माझा जन्म तसा श्रावणातल्या एका सोमवारचा. ईतके सात्विक रत्न माझ्या आईच्या पदरात टाकायला देवाला हिच तिथी योग्य वाटली असावी. पण वाढदिवस साजरा मात्र आम्ही करतो ईंग्रजी कॅलेंडरनुसार ११ ऑगस्टला. त्यामुळे माझ्या दर तिसर्या वाढदिवसाला श्रावणातला एखादा सण येणे माझ्यासाठी नवीन नाही. कधी हंडी, कधी नागपंचमी, तर यंदा रक्षाबंधन, हे चालूच असते. काही नाही तर फिरूनी श्रावणी सोमवार येतोच. मला वगळता घरी सर्वांचेच मांसाहार करायचे वांधे होत असल्याने माझ्या वाढदिवशी तो ओरडाही मलाच खावा लागतो. पण त्यामुळे माझ्या जन्मदिवशी आणखी एखाद्या जीवाचा मृत्युदिन होत नाही हे चांगलेच होते.
तर असा हा वाढदिवस आपल्याला लहानपणापासूनच स्पेशल वाटतो. उगाचच. का ते माहीत नाही. कारण आपले यात काहीच योगदान नसते. पण तरी आपण सकाळी उठल्यापासून हवेत तरंगत असतो. नवीन छान छान कपडे घालून शाळा-कॉलेज-ऑफिसला जातो. लोकांच्या हसून शुभेच्छा स्विकारतो. त्यांना पार्टीही देतो. ते गिफ्टही देतात. त्यांना रिटर्न गिफ्टही देतो. घराची सजावट करून चार लोकं गोळा करून केक कापतो. तो वॉचमनपासून शेजारीपाजारी सर्वांना वाटतो. हे सगळे का? असा प्रश्न पडतो दरवेळी. आपण आपल्या आयुष्यातील एक माईलस्टोन, एक मैलाचा दगड गाठला म्हणून? एक वर्षे आयुष्य जगलो म्हणून? भले मग त्या वर्षी काहीही अभ्यास न करता बारावीला नापास का झालो असेना. वर्ष कितीही वाईट का गेले असेना. कितीही बिनकामाचे का जगलो असेना. तरीही वाढदिवसाचा दिवस हा सुखावतोच.
लहानपणी मी देखील शाळा कॉलेजला सारेच वाढदिवस एंजॉय केले. पण जसे मोठे होऊ लागलो तसे वाढदिवस मला नकोसा वाटू लागला. याचे एक कारण म्हणजे काळानुसार माझ्या स्वभावात झालेला माणूसघाणा बदल. उगाच फारसे कधी न बोलणारे, जुजबी ओळखीचे लोकं प्रत्यक्ष समोर भेटून शुभेच्छा देतात, त्यांचा हसून स्विकार करणे नकोसे वाटते. बर्र त्या बदल्यात त्यांना चॉकलेटही आपणच द्यायचे. आताच्या सोशलसाईटच्या जमान्यात लोकं व्हॉटसप फेसबूकवर पर्सनल मेसेज करून दिवसभर शुभेच्छा देत राहणार. नंतर रात्रभर ते मेसेज वाचून त्यांना पर्सनली रिप्लाय करत राहायचे. व्हॉटसप ग्रूपवर जावे तर तिथेही दिवसभर तेच. त्याच त्याच कोरड्या शुभेच्छा पन्नास जण देणार. त्या वाचून धन्यवाद धन्यवाद करत राहा..
अर्थात हे सर्वच शुभेच्छांना लागू नाही. ओळखीच्या अन आवडीच्या लोकांच्या शुभेच्छा सुखावतातच. पण लाईफ ईतकी सोशल झालीय की दूरदूरच्या शुभेच्छांनाही स्विकारावे, किंबहुना झेलावे लागतेच. आणि यामागे आपले कर्तुत्व तरी काय असते, तर आपण त्या अमुकतमुक दिवशी जन्म घेतला आणि आज त्याच अमुकतमुक दिवशी आपले वय आणखी एकाने वाढले. याच कारणासाठी मी गेले काही वर्षे माझ्या सर्व सोशलसाईट्स अकाऊंटवर माझ्या जन्मदिवसाची तारीख कोणाला दिसणार नाही अशी सेटींग ठेवली आहे. जेणेकरून किमान औपचारीकता म्हणून येणार्या शुभेच्छा टळतील. आणि ज्यांना खरेच माझ्या या जगात असण्याचा आनंद आहे तेच लोकं मला आठवणीने शुभेच्छा देतील.
