असे देश, अशी नावे !

Submitted by कुमार१ on 2 June, 2022 - 03:30

संपूर्ण जगाचा नकाशा न्याहाळणे हा एक छान विरंगुळा असतो. आज अखेरीस जगभरात एकूण १९६ देश असून याव्यतिरिक्त ‘देशा’चा दर्जा न मिळालेली अनेक बेटे किंवा भूभाग आहेत. (देशांच्या एकूण संख्येबाबत 195 ते 249 असे विविध अंक जालावर वाचायला मिळतात; तूर्त तो विषय नाही). नकाशातून जगातले एखादे अपरिचित शहर शोधण्याचा खेळ शालेय जीवनात बऱ्यापैकी खेळला जातो. गेले काही महिने https://worldle.teuteuf.fr/ या संकेतस्थळावर ‘नकाशावरून देश ओळखा’ हा दैनंदिन खेळ सादर केला जातो. तो नियमित खेळत असताना बऱ्याच अपरिचित देशांचा परिचय झाला. त्यातल्या काहींची नावे कुतुहल चाळवणारी निघाली. त्यांचे उच्चारही मजेशीर वाटले. मग स्वस्थ कुठले बसवणार? त्या नावांची व्युत्पत्ती आणि त्या मागचा इतिहास व भूगोल इत्यादी गोष्टी धुंडाळून काढल्या. त्यातून काही रंजक माहिती गवसली. त्याचे संक्षिप्त संकलन करण्यासाठी हा लेख.
world-map.jpg

देशनामांच्या विविध व्युत्पत्त्यांवर नजर टाकता बऱ्याच गमतीजमती वाचायला मिळतात. या व्युत्पत्त्यांचे अशा प्रकारे वर्गीकरण करता येते :
1. संबंधित ठिकाणच्या प्राचीन जमाती, राज्य किंवा वंशाची नावे
2. भूभागाचा भौगोलिक प्रकार
3. भूगोलातील दिशा
4. स्थानिक प्रभावशाली व्यक्तीवरून
5. अनिश्चित/वादग्रस्त व्युत्पत्ती

वरील प्रत्येक वर्गातील काही मोजकी रंजक देश-नावे आता पाहू. उदाहरणे निवडताना शक्यतो मोठ्या देशांऐवजी छोटे, तुलनेने अपरिचित किंवा माध्यमांमध्ये विशेष चर्चेत नसलेले देश निवडले आहेत.

१. प्राचीन जमाती / वंशाची नावे
क्रोएशिया हा युरोपमधील एक देश. त्याचे नाव एका स्लाविक जमातीवरून ठेवलेले आहे. मुळात हा शब्द इंडो-आर्यन होता. नंतर तो जुन्या पर्शियनमध्ये गेला आणि अखेरीस लॅटिन भाषेत स्थिरावला. या देशात Neanderthals या अतिप्राचीन मानवी पूर्वजांचे जीवाश्म सापडले आहेत.
या गटातील काही देशांची नावे थेट जमातीची नसून त्या जमातींचे गुणवर्णन करणारी देखील आहेत.
Burkina Faso असे मजेशीर नाव असलेला हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश. त्याचे जुने नाव Upper Volta हे Volta या नदीवरून ठेवलेले होते.1984 मध्ये त्याचे नामांतर होऊन नवे नाव लागू झाले. या नावातील दोन शब्द भिन्न भाषांमधले आहेत :
Burkina (Mossi भाषा) म्हणजे प्रामाणिक व सरळमार्गी
Faso (Dioula भाषा) म्हणजे वडिलांचे घर.
थोडक्यात, या देशाच्या नावातून तिथले लोक भ्रष्टाचारविरहित सज्जन आहेत असे अभिप्रेत आहे ! या देशात पूर्वी अनेकदा हिंसात्मक उठाव होऊन सत्तांतरे झालेली आहेत. एक अतिशय अविकसित देश असे त्याचे वर्णन करता येईल.

