
संपूर्ण जगाचा नकाशा न्याहाळणे हा एक छान विरंगुळा असतो. आज अखेरीस जगभरात एकूण १९६ देश असून याव्यतिरिक्त ‘देशा’चा दर्जा न मिळालेली अनेक बेटे किंवा भूभाग आहेत. (देशांच्या एकूण संख्येबाबत 195 ते 249 असे विविध अंक जालावर वाचायला मिळतात; तूर्त तो विषय नाही). नकाशातून जगातले एखादे अपरिचित शहर शोधण्याचा खेळ शालेय जीवनात बऱ्यापैकी खेळला जातो. गेले काही महिने https://worldle.teuteuf.fr/ या संकेतस्थळावर ‘नकाशावरून देश ओळखा’ हा दैनंदिन खेळ सादर केला जातो. तो नियमित खेळत असताना बऱ्याच अपरिचित देशांचा परिचय झाला. त्यातल्या काहींची नावे कुतुहल चाळवणारी निघाली. त्यांचे उच्चारही मजेशीर वाटले. मग स्वस्थ कुठले बसवणार? त्या नावांची व्युत्पत्ती आणि त्या मागचा इतिहास व भूगोल इत्यादी गोष्टी धुंडाळून काढल्या. त्यातून काही रंजक माहिती गवसली. त्याचे संक्षिप्त संकलन करण्यासाठी हा लेख.
देशनामांच्या विविध व्युत्पत्त्यांवर नजर टाकता बऱ्याच गमतीजमती वाचायला मिळतात. या व्युत्पत्त्यांचे अशा प्रकारे वर्गीकरण करता येते :
1. संबंधित ठिकाणच्या प्राचीन जमाती, राज्य किंवा वंशाची नावे
2. भूभागाचा भौगोलिक प्रकार
3. भूगोलातील दिशा
4. स्थानिक प्रभावशाली व्यक्तीवरून
5. अनिश्चित/वादग्रस्त व्युत्पत्ती
वरील प्रत्येक वर्गातील काही मोजकी रंजक देश-नावे आता पाहू. उदाहरणे निवडताना शक्यतो मोठ्या देशांऐवजी छोटे, तुलनेने अपरिचित किंवा माध्यमांमध्ये विशेष चर्चेत नसलेले देश निवडले आहेत.
१. प्राचीन जमाती / वंशाची नावे
क्रोएशिया हा युरोपमधील एक देश. त्याचे नाव एका स्लाविक जमातीवरून ठेवलेले आहे. मुळात हा शब्द इंडो-आर्यन होता. नंतर तो जुन्या पर्शियनमध्ये गेला आणि अखेरीस लॅटिन भाषेत स्थिरावला. या देशात Neanderthals या अतिप्राचीन मानवी पूर्वजांचे जीवाश्म सापडले आहेत.
या गटातील काही देशांची नावे थेट जमातीची नसून त्या जमातींचे गुणवर्णन करणारी देखील आहेत.
Burkina Faso असे मजेशीर नाव असलेला हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश. त्याचे जुने नाव Upper Volta हे Volta या नदीवरून ठेवलेले होते.1984 मध्ये त्याचे नामांतर होऊन नवे नाव लागू झाले. या नावातील दोन शब्द भिन्न भाषांमधले आहेत :
Burkina (Mossi भाषा) म्हणजे प्रामाणिक व सरळमार्गी
Faso (Dioula भाषा) म्हणजे वडिलांचे घर.
थोडक्यात, या देशाच्या नावातून तिथले लोक भ्रष्टाचारविरहित सज्जन आहेत असे अभिप्रेत आहे ! या देशात पूर्वी अनेकदा हिंसात्मक उठाव होऊन सत्तांतरे झालेली आहेत. एक अतिशय अविकसित देश असे त्याचे वर्णन करता येईल.
Guinea हा शब्द नावात असलेले काही देश आहेत. त्यापैकी Papua New Guinea हे एक गमतीदार नाव. यातल्या Papua चा अर्थ (बहुधा) कुरळे केस असलेले, तर Guinea चा अर्थ काळ्या वर्णाचे लोक. हा देश Oceania तील एक बेट आहे. भाषावैविध्य हे या देशाचे वैशिष्ट्य असून तेथे सुमारे 851 भाषा प्रचलित आहेत.
