'छत्रपती शिवाजी महाराज' असे पूर्ण नाव घेणे ही जबरदस्ती आहे का?

Submitted by हरचंद पालव on 28 November, 2019 - 02:37

सर्वप्रथम हे मान्यच करायला पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व महाराष्ट्राचे दैवत आहे. त्यांचे चरित्र अतुलनीय आहे. इतिहासात एक द्रष्टा राजा, कुशल राज्यकर्ता, सेनापती, संघटक, शककर्ता, प्रजाहितदक्ष; इतकेच काय - सिंहासनाधीश्वर, प्रौढप्रतापपुरंधर, राजाधिराज - अशी कितीतरी विशेषणे लावली तरी ती कमीच पडतील. त्यांच्या विषयी लिहिताना रामदासस्वामीं पासून ते आजपर्यंत कित्येक इतिहासकार, कादंबरीकर, नाटककार, चित्रपटकथालेखक यांची लेखणी थकली तरी त्यांचे संपूर्ण वर्णन लिहायला ती अपुरीच पडेल इतके उत्तुंग व्यक्तिमत्त्व! त्यामुळे महाराजांबद्दल आदर आहे हे सांगायला लागायची किंवा त्यासाठी कुठला पुरावा देण्याची गरज निदान मराठी माणसास नसावी.

आता हे सर्व असताना नुकत्याच काही घडामोडींमुळे त्यांच्या नावाचे संबोधन चर्चेत आले आहे. अमिताभ बच्चन काम करत असलेल्या कौन बनेगा करोडपती कर्यक्रमात एकीकडे 'मुघल-सम्राट औरंगजेब' असा उल्लेख असताना त्याच खाली केवळ 'शिवाजी' हा उल्लेख करणं हे अपमानास्पद वाटते हे खरेच! त्याबद्दल त्यांचा निषेध. परंतु हे लक्षात घ्यायला हवे की इथे अपमान हा संबोधनाच्या तुलनेतून निर्माण झाला आहे. इतर ठिकाणी स्टँड-अलोन उल्लेख असेल तर 'शिवाजी' म्हणणं तुम्हाला चुकीचं वाटतं का? असेल तर पुढे काही प्रश्न निर्माण होतातः

१. भोंडल्यामध्ये 'शिवाजी अमुचा राजा..' ह्या गीतात बदल करावेत का? इथे गाणारे महाराजांना प्रेमाने 'शिवाजी' म्हणतात, त्या प्रेमाचे काय? प्रेमापेक्षा आदर कायम मोठाच असतो का? ते ठरवणे व्यक्तिसापेक्ष असायला हवे ना?
२. लहानपणी 'शिवाजी म्हणतो' हा खेळ खेळायचो, त्यात महाराजांचा उल्लेख एकेरी असला तरी कधी अनादर वाटला नाही, किंबहुना तसे कधी डोक्यातही आले नाही. त्याचे काय?
३. शिवाजी महाराजांचा आदर सर्वांनी ठेवावा - ही जबरदस्ती आहे का? एखाद्याला नसेल वाटत, तर आपण तो आदर त्या/तिच्यावर लादावा का?
४. वरचे उत्तर होय असेल तर मग एखादा म्हणेल की त्याच्या मते चंद्रगुप्त मौर्य सर्वश्रेष्ठ आहे. मग चंद्रगुप्ताचा 'सम्राट चंद्रगुप्त मौर्य महाराज' किंवा अशोकाचा उल्लेख 'सम्राट अशोक महाराज' आणि अशोकचक्राचे नाव 'सम्राट अशोक महाराज चक्र' असे करावे - ही सक्ती केली तर चालेल का? झाशीची राणी - असा एकेरी उल्लेख तरी मग का करायचा? झाशीच्या महाराणी लक्ष्मीबाई - असे संपूर्ण नाव घ्या.
५. अनेक इतिहासकार इतिहास लिहिताना प्रत्येक व्यक्तिबद्दल केवळ एक ऐतिहासिक व्यक्ति म्हणून भावनिक न होतासुद्धा लिहू शकतात. त्यामुळे सरदेसाई काय, किंवा गोविंद पानसरे काय - त्यांनी 'शिवाजी कोण होता' - असे एकेरी उल्लेख केले असले तरी फक्त त्या संबोधनावर न जाता त्यांनी उलट त्यांच्याबद्दल काय मोठे संशोधन समोर आणले आहे - ते योगदान जास्त महत्त्वाचे नाही काय?
६. मला आठवते की लहानपणी एका इतिहासप्रेमी (परंतु कर्माने केवळ गुंडगिरी करणार्‍या) माणसाने दटावले होते की 'महाराज आपल्या सर्वांच्या कित्येक पिढ्यांसाठी आदरस्थानी आहेत. त्यांना नुसते शिवाजी काय म्हणता? घरी वडिलांना पण अरे-तुरे करता का?' आता आम्ही कुणी अरे-तुरे करत नव्हतो हे खरे; पण आज-कालची मुले वडिलांना अरे-तुरे खरोखरच करतात, पण त्यामुळे कुठेही आदर कमी झाला आहे असे वाटत नाही. फक्त 'अहो जाहो' म्हटल्याने आदर दाखवला जातो आणि 'अरे-तुरे' केल्याने आदर राहत नाही - हे सरसकटीकरण नाही काय?

