाठी केला होता अट्टाहास…)
आत मध्ये लोकं विखुरलेली असली तरी गर्दी होतीच. सुरुवातीलाच या फेस्टिवलला ज्याचं नाव मिळालं त्या काळ्या घोड्याचा पुतळा होता. त्याच्या आजूबाजूला वेगवेगळ्या हस्तकलेच्या, ग्रामोद्योगाच्या वस्तूंचे स्टॉल्स होते. त्यामध्ये यावेळी तरी मला रस नसल्यामुळे ओझरती नजर मारुन मी कलाकृतींकडे वळलो.
44.. Bike n Silencer Sculpture..
45.. भेटलो बुवा ह्याला शेवटी एकदाचा..
46.. गर्दीतला कावळा..
47.. गोष्टीतला शहाणा कावळा..
48.. "क" - कलाकाराचा..
49.. पुन्हा एकदा कावळा..
50.. Horse Sculpture -01
51.. Horse Sculpture -02
52.. Computer Key Board Car Sculpture..
53.. Key Board Car Sculpture : Close-Up..
54.. काॅमन मॅन और सफेद घोडा..
इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते की इथली कोणतीही कलाकृती मला किंवा कोणालाही रस घेऊन बघता येईल, न्याहाळता येईल, तिचा आनंद घेता येईल.. हे शक्य नव्हतं.
याला कारण म्हणजे कुठल्याही कलाकृतीला जिथे जिथे आणि जेवढ्या जेवढ्या प्रकारे आणि तेही जेवढ्या जास्तीत जास्त माणसांना चिकटता येईल, तेवढी माणसं चिकटून उभी होती आणि एकतर सेल्फी काढत होती किंवा समोर उभ्या असलेल्या मित्र, मैत्रीण, गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड, नातेवाईक यांना फोटो काढायला सांगत होती.
प्रत्येक कलाकृतीचा जणू चक्रव्युहात अडकलेला अभिमन्यू झाला होता.
हा फेस्टिवल, या ठिकाणी मात्र कलाकारांना, कलाकृतींना उत्तेजन देण्याऐवजी त्यांचा अनमान करण्याचंच काम करत होता. या प्रत्येक कलाकृती भोवती एखादं बॅरियर जर उभं केलं असतं तर ते जास्त योग्य ठरलं असतं.
55.. टाकाऊतून शिल्पाकृती..
गर्दीमधे जेवढं सहज पहाता येईल तितकं पाहून जिला मी प्रवेश-कमान समजत होतो त्या प्रत्यक्षातल्या एक्झिट मधून मी बाहेर पडलो.
घड्याळ बघितल्यावर लक्षात आलं, की मी घाई केली तर मला देवदत्त पटनाईकांचं चर्चासत्र थोडी सुरुवात चुकली तरी का होईना, पण अटेंड करता येईल.
पत्नीला फोन लावायचा प्रयत्न केला पण आवाज अजिबात ऐकू जात नव्हता. गुगल मॅप वरती ते ठिकाण, त्या ठिकाणी पोहोचण्याचा रस्ता पहायचा प्रयत्न केला. पण एवढ्या प्रचंड गर्दीमुळे कदाचित नेटवर्क जॅम होऊन पुरेसा डेटा मिळत नव्हता.
एकही टॅक्सी रिकामी जात नव्हती आणि एखाद दुसरी मिळालीच तर त्यांना कमी अंतरावरती यायचं नव्हतं. तेव्हा अंदाजाने रस्ता पकडून चालायला सुरुवात केली.
थोडं पुढे गेल्यानंतर एका छोट्या गल्लीमध्ये, संपूर्ण गल्ली अडवून पंधरा-वीस माणसांचा घोळका उभा होता आणि कोणीतरी एकच व्यक्ती त्यांच्याशी बोलत होती. जवळ गेल्यावर कळलं अरे हा तर हेरिटेज वॉक.
बाजूने जाताना त्या माहिती देणाऱ्या मुलीने, 'यू कॅन जॉईन अस' असं म्हटलं पण बेलाॅर्ड पियरला पोहोचायचं असल्यामुळे मी विनम्रपणे तिला नकार दिला.