२. भौगोलिक प्रकार
जगातील सुमारे एक चतुर्थांश देश या व्युत्पती-प्रकारात मोडतात. बेट, आखात किंवा जमिनीच्या वैशिष्ट्यपूर्ण भूगोलावरून अशा देशांची नावे ठेवली गेलीत.
Sierra Leone हा एक पश्चिम आफ्रिकेतील देश. याचे मूळ नाव पोर्तुगीजांनी ठेवले. त्याचा शब्दशः अर्थ ‘सिंह पर्वतराजी’ असा आहे. परंतु याचा संबंध सिंहांशी अजिबात नाही. तेथील पर्वतराजीतून होणाऱ्या प्रचंड विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेवरून ते नाव दिले गेले आहे. पुढे मूळ नाव इटालियन पद्धतीने बदलून सध्याचे करण्यात आले. हे नाव प्रथम ऐकल्यावर सनी लिओनी या अभिनेत्रीची सहजच आठवण झाली !
Costa rica हा अमेरिका खंडातील एक छोटा देश. या नावाचा शब्दशः अर्थ किनारपट्टीचा श्रीमंत भाग असा आहे. मूळ नाव (la costa rica) स्पॅनिश भाषेतील असून ते बहुधा नामवंत दर्यावर्दी ख्रिस्तोफर कोलंबस यांनी दिलेले असावे. त्यांच्या समुद्रपर्यटना दरम्यान ते जेव्हा या किनाऱ्यावर पोहोचले तेव्हा त्यांना येथील स्थानिक लोकांनी अंगावर भरपूर सोन्याचे दागिने घातलेले दिसले.
या देशाने नागरिकांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष दिले असून देशाच्या सकल उत्पन्नातील बऱ्यापैकी भाग शिक्षणावर खर्च केला जातो. या खर्चाचे प्रमाण जागतिक सरासरीपेक्षा जास्त आहे.
3. भूगोलातील दिशा
सुमारे पंचवीस देशांना त्यांच्या पृथ्वीगोलातील दिशेनुसार नाव दिलेले आहे. त्यापैकी नॉर्वे, जपान आणि ऑस्ट्रेलिया हे तर सर्वपरिचित देश. त्यांची व्युत्पत्ती अशी :
• नॉर्वे = Northern Way = उत्तरभूमी
• जपान (निप्पोन) = उगवता सूर्य (पूर्व)
• ऑस्ट्रेलिया = दक्षिणभूमी
आता Timor-Leste या अपरिचित देशाबद्दल पाहू.
हा देश आग्नेय आशियातील एक बेट आहे. देशाच्या जोड नावातील दोन शब्दांचा अर्थ असा :
Timor(मलय भाषेत) = पूर्व
Leste(पोर्तुगीज) = पूर्व
हा देश जावा व सुमात्राच्या पूर्वेस असल्याने हे नाव दिले गेले.
येथे पूर्वी दीर्घकाळ पोर्तुगीजांची वसाहत होती. त्यानंतर इंडोनेशियाने लष्करी कारवाई करून तो ताब्यात घेतला होता. 2002 मध्ये त्याला स्वतंत्र अस्तित्व प्राप्त झाले. स्वतंत्र अस्तित्व मिळवणारा तो एकविसाव्या शतकातील पहिला देश ठरला. हा अतिशय गरीब देश असून कुपोषणाच्या समस्येने ग्रासलेला आहे.
४. स्थानिक प्रभावशाली व्यक्तीवरून
जगातील सुमारे 25 देश या गटात येतात. त्यापैकी एखाद-दुसरा अपवाद वगळता बहुतेकांची नावे स्थानिक प्रभावशाली पुरुषावरून दिलेली आहेत.