तुम्हाला काय वाटते ते नक्की सांगा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

{त्यावर 'छत्रपती शिवाजी महाराज' म्हणा म्हणून आग्रह केला}
हे किमान तिसऱ्यांदा झाल़य. शरद केळकरनेच आधी एकदा केलं होतं. मग चिन्मय मांडलेकरने. >> मिडीया बाईटमध्ये राहण्यासाठी किंवा थोरा मोठ्यांच्या नावाला क्मॉडिटी सारखे वापरून आपले महत्व वाढवण्यासाठी असे करतात हे लोक. बहुतांशवेळा प्रेस कॉन्फरन्स मध्ये असे प्रश्न, त्यांची ऊत्तरे आणि पद्धतशीरपणे ह्याचे विडिओ सोशल मिडियावर पेरणे हे स्क्रिप्टेड असते. पब्लिसिटी स्टंट.
ईतिहास माहित असणे तर लांबच राहिले पण शिवाजी महाराजांच्या संदर्भातल्या फिफ्थ ग्रेड एन्सायक्लोपिडिक माहिती बद्दल सुद्धा बोंब असते ह्या लोकांची.

तो पवारांचा पोस्टर "ऑनेस्ट मिस्टेक" म्हणतात तसा आहे हे उघड आहे. दिसायला ऑड दिसते पण हे कोणी जाणूनबुजून करत नाही. पण हेच इतरांनी केले की जातीबिती काढतात हेच पब्लिक.

अरे त्यात मिस्टेकही मला काही वाटली नाही. Happy
पोस्टरवर प्लेसमेंट करताना वरच्या अंगाला/ हेडर मध्ये मोठी माणसं आणि खाली लहान हे कुठलं लॉजिक आहे? बरं पवार हेडर मध्ये आहेत. शिवाजी मध्यावर आहे. रिअल-इस्टेट बघितली तर शिवाजीची जास्तच आहे. हे म्हणजे 'महजब मलेरिआ फैलाता है' हे वाक्य सुटं करुन... म्हणजे समजा एक लवंगीची माळ आहे. आणि पोरं एकेक फटाका सुटा करुन लावताहेत तर एका सुट्या केलेल्या फटाक्यावरच्या पेपरात हे वरचं मलेरिआ वाक्य आहे. ते तितकंच वाचुन आमिर खान देशद्रोही आहे बोंब ठोका. किंवा ते वाक्य लोकसत्ताच्या फॉंट मध्ये आहे म्हणून लोकसत्ता ला कॅन्सल करा टाईप प्रकार आहे.
कॅन्सल करायचं ठरलंच होतं, हेन्स प्रूव्ह्ड करायच्या बुडत्याला काडी शोधायची. व्हॉट्सअ‍ॅप अंकलना पुढे ढकलायला पोस्टीची बेगमी झाली. लोकसत्ताला क्लिक बेट लिहायला काही मिळालं. इ .इ. इ.

मला जनरली शिवाजी महाराज पोस्टरवर वरती हवेत असे वाटते. पण कोणी माफी वगैरे मागावी इतकी गरज नाही Happy महाराष्ट्रात अपमान ब्रिगेड खूप फोफावले आहे.

अशी मोठमोठी लांबलचक नावे देण्याची टूमच निघाली आहे. झाशी,भोपाळ, चेन्नई सेंट्रल ची नवीन नावे पाहा.