जरा पुढे गेल्यावरती लागलं ते हे सेंट थाॅमस कॅथेड्रल.
56.. सेंट थाॅमस कॅथेड्रल -01
57.. सेंट थाॅमस कॅथेड्रल -02
इथून फोन केल्यानंतर मात्र तो बायकोला लागला. माझी बस राईड न मिळाल्यामुळे मी पटनाईकांच्या चर्चासत्राला येतोय याची तिला कल्पना दिली. हाॅर्निमन सर्कलच्या मागच्या बाजूने शहिद भगतसिंग रोडवर येताना पुन्हा दिसली ती एशियाटिक सोसायटीची बिल्डिंग.
58.. एशियाटिक लायब्ररी - आता सायंकाळी..
संध्याकाळच्या दिव्यांच्या उजेडात तिचा परत एक फोटो काढून मी कालिकत रोडवरच्या इफ.बी. (If. Be) मधे गेलो.
59.. इफ. बी. (IF. BE.) इमारतीचा दर्शनी भाग आणि 'कॅफे Banyan ट्री' चा लोगो..
(१४५ वर्ष जुन्या आईस फॅक्टरीचं कला, रचना आणि वास्तुकला यांना उत्तेजन देण्यासाठी पुनरुज्जीवन आणि रुपांतर केलं आहे.)
(http://ifbe.space/ ही या संस्थेची वेबसाईट आहे.
छान माहिती आहे. वेबसाईटला जरुर भेट द्या.)
60.. इमारतीच्या मध्यभागी असलेला आणि जतन केलेला वड..
थोडीफार ॲडजस्टमेंट केल्यावर बसायला जागाही मिळाली. चर्चेची थोडी सुरुवात गेली होती पण बरंच चर्चासत्र पहायला, ऐकायला मिळालं.
61.. देवदत्त पटनाईक कार्यक्रम..
पटनाईक "मिथ" या शब्दाचा पुराणकाळापासून बदलत गेलेला संदर्भ आणि आजच्या आधुनिक पिढीचे व्यवहार, आजचं जगणं या अनुषंगाने ते 'मिथ' आजच्या काळानुसार कसं बदलत गेलंय यावर बोलले.
भस्मासुर आणि बकासूर ही त्या काळातील मिथकं त्या काळातील कोणत्या वृत्ती दर्शवायची आणि त्या वृत्तींचं अस्तित्व आजच्या काळातही बदलत्या स्वरुपात कसं टिकून आहे याची त्यांनी उदाहरणं दिली.
आजच्या काळात वैयक्तिक आणि सामाजिक स्तरावर या भस्मासुरी आणि बकासुरी वृत्तींमुळे निर्माण होणाऱ्या समस्या आणि त्यांचे परिणाम यावर ते बोलले.
या दोन असूरवृत्तींवर नियंत्रण रहाण्यासाठी धर्माची आवश्यकता आणि अपरिहार्यता त्यांनी विषद केली.
बळी तो कानपिळी हा निसर्गनियम. पण याच्या नेमकं उलट वागणं म्हणजेच समाजातल्या 'आहे रे' वर्गाने समाजातल्या 'नाही रे' वर्गाची मनापासून काळजी घेणे हा तो धर्म असं ते म्हणाले.
चर्चासत्राच्या संपल्यावर त्याच्या बाजूलाच काही तरुण आर्किटेक्ट्सच्या कामाचं "Practices on the Horizon" हे प्रदर्शन भरलं होतं, तेही पाहायला मिळालं.
62.. तरुण आर्किटेक्ट्सच्या कामांचे प्रदर्शन..
63.. प्रदर्शनातील एक नमुना..
हे झाल्यावर त्याच इमारतीमध्ये असलेल्या कॅफे Banyan Tree मध्ये कॉफी घेतली.
64.. Cafe Banyan Tree..