Guinea हा शब्द नावात असलेले काही देश आहेत. त्यापैकी Papua New Guinea हे एक गमतीदार नाव. यातल्या Papua चा अर्थ (बहुधा) कुरळे केस असलेले, तर Guinea चा अर्थ काळ्या वर्णाचे लोक. हा देश Oceania तील एक बेट आहे. भाषावैविध्य हे या देशाचे वैशिष्ट्य असून तेथे सुमारे 851 भाषा प्रचलित आहेत.

२. भौगोलिक प्रकार
जगातील सुमारे एक चतुर्थांश देश या व्युत्पती-प्रकारात मोडतात. बेट, आखात किंवा जमिनीच्या वैशिष्ट्यपूर्ण भूगोलावरून अशा देशांची नावे ठेवली गेलीत.

Sierra Leone हा एक पश्चिम आफ्रिकेतील देश. याचे मूळ नाव पोर्तुगीजांनी ठेवले. त्याचा शब्दशः अर्थ ‘सिंह पर्वतराजी’ असा आहे. परंतु याचा संबंध सिंहांशी अजिबात नाही. तेथील पर्वतराजीतून होणाऱ्या प्रचंड विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेवरून ते नाव दिले गेले आहे. पुढे मूळ नाव इटालियन पद्धतीने बदलून सध्याचे करण्यात आले. हे नाव प्रथम ऐकल्यावर सनी लिओनी या अभिनेत्रीची सहजच आठवण झाली !

Costa rica हा अमेरिका खंडातील एक छोटा देश. या नावाचा शब्दशः अर्थ किनारपट्टीचा श्रीमंत भाग असा आहे. मूळ नाव (la costa rica) स्पॅनिश भाषेतील असून ते बहुधा नामवंत दर्यावर्दी ख्रिस्तोफर कोलंबस यांनी दिलेले असावे. त्यांच्या समुद्रपर्यटना दरम्यान ते जेव्हा या किनाऱ्यावर पोहोचले तेव्हा त्यांना येथील स्थानिक लोकांनी अंगावर भरपूर सोन्याचे दागिने घातलेले दिसले.
या देशाने नागरिकांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष दिले असून देशाच्या सकल उत्पन्नातील बऱ्यापैकी भाग शिक्षणावर खर्च केला जातो. या खर्चाचे प्रमाण जागतिक सरासरीपेक्षा जास्त आहे.

3. भूगोलातील दिशा

सुमारे पंचवीस देशांना त्यांच्या पृथ्वीगोलातील दिशेनुसार नाव दिलेले आहे. त्यापैकी नॉर्वे, जपान आणि ऑस्ट्रेलिया हे तर सर्वपरिचित देश. त्यांची व्युत्पत्ती अशी :
• नॉर्वे = Northern Way = उत्तरभूमी
• जपान (निप्पोन) = उगवता सूर्य (पूर्व)
• ऑस्ट्रेलिया = दक्षिणभूमी

आता Timor-Leste या अपरिचित देशाबद्दल पाहू.
हा देश आग्नेय आशियातील एक बेट आहे. देशाच्या जोड नावातील दोन शब्दांचा अर्थ असा :
Timor(मलय भाषेत) = पूर्व
Leste(पोर्तुगीज) = पूर्व
हा देश जावा व सुमात्राच्या पूर्वेस असल्याने हे नाव दिले गेले.
येथे पूर्वी दीर्घकाळ पोर्तुगीजांची वसाहत होती. त्यानंतर इंडोनेशियाने लष्करी कारवाई करून तो ताब्यात घेतला होता. 2002 मध्ये त्याला स्वतंत्र अस्तित्व प्राप्त झाले. स्वतंत्र अस्तित्व मिळवणारा तो एकविसाव्या शतकातील पहिला देश ठरला. हा अतिशय गरीब देश असून कुपोषणाच्या समस्येने ग्रासलेला आहे.

४. स्थानिक प्रभावशाली व्यक्तीवरून
जगातील सुमारे 25 देश या गटात येतात. त्यापैकी एखाद-दुसरा अपवाद वगळता बहुतेकांची नावे स्थानिक प्रभावशाली पुरुषावरून दिलेली आहेत.