बोलिविया हा दक्षिण अमेरिका खंडातील देश. तो पूर्वी स्पॅनिश लोकांच्या ताब्यात होता. कालांतराने स्थानिकांचे स्पेनविरुद्ध स्वातंत्र्ययुद्ध झाले. त्यामध्ये व्हेनेझुएलाचे नेते Simón Bolívar यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या सन्मानार्थ या नव्या देशाला Bolívar असे नाव दिले गेले. पुढे ते मधुरतेसाठी Bolívia असे बदलण्यात आले. हा बहुवांशिक असलेला विकसनशील देश आहे. तेथील भूमी अनेक खनिजांनी समृद्ध आहे.
मॉरिशस या पूर्व आफ्रिकेतील बेटाच्या नावाची कथा तर खूप रंजक आहे. चालू नाव Maurice या डच राजपुत्रावरून दिलेले आहे. परंतु हा देश बऱ्याच नामांतरांतून गेलेला आहे. सुरुवातीस पोर्तुगीज दर्यावर्दींनी त्याला
Dina Arobi >> Do-Cerne >> Mascarene
अशी नावे दिली होती. त्यानंतर इथे फ्रेंचांची वसाहत झाल्यानंतर त्याचे नाव Isle de France असे झाले. पुढे फ्रेंचांनी शरणागती पत्करून ब्रिटिशांनी यावर कब्जा केला तेव्हा मॉरिशस हे नाव पुन्हा प्रस्थापित झाले.
या गटातील दोन देशनावे स्त्रियांवरुन दिलेली आहेत.
त्यापैकी ऐतिहासिक खऱ्या स्त्रीवरून दिलेले (बहुधा) एकमेव नाव म्हणजे St. Lucia. हे एक वेस्टइंडीज मधील बेट आहे. त्याचे नाव Lucia या संत स्त्रीवरून दिले आहे. कॅथोलिक पंथात ज्या आठ गौरवलेल्या स्त्रिया आहेत त्यापैकी ही एक. या भागातून जात असताना फ्रेंच दर्यावर्दींचे जहाज 13 डिसेंबर रोजी बुडाले. हा दिवस ल्युसिया यांचा स्मृतिदिन असल्याने कोलंबसने त्यांचे नाव या बेटाला दिले. हे बेट त्याच्या सुंदर समुद्र किनाऱ्यामुळे पर्यटकांचे विशेष आकर्षण आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत पर्यटनाचा वाटा मोठा आहे.
५. अनिश्चित/वादग्रस्त व्युत्पत्ती
सुमारे २० देशांच्या बाबत अशी परिस्थिती आहे. त्यापैकी दोन उदाहरणे पाहू.
माल्टा हा पर्यटकांचे आकर्षण असलेला युरोपातील एक छोटासा देश (बेट). किंबहुना स्वतंत्र देशाचा दर्जा दिलेले हे एक शहर (city-state) आहे. याच्या दोन व्युत्पती प्रचलित आहेत:
a. ग्रीक भाषेत Malta चा अर्थ मध. या बेटावर एक विशिष्ट प्रकारच्या मधमाशा असून त्यांच्यापासून एक अतिमधुर मध तयार होतो.
b. Maleth या शब्दाचा अर्थ निवारा किंवा बंदर असा आहे.
सरतेशेवटी आपल्या सख्खा शेजारी नेपाळबद्दल. याच्या अनेक व्युत्पत्ती असून भाषातज्ञात त्याबाबत भरपूर मतभिन्नता आहे. ४ प्रकारच्या व्युत्पत्ती प्रचलित आहेत :
a. पशुपती पुराणानुसार ‘ने’ नावाचे मुनी होते (नेमी). त्यांनी संरक्षित केलेला हा प्रदेश आहे.
b. नेपा नावाच्या गुराख्यावरून हे नाव पडले.
c. निपा =पर्वताचा पायथा. आल= आलय= घर. >> पर्वताच्या पायथ्याशी असलेला प्रदेश.
d. तिबेट -बर्माच्या भाषेनुसार:
ने= गाई-गुरे आणि
पा = राखणदार
असे हे व्युत्पत्तीपुराण. काही देशांच्या नावांच्या संदर्भात ऐतिहासिक कागदपत्रे उपलब्ध असतात; त्याबाबत दुमत नसते. मात्र जिथे अशी कागदपत्रे उपलब्ध नसतात तिथे भाषा अभ्यासकांना लोककथा किंवा दंतकथांचा आधार घ्यावा लागतो. काही वेळेस अनेक मूळ नावांचे अपभ्रंश होत समाजात शेवटी कुठलेतरी भलतेच नाव देखील रूढ होते. अशा तऱ्हेने काही देशांच्या नावाबाबत अधिकृत माहितीखेरीज अनेक पर्यायी व्युत्पत्ती वर्णिलेल्या असतात.