बोलता बोलता बायको म्हणाली की पटनाईकांच्या कार्यक्रमाला उशीर होऊ नये म्हणून ती इथे आली, ते एवढ्या लवकर पोहोचली की आधीचं पाच ते सहाचं
Urban Design & Architecture या कॅटेगरीमधलं
"The Future of the Practice" - हे भविष्यवेधी आर्किटेक्चरल प्रॅक्टिस वरचं चर्चासत्रही (panel discussion) तिला पूर्ण अटेंड करता आलं.
'वास्तुकलेची भविष्यातील वाटचाल' हा विषय असला तरी त्याला स्पर्श करण्याऐवजी सर्वच सहभागींनी त्यांच्या सद्यकालीन प्रॅक्टिसची माहिती दिली आणि प्रोजेक्ट दाखवले. त्या अर्थाने हे चर्चासत्र विषयाशी सुसंगत नव्हतं असं तीचं मत झालं.
65.. Bye.. Bye.. Kala Ghoda.
कॅफे मधून बाहेर आल्यावर ओला बुक केली ती लगेच मिळाली आणि ईस्टर्न एक्सप्रेस फ्री वे वरुन आम्ही घरच्या वाटेला लागलो.
हा संपूर्ण दिवस जरी पळापळीचा, अनेक कार्यक्रमांना रांगा लावण्याचा, दुपारच्या उन्हातल्या तंगडतोडीचा आणि तसा मोठ्या कालावधीचा असला तरी खूपच समाधानाचा, बरंच काही मिळाल्याचा आणि मुख्य म्हणजे 'काळाघोडा महोत्सव पहायचाय' ही कित्येक वर्षांची इच्छापूर्ती करणारा ठरला..
तेव्हां ही साठा उत्तराची कहाणी पाचां उत्तरी सुफळ संपूर्ण..!!
काळा घोडा गटग अनुषंगाने काही विचार..
मुळात या वर्षी मी काळा घोडा महोत्सवाला जायचा विचार केला तो मायबोलीवरच्या गटगच्या चर्चेमुळे.
पण प्रत्यक्षात महोत्सवाचा अनुभव घेतल्यानंतर मला असं वाटतं की हा महोत्सव गटगसाठी योग्य नाही.
अर्थात माझे हे निष्कर्ष शनिवारच्या प्रचंड गर्दीच्या अनुभवावर आधारित आहेत. (गटग ही याच दिवशी ठरलं होतं). पण सोमवार ते शुक्रवार या वर्किंग डेजना गटग अटेंड करणं जमू शकेल की नाही, हा ही एक प्रश्न आहे.
गटगसाठी महोत्सव अयोग्य वाटण्याची काही कारणं पुढीलप्रमाणे :
महोत्सवात जी चर्चासत्र, परिसंवाद असतात त्याबाबत सगळ्यांच्या आवडीनिवडी सारख्याच असतील असं नाही.
ही ठिकाणं खूप लांब लांबच्या वॉकिंग डिस्टन्सवरती असतात, त्यामुळे तिथे येण्याजाण्यासाठी जास्त वेळ जातो.
टॅक्सीने जायचं म्हटलं तरीसुद्धा बऱ्याचदा त्यांचा नकार ठरलेला असतो. आणि काळा घोडा परिसरात जायचे म्हटल्यावर तुलनेने जवळच्या (ड्रायव्हिंग डिस्टन्स) अंतरामुळेही आणि मुख्यत्वे गर्दीमुळे ते नकार देतात.
त्यातही एका टॅक्सीपुरती माणसं असतील तर एखाद्या वेळेला ती कायम एकत्र राहतील. पण जास्त सदस्य असतील तर ज्या दोन, तीन, चार टॅक्सीज् लागतील त्या एका वेळेला मिळणं जवळजवळ अशक्य आहे.
खाण्यापिण्याच्या प्रत्येक ठिकाणी तोबा गर्दी असते आणि इथेही वेटिंग पिरियड मोठा असतो.