बोलिविया हा दक्षिण अमेरिका खंडातील देश. तो पूर्वी स्पॅनिश लोकांच्या ताब्यात होता. कालांतराने स्थानिकांचे स्पेनविरुद्ध स्वातंत्र्ययुद्ध झाले. त्यामध्ये व्हेनेझुएलाचे नेते Simón Bolívar यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या सन्मानार्थ या नव्या देशाला Bolívar असे नाव दिले गेले. पुढे ते मधुरतेसाठी Bolívia असे बदलण्यात आले. हा बहुवांशिक असलेला विकसनशील देश आहे. तेथील भूमी अनेक खनिजांनी समृद्ध आहे.

मॉरिशस या पूर्व आफ्रिकेतील बेटाच्या नावाची कथा तर खूप रंजक आहे. चालू नाव Maurice या डच राजपुत्रावरून दिलेले आहे. परंतु हा देश बऱ्याच नामांतरांतून गेलेला आहे. सुरुवातीस पोर्तुगीज दर्यावर्दींनी त्याला
Dina Arobi >> Do-Cerne >> Mascarene
अशी नावे दिली होती. त्यानंतर इथे फ्रेंचांची वसाहत झाल्यानंतर त्याचे नाव Isle de France असे झाले. पुढे फ्रेंचांनी शरणागती पत्करून ब्रिटिशांनी यावर कब्जा केला तेव्हा मॉरिशस हे नाव पुन्हा प्रस्थापित झाले.

या गटातील दोन देशनावे स्त्रियांवरुन दिलेली आहेत.
stlucia.jpg

त्यापैकी ऐतिहासिक खऱ्या स्त्रीवरून दिलेले (बहुधा) एकमेव नाव म्हणजे St. Lucia. हे एक वेस्टइंडीज मधील बेट आहे. त्याचे नाव Lucia या संत स्त्रीवरून दिले आहे. कॅथोलिक पंथात ज्या आठ गौरवलेल्या स्त्रिया आहेत त्यापैकी ही एक. या भागातून जात असताना फ्रेंच दर्यावर्दींचे जहाज 13 डिसेंबर रोजी बुडाले. हा दिवस ल्युसिया यांचा स्मृतिदिन असल्याने कोलंबसने त्यांचे नाव या बेटाला दिले. हे बेट त्याच्या सुंदर समुद्र किनाऱ्यामुळे पर्यटकांचे विशेष आकर्षण आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत पर्यटनाचा वाटा मोठा आहे.

५. अनिश्चित/वादग्रस्त व्युत्पत्ती
सुमारे २० देशांच्या बाबत अशी परिस्थिती आहे. त्यापैकी दोन उदाहरणे पाहू.
माल्टा हा पर्यटकांचे आकर्षण असलेला युरोपातील एक छोटासा देश (बेट). किंबहुना स्वतंत्र देशाचा दर्जा दिलेले हे एक शहर (city-state) आहे. याच्या दोन व्युत्पती प्रचलित आहेत:
a. ग्रीक भाषेत Malta चा अर्थ मध. या बेटावर एक विशिष्ट प्रकारच्या मधमाशा असून त्यांच्यापासून एक अतिमधुर मध तयार होतो.
b. Maleth या शब्दाचा अर्थ निवारा किंवा बंदर असा आहे.

सरतेशेवटी आपल्या सख्खा शेजारी नेपाळबद्दल. याच्या अनेक व्युत्पत्ती असून भाषातज्ञात त्याबाबत भरपूर मतभिन्नता आहे. ४ प्रकारच्या व्युत्पत्ती प्रचलित आहेत :

a. पशुपती पुराणानुसार ‘ने’ नावाचे मुनी होते (नेमी). त्यांनी संरक्षित केलेला हा प्रदेश आहे.
b. नेपा नावाच्या गुराख्यावरून हे नाव पडले.
c. निपा =पर्वताचा पायथा. आल= आलय= घर. >> पर्वताच्या पायथ्याशी असलेला प्रदेश.
d. तिबेट -बर्माच्या भाषेनुसार:
ने= गाई-गुरे आणि
पा = राखणदार