असो, प्रस्तावनेत जरा जास्तच पॅराग्राफ पडले नाही. नेहमीचेच आहे माझे. जो किस्सा सांगायला आलेलो तो घेतो आता. पण त्याआधी हि प्रस्तावना गरजेची होतीच. का ते किस्सा संपता संपता समजेलच. कारण शुभेच्छांची खरी किंमत, खरी ताकद कळावी असा हा एक किस्सा आहे
जर मी चुकत नसेल तर त्या दिवशी दही हंडी होती. आम्ही शिर्डीला होतो. आम्ही म्हणजे मी आणि माझे आईबाबा, माझे दोन काका काकी त्यांच्या मुलांसह. अजून एका काकांची मुले आमच्यासोबत. अशी भलीमोठी कौटुंबिक देवदर्शनाची सहल होती. मह्राराष्ट्रातच कुठे कुठे फिरत होतो. माझ्या वाढदिवसाच्या आदल्या रात्री म्हणजे १० ऑगस्टलाच आम्ही शिर्डीला पोहोचलो. रात्री जेवण उरकून लवकर झोपायचे होते. कारण सकाळी साईबाबांचे दर्शन घ्यायचे होते.
तेव्हा मी पक्का आस्तिक होतो. आणि पहिल्यांदाच साईबाबांचे दर्शन घ्यायला शिर्डीला आलेलो. आजवर त्यांना घरच्या फोटोतच बघत आलो होतो. आज त्यांना त्यांच्या कर्मस्थानी बघणार होतो. त्यामुळे उत्सुकता एकदम चरमसीमेला होती. त्या घरच्या फोटोखाली एक सुंदर वाक्य लिहिले होते. "सब का मालिक एक". भले आज मी नास्तिक असलो तरी त्या वचनावर मात्र अजूनही विश्वास ठेवतो. पण त्या एकाचा शोध घ्यायला कधी जात नाही. त्याला आपल्या आतच शोधावे असे वाटते.
असो, तर सकाळी म्हणजे भल्या पहाटेच दर्शन घ्यायचे होते. चार वाजताच उठायचे होते. त्यामुळे आदल्या रात्री नऊलाच जेवून दहालाच झोपूया असे ठरवले. पण तिथे कोणीतरी सांगितले की बारापर्यंत जागलात तर जवळच कृष्ण जन्माष्टमीचा छान कार्यक्रम बघायला मिळेल.
"दही हंडीsss" आम्ही सारीच भावंडे एका सुरात ओरडलो. खरे तर आम्ही नाराज होतो. आयुष्यात पहिल्यांदाच मुंबईतील दहीहंडी उत्सव चुकवत होतो. ती धमाल शब्दात सांगून कळणार नाही. वा मुंबई बाहेरच्यांना दूरदर्शनवरच्या हंड्या बघून समजणार नाही. आठवडाभर आधीच मैदानात लाईट लाऊन रोज रात्रीची प्रॅक्टीस करणे. हंडीच्या दिवशी सकाळीच बनियान घालून कुठल्यातरी पथकासोबत जाणे. तर दुपारी पावभाजी पुलावचे जेवण हादडून कल्टी मारून आपल्या बिल्डींगमधली हंडी फोडायला येणे. रस्त्यावर लावलेली सहा सात थरांची बाहेरची हंडी मोठी मंडळे येऊन फोडणार, तर आतल्या मैदानातील चार थरांची हंडी आम्हीच पोरंपोरं किडे करत, एकमेकांचे पाय खेचत फोडणार. वर बाल्कनीतून चाळीतल्या पोरी आमच्यावर फुगे फोडणार, तर मोठी माणसे बादल्या बादल्यांनी पाणी ओतून हंडी सहज फुटू नये हे बघणार. अगदीच काही नाही तर वर चढलेल्यांच्या चड्ड्याच खेचणार, पण हंडी लवकर फुटू नाही देणार. या सगळ्यातही सारी आपलीच पोरे असल्याने त्यांना काही होऊ नये याची काळजी घेणे होतेच. पण पोरांनाही वरतून पोरी बघत असल्याने हिरो बनायची हौस असायची. आणि त्यामुळे मग एकेक कांड घडायचे. मग शेवटी प्रसाद, पार्टी, गोविंदाची गाणी, बेंजो लाऊन नाच, एकदम वेगळाच माहौल असायचा तो. आबालवृद्ध सर्वांनाच एकत्र मजा करायला त्यात काही ना काही गवसायचे.