काही परिचित आणि काही बरेचसे अपरिचित अशा व्यक्ती एकत्र आल्यानंतर प्राथमिक ओळखीसाठी एखादी निवांत जागा, बसायची चांगली व्यवस्था, खाण्यापिण्याची पटकन होऊ शकणारी सोय असं असेल, तर हा परिचय तुलनेने सोपा, सहज होऊन जातो. पण ह्याच गोष्टी गर्दीमध्ये फिरत फिरत जमणं कठीण आहे.
अगदी रस्त्यावर चालत फिरायचं म्हटलं तरी प्रचंड गर्दी आणि नेटवर्क जॅम मुळे संपर्क साधणं अवघड होऊन जातं.
भरगच्च कार्यक्रम असल्यामुळे घरी परततानाही मुंबई, ठाणेकर, फारात फार कल्याण, दहिसर पर्यंतच्या लोकांना हे जमावं.
तेव्हा गटगच करायचं असेल तर ओळखीपाळखी, परस्पर परिचय, गप्पागोष्टी, मनसोक्त खादाडी यासाठी एखादी निवांत जागाच बेस्ट..
So this is what we missed.
So this is what we missed. खूप मस्त फोटो आणि वृत्तान्त. यातल्या अनेक इमारती तिथून जाताना किती वेळा पाहिल्या असतील; काही तर रोजच. पण त्यांचा भव्यपणा , सौंदर्य तेव्हा जाणवायचं नाही.
गटगबद्दल सहमत.
आमच्यातल्या काहींना पंचम पुरीवाला इथला फुड वॉक आणि नेव्हल बँडमध्ये रस होता. शिवाय पुणेकरांना संध्याकाळी लवकर परतायचं असल्याने त्यांचे कार्यक्रम हुकणार होते.
लय म्हणजे लय भारी. आवडलेच !
लय म्हणजे लय भारी. आवडलेच !
मस्त माहिती आणि फोटो!
मस्त माहिती आणि फोटो!
मुंबईतलेच/जवळपासचे असल्याने
मुंबईतलेच/जवळपासचे असल्याने इतका वेळ देऊ शकलात. तुमच्या आवडीचे कार्यक्रम खूप प्रकारचे आहेत त्यामुळे हे पाहू का ते करू असं झालं.
दूरवरून येणारे किंवा कलासक्त नसल्यास काला घोडा ऊत्सवात काहीच मजा येणार नाही. फक्त सेल्फी काढणे आणे कुल्फी खाणे हेच बऱ्याच तरुण मुलामुलींचे गट करत होते.
मी दरवर्षी जातो पण पहिल्या दुसऱ्या दिवशी. गर्दी नव्हतीच. गटगमधले कुणी आले तर म्हणून अकरा तारखेलाही ठरल्याप्रमाणे अर्धा तास उभारी राहिलो. सर्वांनाच एकमेकांना भेटायला आवडत असेल असे नसते. मला कुठे जायचे झाल्यास ठरवाठरवी करत नाही. मी अमुक वेळी जाणार जॉईन व्हा सांगून सोडून देतो.
पूर्वी शीव'लाच राहात असल्याने मुंबई शांतपणे पाहिली आहे. त्या वेळी डबलडेकर आवडती होती. पुढे प्रवाशांनीच तिला नाकारली. म्हणजे वरच्या मजल्यावर जायला चाळीस+ वाले तयारच नसत. भांडणं. मग त्या बसेस काढायचा निर्णय झाला. (दोन कंडक्टर लागतात आणि वाढत जाणारे उड्डाणपूल हीसुद्धा कारणे आहेत.) आता नवीन डबलडेकर खरेदी झाल्या आहेत आणि फक्त ठराविक मार्गांवर चालवणार. ( क्रिकेट, फुटबॉलच्या टीम जिंकून येतात तेव्हा ओपन डेक डबलडेकरच येते धावून. महागड्या गाड्या तेव्हा कामाच्या नसतात. पुढे असे प्रसंग येणार म्हणून नवीन गाड्या.)असो.
प्रदर्शने, फुटपाथवरच्या ओपन गॅलेऱ्या (प्रायोजक कॅम्लिन) चांगल्याच.
कोकण, हिल स्टेशनस किंवा मुंबई या हळूहळू अनुभवाच्या गोष्टी आहेत,'करायच्या' नाहीत.