छत्रपतींचे फोटो वापरणे हा देखील राजकीय स्वार्थ असतो आणि त्या फोटोत मग काहीतरी वादग्रस्त शोधून महाराजांशी तुलना केलीय असे दाखवून वाद उत्पन्न करणे यातही राजकीय स्वार्थ असतो.
आपण सामान्य माणूस या चर्चेपासून दूर राहू तरच ते उत्तम.

बुलेटच्या मडगार्ड वरती / इतर मोठ्या गाड्यांच्या नंबर प्लेट वरती जे लोक फोटो/ स्टिकर लावतात त्यांच्या विरुद्ध स्वतः पुढे बसून मागे फोटो लावला म्हणून कसा काय जनक्षोभ नसतो कधी ?
त्यामुळे -
आपण सामान्य माणूस या चर्चेपासून दूर राहू तरच ते उत्तम +१

बुलेटच्या मडगार्ड वरती / इतर मोठ्या गाड्यांच्या नंबर प्लेट वरती जे लोक फोटो/ स्टिकर लावतात त्यांच्या विरुद्ध स्वतः पुढे बसून मागे फोटो लावला म्हणून कसा काय जनक्षोभ नसतो कधी ?

खरेतर असे वाहनाच्या बाह्यभागावर महाराजांचा फोटो लावणे मला व्यक्तीशः पटत नाही, पावसाळ्यात खूप चिखल उडून महाराजांचा अपमान होतो. त्यापेक्षा आत dashboard वर महाराजांची छोटीशी मूर्ती सन्मानपूर्वक बसवावी. (डोक्यावर छोटेसे छत्र बसवल्यास अधिक उत्तम, कारण windsheild मधून दुपारी खूप कडक उन येते.)

पण जे लावतात त्यांनी मागच्या नंबरप्लेट वर लावण्यामागे एक कारण असते की, नाकाबंदीवरच्या पोलिसांना पुढची बाजू (नंबरप्लेट) आधी आणि जास्त चांगली दिसते, तुलनेने मागची नंबरप्लेट नंतर दिसते आणि तोपर्यंत वाहन पुढे निघून गेलेले असते. आणि कायदेशीरदृष्ट्या पाहायला गेले तर नंबरप्लेट वर वाहनाच्या नंबरशिवाय अन्य कोणताही मजकूर, चिन्ह असू नये, तो दंडनीय अपराध आहे. (CMVR50/177MVA, as per MumTrafficApp) अनेक गाड्यांची शोरूमसुद्धा आपली जाहिरात करण्यासाठी आपले नाव, फोन नंबर नंबरप्लेटवर खाली लिहितात ते खरे चुकीचे आहे.

विमु माझा मुद्दा तोच आहे की व्यक्ति गणिक हे आदराबद्दलचे मत का बदलत राहते. म्हणजे त्या पक्षाच्या कोणी असे केले की ओके आणि इतर कोणी केले की चुकिला माफी नाही टाइप !!

पण हेच इतरांनी केले की जातीबिती काढतात हेच पब्लिक.
Submitted by फारएण्ड on 1+१०००

ते मांडलेकर आणि केळकर गप बसले असते तर त्यावरून जाती काढून, शिवीगाळ करून पुरोगामीब्रिगेडी गुंडांनी असा कांगावा केला असता जणू तेच स्वतः एकेरी बोलले आहेत. You cannot be enough careful!
Wrong जातीच्या लोकांनी महाराजांचं शक्यतो नाव घेऊच नये, विषय काढुच नये हे उत्तम.

तुमच्या त्या ह्या मोड ऑन.

"चोराच्या मनात चांदणे. विशिष्ट जातीच्या लोकांनी थोरल्या छत्रपतींपासून शाहू महाराजांपर्यंत छत्रपतींना हीन , तुच्छ लेखण्याची परंपरा घालून दिली आहे. त्यामुळे एक्स्ट्रा केअरफुल राहिलेलं बरं."

मोड ऑफ. हा प्रतिसाद जेनेरिक नाही. स्पेसिफिक आहे. इतरांनी तो अंगाला लावून घेतल्यास त्यांची जबाबदारी.