“नावात काय आहे?” हा शेक्सपियर निर्मित आणि बहुचर्चित लाखमोलाचा प्रश्न.
त्याचे उत्तर, “नावात काय नाही?” या प्रश्नाद्वारेच अन्य कोणीतरी देऊन टाकलेले आहे !
प्रत्येक शब्दातून त्याचा इतिहास डोकावत असतो. तो आपल्याला कित्येक शतके मागे घेऊन जातो. विविध देशांच्या नावांवरून आपल्या लक्षात येईल की त्यातील बऱ्याच नावांमधून भूगोल देखील डोकावतोय. देशाचे नाव त्या संस्कृतीचे प्रतीक असते आणि तो राष्ट्रीय अस्मितेचाही भाग असतो. नमुन्यादाखल काही देशनावे या लेखात सादर केली.
ही छोटीशी जागतिक शब्दसफर वाचकांना रोचक वाटेल अशी आशा आहे.
…………………………………………………………………………………………………………………………………………….
चित्रे जालावरून साभार !
<<ग्राद व ग्राम यांत साम्य
<<ग्राद व ग्राम यांत साम्य आहे.>>
हो रशियनमध्ये हिंदी, मराठी, संस्कृतशी साम्य असलेले बरेच शब्द आहेत. जसे, сахар - रशियन उच्चार साखर, ананас - रशियन उच्चार अनानास, чай - रशियन उच्चार चाय (चहा), брат - रशियन उच्चार ब्रात (भाऊ) इ.
आकडेही मराठी, हिंदी, संस्कृतशी साम्य दाखवणारे आहेत. : 1 - अजीन, 2 - व्दा, 3 - त्री, 4 - चित्तीरि, 5 - प्याच, 6 - षेस्त, 7 - स्येम्, 8 - वसिम्
आज भारत स्वतंत्र होऊन ७५
आज भारत स्वतंत्र होऊन ७५ वर्षे पूर्ण झाल्याचा सोहळा दणक्यात साजरा होत आहे.
भारतासोबतच आज पूर्वेचे उत्तर आणि दक्षिण दोन्ही कोरिया, खाडीतले बहरीन, आफ्रिकेतले काँगो रिपब्लिक आणि युरोपातील पिटुकल्या Liechtenstein ह्या देशांचाही स्वतंत्रता वर्धापन दिवस साजरा होत आहे.
बहरीन आणि भारताला ब्रिटिशांपासून, दोन्ही कोरियांना जपानपासून, काँगो ला फ्रेंचांपासून तर Liechtenstein ला जर्मन दास्यातून मुक्ती मिळाल्याचा एकच दिवस - १५ ऑगस्ट !!
(अर्थात वेगवेगळ्या वर्षांत)
* रशियनमध्ये हिंदी, मराठी,
* रशियनमध्ये हिंदी, मराठी, संस्कृतशी साम्य असलेले बरेच शब्द >>> छान माहिती.
....
* Liechtenstein बद्दल मागच्या वर्षी वाचले होते.
इतर देशांची माहिती रंजक.
मी मुद्दाम Liechtenstein चा
मी मुद्दाम Liechtenstein चा उच्चार शोधला. बहुतेक ठिकाणी लिक्टनस्टाइन असा उच्चार
दिसला. ऐकू आला. एके ठिकाणी लीश्टनस्टाइन असा उच्चार दिला आहे.एक गंमत- चुकीची माहिती देणारा एक संदेश व्हॉट्स अॅपवर वारंवार येत असतो.
आपल्या देशाचं नाव INDIA -Independent Nation Declared in August असं ब्रिटिशांनी ठरवलं
...in August असं ब्रिटिशांनी
...in August असं ब्रिटिशांनी ठरवलं >>काहीही !