हुश्श! ती सारी मजा सोडून आम्ही आजच्या दिवशी ईथे शिर्डीला होतो. ना दहीहंडी नेहमीसारखी साजरी होणार होती ना माझा वाढदिवस!
दुधाची तहान ताकावर म्हणत ईथली दहीहंडी बघायला आम्ही रात्री साडेअकरालाच तिथे पोहोचलो खरे. पण ईतक्या ऊंचावर बांधलेली हंडी बघून तिथेच भोवळ येऊन पडतो की काय असे वाटू लागले. हातात कपडे सुकत घालायची काठी घेतली असती तर टाचाही वर न करता मी ती फोडली असती.
यथावकाश हंडीची पूजा वगैरे झाली. त्यानंतर ठिक बारा वाजता तेथील मंडळाचा एक कार्यकर्ता आला. त्याने खांद्यावर एका कृष्णाची वेशभूषा केलेल्या लहान मुलाला उचलून घेतले. आणि हंडी फोडायची औपचारीकता पुर्ण केली. प्रसाद वाटप झाले. आणि आम्ही भावंडे माना खाली घालूनच रूमवर परतलो. मोठी माणसे मात्र प्रसाद छान होता, भजन छान होते, रात्रीचे जेवणही छान होते. अश्या गप्पा मारण्यातून आनंद मिळवत होते. पहाटे लवकर ऊठून लवकर तयारी आटपली तर पुरीभाजीचा छानसा प्रसाद अगदी स्वस्तात मिळेल अशी खबर त्यांना त्या गप्पातून समजली. त्यामुळे सकाळी वेळेवर उठायचे फर्मानही सुटले.
शिर्डीला जायच्या आधी आम्ही त्र्यंबकेश्वर आणि अजून एक दोन देवस्थाने फिरून आलेलो. शिर्डी शेवटचा टप्पा होता. तो टाळता आला असता तर हंडीसोबत मला माझा वाढदिवसही मुंबईला साजरा करता आला असता. पण शिर्डी शिर्डी सारे करतात ती काय आहे हे बघायची ईच्छाही होतीच. त्यामुळे मी आढेवेढे न घेता तयार झालेलो. अर्थात माझ्या आढेवेढ्यांना विचारणार कोण होते हा पुढचा प्रश्न झाला. तरी तो उद्भवलाच नव्हता. पण आता मात्र मी पुरता पस्तावलो होतो. ईथे म्हणावी तशी काहीच मजा येत नव्हती. पहाटे झोपमोड करून उठा. थंडीची आंघोळ करा. लाईनीत उभे राहा. गर्दीत दर्शन घ्या. दुपारी पुन्हा लाईन लाऊन पंगतीत जेवण करा. आणि संध्याकाळी मुंबईसाठी निघा... मला माझ्या वाढदिवसाच्या दिवशीच एक दगदगीचा अन कसाबसा ढकलायचा दिवस दिसू लागला. सोबत चुलत भावंडे होती हेच काय ते एक सुख!