साधारण ६०-७० वर्षांपूर्वी महाराजांचा उल्लेख एकेरीच करायची पद्धत होती. इतिहासात तमाम भारतीय-अभारतीय राजे एकेरी उल्लेखाने असत. "अशोकाने बौद्ध धर्माचा प्रसार केला" ह्यात कुणालाच काही वावगे वाटत नसे. खेळतानाही "शिवाजी म्हणतो पळा पळा"; लोकगीतांमध्येही "शिवाजी आमुचा राजा" असा पब्लिक मेमरी मध्येही एकेरीच उल्लेख असे. नंतर कधीतरी फक्त शिवाजी महाराजांची-शिवराय /महाराज इथवर प्रगती झाली. बाकी सगळे राजे अजूनही एकेरीच राहिले आहेत. तेही ठीकच होतं, पण हल्लीचं जे 'छत्रपती शिवाजी महाराज' चालू आहे, तो नाहक केलेला अट्टाहास आहे असं माझंही मत आहे. म्हणायला सुद्धा किती लांबलचक आणि जड पडतं! आणि मराठी भाषेत आई, देव हे एकेरीच आहेत. उत्तर भारतीय लोक गणपतीला 'गणेशजी', महादेवाला 'शिवजी' म्हणतात आणि ते ऐकायला विचित्र वाटतं. त्यांनाही आपले देवांसाठी एकेरी उल्लेख खटकतात. पण तीच पद्धत आहे आपली. त्यामुळे ज्यांना 'छत्रपती शिवाजी महाराज' म्हणायचं त्यांनी म्हणा, पण इतरांनीही म्हणावं असा अट्टाहास करू नका.

त्यामुळे ज्यांना 'छत्रपती शिवाजी महाराज' म्हणायचं त्यांनी म्हणा, पण इतरांनीही म्हणावं असा अट्टाहास करू नका.
+१११

शरी +७८६

खेळतानाही "शिवाजी म्हणतो पळा पळा"; लोकगीतांमध्येही "शिवाजी आमुचा राजा" असा पब्लिक मेमरी मध्येही एकेरीच उल्लेख असे.
>>>>>>
मालवण पाण्यामध्ये किल्ला, शिवाजी आत कसा शिरला
शिरला तर शिरला वर बोलतो कसा...
असे बोलून पुढे हिंदी पिक्चरचे गाणे म्हटले जायचे .. बालपणीच्या सगळ्या पिकनिक हेच गाण्यात गेल्या.

मालवण पाण्यामध्ये किल्ला, शिवाजी आत कसा शिरला
शिरला तर शिरला वर बोलतो कसा...
असे बोलून पुढे हिंदी पिक्चरचे गाणे म्हटले जायचे .. बालपणीच्या सगळ्या पिकनिक हेच गाण्यात गेल्या.>>>

ते तेव्हाही विचित्र वाटायचे, पण कसे सांगायचे ते कळायचे नाही!

डी वाय पाटील कॉलेजला एकदा काही कामाचा चार्ज लावला होता. रक्कम घेतल्यावर पावतीपुस्तक काढून लिहिता लिहिता बोलू किंवा बोलता बोलता लिहू लागलो- डी वाय पाटील कॉलेज - सहा हजार रुपये फक्त. अकाऊंटंट लगेच ओरडली - 'ते पद्मश्री डॉक्टर डी. वाय. पाटील कॉलेज" असं संपूर्ण लिहा.

सकाळ च्या छोट्या जाहिराती पाहत होतो सेकंड हँड कार साठी - एका जाहिरातीत लिहिलेलं दिसलं - सर्व प्रकारची जुनी वाहने मिळतील त्वरीत संपर्क करा - श्री. जगताप साहेब / श्री. फटांगरे साहेब. जन्मजात खोडकर स्वभाव उफाळून आला. नंबर डायल केला आणि विचारलं - मिस्टर जगताप किंवा फटांगरे आहेत का? पलीकडून आवाज आला - जगताप साहेब किंवा फटांगरे साहेब असं विचारा. साहेब असतील तुमचे ते माझे नाहीत असं म्हणून फोन ठेवून दिला.

डॉक्टर आणि शिक्षकांशी बोलताना त्यांच्या नावापुढे / नंतर डॉक्टर / सर मॅडम असं म्हंटलं नाही तर त्यांचा इगो दुखावतो असा अनुभव आहे.