असे हे व्युत्पत्तीपुराण. काही देशांच्या नावांच्या संदर्भात ऐतिहासिक कागदपत्रे उपलब्ध असतात; त्याबाबत दुमत नसते. मात्र जिथे अशी कागदपत्रे उपलब्ध नसतात तिथे भाषा अभ्यासकांना लोककथा किंवा दंतकथांचा आधार घ्यावा लागतो. काही वेळेस अनेक मूळ नावांचे अपभ्रंश होत समाजात शेवटी कुठलेतरी भलतेच नाव देखील रूढ होते. अशा तऱ्हेने काही देशांच्या नावाबाबत अधिकृत माहितीखेरीज अनेक पर्यायी व्युत्पत्ती वर्णिलेल्या असतात.

“नावात काय आहे?” हा शेक्सपियर निर्मित आणि बहुचर्चित लाखमोलाचा प्रश्न.
त्याचे उत्तर, “नावात काय नाही?” या प्रश्नाद्वारेच अन्य कोणीतरी देऊन टाकलेले आहे !

प्रत्येक शब्दातून त्याचा इतिहास डोकावत असतो. तो आपल्याला कित्येक शतके मागे घेऊन जातो. विविध देशांच्या नावांवरून आपल्या लक्षात येईल की त्यातील बऱ्याच नावांमधून भूगोल देखील डोकावतोय. देशाचे नाव त्या संस्कृतीचे प्रतीक असते आणि तो राष्ट्रीय अस्मितेचाही भाग असतो. नमुन्यादाखल काही देशनावे या लेखात सादर केली.
ही छोटीशी जागतिक शब्दसफर वाचकांना रोचक वाटेल अशी आशा आहे.
…………………………………………………………………………………………………………………………………………….
चित्रे जालावरून साभार !

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

न्युझीलँड हे नाव मुळात डच लोकांनी दिलेले आहे. त्याच्या शोधापूर्वी Zeeland या नावाचा डच परगणा अस्तित्वात होता. त्यावरून New Zeeland करण्यात आले. पुढे इंग्लिशमध्ये त्याचे स्पेलिंग बदलले.

रंजक भाग असा आहे: न्यूझीलंड आणि “ओल्ड Zeeland’ एकमेकांपासून 17700 किलोमीटर दूर आहेत !

(पृथ्वीवरील कोणत्याही दोन बिंदूमधले जास्तीत जास्त अंतर 20,000 किलोमीटर असते).

https://www.britannica.com/story/where-is-old-zealand

अरे वा!
असे न्यु नाव असलेले बरेच प्रांत आहेत. न्यु यॉर्क, न्यु जर्सी , इ.
या लेखात म्हटलंय की डच लोकांनी ऑस्ट्रेलियालाही न्यु हॉलंड हे नाव दिलं होतं.
हॉलंड हा नेदरलँडसचा भाग आहे. मला वाटत होती, दोन्ही एका देशाची नावं आहेत. त्या देशाच्या रहिवाश्यांना डच का म्हणत असावेत?
ड्युइश वरून डच असं एक उत्तर दिसलं.

असे न्यु नाव असलेले बरेच प्रांत आहेत >>> +११
अमेरिकेचा शोध लागल्यानंतरच्या सुरुवातीच्या राज्यसमूहाला देखील न्यू इंग्लंड म्हणतात/ म्हणायचे.

एकंदरीत जुन्या प्रस्थापित नावाच्या मागे 'न्यू' लावणे ही पाश्चिमात्य वसाहतवादाची खासियत होती Happy

त्या देशाच्या रहिवाश्यांना डच का म्हणत असावेत? >>
इथे (https://www.dictionary.com/e/demonym/) सविस्तर उहापोह आहे.

High Dutch ( पर्वतराजीतील लोक ) >>>> southern Germany.
Low Dutch ( सपाटीवरील लोक) >>>> Netherlands.