पहाटेचा पुरीभाजीचा प्रसाद झाला. बाबांचे दर्शनही झाले. काय कसे आता आठवतही नाही. पण मी शरीराने आणि मनानेही थकलेलो हे नक्की. तश्याच अवस्थेत आम्ही जेवणाच्या रांगेत उभे होतो. तिथे माझ्या आईने घोषणा केली की माझ्या वाढदिवसाची पार्टी म्हणून सर्वांच्या जेवणाचा खर्च ती करणार. त्याऊपर तिने आणखी पंधरावीस कूपन घेऊन ईतर अनोळखी लोकांमध्ये प्रसाद म्हणून वाटली. त्या अन्नदानाचे पुण्यही माझ्या वाट्याला यावे हा त्यामागचा हेतू.
एका आईला आपल्या मुलाच्या वाढदिवसाला अन्नदान केल्याचे समाधान मिळाले. पण मला त्याच्याशी घेणेदेणे नव्हते. मला आता कडाडून भूक लागली होती आणि पंगतीचे जेवण लहानपणापासूनच फार आवडीचे होते. त्यात ईथले प्रसादाचे जेवण फार चवदार असते म्हणून मोठी माणसे आमचा हुरूप वाढवत होते. त्यामुळे आता कधी एकदा आत शिरतो आणि पुरीभाजी, पुलाव कोशिंबीर, जिलेबी मठ्ठा, लोणचे पापड अश्या ताटावर तुटून पडतो असे झालेले. पण प्रत्यक्षात मात्र डाळ भात भाजी चपाती असे घरगुती जेवण समोर आलेले बघून मला माझा घनघोर विश्वासघात झाल्यासारखे वाटले. माझा बांध फुटला, आणि डोळ्यातून गंगा जमुना वाहू लागल्या. मी अगदी हुंदके देऊन रडू लागलो. हे रडणे कालपासून पदरी पडत असलेल्या सर्वच निराशेचे मिळून होते.
पंगतीचे जेवण सुरू झाले होते आणि मी एकटाच हमसून हमसून रडत होतो. कदाचित तिथल्या वाढप्यांना अशी रडणारी आणि जेवणाच्या ताटावर नखरे दाखवणारी मुले बघणे सवयीचे असावे. तरीही माझ्या अश्रूंच्या ओलांडलेल्या पातळीकडे पाहून त्यांचीही चलबिचल झाली. हे काही वेगळेच प्रकरण दिसत आहे म्हणून त्यांनी चौकशी केली. आईकडून त्यांना समजले की आज माझा वाढदिवस आहे. तो नेहमीसारखा मित्रांसोबत साजरा होत नसल्याने मी नाराज आहे. हे ऐकून त्यांचेही हृदय द्रवले. आणि त्यांनी एकमेकांशी नेत्रपल्लवी करून एक प्लान आखला. आई ग्ग, हे असे लिहायला फारच दवणीय वाटत आहे. पण प्रत्यक्षात तसेच घडत होते.
पाचच मिनिटांत तेथील वाढप्यांचा एक छोटासा ग्रूप माझ्या टेबलासमोर हजर झाला. त्यांच्या हातात एक मोठी ताटली होती. त्या ताटलीच्या मधोमध भाताची मूद असावे तसे एक वाटीभर शिरा उपडी केला होता. त्याभोवताली बारीकश्या मेणबत्त्या लावल्या होत्या. म्हणजे बर्थडे सेलिब्रेशनचा केकच जणू.
सत्यनारायणाच्या पूजेला चमचाभर मिळणारा साजूक तुपातील प्रसादाचा शिरा फार आवडीचा. तो ईथे पुर्ण वाटीभर होता. जो मूळ जेवणाच्या ताटात नव्हता, म्हणजे केवळ माझ्यासाठीच आणला होता. लहान असलो, नाराज असलो, तेव्हा अगदी रडत असलो, तरी मूळ स्वभावाने मी हट्टी नव्हतो, समजूतदार होतो. त्यामुळे त्यांचे ते कृत्य सुखावून गेले. दु:ख हलके झाले. राग मावळला. चीडचीड नाहीशी झाली...