महेश कोठारेच्या एका खतरनाक सिनेमात जॉनी लिव्हर आणि सदाशिव अमरापूरकर भांडत असतात. दोघे भांडणात एकमेकांचे आडनाव घेऊन ओरडतात. स अ ओरडतो - तुंगारे मग लगेच जॉ लि देखील तितक्याच चढ्या आवाजात ओरडतो - पोटभरे. मग अजून चढ्या आवाजात स अ तात्काळ ओरडतो - अ‍ॅडव्होकेट पोटभरे. सगळ्याच वकिलांना नाही पण ज्यांची वकिली जोरात चालते अशांना त्यांच्या नावामागे अ‍ॅडव्होकेट लावलं नाही की कसा तिळपापड होतो हे बारकाईने दाखवलं आहे.

सुभेदार कर्नल किंवा ब्रिगेडिअर जनरल पर्यंत सर्वच आजी माजी सेना कर्मचारी स्वतःच्या नावासोबत हुद्द्याचा उल्लेख करतात आणि समोरच्यानंही त्यांच्यासोबत बोलताना करावा असा आग्रह धरतात.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकरिता आठ अक्षरे अधिकची बोलायला किंवा टायपायला फार कष्ट वाटत नाहीत. माझं नाव आडनाव एकत्र केलं तर दहा अक्षरे होतात. महाराजांचं आडनाव तर आपण लिहितच नाही. मग ही अकरा अक्षरे जास्त आहेत? त्यांनी आपल्याकरिता जो त्याग केलाय त्याची जाणीव ठेवता इतके कष्ट तर आपण नक्कीच घ्यावेत.

धन्यवाद विमू

पण सक्ती करायची गरज पडावी लागणे हे दुर्दैवी आहे. हे उत्स्फुर्त आतून असं आलं पाहिजे. मला तर महाराजांचे कष्ट, त्यांनी सोसलेलं दु:ख, आप्तेष्टांसोबतच संघर्ष आणि सर्वात पीडादायक म्हणजे त्यांना लाभलेलं अल्पायुष्य हे वाचल्यावर त्यांनी हे सगळं नेमकं सोसलं तरी कशाकरिता असं वाटतं? त्यांना उसंत तरी कधी मिळाली असेल? व्हॉट वॉज द पर्सनल गेन ही अ‍ॅक्चूअली अ‍ॅचिव्ह्ड?

आपण जर एक लहान रोपटे जरी लावले तरी साधारण पुढच्या वीस वर्षांनंतर त्याची मधूर फळे आरामात खातो.

असं म्हणता येईल की महाराजांनी महाराष्ट्राच्या लाखो हेक्टर जमिनीवर अशी करोडो रोपटी लावून त्या वृक्षांचे घनदाट जंगल बनविले आणि त्यातलं एक फळही स्वतः खाण्याचं सुख त्यांना लाभलं नाही. किंबहूना त्यांची तशी अपेक्षाच नसावी. मग हे सर्व त्यांनी कोणाकरिता केलं? आमच्याचकरिता ना? आम्हालाच त्यांची कदर का नसावी?

इतिहास शिकविण्यात काहीतरी चूक झाली आहे. मोठी गंभीर चूक. अन्यथा अशा शीर्षकाचा धागा यायलाच नको होता.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकरिता आठ अक्षरे अधिकची बोलायला किंवा टायपायला फार कष्ट वाटत नाहीत.
>>>>

तुमच्या स्वत:च्याही सर्व पोस्टमध्ये महाराज ईतकाच उल्लेख आहे.
मी देखील असेच करतो. सवयीनेच होते. छत्रपती फक्त महाराजांच्या जयजयकाराची घोषणा देतानच तोंडी येते वा लिहिले जाते.
बाकी आदर - अनादर बोलणाऱ्याच्या लिहिणाऱ्याच्या टोनमध्ये जाणवतो. महाराजांबाबत मुद्दाम खोडसाळपणा कोणी करत असेल तर ते ही कळते आणि तेव्हा संताप हा होतोच

ते तेव्हाही विचित्र वाटायचे, पण कसे सांगायचे ते कळायचे नाही!
<<<<<<

मला ॲक्चुअली कधी ते विचित्र वाटले नाही. कारण हे गाणे बोलणारी जी मराठमोळी जनता होती ती माझ्या ओळखीचीच होती. आणि तिला महाराजांबद्दल प्रचंड आदर आहे हे माहीत होते. आमच्या चाळीत प्रत्येक माळ्यावर,प्रत्येक विंगमध्ये गणपती आणि शिवाजी महाराज यांचे फोटो वा भिंतीवर काढलेले चित्र होते. दोघांना ईक्वली देवाचा दर्जा होता. त्यामुळे नुसते बाप्पा म्हणतानाही जसे आपलेपणा वाटतो आणि श्रद्धाही आपल्या जागी कायम राहते तसे महाराजांचा एखाद्या गाण्यात नुसते नावाने उल्लेख करताना त्यांच्याबद्दलचा आदर आणि अभिमान आपल्या जागी कायम राहायचाच.