...
तसेच सर्वोच्च न्यायालयाने इंडिया चे नाव भारत केलेले आहे असे चुकीचे संदेश गेल्या काही वर्षात फिरत होते.
वास्तवात 2020 मध्ये तशी याचिका न्यायालयात दाखल झाली होती.
त्यासंदर्भात न्यायालयाने केंद्र सरकारला त्यावर विचार करण्यास सांगितले होते.
त्याची सविस्तर माहिती इथे आहे
https://factly.in/supreme-court-has-not-passed-any-judgement-to-rename-i...
... आपल्या देशाचं नाव INDIA
... आपल्या देशाचं नाव INDIA -Independent Nation Declared in August असं ब्रिटिशांनी ठरवलं Lol....
खरंच या लोकांच्या बुद्धीची कीव वाटते. ब्रिटिशांनी साधारण ८० देशांवर राज्य केले, पैकी ५६ देश तर अजूनही राष्ट्रकुलात आहेत.
प्रत्येकाला स्वातंत्र्य देतांना असे नामकरण केले असते तर ८० देशांची बारशी करता-करता नाकी नऊ आले असते त्यांच्या
Liechtenstein चा उच्चार
Liechtenstein चा उच्चार लिष्टेनस्टाईन असा आहे. जर्मन नाव आहे.
<<खरंच या लोकांच्या बुद्धीची
<<खरंच या लोकांच्या बुद्धीची कीव वाटते.>>
पूर्ण सहमत आहे.
भारताला स्वतःचा राष्ट्रध्वज
भारताला स्वतःचा राष्ट्रध्वज असावा अशी कल्पना प्रथम मांडणाऱ्या Pingali Venkaiha यांना मानवंदना !
Monaco देशाचे पूर्ण नाव
Monaco देशाचे पूर्ण नाव Principality of Monaco असे आहे.
Principality = 'प्रिन्स'च्या अधिपत्याखाली असलेले.
>>>डायोमीड बेटांची मजेशीर केस
>>>डायोमीड बेटांची मजेशीर केस>>> भारीच.
धागा छान चाललाय
Principality = 'प्रिन्स'च्या
Principality = 'प्रिन्स'च्या अधिपत्याखाली असलेले.
मग
मुंशीपालटी म्हणजे एखाद मुंशीच्या हाताखाली असणारे शहर म्हणायचे काय
(सहज एक टवाळ पी जे)
(No subject)
‘दिनार’ हे मध्यपूर्वेतील
‘दिनार’ हे मध्यपूर्वेतील बऱ्याच देशांचे चलन आहे. परंतु त्याचा उगम रोमन आहे.
Denarius हे रोमचे चांदीचे नाणे होते. (Dena = 10)
च्यायला ! इतके क्रूसेड्स अन्
च्यायला ! इतके क्रूसेड्स अन् इंतिफादा वगैरे होऊनही ही आर्थिक सांस्कृतिक देवाणघेवाण तशीच्या तशी राहिली. सुरस अन् चमत्कारिक म्हणायला हवं हे सगळं
दक्षिण पूर्व युरोपमधील सुमारे
दक्षिण पूर्व युरोपमधील सुमारे दहा देशांच्या समूहाला 'बाल्कन देश' असे जुने नाव आहे.
परंतु अलीकडे ते वापरायचे टाळले जाते.
काही अभ्यासकांच्या मते त्या नावातून वांशिक भेदभाव सुचवला जातो. त्यामुळे या देशांना 'दक्षिण पूर्व युरोपीय देश' म्हटले पाहिजे.
https://www.britannica.com/place/Balkans
उत्तर ध्रुवीय प्रकाश (
उत्तर ध्रुवीय प्रकाश ( aurora borealis) अवकाशातून कसा दिसतो यासंदर्भात प्रसिद्ध झालेली एक छान चित्रफित इथे आहे :
https://www.bbc.com/news/av/world-62831574
१० लाख डॉलर्स मूल्य असलेले
आजमितीस १० लाख डॉलर्स मूल्य असलेले ६९ ए.डी. मधील इसराएलचे प्राचीन नाणे चोरण्यात आले होते. ते समारंभपूर्वक इसराएलला परत केले :
https://www.bbc.com/news/world-middle-east-62875673
shekel प्रकारची अशी फक्त ४ नाणी अस्तित्वात आहेत.