पण अजूनही ती विलक्षण घटना घडायची शिल्लक होती. मी सुरीने तो शिर्याचा केक कापताच त्या सर्वांनी "हॅपी बड्डेऽऽ ऋन्मेऽऽष.." म्हणून टाळ्यांचा कडकडाट केला. आणि आजूबाजूचे पंगतीतले सारेच जण त्यांना सामील झाले. मोठ्ठा हॉल होता तो जेवणाचा. जो मला मिळणार्या शुभेच्छांनी दणाणून उठला. अंगावर अस्सा शहारा आला. ईतक्या जणांनी एकसाथ केवळ माझ्यासाठी टाळ्या वाजवत हॅपी बड्डे गायची वेळ आयुष्यात कधी आली नव्हती, ना कधी येईल असे वाटले होते. मी एक नजर भावंडांवर टाकली. मला त्या सर्वांमध्ये एकदम वीवीआयपी झाल्यासारखे वाटत होते. अचानक माझा दिवस स्पेशल झाला होता. अचानक माझा वाढदिवस स्पेशल पद्धतीने साजरा होत होता. तो अविस्मरणीय झाला होता.
तेव्हा मोबाईलचा जमाना नव्हता. जे काही घडेल त्याचे फोटो, विडिओ टिपायची पद्धत नव्हती. आम्हीही त्या ट्रिपला जाताना कुठला कॅमेरा सोबत नेला नव्हता. अन्यथा आजच्या जमान्यात तो अखंड क्लिकक्लिकाट करायचा प्रसंग होता.
पण ते ही एक बरेच झाले म्हणा. अन्यथा त्या नादात ते क्षण अनुभवायचे राहून गेले असते. आणि तसेही त्या टिपलेल्या फोटोत माझ्या मनातील तेव्हाचे नेमके भाव टिपणे अवघडच होते
त्या दिवशी एक गोष्ट मात्र समजली. भले आपल्या वाढदिवसाला लोकांच्या औपचारीक शुभेच्छा स्विकारायला जरी कंटाळवाने वाटत असले. तरी एखाद्याला मनापासून शुभेच्छा देऊन आनंदित करणे हे एक पुण्याचेच काम आहे.
धन्यवाद,
ऋन्मेष
वाढदिवसाच्या शुभेच्छा ऋन्मेष
वाढदिवसाच्या शुभेच्छा ऋन्मेष. बालपणाची छान आठवण.
छान आठवण आहे.
छान आठवण आहे.
खूप छान लिहिले आहे.
खूप छान लिहिले आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
मस्त लिहिलंय! वाढदिवसाच्या
मस्त लिहिलंय! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
वाढदिवसानिमित्त शुभ चिंतन.
वाढदिवसानिमित्त शुभ चिंतन. तुम्ही आणि तुमचे अनेक लेख शंभरी गाठोत!
लेख आवडला. किंचितशी ' आपला अभिषेक ' ची झलक जाणवली,
"पण त्या एकाचा शोध घ्यायला कधी जात नाही. त्याला आपल्या आतच शोधावे असे वाटते. " छान.
हॅॅप्पी बर्थडे ऋन्मेष!
हॅॅप्पी बर्थडे ऋन्मेष!
जुग जुग जियो.
वाढदिवसाच्या शुभेच्छा!
वाढदिवसाच्या शुभेच्छा!
तुम जियो हजारो साल.....वगैरे वगैरे
BTW चरमसीमा हा योग्य शब्द आहे चरणसीमा नव्हे
खूप सुंदर आठवण. मांडणीही
खूप सुंदर आठवण. मांडणीही सुरेख.
हॅपी बर्थडे ऋन्मेश.
हॅॅप्पी बर्थडे ऋन्मेष!
हॅॅप्पी बर्थडे ऋन्मेष!
मधले काही प्रतिसाद उडाले आहेत
गोंधळ. प्र का टा.
भाई का बड्डे... ऋन्मेष- केक
भाई का बड्डे... ऋन्मेष- केक चा फोटो हवा होता... येऊ दे...
हीरा
हीरा
तुमचा काहीतरी गोंधळ होतो आहे. त्या दुसऱ्या धाग्यावर पहा.