पद्मपुरस्कार ही नावापुढे किंवा आधी लावायची पदवी नव्हे असे वाचले होते. म्हणजे डॉक्टर अमुक किंवा कॅप्टन अमुक तसे पद्मश्री अमुक असे नसते. फक्त सशस्त्र दलांतील सैनिकांना संबोधताना त्यांचा क़िताब लावणे योग्य असते असे काहीसे वाचले होते

डॉक्टर आणि शिक्षकांशी बोलताना त्यांच्या नावापुढे / नंतर डॉक्टर / सर मॅडम असं म्हंटलं नाही तर त्यांचा इगो दुखावतो असा अनुभव आहे. >>>बाळंतपणात एकदा हॉस्पिटलमध्ये नर्स ला "नर्स" म्हटले होते तर ओरडून म्हणाली नर्स नाही म्हणायचे सिस्टर म्हणायचे माझी ट्यूब नाही पेटली मी म्हणले, कुणाची? तर रागात निघून गेली .

डॉक्टर आणि शिक्षकांशी बोलताना त्यांच्या नावापुढे / नंतर डॉक्टर / सर मॅडम असं म्हंटलं नाही तर त्यांचा इगो दुखावतो असा अनुभव आहे. >>>बाळंतपणात एकदा हॉस्पिटलमध्ये नर्स ला "नर्स" म्हटले होते तर ओरडून म्हणाली नर्स नाही म्हणायचे सिस्टर म्हणायचे माझी ट्यूब नाही पेटली मी म्हणले, कुणाची? तर रागात निघून गेली .

तसेच प्रत्येक वेळी माननीय .. (नाव) साहेब ... (आडनाव), किंवा उल्लेख करतांना माननीय .. साहेब (केवळ नावाचा उल्लेख), हे कितपत योग्य आहे?

डॉक्टर आणि शिक्षकांशी बोलताना त्यांच्या नावापुढे / नंतर डॉक्टर / सर मॅडम असं म्हंटलं नाही तर त्यांचा इगो दुखावतो असा अनुभव आहे. >> हे ही चूकच आहे. अजिबात समर्थनीय नाही.

तसेच प्रत्येक वेळी माननीय .. (नाव) साहेब ... (आडनाव), किंवा उल्लेख करतांना माननीय .. साहेब (केवळ नावाचा उल्लेख), हे कितपत योग्य आहे? >> स्वतःहून तसा उल्लेख कुणी करत असेल तर ठीक आहे, पण इतरांनीही तसाच उल्लेख करावा ही सक्ती चूक आहे.

'छत्रपती शिवाजी महाराज' असे पूर्ण नाव घेणे ही जबरदस्ती आहे का? नाही पण...
दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील कथा आहे.
एक रंगरूट लष्कराच्या छावणीत दाखल होतो. आज पहिलाच दिवस आहे. सकाळी परेड झाल्यावर नाश्त्याच्या लाईन मध्ये उभा राहतो. नंबर आल्यावर सार्जंट एक कागद पुढे करतो.
"इथे सही कर."
"हे काय?"
""मी माझ्या देशावर प्रेम करतो." अस डिक्लरेशन आहे. सही कर नि नाश्ता घे."
रंगरूटचे अर्थात देशावर प्रेम असते. तो भारावून जातो.आणि खुशीने सही करतो.
आता दुपारची जेवणाची लाईन. नंबर आल्यावर सार्जंट एक कागद पुढे करतो.
"इथे सही कर."
"हे काय?"
""मी माझ्या देशावर प्रेम करतो." अस डिक्लरेशन आहे. सही कर नि जेवण घे."
"अहो सर, मी सकाळीच चार तासापूर्वी लिहून दिले होतो. आता पुन्हा?"
" क्यू बे, तू देशावर प्रेम करतोस ना? मग पुन्हा सही करायला तुझे हात झिजतात काय?"
अस आहे ते हपा.

Pages

Back to top