कायदेपंडित जे. साई दीपक यांनी
कायदेपंडित जे. साई दीपक यांनी हे पुस्तक चतुष्ट्य लिहिलेले आहे :
India that is Bharat Quadrology
https://www.brownpundits.com/2022/09/25/book-review-india-bharat-and-pak...
रशिया बदलणार युक्रेनचा
रशिया बदलणार युक्रेनचा नकाशा
https://www.esakal.com/global/announcement-of-merger-four-regions-russia...
अजून ३०० दशलक्ष वर्षांनी !...
अजून ३०० दशलक्ष वर्षांनी !......
जगाचा नकाशा बदलणार?....तर आशियाला मिळणार अमेरिका
'अमासिया' हा महाखंड तयार होणार ?
https://www.tarunbharat.net/Encyc/2022/10/9/map-of-world-change.html
https://en.wikipedia.org/wiki/Amasia_(continent)
15 नोव्हेंबर 2022 च्या
15 नोव्हेंबर 2022 च्या सुमारास जागतिक लोकसंख्या 8 अब्ज या टप्प्यावर पोचणार:
https://bigthink.com/strange-maps/8-billion-people/
इंडोनेशिया त्यांच्याकडील शंभर
इंडोनेशिया त्यांच्याकडील शंभर बेटांचा समूह लिलावात विकायला काढणार आहे. त्यावरील
उलटसुलट प्र:
https://amp-theguardian-com.cdn.ampproject.org/v/s/amp.theguardian.com/w...
नेपाळचे एक वैशिष्ट्य म्हणजे
नेपाळचे एक वैशिष्ट्य म्हणजे चौकोनी राष्ट्रध्वज नसलेला तो आधुनिक जगातील एकमेव स्वतंत्र देश आहे.
https://www.britannica.com/topic/flag-of-Nepal
... इंडोनेशिया बेटांचा समूह
... इंडोनेशिया बेटांचा समूह विकायला काढणार आहे. ...
विकत / दीर्घ मुदतीच्या भाडेकरारावर अनेक बेटे त्यांनी आधीच दिली आहेत. उदा बिंटान बेट सिंगापूर सरकारने पैसे मोजून घेतलंय आणि अनेक श्रीमंत सिंगापूरकरांनी तिथे मोठाले व्हिला विकत घेतलेन. विकांताला बोटींनी जायचे आणि सोमवारी सकाळी परत सिंगापुर असे करतात लोकं.
अच्छा ! चांगली माहिती
अच्छा ! चांगली माहिती
जगातले एकमेव तरंगते टपाल
जगातले एकमेव तरंगते टपाल कार्यालय काश्मीरमध्ये आहे असे वाचले.
https://www.wionews.com/india-news/worlds-only-floating-post-office-in-k...
आफ्रिका खंड दुभंगून नव्या
आफ्रिका खंड दुभंगून नव्या महासागराची निर्मिती होणार का, हा सध्याचा भूगोलातील एक प्रचंड कुतुहलाचा विषय आहे :.
https://www.thearchaeologist.org/blog/a-new-ocean-is-being-formed-in-afr....
ही प्रक्रिया हळूहळू सुरू झालेली आहे असे अभ्यासकांचे मत दिसते.
अर्थातच याला लाखो वर्षे लागतील हे उघड आहे.
चिली हा देश कवींचा देश म्हणून
चिली हा देश कवींचा देश म्हणून ओळखला जातो असे वाचले.
इथली काव्य परंपरा खूप चांगली आहे.
आतापर्यंत या देशाच्या दोन कवींनी साहित्यातील नोबेल प्राप्त केलेले आहे (1945 व 1971).
अरे वा! पाबलो नेरुडा हा कवि
अरे वा! पाबलो नेरुडा हा कवि चिली चा दिसतो.
Pages