ही कथा मला आधीच माहित होती.
ही कथा मला आधीच माहित होती. 'समग्र ऋन्मेषविजय ' ह्या पोथीतील "बाल ऋन्मेष लीला " ह्या प्रकरणात हि कथा आहे.
वाढदिवसाच्या शुभेच्छा ऋ! लेख
वाढदिवसाच्या शुभेच्छा ऋ! लेख आवडला हेवेसान.
खरंच. हे वेगळे सांगायला नकोच.
खरंच. हे वेगळे सांगायला नकोच. छान वाढदिवस आठवण. नवीन वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
छान आठवण अभिषेक .
छान आठवण अभिषेक . वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! लेख आवडला.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
सुंदर आठवण.
सुंदर आठवण.
अरे छान लिहिलं आहेस!
अरे छान लिहिलं आहेस! वाढिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
मस्त आठवण
मस्त आठवण
त्याच त्याच कोरड्या शुभेच्छा पन्नास जण देणार. त्या वाचून धन्यवाद धन्यवाद करत राहा >> अगदीच.. म्हणून मी सुद्धा फार कमी लोकांना बर्थडे विश करते
मला तर नुसता वाढदिवसाचा दिवसच नाही तर तो अख्खा महिनाच स्पेशल वाटतो..मधल्या काही वर्षात अगदी आठवडाभर ॲाफिसला नवीन कपडे घालून जात बर्थडे विकही सेलिब्रेट करायचे..आता मुलींचेच बर्थडे विक सेलिब्रेट करायला जास्त मजा येते
सर्वांचे मनापासून आभार.
सर्वांचे मनापासून आभार.
वाढदिवसाच्या मुहुर्तालाच प्रकाशित करावे अशी ईच्छा असल्याने ऑफिस काम करतानाच ब्रेक ब्रेक घेत लिहिलेले.. त्यामुळे विस्कळीत झालेय असे माझे मलाच वाटलेले. तरी आवडला लेख आणि आठवण चारचौघांना हे बघून बरे वाटले
ऋन्मेष- केक चा फोटो हवा होता.
ऋन्मेष- केक चा फोटो हवा होता... येऊ दे...
>>>
कुठल्या केकचा च्रप्स, त्या शिरा केकचा की आजच्या केकचा?
तेव्हाचा तर काढला नव्हता. पण हल्ली माझा वाढदिवस आला की लोकं आधी हेच विचारतात की बायकोने बनवलेल्या केकचा फोटो दाखव
हे घ्या आजचे केक.. रक्षाबंधन + वाढदिवस असा डबल धमाका असल्याने दोन दोन बनवलेले
.
आणि हे लेकीने बनवलेले
आणि हे लेकीने बनवलेले ग्रीटींग.
त्यातील कवितेचा एक वेगळाच ईतिहास आहे. तो पुन्हा कधीतरी..
.
किती गोड आहे ग्रीटिंग कार्ड..
किती गोड आहे ग्रीटिंग कार्ड...
केक नेहमीप्रमाणे मस्तच...
धन्यवाद च्रप्स
धन्यवाद च्रप्स
ॠ, Belated Birthday Wishes.
ॠ,
Belated Birthday Wishes.
हो. कालच्या वाढदिवसानिमित्त
हो. कालच्या वाढदिवसानिमित्त आज शुभेच्छा.
अरे हो, दही हंडीचा वाढदिवस
अरे हो, दही हंडीचा वाढदिवस
शुभेच्छांबद्दल धन्यवाद.
बरे झाले धागा वर आला. चरमसीमा संपादित करून घेतो.
धन्यवाद अनन्तयात्री.
अर्र नंतर दहीहंडीला लिहू
अर्र नंतर दहीहंडीला लिहू म्हणून ह्या धाग्यावर हॅपी बर्थडे लिहायचे राहिले की.... जाऊ दे, प्रायश्चितार्थ केला शिरा की फोटो टाकेन. (आता कधी नको विचारू, पुढच्या वाढदिवसाच्या आधी कधी टाकेन.)
Pages