हिमालय - पिंडारी - द्वाली ते फुकरिया
आज समिट. भरपूर अंतर, आणि भरपूर उंचीवर जायचं होतं. आणि तिथे थोडा वेळ थांबून परत यायचं होतं. फुकरियाहून समिटला पोचायला साडे तीन ते चार तास लागणार होते. १२ किलोमीटरचा पल्ला होता. सकाळी लवकर निघालो होतो. लवकरची वेळ आणि गारवा यामुळे पाणी फार प्यायले नव्हते आणि चढायला सुरुवात केल्यावर पहिल्या पाच मिनिटांत मला गार वार्याने इंगा दाखवला. डोकं भणभणल्यासारखं झालं. थांबून पाणी प्यायले तशी पाच मिनिटांत परत नॉर्मल झाले. जाताना हिमालयाची निरनिराळी चित्तथरारक लँड्स्केप्स आपल्याला मंत्रमुग्ध करुन टाकतात. आम्ही आजही पिंडार व्हॅलीतून प्रवास करत होतो. पिंडार ग्लेशियरमधील हवामान काही मिनिटांत बदलू शकते, त्यामुळे सकाळी लवकर निघुन ९:३०-१०:०० पर्यंत आम्ही समिटला पोचणार असा बेत होता. आजही मधे काही प्रवाह, काही ठिकाणी कडक बर्फ असे पॅचेस होते. घसरणार्या बर्फाचा एक पॅच ओलांडून आम्ही पुढे गेलो आणि मोठ्या हिरव्यागार कुरणापाशी येऊन पोहोचलो.
मधली ही काही दृश्य
पहिला थांबा..इथुन बेस कॅम्प असा दिसत होता
चढा, चढा, चढत रहा
मंत्रमुग्ध
इथे शेवटच्या टप्प्यात आम्ही रॉकफॉल एरियात पोचलो. हा अतिशय संवेदनशील भाग आहे, कधीही वरून खडक कोसळू शकतात, त्यामुळे इथुन जाताना जरा सावध रहावं लागतं. एक जरा घसरडा बर्फ ओलांडला आणि आम्ही पायवाटेला लागलो. ही पायवाट जरा अवघड, अगदी निमुळती आहे, अनेक ठिकाणी तुटलेली आहे. पण समोर बर्फाच्छादीत चांगुच शिखर डोळ्यांचं पारणं फेडतं.
आणि आम्ही समिटला पोचलो. इथे एक पठार आहे. तिथे एक झोपडी आणि एक मंदीर. हे सुप्रसिद्ध पिंडारी बाबा किंवा बाबा धर्मानंद यांचे घर आहे. काही जण तिथल्या गवतात लोळत होते. मुलं बर्फात जोरदार दंगा करत होती आणि काही जण बाबा धर्मानंद यांच्या कडे चहा घेत होते. बाबा धर्मानंद आलेल्या प्रत्येकाला चहा देतात.
आता अगदी जवळ आलोय
पण आजचा ट्रेक अजुन संपला नव्हता. झीरो पॉइंट साठी इथुन पुढे दिड किलोमीटर थोडं चालत, चढत जायचं होतं. इथे बसले असते तर परत उठणं आणि चढणं नकोसं झालं असतं , त्यामुळे पाच मिनिटं थांबून आम्ही पुढे निघालो. दमत दमत हे अंतर पार केलं आणि अहाहा! एका निमुळत्या वाटेवर पोचलो आणि आडो! 'You have reached the Zero Point' असा फलक दिसला आणि शीण काही काळापुरता निघुन गेला. १२,८०० फूटावर आम्ही उभे होतो. हा आनंद अवर्णनीय होता. इथे येईपर्यंत मला मी हे करु शकेन अशी खात्री नव्हती. इकडे तर फोटो सेशन मस्ट!
लिडर्स
शीण काही काळापुरता निघुन गेला असं म्हणते आहे कारण दुसर्याच मिनिटाला मला गरगरल्यासारखं झालं. इतक्या निमुळत्या कड्यावर आम्ही होतो. तिथे मी चक्क मांडी घालून बसले आणि हातात हनुवटी ठेउन बसले. आणि त्याहून विशेष म्हणजे तिथे मला काही सेकंद झोप लागली. ओक्सिजन लेव्हल कमी झाली असणार. भरपूर पाणी प्यायलं, जरा बरं वाटल्यावर खाली मंदिराशी परत आले. तिथे तो चहाही मला जाईना. मळमळ, डोकेदुखी, चक्कर यातलं काहीही मला आलटून पालटून होतंय असं मला वाटत होतं. आमच्यातल्या माहितगारांपैकी कुणीतरी कुठलीशी गोळी दिली. गोळी घेउन दहा मिनिटं डोळे मिटून बसले त्यांनन्तर मी परत माणसात आले. एकदम फ्रेश वाटायला लागलं. मग सगळे आपापल्या वेगाप्रमाणे परत फुरकिया ला परत आलो. आज झोप न होउन मला चालणार नव्हते. त्यामुळे आज मी गोळी घेउनच पडी टाकली ती एकदम पहाटेच जागी झाले.
सगळे फोटो मस्त!
सगळे फोटो मस्त!
फोटो मस्त. वर्णनही छानच. तुला
फोटो मस्त. वर्णनही छानच. तुला झालेला त्रास थोडक्यात कमी झाला हे बरं झालं.