तुमचे धावते प्रवासवर्णन आणि उत्तम फोटो छानच झाले आहे.
आहाहा काय सुरेख फोटो आहेत. भर
आहाहा काय सुरेख फोटो आहेत. भर दुपारी मुंबई काय सुंदर दिसते. अविट. दुपार म्हटले की मुंबईच आठवते मला. मुंबईची एकही नकोशी आठवण नाही मला. किंबहुना .... सर्वाधिक आवडते शहर.
फारच अप्रतिम आहेत फोटो ,
फारच अप्रतिम आहेत फोटो , वर्णनही आवडले. घरबसल्या सहल झाली.
कॅमेरा कुठला वापरता निरु ?
खूप छान वृत्तान्त आणि
खूप छान वृत्तान्त आणि फोटोसुद्धा. बकाल मुंबईत तुमचा एक दिवस आनंदाचा गेला, हे वाचून बरे वाटले. प्रचंड गर्दी, लांबलचक लाइन्स, टॅक्सी आणि हॉटेल/जेवणाची गैरसोय असूनही तुम्ही उत्साहाने, इतक्या दूरवर कार्यक्रमाला गेलात म्हणून तुमचे कौतुक आहे. इतक्या गर्दीत दिवस घालवायचा माझा तरी उत्साह आता कमी झाला आहे.
<>
<< So this is what we missed. >>
@ भरत, बऱ्याच मायबोलीकरांना काळा घोडा फेस्टिवल बघायची इच्छा होती आणि त्यांना काही कारणामुळे जमलं नाही.
मला जायला जमलं आणि महोत्सवासाठी संपूर्ण दिवस मोकळा ठेवला होता, तेव्हा विचार केला की ही अप्रत्यक्ष सफर घडवून आणली तर कदाचित त्यांना आवडेल.
@ Srd, मी व्हाॅट्सअप ग्रुप वर नसल्यामुळे कोण कुठे उभं राहणार आहे त्याची मला कल्पना नव्हती. मी जेव्हा एशियाटिक लायब्ररीमध्ये होतो तेव्हा नेमके तुम्ही जहांगीरला होतात. अर्थात आपण एकमेकांना ओळखणार कसं हा प्रश्न होताच. पण तरीही आपण आसपास असून सुद्धा एकमेकांना भेटू शकलो नाही याची खंत वाटते.
@ सामो, मुंबई छानच आहे. प्रश्नच नाही.
@ अस्मिता. हे सर्व फोटो माझ्या मोबाईलने काढलेले आहेत.
तुम्ही सर्व, फारएण्ड, कुमार१ यांचे प्रतिसादाबद्दल आभार..
मस्त फोटो!
मस्त फोटो!
स्पेशली मुंबईचे..
अविट. दुपार म्हटले की मुंबईच आठवते >>>> +७८६ सामो
पित्ताचा त्रास वाढल्याने हे असे दुपारचे मुंबईत भटकने फार मिस करतो..
काला घोडा फेस्टिवल ची प्रवास
काला घोडा फेस्टिवल ची प्रवास यात्रा आवडली . फोटोमुळे महोत्सवाची कल्पना आली . उशीची कमान छान दिसते आहे .गर्दीचे फोटो आणि वर्णन वाचून गणेशोत्सव च डोळ्यासमोर आला . मी पुण्यावरून येणार होते पण प्रकृतीच्या कारणामुळे जमले नाही . गटग बाबत तुम्ही सांगितलेले मुद्दे बरोबर आहेत . बस राईड फक्त फेस्टिवल मध्येच असते का ? नाहीतर एखादा शनिवार/रविवार मुंबई दर्शन करायचा विचार आहे . आठवणीने इथे वृत्तांत आणि फोटो टाकल्याबद्दल धन्यवाद अ'नि'रुद्ध !!!
या धाग्याला दशसहस्र हार्टस !!
या धाग्याला दशसहस्र हार्टस !!!!!
यावर्षी जाता नाही आले पण तुमच्या सचित्र वृतांताने ताक दिले
दुतता.