भूगोल खेळातील आजच्या देशाचे नाव एका महत्त्वाच्या भौगोलिक संकल्पनेवरून आहे.
मूळ नाव व इंग्लिश नावात बारीकसा फरक केलेला असून तो रंजक आहे !

कालचा देश Ecuador होता.
हे नाव विषुववृत्त (Equator) या वरून देण्यात आलेले आहे.
या देशाची राजधानी Quito विषुववृत्ता पासून फक्त चाळीस किलोमीटर अंतरावर दक्षिण बाजूस आहे.

बऱ्याच इंग्लिश भाषकांना इतर युरोपीय भाषांची जाण नसते. त्यांना युकेव्यतिरिक्त इतर युरोपमध्ये संभाषणाच्या समस्या येतात. ज्या बिगर-इंग्लिश मातृभाषक देशांमध्ये इंग्लिश संभाषण करणे सोपे असते त्यांची क्रमवारी अशी आहे :

१. नेदरलँडस
२. ऑस्ट्रिया
३. डेन्मार्क.

https://www.euronews.com/travel/2022/08/05/struggling-to-learn-the-langu...

Uruk, Ur, Meggido, Babylon, व Nineveh यांना आधुनिक जगातील सुरवातीची महानगरे मानतात<<< प्राचीन जगतातील पहिली महानगरं Happy
सर्वसामान्यांसाठी अगदी साधा, सोपा इतिहास सांगण्याचा प्रयत्न करते आहे. तपशीलांशी कोणतीही तडजोड न करता. त्यातील हा एक भाग जगातले पहिले साम्राज्य: https://anchor.fm/aratikhopkar/episodes/16-e1l42ue

अवल
दुव्या बद्दल धन्यवाद
सवडीने पाहतो

बऱ्याच देशनावांचा उगम खालील क्रमाने विकसित होत गेलेला आहे :

१. संबंधित ठिकाणी असलेली नदी/ झरा/ तलाव यांचे नाव (hydronym)
२. त्यावरून ठिकाणाचे नाव पडणे (toponym)
३. त्यावरून वंशाचे किंवा देशाचे नाव (ethnonym)

देशाच्या दिलेल्या नावांमध्ये दोन प्रकार पडतात:
a. देशाबाहेरील लोकांनी ठेवलेले नाव (exo..)
b. अंतर्गत नाव (endo..)

• जगातील आतापर्यंतचे नीचांकी तापमान = उणे 94C, :अंटार्टिका (निर्मनुष्य ठिकाण)

• जगाच्या मनुष्यवस्ती असलेल्या भागातील नीचांकी तापमान= उणे ७१ C : Oymyakon, साखा , सायबेरिया, रशिया.
इथले नियमित तापमान उणे ५० C असते.

तिथल्या जनजीवनाचे काही फोटो इथे आहेत:
https://www-mirror-co-uk.cdn.ampproject.org/v/s/www.mirror.co.uk/news/wo...

ग्रीनलँड मधील कोसळलेल्या हिमनगाचे सुरेख ड्रोन-चित्रण ख्यातनाम चित्रकर्मी Daniel Haussmann यांनी केले आहे :

https://petapixel.com/2022/08/08/gorgeous-aerial-footage-showcases-green...
नेत्रदीपक !

आफ्रिकेचे शिंग

Djibouti, Eritrea, Ethiopia, and Somalia या एकमेकांच्या सान्निध्यात असलेल्या देशांमुळे आफ्रिकेच्या नकाशावर एक वैशिष्ट्यपूर्ण आकार दिसतो त्याला शिंग असे म्हणतात
Horn-of-Africa-8_Q640.jpg

खूप छान माहिती देता तुम्ही कुमार sir.
भू विज्ञान हे माझे प्रोफेशन आणि पॅशन दोन्ही असल्याने मायबोलीवरील हा धागा माझा सर्वाधिक आवडता आहे

धन्यवाद !
*भू विज्ञान हे माझे प्रोफेशन आणि पॅशन दोन्ही
>>>
अरे, मग तुम्ही पण लिहा ना यावर काहीतरी. आमच्या ज्ञानात भर पडेल.