फोटोज मधली एकदम मुंबई सुंदर
फोटोज मधली एकदम मुंबई सुंदर दिसते आहे ! मस्त बिल्डिंग्ज आहेत या सगळ्या. कालाघोडाला कधीच जायचा योग आलेला नाही आणि येईल असेही वाटत नाही पण या फोटोज मुळे वर्चुअल तरी टूर झाली.
@ उपाशी बोका, गर्दीत फिरायला
@ उपाशी बोका, गर्दीत फिरायला मलाही आवडत नाहीच. पण काळाघोडा महोत्सव एकदा तरी बघायचा होता. विकडेजना जाणं शक्य नव्हतं. आणि त्या शनिवारी Indoor कार्यक्रम चांगले होते, म्हणून गेलो.
) आणि maitreyee ह्यांचेही प्रतिसादाबद्दल आभार.
@अश्विनी११, बस राईड एरवी पण असते. (निलांबरी ओपन डेक बस टुर)
https://www.facebook.com/opendeckbusmumbai?mibextid=ZbWKwL
ही त्यांच्या Facebook पानाची लिंक..
तुमच्याबरोबरच ऋन्मेऽऽष, अनिंद्य (दशसहस्र हार्ट्स चालतीलच की..
नितांत सुंदर वृत्तांत. वर्णन
नितांत सुंदर वृत्तांत. वर्णन ओघवते असल्याने तुमच्या बरोबरच आहे असं वाटलं.
फोटो पण अप्रतिमच आलेत.
काला घोडा फेस्टिवलला भेट देणे हे अजूनही बकेट लिस्ट मध्येच आहे. बघू कधी लिस्टच्या बाहेर येते ते !
छान वृत्तान्त आणि फोटो.
छान वृत्तान्त आणि फोटो.
उत्साही वातावरण आहे
आहाहा कसले सुरेख फोटो आहेत,
आहाहा कसले सुरेख फोटो आहेत, नेत्रसुखद, माहितीही छान, मस्त झाली भ्रमंती तुमच्याबरोबर आमचीही.
ते काळा घोडा फेस्टिवलचं प्रवेशद्वार आहे ते ज्यांनी ज्यांनी डिझाईन केलं ती माहिती आणि ते आर्टीस्ट यांची माहिती आणि बाईट्स मला अक्षय केळकरच्या vlog मध्ये मिळाली, तो vlog मी बिग बॉस मराठी सिझन चार वर शेअर केलाय. खूप आदर वाटला, एक दृष्टिहीन मुलगी आणि एक ट्रान्सजेंडर यांचा सहभाग होता त्यात.
त्या निलांबरी बसमधुन ओपन डेक मधून प्रवास करायचा आहे एकदा. पूर्वीच्या मुंबईत डबलडेकरने प्रवास करायचा योग आला तर वरच्या मजल्यावर बसायला जास्त आवडायचं.
खूप छान वृत्तान्त आणि
खूप छान वृत्तान्त आणि फोटोसुद्धा. >> अनुमोदन!!
खूपच छान वृत्तांत आणि प्रचि!
खूपच छान वृत्तांत आणि प्रचि!
खूप सुंदर चित्रदर्शी आढावा.
खूप सुंदर चित्रदर्शी आढावा.
चित्रे तर सुंदरच!
नितांत सुंदर वृत्तांत. वर्णन
नितांत सुंदर वृत्तांत. वर्णन ओघवते असल्याने तुमच्या बरोबरच आहे असं वाटलं.
फोटो पण अप्रतिमच आलेत....+१.
मुंबईत असून एकदाही तिथे गेले नाही याबद्दल खूप खेद वाटतो.
वा, फार मस्त लिहिलत. जणू
वा, फार मस्त लिहिलत. जणू तुमच्या बरोबर सगळं फिरून पहात होते. फोटो सगळेच छान. सोबत त्या त्या ठिकाणचे वर्णन आणि तुमची टिपणी आवडली. एकूणातच मस्त ट्रिट मिळाली, धन्यवाद!
वा, फार मस्त लिहिलत. जणू
वा, फार मस्त लिहिलत. जणू तुमच्या बरोबर सगळं फिरून पहात होते. फोटो सगळेच छान. >> +1
माबोवर गटग होणार वाचलं तेव्हाच पहिल्यांदा याविषयी कळलं. उत्सुकता होतीच. धन्यवाद .
ओघवती भाषा आणि अनेक गोष्टींचा
ओघवती भाषा आणि अनेक गोष्टींचा थोडक्यात परामर्श...
अप्रतिम प्र. चि.
वाचकाला खिळवून ठेवणारा वृतांत...
सगळं वाचल्यावर लक्षात आलं हा उत्सव सर्वांगाने अनुभवायचा तर एक दिवस खूप छोटा आहे.
धन्यवाद....
.
>>>ते काळा घोडा फेस्टिवलचं
>>>ते काळा घोडा फेस्टिवलचं प्रवेशद्वार आहे ते ज्यांनी ज्यांनी डिझाईन केलं ती माहिती आणि ते आर्टीस्ट यांची माहिती आणि बाईट्स मला अक्षय केळकरच्या vlog मध्ये मिळाली, तो vlog मी बिग बॉस मराठी सिझन चार वर शेअर केलाय. <<<
@ अंजू, vlog माहिती छान आहे.
>>सगळं वाचल्यावर लक्षात आलं हा उत्सव सर्वांगाने अनुभवायचा तर एक दिवस खूप छोटा आहे.<<
@ दत्तात्रय साळुंके, कला प्रदर्शन, चित्र प्रदर्शन हे एका दिवसात आरामात होतं. फक्त जे वेगवेगळे Indoor/Outdoor कार्यक्रम आहेत ते दर दिवशी खूप आहेत आणि बर्याचदा दर दिवशी वेगळे आहेत. (हेरिटेज वाॅक दररोज आहेत).
त्यामुळे कलाकृती आणि एखाद दोन कार्यक्रम एका दिवसात आरामात होतील. पण बरेच कार्यक्रम बघायचे असतील तर जास्त फेऱ्या मारायला लागतील.
तुमचे आणि चौथा कोनाडा, Sparkle, anudon, वावे, अज्ञातवासी, देवकी, अवल, आणि वर्णीता यांचे अभिप्रायाबद्दल आभार..
मायबोलीकरांनो,
मायबोलीकरांनो,
काळा घोडा फेस्टिवल २० तारखेपासून सुरु झाला आहे आणि २७/२८ तारखेपर्यंत आहे. शुक्रवारी २६ तारखेला प्रजासत्ताक दिनाची सुट्टीही आहे. म्हणजेच जोडून सुट्ट्या आल्या आहेत.
गेल्या वर्षी काळा घोडा उत्सवाचे धागे जोरात होते..
यावर्षी का कमी उत्साह..??
मुलाची खूप इच्छा होती
मुलाची खूप इच्छा होती यावेळेस काळा घोडा फेस्टीवलला जायची.. पण रविवार पर्यंत फावला वेळ नसल्याने जमेल असं वाटत नाही.
माझा सध्या डॉक्टर व्हिजिट
माझा सध्या डॉक्टर व्हिजिट महोत्सव सुरू आहे. त्यामुळे काळा घोडाला यंदाचा मुहूर्त नाही.
इथले सगळे फोटो पुन्हा पाहिले. डोळे निवले.
Home - Kala Ghoda Arts
कालाघोडा कला महोत्सव २०२५ : काही लिंक्स..
Home - Kala Ghoda Arts Festival 25 Jan - 2 Feb 2025 Mumbai India https://search.app/2GVcCTgEZfiQnSa79
Program XXV - Kala Ghoda Arts Festival 25 Jan - 2 Feb 2025 Mumbai India https://search.app/mdnxQ8KVAqf3iiNr8
https://www.instagram.com/p/DEZWY3IJdcv/?igsh=M3Q1Y25mdmRtMXN2
https://www.instagram.com/p/DDPRg9ooy2c/?igsh=OTRnaHdlMWNxaGZi