Massachusetts आणि Connecticut च्या हद्दीवर Webster शहराजवळ हा तलाव आहे म्हणे, मला तर नाव कसे टाईप करायचे हा प्रश्न पडला, त्यामुळे स्क्रीनशॉट देतोय अमेरिकेतील अन् कदाचित जगातील सगळ्यात लांबलचक नाव एखाद भौगोलिक फिचरला दिलेले.

Screenshot_20220811-071926_Chrome.jpg

फोटोत जे बोल्डमध्ये केलेले नाव आहे ते खरे नाव लोकल native Indian भाषेत त्याचा अर्थ म्हणे "तुम्ही (तलावाच्या) तुमच्या भागात मासेमारी करा, आम्ही आमच्या भागात करतो, मध्ये कोणीच करू नये" असा काहीसा होतो, अर्थात स्थानिक लोक ह्या सरोवराला साधे सिंपल "वेबस्टर लेक" ह्याचं नावाने ओळखतात (म्हणे)

काय अजब नाव आणि किती मजेशीर अर्थ.

हे नाव वाचताना विवेकानंद म्हणणारा ट्रंप आठवला. त्यानंही असाच काहीतरी टंगट्विस्टर उच्चार केला होता.

वर जे आफ्रिकेचे शिंग म्हणून वर्णन केले आहे त्यातील सोमालियाचा एक भाग असलेल्या सोमाली लँडबद्दल माहिती :

Somaliland-Map-and-Boundaries.jpg

जागतिक पातळीवर हा सोमालियाचा भाग समजला जातो. परंतु त्या भागाचे स्वतंत्र सरकार आहे. म्हणजेच हा de facto प्रकारातील देश आहे. त्यांना de jure मान्यता नाही.

डायोमीड बेटांची मजेशीर केस

डायोमीड बेटं ही बिग डायोमीड आणि लिटिल डायोमीड बेट अशी दोन बेटं आहेत. त्यातील बिग डायोमीड हे रशियाच्या मालकीचे असून लिटिल डायोमीड हे अमेरिकेच्या मालकीचे आहे. दोन्ही बेटांत फक्त २.४ मैल अंतर आहे, तरीही इंटरनॅशनल डेट लाईनच्या अलीकडे पलीकडे असल्यामुळे दोन्ही बेटांत २१ तासाचा टाईम गॅप असतो, ह्या बेटांचे टोपण नाव टूमोरो आयलंड आणि येस्टरडे आयलंड असे पडलेले आहे

5cc8977d93a152004c2eb013.jpeg

Sichuan ( Szechuan or Szechwan) हा चीनचा प्रसिद्ध प्रांत. इथल्या पाकक्रिया पण चविष्ट.
SICH.jpg

आपण भारतात ज्या ‘शेझवान’ नूडल्स खातो ते नाव यावरून घेतलेले.

कुमार सर,

शेझवान नुडल्स मध्ये नावच फक्त सिचुआन शेझवान आहे, बाकी आपली देशी रेसिपी पाहता पितबंधू जीव देतील अशी गत आहे बघा

जर्मनीला रशियनमध्ये Германия (गिर्मानिया) म्हटले जाते.
रशियाचे पूर्वेकडचे सर्वात मोठे शहर - Владивосток (व्लदिवस्तोक) व्लदि म्हणजे देव आणि वस्तोक म्हणजे पूर्व. व्लदिवस्तोक म्हणजे पूर्वेकडच्या देव.
मॉस्को शहराला त्यातून वाहणाऱ्या मॉस्को (Москва - रशियन उच्चार मस्क्वा) नदीवरून पडले आहे.
Volga नदीच्या नांवावरून ओळखले जाते Волгоград व्हल्गऽग्राद. ग्राद म्हणजे छोटे शहर/town

छान.
*ग्राद म्हणजे छोटे शहर>>>>
ग्राद व ग्राम यांत साम्य आहे.
(इंडो युरोपीय कुळ?)

Pages